* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासाची स्पेनमधील आजची स्थिती - पाब्लो झांब्रानो / The Present State of Comparative Literature in Spain - Pablo Zambrano

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/९/२३

साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासाची स्पेनमधील आजची स्थिती - पाब्लो झांब्रानो / The Present State of Comparative Literature in Spain - Pablo Zambrano

तुलनात्मक साहित्याभ्यास ही पद्धत तिच्या अमेरिका,

फ्रान्स,जर्मनी या पूर्वापारच्या केंद्रांमध्ये शंकास्पद ठरत असताना पोर्तुगाल,मेक्सिको, अर्जेंटिना आणि स्पेन या दूरवरच्या परिघावरच्या देशांमध्ये तिच्यात मौलिक भर पडून तिचा पुनर्जन्म होतो आहे.मी खरं तर याला तिचा प्रथम जन्म म्हणेन.शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ स्पेनमध्ये या संदर्भात खूप अज्ञान आणि अवहेलना होती.१९ व्या शतकाच्या उत्तराधीपासून तुलनात्मक साहित्याभ्यासात झालेल्या प्रगतीची स्पेनमध्ये कोणालाच कल्पना नव्हती.

याची कारणं स्पेनच्या इतिहासात आणि सामाजिक,

परिस्थितीत दडलेली आहेत.स्पॅनिश साम्राज्याच्या ऱ्हासकालात स्पेन उर्वरित जगापासून तुटत गेला.१९३६ ते १९३९ या काळातली यादवी आणि जनरल फ्रँकोची फॅसिस्ट राजवट इथपर्यंत हे तुटलेपण वाढतच गेलं.१९७५ मध्ये फ्रँकोचा मृत्यू झाल्यावर स्पेनमध्ये तुटलेपण संपून सांस्कृतिक पुनरुत्थानाला सुरुवात झाली.स्पेनचा जगाशी संवाद सुरू झाला आणि स्पेन EU मध्ये म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सामील झालं.गेल्या वीस वर्षांच्या काळातला हा आंतरराष्ट्रीय आणि सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतला तर स्पेनमधल्या अलीकडच्या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या जोमदार प्रारंभाची संगती लागते.तिथे आता तुलनात्मक साहित्याभासात पदवी मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे. Exemplaria : Revista International de Literatura Comparada अशासारखी या विषयाला वाहिलेली विद्यापीठीय नियतकालिकं निघत आहेत. SELGYC सारख्या संस्थांची सभासदसंख्या वाढते आहे.राष्ट्रीय स्तरावरच्या AEDEAN या साहित्यसंस्थेत तुलनाकारांचे विशेष गट नियुक्त होत आहेत.या संस्थांमध्ये आजपर्यंत फारसं खुलं वातावरण नव्हतं.अजूनही काही पारंपरिक,बंदिस्त वातावरणाच्या विभागांमधील अभ्यासकांच्या मनात या नव्या पद्धतीबद्दलच्या शंका घट्ट असल्या तरी व्यक्तिशः मला स्पेनमध्ये तुलनात्मक साहित्याभ्यास जोरकसपणे फुलणार याबद्दल शंका नाही. माझ्या या आशावादामागे भरभक्कम कारणं आहेत.दारिओ विल्येनूव्हा (University of Santiago de Compostela) सारखे अनेक अभ्यासक विद्वान स्पेनमध्ये तुलनात्मक स्वरूपाच्या सिद्धांतांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देत आहेत.उदा.इझ्रेली विद्वान इतामार एवेन जोहर यांची बहुपद्धतती सिध्दांत (Polysystem Theory) किंवा जीगफ्रीड स्मिट् यांचा प्रयोगलक्ष्यी (empirial) अभ्यास. (Villanueva Avances en..... Teoria de la literatura,1994).या तात्त्विक अभ्यासाला जोड मिळते.ती वाढत्या संख्येने प्रसिद्ध होणाऱ्या पाठ्यपुस्तकांची आणि हस्तपुस्तिकांची.सध्या स्पॅनिश समाज स्वतःची ओळख पुनः पुनः तपासून पाहून निश्चित करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेला आहे.आजपर्यंत बरेचदा आडबाजूला ढकलून दिलेला "कोहम्"चा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे.स्पेनच्या इतिहासात प्रथमच भाषाबाहुल्य,संस्कृतीबाहुल्य आणि राष्ट्रकांचे बाहुल्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.गेली पाच शतकं स्पॅनिशमुळे नसलेल्या "इतर" लोकांच्या देशातील अस्तित्वाचा उच्चार आणि विचार झाला नव्हता. स्पेन हा देश निर्विवादपणे युरोपातील बहुसांस्कृतिक देशांपैकी एक देश आहे.त्यामुळे केवळ पारंपरिक तुलाभ्यासासाठीच नव्हे तर नवे सिद्धांत ताडून पाहण्यासाठीसुद्धा स्पेनची संस्कृती ही एक उपलब्धी आहे.स्पेनचे दक्षिण अमेरिकेतील प्रदीर्घ काळचे साम्राज्यवादी वसाहतवादी अस्तित्व आणि सध्याच्या युरोपातील त्याचं महत्त्वाचं स्थान यातून स्पेन हा युरो-अमेरिकन सांस्कृतिक संबंधांमध्ये महत्त्वाचा पूल बनतो.युरोपचे आर्थिक-राजकीय एकीकरण हे जोरकसपणे प्रत्यक्षात येऊ घातलं आहे ही बाब साहित्य आणि संस्कृतीच्या तुलनाकारांनी पुरेपूर वापरली पाहिजे.

स्पॅनिश अभ्यासकांनी याची सुरुवात केली आहे असं दिसतं.रोमेरो,वेगा आणि कार्बोनेल व गिलेन यांची अलीकडची प्रकाशनं या आशा भरल्या संदर्भात पाहिली पाहिजेत.हे ग्रंथ म्हणजे काही पूर्वप्रसिद्ध ग्रंथांची भाषांतरं आहेत.ही गोष्ट रोमेरोच्या बाबतीत सहज लक्षात येते;परंतु वेगा आणि कार्बोनेल जणू मूळ लेखक आहेत असं वाटतं. मात्र तरीही हे अभिजात निबंधाचे भाषांतरित संग्रह स्पॅनिश वाङ्मयाभ्यासात तुलनात्मक पद्धतीचं मोठं योगदान देतात.ते पाठ्यपुस्तकं म्हणून उपयुक्त आहेत.मात्र मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ह्या उपयुक्त हातपुस्तिका (manuals) नाहीत.


वेगा आणि कार्बोनेल यांच्या ग्रंथांची रचना तुलाभ्यासाचा तात्त्विक इतिहास म्हणून अगदी योग्य आहे.तीन मुख्य भागांमध्ये प्रातिनिधिक अशा खुद्द वेगा आणि कार्बोनेल यांनी अनुवाद केलेल्या संहिता आहेत.प्रत्येक भागाच्या सुरुवातीला थोडक्यात पण उपयुक्त असा त्या भागाचा परिचय करून देणारा लेख आहे. पहिला भाग ज्या जुन्या प्रमाणसूत्राना (Old paradigm) बराच अंमल गाजवला त्यांचं मूळ आणि त्यांची वाढ व प्रगती याला वाहिलेला आहे.त्यात क्रोचे टेक्स्ट,गेली,बाल्डेन स्पेर्गर,फान टीग्हेम इत्यादींचे निबंध आहेत.दुसरा भाग आहे तेच आणि त्याची नव्या प्रमाणसूत्राकडून उकल (Crisis and the New Paradigm ) वेलेक, रेमाक,फोकेमा रूपरेस्ट आणि लॉरे यांचे सकस निबंध या भागात येतात.तिसऱ्या भागात तुलाभ्यासातील अगदी अलीकडच्या दिशांची ओळख करून दिलेली आहे.यात शँतँ,शेवरिए,अ‍ॅक्रॉफ्ट,ग्रिफिथ,

टिफीन,निश्ची,स्नावडर, लान्सर,लफेव आणि झिपेत्नेक यांचे निबंध येतात. शेवटच्या भागात उपयुक्त अशी संदर्भसूची आहे.वेगा आणि कार्बोनेल यांच्या या ग्रंथाशी रोमेरोच्या ग्रंथाच्या बऱ्याच तारा जुळलेल्या होत्या.परंतु रोमेरोने प्रस्तावनेत म्हटल्यानुसार तिच्या ग्रंथाचा हेतू स्पॅनिश वाचकाला तुलाभ्यासाच्या आपल्या शतकाच्या शेवटी असलेल्या स्थितीचं दर्शन घडवणे हा आहे.या अपेक्षेने पाहिलं तर रोमेरोचा संग्रह हा वेगा आणि कार्बोनेल यांच्या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचा विस्तार आहे.रोमेरोचा ग्रंथही तीन प्रकरणात विभागलेला आहे.मात्र ही विभागणी कालक्रमानुसार न होता पद्धतीच्या सोयीनुसार झालेली आहे.पहिला विभाग प्रॉवर,मरीनो आणि बॅसनेट यांच्या सुपरिचित कल्पनांचा विस्तार करतो.दुसऱ्या विभागात क्युलर,रेमाक,स्विगर्स, फोकेमा,जिलेस्पी,क्युलर व झिपेत्नेक यांचा सिद्धांतन येतं."शिक्षणशास्त्रीय मुळे" (di- dactic orientations) या शीर्षकाच्या तिसऱ्या विभागात शेवरेल आणि फोकेमा यांचे निबंध आहेत.शेवटच्या भागात ग्रंथसूची आहे.या संग्रहाला एकच दूषण देता येईल.ते म्हणजे सर्व नसली तरी काही भाषांतरांची शैली आणि स्वर नको इतके "इंग्लिश" आहेत.रोमेरो व वेगा आणि कार्बोनेल ह्यांच्या या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या भाषांतरित लेखसंग्रहा

पाठोपाठ १९९८ मध्ये एक विलक्षण पुस्तक आलं.

क्लॉडिओ गिलेनचं Multiples Moradar (Barcelona,Tusquets १९९८). गिलेनचं खास कौशल्य म्हणजे तो वाचकाला सतत संहितेचा आनंद देत राहतो.या शतकातल्या फार महत्त्वाच्या तुलनाकारांपैकी एक असलेल्या गिलेनच्या कारकिर्दीचा समग्र आढावाच ह्या पुस्तकातून मिळू शकतो.हे सर्व निबंध पूर्वप्रसिद्ध असले तरी हा केवळ पूर्वप्रसिद्ध निबंधांचा संग्रह राहात नाही.सर्व निबंधांचे पुनर्लेखन करून विस्तृत स्पष्टीकरणेही जोडलेली असल्याने हा एकसंध,एकजीव असा प्रबंध झाला आहे."आपल्यात असलेल्या आणि आपल्याभोवती असलेल्या बहुलतेचा विचार कसा करावा ?" या प्रश्नाने गिलेनच्या प्रस्तावनेची सुरुवात होते.आपल्या ऐतिहासिक अनुभवांची परिणती एका जटिलतेत झालेली आहे; या जटिलतेचा अभ्यास ही Multiples Moradar समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे.या ग्रंथाचे दोन भाग आहेत. "साहित्य आणि हद्दपारी", "साहित्य आणि निसर्गसृष्टी", "साहित्य आणि पत्ररूप लिखाण" "साहित्य आणि बीभत्सता" या चार उत्कृष्ट लेखांचा पहिल्या विभागात समावेश आहे.या लेखात कोणी आणखी काही भर घालू शकेल असे वाटत नाही.गोविंद,दान्ते,दु बेले, शेक्सपिअर इत्यादींच्या हद्दपारीचे अनुभव सांगत गिलेन शेवटी राफाऐल,आल्बर्ती आणि नोबेल विजेता युआन रामोन जिमेनेझ यांचे अनुभव नोंदवतो.गिलेनने इथे स्पॅनिश साहित्यावर फारसा भर दिलेला नसला तरी त्याचा स्वतःचा अनुभव तसाच आहे.स्पेनचं साहित्य हे हद्दपारीचं साहित्य आहे.विशेषतः १९३९च्या यादवीनंतरचं साहित्य देशाबाहेरच जन्मलं.या गोष्टीचं भान त्याला आहे. असं दिसतं.


व्यक्तिशः मला "साहित्य आणि निसर्गसृष्टी" हा निबंध फार लक्षणीय वाटला.Evgon आणि Parergon म्हणजे या दोन संकल्पना स्पष्ट करून विसाव्या शतकात साहित्य आणि चित्रकलेत निसर्गसृष्टीचं चित्रीकरण कसकसं होत गेलं याचा त्याने इथे वेध घेतलेला आहे. वर्डस्वर्थ आणि बोदले यांच्या निसर्गकवितांवरचे त्यांचे विचार मी आजवर वाचलेल्या विचारात सर्वोत्कृष्ट आहेत.परंतु वास्तववादाच्या चर्चेत फ्लोबेर आणि मादाम बोव्हरी पूर्णपणे गैरहजर आहेत.याची चुटपूट लागून राहते. फ्लोबेरच्या कादंबऱ्यांमधील निसर्गदर्शन आणि त्याची स्वच्छंदतावादी (Ro- mantic) सौंदर्यविचारावरील टीका यांच्यातील संबंधांबद्दल बरंच काही म्हणण्यासारखं आहे.त्याचप्रमाणे एमा आणि रोडोल्फ यांच्यातला प्रथम लैंगिक संबंध (भाग २ प्रकरण ९) आणि त्या गोष्टीचा कादंबरीतील तथाकथित वास्तववादी जीवनदर्शनावरचा परिणाम याबद्दलही बरंच काही म्हणता येईल."मादाम बोव्हरी" ही १९ व्या शतकातील महत्त्वाची कादंबरी मानली जाते. तेव्हा गिलेनच्या साक्षेपी नजरेने तिचा घेतलेला वेध ही वाचकाला एक आनंदाची पर्वणी झाली असती.त्याच्या साहित्य व बीभत्सतेच्या अभ्यासाबाबतही हेच म्हणता येईल.या संदर्भात सुद्धा फ्लोबेरची कादंबरी ही निश्चितच एक मैलाचा दगड आहे.दुसऱ्या भागात राष्ट्रीय साहित्य,साचेबंद राष्ट्रीय प्रतिमा आणि युरोप या विषयांवरचे तीन निबंध आहेत.हे निबंध जरी मुख्यत्वे ऐतिहासिक आढावा या स्वरूपाचे असले तरी समकालीन युरोप आणि स्पेनमध्ये जी राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक खळबळ चालू आहे. तिच्यावरच गिलेनचं चिंतन-मनन इथे दिसून येते.मी याआधी म्हटल्याप्रमाणे एक सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्व असलेला स्वतंत्र समाज म्हणून स्पेन सध्या आपली पूर्वापार चालत आलेली ओळख पुनः पुनः तपासतो आहे आणि तिची फेरमांडणी करतो आहे.यात कॅटॅलोनियन,बास्क आणि गॅलिशियन ही राष्ट्रके एका बाजूला काही मागण्या करताहेत.तर नव्या प्रादेशिक चळवळी त्यावर त्याच प्रकारची प्रतिक्रिया देताहेत.ह्या कलहाचा स्पेनचे राष्ट्रीय साहित्य यासारख्या सुनिश्चित आणि प्रदीर्घ काळ चालत आलेल्या संकल्पनांवर परिणाम होतो आहे हे सांगायला नको.समाजाच्या काठावरील समूहांमध्ये राष्ट्रवादी जाणिवांची वाढ ही एका परीने आवश्यक आहे.त्यांचा नि:सारक परिणाम होईल आणि जुने साचे नष्ट होतील.

नव्या,खुल्या विचाराने साहित्याची नवी मानांकन यादी (Canon) तयार होऊ शकेल.मात्र इथे गिलेनने ज्या धोक्याची जाणीव करून दिली आहे,तो प्रांतीय संकुचित जाणिवांचा (Provincial rava ings) धोकाही लक्षात घेतला जावा.राजकारणी आणि काही बुद्धिजीवीसुद्धा खोट्या इतिहासावर आधारित नवे साचे तयार करून नव्या संकुचित राष्ट्रीय जाणिवा निर्माण करतील.( संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास, जगातील निवडक निबंधाचे अनुवाद,संपादक,प्रा.डॉ.मनीषा आनंद पाटील,आनंद ग्रंथ सागर प्रकाशन,कोल्हापूर ) "बहुभाषिक समाज हा सुरुवातीला कमी बंदिस्त आणि कमी प्रांतिकतावादी असतो." या गिलेनच्या विधानावर (३२०) दुर्देवाने कृतकपवित्र राष्ट्र संकल्पना निर्माण करणाऱ्यांकडून शंका घेतली जात आहे.एड्गर मॉरीनचे "Penser I Europe" हे विधान स्मरून - जसं गिलेन नेहमी करतो तसं - मी म्हणेन की स्पेन पुनःश्च स्पॅनिश (पद्धतीने) विचार करत आहे.गिलेनचे पुस्तक आणि विचार सकारात्मक परिणाम घडवून आणतील अशी अशा आहे.या पुस्तकाच्या वाचनाने ज्याला चालना मिळेल अशा अनेक गोष्टी आहेत. Multiples Moradar प्रकाशित होणं ही मोठ्या महत्त्वाच्या सांस्कृतिक घटनांपैकी एक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.त्याच्याच Enter to uno y lo diverso.

Introduccion a la literatura comparada या पुस्तकाच्या बरोबरीने हे आंतरराष्ट्रीय परिणाम असलेलं अत्यावश्यक प्रकाशन आहे.तुलनात्मक साहित्याभ्यासात स्पेनमध्ये होऊ घातलेल्या शुभलक्षणी बदलांसाठी हा एक मजबूत आधार होईल.


(Romero, Vega and Carbonell, and Guillén Pablo Zambrano, University of Huelva, CLCWeb: Comparative Literature and Culture 1.2 (1999): <https://doi.org/10.7771 / 1481-4374.1039)


अनु : शर्मिष्ठा खेर