* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: 'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत - २ 'Departed' Al Mustafa Angel - 2

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/८/२३

'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत - २ 'Departed' Al Mustafa Angel - 2


कृपाळूपण स्वतःची प्रतिमा आरशात स्वतःच न्याहाळत बसेल तर ते शिळारूप होईल. सत्कृत्य स्वतःलाच कुरवाळून घेत आत्मप्रशंसा करील तर शापचिंता निर्माण करील.तुमच्यापैकी काहींनी मला माणूसघाणा म्हटलं. आपल्याच एकलेपणात धुंद असतो म्हटलं. कोणी म्हणाले,अरण्यातील वृक्षवेलींशी हा संवाद करतो तितका माणसांशी करीत नाही. डोंगरमाथ्यावर जाऊन एकलकोंडा बसतो आणि आमच्या वस्तीकडे अवहेलणेच्या नजरेनं पाहतो.जिवलग मित्रहो,डोंगरवाटांनी मी चालत राहिलो आणि दूर विजनात दिवस काढले : हे नसतं केलं तर उंचावरून,दूर अंतरावरून तुमच्याकडे मला कसं पाहता आलं असतं?अंतर राखलं नाही अन् दुरून पाहिलं नाही तर एखाद्याला कुणाशी जवळीक कशी साधेल ?


इतर काहींनी,प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही तरी मला म्हटलं :परदेशी यात्रिका,कधीही पोहोचू शकणार नाहीस अशा उत्तुंग शिखरांचा ध्यास घेतला आहेस.गरुड जिथं घरटं बांधतो त्या टकमक सुळक्यावर तू बैठक का मांडतोस ? जे अप्राप्य त्याच्या शोधात का असतोस ? कोणती वादळं तुला आपल्या जाळ्यात बंदिवान् करायची आहेत ?कोणते ध्रुमधूसर पक्षी

आकाशमार्गावर धरू पाहतोस ? 

ये,आमच्यातला एक होऊन राहा.खाली उतरून ये.आमचं अन्न घेऊन भूक शांत कर.आमच्या मद्यानं तहान भागव.' त्यांनी काढलेले हे शब्द अंतःकरणापासूनचेच होते.

पण,मित्रहो,अधिक खोलात जाऊन त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना कळलं असतं की,तुमच्या आनंदाचं आणि दुःखाचं रहस्य कशात,त्याच्या शोधात मी होतो.


आकाशपंथांनी विहरणारे तुमचे आत्मपक्षी माझा पारधविषय होते.पण मी कसला पारधी ? माझीच पारध होत राहिली.माझे कित्येक बाण धनुष्यातून सुटले पण परतून माझ्या हृदयावर आदळले.उंचावर मी जात होतो,

तरी मला सरपटावं लागलं,हेही खरं.माझे पंख उन्हात पसरलेले होते तरी जमिनीवरील त्यांची सावली कासवगतीची होती.एवढा मी श्रद्धावान् पण शंका-संशयांनी भरलेला होतो. कित्येकदा माझ्याच

यातनांच्या जखमा मी चाचपून पाहिल्या आहेत,आणि त्यामुळ तुमच्यावरचा माझा विश्वास वाढला आहे.तुमचं अधिक ज्ञान मला झालं आहे.हा माझा विश्वास आणि हे माझं ज्ञान यांच्या बळावरच मी सांगतो तुम्ही आहात ते तुमच्या देहात बद्ध नाहीत:तुमच्या घराचे आणि शेतमळ्यांचे तुम्ही कैदी नाहीत.


तुमच्यांत जे वस्तीला आहे ते पर्वतशिखरांच्याही वरून संचार करतं.वाऱ्यासोबत स्वैर भटकतं. ऊब मिळावी म्हणून सूर्यप्रकाशात वळवळावं आणि सुरक्षिततेसाठी जमिनीखाली अंधाऱ्या बिळांत वावरावं,अशी तुमच्या अंतरात्म्याची गत नाही.तो मुक्त आहे : जगाला व्यापून राहणारं, अंतराळात मुक्त संचार करणारं ते चैतन्य आहे.

हे माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या.त्यांना साफसूफ करायला बघू नका.सगळ्याच गोष्टींचा आरंभ संदिग्ध आणि व्यामिश्र असतो,तरी त्यांचा शेवट तसा नसतो. मी म्हणजे केवळ एक आरंभ - दर्शन,इतकाच तुमच्या आठवणीत न राहीन तर किती छान होईल! चेतना आणि ती धारण करणारे जीव यांचा जन्म केवळ धुक्यात होतो : स्वच्छ केलासात (crystal) होत नाही.आणि कुणास ठाऊक,केलास ही धुक्याची अधोगती तर नसेल?


मी तुमच्या आठवणीत राहणार असेन तर मी सांगतो त्या गोष्टींचे स्मरण ठेवावं असं मला वाटतं. तुमच्या आत जे जे निःशक्त आणि विस्कटलेलं दिसेल ते ते अत्यंत शक्तिमान, अत्यंत निर्धारशील आहे असं समजा.तुमचे श्वासनिःश्वास, त्यांनीच तुमच्या हाडांना ताठ,कणखर आणि सुडौल केलं नाही काय? या श्वासांची भरती-ओहोट तुमच्या दृष्टिपथात थोडीच येते! तशी ती येईल त्या क्षणी तुमच्या नजरेतून दृश्यजगत् मावळलेलं असेल.


जे स्वप्न तुम्हाला आठवतही नाही,त्यातूनच तर तुम्ही नगरबांधणी केलीत आणि तिच्या आतली सगळी मांडामांडही.त्या स्वप्नाची कुजबुज जरी तुमच्या कानी पडली तरी दुसरा कोणताही आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही.पण तसं दर्शन आणि तसं श्रवण तुमच्या अनुभवात नाही,हेही चांगलंच.ज्या हातांनी तुमच्या डोळ्यांवरचा दृष्टी गढूळणारा पडदा विणला आहे,तेच हात तो दूर करतील.तुमच्या कानांत भरलेलं मातीचं मेण ज्या बोटांनी मळलं आहे,तीच बोटं ते मेण उकरू शकतील.मग तुम्ही पाहाल : मग तुम्ही ऐकाल.तरीही अनुभवलेल्या आंधळेपणाची निंदा न कराल. बहिरेपणाचा खेद न कराल. कारण,त्या दिवशी या सर्व गोष्टींआड दडलेले हेतू तुमच्या जाणिवेत आलेले असतील.आणि तुम्ही प्रकाशाला द्याल तसाच धन्यवाद काळोखालाही द्याल.इतकं बोलून झाल्यावर अल् मुस्तफानं सभोवार पाहिलं.त्याच्या नौकेचा कर्णधार सुकाणूपाशी उभा होता. वाऱ्यानं शिडं भरली आहेत.आपल्याला दूरवर प्रवास करायचा आहे, हे तो पाहत होता.अल मुस्तफा म्हणाला :


"फार धीराचा आहे आमचा कप्तान.

वारा वाहतोय,शिडं अधीर झाली आहेत 

आणि सुकाणू दिशासूचनेची अपेक्षा करीत आहे. इतकं असूनहीमाझा कप्तान शांतपणानं माझी वाट पाहत आहे.आणि हे माझे समुद्रावरचे सहप्रवासी कामगार माझं बोलणं धीरानं ऐकत आहेत.त्यांनी तर महासमुद्राची गाज ऐकली आहे.आता ते किती वेळ थांबतील ?मी निघायला तयार आहे.हा लहानसा ओहोळ समुद्राशी येऊन पोहोचला.आहे.आई आपल्या बाळाला स्तनाशी घेईल.ऑरफालीजच्या जनबांधवहो, निरोपाचा नमस्कार मी तुम्हाला करतो.दिवस सरला आहे.पाण्यातलं कमळ दुसऱ्या दिवशी उमलण्यासाठी मिटावं,तसा हा दिवस

मिटायला आला आहे.या दिवसात जे दिलं घेतलं ते आपण राखून ठेवूया. त्यात काही उणीवही असेल.आपणा सर्वांना पुन्हा एकत्र यावं लागेल.देणाऱ्या परमेश्वराकडे हात पसरावे लागतील.मी पुन्हा परत येईन,हे विसरू नका.काही काळ जाईल आणि माझ्यातली आर्तता आणखी एका देहासाठी माती आणि पाणी जमा करील.तुम्हाला आणि तुमच्या संगतीत घालवलेल्या माझ्या यौवनाला मी निरोप देतो.कालच,एखाद्या स्वप्नात भेटलोत असं झालं आहे.मी माझ्या एकलेपणात असताना तुम्ही माझ्यासाठी गाणी गाइलीत.तुमच्या 

मनीच्या उत्कंठांचा मनोरा मी आकाशात उभा केला.

आता तुमची माझी झोप उडाली आहे. स्वप्न ओसरलं आहे.उषःकाल उलटून गेला आहे.मध्यान्ह झाला आहे.

पुरती जाग आली आहे. एकमेकांचा निरोप आपण घेतला पाहिजे.स्मरणाच्या संधिप्रकाशात,पुन्हा आपली भेट होईल.आपण पुन्हा बोलू - बसू या.त्यावेळी तुम्ही मला अधिक गहन - मधुर गीत ऐकवून रिझवाल.आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील तर आकाशात आणखी एक मनोरा आपण उभा करू."

एवढं बोलून अल् मुस्तफानं नौकेवरील खलाश्यांना इशारा केला.तात्काळ त्यांनी नांगर ओढला,नौकेचे बंध मोकळे केले आणि नौका पूर्वदिशेनं हलली.


निरोपासाठी जमलेल्या सर्वांच्या मुखातून जणू एकच हाक उमटली.मावळत्या उजेडात, समुद्रभागावर एखाद्या वाद्यस्वरासारखी ती व्यापून राहिली.


अल् मित्रा तेवढी निमूट उभी होती.नौकेकडे पाहत.धुक्यात नौका दिसेनाशी झाली.सर्वजण पांगून गेले.


अल् मित्रा एकटीच तटालगत उभी होती. तो बोलून गेला ते शब्द ती पुन्हा पुन्हा आठवत होती.


"थोडा काळ जाईल :


वाऱ्यावर क्षणभर विश्रांती घेईन.


मग कोणा स्त्रीच्या पोटी


मी पुन्हा जन्माला येईन."


२६.८.२०२३ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..