* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विचारवंत कन्फ्यूशियस - thinker Confucius. भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/९/२३

विचारवंत कन्फ्यूशियस - thinker Confucius. भाग २

पिता ज्याप्रमाणे मुलाबाळांची तरतूद ठेवतो, त्यांची सर्व काळजी घेतो,तसे राजाने प्रजेचे पालन केले पाहिजे, "एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात निकाल देण्यासाठी कन्फ्यूशियसला बोलवण्यात आले,तर एकदम निकाल देण्यापूर्वी तो आधी पुष्कळशा शहाण्या लोकांचा विचार घेई.व मग न्याय देई.पुढे भविष्यकाळात जी ज्युरीपद्धती जगात आली,तीच जणू कन्फ्यूशियसच्या डोळ्यांसमोर होती.गुन्हेगारांना शिक्षा देणे हेच त्याचे मुख्य ध्येय नसून गुन्हे कमी कसे होतील,हे तो आधी मुख्यतःपाही.त्या वेळेस साऱ्या चीन देशभर भुरट्या चोरांचा व उचल्यांचा बुजबुजाट झाला होता! याला आळा घालण्यासाठी म्हणून प्रमुख नागरिक त्याला प्रश्न करीत.तो म्हणे,

"चोरी बंद करायचा एकच मार्ग आहे.आणि तो म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ कमी करा.तुम्ही लोभ सोडला म्हणजे चोरांनी न्यावे इतके जास्त तुमच्याजवळ उरणारच नाही."

आपल्या राजाची कीर्ती वाढावी;आपले राष्ट्र सुधारलेले व्हावे,म्हणून कन्फ्यूशियसचे जे प्रयत्न चालले होते त्यात त्याला बरेचसे यश येत होते. परंतु ली प्रांतांचा राजा लू प्रातांचा मत्सर करी, द्वेष करी.कन्फ्यूशियसच्या नेतृत्वाखाली लू प्रांतांची कीर्ती पसरत आहे.ही गोष्ट ली प्रातांधिपतीस सहन झाली नाही.कन्फ्यूशियसचे लू प्रातांच्या राजावर जे वजन होते,ते नष्ट व्हावे म्हणून त्याने एक साधी युक्ती केली.त्याने लू राजाकडे ऐंशी नृत्यांगना पाठविल्या.युक्ती सफल झाली.राजा त्या नृत्यांगनांत इतका रमला की, कन्फ्यूशियस व त्याचे प्रयोग सारे विसरून गेला.कन्फ्यूशियसला या गोष्टींचा तिटकारा आला. तो आपला स्वतःचा लू प्रांत सोडून रागाने निघून गेला आणि पुन्हा जगभर भटकू लागला. जगाच्या करुणेवर,जगाच्या आधाावर त्याने स्व:ला सोपविले.या वेळेपर्यंत कित्येक हजार शिष्य त्याला मिळाले होते.तरीही आपले जीवन विफल आहे असे,त्यास वाटे.राजे पशुसमान होते,प्रजा अडाणी होती.आणि त्याचे उत्तम पुरुषाचे ध्येय अद्याप स्वप्नातच होते. मानवजातीस स्वतः प्रमाणे बनविण्याचा त्याने प्रयत्न केला.परंतु ज्या मातीवर तो प्रयत्न करू पाहात होता.ती माती टणक होती.त्याची सौम्य बोटे त्या मातीस आकार देऊ शकेनात.प्रवास करताना पुष्कळ वेळा खुनी व दरोडेखोर त्याच्यावर हल्ला चढवीत.पुष्कळ वेळा त्याला अन्नाशिवायही दिवस काढावे लागले.तरीही तो ध्येयापासून च्युत झाला नाही;स्वीकृत कार्य त्याने सोडले नाही.


या वेळचे स्वतःचे एक सुंदर शब्दचित्र त्याने काढले आहे.तो लिहितो; "कन्फ्यूशियस इतका तहानलेला आहे,की पुष्कळ वेळा खाण्यापिण्याचीसुद्धा त्याला आठवण राहत नाही.आपल्या प्रयत्नांना यश येत आहे असे जरा दिसले की त्या आनंदात तो सारे दुःख विसरून जातो.ज्ञानोपासना करताकरता व ध्येयार्थ धडपडत असता वार्धक्य जवळ येत आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही "


हाती घेतलेले उद्योग निराशेने सोडून द्यायला तो अद्याप तयार नव्हता.जनतेला दैनंदिन व्यवहारात मार्गदर्शन व्हावे म्हणून प्राचीन ग्रंथांचे संपादन व संकलन त्याने सुरु केले.

जुन्या चिनी बायबलातून त्याने जणू नवीन बायबल करारच चिनी जनतेस दिला.कन्फ्यूशियस बुद्धाप्रमाणे नास्तिक होता. स्वर्ग किंवा नरक यांवर त्याचा विश्वास नव्हता. त्याचा एकाच गोष्टीवर अपरंपार विश्वास होता. तो म्हणजे स्वतःच्या मानवबंधूंवर कन्फ्यूशियसची श्रद्धा होती.की जर शंभर वर्षे नीट सुव्यवस्थित राज्यकारभार चालेल, तर पृथ्वीवरचा सारा अत्याचार नाहीसा होईल.


या ध्येयाने प्रेरित होऊन लोकांवर कशा रीतीने राज्य चालवावे याविषयीची निश्चित सूत्रावली त्याने लिहून ठेवली आहे.शिस्त यावी म्हणून नानाविध विधिविधाने त्याने सांगितली आहेत, जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने कोणत्यातरी विधीशी जोडली आहे.हे विधीचे अवडंबर मोठे डोळ्यांत भरण्यासारखे आहे.झोपडीत राहणारा शेतकरी राजवाड्यातील राजाइतकाच प्रतिष्ठित.राजाला राजाचे विधी.शेतकऱ्याला शेतकऱ्याचे.

परंतु उभयतांच्याही जीवनात त्या त्या गंभीर विधींमुळे एक प्रकाराची प्रतिष्ठा आली.कन्फ्यूशियसने आपल्या लोकांवर जे हे औपचारीक असे नानाविध बाह्यविधी लादले, त्यांचे आपणास आज हसू येते.अती गुंतागुंतीचे व काहीकाही बाबतीत तर ते हास्यास्पद असे दिसतात.या विधींमुळे चिनी राष्ट्र हे सर्व जगात अगदी बारीकसारीक गोष्टींकडेही फार पाहणारे, बाह्य देखाव्यावर भर देणारे असे झाले.परंतु यामुळे एक प्रकारचा स्वाभिमानही त्यांच्यांत आला.दुसऱ्यांस मान देणे व स्वत:चाही मान सांभाळणे या दोन्ही गोष्टी ते शिकले.राजाही पूजनिय आणि शेतकरीही पूजनिय,कन्फ्यूशियसच्या शिकवणीचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, की "स्वतःशी प्रामाणिक रहा व शेजाऱ्यांशी प्रेमाने व सहिष्णुतेने वागा." दुबळ्या निःस्वार्थतेच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्याने त्यांना उदार आणि दुसऱ्यांच्या डोळ्यांत न खुपणारा असा सुसंस्कृत स्वार्थ शिकविला. स्वार्थ तुमच्याजवळ असणारच. परंतु तो शहाणा स्वार्थ असू दे. कन्फ्यूशियसच्या मनात चीन हे प्रतिष्ठित नागरिकांचे राष्ट्र करावयाचे होते. असहिष्णू व अहंकारी लोकांची जात निर्मिण्याऐवजी सभ्य अशा सद्गृहस्थांची जात त्याला निर्मावयाची होती.चिनी राष्ट्र सद्गृहस्थांचे व्हावे असे स्वप्न रात्रंदिवस तो मनात खेळवीत होता.राजाला वा रंकाला तो स्वतः समानतेने वागवी.राजाचे स्थान वैभवाचे व थोर म्हणून त्यालातो मान देई आणि गरीब थोर मनाने व उदात्तेने कसे कष्ट सोशीत आहे हे पाहून त्यालाही मान देई. तो "ज्यांना ज्यांना जीवनात दुःख,क्लेश आहेत,ज्यांची जीवने विकल नि विफल झाली आहेत,ज्यांना अपयश आले आहे, अशा सर्वांच्या दुःखात तो सहभागी होऊ इच्छित असे.कन्फ्यूशियसवर त्याचा एक शिष्य यामुळे एकदा रागावला. "दरिद्री लोकांत,सर्वसामान्य जनतेत मिसळण्याची तुमची ही वृत्ती आम्हाला आवडत नाही." असे तो शिष्य म्हणाला. कन्फ्यूशियस त्याला शांतपणे म्हणाला, "दुःखी कष्टी दुनियेशी मी एकरूप नको होऊ.तर कोणाबरोबर होऊ?"

परंतु दरिद्री नारायणाविषयी जरी त्याला सहानुभूती वाटत असली,तरी भावनांनी वाहून जाणारा,विरघळून जाणारा तो नव्हता.तो आपला तोल,सुवर्णमध्य कधी विसरत नसे.

त्याची सहानुभूतीही व्यवहारी होती.मानवजातीला ओलांडून सर्व प्राणिमात्रांस कवटाळू पाहणारी अशी त्याची सहानुभूती नव्हती.तो म्हणे, "जगापासून दूर निघून जाणे अशक्य आहे.ज्या पशुपक्ष्यांशी आपले काही साधर्म्य नाही, त्याच्यांशी एकरूप कसे व्हायचे? " कन्फ्यूशियस पशुपक्ष्यांसाठी तहानलेला नव्हता.देवदूतांना भेटायला हपापलेला नव्हता.त्याच्या डोळ्यांसमोर स्वतःची ही मानवजात नेहमी असे. तिचा तो विचार करी.तिचे सुख - दुःख पाही.तसे अपकाराची फेड उपकाराने करावी,

द्वेषाला प्रेमाने जिंकावे,अहंकाराबरोबर नम्रता घ्यावी. असा संदेश त्याने कधी दिला नाही.एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा असे त्याचे मत नव्हते.हे मत त्याला शहाणपणाचे वाटले नाही. "शत्रूबरोबर न्यायाने वागा व मित्राबरोबर प्रेमाने वागा." असा त्याचा दूरदर्शी उपदेश आहे. शत्रूबरोबर न्यायाने वागा,परंतु त्याच्यावरही प्रेम करून त्याला चिडवू नका.अशाने तो शत्रू अधिकच रागावेल. 'मला लाजावता काय?" असे तो म्हणेल.आगीत तेल ओतल्याप्रमाणे ते होईल. दुसऱ्याने इजा केली असता त्याचा सूड घेऊ पाहणे हे पशुवृत्तीचे द्योतक आहे.परंतु त्याला क्षमा करणे हेही मूर्खपणाचे आहे.एकंदर गोष्टीचा नीट विवेकाने निर्णय करा व तदनुसार वागा. शत्रूचे हक्कही सांभाळा व स्वतःची प्रतिष्ठाही सांभाळा.आपल्या अन्यायी शेजाऱ्यांशी वागण्याचा सुसंस्कृत माणसाचा हाच एक मार्ग आहे. एकदा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, "एका शब्दांत तुमच्या शिकवणीचे सार सांगा." कन्फ्यूशियस म्हणाला, "जशास तसे." शिष्य म्हणाले, "याचा अर्थ अधिक स्पष्ट करा." तो म्हणाला, "जे तुम्ही स्वतःच्या बाबतीत करू इच्छिणार नाही ते दुसऱ्यांच्या बाबतीत करू नका."

कन्फ्यूशियसने जो हा सुवर्णनियम सांगितला,तोच पाचशे वर्षांनी पुढे ख्रिस्तानेही सांगितला.परंतु दोघांचेही म्हणणे त्यांच्या समकालीनांनी ऐकले नाही.समकालीन जनतेने दोघांचीही उपेक्षाच केली.त्याचे अखेरचे दिवस दुःखाचे होते.त्याचे प्रिय शिष्य मरण पावले,पत्नींशी काडीमोड करूनही तिच्यावर तो प्रेम करी. तीही मेली.त्याचा एकुलता एक मुलगाही वारला. तो म्हणाला, "आता मीही जाणे बरे.माझीही वेळ आता आलीच आहे. "

तो अत्यंत दारिद्र्यात निवर्तला.त्याचे वय बहात्तर वर्षांचे होते. त्याचे हेतू विफल झाले होते.त्याची स्वप्ने धुळीस मिळाली होती.मानवावरचा त्याचा विश्वास ढासळला होता.फारच थोड्या लोकांनी त्याचे शब्द हृदयाशी धरले.

आणि जे त्याच्या शिकवणीप्रमाणे वागत त्यांचा छळ होई.आरंभी ख्रिश्चनांचा त्यांच्या क्रांतिकारक जहाल मतांबद्दल जसा छळ झाला,तसाच कन्फ्यूशियसच्या शिष्यांचाही झाला.एका चिनी सम्राटाने कन्फ्यूशियसची सारी पुस्तके जाळण्याचा हुकूम त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी दिला.पुष्कळ श्रद्धावान पंडितांनी भक्तीमुळे ग्रंथ न जाळता लपवून ठेविले.परंतु कायदेभंग करणाऱ्या अशा पंडितांना जिवंत पुरण्यात आले.

परंतु आज पाश्चिमात्यांत बायबल जितके लोकप्रिय आहे तितकेच चीनमध्ये कन्फ्यूशियसचे ग्रंथ लोकप्रिय आहेत. ख्रिस्ताप्रमाणे कन्फ्यूशियसही आता देव झाला आहे.

ख्रिस्त व कन्फ्यूशियस दोघांनीही सज्जन मानवांची एक नवीन जात निर्माण करण्याचा महान उद्योग केला.शिष्ट मानव नव्हेत; तर खऱ्या अर्थाने सौम्य व शांत असे सद्गृहस्थ.परंतु आतापर्यंत ख्रिस्त व कन्फ्यूशियस या दोघांचेही कोणी ऐकले नाही.दोघांच्याही शिकवणीपासून जग दूरच राहिले आहे.कोट्यवधी चिनी लोक कन्फ्यूशियसच्या नावाची पूजा करतात; परंतु कन्फ्युशियससारखे आपले मत उदार व उदात्त व्हावे अशी खटपट कितीसे करीत असतील ? तसेच जे स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात,अशांपैकी किती जणांना ख्रिस्ताने शिकवलेला धर्म समजला असेल,समजत असेल ?


ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्युशियश 

०३.०९.२३ या लेखातील शेवटचा भाग ..