* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१३/९/२३

पाश्चिमात्य वैद्यक : रोम Western Medicine: Rome

रोमनं मेडिटेरियन प्रांतावर राज्य केलं तेव्हा त्यांनी बायॉलॉजीच्या प्रगतीत बराच हातभार लावला होता.त्या वेळच्या तज्ज्ञांनी रोममध्ये असलेलं आधीचं ज्ञान जपून ठेवायला आणि रोम साम्राज्यात त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली होती.त्याच वेळी तिसऱ्या शतकात होऊन गेलेला औलुस कॉर्नेलियस सेल्सस (Aulus Cornelius Celsus) (ख्रिस्तपूर्व २६ ते ५०) यानं एक सायन्स सर्व्हेच घेतला घेतला.त्यात त्यानं आतापर्यंत उल्लेखल्या गेलेल्या आणि वापरात असलेल्या सहाशे वनस्पतींची माहिती गोळा केली होती.आणि त्यांच्या औषधी उपयोगांबद्दल लिहिलं होतं. यातून त्याला भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली होती.यातूनच त्यानं फार्माकोलॉजी (औषधनिर्माण) या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया घातला.अशा प्रकारच्या एन्सायक्लोपीडियाचं काम रोमच्या इतिहासात आणखी एका महान वैज्ञानिकानं पुढे नेलं.त्याचं नाव होतं गेयस प्लिनियस सेकंड्स (इ.स.२३ ते ७९) यानं याच्या आधीच्या लेखकांनी बायॉलॉजीबद्दल लिहिलेलं जे काही सापडेल ते लिहून ठेवलं. अर्थात,त्या काळी बायॉलॉजीला 'नॅचरल सायन्स' म्हणत होते.त्यामुळे त्यानंही आपल्या खंडांना 'नॅचरल हिस्ट्री' म्हटलं आहे.त्याच्या लिखाणाचे चक्क खंड होते.त्यानं जे काही सापडेल ते सगळं लिहिलं असल्यामुळे त्यात अनेकदा विज्ञानाबद्दलच्या चुकीच्या समजुती आणि भाकडकथाही आल्या होत्या.पण तरीही त्यानं जे काही होतं त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं' ही तार्किक कारणमीमांसा कायमच प्रमाण मानली होती. आणि त्याला पाठिंबा दिला होता.त्यामुळेच हे खंड पुढची अनेक शतकं अभ्यासली गेली होती. या माणसाला आता आपण 'प्लिनी' म्हणून ओळखतो.!


ग्रीक परंपरेतला शेवटचा आणि जवळपास सगळ्यात महत्त्वाचा बायोलॉजिस्ट ज्याला म्हणता येईल तो म्हणजे गेलन (१३० ते २००) होता.गेलनचा जन्म आशिया मायनरमध्ये झाला होता.आणि त्यानं आपलं कार्य मात्र रोममध्ये केलं.गेलनच बालपण एका श्रीमंत कुटुंबात पर्गेमॉन या गावात गेलं.त्यामुळे त्याला गेलन ऑफ पर्गेमॉन'असंही म्हटलं जातं.त्याची आई तापट स्वभावाची होती.घरात तिचा सतत आरडाओरडा सुरू असे.त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकांनी नीट काम केलं नाही तर ती त्यांचा चक्क चावा घेत असे! गेलनला भाऊ-बहिणी होत्या याविषयी काही माहिती उपलब्ध नाही.गेलनचे वडील निकॉन हे प्रसिद्ध अभियंता आणि वास्तुरचनाकार होते.त्यांना गणित,तत्त्वज्ञान,खगोलशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये रस होता.गेलननं त्यांची प्रतिभा घेतलेली असली तरीही आईचा भडकपणाही त्याच्या जोडीला उचलला होता! त्या काळात युद्धात शत्रूकडच्या नागरिकांना पकडून विजयानंतर नोकर बनवलं जाई.गेलनच्या घरी असे अनेक नोकर होते. निकॉननं स्वत:च गेलनला लहानपणी शिकवलं.थोडा मोठा झाल्यावर गेलन शाळेत गेला.त्याला अभ्यासाची चांगली गोडी लागली.शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करून गेलननं वैद्यकीय अभ्यास सुरू केला.वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्याची ३ पुस्तकंही प्रसिद्ध झाली होती.

त्याच्या गावात अस्कुलअ‍ॅपेअसच एक भलंमोठं देऊळ होतं.दंतकथेनुसार अस्कुल अ‍ॅपेअस हा वैद्यकीय बाबतींमधला एक ग्रीक देव होता,आणि तो सच्चाईनं वागणं आणि आजारातून बरं होणं यांचं प्रतीक असलेल्या अपोलो या देवाचा मुलगा मानला जाई.तसंच अस्कुलअ‍ॅपे असला काही जण जगातला पहिला डॉक्टर मानायचे.तो त्याच्या उपचारांनी मृतांनाही जिवंत करू शके म्हणे.! त्याच्या नावानं बांधलेल्या या देवळात आजार आणि रोगामुळे ग्रासलेले लोक यायचे. या देवळातल्या पुजाऱ्यांना वैद्यकीय बाबींचीही जाण असे.ते मग या रुग्णांवर उपचार करायचे. बहुतेकदा त्यांचे उपचार म्हणजे विविध प्रकारचे चहा बनवून देणं हे असायचे.काही वेळा मात्र शस्त्रक्रियाही व्हायच्या.पण त्यात बव्हंशी वेळा रुग्ण मरायचाच.कारण एक तर माणसाच्या शरीराबद्दल अजून नीटसं कुणालाच माहिती नव्हतं आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यात वापरली जाणारी हत्यारं निर्जंतुक केली पाहिजेत हे अजून कळायचं होतं. रुग्णांना पडलेल्या स्वप्नांवरून त्यांच्यावर काय उपचार केले पाहिजेत याचा अंदाज मग ती पुजारी डॉक्टर मंडळी घ्यायची.कधीकधी तर म्हणे त्या रुग्णांच्या स्वप्नात अस्कुलअ‍ॅपेअस स्वतःच येऊन त्यांना आश्चर्यकारकरीत्या बरं करून टाकायचा! मग रुग्णांची आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करावी या हेतूनं अनेक प्रतिष्ठित लोकही त्या देवळात अधूनमधून राहायचे.असंच एकदा निकॉन त्या देवळात राहिला होता. तेव्हा त्याच्या स्वप्नात अस्कुल

अ‍ॅपेअस आला आणि गेलन एक महान डॉक्टर होईल असा दृष्टान्त त्यानं निकॉनला दिला. त्यामुळे गेलन १६ वर्षांचा झाल्यावर निकॉननं त्याला डॉक्टर करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली.अस्कुलअ‍ॅपअसचं देऊळ हीच गेलनचं वैद्यकशास्त्र शिकायची पहिली कर्मभूमी होती. सेतारस आणि रेफिनस हे दोघं डॉक्टर्स गेलनच्या आधी तिथे रुग्णांवर उपचार करायचे.त्यांच्या मागे मागे फिरत त्यांच्या कामाचं निरीक्षण करणं अशी गेलन आणि त्याच्या सहाध्यायांची शिकायची पद्धत असे.त्या वेळच्या काही उपचारपद्धती आज आपल्या अंगावर काटा आणतील अशा होत्या.उदाहरणार्थ,कुणाच्या अंगावर फोड आलेले असतील तर हंस पक्ष्यांच्या तीक्ष्ण चोची त्या फोडांवर ते फुटेपर्यंत जोरजोरात टोचवल्या जात! जखमा बऱ्या करण्यासाठी देवळातल्या कुत्र्यांना त्या चाटायला लावल्या जात.! आता डॉक्टरांच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो तसा त्या काळातल्या डॉक्टरांच्या गळ्यात पवित्र साप असायचा! त्यामुळेच आज एकमेकांना विळखा घातलेले दोन साप हे वैद्यकाची निशाणी म्हणून दाखवत असावेत.! आणि असं बरंच काही. एकूण तो काळच भीषण होता हे खरं!


सुरुवातीला त्यानं ग्लॅडिएटर्स म्हणजे मानवी योद्ध्यांचा सर्जन म्हणून काम केलं होतं.त्यांना झालेल्या दुखापती आणि जखमा यांच्यावर तो उपचार करायचा.त्यामुळेच त्याला मानवी शरीराच्या आतमध्ये काय असतं याचा अभ्यास करणं शक्य झालं.त्यामुळेच तो शरीरावरच्या जखमांना शरीराच्या आतमध्ये डोकावण्याच्या खिडक्या म्हणत असे! शिवाय जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्यानं कुत्रे,माकड,मेंढी आणि इतरही अनेक प्राण्यांचं डिसेक्शन केलं होतं.त्यातून त्यानं झूऑलॉजीचा प्रचंड अभ्यास केला.त्यानं कोणत्याही प्राण्याच्या शरीरातले कोणते अवयव काय काम करतात याबद्दल त्यानं सखोल अभ्यास केला होता.त्यामुळेच आजही बायॉलॉजीच्या शास्त्रात आणि वैद्यकाच्या शास्त्रात गेलनचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.इतका की त्याच्या हातून कधी काही चूक होऊ शकते यावर पुढची अनेक शतकं कुणाचा विश्वासच बसत नव्हता! गेलन डुकरांच्या शरीराचा अभ्यास करून त्यावरून माणसांच्या शरीराविषयी अंदाज बांधे ! त्यासाठी वर्षातून एकदा तो आणि त्याचे विद्यार्थी एका मेलेल्या डुकराचं शरीरविच्छेदन करायचे. रोममधल्या धार्मिक प्रथेनुसार मृत माणसाचं शरीरविच्छेदन करणं निषिद्ध मानलं जात असल्यानं खरं म्हणजे गेलनकडे दुसरा पर्यायही नव्हता.पण डुकराचं आणि माणसाचं शरीर यांच्यात अनेक महत्त्वाचे फरक असतात,पण त्यामुळे डुकराच्या शरीरातल्या गुणधर्मांवरून माणसाच्या शरीराबद्दल निष्कर्ष काढणं म्हणजे अचाटच होतं.! त्यातून हे निष्कर्ष पडताळून बघायला हवेत.पण त्यासाठी माणसाचं शरीर आणणार कुठून? ते शक्य नसल्यानं मग गेलन त्याला जमतील तसे अंदाज बांधायचा.अर्थातच बरेचदा ते चुकीचेही असायचे!

दुसऱ्या शतकात,म्हणजे आजपासून २००० वर्षांपूर्वी गेलननं चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा केली.तलवारीचे वार,बाणामुळे झालेल्या जखमा आणि हिंस श्वापदांनी केलेले हल्ले,यांसारख्या घटना त्या काळी सतत घडायच्या.त्यावर तातडीनं उपचार करणं गरजेचं असे.ही जबाबदारी गेलनवर असे.त्यानं अनेक औषध आणि उपचारपद्धती शोधून काढल्या. पण गेलन हा वैद्यकशास्त्रातला ॲरिस्टॉटलच म्हटला पाहिजे.सुमारे १५०० वर्ष त्याचा शब्द त्याच्या नंतरची मंडळी प्रमाण मानणार होती! गेलनचा जन्म व्हायच्या सुमाराला रोमन लोकांनी युरोपमधला बराच भाग,आफ्रिकेतला काही भाग,मध्य पूर्वेकडचे देश आणि आशियातला काही प्रदेश या सगळ्यांवर आपला कब्जा केला होता.गेलनच्या काळात तो एकटाच डॉक्टर होता असं नाही,पण त्या काळात डॉक्टर्सना योग्य प्रशिक्षण कुठून मिळणार ? त्यामुळे बहुतेक सगळे डॉक्टर्स इतर डॉक्टर्सचं निरीक्षण करूनच या व्यवसायाची तंत्रं शिकायचे.तसंच आपण डॉक्टर आहोत अशी घोषणा केली की झालं, त्या माणसाला डॉक्टर मानलं जाई ! त्यासाठी अमुक अमुक पदवी किंवा अनुभव असावा अशी पात्रता चाचणीच नव्हती!थोडे दिवस हा धंदा करून बघायचा,चालला तर बरंच आहे,नाहीच चालला तर तो सोडून दुसरं काहीतरी करायचं अशी गंमत चाले! त्या काळातही आपल्याला आज होतात त्यांपैकी अनेक आजार आणि रोग व्हायचे.पण आजच्यासारखी आधुनिक उपचारपद्धती तेव्हा नव्हतीच. लसूण आणि मध हे अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानले जायचे. जवळजवळ प्रत्येकजण लसूण नुसता किंवा भाजून खायचे.लोक लसणीचा रस प्यायचे, लसूण अंगाला चोळायचे आणि लसणीच्या माळा गळ्यात घालायचे!मधाचंही तेच.ते खायचे किंवा कुठेही लावायचे! [सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन]


डॉक्टरांना रोगांबद्दल अगदी बाळबोध माहिती असे.या सगळ्यामुळे माणसाचं शरीर कशाचं बनलं आहे,ते कसं चालतं,या सगळ्या गोष्टी अजून गुलदस्त्यातच होत्या.

माणसाच्या शरीरात काही आत्माबित्मा असतो की काय हे लोकांना कळत नव्हतं.त्यांना अनेक प्रश्न पडायचे. उदाहरणार्थ,माणसाच्या हृदयाचं काम नक्की काय असतं? माणूस कसा विचार करतो हे हृदयच ठरवतं का? का रक्त गरम करण्यासाठी हृदय म्हणजे माणसाच्या शरीरातली भट्टी होती का? रक्त कुठून येतं? किंबहुना रक्त बनण्याची सुरुवात कुठे होते? ते शरीरात एकीकडून दुसरीकडे कसं जातं ? रक्ताचे अनेक प्रकार असतात का? शरीरात हवा असते का? असते तर ती कुठे असते?ती रक्तवाहिन्यांमध्ये असते का? फुफ्फुसांचं काम काय असतं ? ते हृदय थंड ठेवायला मदत करतं का? यकृतामधल्या कुठल्या तरी भागामुळे आपण शूर बनतो का? आपली औदासीन्याची भावना आपल्या पोटाच्या केंद्रस्थानी एकवटलेली असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा गेलननं विडाच उचलला होता.त्यानं शरीरशास्त्राचा अभ्यास केला, त्याविषयी खूप लिहिलं आणि शिकवलंही.पण मृत माणसाच्या शरीराचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाईल त्यामुळे मग गेलं वर बैल कुत्री माकडा आणि डुकरं यांच्या शहरांचा अभ्यास करून त्याचे आधारे माणसाच्या शरीरात बदल अंदाज बांधावे लागायचे त्यामुळे अर्थातच त्यात असंख्य चुका व्हायच्या.


.. अपुर्ण..



११/९/२३

साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासाची स्पेनमधील आजची स्थिती - पाब्लो झांब्रानो / The Present State of Comparative Literature in Spain - Pablo Zambrano

तुलनात्मक साहित्याभ्यास ही पद्धत तिच्या अमेरिका,

फ्रान्स,जर्मनी या पूर्वापारच्या केंद्रांमध्ये शंकास्पद ठरत असताना पोर्तुगाल,मेक्सिको, अर्जेंटिना आणि स्पेन या दूरवरच्या परिघावरच्या देशांमध्ये तिच्यात मौलिक भर पडून तिचा पुनर्जन्म होतो आहे.मी खरं तर याला तिचा प्रथम जन्म म्हणेन.शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ स्पेनमध्ये या संदर्भात खूप अज्ञान आणि अवहेलना होती.१९ व्या शतकाच्या उत्तराधीपासून तुलनात्मक साहित्याभ्यासात झालेल्या प्रगतीची स्पेनमध्ये कोणालाच कल्पना नव्हती.

याची कारणं स्पेनच्या इतिहासात आणि सामाजिक,

परिस्थितीत दडलेली आहेत.स्पॅनिश साम्राज्याच्या ऱ्हासकालात स्पेन उर्वरित जगापासून तुटत गेला.१९३६ ते १९३९ या काळातली यादवी आणि जनरल फ्रँकोची फॅसिस्ट राजवट इथपर्यंत हे तुटलेपण वाढतच गेलं.१९७५ मध्ये फ्रँकोचा मृत्यू झाल्यावर स्पेनमध्ये तुटलेपण संपून सांस्कृतिक पुनरुत्थानाला सुरुवात झाली.स्पेनचा जगाशी संवाद सुरू झाला आणि स्पेन EU मध्ये म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सामील झालं.गेल्या वीस वर्षांच्या काळातला हा आंतरराष्ट्रीय आणि सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतला तर स्पेनमधल्या अलीकडच्या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या जोमदार प्रारंभाची संगती लागते.तिथे आता तुलनात्मक साहित्याभासात पदवी मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे. Exemplaria : Revista International de Literatura Comparada अशासारखी या विषयाला वाहिलेली विद्यापीठीय नियतकालिकं निघत आहेत. SELGYC सारख्या संस्थांची सभासदसंख्या वाढते आहे.राष्ट्रीय स्तरावरच्या AEDEAN या साहित्यसंस्थेत तुलनाकारांचे विशेष गट नियुक्त होत आहेत.या संस्थांमध्ये आजपर्यंत फारसं खुलं वातावरण नव्हतं.अजूनही काही पारंपरिक,बंदिस्त वातावरणाच्या विभागांमधील अभ्यासकांच्या मनात या नव्या पद्धतीबद्दलच्या शंका घट्ट असल्या तरी व्यक्तिशः मला स्पेनमध्ये तुलनात्मक साहित्याभ्यास जोरकसपणे फुलणार याबद्दल शंका नाही. माझ्या या आशावादामागे भरभक्कम कारणं आहेत.दारिओ विल्येनूव्हा (University of Santiago de Compostela) सारखे अनेक अभ्यासक विद्वान स्पेनमध्ये तुलनात्मक स्वरूपाच्या सिद्धांतांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देत आहेत.उदा.इझ्रेली विद्वान इतामार एवेन जोहर यांची बहुपद्धतती सिध्दांत (Polysystem Theory) किंवा जीगफ्रीड स्मिट् यांचा प्रयोगलक्ष्यी (empirial) अभ्यास. (Villanueva Avances en..... Teoria de la literatura,1994).या तात्त्विक अभ्यासाला जोड मिळते.ती वाढत्या संख्येने प्रसिद्ध होणाऱ्या पाठ्यपुस्तकांची आणि हस्तपुस्तिकांची.सध्या स्पॅनिश समाज स्वतःची ओळख पुनः पुनः तपासून पाहून निश्चित करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेला आहे.आजपर्यंत बरेचदा आडबाजूला ढकलून दिलेला "कोहम्"चा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे.स्पेनच्या इतिहासात प्रथमच भाषाबाहुल्य,संस्कृतीबाहुल्य आणि राष्ट्रकांचे बाहुल्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.गेली पाच शतकं स्पॅनिशमुळे नसलेल्या "इतर" लोकांच्या देशातील अस्तित्वाचा उच्चार आणि विचार झाला नव्हता. स्पेन हा देश निर्विवादपणे युरोपातील बहुसांस्कृतिक देशांपैकी एक देश आहे.त्यामुळे केवळ पारंपरिक तुलाभ्यासासाठीच नव्हे तर नवे सिद्धांत ताडून पाहण्यासाठीसुद्धा स्पेनची संस्कृती ही एक उपलब्धी आहे.स्पेनचे दक्षिण अमेरिकेतील प्रदीर्घ काळचे साम्राज्यवादी वसाहतवादी अस्तित्व आणि सध्याच्या युरोपातील त्याचं महत्त्वाचं स्थान यातून स्पेन हा युरो-अमेरिकन सांस्कृतिक संबंधांमध्ये महत्त्वाचा पूल बनतो.युरोपचे आर्थिक-राजकीय एकीकरण हे जोरकसपणे प्रत्यक्षात येऊ घातलं आहे ही बाब साहित्य आणि संस्कृतीच्या तुलनाकारांनी पुरेपूर वापरली पाहिजे.

स्पॅनिश अभ्यासकांनी याची सुरुवात केली आहे असं दिसतं.रोमेरो,वेगा आणि कार्बोनेल व गिलेन यांची अलीकडची प्रकाशनं या आशा भरल्या संदर्भात पाहिली पाहिजेत.हे ग्रंथ म्हणजे काही पूर्वप्रसिद्ध ग्रंथांची भाषांतरं आहेत.ही गोष्ट रोमेरोच्या बाबतीत सहज लक्षात येते;परंतु वेगा आणि कार्बोनेल जणू मूळ लेखक आहेत असं वाटतं. मात्र तरीही हे अभिजात निबंधाचे भाषांतरित संग्रह स्पॅनिश वाङ्मयाभ्यासात तुलनात्मक पद्धतीचं मोठं योगदान देतात.ते पाठ्यपुस्तकं म्हणून उपयुक्त आहेत.मात्र मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ह्या उपयुक्त हातपुस्तिका (manuals) नाहीत.


वेगा आणि कार्बोनेल यांच्या ग्रंथांची रचना तुलाभ्यासाचा तात्त्विक इतिहास म्हणून अगदी योग्य आहे.तीन मुख्य भागांमध्ये प्रातिनिधिक अशा खुद्द वेगा आणि कार्बोनेल यांनी अनुवाद केलेल्या संहिता आहेत.प्रत्येक भागाच्या सुरुवातीला थोडक्यात पण उपयुक्त असा त्या भागाचा परिचय करून देणारा लेख आहे. पहिला भाग ज्या जुन्या प्रमाणसूत्राना (Old paradigm) बराच अंमल गाजवला त्यांचं मूळ आणि त्यांची वाढ व प्रगती याला वाहिलेला आहे.त्यात क्रोचे टेक्स्ट,गेली,बाल्डेन स्पेर्गर,फान टीग्हेम इत्यादींचे निबंध आहेत.दुसरा भाग आहे तेच आणि त्याची नव्या प्रमाणसूत्राकडून उकल (Crisis and the New Paradigm ) वेलेक, रेमाक,फोकेमा रूपरेस्ट आणि लॉरे यांचे सकस निबंध या भागात येतात.तिसऱ्या भागात तुलाभ्यासातील अगदी अलीकडच्या दिशांची ओळख करून दिलेली आहे.यात शँतँ,शेवरिए,अ‍ॅक्रॉफ्ट,ग्रिफिथ,

टिफीन,निश्ची,स्नावडर, लान्सर,लफेव आणि झिपेत्नेक यांचे निबंध येतात. शेवटच्या भागात उपयुक्त अशी संदर्भसूची आहे.वेगा आणि कार्बोनेल यांच्या या ग्रंथाशी रोमेरोच्या ग्रंथाच्या बऱ्याच तारा जुळलेल्या होत्या.परंतु रोमेरोने प्रस्तावनेत म्हटल्यानुसार तिच्या ग्रंथाचा हेतू स्पॅनिश वाचकाला तुलाभ्यासाच्या आपल्या शतकाच्या शेवटी असलेल्या स्थितीचं दर्शन घडवणे हा आहे.या अपेक्षेने पाहिलं तर रोमेरोचा संग्रह हा वेगा आणि कार्बोनेल यांच्या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचा विस्तार आहे.रोमेरोचा ग्रंथही तीन प्रकरणात विभागलेला आहे.मात्र ही विभागणी कालक्रमानुसार न होता पद्धतीच्या सोयीनुसार झालेली आहे.पहिला विभाग प्रॉवर,मरीनो आणि बॅसनेट यांच्या सुपरिचित कल्पनांचा विस्तार करतो.दुसऱ्या विभागात क्युलर,रेमाक,स्विगर्स, फोकेमा,जिलेस्पी,क्युलर व झिपेत्नेक यांचा सिद्धांतन येतं."शिक्षणशास्त्रीय मुळे" (di- dactic orientations) या शीर्षकाच्या तिसऱ्या विभागात शेवरेल आणि फोकेमा यांचे निबंध आहेत.शेवटच्या भागात ग्रंथसूची आहे.या संग्रहाला एकच दूषण देता येईल.ते म्हणजे सर्व नसली तरी काही भाषांतरांची शैली आणि स्वर नको इतके "इंग्लिश" आहेत.रोमेरो व वेगा आणि कार्बोनेल ह्यांच्या या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या भाषांतरित लेखसंग्रहा

पाठोपाठ १९९८ मध्ये एक विलक्षण पुस्तक आलं.

क्लॉडिओ गिलेनचं Multiples Moradar (Barcelona,Tusquets १९९८). गिलेनचं खास कौशल्य म्हणजे तो वाचकाला सतत संहितेचा आनंद देत राहतो.या शतकातल्या फार महत्त्वाच्या तुलनाकारांपैकी एक असलेल्या गिलेनच्या कारकिर्दीचा समग्र आढावाच ह्या पुस्तकातून मिळू शकतो.हे सर्व निबंध पूर्वप्रसिद्ध असले तरी हा केवळ पूर्वप्रसिद्ध निबंधांचा संग्रह राहात नाही.सर्व निबंधांचे पुनर्लेखन करून विस्तृत स्पष्टीकरणेही जोडलेली असल्याने हा एकसंध,एकजीव असा प्रबंध झाला आहे."आपल्यात असलेल्या आणि आपल्याभोवती असलेल्या बहुलतेचा विचार कसा करावा ?" या प्रश्नाने गिलेनच्या प्रस्तावनेची सुरुवात होते.आपल्या ऐतिहासिक अनुभवांची परिणती एका जटिलतेत झालेली आहे; या जटिलतेचा अभ्यास ही Multiples Moradar समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे.या ग्रंथाचे दोन भाग आहेत. "साहित्य आणि हद्दपारी", "साहित्य आणि निसर्गसृष्टी", "साहित्य आणि पत्ररूप लिखाण" "साहित्य आणि बीभत्सता" या चार उत्कृष्ट लेखांचा पहिल्या विभागात समावेश आहे.या लेखात कोणी आणखी काही भर घालू शकेल असे वाटत नाही.गोविंद,दान्ते,दु बेले, शेक्सपिअर इत्यादींच्या हद्दपारीचे अनुभव सांगत गिलेन शेवटी राफाऐल,आल्बर्ती आणि नोबेल विजेता युआन रामोन जिमेनेझ यांचे अनुभव नोंदवतो.गिलेनने इथे स्पॅनिश साहित्यावर फारसा भर दिलेला नसला तरी त्याचा स्वतःचा अनुभव तसाच आहे.स्पेनचं साहित्य हे हद्दपारीचं साहित्य आहे.विशेषतः १९३९च्या यादवीनंतरचं साहित्य देशाबाहेरच जन्मलं.या गोष्टीचं भान त्याला आहे. असं दिसतं.


व्यक्तिशः मला "साहित्य आणि निसर्गसृष्टी" हा निबंध फार लक्षणीय वाटला.Evgon आणि Parergon म्हणजे या दोन संकल्पना स्पष्ट करून विसाव्या शतकात साहित्य आणि चित्रकलेत निसर्गसृष्टीचं चित्रीकरण कसकसं होत गेलं याचा त्याने इथे वेध घेतलेला आहे. वर्डस्वर्थ आणि बोदले यांच्या निसर्गकवितांवरचे त्यांचे विचार मी आजवर वाचलेल्या विचारात सर्वोत्कृष्ट आहेत.परंतु वास्तववादाच्या चर्चेत फ्लोबेर आणि मादाम बोव्हरी पूर्णपणे गैरहजर आहेत.याची चुटपूट लागून राहते. फ्लोबेरच्या कादंबऱ्यांमधील निसर्गदर्शन आणि त्याची स्वच्छंदतावादी (Ro- mantic) सौंदर्यविचारावरील टीका यांच्यातील संबंधांबद्दल बरंच काही म्हणण्यासारखं आहे.त्याचप्रमाणे एमा आणि रोडोल्फ यांच्यातला प्रथम लैंगिक संबंध (भाग २ प्रकरण ९) आणि त्या गोष्टीचा कादंबरीतील तथाकथित वास्तववादी जीवनदर्शनावरचा परिणाम याबद्दलही बरंच काही म्हणता येईल."मादाम बोव्हरी" ही १९ व्या शतकातील महत्त्वाची कादंबरी मानली जाते. तेव्हा गिलेनच्या साक्षेपी नजरेने तिचा घेतलेला वेध ही वाचकाला एक आनंदाची पर्वणी झाली असती.त्याच्या साहित्य व बीभत्सतेच्या अभ्यासाबाबतही हेच म्हणता येईल.या संदर्भात सुद्धा फ्लोबेरची कादंबरी ही निश्चितच एक मैलाचा दगड आहे.दुसऱ्या भागात राष्ट्रीय साहित्य,साचेबंद राष्ट्रीय प्रतिमा आणि युरोप या विषयांवरचे तीन निबंध आहेत.हे निबंध जरी मुख्यत्वे ऐतिहासिक आढावा या स्वरूपाचे असले तरी समकालीन युरोप आणि स्पेनमध्ये जी राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक खळबळ चालू आहे. तिच्यावरच गिलेनचं चिंतन-मनन इथे दिसून येते.मी याआधी म्हटल्याप्रमाणे एक सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्व असलेला स्वतंत्र समाज म्हणून स्पेन सध्या आपली पूर्वापार चालत आलेली ओळख पुनः पुनः तपासतो आहे आणि तिची फेरमांडणी करतो आहे.यात कॅटॅलोनियन,बास्क आणि गॅलिशियन ही राष्ट्रके एका बाजूला काही मागण्या करताहेत.तर नव्या प्रादेशिक चळवळी त्यावर त्याच प्रकारची प्रतिक्रिया देताहेत.ह्या कलहाचा स्पेनचे राष्ट्रीय साहित्य यासारख्या सुनिश्चित आणि प्रदीर्घ काळ चालत आलेल्या संकल्पनांवर परिणाम होतो आहे हे सांगायला नको.समाजाच्या काठावरील समूहांमध्ये राष्ट्रवादी जाणिवांची वाढ ही एका परीने आवश्यक आहे.त्यांचा नि:सारक परिणाम होईल आणि जुने साचे नष्ट होतील.

नव्या,खुल्या विचाराने साहित्याची नवी मानांकन यादी (Canon) तयार होऊ शकेल.मात्र इथे गिलेनने ज्या धोक्याची जाणीव करून दिली आहे,तो प्रांतीय संकुचित जाणिवांचा (Provincial rava ings) धोकाही लक्षात घेतला जावा.राजकारणी आणि काही बुद्धिजीवीसुद्धा खोट्या इतिहासावर आधारित नवे साचे तयार करून नव्या संकुचित राष्ट्रीय जाणिवा निर्माण करतील.( संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास, जगातील निवडक निबंधाचे अनुवाद,संपादक,प्रा.डॉ.मनीषा आनंद पाटील,आनंद ग्रंथ सागर प्रकाशन,कोल्हापूर ) "बहुभाषिक समाज हा सुरुवातीला कमी बंदिस्त आणि कमी प्रांतिकतावादी असतो." या गिलेनच्या विधानावर (३२०) दुर्देवाने कृतकपवित्र राष्ट्र संकल्पना निर्माण करणाऱ्यांकडून शंका घेतली जात आहे.एड्गर मॉरीनचे "Penser I Europe" हे विधान स्मरून - जसं गिलेन नेहमी करतो तसं - मी म्हणेन की स्पेन पुनःश्च स्पॅनिश (पद्धतीने) विचार करत आहे.गिलेनचे पुस्तक आणि विचार सकारात्मक परिणाम घडवून आणतील अशी अशा आहे.या पुस्तकाच्या वाचनाने ज्याला चालना मिळेल अशा अनेक गोष्टी आहेत. Multiples Moradar प्रकाशित होणं ही मोठ्या महत्त्वाच्या सांस्कृतिक घटनांपैकी एक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.त्याच्याच Enter to uno y lo diverso.

Introduccion a la literatura comparada या पुस्तकाच्या बरोबरीने हे आंतरराष्ट्रीय परिणाम असलेलं अत्यावश्यक प्रकाशन आहे.तुलनात्मक साहित्याभ्यासात स्पेनमध्ये होऊ घातलेल्या शुभलक्षणी बदलांसाठी हा एक मजबूत आधार होईल.


(Romero, Vega and Carbonell, and Guillén Pablo Zambrano, University of Huelva, CLCWeb: Comparative Literature and Culture 1.2 (1999): <https://doi.org/10.7771 / 1481-4374.1039)


अनु : शर्मिष्ठा खेर 

९/९/२३

मुंग्यांतील गुलामी - Slavery in Ants

भर उन्हाच्या काळात थोडा वेळ सावलीला थांबावं म्हणून मी मोहरानात प्रवेश केला. मोहाची रुंद पानं जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झालो.माझं लक्ष वर झाडाकडे गेलं. फुटबॉलच्या आकाराएवढी पानांची घरटी जिकडे

तिकडे दिसत होती.जिथे दोन पानं एकमेकांना जोडली होती,तिथे पांढरी रेषा दिसत होती.इतक्यात झाडावरून लाल रंगाच्या तीनचार मुंग्या अंगावर पडल्या.त्या मानेवरून खांद्याकडे गेल्या तेव्हा त्या भागाची अशी काही आग झाली की,शेवटी शर्ट काढून झटकावा लागला.तेव्हा आढळून आलं की,त्या शर्टाला चिकटून बसल्या होत्या.

त्यांचंच हे कृत्य होतं.नकळत मला त्यांनी कडकडून चावा घेतला होता.नंतर मी सावरून बसलो.आजूबाजूला ऐनाडीची झुडपं दिसत होती.तिथून आता उठून जाण्याच्या विचारात असताना माझं लक्ष ऐनाडीच्या झुडपाखाली गेलं.तिथे लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या अगदी लढाईच्या तयारीत असताना दिसल्या.अशी दृश्यं फार क्वचितच पाहायला मिळतात.म्हणून मी तिथेच सावरून बसलो.ज्यांनी हल्ला चढविला होता,त्या लाल मुंग्या होत्या.


असंच एकदा आंब्याच्या झाडावरती पानांनी बनविलेल्या गोलाकार घरट्यांचं निरीक्षण करताना एका घरट्यात या लाल आणि काळ्या मुंग्या गुण्यागोविंदानं नांदताना मला दिसल्या. मला आश्चर्य वाटून मी त्या घरट्याचं निरीक्षण करू लागलो.ते घरटं लाल मुंग्यांचं होतं यात शंका नव्हती.

लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना गुलामासारखं पाळलं होतं.

या काळ्या मुंग्यांना त्या जेव्हा अंड्यात होत्या तेव्हापासून लाल मुंग्यांनी पकडलं होतं.हा सारा वृत्तान्त मी डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथात 'वन्य जीवांचे स्वभावतः गुणधर्म' या सदरात वाचला होता.परंतु त्याचा प्रत्यय कधी काळी जंगलातील भटकंतीत येईल असं वाटलं नव्हतं. डार्विनच्या पुस्तकातील या लाल आणि काळ्या मुंग्यांच्या मालक- गुलाम संबंधाविषयीचा तपशील विस्मरणात जात असता आत्ताचं हे दृश्य अचानक दिसलं.


या लाल मुंग्यांचं वारूळ मोहाच्या मुळाखालीच होतं.

मोहरान डोंगराच्या पायथ्याला होतं.तिथून थोड्या अंतरावर काळ्या मुंग्यांचं वारूळ होतं. माझ्या येण्या-जाण्याच्या वाटेवर असलेल्या मोहरानातून जात असताना या वारुळाच्या आजूबाजूला लाल मुंग्या हिंडताना मला दिसल्या.मी लगेच त्यांना पाहण्यासाठी थांबलो. त्यांची संख्या सुमारे साठसत्तर तरी असावी.त्या जिकडेतिकडे काळ्या मुंग्यांच्या वारुळाभोवती रेंगाळत होत्या.अन्नाच्या शोधात त्या जलद गतीनं जाताना मोठ्या शोधक वृत्तीनं ये-जा करताना दिसतात.तशा त्या आज दिसत नव्हत्या.

त्या तिथल्या तिथेच चकरा मारीत होत्या.जवळच्या गवताच्या काड्यांवर चढत होत्या.शेंड्यावर जाऊन आपल्या मिशांची हालचाल करताना दिसत होत्या.मध्येच दोन मुंग्या एकमेकींच्या तोंडाजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगुज करीत. अशा वेळी त्यांच्या मिशीची बरीच हालचाल होई. बराच वेळ निरीक्षण केल्यावर आढळून आलं की,या टोळक्यांचं इथे जमणं निरुद्देश नव्हतं. त्यांच्या येणाऱ्या खास पलटणीसाठी ही प्राथमिक स्वरूपाची टेहळणी होती.काळ्या मुंग्या अस्वस्थ दिसल्या.एखाद्या लाल मुंगीची अवचित भेट होताच काळी मुंगी लगेच वळण घेऊन वेगानं आपलं वारूळ गाठायची.अन् मुळाच्या जाळीत जमलेल्या आपल्या बांधवांना जाऊन मिळायची.या काळ्या मुंग्यांचा जमाव जणू लाल मुंग्यांनी लादलेल्या युद्धाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करायला जमला असावा. लढाईपूर्वी टेहळणीला निघालेल्या या लाल मुंग्यांचं हे काम दोनतीन दिवस तरी चालू होतं.लहानलहान पलटणी करून लाल मुंग्या,

काळ्या मुंग्यांच्या वारुळाजवळ कूच करीत होत्या. वारुळाजवळ आपसात त्यांच्यात चकमक उडत होती.

काळ्या मुंग्या लाल मुंग्यांवर जिवाची बाजी लावून तुटून पडायच्या,परंतु लाल मुंग्या धीम्या चालीनं वारुळाकडे चाल करीत होत्या.वाटेत भेटलेल्या काळ्या मुंग्यांना त्या डसायच्या.तीक्ष्ण चावा घेऊन धडापासून मुंडकं अलग करायच्या.


डोंगरावरून लाल मुंग्यांचं सैन्य खाली वारुळाकडे कूच करीत होतं.एकदीड तासाच्या अवधीत ते वारुळापासून दोनतीन हात अंतरावर पोचलं.सैन्याच्या शिस्तीप्रमाणे इथून ते तीन भागांत विभागलं गेलं.त्यातील एका तुकडीनं सरळ वारुळावर हल्ला चढविला.बाकी दोन तुकड्या सांडशीच्या आकारात जाऊ लागल्या.हे सारं पाहून मी आश्चर्यानं थक्क झालो.त्या जागेला जबर युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. वरून नजर टाकली की त्यांची व्यूहरचना लक्षात येई.पहिली तुकडी आता गवतावरून धावत होती.दुसरी आणि तिसरी तुकडी वारुळाकडे आगेकूच करीत होती.पहिल्या तुकडीशी सामना करीत असलेल्या काळ्या मुंग्यांना इतर दोन तुकड्यांच्या हालचालीची कल्पना नव्हती.शेवटी काळ्या मुंग्यांना कळून चुकलं की,लाल मुंग्यांच्या घेरावात त्या पूर्णपणे अडकून पडल्या आहेत. तेव्हा हताश होऊन त्या जगण्याची इच्छा गमावून बसल्या.लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना जसं चोहोकडून घेरलं तशा त्या वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागल्या.काही मुंग्या तर या प्रयत्नात सरळ लाल मुंग्यांच्या आयत्या वाटेतच सापडल्या.लाल मुंग्यांनी त्यांना लगेच ठार केलं. काही काळ्या मुंग्यांनी आपल्या वारुळात प्रवेश केला.वारुळातील काही अंडी त्यांनी प्रवेशद्वाराजवळ एकत्रित करायला सुरवात केली.काही जणी अंडी तोंडात धरून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जाऊ लागल्या.परंतु हे सारं करायला त्यांना फार उशीर झाला होता.वारुळाभोवती घेराव करून आगेकूच करणाऱ्या त्या लाल सेनेनं वारुळाचा सारा भाग व्यापून टाकला.जिकडेतिकडे मुंग्यांचे पुंजके दिसू लागले.

काळ्या मुंग्यांच्या जबड्यात अंडी होती. त्यांचा पाठलाग लाल मुंग्या करीत होत्या. तोंडातील अंडी सोडून देण्यास त्यांना भाग पाडत होत्या.प्रतिकार केला की लगेच त्यांना ठार करण्यात येई.काही भित्र्या काळ्या मुंग्या,समोर लाल मुंग्या दिसताच,तोंडातील अंडी टाकून लगेच पळून स्वत:चा जीव वाचवीत.साऱ्या क्षेत्राला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं.दोन्ही पक्षातील मुंग्यांची डोकी धडावेगळी झालेली दिसत.मृत्यूचं थैमान माजलं होतं.कसाबसा जीव वाचवून काही काळ्या मुंग्या या मृतांच्या सड्यातून धावत होत्या,तर काही काळ्या मुंग्या त्यांनी सोडून दिलेली अंडी गोळा करून परत आपल्या तळाकडे कूच करीत होत्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी त्या ठिकाणी पोचलो.युद्धविराम झाल्याचं मला आढळून आलं.काळ्या मुंग्यांचं वारूळ ओस पडलं होतं.जखमी आणि मृत मुंग्यांचा तिथे ढीग पडला होता.लाल मुंग्यांचं अथवा काळ्या मुंग्यांचं सैन्य आता कुठेच दिसत नव्हतं.मी लगेच लाल मुंग्यांच्या वारुळाकडे धाव घेतली.अगदी शेवटची तुकडी काळ्या मुंग्यांची अंडी घेऊन नुकतीच तिथे पोचली होती.वारुळाच्या प्रवेशद्वारावर गुलाम काळ्या मुंग्यांनी धन्याचं स्वागत केलं.


वन्य जीवांत अशा प्रकारची जीवघेणी युद्धं होत नाहीत.काळ्या मुंग्यांना गुलाम करणाऱ्या लाल मुंग्या त्याला अपवाद आहेत.एरवी स्वत:चा जीव

वाचविण्याकरता त्यांच्यात झुंजी होतात किंवा त्या भक्ष्यावर हल्लाही करतात.मोर कीटक किंवा मुंगीमारच्या रूपानं मुंग्यांना देखील शत्रू आहेत. प्रौढ मोर कीटकाचा स्वभाव चतुरासारखाच असतो.दिसायला निष्पाप, परंतु अर्भकावस्थेत तो एखाद्या राक्षसासारखा खादाड असतो.

त्याकरिता भक्ष्य तो मोठ्या युक्तीनं पकडतो.अर्भकावस्थेत त्याचं शरीर गोलाकार असून डोकं मोठं असतं.(निळावंती - मारुती चितमपल्ली,प्रकाशक - मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर) त्याचा जबडा सांडशीसारखा असतो.मेळघाटातील सेमाडोह येथील सिपना नदी पाऊस पडताच दुथडी भरून वाहायची.तेव्हा नदीकाठच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडाझुडपांभोवती बारीक रेतीचा थर साचायचा.तो किंचित सुकला की कीटकसृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी मी सकाळीच काठाकाठानं जाऊ लागायचो.इथल्या भुसभुशीत जमिनीवर अक्षरश: शेकडो छिद्रं दिसत.आकारानं शंकूसारखी.अर्धाअधिक इंच खोल.तुम्हाला माहीत आहेच की मुंग्यांइतकं उद्योगी कुणी नसतं.सारख्या घाईगडबडीत त्या इकडून तिकडे जाताना दिसतात.कुठेकुठे त्या अडखळतात,खाली पडतात.परंतु पुन्हा उठून पूर्ववत् चालू लागतात.अशा मुंग्यांच्या वाटेवर ही छिद्रं दिसतात.त्या छिद्रांत एखाद-दुसरी मुंगी कोलमडून पडे.मात्र तिला त्या छिद्रातून परत बाहेर पडता येत नसे.ती वर चढण्याचा प्रयत्न करी.परंतु प्रत्येक वेळी रेती ढासळल्यानं ती खाली पडे.या संधीची वाट पाहत त्या छिद्राच्या तळात मोर कीटक दडून बसलेला असे.मुंगीला लगेच रेतीत ओढून तो तिच्या शरीरातील द्रव शोषून घेई. 




७/९/२३

भास एक भय कथा ... Language is a horror story.

माझ्या अंगावर सर्रकन काटा आला..!


...उताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो,तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली,दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले.मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर असताना माझे हात पसरले गेले होते.माझ्या उजव्या हाताला 'ओकचं' एक रोपट लागलं... तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपट मी हाताने पकडल असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जळवून वाघाच्या पोटाला टेकवल असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो.वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटावर टेकवले.त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.


जिम कॉर्बेट - कुमाऊँचे नरभक्षक


अशीच उत्कंटा वाढविणारी अंधारी भय कथा खाली देत आहोत.ही कथा आपल्या जीवनाबरोबर असते,अगदी बालपणापासून,आपल्या प्रत्येकामध्ये असा 'सदा' असतोच.ही कथा आपले मित्र श्री.विष्णू गोपाळ सुतार,

हरोली यांनी लिहिली आहे.


भास…


तिन्हीसांज टळून गेली होती.अंधार पडत चालला होता.पण सदाचा अजून पत्ता नव्हता.शाळेतून अजून घरी आला नव्हता.सदाची आई त्याची काळजी करत होती.

वाटंकडं डोळं लावून चुलीवरच्या तव्यात भाकरी टाकत ती सदाचीच वाट बघत होती.इतक्यात सदा आला.

अंगणातून आईला म्हणाला आई च्या दे मला.शंकऱ्याच्या घरला अब्यासाला जानार हाय.


सदाला बघून सुमाला बरं वाटलं.तुकाराम आणि सुमाचा एकुलता एक पोर सदा.मूल जगेल याचा भरवसा नसताना जिवंत राहिलेलं बाळ म्हणून काय कवतुक.मुद्दाम दुसरं मूल होऊ दिलं नाही. सदालाच लाडाकोडानं हातावरच्या फोडासारखं जपलं.पोरगं हुशार निघालं.चौथी आणि सातवीत केंद्रात नंबर काढलं.यंदा सदा दहावीत होता. अभ्यासातही हुशार होता.शाळेतल्या मास्तरांचाही त्याच्यावर जीव होता.शाळा चालू होण्यापूर्वी एक तास सकाळी आणि शाळा सुटल्यावर एक तास तो रोज जादा अभ्यासासाठी शाळेतच रहायचा.त्यामुळंच आज त्याला उशीर झाला होता.चहा पिऊन तो परत अभ्यासाला जाणार होता.


हायपाय धुवून सदा आत आला.त्याला बघून सुमा म्हणाली,"सदा ,माज्या राजा,एक काम हाय रं. ह्यबघ.त्यास्नी एकाएकी थंडी वाजून आलीया.

अंगात ताप भरलाया.तोंडातनं सबुद भाईर ईना."


तुकाराम तापानं,फणफणत होता.दिवसभर पाणी पाजून अंग केंगाटून गेलं होतं.चहा पिऊन पुन्हा पाण्याकडं जावं म्हणून तो घरी आला होता. तासावर पाणी घेतलं होतं.

त्याला गडबडीनं पाण्याकडं जायचं होतं.चहा पितानाच त्याला अचानक कसंतरीच व्हायला लागलं.थंडी वाजायला लागली.बघता बघता अंग तापायला लागलं.

म्हणून वाकळ घेऊन गपगार पडून होता.पाणी पीत सदा आईचं बोलणं ऐकत होता.अचानक कसा ताप आला त्याला कळेना. आई म्हणाली.,"उपाद्याचा डाक्तर आल्ता.

टुचून गेलाया.सकाळपतूर कमी ईल म्हणालाय.पर सदा,रानात उसाला पानी लावून आल्यात रं.आन आत्तापतूर पाट भरला आसंल.तवा आच्चादिस अब्यास र्‍हाऊ दे.तेवढा पाट फिरवून ये जार र सोन्या." 


सदा गुमान आईच ऐकत होता.नाही म्हणाव असं त्याला वाटत होतं.चौगुले सरांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या.'बोर्डात आला पाहिजेस बग' या सरांच्या वाक्यानं सदाचा हुरूप वाढला होता. त्यालाही खात्री होतीच.थोडंच दिवस उरलं होतं परीक्षेला म्हणून ज्यादा अभ्यास करत होता. आताही त्याला जायच नव्हतं पण नाईलाज होता.

पलिकडच्या खोलीत तुकाराम निपचित पडला होता.

सदानं तुकारामाच्या अंगावरची वाकळ बाजूला सारुन कपाळाला हात लावला. झटक्यासरशी त्यानं आपला हात बाजूला केला. अंग तव्यासारखं भाजत होतं.सदा उठला. अंगातली शाळेची कापडं काढली.रोजची कापडं त्यानं अंगात घातली.आईनं दिलेला चहा घेऊन खांद्यावर टॉवेल टाकून शेताकडे जायला तो घरातून बाहेर पडला.

आत्तापर्यंत बाहेर खूपच अंधार पडला होता.गार हवेची एक झुळूक सदाला चाटून गेली.तसं त्यानं खांद्यावरचा टॉवल डोक्याला गुंडाळला.हाताची घट्ट मिठी छातीभोवती आवळून तो चालू लागला.रात्रीच्या वेळी एकट्यानं शेताकडं जाण्याची सदाची ही पहिलीच वेळ होती.या आधी गेला होता पण; सोबत वडील असताना!


गाव दूर राहिला आणि आता अंधारात त्याला रस्ताही नीट दिसेना.जसजसं पुढं जाऊ लागला तसं त्याला भीती वाटू लागली.रातकिड्यांचा किर्रर्र आवाज त्याच्या कानात घुमू लागला. थंडीमुळे कुत्री उगाच ओरडत होती.सोबतीला कुणी असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं.

रस्त्याच्या कडेला अंगाचं मुटकुळं करून बसलेलं काळं कुत्रं सदाच्या चाहुलीनं जागं झालं.स्वतःच्याच विचारात असणारा सदा त्यामुळे एकदम दचकला.त्याच्या अंगाला घाम सुटला.मनात देवाचं नाव घेत तो चालू लागला. पण भीती काय कमी होत नव्हती.त्यातच भर म्हणजे पाणंदीजवळच धनगराच्या सोना म्हातारीला जाळल्याचं त्याला आठवलं.अंगावर काटा आला.तो दचकून गेला.

इथूनच परत जावं असंही त्याला वाटायला लागलं.पण त्याला तसं करता येत नव्हतं.देवाचं नाव घेत तो पुन्हा चालू लागला.रस्ता सोडून तो आता पाणंदीत आला. जरा वेळ तो तिथंच थांबला.दिवसभर उन्हात तापलेली रानं शांत विश्रांती घेत आभाळाकडं बघत निवांत पडलेली होती.वाऱ्यामुळे शिवारातली पिकं डोलत होती.त्याची मंद झुळूक लागताच सदानं पुन्हा डोक्याला टॉवेल बांधला आणि तो चालू लागला.


रानडुकरांनी रानात हैदोस मांडलाय आणि राखणीला माणसं रानात होती हे त्याला माहित होतं.आता त्याला डुकरांचीपण भीती वाटू लागली.तसाच गडबडीत तो झपाझप पावलं उचलत राहिला.इतक्यात रानातनं एक बॅटरीचा झोत त्याच्या अंगावर पडला.त्यानं तो जास्तच दचकला.मागं फिरून त्या झोताच्या दिशेन त्यानं पाहिलं.

रानातनं आवाज आला, "कोन हाय रे तिकडं?" सदाला आवाज ओळखता आला नाही. घाबरतच तो म्हणाला,मी ..मी.. सदा हाय निकमाचा." बॅटरीचा झोत जवळ जवळ येऊ लागला.कोण असावं याचा काहीच अंदाज सदाला लागेना. डोक्याचा टॉवल काढला.एकदम जवळ आल्यावर बॅटरीचा झोत बंद करत जाधवाचा आंदा म्हणाला, "कोण? सदा?अरे तू? हिकडं काय करतुयास? आनी इतक्या राच्च्याला का आलाईस?"


जाधवाच्या आन्दाला पाहून सदाला जरा बरं वाटलं.

तो म्हणाला, "आन्दूदा, तू हाईस व्हय. भिलो की गा एकदम". आन्दा म्हणाला."भ्यायला काय झालं .. रं? काय भूत बीत वाटलो की काय तुला? पर तू हिकडं काय करतुयस?" सदा म्हणाला,"रातीच्या वक्ताला कवा आलू न्हाय एकटं. म्हणून जरा घाबरलो बग.आरं, आबास्नी बरं न्हाई.तापानं आंग भाजून गेलयां.थंडीनं हुडहुडी भरलीया.

निपचित पडून हायती बग. आनि हिकडं तर पाट भरलाया.तासावर पानी घेतलंया कदमाच्या हिरीचं.आनी घरात माज्याशिवाय दुसरं कोन हाय? पाट परतायला आलूया. तू हिकडं काय करालाईस?"


"आरं ही डुकरं काय बसू देत्यात व्हय मर्दा! कसलं चांगलं पिक आलंया आनी ही एकसारखं दमवाय लागल्यात.

राखनीला आलोय न्हवं.मी हाय.अन्ना हाय,रव्या हाय सुताराचा".आन्दानं खुलासा केला.एवढ्या रात्री आपल्या सोबत कुणीतरी आहे याचं सदाला बरं वाटलं.आता आन्दाला घेऊनच शेताकडं जावं असा विचार करुन तो आन्दाला म्हणाला, "आन्दूदा,मग जरा चल की माज्यासंग.पाट परतून येवूया. एकट्याला भ्या वाटायल्या रं".आन्दानं लागलीच कबूली दिली.चालता चालता आन्दानं शाळेचा विषय काढला. "चौगुले मास्तर तुमाला हाईत काय रं शिकवायला ?" सदा म्हणाला, "हाईत की. मराठी शिकवित्यात. नाद करायचा नाई सरांचा. लई भारी शिकीवत्यात.कवा कवा तर एवढं हशिवत्यात.तास सपूच ने वाटतोय त्यांचा." "गणिताला कोन हाय रे?" आन्दानं विचारलं. "परीट सर".सदान सांगितलं."परीट सर? आरं लई मारतंय बाबा ते.आमाला तर नुसतं फोडून काढलंय बग त्यानं." आन्दानं भूतकाळ आठवला."आमच्या वर्गातली बी लई मार खात्यात.पर माज्यावर लई जीव सरांचा. वर्गात सगळ्यांच्या आदी माजं उत्तर तयार आसतंय. मला लई आवडतंय गणित."आन्दाला सदाचं कौतुक वाटलं आणि नवे मुख्याध्यापक, बदललेली शिक्षक मंडळी,शिक्षणाचं वातावरण यावर बोलत बोलत ती दोघं शेतापर्यंत कधी आली ते समजलंच नाही.सदानं पाटाचा अंदाज घेतला.पाट भरलाय हे बघून पुढच्या पाटाला पाणी फिरवण्यासाठी तो खोरं शोधू लागला. अंधारात त्याला ते कुठे सापडेना.म्हणून आन्दाकडं त्यानं खुरपं मागितलं. आन्दाकडं खुरपं नव्हतं.पण राखणीची काठी होती.काठीनंच पाट फोडून रात्रभर पाणी चालावं म्हणून त्यानं चार पाटाला पाणी लावलं.राखणीची

काठी त्याला परत केली.दोघेही मागं फिरले,बोलत बोलत ती दोघं रस्त्यावर आली.आन्दाचं आभार मानावं म्हणून सदानं मागं पाहिलं आणि ........सदाला एकदम घामच फुटला.हाताची बोटं आपोआप तोंडात गेली.हातपाय लटपटू लागले.त्याला काहीच कळेनासं झालं.तो मटकन खालीच बसला.त्याचा विश्वासच बसेना.कारण आन्दा तिथं कुठं नव्हताच.आता तर आपल्याबरोबर होता आणि एवढ्यात कुठं गेला याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं.आन्दाला चारदोन हाकासुध्दा मारुन बघितल्या.आन्दाचा कुठूनच आवाज आला नाही.पण त्यानं कुत्री मात्र जागी झाली आणि ओरडायला लागली.

आवाज ऐकून कदमाचा शिवन्या आणि सुताराचा रव्या सदाजवळ आले. "काय रं? कुणाला हाक मारतुयस?


"ते....ते आन्दूदाला हाक मारतोय पर ओ दीना न्हवं."

"आरं आन्दा आलाय कुटं अजून". "आता हूता माज्यासंग आनि".....

"आरं कसं असंल? अजून याचा हाय त्यो."


आता मात्र सदाला काहीच कळेना.आन्दूदा अजून आलाच न्हाई तर माज्याबरोबर कोन हुतं या विचारानं त्याची बोबडीच वळली.दरदरून घाम फुटला.आन्दाचाच विचार करत झपाझप पावलं टाकत तो पळतच घराकडे आला. अंगातली कापडे घामानं भिजली होती.भरलेला तांब्याच त्यानं तोंडाला लावला.आईलाही काही कळंना.

त्याचा तो अवतार बघून चिंतागत होऊन ती त्याला म्हणाली, "आरं जेवणार हाईस की अजून. आनी पानी कशाला प्या लागलाईस? ताट करुन ठेवलंय चल जेव चल.सदानं हात धुतलं आणि तो ताटावर बसला.पण त्याचं लक्ष जेवणाकडे नव्हतं.तसाच त्यानं जेवणाठी घास उचलला.घास तोंडात घालणार इतक्यात बाहेरुन आवाज आला.


"तुकामा हाय का घरात?" सदाच्या आईन पुढं होऊन बघितलं. आणि दारातल्या आन्दाला बघून ती म्हणाली,


"आन्दा? काय रे? काय काम हुतं?" आन्दा  म्हणाला, "व्हय.रानाकडं चाल्लोय.' चिंतागती आई म्हणाली, "इदुळा?"


``आवं काय सांगायचं काकू,रानात डुकरानी नुस्ता धुडघूस घाटलाया.आवं पिक चांगलं आलंया आनी ही डुकरं दमवाय लागल्यात न्हवं. 


"आनि रं. आत तरी ई की.आई" म्हणाली.आत येत आन्दा म्हणाला.


"न्हाई, जातू की.शिवन्या आन रव्या हैती रानात. वाट बगत असतील.' 

"होंच्याकडं काय काम हुतं?"


"व्हय ते ब्याटरी मागाय आल्तो.राखणीला चाल्लोय.माझ्या ब्याटरीतला मसाला सपलाय न्हवं.' ..


"थांब हं देतो." असं म्हणत सदाची आई उठली.सदाकडे बघून आन्दानं विचारलं,"काय सदा यावं का जेवायला ?"


.... आणि घरात आलेल्या आन्दाला बघून सदाच्या हातातला घासच गळून पडला. काहीच न बोलता तो आन्दाकडं बघतच राहिला….


५/९/२३

विचारवंत कन्फ्यूशियस - thinker Confucius. भाग २

पिता ज्याप्रमाणे मुलाबाळांची तरतूद ठेवतो, त्यांची सर्व काळजी घेतो,तसे राजाने प्रजेचे पालन केले पाहिजे, "एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात निकाल देण्यासाठी कन्फ्यूशियसला बोलवण्यात आले,तर एकदम निकाल देण्यापूर्वी तो आधी पुष्कळशा शहाण्या लोकांचा विचार घेई.व मग न्याय देई.पुढे भविष्यकाळात जी ज्युरीपद्धती जगात आली,तीच जणू कन्फ्यूशियसच्या डोळ्यांसमोर होती.गुन्हेगारांना शिक्षा देणे हेच त्याचे मुख्य ध्येय नसून गुन्हे कमी कसे होतील,हे तो आधी मुख्यतःपाही.त्या वेळेस साऱ्या चीन देशभर भुरट्या चोरांचा व उचल्यांचा बुजबुजाट झाला होता! याला आळा घालण्यासाठी म्हणून प्रमुख नागरिक त्याला प्रश्न करीत.तो म्हणे,

"चोरी बंद करायचा एकच मार्ग आहे.आणि तो म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ कमी करा.तुम्ही लोभ सोडला म्हणजे चोरांनी न्यावे इतके जास्त तुमच्याजवळ उरणारच नाही."

आपल्या राजाची कीर्ती वाढावी;आपले राष्ट्र सुधारलेले व्हावे,म्हणून कन्फ्यूशियसचे जे प्रयत्न चालले होते त्यात त्याला बरेचसे यश येत होते. परंतु ली प्रांतांचा राजा लू प्रातांचा मत्सर करी, द्वेष करी.कन्फ्यूशियसच्या नेतृत्वाखाली लू प्रांतांची कीर्ती पसरत आहे.ही गोष्ट ली प्रातांधिपतीस सहन झाली नाही.कन्फ्यूशियसचे लू प्रातांच्या राजावर जे वजन होते,ते नष्ट व्हावे म्हणून त्याने एक साधी युक्ती केली.त्याने लू राजाकडे ऐंशी नृत्यांगना पाठविल्या.युक्ती सफल झाली.राजा त्या नृत्यांगनांत इतका रमला की, कन्फ्यूशियस व त्याचे प्रयोग सारे विसरून गेला.कन्फ्यूशियसला या गोष्टींचा तिटकारा आला. तो आपला स्वतःचा लू प्रांत सोडून रागाने निघून गेला आणि पुन्हा जगभर भटकू लागला. जगाच्या करुणेवर,जगाच्या आधाावर त्याने स्व:ला सोपविले.या वेळेपर्यंत कित्येक हजार शिष्य त्याला मिळाले होते.तरीही आपले जीवन विफल आहे असे,त्यास वाटे.राजे पशुसमान होते,प्रजा अडाणी होती.आणि त्याचे उत्तम पुरुषाचे ध्येय अद्याप स्वप्नातच होते. मानवजातीस स्वतः प्रमाणे बनविण्याचा त्याने प्रयत्न केला.परंतु ज्या मातीवर तो प्रयत्न करू पाहात होता.ती माती टणक होती.त्याची सौम्य बोटे त्या मातीस आकार देऊ शकेनात.प्रवास करताना पुष्कळ वेळा खुनी व दरोडेखोर त्याच्यावर हल्ला चढवीत.पुष्कळ वेळा त्याला अन्नाशिवायही दिवस काढावे लागले.तरीही तो ध्येयापासून च्युत झाला नाही;स्वीकृत कार्य त्याने सोडले नाही.


या वेळचे स्वतःचे एक सुंदर शब्दचित्र त्याने काढले आहे.तो लिहितो; "कन्फ्यूशियस इतका तहानलेला आहे,की पुष्कळ वेळा खाण्यापिण्याचीसुद्धा त्याला आठवण राहत नाही.आपल्या प्रयत्नांना यश येत आहे असे जरा दिसले की त्या आनंदात तो सारे दुःख विसरून जातो.ज्ञानोपासना करताकरता व ध्येयार्थ धडपडत असता वार्धक्य जवळ येत आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही "


हाती घेतलेले उद्योग निराशेने सोडून द्यायला तो अद्याप तयार नव्हता.जनतेला दैनंदिन व्यवहारात मार्गदर्शन व्हावे म्हणून प्राचीन ग्रंथांचे संपादन व संकलन त्याने सुरु केले.

जुन्या चिनी बायबलातून त्याने जणू नवीन बायबल करारच चिनी जनतेस दिला.कन्फ्यूशियस बुद्धाप्रमाणे नास्तिक होता. स्वर्ग किंवा नरक यांवर त्याचा विश्वास नव्हता. त्याचा एकाच गोष्टीवर अपरंपार विश्वास होता. तो म्हणजे स्वतःच्या मानवबंधूंवर कन्फ्यूशियसची श्रद्धा होती.की जर शंभर वर्षे नीट सुव्यवस्थित राज्यकारभार चालेल, तर पृथ्वीवरचा सारा अत्याचार नाहीसा होईल.


या ध्येयाने प्रेरित होऊन लोकांवर कशा रीतीने राज्य चालवावे याविषयीची निश्चित सूत्रावली त्याने लिहून ठेवली आहे.शिस्त यावी म्हणून नानाविध विधिविधाने त्याने सांगितली आहेत, जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने कोणत्यातरी विधीशी जोडली आहे.हे विधीचे अवडंबर मोठे डोळ्यांत भरण्यासारखे आहे.झोपडीत राहणारा शेतकरी राजवाड्यातील राजाइतकाच प्रतिष्ठित.राजाला राजाचे विधी.शेतकऱ्याला शेतकऱ्याचे.

परंतु उभयतांच्याही जीवनात त्या त्या गंभीर विधींमुळे एक प्रकाराची प्रतिष्ठा आली.कन्फ्यूशियसने आपल्या लोकांवर जे हे औपचारीक असे नानाविध बाह्यविधी लादले, त्यांचे आपणास आज हसू येते.अती गुंतागुंतीचे व काहीकाही बाबतीत तर ते हास्यास्पद असे दिसतात.या विधींमुळे चिनी राष्ट्र हे सर्व जगात अगदी बारीकसारीक गोष्टींकडेही फार पाहणारे, बाह्य देखाव्यावर भर देणारे असे झाले.परंतु यामुळे एक प्रकारचा स्वाभिमानही त्यांच्यांत आला.दुसऱ्यांस मान देणे व स्वत:चाही मान सांभाळणे या दोन्ही गोष्टी ते शिकले.राजाही पूजनिय आणि शेतकरीही पूजनिय,कन्फ्यूशियसच्या शिकवणीचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, की "स्वतःशी प्रामाणिक रहा व शेजाऱ्यांशी प्रेमाने व सहिष्णुतेने वागा." दुबळ्या निःस्वार्थतेच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्याने त्यांना उदार आणि दुसऱ्यांच्या डोळ्यांत न खुपणारा असा सुसंस्कृत स्वार्थ शिकविला. स्वार्थ तुमच्याजवळ असणारच. परंतु तो शहाणा स्वार्थ असू दे. कन्फ्यूशियसच्या मनात चीन हे प्रतिष्ठित नागरिकांचे राष्ट्र करावयाचे होते. असहिष्णू व अहंकारी लोकांची जात निर्मिण्याऐवजी सभ्य अशा सद्गृहस्थांची जात त्याला निर्मावयाची होती.चिनी राष्ट्र सद्गृहस्थांचे व्हावे असे स्वप्न रात्रंदिवस तो मनात खेळवीत होता.राजाला वा रंकाला तो स्वतः समानतेने वागवी.राजाचे स्थान वैभवाचे व थोर म्हणून त्यालातो मान देई आणि गरीब थोर मनाने व उदात्तेने कसे कष्ट सोशीत आहे हे पाहून त्यालाही मान देई. तो "ज्यांना ज्यांना जीवनात दुःख,क्लेश आहेत,ज्यांची जीवने विकल नि विफल झाली आहेत,ज्यांना अपयश आले आहे, अशा सर्वांच्या दुःखात तो सहभागी होऊ इच्छित असे.कन्फ्यूशियसवर त्याचा एक शिष्य यामुळे एकदा रागावला. "दरिद्री लोकांत,सर्वसामान्य जनतेत मिसळण्याची तुमची ही वृत्ती आम्हाला आवडत नाही." असे तो शिष्य म्हणाला. कन्फ्यूशियस त्याला शांतपणे म्हणाला, "दुःखी कष्टी दुनियेशी मी एकरूप नको होऊ.तर कोणाबरोबर होऊ?"

परंतु दरिद्री नारायणाविषयी जरी त्याला सहानुभूती वाटत असली,तरी भावनांनी वाहून जाणारा,विरघळून जाणारा तो नव्हता.तो आपला तोल,सुवर्णमध्य कधी विसरत नसे.

त्याची सहानुभूतीही व्यवहारी होती.मानवजातीला ओलांडून सर्व प्राणिमात्रांस कवटाळू पाहणारी अशी त्याची सहानुभूती नव्हती.तो म्हणे, "जगापासून दूर निघून जाणे अशक्य आहे.ज्या पशुपक्ष्यांशी आपले काही साधर्म्य नाही, त्याच्यांशी एकरूप कसे व्हायचे? " कन्फ्यूशियस पशुपक्ष्यांसाठी तहानलेला नव्हता.देवदूतांना भेटायला हपापलेला नव्हता.त्याच्या डोळ्यांसमोर स्वतःची ही मानवजात नेहमी असे. तिचा तो विचार करी.तिचे सुख - दुःख पाही.तसे अपकाराची फेड उपकाराने करावी,

द्वेषाला प्रेमाने जिंकावे,अहंकाराबरोबर नम्रता घ्यावी. असा संदेश त्याने कधी दिला नाही.एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा असे त्याचे मत नव्हते.हे मत त्याला शहाणपणाचे वाटले नाही. "शत्रूबरोबर न्यायाने वागा व मित्राबरोबर प्रेमाने वागा." असा त्याचा दूरदर्शी उपदेश आहे. शत्रूबरोबर न्यायाने वागा,परंतु त्याच्यावरही प्रेम करून त्याला चिडवू नका.अशाने तो शत्रू अधिकच रागावेल. 'मला लाजावता काय?" असे तो म्हणेल.आगीत तेल ओतल्याप्रमाणे ते होईल. दुसऱ्याने इजा केली असता त्याचा सूड घेऊ पाहणे हे पशुवृत्तीचे द्योतक आहे.परंतु त्याला क्षमा करणे हेही मूर्खपणाचे आहे.एकंदर गोष्टीचा नीट विवेकाने निर्णय करा व तदनुसार वागा. शत्रूचे हक्कही सांभाळा व स्वतःची प्रतिष्ठाही सांभाळा.आपल्या अन्यायी शेजाऱ्यांशी वागण्याचा सुसंस्कृत माणसाचा हाच एक मार्ग आहे. एकदा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, "एका शब्दांत तुमच्या शिकवणीचे सार सांगा." कन्फ्यूशियस म्हणाला, "जशास तसे." शिष्य म्हणाले, "याचा अर्थ अधिक स्पष्ट करा." तो म्हणाला, "जे तुम्ही स्वतःच्या बाबतीत करू इच्छिणार नाही ते दुसऱ्यांच्या बाबतीत करू नका."

कन्फ्यूशियसने जो हा सुवर्णनियम सांगितला,तोच पाचशे वर्षांनी पुढे ख्रिस्तानेही सांगितला.परंतु दोघांचेही म्हणणे त्यांच्या समकालीनांनी ऐकले नाही.समकालीन जनतेने दोघांचीही उपेक्षाच केली.त्याचे अखेरचे दिवस दुःखाचे होते.त्याचे प्रिय शिष्य मरण पावले,पत्नींशी काडीमोड करूनही तिच्यावर तो प्रेम करी. तीही मेली.त्याचा एकुलता एक मुलगाही वारला. तो म्हणाला, "आता मीही जाणे बरे.माझीही वेळ आता आलीच आहे. "

तो अत्यंत दारिद्र्यात निवर्तला.त्याचे वय बहात्तर वर्षांचे होते. त्याचे हेतू विफल झाले होते.त्याची स्वप्ने धुळीस मिळाली होती.मानवावरचा त्याचा विश्वास ढासळला होता.फारच थोड्या लोकांनी त्याचे शब्द हृदयाशी धरले.

आणि जे त्याच्या शिकवणीप्रमाणे वागत त्यांचा छळ होई.आरंभी ख्रिश्चनांचा त्यांच्या क्रांतिकारक जहाल मतांबद्दल जसा छळ झाला,तसाच कन्फ्यूशियसच्या शिष्यांचाही झाला.एका चिनी सम्राटाने कन्फ्यूशियसची सारी पुस्तके जाळण्याचा हुकूम त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी दिला.पुष्कळ श्रद्धावान पंडितांनी भक्तीमुळे ग्रंथ न जाळता लपवून ठेविले.परंतु कायदेभंग करणाऱ्या अशा पंडितांना जिवंत पुरण्यात आले.

परंतु आज पाश्चिमात्यांत बायबल जितके लोकप्रिय आहे तितकेच चीनमध्ये कन्फ्यूशियसचे ग्रंथ लोकप्रिय आहेत. ख्रिस्ताप्रमाणे कन्फ्यूशियसही आता देव झाला आहे.

ख्रिस्त व कन्फ्यूशियस दोघांनीही सज्जन मानवांची एक नवीन जात निर्माण करण्याचा महान उद्योग केला.शिष्ट मानव नव्हेत; तर खऱ्या अर्थाने सौम्य व शांत असे सद्गृहस्थ.परंतु आतापर्यंत ख्रिस्त व कन्फ्यूशियस या दोघांचेही कोणी ऐकले नाही.दोघांच्याही शिकवणीपासून जग दूरच राहिले आहे.कोट्यवधी चिनी लोक कन्फ्यूशियसच्या नावाची पूजा करतात; परंतु कन्फ्युशियससारखे आपले मत उदार व उदात्त व्हावे अशी खटपट कितीसे करीत असतील ? तसेच जे स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात,अशांपैकी किती जणांना ख्रिस्ताने शिकवलेला धर्म समजला असेल,समजत असेल ?


ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्युशियश 

०३.०९.२३ या लेखातील शेवटचा भाग ..