माझ्या अंगावर सर्रकन काटा आला..!
...उताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो,तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली,दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले.मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर असताना माझे हात पसरले गेले होते.माझ्या उजव्या हाताला 'ओकचं' एक रोपट लागलं... तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपट मी हाताने पकडल असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जळवून वाघाच्या पोटाला टेकवल असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो.वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटावर टेकवले.त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.
जिम कॉर्बेट - कुमाऊँचे नरभक्षक
अशीच उत्कंटा वाढविणारी अंधारी भय कथा खाली देत आहोत.ही कथा आपल्या जीवनाबरोबर असते,अगदी बालपणापासून,आपल्या प्रत्येकामध्ये असा 'सदा' असतोच.ही कथा आपले मित्र श्री.विष्णू गोपाळ सुतार,
हरोली यांनी लिहिली आहे.
भास…
तिन्हीसांज टळून गेली होती.अंधार पडत चालला होता.पण सदाचा अजून पत्ता नव्हता.शाळेतून अजून घरी आला नव्हता.सदाची आई त्याची काळजी करत होती.
वाटंकडं डोळं लावून चुलीवरच्या तव्यात भाकरी टाकत ती सदाचीच वाट बघत होती.इतक्यात सदा आला.
अंगणातून आईला म्हणाला आई च्या दे मला.शंकऱ्याच्या घरला अब्यासाला जानार हाय.
सदाला बघून सुमाला बरं वाटलं.तुकाराम आणि सुमाचा एकुलता एक पोर सदा.मूल जगेल याचा भरवसा नसताना जिवंत राहिलेलं बाळ म्हणून काय कवतुक.मुद्दाम दुसरं मूल होऊ दिलं नाही. सदालाच लाडाकोडानं हातावरच्या फोडासारखं जपलं.पोरगं हुशार निघालं.चौथी आणि सातवीत केंद्रात नंबर काढलं.यंदा सदा दहावीत होता. अभ्यासातही हुशार होता.शाळेतल्या मास्तरांचाही त्याच्यावर जीव होता.शाळा चालू होण्यापूर्वी एक तास सकाळी आणि शाळा सुटल्यावर एक तास तो रोज जादा अभ्यासासाठी शाळेतच रहायचा.त्यामुळंच आज त्याला उशीर झाला होता.चहा पिऊन तो परत अभ्यासाला जाणार होता.
हायपाय धुवून सदा आत आला.त्याला बघून सुमा म्हणाली,"सदा ,माज्या राजा,एक काम हाय रं. ह्यबघ.त्यास्नी एकाएकी थंडी वाजून आलीया.
अंगात ताप भरलाया.तोंडातनं सबुद भाईर ईना."
तुकाराम तापानं,फणफणत होता.दिवसभर पाणी पाजून अंग केंगाटून गेलं होतं.चहा पिऊन पुन्हा पाण्याकडं जावं म्हणून तो घरी आला होता. तासावर पाणी घेतलं होतं.
त्याला गडबडीनं पाण्याकडं जायचं होतं.चहा पितानाच त्याला अचानक कसंतरीच व्हायला लागलं.थंडी वाजायला लागली.बघता बघता अंग तापायला लागलं.
म्हणून वाकळ घेऊन गपगार पडून होता.पाणी पीत सदा आईचं बोलणं ऐकत होता.अचानक कसा ताप आला त्याला कळेना. आई म्हणाली.,"उपाद्याचा डाक्तर आल्ता.
टुचून गेलाया.सकाळपतूर कमी ईल म्हणालाय.पर सदा,रानात उसाला पानी लावून आल्यात रं.आन आत्तापतूर पाट भरला आसंल.तवा आच्चादिस अब्यास र्हाऊ दे.तेवढा पाट फिरवून ये जार र सोन्या."
सदा गुमान आईच ऐकत होता.नाही म्हणाव असं त्याला वाटत होतं.चौगुले सरांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या.'बोर्डात आला पाहिजेस बग' या सरांच्या वाक्यानं सदाचा हुरूप वाढला होता. त्यालाही खात्री होतीच.थोडंच दिवस उरलं होतं परीक्षेला म्हणून ज्यादा अभ्यास करत होता. आताही त्याला जायच नव्हतं पण नाईलाज होता.
पलिकडच्या खोलीत तुकाराम निपचित पडला होता.
सदानं तुकारामाच्या अंगावरची वाकळ बाजूला सारुन कपाळाला हात लावला. झटक्यासरशी त्यानं आपला हात बाजूला केला. अंग तव्यासारखं भाजत होतं.सदा उठला. अंगातली शाळेची कापडं काढली.रोजची कापडं त्यानं अंगात घातली.आईनं दिलेला चहा घेऊन खांद्यावर टॉवेल टाकून शेताकडे जायला तो घरातून बाहेर पडला.
आत्तापर्यंत बाहेर खूपच अंधार पडला होता.गार हवेची एक झुळूक सदाला चाटून गेली.तसं त्यानं खांद्यावरचा टॉवल डोक्याला गुंडाळला.हाताची घट्ट मिठी छातीभोवती आवळून तो चालू लागला.रात्रीच्या वेळी एकट्यानं शेताकडं जाण्याची सदाची ही पहिलीच वेळ होती.या आधी गेला होता पण; सोबत वडील असताना!
गाव दूर राहिला आणि आता अंधारात त्याला रस्ताही नीट दिसेना.जसजसं पुढं जाऊ लागला तसं त्याला भीती वाटू लागली.रातकिड्यांचा किर्रर्र आवाज त्याच्या कानात घुमू लागला. थंडीमुळे कुत्री उगाच ओरडत होती.सोबतीला कुणी असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं.
रस्त्याच्या कडेला अंगाचं मुटकुळं करून बसलेलं काळं कुत्रं सदाच्या चाहुलीनं जागं झालं.स्वतःच्याच विचारात असणारा सदा त्यामुळे एकदम दचकला.त्याच्या अंगाला घाम सुटला.मनात देवाचं नाव घेत तो चालू लागला. पण भीती काय कमी होत नव्हती.त्यातच भर म्हणजे पाणंदीजवळच धनगराच्या सोना म्हातारीला जाळल्याचं त्याला आठवलं.अंगावर काटा आला.तो दचकून गेला.
इथूनच परत जावं असंही त्याला वाटायला लागलं.पण त्याला तसं करता येत नव्हतं.देवाचं नाव घेत तो पुन्हा चालू लागला.रस्ता सोडून तो आता पाणंदीत आला. जरा वेळ तो तिथंच थांबला.दिवसभर उन्हात तापलेली रानं शांत विश्रांती घेत आभाळाकडं बघत निवांत पडलेली होती.वाऱ्यामुळे शिवारातली पिकं डोलत होती.त्याची मंद झुळूक लागताच सदानं पुन्हा डोक्याला टॉवेल बांधला आणि तो चालू लागला.
रानडुकरांनी रानात हैदोस मांडलाय आणि राखणीला माणसं रानात होती हे त्याला माहित होतं.आता त्याला डुकरांचीपण भीती वाटू लागली.तसाच गडबडीत तो झपाझप पावलं उचलत राहिला.इतक्यात रानातनं एक बॅटरीचा झोत त्याच्या अंगावर पडला.त्यानं तो जास्तच दचकला.मागं फिरून त्या झोताच्या दिशेन त्यानं पाहिलं.
रानातनं आवाज आला, "कोन हाय रे तिकडं?" सदाला आवाज ओळखता आला नाही. घाबरतच तो म्हणाला,मी ..मी.. सदा हाय निकमाचा." बॅटरीचा झोत जवळ जवळ येऊ लागला.कोण असावं याचा काहीच अंदाज सदाला लागेना. डोक्याचा टॉवल काढला.एकदम जवळ आल्यावर बॅटरीचा झोत बंद करत जाधवाचा आंदा म्हणाला, "कोण? सदा?अरे तू? हिकडं काय करतुयास? आनी इतक्या राच्च्याला का आलाईस?"
जाधवाच्या आन्दाला पाहून सदाला जरा बरं वाटलं.
तो म्हणाला, "आन्दूदा, तू हाईस व्हय. भिलो की गा एकदम". आन्दा म्हणाला."भ्यायला काय झालं .. रं? काय भूत बीत वाटलो की काय तुला? पर तू हिकडं काय करतुयस?" सदा म्हणाला,"रातीच्या वक्ताला कवा आलू न्हाय एकटं. म्हणून जरा घाबरलो बग.आरं, आबास्नी बरं न्हाई.तापानं आंग भाजून गेलयां.थंडीनं हुडहुडी भरलीया.
निपचित पडून हायती बग. आनि हिकडं तर पाट भरलाया.तासावर पानी घेतलंया कदमाच्या हिरीचं.आनी घरात माज्याशिवाय दुसरं कोन हाय? पाट परतायला आलूया. तू हिकडं काय करालाईस?"
"आरं ही डुकरं काय बसू देत्यात व्हय मर्दा! कसलं चांगलं पिक आलंया आनी ही एकसारखं दमवाय लागल्यात.
राखनीला आलोय न्हवं.मी हाय.अन्ना हाय,रव्या हाय सुताराचा".आन्दानं खुलासा केला.एवढ्या रात्री आपल्या सोबत कुणीतरी आहे याचं सदाला बरं वाटलं.आता आन्दाला घेऊनच शेताकडं जावं असा विचार करुन तो आन्दाला म्हणाला, "आन्दूदा,मग जरा चल की माज्यासंग.पाट परतून येवूया. एकट्याला भ्या वाटायल्या रं".आन्दानं लागलीच कबूली दिली.चालता चालता आन्दानं शाळेचा विषय काढला. "चौगुले मास्तर तुमाला हाईत काय रं शिकवायला ?" सदा म्हणाला, "हाईत की. मराठी शिकवित्यात. नाद करायचा नाई सरांचा. लई भारी शिकीवत्यात.कवा कवा तर एवढं हशिवत्यात.तास सपूच ने वाटतोय त्यांचा." "गणिताला कोन हाय रे?" आन्दानं विचारलं. "परीट सर".सदान सांगितलं."परीट सर? आरं लई मारतंय बाबा ते.आमाला तर नुसतं फोडून काढलंय बग त्यानं." आन्दानं भूतकाळ आठवला."आमच्या वर्गातली बी लई मार खात्यात.पर माज्यावर लई जीव सरांचा. वर्गात सगळ्यांच्या आदी माजं उत्तर तयार आसतंय. मला लई आवडतंय गणित."आन्दाला सदाचं कौतुक वाटलं आणि नवे मुख्याध्यापक, बदललेली शिक्षक मंडळी,शिक्षणाचं वातावरण यावर बोलत बोलत ती दोघं शेतापर्यंत कधी आली ते समजलंच नाही.सदानं पाटाचा अंदाज घेतला.पाट भरलाय हे बघून पुढच्या पाटाला पाणी फिरवण्यासाठी तो खोरं शोधू लागला. अंधारात त्याला ते कुठे सापडेना.म्हणून आन्दाकडं त्यानं खुरपं मागितलं. आन्दाकडं खुरपं नव्हतं.पण राखणीची काठी होती.काठीनंच पाट फोडून रात्रभर पाणी चालावं म्हणून त्यानं चार पाटाला पाणी लावलं.राखणीची
काठी त्याला परत केली.दोघेही मागं फिरले,बोलत बोलत ती दोघं रस्त्यावर आली.आन्दाचं आभार मानावं म्हणून सदानं मागं पाहिलं आणि ........सदाला एकदम घामच फुटला.हाताची बोटं आपोआप तोंडात गेली.हातपाय लटपटू लागले.त्याला काहीच कळेनासं झालं.तो मटकन खालीच बसला.त्याचा विश्वासच बसेना.कारण आन्दा तिथं कुठं नव्हताच.आता तर आपल्याबरोबर होता आणि एवढ्यात कुठं गेला याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं.आन्दाला चारदोन हाकासुध्दा मारुन बघितल्या.आन्दाचा कुठूनच आवाज आला नाही.पण त्यानं कुत्री मात्र जागी झाली आणि ओरडायला लागली.
आवाज ऐकून कदमाचा शिवन्या आणि सुताराचा रव्या सदाजवळ आले. "काय रं? कुणाला हाक मारतुयस?
"ते....ते आन्दूदाला हाक मारतोय पर ओ दीना न्हवं."
"आरं आन्दा आलाय कुटं अजून". "आता हूता माज्यासंग आनि".....
"आरं कसं असंल? अजून याचा हाय त्यो."
आता मात्र सदाला काहीच कळेना.आन्दूदा अजून आलाच न्हाई तर माज्याबरोबर कोन हुतं या विचारानं त्याची बोबडीच वळली.दरदरून घाम फुटला.आन्दाचाच विचार करत झपाझप पावलं टाकत तो पळतच घराकडे आला. अंगातली कापडे घामानं भिजली होती.भरलेला तांब्याच त्यानं तोंडाला लावला.आईलाही काही कळंना.
त्याचा तो अवतार बघून चिंतागत होऊन ती त्याला म्हणाली, "आरं जेवणार हाईस की अजून. आनी पानी कशाला प्या लागलाईस? ताट करुन ठेवलंय चल जेव चल.सदानं हात धुतलं आणि तो ताटावर बसला.पण त्याचं लक्ष जेवणाकडे नव्हतं.तसाच त्यानं जेवणाठी घास उचलला.घास तोंडात घालणार इतक्यात बाहेरुन आवाज आला.
"तुकामा हाय का घरात?" सदाच्या आईन पुढं होऊन बघितलं. आणि दारातल्या आन्दाला बघून ती म्हणाली,
"आन्दा? काय रे? काय काम हुतं?" आन्दा म्हणाला, "व्हय.रानाकडं चाल्लोय.' चिंतागती आई म्हणाली, "इदुळा?"
``आवं काय सांगायचं काकू,रानात डुकरानी नुस्ता धुडघूस घाटलाया.आवं पिक चांगलं आलंया आनी ही डुकरं दमवाय लागल्यात न्हवं.
"आनि रं. आत तरी ई की.आई" म्हणाली.आत येत आन्दा म्हणाला.
"न्हाई, जातू की.शिवन्या आन रव्या हैती रानात. वाट बगत असतील.'
"होंच्याकडं काय काम हुतं?"
"व्हय ते ब्याटरी मागाय आल्तो.राखणीला चाल्लोय.माझ्या ब्याटरीतला मसाला सपलाय न्हवं.' ..
"थांब हं देतो." असं म्हणत सदाची आई उठली.सदाकडे बघून आन्दानं विचारलं,"काय सदा यावं का जेवायला ?"
.... आणि घरात आलेल्या आन्दाला बघून सदाच्या हातातला घासच गळून पडला. काहीच न बोलता तो आन्दाकडं बघतच राहिला….