* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: October 2026

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

10/1/26

उत्क्रांतिवाद : डार्विन आणि वॉलेस Evolutionism: Darwin and Wallace

मूळ लेखक — अच्युत गोडबोले

सहलेखक — अमृता देशपांडे
पुस्तक — सजीव
प्रकाशक — मधुश्री पब्लिकेशन

भाग १

१ जुलै १८५८ हा दिवस डार्विनसाठी अत्यंत महत्त्वाचा, पण तितकाच विचित्र दिवस ठरला. त्या संध्याकाळी त्याचा सिद्धान्त जगासमोर आला. लिनियन सोसायटीत तो वाचला जात होता. पण त्याच वेळी तो आणि त्याची बायको आपल्या चार्ल्स या मुलाचा अंत्यसंस्कार करत होते. स्कार्लेट फीवरनं डार्विनच्या मुलाचा जीव घेतला होता. एकीकडे त्याची २० वर्षांची मेहनत जगासमोर येत होती, तर दुसरीकडे त्याचा मुलगा त्याला सोडून गेला होता.

या घटना इतक्या सहज घडल्या नव्हत्या. त्याचा सिद्धान्त वाचला जात असला, तरी त्याच्या या सिद्धान्तात अजून एक जण भागीदार झाला होता. त्याचं नाव होतं—अल्फ्रेड रसेल वॉलेस! त्यामुळे त्याचा हा सिद्धान्त आता 'डार्विन-वॉलेस' सिद्धान्त झाला होता. नेमकं काय झालं होतं?

डार्विननं आपले सिद्धान्त पुस्तकरूपात लिहिले. पण ते प्रकाशित व्हायच्या आधीच एक संकट त्याच्यासमोर उभं ठाकलं. १८५८ साली अल्फ्रेड रसेल वॉलेस या तरुण 'नॅचरॅलिस्ट'नं स्वतःच्या एका प्रबंधाचा ड्राफ्ट डार्विनला पाठवला. त्यात त्यानं डार्विनसारखीच 'नॅचरल सिलेक्शन'ची थिअरी मांडली होती. आपलीच थिअरी वॉलेसही मांडतोय हे बघून डार्विन थक्क झालाच, पण त्याचे डोळेही खाडकन उघडले.

आता पुस्तक प्रकाशित केलं, तर वॉलेसच्या कल्पना चोरल्या असा आरोप आपल्यावर येईल आणि प्रकाशित नाही केलं तर आपली २० वर्षांची मेहनत पाण्यात जाईल. मग नेमकं करावं तरी काय? असा प्रश्न डार्विनला पडला होता.

पुस्तक परत व्यवस्थित लिहून काढावं म्हटलं, तर त्याचा मुलगा चार्ल्स त्याच वेळी वारला. 'मी या संशोधनाचं क्रेडिट स्वतःच घेऊन असं अतिशय कोत्यासारखं वागण्यापेक्षा मी ते पुस्तक जाळून टाकणं पसंत करीन,' असं तो या वेळी म्हणाला होता.

शेवटी डार्विननं आपला प्रश्न चार्ल्स ल्येल आणि जोसेफ हुकर यांना सांगितला. त्या दोघांनी यातून एक उपाय काढला. 'ही थिअरी डार्विन आणि वॉलेस या दोघांची आहे' असं जगाला सांगावं, असं त्यांनी सुचवलं.

त्या संध्याकाळी लिनियन सोसायटीत एकूण सात प्रबंध वाचले गेले. त्यात डार्विन-वॉलेस यांचाही प्रबंध वाचला गेला. डार्विन या महत्त्वाच्या क्षणी तिथं हजर राहूच शकला नव्हता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या सभेत हजर असलेल्या ३० जणांना या अत्यंत क्रांतिकारक प्रबंधाबद्दल विशेष काही वाटलं नाही. त्यांच्या दृष्टीनं तो निव्वळ एक साधा प्रबंध होता.

लिनियन सोसायटीमध्ये नेहमीच असे अनेक प्रबंध वाचण्याचा कार्यक्रम होत असल्यामुळे त्यांना यात क्रांतिकारक असं काहीच वाटलं नाही. त्यामुळे डार्विन आणि वॉलेस यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यावर ना वाद झाले, ना चर्चा. जग हादरवून टाकणारा असा तो प्रबंध असूनही ते सगळे तीस लोक काहीच न घडल्यासारख्या निर्विकार चेहऱ्यानं आपापल्या घरी गेले!

पण ही थिअरी मात्र नंतर 'डार्विन-वॉलेस' थिअरी राहिली नाही. याचं कारण खुद्द वॉलेस होता. प्रसिद्धीच्या मागे नसणाऱ्या वॉलेसनं स्वतःहूनच या थिअरीला 'डार्विनिझम' संबोधायला सुरुवात केली होती. त्यामुळे क्षणार्धात कुठल्याही वादविवादाशिवाय त्यानं डार्विनला जगप्रसिद्धी बहाल केली होती.

डार्विन आता चांगलाच प्रसिद्ध झाला होता, पण त्याला सहसहजी प्रसिद्धी उपभोगता येणारच नव्हती. त्याच्यासमोर अजून एक संकट उभं राहिलं. नॅचरल सिलेक्शनच्या आधारे उत्क्रांतिवादाची तत्त्वं डार्विननं मांडली. त्याच्या २० वर्ष आधीच आपण ती मांडल्याचा आणि डार्विननं ती चोरल्याचा आरोप पॅट्रिक मॅथ्यू यानं केला!

त्यानं 'Naval Timber and Arboriculture' अशा पुस्तकात ही तत्त्वं मांडली होती, असा त्याचा दावा होता. पण गंमत अशी होती, की एक तर हे पुस्तक फारसं कुणालाही माहीत नव्हतं आणि अशा पुस्तकाच्या 'Appendix'मध्ये त्यानं ही तत्त्वं मांडली होती. अर्थातच ती कुणीच वाचली नव्हती. डार्विनला प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यावर मॅथ्यूनं थोडा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणीच ऐकला नाही. डार्विन मात्र हळूच माफी मागून मोकळा झाला.

या बाबतीत आणखी एक गंमत झाली. ऑक्सफर्डमध्ये एडवर्ड पाउल्टन (१८५६–१९४३) हा एक प्राणिशास्त्रज्ञ राहात असे. त्याला १८४९ साली बॉस्टनमध्ये छापलेलं पत्रक मिळालं. जी. एच. स्लीपर या अमेरिकनानं त्या काळी लिहिलेलं पत्र अल्फ्रेड वॉलेसच्या हातात पडलं होतं आणि त्यानं ते सरळ पाउल्टनला पाठवून दिलं होतं.

या पत्रकात डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्याच नव्हे, तर पाश्चरच्या सूक्ष्मजंतूंविषयीच्या थिअरीजही नीटपणे मांडल्या होत्या. म्हणजे डार्विन आणि पाश्चर हे खरे मूळचे संशोधक नव्हतेच, तर! पाउल्टननं लगेच त्यावर भाषणं द्यायला सुरुवात केली. 'नेचर'मध्ये अनेक लेख छापून आले. पण नंतर हे सगळंच फ्रॉड असल्याचं लक्षात आलं आणि स्लीपरनं हे मुद्दामहूनच जुन्या तारखेचं पत्र काढलं होतं, हे लक्षात आलं.

१८२३ साली वेल्समध्ये जन्मलेला वॉलेस अत्यंत गरिबीत वाढला. नऊ भावंडांपैकी अल्फ्रेड हा आठवा. तो १३व्या वर्षीच शाळा सोडून कुटुंबाला हातभार लावायला लागला. जमिनीचा सर्व्हे करण्याच्या कामात तो भावाला मदत करायला लागला. मग काही काळ त्यानं शिक्षकाचंही काम केलं.

१८४८ साली वॉलेस ब्राझीलमध्ये गेला. तिथं बरंच भटकून त्यानं जमिनीचे, खडकांचे, प्राण्यांचे, वनस्पतींचे बरेच नमुने आणि फॉसिल्सही गोळा केले. यात गोळा केलेल्या गोष्टी वस्तुसंग्रहालयांना विकून पैसा मिळवायचा, असा त्याचा घाट होता. चार वर्षं ॲमेझॉन नदीकाठी फिरताना वॉलेस 'नरभक्षक' लोकांमध्येही राहिला. त्यांनाही एक वेगळी संस्कृती आणि माणुसकी आहे, हे त्यानं जाणलं.

१८५२ साली परतीला निघाला असताना वॉलेसचं जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. त्यावेळी मलेरियाचा ताप अंगात असताना एका पडावातून फक्त नेसते कपडे आणि काही वह्या घेऊन तो किनाऱ्यावर आला खरा, पण ते जहाज मात्र बुडालं. प्रचंड मेहनत घेऊन गोळा केलेले नमुने, प्राणी, पक्षी यांचा खजिनाही त्या जहाजाबरोबर डोळ्यांसमोर बुडताना त्यानं बघितला.

यानंतर १८५४ ते १८६२ मध्ये तो मलाया आणि मसाल्यांच्या बेटांवर नमुने गोळा करायला गेला. इथंच त्यानं 'वॉलेस लाइन'ची कल्पना मांडली. इंडोनेशियातून काढलेल्या या काल्पनिक रेषेच्या अलीकडे आशिया खंडातले प्राणी आणि पलीकडे ऑस्ट्रेलियातले प्राणी आढळतात. खूप पूर्वीपासून भूखंड सतत सरकताहेत, त्यामुळेच असं झालं होतं.

१८५८ साली वॉलेसही 'नॅचरल सिलेक्शन'मधून 'उत्क्रांतिवाद' या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचला. त्यानं तसं डार्विनला लिहिलं आणि मग नाट्य सुरू झालं होतं.

इकडे वॉलेसनंच उत्क्रांतिवादाची ही थिअरी डार्विनचीच आहे हे मान्य केल्यावर १८५९ च्या हिवाळ्यात डार्विननं आपले विचार प्रकाशित करायचं ठरवलं आणि 'द क्वार्टर्ली रिव्ह्यू' या एका प्रतिष्ठित नियतकालिकाकडे प्रकाशनापूर्वीची प्रत पाठवली. संपादकानं ते वाचलं, पण त्याला त्यात फारसा 'दम' वाटला नसल्याचं कळवलं. या उत्क्रांतिवादाच्या भानगडीत न पडता 'तू कबुतरांवर का लिहीत नाहीस? ते पुस्तक जास्त खपेल,' असा सल्लाही दिला.

स्वतः डार्विनला तरी कुठं फारशी खात्री होती? जॉन मरे या प्रकाशकाला 'तुम्हाला आवडलं तरच छापा, नाहीतर नाही छापलं तरी चालेल. आपल्या करारातून मी तुम्हाला लगेच मुक्त करेन,' असंही डार्विननं लिहिलं.

डार्विननंही त्या पुस्तकाचं 'An Abstract of an Essay on the Origin of Species and Varieties through Natural Selection' असं लांबलचक आणि भीतिदायक शीर्षक दिलं होतं. ते वाचून जॉन मरे हादरलाच. त्यानंही त्याच्या फक्त ५०० प्रतीच काढायच्या ठरवल्या. पण जेव्हा डार्विननं त्याचं शीर्षक 'On the Origin of Species' असं सुटसुटीतरीत्या बदललं, तेव्हा आता ते पुस्तक जास्त खपेल या आशेनं मरेनं १,२५० प्रती काढल्या.

पुस्तकाची किंमत त्यानं १५ शिलिंग ठेवली होती. आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी त्या सगळ्या प्रती खपल्या! यानंतर मग आजपर्यंत ते छापतच गेलं आणि गाजतच राहिलं! आणि त्यानं वादळंही खूपच उठवली! पण ते कायम 'बेस्ट सेलर' यादीतच राहिलं आणि स्पॅनिश, बोहेमियन, पोलिश, रशियन, जपानी एवढंच नव्हे तर प्रत्येक युरोपियन भाषेत त्याचं भाषांतर झालं.

डार्विननं १२ वर्षांनंतर 'The Descent of Man' लिहिलं आणि पूर्वीच्या कल्पनांना हादराच दिला. यापूर्वी 'हे जीवसृष्टीतले सगळे जीव देवानं निर्माण केले आणि त्यानंतर त्यात काहीच बदल झालेले नाहीत. माणूस हा या जीवसृष्टीतला सर्वोच्च बिंदू आहे आणि त्यामुळे तो इतर प्राण्यातून निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असंच ठामपणे मत लोकांचं शतकानुशतकं झालं होतं. धर्मही तेच सांगत होता. डार्विननं माणूसही या उत्क्रांतीत एपपासून कसा निर्माण झाला असावा याविषयी तर्क मांडले होते.

उत्क्रांतिवादामधले काही महत्त्वाचे मुद्दे असे—सजीवांच्या जातींना कायमचं अस्तित्व नसतं, तर त्या कायम बदलत असतात. सर्व जातींना अस्तित्वासाठी आणि पुनरुत्पादनासाठी झगडा करत राहावा लागतो. या अस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्या जाती अपयशी ठरतात, त्या नामशेष होतात. ज्या टिकून राहतात त्यांच्या पुनरुत्पादनातून अशा जातींची वाढ होते. यालाच 'नॅचरल सिलेक्शन' असं म्हणतात.

या प्रकारच्या जातींमधल्या बदलांना लाखो वर्षं वेळ लागतो. या 'नॅचरल सिलेक्शन'ला डार्विनला खूप महत्त्व आहे. नाहीतर फक्त उत्क्रांतिवादाच्या जवळपास तसे बरेच जण पोहोचले होते.

इकडे डार्विनच्या विचारांनी खळबळ माजली होती. त्याचे विचार चर्चला आणि धर्मनिष्ठ लोकांना मान्य नव्हतेच आणि प्रत्यक्ष शास्त्रज्ञांतही त्याविषयी शंका होत्याच. डार्विनची थिअरी 'फॉसिल्स'वरून सिद्ध होत नाही, असं काहींचं म्हणणं होतं. जर प्राणी उत्क्रांतीनं हळूहळू बदलत असतील, तर मग दोन प्राण्यांमधल्या वेगवेगळ्या अवस्थेतले अनेक प्राणी सापडायला हवे होते. तसे तर काही प्राणी दिसत नव्हते.

पण 'या उत्क्रांतीसाठी प्रचंड मोठा काळ लागतो,' असं डार्विन म्हणे, तेही कित्येकांना पटत नसे. डार्विनच्या अगदी जवळ असलेल्या मंडळींनीही त्याच्यावर टीकेचाच सूर धरला. डार्विनची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रंही त्या काळी प्रकाशित होत.

एकदा तर नाकतोडा, कुठलासा बग, फुलपाखरू यांचे वेगवेगळे अवयव कापून ते एकमेकांना जोडून 'नवीनच' एक प्राणी बनवून दोन मुलं डार्विनची चेष्टा करायला त्याला दाखवायला घेऊन आली आणि हा कुठला प्राणी आहे, असं त्याला विचारलं. डार्विननं शांतपणे उत्तर दिलं, 'हमबग!' ते ऐकून मुलं पळूनच गेली.

या सगळ्या टीकेत टी. एच. हक्सले (१८२५–१८९५) यानं मात्र डार्विनचे विचार खूपच जोरदारपणे पुढे मांडले. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले आणि प्रसिद्ध लेखक आल्डस हक्सले हे याचे नातू.

टी. एच. हक्सलेनं उत्क्रांतिवादाबद्दल सहा भाषणं दिली. ती खूप गाजली, पण त्यांनी वादळही उठवलं. कुठल्याही जाहीर वादचर्चेमध्ये लाजराबुजरा डार्विन जातच नसे. हक्सलेच त्याच्यावतीनं बोलायचा. इतकं की हक्सलेला डार्विनचा 'बुलडॉग' म्हणत.

२७ जून १८६० रोजी ऑक्सफर्डमध्ये डार्विनचा विरोधक रिचर्ड ओवननं आपली मतं मांडली होती. त्या वेळी हक्सलेनं त्याच्या जागेवरूनच त्याला सडेतोड उत्तरं दिली होती.

तीनच दिवसांनी हक्सले आणि बिशप विल्बरफोर्स यांच्यात जाहीर वाद होणार असल्याचं जाहीर झाल्यानं लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

विल्बरफोर्स काही कच्चा नव्हता. त्यानं १८२६ साली गणितात ऑक्सफर्ड विद्यापीठातली प्रथम श्रेणी पटकावली होती. तो उत्कृष्ट बोले आणि त्यामुळे त्याला 'सोपी सॅम' या टोपणनावानं हाक मारत.

त्याने उत्क्रांतिवादाच्या विरुद्ध एक लेख 'द क्वार्टर्ली रिव्ह्यू'मध्ये लिहिला होता आणि शिवाय, प्रत्यक्ष वादचर्चेत भाग घेऊन डार्विनला त्याची जागा दाखवून देण्याची प्रतिज्ञाही केली होती.

गंमत म्हणजे 'विज्ञानात रस नसलेल्या लोकांसमोर कशाला वाद घाला?' या विचारांनी हक्सले या वादाला हजरच राहणार नव्हता. पण त्याला डार्विनचा एक चाहता रॉबर्ट चेंबर हा आदल्याच दिवशी भेटला. त्यानं हक्सलेला थांबण्याचा आग्रह केल्यामुळे हक्सले कसाबसा त्या चर्चेला हजर झाला.

प्रत्यक्ष वादाच्या वेळी हजर असलेले १,००० लोक ठरलेल्या जागेत मावेनात, म्हणून त्यांना शेवटी कार्यक्रमाची जागा बदलावी लागली होती. अनेक लोक उभे राहूनच ऐकत होते. जीवशास्त्रातले तज्ज्ञ या सभेला हजर होते. त्यात अनेक धर्मपंडितही होते. तर इथं गरमागरम वादावादी बघायला मिळणार म्हणून अनेक विद्यार्थीही दाटीवाटीनं बसले होते.

अनेकांची भाषणं झाल्यावर शेवटी बिशप विल्बरफोर्स बोलायला उठला. विल्बरफोर्स हा सर रिचर्ड ओवेनकडून बरंच काही शिकून आला होता. ओवेन हा हक्सलेचा शत्रू होता. 'सोपी सॅम'नं विनोदाने बाजी मारून नेली, पण त्याला तर्कशुद्ध मांडणी करता येईना.

शेवटी वादात युक्तिवाद काहीच करता येईना तेव्हा बिशपनं कुत्सितपणे काहीतरी शेरा मारून हक्सलेला खजील करण्याच्या उद्देशानं विचारलं, 'तुमचे पूर्वज एप होते ते आईकडून की वडिलांकडून?'

तेव्हा हक्सले गरजला होता, 'मला जर एप आणि कुठल्याही वैज्ञानिक चर्चेतही असे मूर्खासारखे प्रश्न विचारणारा सुशिक्षित माणूस यांच्यात जर कोणी पूर्वज म्हणून निवडायचा झाला, तर मी नक्कीच एप निवडेन.'

पण यानंतर सभागृहात एकच हलकल्लोळ माजला. अनेक माणसं उठून एकाच वेळी बोलायला लागली, त्यात वादावादी आणि मारामाऱ्या काय झाल्या, काही विचारू नका! त्यात एक बाई चक्क बेशुद्ध पडली.

'बीगल'चा कॅप्टन फिट्झरॉय हाही या सभेला हजर होता. त्याला डार्विनची मतं मुळीच पटायची नाहीत. त्यानं त्याची धार्मिक मतं असणारं डार्विनविरोधी भाषण या गोंधळातच उभं राहून ठोकलं.

या गदारोळानंतर दोन्ही गट आमचाच विजय झालाय, असं एकमेकांकडे बघत ओरडून आपापल्या दिशेनं शेवटी गेले. पण कित्येकांच्या मते हक्सले हा त्या दिवशीचा हिरो झाला होता!

भाग समाप्त — डार्विन आणि वॉलेस यांच्या विचारांनी सुरू झालेल्या उत्क्रांतीच्या वादळाची पहिली लाट