आता संध्याकाळ झाली.साक्षात्कारिणी अम्मित्रा बोलू लागली : हा दिवस,हे स्थळ आणि अशी
वचनं उद्गारणारा तुझा आत्मा दैवी कृपेला पात्र असो.
त्यावर अल मुस्तफा म्हणाला : जो संवाद झाला तो मीच केला का ? श्रोताही मीच होतो की !
देवळाच्या पायऱ्या उतरत तो चालू लागला. जमलेले जनबांधव त्याच्यामागून निघाले. नौकेपाशी तो पोहोचला.चढून डेकवर उभा राहिला.जनसमूहाकडे पाहत पुन्हा बोलू लागला. त्याचा स्वर मघापेक्षा उंच होता :
ऑरफालीजच्या नागरिक जन हो,तुमचा निरोप घ्यावा असा आदेश वारा मला देत आहे.वारा करीत आहे तितकी तातड मला नसेल.तरी मला गेलं पाहिजेच.आम्ही फिरस्ते संन्यासी. एकांत वाटेच्या शोधात असणारे.रात्र जिथं घालवली तिथं पुढच्या दिवशी आम्ही ठरत नाही. सूर्यास्ताला जिथं असतो तिथून अरुणोदयापूर्वी आम्ही प्रयाण करतो.धरणीची लेकरं झोपेत असतात तेव्हा आम्ही वाटचाल करीत असतो.कोण्या जिवट चेतना-निर्भर वनस्पतीची आपण बीजं आहोत.आपले अंतरात्मे विकसित होऊन पिकतील तसतसे वायुमंडलाच्या अधीन आपण होतो,आणि अवकाशात विखुरले जातो.भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सहवासातले माझे दिवस मोजके होते.तुमच्याशी बोललो ते त्याहूनही मोजकं होतं.माझा शब्दस्वर तुमच्या कानांआड होईल आणि माझा प्रेमभाव तुमच्या विस्मरणात जाईल त्या क्षणी मी पुन्हा तुमच्यात येईन.त्यावेळी माझं अंतःकरण ईश्वरी कृपेनं अधिक समृद्ध झालेलं असेल.माझ्या ओठांतले शब्द अंतरात्म्याला आणखी शरण गेलेले असतील.
भरतीच्या लाटेवर स्वार होऊन मी पुन्हा परतेन.मृत्यून मला दडवलं असेल,किंवा गाढ शांतीनं मिठीत घेतलं असेल,तरीही तुमच्याशी संवाद करावा,तुमच समाधान करावं यासाठी मी आतुर असेन.माझी धडपड व्यर्थ जाणार नाही.
मी बोलून गेलो त्यात सत्यार्थ असेल तर ते सत्य माझ्या मुखातून अधिकार-स्वरानं प्रकट होईल माझे शब्द तुमच्या विचारांशी सुसंगत असतील.ऑरफालीजच्या जनबांधव हो,शिडांत वारा भरला आहे.मी निघालो आहे.रिकाम्या अंतःकरणानं जात नाही,भरून पावलो आहे.
या माझ्या प्रयाणदिवशी तुमच्या गरजा भागलेल्या नसतील आणि माझ्या प्रेमाला पूर्तता आली नसेल तर आपण एकमेकांना वचन देऊया की तसा सफलतेचा दिवस कधीतरी उगवेलच.माणसांच्या गरजा बदलतात,
तसं प्रेम बदलत नाही.माझ्यासारख्या प्रेमिकाला प्रेमाच्या पोटी गरजा सफल व्हाव्यात असंच वाटतं.
म्हणून लक्षात घ्या,गाढ शांतिघरातून मी पुन्हा परतेन.
पहाटवेळी धुकं सर्वत्र स्वतःला लोटून देत असतं.त्याचेच दवबिंदू शेतमळ्यांवर उतरतात. त्या बिंदूंमधून मेघमाला जमून येते.आकाशातून ती पुन्हा पावसाच्या रूपानं पृथ्वीवर उतरते.त्या धुक्यासारखा मी आहे,असं समजा.
रात्रीच्या शांत प्रहरांत मी तुमच्या नगरीच्या रस्त्यांवरून फिरलो आहे.माझा अंतरात्मा तुमच्या घराघरात शिरला आहे.तुमच्या अंतःकरणांतली धडधड मी अनुभवली आहे. तुमचे उच्छ्वास माझ्या मुद्रेवर उमटले आहेत. एकूण एक सर्वांना मी ओळखलं आहे.तुमचा आनंद आणि तुमचं दुःख माझं झालं आहे.झोपेत तुम्ही पाहिलीत ती स्वप्नं मीही पाहिली आहेत.कित्येकदा तर मी तुमच्यामध्ये पर्वतराजीच्या पोटात भरून आलेल्या सरोवराप्रमाणे होऊन राहिलो.तुमच्या अंतःकरणांची उंच शिखरं माझ्यात प्रतिबिंबित झाली.त्याच बरोबर,वळणं घेणाऱ्या उतरणी आणि तुमच्या विचार-वासनांचे सरकते कळपही माझ्यात उमटले आहेत.तुमच्या बाळगोपाळांचं हास्य माझ्या स्तब्ध चित्तात,निर्झराप्रमाण हुदडत आलं.तरुणांच्या आकांक्षा नदीप्रवाहाप्रमाणे वाहत आल्या.माझ्या गूढ़ आकांक्षांहून मनः कुहरात निर्झरांचे आणि नद्यांचे ओघ पोहोचले,तरी त्यांचं गीतगुंजन चालूच राहिलं : मात्र त्या हास्याहून अधिक मधुर, आणि त्या अधिक उज्ज्वल असं काही मला जाणवत होतं.ती होती तुमच्यातली असीमता !
ईश्वराच्या अस्तित्वातील अंशमात्र पेशी आणि नसा तुम्ही आहात.त्याच्या विराट गीत-स्वरावलीत तुमचं गुंजन म्हणजे निःस्वर श्वासासारखं आहे.तरी,त्या अमर्याद पुरुषोत्तमाच्या अपेक्षेनं तुम्हीदेखील अमर्याद आहात.
त्यांच्या दर्शनात मी तुम्हाला पाहिलं आहे,आणि तुमच्यावर प्रेम केलं आहे.किती झालं तरी,त्या विराट विश्वरूपाच्या कक्षेतले तुम्ही : मग माझं प्रेम आपल्यातलं अंतर तोडू शकलं,त्यात नवल ते काय? तुमचं जाणतेपण,तुमच्या आकांक्षा, तुमची दर्शनं त्या कक्षेबाहेर थोडीच उड्डाण घेणार! तुमच्यातलं व्यापकपण एखाद्या मोहरून आलेल्या प्रचंड ओकवृक्षासारखं असतं.त्याच्या शक्तिमत्तेमुळं या मातीशी तुम्ही बांधून राहता. त्याचा परिमळ तुम्हाला अवकाशात उचलून धरतो आणि त्याच्या चिरजीवनात तुम्ही अमरपण भोगता.
एखादी शृंखला असते.कडीतून कडी गुंफलेली. सांगतात की तिच्यातला एकही दुवा कच्चा-दुबळा असेल तर ती शृंखला तितकी दुबळी असते.हे अर्धसत्य आहे.तिच्यातील बलवान दुव्याइतकी ती बलवानही असते.तुम्हीही तसेच आहात,हे समजून असा. माणसाच्या दुबळ्या कृत्यानं त्याची शक्ती मोजू नये.महासमुद्राची बलाढ्यता त्याच्या लाटांवरील फेसांच्या भंगुरतेनं मोजता येते काय ?
तुमचं अपयश तेवढं लक्षात घेऊन तुमची गुणवत्ता ठरवणं,हे बरोबर कसं ? ऋतुमानात चंचलता असते म्हणून त्याला दोष द्यावा काय? बंधूनो,तुम्ही महासागरासारखे आहात.किनारभूमीवर रुतून बसलेल्या तुमच्या नौका भरतीची प्रतीक्षा करीत असतात,म्हणून काय झालं ? तुम्ही तर नाहीच,पण प्रत्यक्ष समुद्रही भरतीला ओढून आणायला समर्थ असत नाही.ऋतुमान जस तसे तुम्ही असता.हिवाळ्याची पीडा भोगताना वसंत ऋतू तुम्ही अगदी मनावेगळा करता तरी तुमच्या अंतरंगात तो अर्धसुप्त असतो.तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता याचा तो अपराध मानत नाही.
हे सगळं मी बोलतो म्हणून एकमेकांशी विचार करताना असं समजू नका की 'यानं आमची स्तुती केली... आमच्यातलं चांगलं तेवढं पाहिलं.' तुम्ही स्वतःशी स्वतःचा विचार करताना जे म्हणाल तेच मी बोललो.
पण मित्रहो,शब्दांतून व्यक्त होणारं ज्ञान हे शब्दातीत ज्ञानाची केवळ छाया असतं.तुमचे विचार काय,माझे शब्द काय,मोहोरबंद स्मृतीच्या लहरीप्रमाणं आहेत.भूतकाळाची नोंदवही जणू.भूतकाळातल्या अतिप्राचीन दिवसांत या पृथ्वीला स्वतःचीच खबर नव्हती,मग ती तुम्हा-आम्हाला कुठून ओळखणार? भयानक गोंधळाच्या बेधुंद रात्रीमागून रात्री इथं होऊन गेल्या.ज्ञानवान् महात्मे या पृथ्वीवर जन्मले.त्यांनी तुम्हाला आत्मज्ञान दिलं.त्या ज्ञानातला हिस्सा घ्यायला मी आलो आहे.पाहिलंत का,त्या ज्ञानाहून अधिक काही माझ्या पदरात पडलं आहे.!
कालौघात,तुमच्यासाठी आत्मज्योत अधिक तेजानं उजळत आहे.तुमचा मनःप्रदेश ती अधिक व्यापत आहे.आणि तुम्ही मात्र मावळून गेलेल्या दिवसांची खंत करीत बसलेले आहात.
तुमचं जीवन सभोवतीच्या देहधारी जीवांतील चैतन्याचं असतं.आणि हे जीव तर स्मशानभयानं ग्रासलेले आहेत.खरं म्हणजे,इथं स्मशान आहेच कुठं? सभोवारचे डोंगर आणि मैदानं ही तर पाळण्यासारखी आहेत : पायठाणासारखी आहेत.
तुमच्या शेतमळ्यात तुम्ही पूर्वजांचं दफन केलं आहे.त्या जागांच्या जवळून जाताना नीट निरखून पाहा.तुम्हाला दिसेल की तुम्ही आणि तुमची मुलंबाळंच हातात हात गुंफून,फेर धरून नाचत आहेत.
पुष्कळदा तुम्ही चैन चंगळ करण्यात रंगून जाता. कशासाठी,त्याचं भानही तुम्हाला नसतं. कुणीकुणी तुमच्याकडे आले : तुमच्या मतांशी, श्रद्धांशी त्यांची जुळली म्हणून तुम्ही वचनं दिली घेतली.त्यांना तुम्ही संपत्ती बहाल केली.सत्ता दिलीत.वैभव दिलंत.
मी कसलंही वचन तुम्हाला दिलं नाही,तरी तुम्ही मला अधिक उदारपणानं कितीतरी दिलंत. जीवनातील चेतनेची खोल-खोल तहान तुम्ही मला दिलीत.
सर्व ध्येयांची परिणती या तहानेनं आसुसलेल्या ओठांमध्ये व्हावी आणि सर्व जीवन निर्झराप्रमाणं व्हावं,याहून माणसाला श्रेष्ठ वरदान तरी कोणतं? ते मिळून मी सन्मानित झालो आहे.जेव्हा जेव्हा या चेतनाप्रवाहाकाठी मी येतो तेव्हा ते जिवंत पाणी आपल्या ठिकाणी तहानेलं आहे,हे पाहून मी धन्य होतो.हे पाणी मी पितो त्यावेळी ते मला पीत असतं.तुम्हांपैकी काहीना वाटून गेलं असेल की मी गर्व वाहतो,आणि कोणती भेटवस्तू स्वीकारायला भारीच संकोच करतो.
खरं सांगू ? केलेल्या श्रमाचं मोल घेताना मी गर्व करतो : देणगी घेताना तसा नाही करीत.आपल्या मेजांवर भोजनासाठी मी यावं अशी इच्छा तुम्ही केलीत,तेव्हा कधीकधी रानावनातली बोरफळं खाऊन मी भूक शमवली.आपल्या ओसरीवर मला निवारा द्यावा असं तुमच्या खूप मनात आलं,तेव्हा कधीकधी मी देवळांच्या मंडपांत आसरा घेतला.म्हणून काय झालं ? दिवसरात्र तुम्ही माझी चिंता केलीत.किती देखभाल केलीत! यामुळं तर अन्न गोड लागलं आणि माझ्या रात्री दृष्टान्तस्वप्नांनी भरून आल्या.
यासाठी मी तुमचा कृतज्ञ आहे.तुमचं सर्व शुभ इच्छितो.
' द प्रॉफेट - खलील जिब्रान '
देवदूत,देवदूतांचं विहारवन आणि अग्रदूत
भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख
मधुश्री पब्लिकेशन,शरद अष्टेकर