* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/९/२३

थोर विचारवंत कन्फ्यूशियस / The great thinker Confucius.

जेव्हा रस्त्यात एखादा चिनी आपणास भेटतो, तेव्हा अहंकार-प्रदर्शक तुच्छतेने आपण त्याच्याकडे पाहतो.परंतु चिनी मनुष्यही त्याच तुच्छतेने आपणाकडे पाहत असतो. असे तुम्हाला सांगितले,तर तुम्हाला एकदम धक्का बसल्यासारखे होईल,नाही ? चिनी मनुष्य आपणा पाश्चिमात्यांस अडाणी,अहंकारी अशी जंगली लोकांची एक जात.असे मानतो.तीन हजार वर्षांपर्यंत चिनी जनतेने ज्ञानी पुरुषांची वीरपुरुष समजून पूजा केली.तलवारीची पूजा न करता त्यांनी ज्ञानाची पूजा केली.जी राष्ट्रे आपल्या सैनिकांना नि आपल्या कुबेरांना श्रेष्ठ नागरिक समजतात,

अशा राष्ट्राविषयी चिनी मनुष्य आदर दाखविणे सुतराम अशक्य आहे.चिनी लोकांस स्वतःच्या इतिहासाचा फार अभिमान वाटतो.त्यांच्या दंतकथांप्रमाणे त्यांची संस्कृती वीस हजार वर्षांची जुनी आहे.या दंतकथा आणखी असे सांगतात,की चिनी लोकांचे पूर्वज हे जवळ जवळ पशुतम स्थितीतच होते.ते गुहांमध्ये राहात,कातडी पांघरीत.नंतर कित्येक शतकांनी एक महान राजवंश आला. त्या राजांनी लोकांना शेती शिकविली;त्यांनी त्यांना सुधारणा नि

संस्कृती दिली.डार्विनच्यापूर्वी कित्येक हजार वर्षे ज्ञानगाथा रचणाऱ्या त्या चिनी ऋषिमुनींना उत्क्रांतीची अंधूक का होईना, कल्पना असावी असे वाटते.

संस्कृतीच्या पुरातनत्वाविषयीची त्यांची कल्पना अतिशयोक्तीची आहे,काव्यमय आहे.चीन देशातील संस्कृतीच्या प्रत्यक्ष खुणा ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपासूनच्या सापडतात.या वेळेस त्यांनी चित्रलिपीचा आरंभ केला होता.तिची वाढ ते करू लागले होते.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस या मधील लेख )


चीनच्या आरंभीच्या इतिहासात शत्रूच्या स्वाऱ्यांचा त्यांना त्रास झालेला दिसत नाही. चीनलाही विजयध्वज मिरवीत जाण्याची इच्छा नव्हती.चीनमध्ये सैनिक हा खालच्या दर्जाचा मानला जाई.सैनिकांची प्रतिष्ठा तिथे नव्हती. खाटीक,व्यापारी,सैनिक हे एकाच दर्जाचे,वरचे स्थान ज्ञानोपासकांना असे.राजांची स्तुती त्यांच्या दिग्विजयांसाठी केली.जात नसे,तर शांतता ठेवीत म्हणून.

चिनी प्रजा युद्धाचा तिरस्कार करी. जीवन सुसंस्कृत असावे असे त्यांना वाटे.सज्जन व सुसंस्कृत अशा उदात्त जीवनाची भक्ती त्यांच्या ठायी होती.अशा निर्मळ जीवनाविषयी त्यांना परमादर वाटे.रेशमाच्या किड्यांची त्यांनी वाढ केली.रेशमाचा व्यापार त्यांनी सुरू केला. पागोडाचे अद्भुत शिल्प त्यांनी निर्मिले व त्याची वाढ केली.एकावर एक तंबू उभारल्याप्रमाणे त्यांचे हे शिल्प दिसते.त्यांनी वैद्यकीचा अभ्यास केला,काव्याची जोपासना केली.ताऱ्यांच्या गतींशी त्यांनी परिचय करून घेतला.

बहुजन समाजाला शिक्षण मिळावे व राज्यकारभार नीट चालावा म्हणून पंडितवर्गाची,मांदरिनवर्गाची संस्था त्यांनी स्थापिली.या वर्गात वंशाला मान नसून ज्ञानाला मान असे.

येथे ज्ञानाची प्रतिष्ठा होती.एखाद्या झाडूवाल्याचा मुलगाही मांदारिन होऊ शकत असे.आवश्यक असे ज्ञान त्याने मिळवलेले असले म्हणजे झाले.उलट,एखादा मांदारिनाचा मुलगाही जर त्याला विद्वता नसेल, तर झाडूवाला होत असे. हे मांदारिन म्हणजे आळशी लोक नव्हते.ते सनदी नोकरीत शिरत. राजाला देशाची व्यवस्था ठेवण्यासठी ते मदत करीत.चीनमध्ये राजसत्ता होती.परंतु अनियंत्रित जुलूम नव्हता.बहुतेक चिनी प्रांतांना प्रबुद्ध अशा राजसत्तेचा अनुभव येई.परंतु असे समजू नका,की त्या काळातील चीन म्हणजे निर्दोष भूमी होती.राजाला मदत करणारे पंडित हे नेहमीच प्रामाणिक असत असे नाही.

राजाची मर्जी मिळविण्यासाठी खुशामतीचा वक्र रस्ताच अधिक जवळचा असतो,असे त्यांना आढळून आले होते.लाचलुचपतीस भरपूर वाव होता. धनार्जन करण्याच्या संधी येत आणि तत्त्वज्ञानी असणारे हे मुत्सद्दीही मोहाला बळी पडल्याशिवाय राहात नसत.कधी कधी तत्त्वज्ञान्यालाही स्वतःचे खिसे सोन्याने भरलेले असावेत असे वाटते.तसेच हे तत्त्वज्ञानी जर कधी प्रामाणिक निघाले,तर राजे त्यांचा सल्ला ऐकतच असे होत नसे.या प्राचीन चिनी लोकांत पूर्णता होती.असे समजण्याचे कारण नाही.काही अतिरंजित इतिहासकारांनी चीन म्हणजे जणू स्वर्ग असे चित्र रंगविले आहे,ते बरोबर नाही.चिनी लोकांमध्ये इतरत्र आढळणारा आणखी एक दोष होता.ते फार अहंकारी होते.जे जे परकी येत,ते त्यांना सैतानी वाटत.परकीयांना ते सदैव तिरस्काराने वागवीत.त्यांच्या देशाचे प्राचीन नाव 'मध्यदेश', 'मध्यराज्य' असे होते.त्यांची अशी समजूत होती,की परमेश्वराने आपणास पृथ्वीच्या मध्यभागी ठेवले आहे.इतर राष्ट्रांपेक्षा आपणच प्रभूचे अधिक लाडके असे त्यांना वाटे. आपण काय ते श्रेष्ठ;असे मानण्याचा मूर्खपणा करण्यात ते अर्वाचीनांच्या बरोबरीचे होते.परंतु कितीही दोष असले,तरी चिनी लोक ख्रिस्तीशकापूर्वीच्या नवव्या शतकात उच्च संस्कृतीवर होते.ही गोष्ट नाकबूल करण्यात अर्थ नाही.परंतु नंतर दुर्दिन आले.हूणांशी त्यांचा संबंध आला.हे हूण चीनच्या पश्चिमेस होते.ते शेळ्या-मेंढ्या पाळीत.ते रानटी होते.शांतताप्रिय चिनी लोकांत लष्करी सत्तेचे विष त्यांनी पोहोचवले.हे पाश्चिमात्य जंतू त्यांच्यात शिरले. चीनमध्ये आजही पाश्चिमात्य लष्करशाहीचे जंतू शिरताना दिसत आहेत.हूणांशी संबंध आल्यामुळे सत्तालालसेचे जे विष चिनी राष्ट्रांत शिरले ते नष्ट करावयास बरीच वर्षे लागली.कितीतरी यादवी युद्धे झाली.आणि नंतर अराजकतेचा काळ आला.सारा देश जणू वेडापिसा बनला.सर्वत्र हाणामारी! वाटेल त्याने उठावे व लहान राज्य स्थापावे.देशाचे शत खंड झाले,

अनेक छोटीछोटी राज्ये सर्वत्र निर्माण होऊन ती परस्परांस नष्ट करू पाहात होती.यावेळी बाहेरचे रानटी लोक आले.

विस्कळीत चीन या रानटी टोळधाडीपुढे टिकाव धरू शकला नाही.परंतु सुदैवाने याच सुमारास चीनमध्ये थोर विचारवंत जन्माला आले.त्यांनी लोकांना पुन्हा समतोलपणा दिला.विवेक दिला.या ज्ञानी व चारित्र्यसंपन्न लोकांत दोन मुकुटमणी होते.एक लाओत्से व दुसरा कन्फ्यूशियस.


लाओत्से ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात जन्मला. कन्फ्यूशियसपेक्षा लाओत्से पन्नास वर्षांनी वडील.अती पूर्वेकडील भागातील लाओत्से,बुद्ध व कन्फ्यूशियस हे तीन परत थोर महात्मे,मानव जातीचे हे सदगुरू एकाच शतकात झाले,ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात धरण्यासारखी आहे. धन्य ते शतक !


जॉन दी बॅप्टिस्ट हा जसा ख्रिस्ताचे आगमन सुचविणारा होता,त्याप्रमाणे लाओत्से कन्फ्यूशियसचा जणू अग्रदूत होता.त्याने कन्फ्यूशियससाठी भूमिका तयार करून ठेवली.त्याने कन्फ्यूशियसच्या आगमनाचे जणू शिंग फुंकले.परंतु कन्फ्यूशियसची विचारसरणी जशी स्पष्ट असे,त्याची भाषा जशी साधी व सरळ असे,तसे लाओत्सेचे नसे.लाओत्सेच्या विचारांत विशदता नव्हती.तो थोडा गूढवादी होता. लाओत्से लोकांना उपदेशी, "न्यायावर प्रेम करा; नेमस्त व संयमी बना; प्रमाण राखा, देहान्त शिक्षा रद्द करा; युद्धाचा धिक्कार करा, जगण्यासाठी हे जग अधिक सुखाचे व आनंदाचे करा." ही ध्येये अती सुंदर होती यात शंका नाही. परंतु प्राथमिक अवस्थेतील राष्ट्राला ही ध्येये जरा अमूर्तच होती,

अर्थहीन,दूरची अशी होती. लाओत्से पुष्कळ वेळा रहस्यमय बोले,गूढ बोले. त्याच्या म्हणण्याचा भावार्थ फारच थोड्यांच्या लक्षात येई.त्या बेबंदशाहीच्या काळात चीनला जर कशाची खरोखर जरूर असेल,तर ती व्यवहार्य व समजण्यास सोप्या अशा निश्चित आचारनियमांची होती.दैनंदिन व्यवहारात सर्वांनी कसे वागावे ते सांगणारी व सर्वसंग्राहक अशी सोपी.सुटसुटीत स्मृती त्यांना हवी होती. लाओत्से हे करू शकत नव्हता.तो फार उंच पडे लोकांनी लाओत्सेला देव बनविले.आणि भविष्यकालीन मोक्षप्राप्तीसाठी ते त्याची प्रार्थना करू लागले.परलोकासाठी लाओत्से,परंतु इहलोकी कन्फ्यूशियसच त्यांचा खरा मार्गदर्शक होता. कन्फ्यूशियस किंवा कुंग-फू-त्सी या नावाचा "तत्त्वज्ञानी कुंग" असा अर्थ आहे. त्याच्या पित्याचे नाव शुहलिंग,तो पित्याचे बारावे अपत्य होता.शुहलिंग हा सैनिक होताकू-प्रांतात तो राहात असे.चीनमध्ये सैनिकांना सामान्यतः मान कमी.परंतु त्या वेळेस सैनिकांची किंमत जरा वाढली होती.नैतिक मूल्यांचे जरा पुन्हा मूल्यमापन केले गेले.त्या वेळेस सर्वत्र लष्करी धिंगाणे चालले होते.

गावांचे,शहरांचे रक्षण करणे अगत्याचे असे.कोण कधी हल्ला करील,याचा नेम नसे.म्हणून सैनिकांची प्रतिष्ठा जरा वाढली होती.शुहलिंग हा शूर शिपाईगडी होता.त्याला खूप मानमान्यता मिळाली होती.अनेक पदव्या मिळाल्या होत्या.तथापि तो सुखी नव्हता.त्याला नऊ मुली झाल्या,

परंतु मुलगा नव्हता.त्याची एक रखेली होती.तिच्यापासून त्याला दोन मुलगे झाले.परंतु ते औरस नव्हते.सनातनी चिनी मनुष्यास एक तरी औरस पुत्र असावा असे वाटे, जसे सनातनी ज्यूस अद्याप वाटते.मृत पित्यासाठी जे विधी करावयाचे,ते चिनी लोकांत व ज्यू लोकांत फक्त औरस पुत्रच करू शकतो.म्हणून शुहलिंगने पुन्हा लग्न करण्याचे ठरविले. त्याचे वय सत्तरहून अधिक होते.नऊ मुलांची माता ती पहिली पत्नी त्याने दूर केली आणि एका लहान मुलीबरोबर त्याने लग्न केले.चीनमध्ये पत्नीला पुत्र होत नाही ही सबब काडीमोडीसाठी होई आणि हे जे अप्रस्तुत व असमान असे विषम लग्न लागले,त्याचे फळ म्हणून पूर्वेकडील अत्यंत शहाणा मनुष्य जन्माला आला.

ख्रि.पू.५५१ मध्ये कन्फ्यूशियस जन्मला.वयाच्या

तिसऱ्या वर्षी कन्फ्यूशियस पितृहीन झाला.कन्फ्यूशियस अती बुद्धिमान होता.लहान वयातच त्याची अलौकिक बुद्धी दिसू लागली. त्याच्या त्या निरोगी व धष्टपुष्ट शरीरात अत्यंत प्रभावी असे मन होते;अती प्रभावशाली बुद्धी होती.तो व्यायामाचा फार भोक्ता होता.परंतु त्यापेक्षाही काव्याचा व संगीताचा अधिक भक्त होता.भराभरा त्याने सारे ज्ञान आत्मसात केले. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याचे गुरुजन त्याला म्हणाले,"तुला शिकवायला आता आमच्याजवळ काही उरले नाही."पुढे दोन वर्षांनी त्याला अकस्मात स्वत:चा अभ्यास सोडावा लागला.त्याची आई गरीब होती.तिला त्याची मदत हवी होती.आईला आधार देणे त्याचे कर्तव्य होते.आपल्या देशाच्या लहान राज्यातील शेतीखात्यात तो कारकून झाला.सतरा वर्षांच्या मुलाला ती जागा झेपायला जरा कठीणच होती.परंतु कन्फ्यूशियसने कुरकूर केली नाही.वास्तविक स्वतःचा जेवढा बोजा, त्याहूनही तो अधिक उचली.त्याला जणू ती सवयच होती.कारकुनी डोक्यावर असतानाच लग्न करून त्याने बायकोचा आणखी बोजा उचलला.लग्नाच्या वेळेस त्याचे वय केवळ एकोणीस वर्षांचे होते.एका वर्षांने त्याला पहिला मुलगा झाला.त्याचे हे लग्न सुखप्रद झाले नाही. का ते कळत नाही.कदाचित त्याच्या पत्नीला सुंदर सुभाषितांपेक्षा अधिक रूचकर व स्वादिष्ट अशा अन्नाची जरुरी असावी.कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना उपदेशाचे,सुंदर सूत्रमय वचनांचे खाद्य देई;परंतु पत्नी या शब्दांनी थोडीच संतुष्ट होणार!तिला प्रत्यक्ष पोटभर अन्न हवे होते.


चोविसाव्या वर्षी त्याची आई त्याला सोडून गेली. सनातनी चिनी रूढीप्रमाणे मातृशोकप्रदर्शनार्थ त्याने नोकरी सोडली.मातृशोकप्रदर्शनाची मुदत अडीच वर्षांची असे.

कन्फ्यूशियसने ती अक्षरक्ष: पाळली.कन्फ्यूशियस आपल्या देशाचे सारे रीतिरिवाज पाळण्यात अत्यंत दक्ष असे.कन्फ्यूशियस जरी तरुण होता,वयाने अद्याप फारसा मोठा नव्हता.तरी स्वतःच्या मित्रमंडळींत सौम्य व शांत स्वभवाचा,तसेच अती बुद्धि मान म्हणून त्याची ख्याती झाली.त्याची बुद्धी खरोखरच तेजस्वी होती.त्याचे मन प्रगल्भ होते. एका मित्रांनी आग्रह केल्यावरून तो फिरता आचार्य झाला,परिवाजक उपदेशक झाला.तो जेथे जेथे जाई तिथे तिथे निष्ठावंत शिष्यांचा मेळावा त्याच्याभोवती जमे.बैलगाडीत बसून तो या गावातून त्या गावी जात असे.

मधूनमधून विश्रांतीसाठी तो मुक्काम करी.एखाद्या नदीकाठी थांबे;शिष्यांना प्रवचन देई.प्रश्नोत्तरे चालत,चर्चा होई.कधी भाताच्या शेताजवळ मुक्काम पडावा. कधी चेरी झाडांनी सुगंधित केलेल्या स्थानी ते थांबत.अशा रीतीने सर्वत्र संचार करीत असता संसाराला उपयोगी असे ज्ञान तो सर्वत्र पेरीत जाई.ते विचार देशभर पसरले.जे श्रीमंत असत त्यांच्याजवळून तो थोडी गुरुदक्षिणा घेई.जे गरीब असत.त्यांनी मूठभर तांदूळ किंवा वाळलेला मांसखंड दिला,तरी त्याला समाधान असे.उदार व उदात्त जीवनाची शिकवण त्याने सर्वत्र दिली. तोच त्याचा अविरत उद्योग होता.श्रेष्ठ अशा मानवांचा एक नवीन वंशच तो चीनमध्ये जणू निर्मू पाहात होता. जणू श्रेष्ठ पुरुषांचे प्रतिष्ठित असे राष्ट्रच निर्माण करण्याचे त्याचे ध्येय होते.


लोकांना नीट वळण द्यायचे असेल, तर आधी न्यायी राज्यव्यवस्था हवी,ही गोष्ट कन्फ्यूशियसच्या लक्षात आली.तो हेतू मनात धरून तो सर्व प्रांतांतून भटकला. तो निरनिराळ्या राजांना भेटला व म्हणाला, "मी तुमचा प्रधान होऊ का? चांगला राज्यकारभार निर्माण करतो.माझे विचार प्रत्यक्षात आणतो." हा तत्त्वज्ञानी अशा राजाच्या शोधात होता. इतिहासातील अत्यंत विचित्र व आश्चर्यकारक असा हा शोध होता.कधीकधी वाटे,की त्याच्या शोधात त्याला यश येईल,एखादा राजा त्याला प्रयोगाला वाव देईल. त्या वेळचा 'चि' प्रांत म्हणजे अती बंडखोर प्रांत होता.त्या प्रांतांच्या राजाने आपल्या दरबारी कन्फ्यूशियसला महत्त्वाची जागा देऊ केली.परंतु एका मत्सरी मंत्र्याने राजाचे कान फुंकले आणि आयत्या वेळेस राजाने नकार दिला. कन्फ्यूशियस पुन्हा आणखी एखादे प्रयोगार्ह राज्यक्षेत्र शोधीत निघाला.तो आपल्या स्वतःच्या लू प्रांती आला.लू प्रांताच्या राजाने त्याला एका शहराचा मेयर नेमले.नंतर त्याने त्याला सर्व राज्यातील मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले. तो न्यायमंत्री झाला.

कन्फ्यूशियस सम्राटाला म्हणाला,"लोकांना सदैव शांती दे व पोटभर अन्न दे.


 उर्वरित भाग पुढील लेखामध्ये.. 


१/९/२३

ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण २ In the Footsteps of Hiuen Tsang

मिशीने कमीत कमी सामान बरोबर घ्यायचा प्रयत्न केला होता,तरीही ते बऱ्यापैकी जड़ होतं. चीनमधल्या प्रवासात वेगवेगळ्या शहरांमधील माणसांच्या गर्दीने ती हैराण झाली होती. चीनमधली यलो रिव्हर म्हणजे पीत नदी ही सुसंस्कृत चीन आणि गावंढळ चीन यांच्यामधली सीमारेषा आहे.असं म्हटलं जातं. श्वेन ग्लांग हे या नदीचं मूळ नाव. ही नदी क्विलियन पर्वतराजीच्या पायथ्याकडून वाहते.

मिशीची आगगाडी या नदीला समांतर अशी उत्तरेकडे जाऊन लिआंगझू या ठिकाणी थांबली. लिआंगझूच्या उत्तरेला मंगोलियाचा मैदानी प्रदेश सुरू होतो.या शहराच्या रक्षणासाठी बांधलेल्या चीनच्या भिंतीच्या भागाचं रेल्वे स्टेशनवरूनच दर्शन होतं.मिशीला या शहरात ह्युएन त्संगची स्मृती जागवणारं काहीही दिसलं नाही.दरम्यान, चीनमधल्या रेल्वे प्रवासात रेल्वे यंत्रणेशी आणि खाली उतरून गावांमधून भटकताना सरकारी यंत्रणेशी वाद ही अपरिहार्य घटना असते हे एव्हाना तिला समजून चुकलं होतं.मिशीचा पुढला प्रवास मुख्यत्वे पश्चिमेकडे जाणाऱ्या 'सिल्क रूट' मार्गे होणार होता.गोबीचं वाळवंट पार करून गेल्याशिवाय तो मार्ग भेटणार नव्हता.आधुनिक साधनांनी आणि प्रस्थापित मार्गाने जातानाही मिशीला खूप थकवा जाणवला.ह्युएन त्संगच्या काळात तर गोबी वाळवंट पार करणारी व्यक्ती परतणार नाही हे गृहीत धरलं जायचं.

वाटेत तहान-भुकेने मेलेल्या माणसांचे आणि त्यांच्या प्राण्यांचे सांगाडे पडलेले दिसत असत.ह्युएन त्संग चांग गावाला पोहोचला तेव्हा तिथल्या सर्व भिक्खूंनी आणि अखेरीस राजानेसुद्धा त्याने जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करू नये म्हणून ह्युएन त्संगची विनवणी केली.पण ह्युएन त्संग निश्चयाचा पक्का होता.मिशीला अडवणारं मात्र कुणीच नव्हतं. तुर्फानपासून सिल्क रूट पुढे नैर्ऋत्येकडे वळतो.कोल टाग पर्वतराजी ओलांडून बोस्टांग सरोवराच्या काठाने तो यांकीला पोहोचतो.ह्युएन त्संग या प्रदेशाला ओ- की - नीचं राज्य म्हणतो.इथे अरेबिक आणि चिनी अशा दोन भाषा बोलल्या जातात.पूर्वी या शहराला 'यांघी शहर' असं म्हटलं जायचं.त्याचा अर्थ 'आगीचं शहर' मिशीने आता वाटेत लागणाऱ्या ठिकाणांची नावं नीट लक्षात ठेवायला सुरुवात केली;कारण त्या प्रत्येक नावामागे एक कहाणी होती,काही अर्थ होता. इथेच

ह्युएन त्संगच्या तांड्यावर दरोडखोरांनी हल्ला चढवला.

लूटमार करून ते नाहीसे झाले. त्यानंतर ह्युएन त्संगला पंचवीस-तीस परदेशी व्यापारी भेटले. ते चीनहून परत मध्य आशियाकडे निघाले होते.सर्वांनी एकत्रच मुक्काम केला.पण त्या व्यापाऱ्यांना घाई असावी.कारण ह्युएन त्संग आणि त्याचे भिक्खू साथीदार जागे झाले तेव्हा ते व्यापारी गायब झाले होते.सकाळी ह्युएन त्संगचा तांडा पुढे निघाला,तर काही अंतरावर त्या व्यापाऱ्यांची हत्या झालेली त्यांना दिसली.त्यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पसरले होते.हुई लीने ही हकीकत थोडक्यात लिहून ठेवली आहे.

मिशी आता १३०० वर्षांनंतर त्याच मार्गावरून निघाली होती. सुदैवाने तिच्या मार्गात असा धोका नव्हता.


इथून पुढे मिशीला किर्गिझस्तानमध्ये प्रवेश करायचा होता.आता हळूहळू तिच्या चिनी ज्ञानाची उपयुक्तता कमी कमी होत होती.या प्रदेशात मुस्लिम उघूरवंशीयांचं प्रमाण अधिक आहे.चीनपेक्षा त्यांना किर्गिझस्तान देश अधिक जवळचा वाटतो.मिशीने आगगाडीने काशगर गाठलं.

काशगर आणि मुख्य चिनी भूप्रदेश यांच्यामध्ये जाणवण्या

इतका फरक होता. काशगरमध्ये तिला एक्झल हा जर्मन तरुण, एक इस्त्रायली तरुणी,तसंच तिचा न्यूझीलंडवासी मित्र भेटले.ते सारे खुजेराब खिंडीतून किर्गिझस्तानातून पुढे पाकिस्तानमध्ये जाणार होते.मिशीला किर्गिझस्तानात पोचवायची व्यवस्था करणारा माणूस आता टाळाटाळ करत होता.त्याच वेळी तिला बर्नार्ड आणि कॉन्स्टन्स हे जर्मन जोडपं भेटलं.त्यांनाही किर्गिझस्तानात जायचं होतं.

ह्युएन त्संग काशगरहून किर्गिझस्तानात घोड्यावर बसून गेला होता. वाटेत त्याचे सात साथीदार अति थकवा,गार वारे,वेगवेगळे आजार यामुळे निजधामास गेले होते.मिशी आणि तिचे तीन साथीदार टोयोटा लँड क्रूझरमधून तोच रस्ता अगदी आरामात काटत होते.वाटेत त्यांना ह्युएन त्संगच्या त्या सात साथीदारांच्या कबरी लागल्या.


चीन आणि किर्गिझस्तानच्या सीमारेषेवरची सुरक्षा

व्यवस्था खूपच कडक होती.मिशीचं भारतीय पारपत्र बघून तिथला अधिकारी चक्रावला.मिशी म्हणजे चीनमधून किर्गिझस्तानात प्रवेश करणारी त्या सुरक्षा अधिकाऱ्याला भेटलेली पहिली भारतीय व्यक्ती होती.त्याने तिला अनेक प्रश्न विचारून तिच्या भारतीयत्वाची खात्री करून घेतली आणि मगच तिच्या पारपत्रावर प्रवेश दिल्याचा शिक्का उमटवला.या प्रकारात तासभर तरी गेलाच. आता टोरुगार्ट खिंड ओलांडून ते किर्गिझस्तानात शिरले.अनेक उघूर व्यापारी बिश्केक इथल्या बाजारात माल विकत घ्यायला आणि विकायला निघाले होते.आजही सिल्क रूट हा व्यापारी मार्ग होता. दोन-अडीच हजार वर्षांपासून तो प्रामुख्याने व्यापारासाठीच तर वापरला जात होता. किर्गिझस्तानात बनाईने पुढच्या प्रवासाची व्यवस्था आधीच केली होती.त्याची एक सहकारी झेन्या राजधानी बिश्केकहून गाडी घेऊन हजर होती.परदेशी प्रवाशांनी काशगर ते बिश्केक हा प्रवास सार्वजनिक वाहनाने करण्यास दोन्ही शासनांची परवानगी नव्हती.त्यामुळे आधीच खासगी वाहनाची सोय करावी लागली होती.

ह्युएन त्संगने ज्या ठिकाणाहून किर्गिझस्तानात प्रवेश केला त्याहून हे ठिकाण बऱ्याच दक्षिणेला होतं.त्यामुळे मिशीला पुन्हा ह्युएन त्संगचा माग काढणं भाग पडलं.

ह्युएन त्संगने या प्रवासात अनेक साथीदार गमावले होते.हुई लीला त्या प्रवासाचं वर्णन ऐकवताना ह्युएन त्संगच्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहत होती. किर्गिझस्तानातसुद्धा वाटेवर जागोजाग कबरी होत्या.

व्यापारी मार्ग असल्यामुळे जागोजागी दरोडेखोरांचं भय असे.पर्वतराजीचे चढ-उतार जीवघेणे होतेच.त्यात अतिथंड,शुष्क आणि विरळ हवासुद्धा जीवघेणी ठरत होती.किर्गिझस्तानातून मिशी उझबेकिस्तानात समरकंद इथे आली.हे बाबराचं गाव. उझबेकिस्तानातून अमुदर्या नदी ओलांडून ह्युएन त्संगने अफगाणिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर हिंदुकुश पर्वतराजी ओलांडून तो गांधार

मध्ये आला होता.मग सिंधू नदी ओलांडून काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या हुंझामध्ये त्याने प्रवेश केला होता.(हुंझा हा खरं तर काश्मीरचा भाग, पण १९४८ साली तो पाकिस्तानने बळकावला.आपण त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.) ह्युएन त्संगला इथे विरळ हवेचा त्रास झाला होता.अधूनमधून भास होत होते.खोल दऱ्यांतून वाहणारे जलप्रवाह रिबिनीसारखे दिसत होते.

बारामुल्लाची खिंड ओलांडून त्याने काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला होता. इ.स. ६२८ मध्ये ह्युएन त्संग काश्मीरमध्ये पोहोचला तेव्हा त्याचा प्रवास सुरू होऊन एक वर्ष झालं होतं. त्याने त्या काळातील २४ राज्यं आणि १३,८०० किमी इतकं अंतर ओलांडलं होतं.ह्युएन

त्संगच्या काळात समरकंद हे एक महत्त्वाचं आणि भरभराटीला आलेलं शहर होतं. ह्युएन त्संग त्याचा उल्लेख 'सा-मो-की एन' असा करतो.इथल्या नर्तिकांना चिनी सम्राटाच्या दरबारात खूप मागणी होती.समरकंद सोडून गाढवाच्या पाठीवर बसून केशला जाताना मिशी आजारी पडली.तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

ताप होताच.अंगात त्राण उरले नव्हते.पण सुदैवाने थोडी विश्रांती घेतल्यावर मिशीचा ताप उतरला.तिला बरं वाटू लागताच तिच्या रशियन मार्गदर्शक साथीदाराच्या मदतीने तिने अफगाणिस्तानकडे कूच केलं.मिशीचा प्रवास अफगाणिस्तानात पोहोचेपर्यंत तसा सरळ झाला असंच म्हणावं लागेल.आंतरराष्ट्रीय प्रवासात खुष्कीच्या मार्गाने प्रवास करताना ज्या अडचणी येतात त्यात शारीरिक अडचणी,आजार हे गृहीत धरावेच लागतात.सर्वांत जास्त त्रास सरकारी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा,टेबलाखालून होणारे व्यवहार व लालफीत यांचा असतो.या अनुभवातून मिशी तावून-सुलाखून पार पडली होती.ह्युएन त्संगला सरकारी अडचणी आल्या नव्हत्या.त्या काळात ज्ञानाला किंमत होती. ह्युएन त्संगच्या ज्ञानपिपासू वृत्तीची हकीकत सर्वदूर पसरलेली होती.त्याच्या मार्गात सर्वत्र बौद्धमठ होते.त्यामुळे तो मुक्कामाला जिथे जाईल तिथे त्याचं स्वागतच झालं होतं.त्या काळात इस्लाम नुकताच जन्माला येत होता. त्याचा प्रसार झाला नव्हता.ही गोष्टही ह्युएन त्संगच्या पथ्यावर पडली होती.मिशी अफगाणिस्तानमध्ये गेली तेव्हा तिथली बौद्ध शिल्पं शाबूत होती.तिच्यापुढे पहिली अतिशय गंभीर अडचण इथेच पहिल्यांदा उभी राहिली. ती जरी हाँगकाँगवासी असली,

अमेरिकी पद्धतीचं इंग्रजी बोलत असली,तरी तिने भारतीय नागरिकत्व सोडलेलं नव्हतं.तिचा पासपोर्ट अजूनही भारतीयच होता.त्यामुळे तिला पाकिस्तानने वास्तव्य परवाना नाकारला. नाकारला.त्यामुळे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात न जाता मिशी थेट भारतात परतली.ह्युएन त्संग भारतात जसा फिरला तशी तीही फिरली.त्या काळात म्हणजे २००१ मध्ये तिला काश्मीरमध्ये जाऊ नको.असं सांगण्यात आलं,तरी ती गेली.भारतातून परतताना ह्युएन त्संग (तेव्हा अस्तित्वात नसलेल्या) पाकिस्तानमधून गेला होता.मिशीने भारतातून पाकिस्तानात जाण्याचा परवाना मिळवला आणि मग ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करायचा आपला निश्चय पूर्ण केला.


ह्युएन त्संगने भारतात दहा वर्षं वास्तव्य केलं.जाताना तो ६५७ सूत्रं आपल्याबरोबर घेऊन गेला.चीनमध्ये परतल्यावर त्याने आपला एक मठ स्थापन केला तिथे तो त्याच्या अभ्यासानुरूप बौद्ध मत शिकवू लागला. त्याची ही पाठशाळा त्याच्या मृत्यूबरोबर अस्तंगत झाली.पण त्याच्यामुळे चीनमधील बौद्ध मताला आणि बौद्धधर्माला लेखी आधार मिळाला. 


प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्रांचं अचूक आणि यथोचित भाषांतर उपलब्ध करून देणारा आणि त्याच्यावर टिप्पणी करणारा आद्य चिनी भाष्यकार म्हणून तो मान्यता पावला.


मिशी ह्युएन त्संगची ही सारी हकीकत त्याच्या आणि हुई लीच्या शब्दांत सांगते,ह्युएन त्संगच्या प्रवासाचं यथातथ्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करते आणि ते सांगता सांगताच आपल्या स्वतःच्या प्रवासाचं वर्णन अशा तऱ्हेने करते की ह्युएन त्संगच्या प्रवासातल्या अडचणी आणि संकटं आपल्यापुढे प्रकर्षाने उभी राहावीत.या तिच्या शैलीमुळे तिच्याबद्दलचा कौतुकमिश्रित आदर वाढीस लागतो हे नक्की.बरं,ती फक्त ह्युएन त्संगच्या प्रवासा

पुरतीच आपली लेखणी मर्यादित ठेवत नाही,तर अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात फिरताना सिकंदर,

त्यानंतरचे ग्रीक, त्यांच्या संस्कृतीचं आपल्याला मिळालेलं देणं, आपण त्यांना काय दिलं,या साऱ्याची सहजगतीने नोंद करून इतिहासाचा मोठा पट आपल्यापुढे उभा करते.

मिशीचं हे पुस्तक माहितीने ठासून भरलेलं असलं तरी कुठेही नीरस आणि कंटाळवाणं झालेलं नाही.एकीकडे ह्युएन त्संगचा प्रवास,दुसरीकडे तिचा स्वत:चा प्रवास,तिला वाटेत भेटलेल्या सहप्रवाशांची स्वभावचित्रणं,त्याचबरोबर त्या जागेचा इतिहास, त्या जागेसंबंधीच्या दंतकथा अशा बऱ्याच गोष्टींची उकल करत मिशी वाचकाला परत ह्युएन त्संगच्या घरी घेऊन जाते आणि हा प्रवास संपतो.


३०.०८.२३ या लेखातील शेवटचा भाग…

३०/८/२३

ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण In the Footsteps of Hiuen Tsang

सातव्या शतकात अशक्यप्राय वाटणारा सोळा हजार किलोमीटर पायी प्रवास करून भारतात आलेल्या ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाबद्दल आपण साऱ्यांनी वाचलेलं असतं,पण त्याच्या या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यावं असं आपल्यापैकी कितीजणांना वाटतं?

ह्युएन त्संगने झपाटलेल्या एका महिलेने तेराशे वर्षांनंतर त्याच्या इतिहासाचा माग काढत त्याच्याच मार्गाने प्रवास केला.त्याची ही गोष्ट.


इ.स. ६२७ आपल्याला ह्युएन त्संग नावाने परिचित असलेल्या (मूळ चिनी उच्चार श्वेन झांग) चीनमधल्या तरुण बौद्ध भिक्खूने बौद्ध धर्माबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी भारताच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.त्या काळी बौद्ध पौथ्यांचे चिनी अनुवाद अगदीच यथातथा असत. विशेषतः ह्युएन त्संगला रस असणाऱ्या योगकार पठडीतल्या ग्रंथांचे अनुवाद अनाकलनीय होते. त्यामुळेच ह्युएन त्संगची उत्सुकता चाळवली गेली.बौद्ध धर्म नेमका कसा आहे,त्याचे विचार काय आहेत हे स्वतः जाऊन समजून घेतलं पाहिजे,या विचाराने तो झपाटला होता.

बौद्ध धर्माविषयीची आस्था आणि एका प्रकारच्या साहसाचं आकर्षण यातून तो एके दिवशी भारताच्या दिशेने चालू लागला.भारतात दहा वर्षं मुक्काम,एकूण सोळा हजार किलोमीटरचा प्रवास करून अठरा वर्षांनी तो पुन्हा चीनमध्ये परतला.कोणत्याही सोई-सुविधा नसताना, जगाच्या नकाशाचं ज्ञान नसताना त्याने हा  प्रवास कसा केला असेल या विचारानेही आपण थक्क होतो.भारतातल्या मुक्कामात संस्कृत भाषा शिकून ह्युएन त्संगने बौद्ध धर्माचा अभ्यास केला.त्याचा बहुतेक काळ तो नालंदा विद्यापीठात शीलभद्र नावाच्या तत्त्वज्ञाच्या सहवासात होता.चीनमध्ये परतल्यानंतर तो तिथे बौद्ध मत शिकवू लागला.त्याच्या लिखाणामुळे प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्राचं अचूक भाषांतर झालं.चीनमधील बौद्ध मताला लेखी आधार मिळाला.पण ह्युएन त्संगचं महत्त्व फक्त चीनपुरतं मर्यादित नाही;त्याने आपल्या विस्तृत प्रवासाबद्दल लिहिलेल्या टिपणांमधून आज आपल्याला त्या काळातला भारत समजून घेण्यासही मोठी मदत होते.ह्युएन त्संगने उचललेलं साहसी पाऊल आपल्याला चीनशीच नव्हे.तर आपल्याच इतिहासाशीही जोडतं.


ह्युएन त्संगबद्दलची ही माहिती म्हणजे आपल्यासाठी एखाद्या पुस्तकातलं एखाद प्रकरण.जे वाचून पुस्तक मिटवायचं आणि पुढच्या विषयात शिरायचं;पण पत्रकार लेखिका मिशी सरण मात्र तसं करू शकली नाही.जन्माने भारतीय असणारी मिशी अमेरिकेत लहानाची मोठी झाली.आपल्या उच्च शिक्षणासाठी 'तिने 'चीनची संस्कृती' हा विषय निवडला. त्यानंतर बीजिंग आणि नानजिंग इथे पुढच्या अभ्यासासाठी तिने दोन वर्षं वास्तव्य केलं.तिथे तिने 'मँडारिन' या प्रमुख प्रमाणित चिनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं.या काळातच तिची ह्युएन त्संगशी जवळून ओळख झाली.या तरुण साहसी चिनी प्रवाशाने मिशीचा जणू ताबाच घेतला.पुढे १९९४ मध्ये ती वास्तव्यासाठी हाँगकाँगला गेली. तिथे ती वार्ताहर म्हणून काम करत होती.वयाची तिशी पार केल्यावर आपण फारच चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय ही भावना तिला छळायला लागली.अशाच एका आत्मपरीक्षणाच्या उदास संध्याकाळी तिच्या मनात अनेक दिवसांपासून रेंगाळणारा एक विचार पुन्हा वर उफाळून आला ह्युएन त्संग ज्या मार्गाने भारतात गेला त्या मार्गाने आपणही का जाऊ नये? हा विचार बरेच दिवस तिच्या मनात येत होता;पण त्याकडे दुर्लक्ष करत तिची दैनंदिन कामं चालू होती.पण एके दिवशी आतला आवाज ऐकत तिने ह्युएन त्संगच्या पावलावर पाऊल टाकत हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.ह्युएन त्संग चीनमधून भारताकडे निघाला त्यानंतर तब्बल तेरा शतकांनंतर मिशी सरणने तितकंच धाडसी पाऊल उचललं होतं. 'चेजिंग द मॉक्स शॅडो अ जर्नी इन द फुटस्टेप्स ऑफ ह्युएन त्संग' हे पुस्तक म्हणजे ह्युएन त्संग आणि मिशी सरण या दोघांच्या प्रवासाची गुंफण आहे.

ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करण्याचं ठरलं,पण ते प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार होता.ह्युएन त्संगभोवती निर्माण झालेली दंतकथांची जळमटं दूर करून त्याच्याबद्दलची,तसंच त्याच्या प्रवासाबद्दलची यथातथ्य माहिती शोधून मगच तिला खऱ्या प्रवासाची तयारी करता येणार होती.पण तिने कंबर कसली आणि कामातून वेळ काढून एक दिवस ती हाँगकाँगहून बीजिंगला जाऊन धडकली.बीजिंगमध्ये चौकशी केल्यावर तिला माहिती कळली,की तिथे एक संस्था ह्युएन त्संग,त्याचं कार्य,त्याचं लेखन आणि त्याचा विचार यांचा अभ्यास करते. ती तडक त्या संस्थेत पोहोचली. तिथले भारताविषयीचे दोन तज्ज्ञ व्हांग शिचुआन आणि सुन बावगांग तिच्या शंकासमाधानासाठी सज्ज झाले.दोघंही भारतात राहून आलेले होते. 'खरं तर तू आमच्याकडे याआधीच यायला हवं होतंस !' या वाक्याने त्यांनी मिशीचं स्वागत केलं. दोघांच्या बोलण्यातून ह्युएन त्संगबद्दलचा त्यांना वाटणारा अभिमान प्रतीत होत होता.त्यांनी मिशीला ह्युएन त्संगची चरित्रकहाणी ऐकवली. 'चिनी संस्कृती समजून घ्यायची तर त्या संस्कृतीवरचा भारतीय प्रभाव जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल,' या वाक्याने त्यांनी आपल्या मार्गदर्शनाचा शेवट केला. त्यांनी मिशीला कुणाकुणाशी संपर्क साधायचा त्या संस्था आणि व्यक्तींचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले आणि तिच्या धाडसी उपक्रमाला तोंडभरून शुभेच्छाही दिल्या.मिशीचा ह्युएन त्संगच्या शोधाचा प्रवास सुरू झाला लुओयांग इथून. 

लुओयांग हे ह्युएन त्संगचं जन्मगाव. इ.स. ६०० मध्ये ऐन हिवाळ्यात त्याचा जन्म झाला.त्याचं जन्मनाव होतं चेन यी चेन यी म्हणजे चेन नदीच्या काठी जन्माला आलेला.

योग्य वेळी बौद्ध भिक्खूंनी चेन यीच्या डोक्यावरचे केस भादरले.त्याला दीक्षा देऊन नवोदित म्हणून त्यांच्या पंथात दाखल करून घेतलं.त्या वेळी त्याचा नवा जन्म झाला, म्हणून त्याला ह्युएन त्संग हे नवं नाव दिलं गेलं.


ह्युएन त्संगच्या या गावात इ. स. ५०८ मध्ये बोधी ऋषीचं आगमन झालं होतं.सम्राटांच्या आज्ञेनुसार युंग-निंग मठात बसून त्यांनी ३९ ग्रंथांचा अनुवाद केला.त्यात लंकावतार सूत्र, कमल सूत्र,हीरक सूत्र यांच्याबरोबरच असंघ आणि वसुबंधू या दोन भावांनी रचलेले अनेक ग्रंथ होते.मिशी त्या गावी पोहोचली तेव्हा एके काळी भरभराटीला आलेल्या या गावाचं भकास दर्शन तिला घडलं आणि हाती घेतलेल्या प्रवासाबद्दल तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; पण तिचा निश्चय ढळला नाही. तेव्हा चीनमध्ये स्वातंत्र्याचे मर्यादित वारे वाहू लागलेले होते,पण तरी परक्या व्यक्तींकडे संशयाने बघण्याच्या वृत्तीत फारसा फरक पडलेला नव्हता.पासपोर्टधारी व्यक्तीला गावातल्या सर्वात महागड्या हॉटेलात ठेवायचं आणि दुभाष्या नेमायचा,ही प्रथा अजूनही पाळली जात होती.मिशीने मँडारिनमध्ये ती हाँगकाँगची रहिवासी आहे हे सांगून एका छोट्या हॉटेलात जागा मिळवली आणि दुभाष्याला हुसकून लावलं.सर्वप्रथम तिने ह्युएन त्संगच्या कुटुंबाची म्हणजे चेन कुटुंबीयांची गाठ घेतली. चेन झवेई हा ह्युएन त्संगच्या रक्ताचा अंश असलेला तरुण तिला भेटला.त्याने मिशिला ह्युएन त्संगच्या आई-वडिलांच्या समाधीकडे नेलं. त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होती. ह्युएन त्संगची आई इ.स. ६०४ मध्ये, तर वडील इ.स. ६०९ मध्ये वारले होते. गावाजवळच्या एका शेतात त्यांना पुरण्यात आलं होतं. त्या वेळी ह्युएन त्संग खूपच लहान होता. गावात ह्युएन त्संगचे कपडे आणि कटोराही पुरलेले असल्याचं तिला कळलं.ह्युएन त्संगच्या आई-वडिलांची समाधी पाहून मिशी त्या ठिकाणी पोहोचली.तिथला पॅगोडा आता जवळजवळ भग्नावस्थेतच होता. पुढल्या प्रवासात हळूहळू मिशीच्या लक्षात येत गेलं, की गौतम बुद्धांच्या अवशेषांप्रमाणेच ह्युएन त्संगचे अवशेषही जगभरात विखुरलेले आहेत.

ह्युएन त्संगने आपल्या प्रवासाची साद्यंत हकीकत मृत्युपूर्वी शब्दबद्ध केली.बौद्ध धर्माच्या मूळ पोथ्यांचा अभ्यास करणं हा या प्रवासाचा मूळ हेतू होता.ही सर्व हकीकत तांग राजघराण्याच्या काळातील प्राचीन रूढ चिनी भाषेत नमूद करण्यात आली होती.अत्यंत काटेकोरपणे 'ता तांग शी युझी' म्हणजे 'ह्युएन त्संगने नोंदवलेली पश्चिमेकडच्या जगाची हकीकत' अशा शीर्षकाच्या या हकिकतीचं लिखाण इ. स. ६४८ मध्ये पूर्ण झालं.त्यात रस्त्यांबाबतचं मार्गदर्शन,एका स्थानापासून दुसऱ्या स्थळी पोहोचायला लागलेले दिवस,त्या काळात काटलेलं अंतर,वाटेत लागलेले जलप्रवाह,नद्यांच्या खोऱ्यांमधून घेतली जाणारी पिकं,वाटेत कळलेल्या स्थानिकांच्या हकिकती आदी अनेक बाबी अंतर्भूत आहेत.त्यामुळेच ही हकीकत म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज बनली आहे.ह्युएन त्संगच्या या प्रवासवर्णनातून पश्चिम चीन,मध्य आशिया,अफगाणिस्तान,वायव्य भारत आणि भारतातील तेव्हाच्या परिस्थितीचं तपशीलवार वर्णन आढळतं.तेव्हाचा वायव्य भारत म्हणजे आजच्या पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांत.ह्युएन त्संग भारतातून परतला आणि त्याच सुमारास भारतावर इस्लामी आक्रमणाची सुरुवात झाली.ज्या भूभागातून ह्युएन त्संग भारतात आला त्या मध्य आशियात आणि अफगाणिस्तानात इस्लामी प्रभाव वाढला.मात्र,मिशीच्या प्रवासाचा मुख्य आधार होता तो म्हणजे ह्युएन त्संगचा समकालीन आणि परिचित हुई लीने लिहिलेलं ह्युएन त्संगचं चरित्र.हे चरित्र चीनमध्ये पुराणग्रंथांच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे.या चरित्राचा चिनी अभिजात साहित्यावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे.भारतीय आणि चिनी संस्कृतीत हा मोठा फरक आहे.भारतात मौखिक परंपरा असल्याने इतिहासात सांगोवांगीच्या गोष्टींची भर पडत राहते.त्यामुळे त्या घटना आधुनिक काळात पोहोचेपर्यंत त्यातली विश्वासार्हता नष्ट होऊन इतिहासाला दंतकथांचं स्वरूप प्राप्त होतं. चीनमध्ये मात्र गेल्या तीन हजार वर्षांचा इतिहास अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.त्याला दंतकथांची जोड मिळण्याची शक्यता दिसत नाही.ह्युएन त्संगने हुई ली बरोबर त्याच्या प्रवासासंबंधी अधूनमधून शिळोप्याच्या गप्पा मारल्या असणार हे उघडच आहे. हुई ली आपल्या मित्राच्या रोमहर्षक प्रवासवर्णनाने अतिशय भारावून गेला होता, हे त्याने लिहिलेल्या चरित्रावरून सहज स्पष्ट होतं. या चरित्रातली काही वर्णनं अतिशयोक्तिपूर्ण आहेत,पण ही वर्णनं ह्युएन त्संगच्या विस्तृत टिपणांशी ताडून पाहून ह्युएन त्संगचा वास्तव चरित्रपट आज तेरा शतकांनंतरही आपल्याला पाहता येतो.( हटके भटके,निरंजन घाटे, समकालीन प्रकाशन पुणे )  इ. स. ६१८ मध्ये चीनमधील सुई राजवंशाची सद्दी रक्तलांच्छित क्रांतीमुळे संपुष्टात आली.ह्युएन त्संग आणि त्याचा मोठा भाऊ लुओयांग हे जन्मगाव सोडून आधी चांग आन आणि तिथून चेंगडूला पळाले.चेंगडूला त्यांनी महायान संग्रह आणि अभिधर्म कोश यांचा अभ्यास केला. ह्युएन त्संगचं या अभ्यासाने समाधान झालेलं नव्हतं.त्याला योगाकारभूमी शास्त्र आणि परमार्थ सूत्राचा अभ्यास करायचा होता.त्या काळात चीनमध्ये भारतीय ग्रंथांचे वेगवेगळे अनुवाद उपलब्ध होते.एकाच ग्रंथाच्या दोन अनुवादांत सुसूत्रता आणि साम्य या दोहोंचाही अभाव होता.प्रत्येक अनुवादानुसार अनेक पंथ अस्तित्वात आले होते.यामुळेच ह्युएन त्संगने भारतात जायचं ठरवलं.आपल्या प्रवासात ह्युएन त्संग आधी सिचुआनला पोहोचला. तिथून पूर्वेकडे जिआंगसू आणि हेनानला गेला.इथल्या बौद्ध पीठांमध्ये त्याची प्रवचनं होत होती.त्याने या काळात बौद्ध तत्त्वज्ञानासंबंधीचे अनेक वाद जिंकले.बौद्ध तत्त्वज्ञानाचा जाणकार विद्वान म्हणून त्याची कीर्ती पसरू लागली. इ. स. ६२५ मध्ये तो चांग आनला परतला.पुढच्याच वर्षी चीनमध्ये परत एकदा क्रांती झाली आणि तांग साम्राज्याचा पाया घातला गेला.तांग साम्राज्याचा काळ चीनच्या इतिहासात 'सुवर्णकाळ' म्हणून नोंदवला गेला. ह्युएन त्संगसमोर फाही येन आणि ची येन या दोन विद्वानांचा आदर्श होता.त्यांनी भारतात जाऊन बौद्ध सूत्रांचा अभ्यास आणि अनुवाद केला आणि ती चीनमध्ये आणली. 'मलाही तेच करायला हवं' असं ह्युएन त्संगला वाटू लागल्याचं हुई लीने लिहून ठेवलं आहे.

मिशीनेही लुओयांगहून चांग आन गाठलं.चांग आनला आता झिआन असं म्हणतात.एके काळची तांग साम्राज्याची ही राजधानी आता चीनच्या शांगझी या प्रांतात आहे.ह्युएन त्संगचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला ते पाहून तिथूनच मिशीलाही तिचा खरा प्रवास सुरू करायचा होता.चीनच्या १९५८ च्या सांस्कृतिक क्रांतीत ह्युएन त्संगचे अवशेष त्याच्या मूळ समाधीतून दुसरीकडे हलवण्यात आले.या नव्या जागेचे दर्शन घेऊन मिशीची भारत यात्रा सुरू झाली.


उर्वरित प्रवास पुढील लेखामध्ये…

२८/८/२३

'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत - २ 'Departed' Al Mustafa Angel - 2


कृपाळूपण स्वतःची प्रतिमा आरशात स्वतःच न्याहाळत बसेल तर ते शिळारूप होईल. सत्कृत्य स्वतःलाच कुरवाळून घेत आत्मप्रशंसा करील तर शापचिंता निर्माण करील.तुमच्यापैकी काहींनी मला माणूसघाणा म्हटलं. आपल्याच एकलेपणात धुंद असतो म्हटलं. कोणी म्हणाले,अरण्यातील वृक्षवेलींशी हा संवाद करतो तितका माणसांशी करीत नाही. डोंगरमाथ्यावर जाऊन एकलकोंडा बसतो आणि आमच्या वस्तीकडे अवहेलणेच्या नजरेनं पाहतो.जिवलग मित्रहो,डोंगरवाटांनी मी चालत राहिलो आणि दूर विजनात दिवस काढले : हे नसतं केलं तर उंचावरून,दूर अंतरावरून तुमच्याकडे मला कसं पाहता आलं असतं?अंतर राखलं नाही अन् दुरून पाहिलं नाही तर एखाद्याला कुणाशी जवळीक कशी साधेल ?


इतर काहींनी,प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही तरी मला म्हटलं :परदेशी यात्रिका,कधीही पोहोचू शकणार नाहीस अशा उत्तुंग शिखरांचा ध्यास घेतला आहेस.गरुड जिथं घरटं बांधतो त्या टकमक सुळक्यावर तू बैठक का मांडतोस ? जे अप्राप्य त्याच्या शोधात का असतोस ? कोणती वादळं तुला आपल्या जाळ्यात बंदिवान् करायची आहेत ?कोणते ध्रुमधूसर पक्षी

आकाशमार्गावर धरू पाहतोस ? 

ये,आमच्यातला एक होऊन राहा.खाली उतरून ये.आमचं अन्न घेऊन भूक शांत कर.आमच्या मद्यानं तहान भागव.' त्यांनी काढलेले हे शब्द अंतःकरणापासूनचेच होते.

पण,मित्रहो,अधिक खोलात जाऊन त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना कळलं असतं की,तुमच्या आनंदाचं आणि दुःखाचं रहस्य कशात,त्याच्या शोधात मी होतो.


आकाशपंथांनी विहरणारे तुमचे आत्मपक्षी माझा पारधविषय होते.पण मी कसला पारधी ? माझीच पारध होत राहिली.माझे कित्येक बाण धनुष्यातून सुटले पण परतून माझ्या हृदयावर आदळले.उंचावर मी जात होतो,

तरी मला सरपटावं लागलं,हेही खरं.माझे पंख उन्हात पसरलेले होते तरी जमिनीवरील त्यांची सावली कासवगतीची होती.एवढा मी श्रद्धावान् पण शंका-संशयांनी भरलेला होतो. कित्येकदा माझ्याच

यातनांच्या जखमा मी चाचपून पाहिल्या आहेत,आणि त्यामुळ तुमच्यावरचा माझा विश्वास वाढला आहे.तुमचं अधिक ज्ञान मला झालं आहे.हा माझा विश्वास आणि हे माझं ज्ञान यांच्या बळावरच मी सांगतो तुम्ही आहात ते तुमच्या देहात बद्ध नाहीत:तुमच्या घराचे आणि शेतमळ्यांचे तुम्ही कैदी नाहीत.


तुमच्यांत जे वस्तीला आहे ते पर्वतशिखरांच्याही वरून संचार करतं.वाऱ्यासोबत स्वैर भटकतं. ऊब मिळावी म्हणून सूर्यप्रकाशात वळवळावं आणि सुरक्षिततेसाठी जमिनीखाली अंधाऱ्या बिळांत वावरावं,अशी तुमच्या अंतरात्म्याची गत नाही.तो मुक्त आहे : जगाला व्यापून राहणारं, अंतराळात मुक्त संचार करणारं ते चैतन्य आहे.

हे माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या.त्यांना साफसूफ करायला बघू नका.सगळ्याच गोष्टींचा आरंभ संदिग्ध आणि व्यामिश्र असतो,तरी त्यांचा शेवट तसा नसतो. मी म्हणजे केवळ एक आरंभ - दर्शन,इतकाच तुमच्या आठवणीत न राहीन तर किती छान होईल! चेतना आणि ती धारण करणारे जीव यांचा जन्म केवळ धुक्यात होतो : स्वच्छ केलासात (crystal) होत नाही.आणि कुणास ठाऊक,केलास ही धुक्याची अधोगती तर नसेल?


मी तुमच्या आठवणीत राहणार असेन तर मी सांगतो त्या गोष्टींचे स्मरण ठेवावं असं मला वाटतं. तुमच्या आत जे जे निःशक्त आणि विस्कटलेलं दिसेल ते ते अत्यंत शक्तिमान, अत्यंत निर्धारशील आहे असं समजा.तुमचे श्वासनिःश्वास, त्यांनीच तुमच्या हाडांना ताठ,कणखर आणि सुडौल केलं नाही काय? या श्वासांची भरती-ओहोट तुमच्या दृष्टिपथात थोडीच येते! तशी ती येईल त्या क्षणी तुमच्या नजरेतून दृश्यजगत् मावळलेलं असेल.


जे स्वप्न तुम्हाला आठवतही नाही,त्यातूनच तर तुम्ही नगरबांधणी केलीत आणि तिच्या आतली सगळी मांडामांडही.त्या स्वप्नाची कुजबुज जरी तुमच्या कानी पडली तरी दुसरा कोणताही आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही.पण तसं दर्शन आणि तसं श्रवण तुमच्या अनुभवात नाही,हेही चांगलंच.ज्या हातांनी तुमच्या डोळ्यांवरचा दृष्टी गढूळणारा पडदा विणला आहे,तेच हात तो दूर करतील.तुमच्या कानांत भरलेलं मातीचं मेण ज्या बोटांनी मळलं आहे,तीच बोटं ते मेण उकरू शकतील.मग तुम्ही पाहाल : मग तुम्ही ऐकाल.तरीही अनुभवलेल्या आंधळेपणाची निंदा न कराल. बहिरेपणाचा खेद न कराल. कारण,त्या दिवशी या सर्व गोष्टींआड दडलेले हेतू तुमच्या जाणिवेत आलेले असतील.आणि तुम्ही प्रकाशाला द्याल तसाच धन्यवाद काळोखालाही द्याल.इतकं बोलून झाल्यावर अल् मुस्तफानं सभोवार पाहिलं.त्याच्या नौकेचा कर्णधार सुकाणूपाशी उभा होता. वाऱ्यानं शिडं भरली आहेत.आपल्याला दूरवर प्रवास करायचा आहे, हे तो पाहत होता.अल मुस्तफा म्हणाला :


"फार धीराचा आहे आमचा कप्तान.

वारा वाहतोय,शिडं अधीर झाली आहेत 

आणि सुकाणू दिशासूचनेची अपेक्षा करीत आहे. इतकं असूनहीमाझा कप्तान शांतपणानं माझी वाट पाहत आहे.आणि हे माझे समुद्रावरचे सहप्रवासी कामगार माझं बोलणं धीरानं ऐकत आहेत.त्यांनी तर महासमुद्राची गाज ऐकली आहे.आता ते किती वेळ थांबतील ?मी निघायला तयार आहे.हा लहानसा ओहोळ समुद्राशी येऊन पोहोचला.आहे.आई आपल्या बाळाला स्तनाशी घेईल.ऑरफालीजच्या जनबांधवहो, निरोपाचा नमस्कार मी तुम्हाला करतो.दिवस सरला आहे.पाण्यातलं कमळ दुसऱ्या दिवशी उमलण्यासाठी मिटावं,तसा हा दिवस

मिटायला आला आहे.या दिवसात जे दिलं घेतलं ते आपण राखून ठेवूया. त्यात काही उणीवही असेल.आपणा सर्वांना पुन्हा एकत्र यावं लागेल.देणाऱ्या परमेश्वराकडे हात पसरावे लागतील.मी पुन्हा परत येईन,हे विसरू नका.काही काळ जाईल आणि माझ्यातली आर्तता आणखी एका देहासाठी माती आणि पाणी जमा करील.तुम्हाला आणि तुमच्या संगतीत घालवलेल्या माझ्या यौवनाला मी निरोप देतो.कालच,एखाद्या स्वप्नात भेटलोत असं झालं आहे.मी माझ्या एकलेपणात असताना तुम्ही माझ्यासाठी गाणी गाइलीत.तुमच्या 

मनीच्या उत्कंठांचा मनोरा मी आकाशात उभा केला.

आता तुमची माझी झोप उडाली आहे. स्वप्न ओसरलं आहे.उषःकाल उलटून गेला आहे.मध्यान्ह झाला आहे.

पुरती जाग आली आहे. एकमेकांचा निरोप आपण घेतला पाहिजे.स्मरणाच्या संधिप्रकाशात,पुन्हा आपली भेट होईल.आपण पुन्हा बोलू - बसू या.त्यावेळी तुम्ही मला अधिक गहन - मधुर गीत ऐकवून रिझवाल.आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील तर आकाशात आणखी एक मनोरा आपण उभा करू."

एवढं बोलून अल् मुस्तफानं नौकेवरील खलाश्यांना इशारा केला.तात्काळ त्यांनी नांगर ओढला,नौकेचे बंध मोकळे केले आणि नौका पूर्वदिशेनं हलली.


निरोपासाठी जमलेल्या सर्वांच्या मुखातून जणू एकच हाक उमटली.मावळत्या उजेडात, समुद्रभागावर एखाद्या वाद्यस्वरासारखी ती व्यापून राहिली.


अल् मित्रा तेवढी निमूट उभी होती.नौकेकडे पाहत.धुक्यात नौका दिसेनाशी झाली.सर्वजण पांगून गेले.


अल् मित्रा एकटीच तटालगत उभी होती. तो बोलून गेला ते शब्द ती पुन्हा पुन्हा आठवत होती.


"थोडा काळ जाईल :


वाऱ्यावर क्षणभर विश्रांती घेईन.


मग कोणा स्त्रीच्या पोटी


मी पुन्हा जन्माला येईन."


२६.८.२०२३ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..

२६/८/२३

'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत 'Departed' Al Mustafa Angel

आता संध्याकाळ झाली.साक्षात्कारिणी अम्मित्रा बोलू लागली : हा दिवस,हे स्थळ आणि अशी

वचनं उद्गारणारा तुझा आत्मा दैवी कृपेला पात्र असो.

त्यावर अल मुस्तफा म्हणाला : जो संवाद झाला तो मीच केला का ? श्रोताही मीच होतो की !


देवळाच्या पायऱ्या उतरत तो चालू लागला. जमलेले जनबांधव त्याच्यामागून निघाले. नौकेपाशी तो पोहोचला.चढून डेकवर उभा राहिला.जनसमूहाकडे पाहत पुन्हा बोलू लागला. त्याचा स्वर मघापेक्षा उंच होता :

ऑरफालीजच्या नागरिक जन हो,तुमचा निरोप घ्यावा असा आदेश वारा मला देत आहे.वारा करीत आहे तितकी तातड मला नसेल.तरी मला गेलं पाहिजेच.आम्ही फिरस्ते संन्यासी. एकांत वाटेच्या शोधात असणारे.रात्र जिथं घालवली तिथं पुढच्या दिवशी आम्ही ठरत नाही. सूर्यास्ताला जिथं असतो तिथून अरुणोदयापूर्वी आम्ही प्रयाण करतो.धरणीची लेकरं झोपेत असतात तेव्हा आम्ही वाटचाल करीत असतो.कोण्या जिवट चेतना-निर्भर वनस्पतीची आपण बीजं आहोत.आपले अंतरात्मे विकसित होऊन पिकतील तसतसे वायुमंडलाच्या अधीन आपण होतो,आणि अवकाशात विखुरले जातो.भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सहवासातले माझे दिवस मोजके होते.तुमच्याशी बोललो ते त्याहूनही मोजकं होतं.माझा शब्दस्वर तुमच्या कानांआड होईल आणि माझा प्रेमभाव तुमच्या विस्मरणात जाईल त्या क्षणी मी पुन्हा तुमच्यात येईन.त्यावेळी माझं अंतःकरण ईश्वरी कृपेनं अधिक समृद्ध झालेलं असेल.माझ्या ओठांतले शब्द अंतरात्म्याला आणखी शरण गेलेले असतील.

भरतीच्या लाटेवर स्वार होऊन मी पुन्हा परतेन.मृत्यून मला दडवलं असेल,किंवा गाढ शांतीनं मिठीत घेतलं असेल,तरीही तुमच्याशी संवाद करावा,तुमच समाधान करावं यासाठी मी आतुर असेन.माझी धडपड व्यर्थ जाणार नाही.


मी बोलून गेलो त्यात सत्यार्थ असेल तर ते सत्य माझ्या मुखातून अधिकार-स्वरानं प्रकट होईल माझे शब्द तुमच्या विचारांशी सुसंगत असतील.ऑरफालीजच्या जनबांधव हो,शिडांत वारा भरला आहे.मी निघालो आहे.रिकाम्या अंतःकरणानं जात नाही,भरून पावलो आहे.

या माझ्या प्रयाणदिवशी तुमच्या गरजा भागलेल्या नसतील आणि माझ्या प्रेमाला पूर्तता आली नसेल तर आपण एकमेकांना वचन देऊया की तसा सफलतेचा दिवस कधीतरी उगवेलच.माणसांच्या गरजा बदलतात,

तसं प्रेम बदलत नाही.माझ्यासारख्या प्रेमिकाला प्रेमाच्या पोटी गरजा सफल व्हाव्यात असंच वाटतं.

म्हणून लक्षात घ्या,गाढ शांतिघरातून मी पुन्हा परतेन.

पहाटवेळी धुकं सर्वत्र स्वतःला लोटून देत असतं.त्याचेच दवबिंदू शेतमळ्यांवर उतरतात. त्या बिंदूंमधून मेघमाला जमून येते.आकाशातून ती पुन्हा पावसाच्या रूपानं पृथ्वीवर उतरते.त्या धुक्यासारखा मी आहे,असं समजा.

रात्रीच्या शांत प्रहरांत मी तुमच्या नगरीच्या रस्त्यांवरून फिरलो आहे.माझा अंतरात्मा तुमच्या घराघरात शिरला आहे.तुमच्या अंतःकरणांतली धडधड मी अनुभवली आहे. तुमचे उच्छ्वास माझ्या मुद्रेवर उमटले आहेत. एकूण एक सर्वांना मी ओळखलं आहे.तुमचा आनंद आणि तुमचं दुःख माझं झालं आहे.झोपेत तुम्ही पाहिलीत ती स्वप्नं मीही पाहिली आहेत.कित्येकदा तर मी तुमच्यामध्ये पर्वतराजीच्या पोटात भरून आलेल्या सरोवराप्रमाणे होऊन राहिलो.तुमच्या अंतःकरणांची उंच शिखरं माझ्यात प्रतिबिंबित झाली.त्याच बरोबर,वळणं घेणाऱ्या उतरणी आणि तुमच्या विचार-वासनांचे सरकते कळपही माझ्यात उमटले आहेत.तुमच्या बाळगोपाळांचं हास्य माझ्या स्तब्ध चित्तात,निर्झराप्रमाण हुदडत आलं.तरुणांच्या आकांक्षा नदीप्रवाहाप्रमाणे वाहत आल्या.माझ्या गूढ़ आकांक्षांहून मनः कुहरात निर्झरांचे आणि नद्यांचे ओघ पोहोचले,तरी त्यांचं गीतगुंजन चालूच राहिलं : मात्र त्या हास्याहून अधिक मधुर, आणि त्या अधिक उज्ज्वल असं काही मला जाणवत होतं.ती होती तुमच्यातली असीमता !


ईश्वराच्या अस्तित्वातील अंशमात्र पेशी आणि नसा तुम्ही आहात.त्याच्या विराट गीत-स्वरावलीत तुमचं गुंजन म्हणजे निःस्वर श्वासासारखं आहे.तरी,त्या अमर्याद पुरुषोत्तमाच्या अपेक्षेनं तुम्हीदेखील अमर्याद आहात.

त्यांच्या दर्शनात मी तुम्हाला पाहिलं आहे,आणि तुमच्यावर प्रेम केलं आहे.किती झालं तरी,त्या विराट विश्वरूपाच्या कक्षेतले तुम्ही : मग माझं प्रेम आपल्यातलं अंतर तोडू शकलं,त्यात नवल ते काय? तुमचं जाणतेपण,तुमच्या आकांक्षा, तुमची दर्शनं त्या कक्षेबाहेर थोडीच उड्डाण घेणार! तुमच्यातलं व्यापकपण एखाद्या मोहरून आलेल्या प्रचंड ओकवृक्षासारखं असतं.त्याच्या शक्तिमत्तेमुळं या मातीशी तुम्ही बांधून राहता. त्याचा परिमळ तुम्हाला अवकाशात उचलून धरतो आणि त्याच्या चिरजीवनात तुम्ही अमरपण भोगता.

एखादी शृंखला असते.कडीतून कडी गुंफलेली. सांगतात की तिच्यातला एकही दुवा कच्चा-दुबळा असेल तर ती शृंखला तितकी दुबळी असते.हे अर्धसत्य आहे.तिच्यातील बलवान दुव्याइतकी ती बलवानही असते.तुम्हीही तसेच आहात,हे समजून असा. माणसाच्या दुबळ्या कृत्यानं त्याची शक्ती मोजू नये.महासमुद्राची बलाढ्यता त्याच्या लाटांवरील फेसांच्या भंगुरतेनं मोजता येते काय ?

तुमचं अपयश तेवढं लक्षात घेऊन तुमची गुणवत्ता ठरवणं,हे बरोबर कसं ? ऋतुमानात चंचलता असते म्हणून त्याला दोष द्यावा काय? बंधूनो,तुम्ही महासागरासारखे आहात.किनारभूमीवर रुतून बसलेल्या तुमच्या नौका भरतीची प्रतीक्षा करीत असतात,म्हणून काय झालं ? तुम्ही तर नाहीच,पण प्रत्यक्ष समुद्रही भरतीला ओढून आणायला समर्थ असत नाही.ऋतुमान जस तसे तुम्ही असता.हिवाळ्याची पीडा भोगताना वसंत ऋतू तुम्ही अगदी मनावेगळा करता तरी तुमच्या अंतरंगात तो अर्धसुप्त असतो.तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता याचा तो अपराध मानत नाही.

हे सगळं मी बोलतो म्हणून एकमेकांशी विचार करताना असं समजू नका की 'यानं आमची स्तुती केली... आमच्यातलं चांगलं तेवढं पाहिलं.' तुम्ही स्वतःशी स्वतःचा विचार करताना जे म्हणाल तेच मी बोललो.

पण मित्रहो,शब्दांतून व्यक्त होणारं ज्ञान हे शब्दातीत ज्ञानाची केवळ छाया असतं.तुमचे विचार काय,माझे शब्द काय,मोहोरबंद स्मृतीच्या लहरीप्रमाणं आहेत.भूतकाळाची नोंदवही जणू.भूतकाळातल्या अतिप्राचीन दिवसांत या पृथ्वीला स्वतःचीच खबर नव्हती,मग ती तुम्हा-आम्हाला कुठून ओळखणार? भयानक गोंधळाच्या बेधुंद रात्रीमागून रात्री इथं होऊन गेल्या.ज्ञानवान् महात्मे या पृथ्वीवर जन्मले.त्यांनी तुम्हाला आत्मज्ञान दिलं.त्या ज्ञानातला हिस्सा घ्यायला मी आलो आहे.पाहिलंत का,त्या ज्ञानाहून अधिक काही माझ्या पदरात पडलं आहे.!


कालौघात,तुमच्यासाठी आत्मज्योत अधिक तेजानं उजळत आहे.तुमचा मनःप्रदेश ती अधिक व्यापत आहे.आणि तुम्ही मात्र मावळून गेलेल्या दिवसांची खंत करीत बसलेले आहात.


तुमचं जीवन सभोवतीच्या देहधारी जीवांतील चैतन्याचं असतं.आणि हे जीव तर स्मशानभयानं ग्रासलेले आहेत.खरं म्हणजे,इथं स्मशान आहेच कुठं? सभोवारचे डोंगर आणि मैदानं ही तर पाळण्यासारखी आहेत : पायठाणासारखी आहेत.


तुमच्या शेतमळ्यात तुम्ही पूर्वजांचं दफन केलं आहे.त्या जागांच्या जवळून जाताना नीट निरखून पाहा.तुम्हाला दिसेल की तुम्ही आणि तुमची मुलंबाळंच हातात हात गुंफून,फेर धरून नाचत आहेत.


पुष्कळदा तुम्ही चैन चंगळ करण्यात रंगून जाता. कशासाठी,त्याचं भानही तुम्हाला नसतं. कुणीकुणी तुमच्याकडे आले : तुमच्या मतांशी, श्रद्धांशी त्यांची जुळली म्हणून तुम्ही वचनं दिली घेतली.त्यांना तुम्ही संपत्ती बहाल केली.सत्ता दिलीत.वैभव दिलंत.

मी कसलंही वचन तुम्हाला दिलं नाही,तरी तुम्ही मला अधिक उदारपणानं कितीतरी दिलंत. जीवनातील चेतनेची खोल-खोल तहान तुम्ही मला दिलीत.


सर्व ध्येयांची परिणती या तहानेनं आसुसलेल्या ओठांमध्ये व्हावी आणि सर्व जीवन निर्झराप्रमाणं व्हावं,याहून माणसाला श्रेष्ठ वरदान तरी कोणतं? ते मिळून मी सन्मानित झालो आहे.जेव्हा जेव्हा या चेतनाप्रवाहाकाठी मी येतो तेव्हा ते जिवंत पाणी आपल्या ठिकाणी तहानेलं आहे,हे पाहून मी धन्य होतो.हे पाणी मी पितो त्यावेळी ते मला पीत असतं.तुम्हांपैकी काहीना वाटून गेलं असेल की मी गर्व वाहतो,आणि कोणती भेटवस्तू स्वीकारायला भारीच संकोच करतो.


खरं सांगू ? केलेल्या श्रमाचं मोल घेताना मी गर्व करतो : देणगी घेताना तसा नाही करीत.आपल्या मेजांवर भोजनासाठी मी यावं अशी इच्छा तुम्ही केलीत,तेव्हा कधीकधी रानावनातली बोरफळं खाऊन मी भूक शमवली.आपल्या ओसरीवर मला निवारा द्यावा असं तुमच्या खूप मनात आलं,तेव्हा कधीकधी मी देवळांच्या मंडपांत आसरा घेतला.म्हणून काय झालं ? दिवसरात्र तुम्ही माझी चिंता केलीत.किती देखभाल केलीत! यामुळं तर अन्न गोड लागलं आणि माझ्या रात्री दृष्टान्तस्वप्नांनी भरून आल्या.

यासाठी मी तुमचा कृतज्ञ आहे.तुमचं सर्व शुभ इच्छितो.


' द प्रॉफेट - खलील जिब्रान '

 देवदूत,देवदूतांचं विहारवन आणि अग्रदूत

भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख

मधुश्री पब्लिकेशन,शरद अष्टेकर