भर उन्हाच्या काळात थोडा वेळ सावलीला थांबावं म्हणून मी मोहरानात प्रवेश केला. मोहाची रुंद पानं जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झालो.माझं लक्ष वर झाडाकडे गेलं. फुटबॉलच्या आकाराएवढी पानांची घरटी जिकडे
तिकडे दिसत होती.जिथे दोन पानं एकमेकांना जोडली होती,तिथे पांढरी रेषा दिसत होती.इतक्यात झाडावरून लाल रंगाच्या तीनचार मुंग्या अंगावर पडल्या.त्या मानेवरून खांद्याकडे गेल्या तेव्हा त्या भागाची अशी काही आग झाली की,शेवटी शर्ट काढून झटकावा लागला.तेव्हा आढळून आलं की,त्या शर्टाला चिकटून बसल्या होत्या.
त्यांचंच हे कृत्य होतं.नकळत मला त्यांनी कडकडून चावा घेतला होता.नंतर मी सावरून बसलो.आजूबाजूला ऐनाडीची झुडपं दिसत होती.तिथून आता उठून जाण्याच्या विचारात असताना माझं लक्ष ऐनाडीच्या झुडपाखाली गेलं.तिथे लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या अगदी लढाईच्या तयारीत असताना दिसल्या.अशी दृश्यं फार क्वचितच पाहायला मिळतात.म्हणून मी तिथेच सावरून बसलो.ज्यांनी हल्ला चढविला होता,त्या लाल मुंग्या होत्या.
असंच एकदा आंब्याच्या झाडावरती पानांनी बनविलेल्या गोलाकार घरट्यांचं निरीक्षण करताना एका घरट्यात या लाल आणि काळ्या मुंग्या गुण्यागोविंदानं नांदताना मला दिसल्या. मला आश्चर्य वाटून मी त्या घरट्याचं निरीक्षण करू लागलो.ते घरटं लाल मुंग्यांचं होतं यात शंका नव्हती.
लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना गुलामासारखं पाळलं होतं.
या काळ्या मुंग्यांना त्या जेव्हा अंड्यात होत्या तेव्हापासून लाल मुंग्यांनी पकडलं होतं.हा सारा वृत्तान्त मी डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथात 'वन्य जीवांचे स्वभावतः गुणधर्म' या सदरात वाचला होता.परंतु त्याचा प्रत्यय कधी काळी जंगलातील भटकंतीत येईल असं वाटलं नव्हतं. डार्विनच्या पुस्तकातील या लाल आणि काळ्या मुंग्यांच्या मालक- गुलाम संबंधाविषयीचा तपशील विस्मरणात जात असता आत्ताचं हे दृश्य अचानक दिसलं.
या लाल मुंग्यांचं वारूळ मोहाच्या मुळाखालीच होतं.
मोहरान डोंगराच्या पायथ्याला होतं.तिथून थोड्या अंतरावर काळ्या मुंग्यांचं वारूळ होतं. माझ्या येण्या-जाण्याच्या वाटेवर असलेल्या मोहरानातून जात असताना या वारुळाच्या आजूबाजूला लाल मुंग्या हिंडताना मला दिसल्या.मी लगेच त्यांना पाहण्यासाठी थांबलो. त्यांची संख्या सुमारे साठसत्तर तरी असावी.त्या जिकडेतिकडे काळ्या मुंग्यांच्या वारुळाभोवती रेंगाळत होत्या.अन्नाच्या शोधात त्या जलद गतीनं जाताना मोठ्या शोधक वृत्तीनं ये-जा करताना दिसतात.तशा त्या आज दिसत नव्हत्या.
त्या तिथल्या तिथेच चकरा मारीत होत्या.जवळच्या गवताच्या काड्यांवर चढत होत्या.शेंड्यावर जाऊन आपल्या मिशांची हालचाल करताना दिसत होत्या.मध्येच दोन मुंग्या एकमेकींच्या तोंडाजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगुज करीत. अशा वेळी त्यांच्या मिशीची बरीच हालचाल होई. बराच वेळ निरीक्षण केल्यावर आढळून आलं की,या टोळक्यांचं इथे जमणं निरुद्देश नव्हतं. त्यांच्या येणाऱ्या खास पलटणीसाठी ही प्राथमिक स्वरूपाची टेहळणी होती.काळ्या मुंग्या अस्वस्थ दिसल्या.एखाद्या लाल मुंगीची अवचित भेट होताच काळी मुंगी लगेच वळण घेऊन वेगानं आपलं वारूळ गाठायची.अन् मुळाच्या जाळीत जमलेल्या आपल्या बांधवांना जाऊन मिळायची.या काळ्या मुंग्यांचा जमाव जणू लाल मुंग्यांनी लादलेल्या युद्धाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करायला जमला असावा. लढाईपूर्वी टेहळणीला निघालेल्या या लाल मुंग्यांचं हे काम दोनतीन दिवस तरी चालू होतं.लहानलहान पलटणी करून लाल मुंग्या,
काळ्या मुंग्यांच्या वारुळाजवळ कूच करीत होत्या. वारुळाजवळ आपसात त्यांच्यात चकमक उडत होती.
काळ्या मुंग्या लाल मुंग्यांवर जिवाची बाजी लावून तुटून पडायच्या,परंतु लाल मुंग्या धीम्या चालीनं वारुळाकडे चाल करीत होत्या.वाटेत भेटलेल्या काळ्या मुंग्यांना त्या डसायच्या.तीक्ष्ण चावा घेऊन धडापासून मुंडकं अलग करायच्या.
डोंगरावरून लाल मुंग्यांचं सैन्य खाली वारुळाकडे कूच करीत होतं.एकदीड तासाच्या अवधीत ते वारुळापासून दोनतीन हात अंतरावर पोचलं.सैन्याच्या शिस्तीप्रमाणे इथून ते तीन भागांत विभागलं गेलं.त्यातील एका तुकडीनं सरळ वारुळावर हल्ला चढविला.बाकी दोन तुकड्या सांडशीच्या आकारात जाऊ लागल्या.हे सारं पाहून मी आश्चर्यानं थक्क झालो.त्या जागेला जबर युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. वरून नजर टाकली की त्यांची व्यूहरचना लक्षात येई.पहिली तुकडी आता गवतावरून धावत होती.दुसरी आणि तिसरी तुकडी वारुळाकडे आगेकूच करीत होती.पहिल्या तुकडीशी सामना करीत असलेल्या काळ्या मुंग्यांना इतर दोन तुकड्यांच्या हालचालीची कल्पना नव्हती.शेवटी काळ्या मुंग्यांना कळून चुकलं की,लाल मुंग्यांच्या घेरावात त्या पूर्णपणे अडकून पडल्या आहेत. तेव्हा हताश होऊन त्या जगण्याची इच्छा गमावून बसल्या.लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना जसं चोहोकडून घेरलं तशा त्या वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागल्या.काही मुंग्या तर या प्रयत्नात सरळ लाल मुंग्यांच्या आयत्या वाटेतच सापडल्या.लाल मुंग्यांनी त्यांना लगेच ठार केलं. काही काळ्या मुंग्यांनी आपल्या वारुळात प्रवेश केला.वारुळातील काही अंडी त्यांनी प्रवेशद्वाराजवळ एकत्रित करायला सुरवात केली.काही जणी अंडी तोंडात धरून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जाऊ लागल्या.परंतु हे सारं करायला त्यांना फार उशीर झाला होता.वारुळाभोवती घेराव करून आगेकूच करणाऱ्या त्या लाल सेनेनं वारुळाचा सारा भाग व्यापून टाकला.जिकडेतिकडे मुंग्यांचे पुंजके दिसू लागले.
काळ्या मुंग्यांच्या जबड्यात अंडी होती. त्यांचा पाठलाग लाल मुंग्या करीत होत्या. तोंडातील अंडी सोडून देण्यास त्यांना भाग पाडत होत्या.प्रतिकार केला की लगेच त्यांना ठार करण्यात येई.काही भित्र्या काळ्या मुंग्या,समोर लाल मुंग्या दिसताच,तोंडातील अंडी टाकून लगेच पळून स्वत:चा जीव वाचवीत.साऱ्या क्षेत्राला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं.दोन्ही पक्षातील मुंग्यांची डोकी धडावेगळी झालेली दिसत.मृत्यूचं थैमान माजलं होतं.कसाबसा जीव वाचवून काही काळ्या मुंग्या या मृतांच्या सड्यातून धावत होत्या,तर काही काळ्या मुंग्या त्यांनी सोडून दिलेली अंडी गोळा करून परत आपल्या तळाकडे कूच करीत होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी त्या ठिकाणी पोचलो.युद्धविराम झाल्याचं मला आढळून आलं.काळ्या मुंग्यांचं वारूळ ओस पडलं होतं.जखमी आणि मृत मुंग्यांचा तिथे ढीग पडला होता.लाल मुंग्यांचं अथवा काळ्या मुंग्यांचं सैन्य आता कुठेच दिसत नव्हतं.मी लगेच लाल मुंग्यांच्या वारुळाकडे धाव घेतली.अगदी शेवटची तुकडी काळ्या मुंग्यांची अंडी घेऊन नुकतीच तिथे पोचली होती.वारुळाच्या प्रवेशद्वारावर गुलाम काळ्या मुंग्यांनी धन्याचं स्वागत केलं.
वन्य जीवांत अशा प्रकारची जीवघेणी युद्धं होत नाहीत.काळ्या मुंग्यांना गुलाम करणाऱ्या लाल मुंग्या त्याला अपवाद आहेत.एरवी स्वत:चा जीव
वाचविण्याकरता त्यांच्यात झुंजी होतात किंवा त्या भक्ष्यावर हल्लाही करतात.मोर कीटक किंवा मुंगीमारच्या रूपानं मुंग्यांना देखील शत्रू आहेत. प्रौढ मोर कीटकाचा स्वभाव चतुरासारखाच असतो.दिसायला निष्पाप, परंतु अर्भकावस्थेत तो एखाद्या राक्षसासारखा खादाड असतो.
त्याकरिता भक्ष्य तो मोठ्या युक्तीनं पकडतो.अर्भकावस्थेत त्याचं शरीर गोलाकार असून डोकं मोठं असतं.(निळावंती - मारुती चितमपल्ली,प्रकाशक - मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर) त्याचा जबडा सांडशीसारखा असतो.मेळघाटातील सेमाडोह येथील सिपना नदी पाऊस पडताच दुथडी भरून वाहायची.तेव्हा नदीकाठच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडाझुडपांभोवती बारीक रेतीचा थर साचायचा.तो किंचित सुकला की कीटकसृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी मी सकाळीच काठाकाठानं जाऊ लागायचो.इथल्या भुसभुशीत जमिनीवर अक्षरश: शेकडो छिद्रं दिसत.आकारानं शंकूसारखी.अर्धाअधिक इंच खोल.तुम्हाला माहीत आहेच की मुंग्यांइतकं उद्योगी कुणी नसतं.सारख्या घाईगडबडीत त्या इकडून तिकडे जाताना दिसतात.कुठेकुठे त्या अडखळतात,खाली पडतात.परंतु पुन्हा उठून पूर्ववत् चालू लागतात.अशा मुंग्यांच्या वाटेवर ही छिद्रं दिसतात.त्या छिद्रांत एखाद-दुसरी मुंगी कोलमडून पडे.मात्र तिला त्या छिद्रातून परत बाहेर पडता येत नसे.ती वर चढण्याचा प्रयत्न करी.परंतु प्रत्येक वेळी रेती ढासळल्यानं ती खाली पडे.या संधीची वाट पाहत त्या छिद्राच्या तळात मोर कीटक दडून बसलेला असे.मुंगीला लगेच रेतीत ओढून तो तिच्या शरीरातील द्रव शोषून घेई.