* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण २ In the Footsteps of Hiuen Tsang

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/९/२३

ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण २ In the Footsteps of Hiuen Tsang

मिशीने कमीत कमी सामान बरोबर घ्यायचा प्रयत्न केला होता,तरीही ते बऱ्यापैकी जड़ होतं. चीनमधल्या प्रवासात वेगवेगळ्या शहरांमधील माणसांच्या गर्दीने ती हैराण झाली होती. चीनमधली यलो रिव्हर म्हणजे पीत नदी ही सुसंस्कृत चीन आणि गावंढळ चीन यांच्यामधली सीमारेषा आहे.असं म्हटलं जातं. श्वेन ग्लांग हे या नदीचं मूळ नाव. ही नदी क्विलियन पर्वतराजीच्या पायथ्याकडून वाहते.

मिशीची आगगाडी या नदीला समांतर अशी उत्तरेकडे जाऊन लिआंगझू या ठिकाणी थांबली. लिआंगझूच्या उत्तरेला मंगोलियाचा मैदानी प्रदेश सुरू होतो.या शहराच्या रक्षणासाठी बांधलेल्या चीनच्या भिंतीच्या भागाचं रेल्वे स्टेशनवरूनच दर्शन होतं.मिशीला या शहरात ह्युएन त्संगची स्मृती जागवणारं काहीही दिसलं नाही.दरम्यान, चीनमधल्या रेल्वे प्रवासात रेल्वे यंत्रणेशी आणि खाली उतरून गावांमधून भटकताना सरकारी यंत्रणेशी वाद ही अपरिहार्य घटना असते हे एव्हाना तिला समजून चुकलं होतं.मिशीचा पुढला प्रवास मुख्यत्वे पश्चिमेकडे जाणाऱ्या 'सिल्क रूट' मार्गे होणार होता.गोबीचं वाळवंट पार करून गेल्याशिवाय तो मार्ग भेटणार नव्हता.आधुनिक साधनांनी आणि प्रस्थापित मार्गाने जातानाही मिशीला खूप थकवा जाणवला.ह्युएन त्संगच्या काळात तर गोबी वाळवंट पार करणारी व्यक्ती परतणार नाही हे गृहीत धरलं जायचं.

वाटेत तहान-भुकेने मेलेल्या माणसांचे आणि त्यांच्या प्राण्यांचे सांगाडे पडलेले दिसत असत.ह्युएन त्संग चांग गावाला पोहोचला तेव्हा तिथल्या सर्व भिक्खूंनी आणि अखेरीस राजानेसुद्धा त्याने जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करू नये म्हणून ह्युएन त्संगची विनवणी केली.पण ह्युएन त्संग निश्चयाचा पक्का होता.मिशीला अडवणारं मात्र कुणीच नव्हतं. तुर्फानपासून सिल्क रूट पुढे नैर्ऋत्येकडे वळतो.कोल टाग पर्वतराजी ओलांडून बोस्टांग सरोवराच्या काठाने तो यांकीला पोहोचतो.ह्युएन त्संग या प्रदेशाला ओ- की - नीचं राज्य म्हणतो.इथे अरेबिक आणि चिनी अशा दोन भाषा बोलल्या जातात.पूर्वी या शहराला 'यांघी शहर' असं म्हटलं जायचं.त्याचा अर्थ 'आगीचं शहर' मिशीने आता वाटेत लागणाऱ्या ठिकाणांची नावं नीट लक्षात ठेवायला सुरुवात केली;कारण त्या प्रत्येक नावामागे एक कहाणी होती,काही अर्थ होता. इथेच

ह्युएन त्संगच्या तांड्यावर दरोडखोरांनी हल्ला चढवला.

लूटमार करून ते नाहीसे झाले. त्यानंतर ह्युएन त्संगला पंचवीस-तीस परदेशी व्यापारी भेटले. ते चीनहून परत मध्य आशियाकडे निघाले होते.सर्वांनी एकत्रच मुक्काम केला.पण त्या व्यापाऱ्यांना घाई असावी.कारण ह्युएन त्संग आणि त्याचे भिक्खू साथीदार जागे झाले तेव्हा ते व्यापारी गायब झाले होते.सकाळी ह्युएन त्संगचा तांडा पुढे निघाला,तर काही अंतरावर त्या व्यापाऱ्यांची हत्या झालेली त्यांना दिसली.त्यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पसरले होते.हुई लीने ही हकीकत थोडक्यात लिहून ठेवली आहे.

मिशी आता १३०० वर्षांनंतर त्याच मार्गावरून निघाली होती. सुदैवाने तिच्या मार्गात असा धोका नव्हता.


इथून पुढे मिशीला किर्गिझस्तानमध्ये प्रवेश करायचा होता.आता हळूहळू तिच्या चिनी ज्ञानाची उपयुक्तता कमी कमी होत होती.या प्रदेशात मुस्लिम उघूरवंशीयांचं प्रमाण अधिक आहे.चीनपेक्षा त्यांना किर्गिझस्तान देश अधिक जवळचा वाटतो.मिशीने आगगाडीने काशगर गाठलं.

काशगर आणि मुख्य चिनी भूप्रदेश यांच्यामध्ये जाणवण्या

इतका फरक होता. काशगरमध्ये तिला एक्झल हा जर्मन तरुण, एक इस्त्रायली तरुणी,तसंच तिचा न्यूझीलंडवासी मित्र भेटले.ते सारे खुजेराब खिंडीतून किर्गिझस्तानातून पुढे पाकिस्तानमध्ये जाणार होते.मिशीला किर्गिझस्तानात पोचवायची व्यवस्था करणारा माणूस आता टाळाटाळ करत होता.त्याच वेळी तिला बर्नार्ड आणि कॉन्स्टन्स हे जर्मन जोडपं भेटलं.त्यांनाही किर्गिझस्तानात जायचं होतं.

ह्युएन त्संग काशगरहून किर्गिझस्तानात घोड्यावर बसून गेला होता. वाटेत त्याचे सात साथीदार अति थकवा,गार वारे,वेगवेगळे आजार यामुळे निजधामास गेले होते.मिशी आणि तिचे तीन साथीदार टोयोटा लँड क्रूझरमधून तोच रस्ता अगदी आरामात काटत होते.वाटेत त्यांना ह्युएन त्संगच्या त्या सात साथीदारांच्या कबरी लागल्या.


चीन आणि किर्गिझस्तानच्या सीमारेषेवरची सुरक्षा

व्यवस्था खूपच कडक होती.मिशीचं भारतीय पारपत्र बघून तिथला अधिकारी चक्रावला.मिशी म्हणजे चीनमधून किर्गिझस्तानात प्रवेश करणारी त्या सुरक्षा अधिकाऱ्याला भेटलेली पहिली भारतीय व्यक्ती होती.त्याने तिला अनेक प्रश्न विचारून तिच्या भारतीयत्वाची खात्री करून घेतली आणि मगच तिच्या पारपत्रावर प्रवेश दिल्याचा शिक्का उमटवला.या प्रकारात तासभर तरी गेलाच. आता टोरुगार्ट खिंड ओलांडून ते किर्गिझस्तानात शिरले.अनेक उघूर व्यापारी बिश्केक इथल्या बाजारात माल विकत घ्यायला आणि विकायला निघाले होते.आजही सिल्क रूट हा व्यापारी मार्ग होता. दोन-अडीच हजार वर्षांपासून तो प्रामुख्याने व्यापारासाठीच तर वापरला जात होता. किर्गिझस्तानात बनाईने पुढच्या प्रवासाची व्यवस्था आधीच केली होती.त्याची एक सहकारी झेन्या राजधानी बिश्केकहून गाडी घेऊन हजर होती.परदेशी प्रवाशांनी काशगर ते बिश्केक हा प्रवास सार्वजनिक वाहनाने करण्यास दोन्ही शासनांची परवानगी नव्हती.त्यामुळे आधीच खासगी वाहनाची सोय करावी लागली होती.

ह्युएन त्संगने ज्या ठिकाणाहून किर्गिझस्तानात प्रवेश केला त्याहून हे ठिकाण बऱ्याच दक्षिणेला होतं.त्यामुळे मिशीला पुन्हा ह्युएन त्संगचा माग काढणं भाग पडलं.

ह्युएन त्संगने या प्रवासात अनेक साथीदार गमावले होते.हुई लीला त्या प्रवासाचं वर्णन ऐकवताना ह्युएन त्संगच्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहत होती. किर्गिझस्तानातसुद्धा वाटेवर जागोजाग कबरी होत्या.

व्यापारी मार्ग असल्यामुळे जागोजागी दरोडेखोरांचं भय असे.पर्वतराजीचे चढ-उतार जीवघेणे होतेच.त्यात अतिथंड,शुष्क आणि विरळ हवासुद्धा जीवघेणी ठरत होती.किर्गिझस्तानातून मिशी उझबेकिस्तानात समरकंद इथे आली.हे बाबराचं गाव. उझबेकिस्तानातून अमुदर्या नदी ओलांडून ह्युएन त्संगने अफगाणिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर हिंदुकुश पर्वतराजी ओलांडून तो गांधार

मध्ये आला होता.मग सिंधू नदी ओलांडून काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या हुंझामध्ये त्याने प्रवेश केला होता.(हुंझा हा खरं तर काश्मीरचा भाग, पण १९४८ साली तो पाकिस्तानने बळकावला.आपण त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.) ह्युएन त्संगला इथे विरळ हवेचा त्रास झाला होता.अधूनमधून भास होत होते.खोल दऱ्यांतून वाहणारे जलप्रवाह रिबिनीसारखे दिसत होते.

बारामुल्लाची खिंड ओलांडून त्याने काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला होता. इ.स. ६२८ मध्ये ह्युएन त्संग काश्मीरमध्ये पोहोचला तेव्हा त्याचा प्रवास सुरू होऊन एक वर्ष झालं होतं. त्याने त्या काळातील २४ राज्यं आणि १३,८०० किमी इतकं अंतर ओलांडलं होतं.ह्युएन

त्संगच्या काळात समरकंद हे एक महत्त्वाचं आणि भरभराटीला आलेलं शहर होतं. ह्युएन त्संग त्याचा उल्लेख 'सा-मो-की एन' असा करतो.इथल्या नर्तिकांना चिनी सम्राटाच्या दरबारात खूप मागणी होती.समरकंद सोडून गाढवाच्या पाठीवर बसून केशला जाताना मिशी आजारी पडली.तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

ताप होताच.अंगात त्राण उरले नव्हते.पण सुदैवाने थोडी विश्रांती घेतल्यावर मिशीचा ताप उतरला.तिला बरं वाटू लागताच तिच्या रशियन मार्गदर्शक साथीदाराच्या मदतीने तिने अफगाणिस्तानकडे कूच केलं.मिशीचा प्रवास अफगाणिस्तानात पोहोचेपर्यंत तसा सरळ झाला असंच म्हणावं लागेल.आंतरराष्ट्रीय प्रवासात खुष्कीच्या मार्गाने प्रवास करताना ज्या अडचणी येतात त्यात शारीरिक अडचणी,आजार हे गृहीत धरावेच लागतात.सर्वांत जास्त त्रास सरकारी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा,टेबलाखालून होणारे व्यवहार व लालफीत यांचा असतो.या अनुभवातून मिशी तावून-सुलाखून पार पडली होती.ह्युएन त्संगला सरकारी अडचणी आल्या नव्हत्या.त्या काळात ज्ञानाला किंमत होती. ह्युएन त्संगच्या ज्ञानपिपासू वृत्तीची हकीकत सर्वदूर पसरलेली होती.त्याच्या मार्गात सर्वत्र बौद्धमठ होते.त्यामुळे तो मुक्कामाला जिथे जाईल तिथे त्याचं स्वागतच झालं होतं.त्या काळात इस्लाम नुकताच जन्माला येत होता. त्याचा प्रसार झाला नव्हता.ही गोष्टही ह्युएन त्संगच्या पथ्यावर पडली होती.मिशी अफगाणिस्तानमध्ये गेली तेव्हा तिथली बौद्ध शिल्पं शाबूत होती.तिच्यापुढे पहिली अतिशय गंभीर अडचण इथेच पहिल्यांदा उभी राहिली. ती जरी हाँगकाँगवासी असली,

अमेरिकी पद्धतीचं इंग्रजी बोलत असली,तरी तिने भारतीय नागरिकत्व सोडलेलं नव्हतं.तिचा पासपोर्ट अजूनही भारतीयच होता.त्यामुळे तिला पाकिस्तानने वास्तव्य परवाना नाकारला. नाकारला.त्यामुळे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात न जाता मिशी थेट भारतात परतली.ह्युएन त्संग भारतात जसा फिरला तशी तीही फिरली.त्या काळात म्हणजे २००१ मध्ये तिला काश्मीरमध्ये जाऊ नको.असं सांगण्यात आलं,तरी ती गेली.भारतातून परतताना ह्युएन त्संग (तेव्हा अस्तित्वात नसलेल्या) पाकिस्तानमधून गेला होता.मिशीने भारतातून पाकिस्तानात जाण्याचा परवाना मिळवला आणि मग ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करायचा आपला निश्चय पूर्ण केला.


ह्युएन त्संगने भारतात दहा वर्षं वास्तव्य केलं.जाताना तो ६५७ सूत्रं आपल्याबरोबर घेऊन गेला.चीनमध्ये परतल्यावर त्याने आपला एक मठ स्थापन केला तिथे तो त्याच्या अभ्यासानुरूप बौद्ध मत शिकवू लागला. त्याची ही पाठशाळा त्याच्या मृत्यूबरोबर अस्तंगत झाली.पण त्याच्यामुळे चीनमधील बौद्ध मताला आणि बौद्धधर्माला लेखी आधार मिळाला. 


प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्रांचं अचूक आणि यथोचित भाषांतर उपलब्ध करून देणारा आणि त्याच्यावर टिप्पणी करणारा आद्य चिनी भाष्यकार म्हणून तो मान्यता पावला.


मिशी ह्युएन त्संगची ही सारी हकीकत त्याच्या आणि हुई लीच्या शब्दांत सांगते,ह्युएन त्संगच्या प्रवासाचं यथातथ्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करते आणि ते सांगता सांगताच आपल्या स्वतःच्या प्रवासाचं वर्णन अशा तऱ्हेने करते की ह्युएन त्संगच्या प्रवासातल्या अडचणी आणि संकटं आपल्यापुढे प्रकर्षाने उभी राहावीत.या तिच्या शैलीमुळे तिच्याबद्दलचा कौतुकमिश्रित आदर वाढीस लागतो हे नक्की.बरं,ती फक्त ह्युएन त्संगच्या प्रवासा

पुरतीच आपली लेखणी मर्यादित ठेवत नाही,तर अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात फिरताना सिकंदर,

त्यानंतरचे ग्रीक, त्यांच्या संस्कृतीचं आपल्याला मिळालेलं देणं, आपण त्यांना काय दिलं,या साऱ्याची सहजगतीने नोंद करून इतिहासाचा मोठा पट आपल्यापुढे उभा करते.

मिशीचं हे पुस्तक माहितीने ठासून भरलेलं असलं तरी कुठेही नीरस आणि कंटाळवाणं झालेलं नाही.एकीकडे ह्युएन त्संगचा प्रवास,दुसरीकडे तिचा स्वत:चा प्रवास,तिला वाटेत भेटलेल्या सहप्रवाशांची स्वभावचित्रणं,त्याचबरोबर त्या जागेचा इतिहास, त्या जागेसंबंधीच्या दंतकथा अशा बऱ्याच गोष्टींची उकल करत मिशी वाचकाला परत ह्युएन त्संगच्या घरी घेऊन जाते आणि हा प्रवास संपतो.


३०.०८.२३ या लेखातील शेवटचा भाग…