* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/१०/२३

टायटॅनिक अपघात की आणखी काही..? Titanic accident or something else..?


" पाण्यात बुडून जाण्याचा आवाज मीच तुम्हाला वर्णन करून सांगू शकते,इतर कोणीही नाही.तो अत्यंत भयप्रद असा आवाज आहे आणि त्यापाठोपाठ नेहमीच एक भयचकित करणारी शांतता असते."

Ms. Eva Hart, Titanic survivor


" ती एक अत्यंत काळीभोर रात्र होती. आकाशात चंद्र नव्हताच.निरीक्षणे करायला लागणारे एकमेव असे बायनोक्युलर्स आम्ही साउथहॅम्प्टनला ठेवून आलो होतो."


टायटॅनिक पहाऱ्यावरील Reginald Fleet चे अमेरिकन सिनेटच्या चौकशीतील विधान.


नोंद क्रमांक १,सन १९०९ - नुकतीच आणि अचानक 'व्हाईट स्टार लाईन' नावाची शिपिंग कंपनी,अमेरिकेचा रेलरोड सम्राट जे. पी. मॉर्गनने ताब्यात घेतली होती.ह्या व्यवहारामागची कारणे अज्ञात असली तरी मॉर्गन हा प्रथितयश,यशस्वी व्यावसायिक होता.ही जी व्हाईट स्टारलाईन शिपिंग कंपनी होती,ती प्रचंड तोट्यात होती. तिच्याकडे एक मोठे प्रवासी जहाज होते.त्याचे नाव RMS Olympic,जे सतत दुरुस्तीसाठी डॉकयार्डमध्ये पडून असे.हा एक पांढरा हत्ती होता आणि त्यामुळे मॉर्गनने ही कंपनी घेतली, तेव्हा तो त्याच्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याने ही कंपनी रुळावर आणेल असेच सगळ्यांना वाटले आणि झालेही तसेच.मॉर्गनने या व्यवहारानंतर अजिबात वेळ दवडला नाही.जणू काही ती खरेदी पुढे घडून येणाऱ्या एका प्रत्ययकारी मोठ्या हालचालीचा एक टप्पा होती. त्याने तातडीने आयर्लंडच्या बेलफास्टच्या देखण्या शिपयार्डमध्ये १९०९ साली व्हाईट स्टारलाईन्सचे एक मोठे प्रवासी जहाज बांधायला घेतले इथे हे सांगितले पाहिजे की, बेलफास्ट हे गाव प्रोटेस्टंट*

(प्रोटेस्टंट हा पंथ कॅथलिक ख्रिश्चनांच्या कर्मठपणाला कंटाळून त्यात सुधारणा करणाऱ्यांची चळवळ होती. कॅथलिक चर्चने त्याला अतिशय हिंसक पद्धतीने सतत विरोध केला.) लोकांचे.


नोंद क्रमांक २,सन १९९१० - जॉर्जियाचा निसर्गरम्य किनारा.त्या ऊबदार किनाऱ्यावरच्या अनेक छोट्या बेटांपैकी एक शांत आणि निर्जन बेट,जॅकील आयलंड.

नोव्हेंबरचा महिना हा खरे तर पानगळ झालेला ऋतू,शुष्क झाडांचा आणि विषण्ण वाऱ्याचा! पण या बेटावर मात्र त्याचा अजिबात मागमूस नव्हता.इथले वातावरण ऊबदार झालेले.इथे अमेरिकेच्या आर्थिक जगातली सात अत्यंत निवडक महत्त्वाची माणसे अमेरिकेत येऊ घातलेल्या मध्यवर्ती बँकेची काही गुप्त गंभीर खलबते करण्यसाठी जमली होती.सतत काळाच्या पुढे आणि नफ्याच्या मागे धावणारी ही मंडळी,तब्बल सात दिवस,ह्या नव्या आर्थिक सत्तेच्या चर्चेत आणि शक्यतांच्या समीकरणात खोलवर आणि गहनपणे बुडाली होती.शेवटी एक मसुदा घेऊन त्या हिशेबी,धोरणी माणसांचा ताफा न्यूयॉर्कला परतला.


नोंद क्रमांक ३,जानेवारी १९११ - नवीन वर्ष उंबरठ्यावर,अमेरिका गारठलेली.ख्रिसमसच्या थंडीची गंमत आता संपली होती आणि उरले होते ते केवळ अंग ठणकावून टाकणारे गार वारे. ह्या कडक थंडीत मात्र न्यूयॉर्कच्या एखाद्या धातूसारख्या थंडगार इमारतीत उंचीवर असणाऱ्या अर्थसत्तांच्या मजल्यांवर मात्र वातावरण पेटले होते.न्यूयॉर्कचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा आर्थिक लगाम आपल्या विवेकी हातात ठेवणाऱ्या त्या तीन धनाढ्य माणसांना अमेरिकेत होऊ घातलेली मध्यवर्ती बँक अजिबात मान्य नव्हती.ही बँक लोकांच्या स्वातंत्र्यावर कायमची गदा आणेल असे त्यांचे मत होते आणि ते त्यांच्या तापलेल्या स्वरातून व्यक्त होत होते. यातला एक होता बेंजामिन गुग्गेनहेम. हा अमेरिकन आणि जर्मन नागरिक. वंशाने ज्यू. गर्भश्रीमंत.


अमेरिकेतील खाण उद्योगसम्राट असणाऱ्या गुग्गेनहेम कुटुंबातला.याचे टोपण नावच मुळी सिल्वर प्रिन्स.दुसरा होता इसीडोर स्ट्रोउस.हा सुद्धा जर्मन- अमेरिकन नागरिक.वंश ज्यू. अमेरिकेन काँग्रेसमन.अत्यंत धनाढ्य माणूस. याचा पक्ष 'डेमोक्रेटिक'. 'मेसीज' या जगप्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक. तिसरा होता जॉन जेकब अ‍ॅस्टर.हा सुद्धा जर्मन-अमेरिकन. अमेरिकेतल्या पहिले दशलक्षाधीश असणाऱ्या अ‍ॅस्टर कुटुंबातला.हा अमेरिकेतला पहिला व्यापार-सम्राट.याने अमेरिकेतला पहिला ट्रस्ट सुरू केला.ह्या तीनही माणसांनी त्या जॅकील बेटावर इतक्या गंभीरपणे आणि मेहनतीने तयार केलेल्या मध्यवर्ती बँकेच्या मसुद्याला धुडकावून लावले.हे तिघेही अमेरिकेतले कमालीचे धनाढ्य आणि जगातील काही मोजक्या गर्भश्रीमंत लोकांपैकी एक.ह्यांच्या श्रीमंतीचा आणि नैतीकतेचा दबदबा दूरवर पसरलेला.संपूर्ण नैतिकतेने व्यवसाय करीत अमेरिकन समाजाचे भले केलेली,आपल्या संपत्तीचा दबाव चांगल्या गोष्टींसाठी वापरणारी ही माणसे;त्यामुळे यांच्या नकाराला अमेरिकेच्या अर्थवर्तुळात एक उच्च दर्जा आणि मजबूत महत्त्व.यांचा नकार म्हणजे जणू अमेरिकन अर्थविश्वाला दिला जाणारा व्हेटोच..!


नोंद क्रमांक ४,सन १९११ - बेलफास्टमध्ये नवीन आलिशान बोट बांधून तयार होत आलेली. जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायनिष्ठेचा हा एक पुरावा.त्यापूर्वी कोणीही बांधली नसेल आणि कोणीही स्वप्नात बघितली नसेल अशी ही आलिशान बोट.समुद्रावर तरंगणारा प्रचंड भव्य राजवाडाच जणू.'कधीही न बुडणारी जगातील एकमेव बोट' अशी तिची जाहिरात सगळ्या जगभरच्या वर्तमानपत्रात झळकत होती.तिचा पहिला मेडनप्रवासही घोषित झाला.त्याची जाहिरातबाजी सुरू झाली आणि तिने जगभरच्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसांच्या मनाचा ठाव घेतला.तिच्यातला पहिला प्रवासी होण्याची त्या लोकांची अधीर लगबग सुरू झालेली.त्या आलिशान बोटीच्या प्रवासाचा दिवस ठरला,१२ एप्रिल १९१२.या सगळ्या प्रवासाला अजून एक वैयक्तिक टच देताना जॉन पियर पौट मॉर्गनने जगभरच्या प्रतिष्ठित लोकांना खास वैयक्तिक आमंत्रणे द्यायला सुरुवात केली. प्रवास सुरू होणार होता,इंग्लंडमधील साउथहॅम्पटन डॉकपासून संपणार होता लुभावणाऱ्या लालसी न्यूयॉर्कच्या किनाऱ्यावर. एक देखणी प्रशस्त बोट,अत्यंत शाही प्रवासी मार्ग आणि जगभरच्या मातब्बर लोकांना स्वत: जॉन पिएरपोट मॉर्गनने दिलेली आमंत्रणे स्वतः मॉर्गनने मालक असून या प्रवासाचे तिकीट काढलेले.साहजिकच बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर या मान्यवरांना त्याकाळातली इतक्या आलिशान आणि इतक्या प्रतिष्ठित प्रवासाची भुरळ न पडती तरच नवल.हे तिघेही त्या प्रवासाला तयार झालेले आणि त्या बातमीने या मेडन प्रवासाला जगभर एक वेगळीच उंची आणि झळाळी दिलेली !


बोटीचा कप्तान एडवर्ड स्मिथ.हा कप्तान उत्तर अटलांटिक समुद्राच्या लाटांवर जवळपास सव्वीस वर्षे सहज स्वार झालेला माणूस.त्या नुसत्या स्पर्शाने अंगभर शहारा आणणाऱ्या थंडगार शांत पाण्यातला तो माहितगार असामी. त्याची नजर अटलांटिकच्या लाटांवर वृद्ध झालेली.याचा अजून एक परिचय म्हणजे हा ज्येसूट.

ज्येसूटस् रोमन कॅथलिकातले अत्यंत कडवे म्हणून प्रसिद्ध.कडवे आणि मर्मभेदी.असे का तर,ज्येसूटचे तत्त्वज्ञान म्हणजे पवित्रतेचे तत्त्वज्ञान.अत्यंत उच्च चांगल्या गोष्टीसाठी प्रसंगी नरसंहार झाला तरी तो मान्य.कारण ज्याचा शेवट पवित्र त्याचे सगळेच मार्गही शुचितेचे.जे पी मॉर्गन हाही ज्येसूटच.त्याचा पगारी नोकर असणारा कप्तान स्मिथ सुद्धा ज्येसूट.या ज्येसूट लोकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते मालकाची आज्ञा शतश: पाळणारे.त्यांचा मालक म्हणजे त्यांचा परमेश्वरच.या पंथाची शिकवणच अशी.तर आपल्या कप्तान स्मिथचा ज्येसूट मालक - गुरु म्हणजे फ्रान्सिस ब्राऊनी.हा आयर्लंडचा अगदी सुप्रसिद्ध हार्डकोर,दादा ज्येसूट.

बोटीवर अनेक आयरिश इटालियन आणि फ्रेंच माणसे होती.मुख्य म्हणजे,जिथे बोट बांधली गेली त्या बेलफास्टच्या प्रोटेस्टंटना तर या प्रवासाच्या निमित्ताने अमेरिकेला स्थलांतरित होण्याची दुर्मीळ ऑफरही जाहीर झालेली.


दिनांक २ एप्रिल १९१२


साडेतीन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असणारे एक आलिशान आणि तरंगते गाव पाण्यात सोडण्यात आले.दिवसाला तब्बल ६१० टन कोळसा जाळून तोपर्यंत कधीही तयार झाली नाही,अशी प्रचंड वाफ तयार करणारी ही महाकाय बोट नजरेच्या एका टप्प्यात मावणार नाही आणि मावली तरी काय पाहिले हे पट्कन सांगता येणार नाही,इतकी अवाढव्य होती.हिची लांबी होती ८८२ फूट आणि वजन तब्बल ४६,००० टन. हिचे नाव होते आर. एम. एस. टायटॅनिक !


दिनांक १२ एप्रिल १९१२


टायटॅनिक निघाली.डेकवरच्या सुबक पॉलिश केलेल्या चकचकीत फळ्या काढण्यात आल्या आणि साधारण पंचवीस मैलापर्यंत ऐकू जाईल असा एक आकाशातल्या ढगांना धडकी भरविणारा,खणखणीत भोंगा या बोटीने दिला, तेव्हा जाणारे आणि मागे राहिलेले सगळेच आयुष्यातला एखादा अविश्वसनीय, अविस्मरणीय प्रसंग पाहत असल्यासारखे गहिवरून गेले.निरोपाचे हात व्याकुळ होऊन थरथरत होते तर डेकवर उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या भाग्यवान प्रवाशांचे हात मात्र एकमेकात घट्ट गुंफलेले.भोंगा वाजताच टायटॅनिकवर घाईघाईने पोचला,तो आपला हार्डकोर ज्येसूट फ्रान्सिस ब्राऊन हा गृहस्थ लगबगीने बोटीवर चढला.त्याने त्या बोटीकडे डोळे भरून पहिले. तिच्यावरची देखणी आणि पारणे फेडणारी श्रीमंती नजरेत सामावली.तिचे फोटो काढले. बोटीवरच्या प्रवाशांचे आणि वेगवेगळ्या मजल्यांचे सुद्धा एका

पाठोपाठ बरेच फोटोग्राफ्स काढले.तो एडवर्ड स्मिथकडे गेला.कदाचित कप्तानाला त्याच्या ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची जाणीवसुद्धा करून दिली असणार. हे सगळे अतिशय चटपटीतपणे करीत हा माणूस, दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आयर्लंडच्या क्वीन्सलंड बंदरात सगळ्यांचा हृद्य निरोप घेऊन उतरला आणि काही क्षणात बोट करड्या लाटांवर झेपावली.बोटीवरच्या लोकांचे दिवसभराचे रुटीन उत्साहाने सुरू होते.


१४ एप्रिल १९९२ ( रात्र) १५ एप्रिल (पहाट)


टायटॅनिकवर रात्र झालेली.एक दमलेली, प्रवासाच्या तृप्तीचे उसासे टाकणारी,रेंगाळलेली रात्र.क्वचित कुठेतरी तिच्या एलिगंट कार्डक्लबमध्ये पत्ते खेळणारे आणि रंगीबेरंगी दबक्या प्रकाशासोबत प्रत्येक घोट सावकाश जिभेवर घोळवत दारू पिणारे काही जण रेंगाळत होते.

अनेकांना आता या शाही प्रवासाची सवय होत आलेली.

त्यामुळे सगळ्याच खोल्यातून विझणाऱ्या दिव्यांसोबत निजानीज झालेली.टायटॅनिक आता न्यूफौंडलंडच्या जवळपास ७०० किलोमीटर दक्षिणेला, अटलांटिकच्या लहरी लाटांवर डुलत होती. समुद्रावरची दमट हवा आता झरझर थंड होत चालली होती.खालचा करडा समुद्र एखाद्या तळ्यासारखा अत्यंत शांत,स्तब्ध.समुद्राचा निर्मम पडदा.डोळ्यात काजळ ओतावे असा काळभोर आणि त्यावर मात्र चांदणखडीची विशाल चादर असावी तसे ताऱ्यांनी खचाखच भरलेलं रत्नजडित आकाश.

अटलांटिकच्या लहरी लाटांवरचा तोच तो थंडगार होणारा हलका वारा. त्या निर्मम निसर्गाच्या जल आणि आकाश या दोन मूलतत्त्वात एखाद्या मंद ताऱ्याप्रमाणे, कालगती

सारखी सरकणारी टायटॅनिक !


बेल वाजली आणि बोटीवर पाळी बदलली.ऑफिसर बदलले.पहारा करणाऱ्या ऑफिसरकडे मात्र बायनॉक्युलर्स नव्हते. इन्फ्रारेड तंत्र,सोनार,ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि रडार या सगळ्यांचाच शोध अजून लागायचा होता.सारे कसे शांत आणि मंद असताना अचानक वॉचटॉवरवरच्या ऑफिसरच्या नजरेला एक मोठा काळसर खंड पडला. "ओ माय गॉड!" तो जवळपास किंचाळला.थरथरत त्याने चेकपोस्ट असणारी फोनची वायर खेचली.अधीरपणे तो पलीकडून फोन उचलण्याची वाट पाहू लागला.साधारण तीन-चार दीर्घ रिंगनंतर फोनवर आलेल्या पलीकडच्या माणसाला त्याने त्या बर्फखंडावरील नजर न हलवत ह्याची माहिती दिली. "थँक्स!" ह्या अदबीच्या उद्गारासहित फोन कट झाला. त्याने अस्वस्थ होऊन पुन्हा फोन लावला.परत त्याने सांगितले, "मला खात्री आहे,पुढे प्रचंड आईसबर्ग आहे!" त्याच्या त्या तारस्वराने मग धावपळ सुरू झाली आणि त्याचवेळी अचानक बोटीचा वेग मात्र वाढू लागला.आता तिचा वेग होता २२ नॉट फुल! दुसरीकडे फुल रिव्हर्सच्या ऑर्डर्स दिल्या गेल्या.हे फारच अनाकलनीय होते. आता ती महाकाय बोट वेगात असतानाच वळवायला सुरुवात झाली.टॉवरवरच्या ऑफिसरची बोट वळणे आणि आईसबर्गचे वेगाने कमी होत जाणारे अंतर याची अस्वस्थ मोजदाद सुरू झालेली.

बोटीवर निद्राधीन असणाऱ्या माणसांना अर्थात याची काहीही जाणीव नाही.अनुभवी कप्तान स्मिथला आता हळूहळू अंदाज येऊ लागलेला.अमावस्येची रात्र. आकाशात चंद्राचा पत्ता नाही आणि समोर तब्बल ८० चौरस मैलाचे अवाढव्य आईसफिल्ड. या दृश्यासोबत ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची त्याला आता तीव्र आठवण होऊ लागली असावी.कदाचित कप्तान स्मिथ त्या क्षणांत,आपली सदसदविवेकबुद्धी आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या ज्येसूट गुरूचे आदेश यांच्यात घुसमटला असावा.कारण त्या शेवटच्या तासातल्या त्याच्या


 सूचना अत्यंत अनाकलनीय, विचित्र आणि त्याच्या प्रदीर्घ अनुभवाच्या ठिकऱ्या उडविणाऱ्या होत्या.त्याच्या लक्षात आले,बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नाहीत. कारण? अगम्य...! आयुष्यात प्रथमच त्याने सगळ्यांनी बोट सोडण्याच्या आदेशाचा उच्चार केला.लोक डेकवर जमा होऊ लागले. त्यांना जाणवले काहीतरी भयाण घडते आहे. हळूहळू सगळ्यांच्या डोळ्यांत भीती उमटायला लागली.आकाश आणि पाणी या निसर्गाच्या दोन महाभूतात सापडलेल्या लोकांना आता आपल्या क्षुद्रतेची जाणीव होऊ लागली.सगळेच हवालदिल झालेले असताना एकदम टायटॅनिकचा बँड डेकवर आला आणि त्या मध्यरात्रीच्या गोंधळात,लोकांचे मनोधैर्य टिकविण्या -

साठी त्या बँडचे प्रामाणिक आणि आज्ञाधारक वादक प्राणपणाने आपापल्या वाद्यांवर आनंदाचे सूर वाजवू लागले.वर ताऱ्यांनी पेटलेले आकाश,खाली शांत काळ्या डोहासारखा समुद्र आणि अस्वस्थ विदीर्ण झालेले बोटीवरचे जीवन,या सगळ्यात प्राण फुंकणारे त्या वाद्यांचे सूर यांचा एक वेगळाच ऑर्केस्ट्रा आता अटलांटिकच्या लाटांवर सजू लागला होता.इतक्या सुसज्ज आणि आलिशान बोटीवर पुरेशा लाईफ बोट नव्हत्या हे कसे पटावे?आता सगळ्यांना भविष्य कळून चुकले होते. कप्तान स्मिथने स्वत: जाऊन स्ट्रेस कॉल पाठवला.

इशाऱ्यासाठी बाहेर फेकण्यात येणारे प्रकाशझोत (डिस्ट्रेस रॉकेटस्) सुरू झाले,पण ते रंगीबेरंगी होते. अशावेळी ते झोत फक्त लाल रंगाचेच असायला हवे असतात.लाल रंग म्हणजे धोक्याचे निशाण,पण ते रंगीबेरंगी असल्याने त्यातल्या त्यात जवळ असणारी बोट कॅलिफोर्नियाला (California) हे धोक्याचे इशारे आहेत,हे कळलेच नाही.बोटीवर मोठी पार्टी चालू असावी असा समज करून घेत ती पुन्हा दूरवर निघून गेली. ( घातसूत्र,दीपक करंजीकर, ग्रंथाली प्रकाशन )


टायटॅनिकवरील लोकांना वाचवू शकेल अशी अजून एक बोट कार्पाथिया (Carpathia) ५८ मैल म्हणजे चार तासांवर होती.तिने आपण येत असल्याचा संदेश पाठवला खरा,पण अथांग समुद्रावर केस पांढरे झालेल्या स्मिथला माहीत होते की,तोपर्यंत सारे संपलेले असेल.आता बोटीची विचित्र हालचाल सुरू झाली.त्या प्रचंड हेलकाव्यांनी अजस्त्र बॉयलर कोसळून पडले. आता लोकांची धावपळ टिपेला पोचली होती. कुठूनशी दैवानेच आर्त आणि दीर्घ हाक मारल्यासारखी एक अतिप्रचंड लाट उसळली आणि तिने एक वरचे उरले सुरले सगळे एका तडाख्यात पुसून टाकले.


अपूर्ण.. उर्वरीत लेखाचा दुसरा भाग ०५.१०.२३ या लेखामध्ये…

१/१०/२३

खवल्या मांजर एक गोष्ट.. Yellow cat is one thing..

एके दिवशी रात्री उशिरा वाकड पोलिस चौकीतून फोन आला,'एक विचित्र प्राणी आमच्या चौकीत शिरलाय ! आम्ही त्याला दार बंद करून कोंडलं आहे.' मी आमचा स्वयंसेवक मित्र डॉ.अमित कामतला फोन लावला.अमित हा त्या वेळी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रात (गायनॅकालॉजी) पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता.गेल्या दोन तीन वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून तो रोजच पार्कवर येत होता. तो लगेचच गाडी घेऊन आला आणि पंधरा वीस मिनिटात आम्ही पोलीस चौकी गाठली.आत जाऊन बघतो,तर इन्स्पेक्टरच्या टेबलाखाली एक खवल्या मांजर शरीराची गुंडाळी करून बसलं होतं.गंमत म्हणजे सगळा पोलिस स्टाफ त्या प्राण्याला घाबरून चौकीच्या बाहेर थांबला होता.मी खुणावल्यावर अमित ते मुटकुळं उचलून मांडीवर घेऊन बसला. 'रेस्क्यू फॉर्म' भरण्यासाठी पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पार्कला यायला सांगून आम्ही त्या खवल्या मांजरासह पार्कवर आलो.


खवल्या मांजर हा एक अद्भुत सस्तन प्राणी आहे.

इंग्रजीमध्ये या प्राण्याला 'मँगोलिन' म्हणतात.मराठी भाषेतल्या नावात मांजर असलं तरी त्याचा मांजराशी काही संबंध नाही.हा प्राणी आकाराने मुंगसापेक्षा थोडासा मोठा असतो, दिसतोही थोडाफार तसाच.त्याच्या संपूर्ण अंगावर एकमेकांवर रचल्यासारखे कठीण खवले असतात.त्रिकोणी आणि चपटे.प्रत्येक खवला म्हणजे खरंतर केसांचा एक पुंजकाच. खवल्यांच्या मधल्या भागात आणि पोटाच्या बाजूला तुरळक राठ केसही असतात.त्याच्या जवळपास कोणी फिरकलं तर नाराज होऊन तो हलकासा फुत्कार टाकतो.कोणी स्पर्श केला तर मात्र लाजून मुटकुळं करून बसतो. त्याच्या तोंडात दात नसतात.त्याची जीभ एखाद्या चिकट वादीसारखी असते.

धोक्याची चाहूल लागून त्याने एकदा का शेपटी पोटाकडून डोक्याकडे वळवून शरीराचा फुटबॉल केला की कितीही ताकद लावली तरी तो उघडता येत नाही.त्यामुळे शत्रू दातांनी आणि नख्यांनी त्याला काहीही इजा करू शकत नाही.त्याला चावण्याचा आणि ओरखडण्याचा प्रयत्न करून कटाळून शत्रू निघून जातो.खवल्या मांजराची नखं खूप लांब आणि तीक्ष्ण असतात.त्यांचा वापर करून ते जमिनीमध्ये माती खोदन बिळं करतात.बिळं कसली,चार ते आठ फूट लांबीच्या छोट्याशा गुहाच असतात त्या! मुंग्या आणि वाळवी हे त्यांचं मुख्य खाद्य.त्यांच्या वारुळावर खवल्या मांजर धाड टाकतं.भराभरा वारूळ उकरत असताना बंद तोंडातल्या फटीतून त्याच्या जिभेची आत-बाहेर हालचाल होत असते. वारुळातल्या मुंग्या आणि वाळवी जिभेला चिकटून त्याच्या पोटात जातात.

त्याच्या पोटातली रसायनं हे खाद्य सहज पचवू शकतात.

खवले मांजर झाडावर चढण्यातही तरबेज असतं.आपल्या

तीक्ष्ण नख्या झाडाच्या खोडावर रोवून ते झाडावर चढतं.

ताकदवान शेपटी झाडाच्या फांदीला आवळून शरीराचा भार तोलून वर चढतं आणि तिथे राहणाऱ्या किडा-मुंग्यांवर डल्ला मारतं.दृष्टी क्षीण असली तरी त्याचं वासाचं ज्ञान अचूक असतं.त्याआधारे ते बरोबर त्याच्या खाद्या

पर्यंत पोहोचतं.दिवसभर स्वतः खणलेल्या घरात मुटकुळं करून झोपा काढतं आणि संध्याकाळी जेवायला घराबाहेर पडतं.


तर मी सांगत होतो आमच्याकडच्या पाहुण्या खवल्या मांजराबद्दल.या प्राण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

रात्री उशिरा हे खवले मांजर पार्कवर आलं आणि सकाळीच वृत्तपत्रांचे छायाचित्रकार त्याचे फोटो काढण्यासाठी येऊन ठेपले.अजून ते पुरतं रुळलंही नव्हतं.

आपण कुठे आलोय याचीही त्याला धड कल्पना नव्हती. त्यामुळे मी छायाचित्रकारांना विनंती करून त्यांना संध्याकाळी यायला सांगितलं.ते गेल्यावर माझे सहकारी नेवाळे यांच्या मदतीने त्या खवले मांजराला उन्हासाठी हिरवळीवर आणून ठेवलं. थोड्याच वेळात डॉ.अमितही त्याची विचारपूस करण्यासाठी येऊन पोहोचला.अमित हा जसा हाडाचा स्वयंसेवक,तसाच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थीही.त्याने रात्रभर जागून खवल्या मांजराच्या खाद्यसवयींचा,त्याला आवश्यक असणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा अभ्यास केला होता.दूध,मध,रताळी आणि कच्च्या अंड्यामधून त्याला आवश्यक असणारी प्रथिनं आणि इतर घटक मिळत असतात.त्यामुळे हे सर्व पदार्थ एकत्र भरडून आणि त्यानंतर विशिष्ट तापमानापर्यंत शिजवून,थंड करून अत्यंत चविष्ट असं 'पॉरिज' (आपल्याकडची लापशी) तयार केलं.ते चाखून पाहण्याचा मोह मला आवरला नाही.मस्तच चव होती त्याची.आमच्या

खवल्या मांजरासमोर ठेवल्यावर एका दीर्घ श्वासाने हुंगून त्यानेही ते चविष्ट पॉरिज जिभेने लपालपा खाऊन टाकल.

पोटभर नाष्टा झाल्यावर आमचा पाहुणा गाढ झोपून गेला.माझे गुरू जेराल्ड ड्युरेल यांनी 'जर्सी वाइल्डलाइफ प्रिझर्वेशन ट्रस्ट'मध्ये प्राणी-पक्षांना संतुलित पोषक आहार मिळण्यासाठी असेच अनेकविध प्रयोग केलेले मी अनुभवले होते.वन्य प्राण्यांना नैसर्गिक वास्तव्यामध्ये मिळणाऱ्या अन्नघटकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रथिनांचा अन् जीवनसत्त्वांचा अभ्यास करून हा भला माणूस त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे पदार्थ तयार करून घ्यायचा.

अगदी केक,पेस्ट्री,पॉरिज आणि पुडिंग्जसुद्धा! अशा नव्या पदार्थाची चव पहिल्यांदा जेराल्ड स्वतः बघत असत,मगच तो प्राणी-पक्ष्यांना दिला जात असते.अमितने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हा नवा प्रयोग यशस्वी केला होता आणि त्यात त्याला यशही आलं.


संध्याकाळच्या सुमारास आमचा पाहुणा झोपेतून उठला.मनसोक्त शीशूचा कार्यक्रम आटोपला आणि तो इकडे-तिकडे पळू लागला.संध्याकाळी त्याला घेऊन वारुळ शोधायला जायचं असं आम्ही ठरवलं होतं.

त्यासाठी नेवाळे त्याला उचलायला गेला,तर लगेच त्याने स्वतःचा फुटबॉल करून घेतला.तो फुटबॉल मांडीवर घेऊन नेवाळे माझ्या शेजारी गाडीत बसला.आम्ही थेट हिंजवडी गाठलं.त्या वेळी आयटी पार्कमधल्या कंपन्यांच्या बांधकामांना सुरुवात झाली होती,पण तरीही तिथे अजून समृद्ध असं माळरान शाबूत होतं.बाभळीची आणि हिवराची झाडंही शिल्लक होती.त्या झाडांच्या खोडालगत लाल,काळ्या आणि पांढऱ्या मुंग्यांची थोडीफार वारुळ होती.त्यांच्यापाशी आम्ही खवल्या मांजराला मोकळं सोडलं.जराही वेळ न दवडता त्याने एका वारुळावर हल्ला चढवला.पुढच्या पायाने तो भराभर वारूळ उकरायला लागला. चामड्याच्या वादीसारखी त्याची लवचिक जीभ आत बाहेर होऊ लागली.मुंडकं आत खुपसून त्याने हजारो मुंग्या चापल्या असाव्यात.त्याची भूक भागली असावी.

अर्ध्या तासानंतर तो गुमान माघारी आमच्याजवळ आला.आम्ही पार्कला परतलो आणि जेवून झोपलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाष्ट्याला लापशी. दुपारी झोप झाल्यावर कालच्यासारखाच 'नेचर वॉक' झाला. दरम्यान,त्याच्या रीहायड्रेशनसाठी आम्ही मध आणि पाण्याचं मिश्रण करून त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं.आवश्यकतेनुसार आपल्या लांबुळक्या जिभेने तो ते चाटून घेत होता.दरम्यान,या खवल्या मांजराला निसर्गात पुन्हा मुक्त करण्यासाठी मी वन विभागाकडे अर्ज

करून ठेवला होता.पाच दिवसांनी त्याला परवानगी मिळाली;पण तोपर्यंत या विचित्र प्राण्याला सांभाळण्याची,

त्याचा जवळून अभ्यास करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं नशीब..! (सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन )


त्याला रात्रीच्या वेळी निसर्गात सोडावं असं ठरलं.

आमच्याबरोबर वन विभागाचे कर्मचारीही येणार होते.

जाण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा लापशीची ट्रीट दिली,मध-पाणी पाजलं.एका भक्कम लाकडी पेटीत ब्लँकेट अंथरून त्याचा फुटबॉल त्यात ठेवला.त्याला हिंजवडीच्या मागे माणच्या जंगलात सोडायचं ठरवलं होतं.तो याच परिसरात सापडला होता.या परिसरात खवले मांजरं आढळतात असं कानावरही आलं होतं आणि तोही तिथूनच केवळ अनवधानाने वाट चुकून आमच्याकडे आला होता.त्यामुळे त्या भागात त्याला त्याची आप्त

मंडळी भेटण्याची शक्यता बरीच होती.


माणला पोचल्यावर एक टेकडी चढून वर गेलो.एव्हाना रात्र झाली होती.वेळ न दवडता आम्ही हलकेच त्याला पेटीबाहेर काढून जमिनीवर ठेवलं आणि दूर जाऊन उभे राहिलो.खवल्या मांजराने स्वतःहून मुटकुळं सोडवलं.
परिसर हुंगून घेतला.

एकदाच आमच्या दिशेने पाहिलं आणि शांतपणे आमचा निरोप घेऊन ते माळरानावर मार्गस्थ झालं.

२९/९/२३

विस्मरणात गेलेला भूसंशोधक लुडविग लीकहार्ट…The forgotten geologist Ludwig Leichhardt..

१९ व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भूभागाचा शोध घेणारा साहसवीर आणि २१व्या शतकात त्याच्या शोधमोहिमेचा माग काढणारी त्याची पणती.भटकी वृत्ती आणि साहसाची ओढ लुडविग लीकहार्ट आणि कॅरी विल्यमसन यांच्या रक्तातच होती.त्यांची ही झपाटून टाकणारी गोष्ट.


 ऑस्ट्रेलिया या भूखंडाचं अंतरंग शोधण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात लुडविग लीकहार्ट हे नाव अग्रणी आहे.लुडविगचा जन्म प्रशियात झाला.एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली.त्याच वातावरणामध्ये लुडविग वाढला.बर्लिन आणि गॉर्टिजेन विद्यापीठांमध्ये त्याने निसर्गशास्त्राचा अभ्यास केला.याच काळात त्याने निसर्गाचा परिचय व्हावा म्हणून इंग्लंड,फ्रान्स,स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये क्षेत्र अभ्यासासाठी भटकंती केली.त्या काळात नवनवे भूभाग बघून तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीशा चमत्कारिक वाटणाऱ्या नैसर्गिक गोष्टी जगापुढे आणायच्या,असा एक पायंडाच युरोपीयन निसर्गशास्त्रज्ञां

मध्ये रूढ होत होता.याला गमतीने 'शास्त्रीय प्रवासज्वर' (सायंटिफिक ट्रॅव्हल फीवर) असं म्हटलं जात असे.

लुडविगलाही याची बाधा झाली होती.त्याच उद्देशाने तो १८४२ मध्ये ऑस्ट्रेलियात गेला.या ठिकाणी नवे शोध लावून शास्त्रीय जगतात आपलं नाव अमर करावं,असा त्याचा विचार होता.लुडविग ऑस्ट्रेलियात पोहोचला त्या वेळी वसाहतकारांनी ऑस्ट्रेलियात पाय ठेवून जेमतेम ५० वर्षं होत होती.त्या काळात ऑस्ट्रेलियाच्या केवळ वायव्य भागात गोऱ्यांच्या तुरळक वसाहती होत्या.त्या भागाचे नकाशे उपलब्ध असले तरी त्यांत बऱ्याच उणिवा होत्या.

त्या भूभागाचे बरेच बारकावे नकाशांत अजून भरलेच गेलेले नव्हते.कारण ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जाण्याचं धाडस कुणी अजून करत नव्हतं.उत्तर ऑस्ट्रेलियाचा बराच भूभाग तसा अज्ञातच होता.अज्ञाताचा शोध घ्यायचा निश्चय केलेल्या लुडविगला ही सुवर्णसंधी वाटत होती.


त्या काळातली ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यावरची सर्वांत मोठी वस्ती म्हणजे पोर्ट एसिंग्टन.तिथे जायचं तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असा सागरी मार्ग तेवढा उपलब्ध होता.(पुढे पोर्ट एसिंग्टनच्या पश्चिमेस डार्विन नगर वसलं आणि पोर्ट एसिंग्टनचं महत्त्व कमी झालं.पूर्व आशियाशी संपर्क साधणार प्रमुख ठाणं म्हणून डार्विन नगराला 'पूर्वेकडची खिडकी' हे विशेषण लाभलं.) लुडविगने जमिनीवरून पोर्ट एसिंग्टनपर्यंतचा प्रवास करण्याचं ठरवलं.पूर्व किनाऱ्यावरच्या ब्रिस्बेनहून सुरुवात करून १५ महिन्यांनी,डिसेंबर १८४५ मध्ये तो पोर्ट एसिंग्टनला पोहोचला.(आता हाच प्रवास विमानाने ५ ते ६ तासांत आटोपतो.) असा प्रवास पार पाडणारा तो पहिला मनुष्य होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन भूसंशोधकांमध्ये त्याचं नाव अमर झालं.त्याचा हा पराक्रम खरोखरच अद्भुत मानावा लागतो.लुडविगने या मोहिमेत एकूण ४८२७ कि.मी.चं अंतर पार केलं.त्यापैकी बहुतेक भूभाग यापूर्वी कुठल्याही गोऱ्या व्यक्तीने बघितलेला नव्हता.या प्रवासात त्याने सर्वप्रथम काही नद्यांची स्थाननिश्चिती केली.त्यामुळे त्या नव्यानेच ऑस्ट्रेलियाच्या नकाशावर दिसू लागल्या.

अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींचीही नोंद अशीच नव्याने करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियाविषयीच्या शास्त्रीय ज्ञानात भर पडली.(त्यांतील काही प्राणी आणि वनस्पती आता पुन्हा जगासमोर येत आहेत.)


ही मोहीम यशस्वी होण्यास लुडविग लीकहार्टचे नेतृत्वगुण कारणीभूत ठरले होते.त्याने या मोहिमेत अन्न म्हणून स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचा काही प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न केला.हे प्रयोग काही वेळा फसले,तर काही वेळा यशस्वी झाले.यशस्वी झालेल्या प्रयोगांमुळे मोहिमेत अन्न वाहून नेण्याचे परिश्रम कमी प्रमाणात करावे लागले.दुसरं म्हणजे याआधी ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात गेलेल्या बहुतेक सर्व मोहिमांना 'स्कव्हीं' या विकाराने पिडलं होतं.हा विकार 'सी' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.लुडविगच्या मोहिमेत मात्र कुणालाही हा त्रास झाला नाही. आणखी एका गोष्टीमुळे लीकहार्टच्या मोहिमेचं महत्त्व ठळकपणे समोर येतं.या मोहिमेनंतर बरोबर एक वर्षाने ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांनी सर्व साधनसामग्रीनिशी अशीच एक मोहीम हाती घेतली होती;पण ही मोहीम लीकहार्टच्या मोहिमेने पार केलेल्या अंतराच्या निम्मं अंतरही पूर्ण करू शकली नाही.


लीकहार्ट या मोहिमेवरून परतला तेव्हा सिडनी शहरात त्याचं भव्य स्वागत झालं.लोकांच्या या उत्साहाचा फायदा घेऊन त्याने लगेचच पुढची मोहीम जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरून निघून पश्चिम किनारा गाठायचा,अशी ती मोहीम होती;पण आजारपण, अशक्तपणा,वावटळी पाऊस,गांधीलमाश्या आणि वाळवंटी माश्यांच्या हल्ल्यांमुळे झालेला त्रास यांच्या एकत्रित परिणामामुळे ८०० मैलांच्या (सुमारे १३०० कि.मी.) प्रवासानंतर दक्षिण क्वीन्सलंडमध्ये पोहोचल्या

वर ही मोहीम आवरती घेतली गेली.


या मोहिमेच्या अपयशातून सावरल्यानंतर सुमारे वर्षभराने लुडविगने एक नवी मोहीम जाहीर केली.ही मोहीम ४ एप्रिल १८४८ रोजी दक्षिण क्वीन्सलंडमधील माउंट ॲबंडन्सच्या दिशेने निघाली.मात्र लुडविगसह या मोहिमेतली सर्व सात माणसं,५० बैल आणि २० खेचरं मध्येच कुठे तरी चक्क नाहीशी झाली.त्यांचे किंवा त्यांच्या सामानाचे कुठलेही अवशेष नंतर कुणालाही सापडले नाहीत.आजतागायत अनेक आधुनिक तंत्रांचा वापर करून या मोहिमेतील काही अवशेष सापडतात का याचा शोध घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.त्या मोहिमेचं नक्की काय झालं हे अजूनही एक न उलगडलेलं कोडंच आहे.


आजवर लीकहार्टसारखे अनेक भूसंशोधक असेच नव्या भूभागांचा शोध घेताना नाहीसे झाले आहेत.त्यांतल्या काहींची नावं भूसंशोधनाच्या इतिहासात अजरामर झाली असली तरी इतर अनेक वीर अज्ञातच राहिले आहेत.

कित्येकांची तर चित्रं अथवा फोटोही आज उपलब्ध नाहीत,पण त्यांच्यामुळे पृथ्वीविषयीच्या भौगोलिक ज्ञानात भर पडली हे विसरून चालणार नाही.


लुडविग लीकहार्टच्या ऑस्ट्रेलियातील मोहिमांची पुढे त्याच्या घरात कायम आठवण काढली जात असे.कॅरी विल्यमसन आणि तिचा भाऊ बेन ही लुडविगच्या भावाच्या नातीची मुलं.ती उत्तर अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमध्ये मोठी झाली. त्यांची आईदेखील अत्यंत अभिमानाने त्यांना लुडविगच्या पराक्रमांच्या हकीगती सांगायची. ऑस्ट्रेलियाच्या रासवट भूपदेशातल्या त्याच्या मोहिमा,त्याचं गायब होणं,अशा अनेक गोष्टींबद्दल ती बोलत असे.त्या काळात कॅरी आणि बेन,दोघं आपण ऑस्ट्रेलियात जाऊन आपल्या या चुलत आजोबांचा शोध घेत आहोत, अशी स्वप्नं बघायचे.त्या काळात ऑस्ट्रेलियाबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती.त्यांना शिकवल्या गेलेल्या जगाच्या भूगोलात उत्तर अमेरिकी भूखंड आणि ध्रुवीय प्रदेश सोडले तर त्या पलीकडच्या जगाचा केवळ ओझरता उल्लेख तेवढा होता.त्यामुळे या भावंडांचं ऑस्ट्रेलियाबद्दलचं ज्ञान तसं अत्यल्पच होतं. त्यामुळे त्यांची स्वप्नं प्रत्यक्षात येणं तसं अवघडच होतं.पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.


कॅरी साहसी सहलींना जाणाऱ्या व्यक्तींना सल्ला देण्याचा व्यवसाय करत असे.अशाच साहसवीरांच्या ऑस्ट्रेलियन सहलीचं व्यवस्थापन करण्यासाठी ती एप्रिल १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियात गेली.काम पूर्ण झाल्यावर ती तिथेच राहिली आणि तिने 'अंकल लुडविग 'संबंधीची माहिती गोळा करण्याचा उद्योग सुरू केला.न्यू साऊथ वेल्सच्या शासकीय ग्रंथालयात अंकल लुडविगची अनेक कागदपत्रं होती,हे त्याशोधात तिला समजलं.त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी तशी असंख्य कागदपत्रं,पुस्तकं आणि खूप मोठा पत्रव्यवहार कॅरीला दाखवला. त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे आणखी एक स्त्री आली आणि तिने कॅरीला आपलं लुडविगशी नातं असल्याचं सांगितलं.आता त्या दोघींचा संवाद सुरू झाला.त्या स्त्रीच्या नवऱ्याचे पणजोबाही लुडविगच्या भावंडांपैकी एक असल्याने कॅरी आणि ती एकमेकींच्या नात्यातल्या निघाल्या.त्या स्त्रीने कॅरीला लुडविगसंबंधी बरीच खरी आणि काही ऐकीव माहितीही दिली.त्याचबरोबर लुडविगच्या घराण्याच्या जर्मनीतल्या लीकहार्ट शाखेचीही माहिती तिने कॅरीला दिली.कॅरी अमेरिकेत व्हर्जिनियातील अलेक्झांड्रिया या आपल्या गावी परतली.या प्रवासातच तिने निश्चय केला,की आपण एक मोहीम काढायची आणि लुडविग लीकहार्टच्या मोहिमेच्या मार्गावरून प्रवास करायचा.असा प्रवास केला तर आपल्या या पणजोबांचं काय झालं हे कदाचित कळू शकेल,असं तिला वाटू लागलं.या मोहिमेबद्दल ती म्हणते- 'खरं तर हे सर्व करावं अशी कुणी माझ्यावर सक्ती केलेली नव्हती;पण ही कल्पना माझ्या डोक्यातून जात नव्हती.कदाचित हे माझ्या हातून घडावं असं नियतीच्या मनात असावं. '


या मोहिमेचा विचार पक्का झाल्यावर कॅरी एक महिन्यासाठी सिडनीमध्ये आली.सोबत तिचा भाऊ बेनही होता.तिने आता या मोहिमेची तयारी करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केलं.हे संशोधन पूर्ण झाल्यावर तिने ठरवलं,की लुडविग पणजोबांच्या १८४४-४५ सालच्या मोहिमेच्या मार्गांचं अनुकरण करायचं,कारण त्या मोहिमेमुळे लीकहार्टचं नाव गाजलं होतं.शिवाय याच मोहिमेमध्ये त्याच्या अंताची बीजंही रोवली गेली होती.

कॅरीला या मोहिमेसाठी सहा आठवडे रजा मिळाली होती.तिला स्वतःचाच पैसा वापरून ही मोहीम पूर्ण करायची होती.यामुळे या मोहिमेवर खूप मर्यादा आल्या होत्या;पण हाती असलेला वेळ आणि उपलब्ध पैसा यांचा वापर करून लुडविगने जिथे जिथे पडाव टाकला अशा जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली.त्याचबरोबर प्रत्येक पडावाच्या आजूबाजूच्या भूप्रदेशाची पाहणी करायची,असंही तिने ठरवलं.लीकहार्टच्या नोंदींचा अर्थ लावायला अशा भटकंतीचा आणि निरीक्षणांचा उपयोग होईल असं तिला वाटत होतं.या मोहिमेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आकडा हळूहळू वाढत कॅरीच्या आवाक्याबाहेर चालला होता.तेव्हा तिने प्रायोजक शोधायचे ठरवले.यापूर्वी तिने कुठल्याही कारणासाठी प्रायोजकत्व मिळवायचे प्रयत्न केले नव्हते. मोठ्या आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांपर्यंत कसं पोहोचायचं याची तिला अजिबात कल्पना नव्हती.


मात्र,तिच्या काही कलाकार मित्रांनी आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी यापूर्वी कुठल्या ना कुठल्या मोठ्या कंपनीच्या प्रायोजकत्वाचा लाभ मिळवला होता.शिवाय कॅरी स्वतः आठ वर्ष अशा प्रकारच्या साहसपूर्ण सहलींचं आयोजन करत होती.त्या मित्र-मैत्रिणींच्या सूचनांचा आणि आपल्या सहलींच्या आयोजन अनुभवाचा फायदा तिला झाला.तिची चिकाटी कामाला आली.ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक परिसरामध्ये सहली काढणारी सर्वात मोठी सहल आयोजक कंपनी 'न्यूमन्स पॅसिफिक'ने तिच्या साहसी सफरीचा सर्व खर्च आणि संयोजन यांचा भार उचलला.नोटबुक कॉम्प्युटर्स या कंपनीने तिला एक लॅपटॉप दिला,तर स्टेशन ट्रेल्व्ह या नभोवाणीने तिला 'उपग्रही भ्रमणध्वनी' पुरवला. यामुळे कॅरी आणि बेन सातत्याने जगाच्या संपर्कात राहू शकत होतेच,पण ते जे काही पाहत होते त्या सर्व गोष्टींच्या अंकीय प्रतिमाही जगाला दिसणार होत्या.


कॅरीला डार्विनस्थित रिक मरे नावाच्या माहितगार व्यक्तीची ओळख करून घेण्यास सांगण्यात आलं.हा रिक मरे प्रवाशांच्या छोट्या गटांना ऑस्ट्रेलियातील वाळवंटाचं आणि इतर दुर्गम प्रदेशांचं दर्शन घडवून आणण्याचा व्यवसाय करत होता.कॅरीची भेट झाल्यावर तिचं म्हणणं त्याने ऐकून घेतलं,तिच्या गरजा लक्षात घेतल्या आणि मोहिमेच्या नियोजनाची चर्चा करून त्याने आखणीची सुरुवात केली.सर्वप्रथम त्याने टेड टोबिन या तज्ज्ञ मार्गदर्शकाला या मोहिमेत सामील करून घेतलं.त्यानंतर टिम डॅनिएल या माजी सैनिकी अधिकाऱ्याला क्वीन्सलंडमधील प्रवासाचं नेतृत्व करायची विनंती केली.

टिम डॅनिएल हा ऑस्ट्रेलियाच्या 'आऊट बॅक' म्हणजे निर्जन प्रदेशात जगायचं कसं याबाबतचा तज्ज्ञ होता.

टोबिन आणि डॅनिएल हे ऑस्ट्रेलियातील वाळवंटी सहलींचे अग्रणी मार्गदर्शक मानले जातात.


कॅरीप्रमाणेच लुडविग लीकहार्टनेही खासगी प्रायोजकत्व मिळवलं होतं.त्याने आधी ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांच्याकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केलेला होता; पण ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भागाचं सर्वेक्षण खासगी मोहिमेने करावं,हे सर मिचेल यांना मान्य झालं नव्हतं.लुडविगला आर्थिक मदत पुरवणाऱ्यांच्यात प्रामुख्याने त्या प्रदेशातले 'रांचर्स' होते.लीकहार्टला नवी कुरणं सापडली तर आपल्या पशुधनात वाढ होईल आणि आपल्या गुरे चराईच्या व्यवसायाचा विस्तार करणं शक्य होईल असं त्यांना वाटत होतं.


कॅरी,बेन, टेड आणि टिम यांच्या 'लीकहार्ट शोध मोहिमे'ची सुरुवात ४ सप्टेंबर २००० या दिवशी सुरू झाली.

लीकहार्टप्रमाणेच त्यांनी क्वीन्सलंडच्या दक्षिण भागातील डार्लिंग डाऊन या भागातून सुरुवात केली.लीकहार्टच्या काळात या भागात झुडपंच झुडपं होती. त्यांच्या गचपणातून मार्ग काढत त्याचा प्रवास सुरु झाला होता. मधल्या काळात ही झुडपं नाहीशी होऊन त्या जागी गुरे चराई करणाऱ्यांच्या आणि तत्संबंधित व्यावसायिकांच्या छोट्टा छोट्या वस्त्या उभ्या राहिल्या होत्या.


'इथे कॅरीला आश्चर्याचा धक्का बसेल अशी एक घटना घडली.या भागात अनेक छोटे-मोठे 'लीकहार्ट ग्रुप' कार्यरत आहेत.त्यांनी लीकहार्टच्या कहाण्या आणि स्मृती जपून ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.कॅरीची मोहीम आणि तिचं लीकहार्टशी असलेलं नातं याबद्दल समजताच त्यांनी तिचं स्वागत केलं; इतकंच नव्हे,तर तिला हवी ती मदत देण्याचंही कबूल केलं.ज्यांच्या रांचमध्ये लीकहार्टच्या पडावाच्या जागा होत्या ती ती ठिकाणं त्या लोकांनी कॅरीला दाखवली,तिचा यथायोग्य पाहुणचारही केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कॅरीला आपल्या पणजोबांसंबंधी बरीच माहिती मिळाली. ही अशी पिढ्यान् पिढ्या जपून ठेवलेल्या आख्यायिकांमधून मिळणारी माहिती कुठल्याही पुस्तकामधून मिळत नसते.


अशाच एका मुक्कामात कॅरीला जॉन गिल्बर्टची कबर बघायला मिळाली.हा जॉन गिल्बर्ट लुडविग लीकहार्टच्या मोहिमांमधील निसर्गशास्त्रज्ञ होता.कॅरी त्या कबरीचं दर्शन घेत असताना आकाशात एक घार घिरट्या घालत होती. कॅरीने गिल्बर्टची नोंदवही वाचलेली होती.त्यात एका नोंदीत 'इथे घारी फारच त्रास देतात.उघड्यावर खाणं घारींनी अशक्य करून सोडलं आहे.त्या कुठली वस्तू पळवतील याचा नेम नाही,'अशी नोंद केलेली आहे,त्याची या वेळी कॅरीला आठवण झाली.


गिल्बर्ट आदिवासींच्या भाल्यांना बळी पडला होता.

त्यामुळे लीकहार्टच्या मोहिमा आणि त्याचं नेतृत्व यांच्यावर प्रश्नचिन्ह लागलं होतं. लीकहार्टची मोहीम यशस्वी झाली खरी,पण ती बऱ्याच अडथळ्यांमधून पार पडली होती. मोहिमेत सुरुवातीला दहा सदस्य सामील झाले होते.त्यांतले दोघं लवकरच मोहीम सोडून निघून गेले.गिल्बर्टचं निधन झालं.त्याच हल्ल्यामध्ये आणखी दोघं गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान,मोहीम अर्ध्यावर असतानाच त्यांनी बरोबर घेतलेलं अन्न संपलं.

पोर्ट एसिंग्टनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागेल याबद्दलचा लीकहार्टचा अंदाज साफ चुकला. याला अनेक कारणं असली,तरी इथला अवघड भूभाग पार करण्यात असलेल्या अडचणी हे त्यांतलं प्रमुख कारण होतं.एकदा एक नदी ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे मोहिमेतले बरेच घोडे वाहून गेले होते;बरीच शिधासामग्रीही वाहून गेली होती.अलीकडच्या बऱ्याच इतिहासकारांनी ही कारणं विचारात न घेता लीकहार्टला 'आगाऊ, गर्विष्ठ आणि चुका न सुधारणारा' ठरवलं आहे. लीकहार्ट आपल्या सहकाऱ्यांच्या जिवावर मोठा बनला,

असंही म्हणण्यात आलं आहे.( हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन )


लुडविग लीकहार्टच्या विरोधात लोकमत का गेलं असावं,या प्रश्नाचा कॅरीने खोलात शिरून अभ्यास केला त्या वेळी एक वेगळीच वस्तुस्थिती समोर आली.

ऑस्ट्रेलियात त्या वेळी इंग्रजी बोलणाऱ्यांचं वर्चस्व होतं.लुडविग जर्मन होता. त्याचं इंग्रजीवर म्हणावं तितकं प्रभुत्व नव्हतं. यामुळे त्याच्या मोहिमेतील इतर सदस्यांशी त्याचा भाषिक मेळ बसू शकत नव्हता. त्यात तो उच्चशिक्षित होता;तर त्याच्या मोहिमेत एक कैदी, एक पंधरा वर्षांचा मुलगा आणि एक अशिक्षित मेंढपाळ होता.

त्यांच्याशी संवाद साधणं लीकहार्टला अवघड गेलं.तो अतिशय शिस्तप्रियही होता.त्यामुळेही त्याचे इतर सदस्यांशी खटके उडाले असावेत.पण याची उणीव त्याने आपल्या नोंदी आणि रोजनिशी लेखनातून भरून काढलेली दिसते.ज्यांनी ज्यांनी त्या लेखनाचा अभ्यास केला त्यांना त्या काळात लीकहार्टने जे मिळवलं,ज्या अवघड परिस्थितीला त्याने तोंड दिलं त्याचं कौतुकच वाटतं.कॅरी विल्यमसनने या प्रवासानंतर तिच्या शोध

मोहिमेवर एक पुस्तक लिहिलं असून,आता ती तिच्या चुलत पणजोबांच्या मोहिमेवर माहितीपट करते आहे.

लीकहार्टच्या अखेरच्या मोहिमेवर त्यातून प्रकाश टाकता येईल असं तिला वाटतं.लीकहार्टच्या प्रवासाच्या खुणा जतन करून ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियातील चाहतेही मदत करत आहेत हे विशेष...

२७/९/२३

जॉर्ज फॉक्स युध्द - प्रतिकारी.. George Fox - War-fighter

या विक्षिप्त व्यक्तीविषयी क्रॉम्वेलला कुतूहल वाटले.

त्याची जिज्ञासा जागृत झाली.त्याने फॉक्सला बोलावले.

सकाळी सहाच्या सुमारास क्रॉम्वेलसमोर त्याला आणण्यात आले.क्रॉम्वेल अंथरुणात होता.त्याचा पोशाख अर्धवट होता.क्वेकर जॉर्ज फॉक्स आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे म्हणाला,"या घराला शांती लाभो..! " क्रॉम्वेलने प्रत्याभिवादन केले.पण तसे करताना त्याने जरा स्मित केले.ते दोघे धर्म,राजकारण,लढाया यांवर बोलले. प्रत्येकाला दुसऱ्याच्या सहानुभूतीविषयी,सूक्ष्म दृष्टीविषयी व विचारशक्तीविषयी आदर वाटत होता,आश्चर्यही वाटत होते. दोघेही क्रांतिकारक होते.मानवामानवांत अधिक मोकळेपणाचे, शहाणपणाचे आणि मित्रभावाचे संबंध असावेत, असे दोघांनाही मनापासून वाटत होते.दोघांचेही ध्येय एकच होते;पण दोघांच्या कार्यपद्धतीत व साधनांत दोन ध्रुवांचा फरक होता.जगात न्यायबुद्धी यावी म्हणून क्रॉम्वेल डोकी उडवीत होता.तर सर्वांच्या हृदयात करुणा व भूतदया यांचा उद्भाव व्हावा म्हणून फॉक्स धडपडत होता.क्वेकर - पंथाचा पुढारी जॉर्ज फॉक्स हासुद्धा एक क्रॉम्वेलच होता.पण आपल्या देशबांधवांचे रक्त सांडण्याचा गुन्हा त्याने कधीही केला नाही.


फॉक्स जाण्यास निघाला,तेव्हा क्रॉम्वेलने त्याचा हात धरून सजल दृष्टीने त्याच्याकडे पाहून म्हटले,"पुन्हा एकदा माझ्या घरी ये.आपण रोज तासभर एकत्र बसल्यास दोघेही परस्परांच्या अधिक जवळ येऊ.मी आपल्या स्वतःच्या आत्म्याचे वाईट चिंतणार नाही." तद्वतच तुमचेही वाईट चिंतणार नाही.तेव्हा फॉक्स शून्यपणे एवढेच म्हणाला,"तू माझे अशुभ चिंतशील तर तू स्वतःच्या आत्म्याचीच हानी करून घेशील." आणि पुन्हा शेवटी म्हणाला, "तू आपले हृदय कठोर होऊ देऊ नको.मी गेल्यावर पुन्हा तुझे हृदय निर्भय होईल,जप." आणि तो चांभार ऋषी त्या हुकूमशहाला सोडून गेला.


क्रॉम्वेल क्केकरचा उपदेश विसरला.त्याच्या घरात तर कधी शांती नांदलीच नाही.पण त्याची हाडेही थडग्यात सुखाने राहू दिली गेली नाहीत. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा राजेशाही सुरू झाल्यावर वेस्ट मिन्स्टर अ‍ॅबेमधून त्याचे थडगे उकरून त्याचा देह बाहेर काढण्यात आला व त्याला फाशी देण्यात आले.नंतर छिन्नविछिन्न करून तो देह एका कुंभाराच्या शेतात फेकून देण्यात आला.जो क्रॉम्वेल तलवारीच्या जोरावर स्वतःला कीर्ती व स्वतःच्या राष्ट्राला स्वातंत्र्य आणू पाहत होता,त्याच्या जीवनाची शेवटची इतिश्री अशा प्रकारे लिहिली गेली.त्याची क्रांती त्याच्या मृत्यूबरोबरच अस्तास गेली.पण जॉर्ज फॉक्सने सुरू केलेली अहिंसक क्रांती अद्यापि आहे. एवढेच नव्हे;तर ती जगभर अधिकाधिक दृढतेने व तेजाने पसरत आहे.


दुसरा चार्लस गादीवर आला.क्रॉम्वेलच्या कारकिर्दीत क्वेकर मंडळींवर रिपब्लिकविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्यांच्यावर राजाविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला.विद्यार्थी,धर्मोपदेशक, मेरी,इंग्लंडचे मॅजिस्ट्रेट साऱ्यांनाच क्वेकरांचा छळ म्हणजे गंमत वाटत असे.एकदा तर पंधरा हजार क्वेकर तुरुंगात होते.त्यातील पुष्कळ जण तुरुंगातच मेले.तथापि,त्यांचे छळकही त्यांना जरा भीत असत.क्वेकरांविषयी त्यांना जरा काहीतरी गूढ वाटे.क्वेकर अत्याचाराची परतफेड मधुर वाणीने करीत.अपमानाला स्मिताने उत्तर देत. त्यामुळे हे श्रेष्ठ अशा जगात राहणारे जादूगार आहे असे केव्हा केव्हा वाटे.एकदा फॉक्सला अटक झाली तेव्हा तो उडून जाऊ नये म्हणून चिमणीच्या धुराड्याजवळही एक रखवालदार ठेवण्यात आला होता.फॉक्सवर देखरेख करणारे सैनिक त्याचे धैर्य,त्याचे व्यक्तिमत्त्व व त्याचे विभूतिमत्त्व पाहून दिपून जात.ते त्याला म्हणत, "तुम्ही आमच्या पलटणीत सामील व्हाल तर आम्ही तुम्हाला कॅप्टन करू." फॉक्सने शिपाई व्हावे म्हणून त्या शिपायांनी पराकाष्ठा केली.पण त्यांना यश येण्याऐवजी त्यांच्या - 

तल्याच पुष्कळांवर त्यांच्या पंथाचे अहिंसक सैनिक बनण्याची पाळी आली.


१६६९ सालच्या ऑक्टोबरच्या अठराव्या तारखेस त्याने स्वार्थमूर हॉल येथील न्यायाधीश फेल याच्या विधवेशी लग्न केले.तिचे नाव मागरिट फेल.ती आठ मुलांची आई होती.फेल घराण्याशी फॉक्सचा सतरा वर्षांचा संबंध होता. मागरिट मित्रसंघाची सभासद होती.क्वेकर लोक तुरुंगात होते तेव्हा ती त्यांच्यासाठी रदबदली करी.एकदोनदा तर ती स्वतः त्याच्यासाठी तुरुंगात गेली होती.ती उच्च कुळात जन्मली होती.ती सुंदर व सुसंस्कृत होती.जे जे काम ती हाती घेई,त्यात त्यात तिला यशच येई.ती मनात आणती,

तर समाजात श्रेष्ठ पदवी व राजदरबारांत सत्कार मिळवू शकली असती.पण बहिष्कृत जॉर्ज फॉक्सची संगती लाभावी म्हणून तिने या सर्व गोष्टींवर लाथ मारली.क्वेकर लोकांसाठी तिने मानसन्मान व सुखोपभोग दूर लोटले. फॉक्सशी लग्न करतेवेळी तिचे वय पंचावन्न वर्षांचे होते.

फॉक्स सेहेचाळीस वर्षांचा होता.हे दांपत्य तुरुंगात नसे,

तेव्हा दोघेही शांततेचा संदेश देत सगळीकडे हिंडत असत.

एकमेकांना एकमेकांच्या संगतीत फारसे राहता येत नसे. त्यांच्या बावीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात फार फार तर पाच वर्षे ती दोघे एकत्र राहिली असतील.पण दोघांमध्ये कोमल व गाढ प्रेम होते. त्यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे.

दोघेही परस्परांना पत्रात प्रथम परस्परांचे कुशल विचारतात.फॉक्सने स्वत:साठी एक गरम कोट विकत घ्यावा म्हणून त्याच्या पत्नीने पाठवलेले पैसे एके दिवशी त्याला मिळाले.पण त्या पैशांचे त्याने एक नारिंगी रंगाचे कापड खरेदी करून त्याचा मागरिटकरता एक लांब झगा शिवविला व म्हटले, 'मला कोटाची जरुरी आहे.पण मागरिटला झग्याची अधिक जरुरी आहे.' कधीकधी तो थकल्यासारखा दिसे तेव्हा ती त्याला म्हणायची, "पुरे आता हिंडणे-फिरणे. स्वार्थमूरला घरी येऊन राहा.विश्रांती घे." पण दूर करायला अन्याय शिल्लक असेपर्यंत फॉक्सला विसावा कोठला ? अमेरिकेत केकरांचा छळ होत असल्याचे फॉक्सच्या कानांवर आले, तेव्हा इंडस्ट्री नावाच्या एका फुटक्या जहाजात बसून तो अमेरिकेत जाण्यास निघाला. खलाशी व उतारू गलबतांतील पाणी पंप करून सारखे बाहेर काढीत होते.गलबत बुडू नये रात्रंदिवस सुरू असे.म्हणून हा जलोत्सर्गप्रकार वारा व पाणी यांपासून धोका होता,तसाच समुद्रावरच्या चाच्यांपासूनही होता.पुष्कळ दिवस बार्बरी येथील चाचे त्यांच्या गलबताचा पाठलाग करीत होते.पण 'इंडस्ट्री' कशीतरी निभावली व साठ दिवसांनंतर ब्रिटिश वेस्ट इंडिजमधील बार्बोडास येथे येऊन लागली.


प्रवासात फॉक्सला संधिवात व ताप यांचा आजार जडला.अमेरिकेत उतरल्यावरही या रोगाने तो आजारी होताच.पण तो शारीरिक दुःखाकडे लक्ष देत नसे.

आजारपण त्याला एक किरकोळ बाब वाटत असे.तो आपले काम सारखे करी.पण शेवटी गळून जाई.

गलबतांतून उतरताच त्याने वेस्ट इंडीजमधल्या क्वेकर संस्थेत व्यवस्थितपणा आणला.त्याने निग्रो गुलामांना स्वातंत्र्य दिल्याचे जाहीर केले.. १६७१मध्ये जॉर्ज फॉक्सचे म्हणणे जर अमेरिका ऐकती,तर अमेरिकेत १८६१ साली अमेरिकेमधील आपसांतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जे युद्ध झाले ते झालेच नसते. वेस्ट इंडिज बेटांतून तो अमेरिकेत गेला.अमेरिकन वसाहतीत त्याच्या येण्याची फार आवश्यकता होती.ह्या नवीन खंडात जणू प्रॉटेस्टंटांचीच सत्ता होती.हे खंड प्रॉटेस्टंटांना निर्धोक करता करता क्वेकरांना मात्र ते धोक्याचे झाले.


मॅसाच्युसेट्स वसाहतीचा गव्हर्नर एन्डिकॉम याच्या परवानगीशिवाय चार क्वेकरांनी बोस्टन येथे पाऊल टाकले म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.त्यांची नावे वुइल्यम रॉबिन्सन, मार्मड्यूक रॉबिन्सन,वुइल्यम लेड्रा व मेरी डायर. याच बोस्टन शहरात क्वेकरांना दूध देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.डोव्हर गावी तीन क्वेकर बायांना गाडीपाठीमागे बांधून बर्फातून ओढत फरफटत नेण्याची सजा देण्यात आली होती.आणखी नऊ गावांनाही अशीच शिक्षा फर्मावण्यात आली होती. "या भटक्या क्केकरांना पकडा... त्यांच्या पाठीवर दहा- दहा फटके मारा." असे हुकूम त्या शहराच्या सुटले होते.या हुकमांवर राइट ऑनरेबल रिचर्ड वाल्डेन याची सही होती.अंमलबजावणी करण्याचे काम रेव्हरेंड रेनॉर याच्याकडे होते. एका गावच्या पोलिसांनी फटके मारून त्यांना पुढच्या गावच्या पोलिसांच्या ताब्यात द्यायचे व आपल्या वसाहतींमधून त्यांची पीडा घालवून घायची.


अमेरिकेतील प्यूरिटनांची हृदये विरघळण्याचे कामी फॉक्सला फारसे यश आले नाही.पण क्वेकरांची हृदये मजबूत व अविकंप करण्यात त्याला यश लाभले.

'बलवंतांसमोर निर्भय राहा व दुबळ्यांसमोर दयेने वागा.'असे त्याने आपल्या अनुयायांच्या मनावर अत्यंत उत्कृष्टपणे बिंबवले. क्वेकर शरण गेल्याचे उदाहरण इतिहासात नाहीं. त्याचप्रमाणे शरण येण्यासाठी त्यांनीही कोणावर कधी सक्ती केली नाही.पेनसिल्व्हानियात क्वेकरांचे प्रभुत्व पाऊणशे वर्षे होते.पण तेवढ्या काळात क्वेकरांकडून एकही इंडियन कधी फसवला गेला नाही की कत्तल केला गेला नाही.


फॉक्स अमेरिकेतून परत आल्यावर धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत इंग्लंडमध्ये फिरत राहिला.जगात सर्वत्र शांतीचे साम्राज्य स्थापा, असे तो शिकवत असे.मरणाआधी चार वर्षे म्हणजे १६८७ साली त्याच्या प्रयत्नांना निम्मे यश आले.दुसऱ्या जेम्सने धर्माच्या बाबतीत भाषणस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य देणारा कायदा पास केला.पण जागतिक शांततेची उरलेली निम्मी लढाई हळूहळू तथापि निश्चितपणे जिंकली जात होती.इतिहासात आपणास प्रथमच युद्धांची जरा लाज वाटू लागली आहे. लष्करी हडेलप्पींवरची श्रद्धा कमी होत चालली आहे.लवकरच एक दिवस असा उजाडेल, की जेव्हा लीस्टरशायरमधील हा अशिक्षित चर्मकार मानवजातीच्या थोर शिक्षकांपैकी एक म्हणून सर्वत्र गौरविला जाईल.


२५.९.२३ या लेखातील शेवटचा भाग..

२५/९/२३

युध्द - प्रतिकारी जॉर्ज फॉक्स.. War-fighter George Fox


इंग्लंडमधील लीस्टरशायर परगण्यातल्या एका खेडेगावात तो वेडा माणूस राहत असे.तो एका चांभाराजवळ उमेदवार म्हणून होता.पण १६४३ च्या जुलै महिन्यात मूसा,येशू,बुद्ध यांच्याप्रमाणे तो फकीर होऊन सत्य

शोधनार्थ बाहेर पडला.या साहसी सत्यशोधकाचे नाव जॉर्ज फॉक्स.त्याची जीवनात निराशा झाली होती.

सभोवतालचे जीवन पाहून तो दुःखी होई.आपण या जगातले नाही असेच जणू त्याला पदोपदी वाटे.या जगातील पशुता व हालअपेष्टा तो समजू शकत नसे.त्या वेळी युरोपात त्रिशतवार्षिक युद्ध जोरात चालू होते.

इंग्लंडात पहिला चार्लस शत्रूंची मुंडकी उडवून ती कुंपणावर लावून ठेवीत होता. 


अखेर पार्लमेंट संतापून राजाच्या मुंडक्यांची मागणी करू लागले.राजकारणाची या लढाईची अजिबात नसणाऱ्यांना घरातून ओढून आणून सक्तीने लढायाला लावण्यात येई.घरी असणाऱ्यांवर अपरंपार कर बसवून त्यांना भिकारी करण्यात येई.वेळच्या वेळी कर न देणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात येई व त्यांच्या घरातले सामान जप्त करण्यात येई.एकदा तर राजाचे हे दूत एका घरात घुसून लहान मुलाचे दूध ठेवलेले भांडे त्यातील दूध ओतून घेऊन गेले. राजे व सेनापती यांच्यापुढे मानवजात मेटाकुटीस आली होती.रोगग्रस्त शरीर हळूहळू मरणाकडे जाते,तद्वत मानवसमाज मरणाकडे जात होता.


वीस वर्षांचा तरुण जॉर्ज जगातल्या या दुःखांवर काही उपाय सापडतो का,हे पाहण्यासाठी आपला धंदा सोडून बाहेर पडला.ईश्वराच्या इच्छेने ज्ञान आपणास आहे.

मानवांना कशाची जरुरी आहे हे आपणास कळते,असा आव आणणाऱ्या धर्मोपदेशकांकडे तो गेला व "माझ्या सत्यशोधनात मला मदत करा." असे त्यांना म्हणाला.पण त्यांनी त्याची टिंगल केली.एक म्हणाला,"लग्न कर म्हणजे सार समजेल." दुसऱ्याने उपदेशिले,"युद्धात जा व युद्धाच्या रणधुमाळीत मनाचा सारा गोंधळ विसरून जा." तिसरा म्हणाला, "मानवजातीच्या चिंतेचा हा तुम्हाला जडलेला रोग बरा होण्यासाठी काही औषध वगैरे घ्या." कोणी सुचविले, 'तंबाखू ओढू लागा!' कोणी म्हटले, 'धार्मिक स्तोत्रे वगैरे म्हणत जा.' जॉर्ज सांगतो,'देवाचे हे जे पाईक,त्यातील एकानेही माझे मन का अशांत आहे ते समजून घेण्याची खटपट केली नाही.ते सारे पोकळ पिशव्या होते.' फॉक्सच्या अनुभवास आले की, सुशिक्षित मनुष्य विचार करणारा असतोच असे नाही.त्या वेळेपासून त्याला नाना भाषा बोलणाऱ्या सुशिक्षित पढतमूर्खाबद्दल व पोकळ धर्मप्रचारकांबद्दल सदैव तिरस्कार वाटे.


चार वर्षे तो स्वतःच्याच मनात विचार करीत होता आणि स्वतःच्या मनाला त्रास देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले.जगातील दुःखांची मुख्यतः तीन कारणे आहेत असे त्याला दिसले.


१. ख्रिश्चन राष्ट्रांना ख्रिश्चन धर्माविषयी काही कळत नव्हते...


२. स्वतःला पुढारी म्हणविणारे फार अहंमन्य असतात,या पुढाऱ्यांच्या पाठोपाठ जाणारे फारच नेभळट असतात..


. जगातील निर्दय युद्धांमुळे मानवजात जणू मरणाच्या पंथाला लागली आहे.ही तीन कारणे शोधून या जगात प्रचार करण्यासाठी,युद्धप्रिय जगाला शांतीचे मार्ग दाखविण्यासाठी तो बाहेर पडला.त्याची आमरण प्रचारयात्रा सुरू झाली. त्याने पाऊस,बर्फ व वारा यांपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी कातड्याची एक कोट-पाटलोण शिवली व रुंद कडांची एक टोपी तयार करून घेतली आणि निघाला.हा यात्रेकरू ! 


'सॉर्टर रिसॉटर्स्' या ग्रंथात कार्लाईल म्हणतो, 'अर्वाचीन इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध व लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वॉटर्लूची. ऑस्टरलिट्झची किंवा आणखी कुठली लढाई नव्हे;तर पुष्कळशा इतिहासकारांनी उल्लेखही न केलेली आणि टिंगल करण्यासाठीच काहींनी उल्लेख केलेली गोष्ट होय.सर्वांनी ती लक्षात ठेवण्या -

सारखी आहे.ती म्हणजे जॉर्ज फॉक्सने आपल्या यात्रेसाठी शिवलेला कातडी सूट,तो क्वेकर पंथाचा आद्य संस्थापक होता.त्याचा धंदा चांभाराचा होता.या विश्वाची दैवी कल्पना ज्यांना आविर्भूत होते.अशांपैकी तो एक होता.काहींना या विश्वाची दिव्यता अधिक उदात्त स्वरूपात दिसते.काहींना जरा कमी उदात्त स्वरूपात दिसते,तर कोणाकोणाला अधिक विशुद्ध स्वरूपात दिसते.ते काहीही असो,जॉर्ज त्यांपैकी एक होता.

ज्यांच्यासमोर विश्वाचे सत्यस्वरूप आविर्भूत होते.त्यांना प्रॉफेट्स,पैगंबर या ईश्वरी वृत्तीने रंगलेले अवलिये असे म्हणतात.जॉर्ज फॉक्सचे लिस्टरशायरमधले चांभाराचे दुकान पोपांच्या प्रासादांपेक्षाही अधिक पवित्र होते.'हे थोर जॉर्ज फॉक्स,शीव,तुझा तो कातड्याचा सूट शीव त्या कोटाला जो जो टांका तू घालीत जाशील.तो तो गुलामगिरीच्या हृदयालाच जाऊन पोहोचेल,धनपूजा व ऐहिकाची पूजा यांच्या हृदयात घुसेल.तुझे हे काम संपले म्हणजे युरोपात एक मुक्त पुरुष दिसेल,एक खरा स्वतंत्र पुरुष दिसेल आणि तो म्हणजे तूच.'


कातड्याच्या सुटातील या शांतिदूताला कधीकधी शेतातील गवताच्या गंजीजवळ निजावे लागे. तुरुंगातल्या थंडगार जमिनीवर,दमट व ओलसर जागेत कित्येक वर्षे त्याला सक्तीने निजायला लावण्यात आले.असा हा जॉर्ज फॉक्स जगातील अत्यंत आश्चर्यकारक अशा सैन्याचा सेनापती होता.'शांतीसाठी झगडणारी अहिंसेने लढणारी सेना!'


जॉर्ज फॉक्सच्या काळातले क्वेकर म्हणजे स्वातंत्र्यार्थ लढणारे वीर शिरोमणी होत.हे सर्वांत शूर असे स्वातंत्र्य

सैनिक धर्मप्रांतातले अराजकवादी होते.धर्माच्या बाबतीत ते कोणाचीही सत्ता मानीत नसत.सतराव्या शतकातल्या या अहिंसक प्रतिकारांनी शत्रूच्या रक्ताचा एकही थेंब न सांडता दीर्घकालपर्यंत लढाई चालविली व अखेर या शांततावीरांनी विजय मिळविला.


जॉर्ज फॉक्स प्रचारार्थ बाहेर पडल्याला आता सहा वर्षे झाली होती.या सहा वर्षांत त्याला साठ निष्ठावंत स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले.ख्रिश्चनांना खरा धर्म देण्यासाठी त्याचा प्रचार सारखा सुरू होता.दोनच वर्षांत साठांचे पन्नास हजार अनुयायी झाले.ते आपणास 'प्रकाशबाळे' किंवा 'मित्रसंघ' म्हणवीत.पण पुढे त्यांना केकर हे नाव मिळाले.एका विरोधकाने म्हटले, "प्रभूचे नाव उच्चारताच कापू लागावे,असे हा आपल्या अनुयायांना सांगतो." क्वेक होतो,अर्थात कापतो तो केकर.


लोकांची अशी समजूत आहे की,क्वेकर भितुरडे असतात.

शांतीचा प्रचार करणाऱ्या दुबळ्यांचा हा संघ झगडण्याची भीती वाटत असल्यामुळे हे जीवनात प्रत्यक्ष भाग घेण्याला भितात.पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे.

क्वेकरांचा इतिहास हा जगातील अत्यंत रोमहर्षक इतिहास होय.जॉर्ज फॉक्स व कायदा न मानणारे त्याचे सैनिक प्रत्यक्ष क्रियात्मक प्रतिकारांचे पुरस्कर्ते होते.ते मवाळ किंवा क्रियाशून्य प्रतिकाराचे पुरस्कर्ते नव्हते.सर्व प्रकारच्या अन्यायाशी,वाईट गोष्टींशी झगडण्याचा उपदेश ते निर्भयपणे करीत.ते प्रथम चढाई करीत व शत्रूच्या गोटाला जाऊन भिडत.उपवास,कैद,अत्याचार,मरण, कशाचीही त्यांना भीती वाटत नसे.ते राजासमोरही कधी टोपी काढीत नसत.राजांच्या डामडौलाचा त्यांना तिटकारा वाटे.सर्व गुलामांना मुक्त करा असे ते जगातील गुलामांच्या धन्यांना सांगत,धर्मोंपदेशकांच्या उद्धटपणाबद्दल त्यांची हजेरी घेत.अन्याय करणाऱ्या न्यायाधीशांची कानउघडणी करीत,युद्ध सुरू असताना सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगायला ते कचरत नसत.


तो एकदा 'तुम्ही माणुसकी दाखवा.दया व प्रेम दाखवा, माणसांसारखे वागा.' असा उपदेश करीत असता एकाने त्याच्या तोंडावर ठोसा मारला,तरी फक्त तोंड पुसून फॉक्सने आपले प्रवचन पुढे चालू केले.त्याने उलट कधीही मारले नाही.स्वतःच्या लढाया लढण्याचे त्याच्या

जवळचे अधिक प्रभावी हत्यार म्हणजे बुद्धी.न्याय्य गोष्ट पटवून देण्याची तो पराकाष्ठा करी.एकदा तर त्याला गुंडांनी खाली पाडून लाथांखाली इतके तुडवले की,शेवटी तो मूच्छित झाला.पण शुद्धीवर येताच उभा राहून व हात पसरून तो म्हणाला, "या, मारा. हे बघा माझे हात,हे माझे डोके, हे माझे गाल.हाणा, मारा." तेव्हा एका धर्माळू गवंड्याने आपल्या हातातल्या फिरायच्या वेळी नेण्याच्या काठीने खरोखरच त्याला चांगले झोडपून काढले.या गुंडांवर कायदेशीर इलाज करण्याचा त्याला देण्यात आलेला सल्ला त्याने मानला नाही.तो म्हणे, "माझे काय त्यांच्याशी भांडण आहे का वैयक्तिक हेवा दावा आहे? मी सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.जगाच्या स्वातंत्र्याच्या या विश्वव्यापी लढाईत माझ्या जीवनाची काय मातब्बरी! प्रभूने माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना क्षमा केली असता मी त्याच्या बाबतीत का त्रास घ्यावा ?"


आणि यानंतर तो शांतीचा युद्धविरोधाचा प्रचार सर्वत्र करू लागल्यामुळे त्याला तुरुंगात घालण्यात आले.तेव्हापासून त्याचे सारे आयुष्य तुरुंग व प्रचार यातच विभागले गेले.

तुरुंगातून सुटताच प्रचार की पुन्हा तुरुंगवास असे सारखे सुरू होते.मानवावर प्रेम करण्याच्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा मिळाली.तो ज्या कोठडीत होता,तिचे वर्णन त्याने पुढीलप्रमाणे केले आहे.


'मला उंच टॉवरमध्ये ठेवण्यात आले होते. दुसऱ्या कैद्यांच्या कोठड्यांतला सारा धूर तिथे येई.धुक्याप्रमाणे दाट येणारा तो धूर जणू भिंतींवर चिकटून बसे.तीन कुलपांच्या आत मला कोंडण्यात येत असे.धूर फार झाला,तरी वरचा एखादा दरवाजा उघडण्यासाठीही दुय्यम जेलर येत नसे.आपण धुरात गुदमरून जाऊ असेच जणू त्याला वाटत असावे.शिवाय माझ्या अंथरुणावर गळतही असे.कधी बाहेर थंडी असे, कधी पाऊस पडत असे.गळू नये म्हणून व्यवस्था करावयाला मी गेलो की माझा सदरा भिजून ओलाचिंब होऊन जाई.सर्व हिवाळा पडून राहण्यात गेला.थंडीने मी गारठून जात असे. माझी उपासमारही होत असे.माझ्या शरीराला सूज आली.

अवयव बधिर होऊन गेले!'


आयुष्याचा बराचसा भाग जॉर्ज फॉक्सला अशा प्रकारच्या तुरुंगात काढावा लागला.पापभीरू व ईश्वरभीरू इंग्रज लोक कैद्यांपैक्षा आपल्या कुत्र्यांचीच अधिक काळजी घेत.जॉर्ज फॉक्सची मुक्तता होणे शक्य नसल्यास त्याच्या

ऐवजी तुरुंगात पडून आपलं स्वातंत्र्य गमावण्यास किती

तरी क्वेकरबंधू तयार होते.(मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी) पण मॅजिस्ट्रेट व जेलर जॉर्जला भयंकर माणूस मानीत.जगात शांती असावी असे तो म्हणे, म्हणूनच शांतीला त्याचा धोका होता असे मानून ते त्याला तुरुंगात ठेवू इच्छित.त्यालानास्तिक,पाखंडी,ठक,

देशद्रोही म्हणण्यात येई.दंडे मारून त्याच्या डोक्यातले शांतीचे विचार ते काढून टाकू पाहत.त्याचा शांतीचा रोग गेला असे वाटून त्याला मुक्त करण्यात आले की लगेच त्याचा शांततेचा प्रचार पूर्ववत पुन्हा सुरू होई.माणसे वाईट नसतात.ती स्वभावतः चांगली असतात. इत्यादी कल्पनांचा प्रचार त्याने सुरू केला की पुन्हा त्याला तुरुंगात अडकवीत.असा हा धरसोडीचा खेळ सारखा चालला होता.जॉर्जचे शरीर दणकट होते.तरीही त्याची प्रकृती शेवटी तुरुंगात बिघडलीच.पण तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याचे शरीर मारले,तरी त्यांना त्याचे मन मारता आले नाही.इंग्लंडमधील कारागृहाच्या घाणीत व अंधारात मानवी स्वातंत्र्याच्या ध्येयाचे बी फुलले.


ऑलिव्हर क्रॉम्बेल इंग्लंडचा हुकूमशहा होता.तेव्हा सरकारविरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून फॉक्सला पकडण्यात आले.या आरोपाला उत्तर म्हणून फॉक्सने क्रॉम्बेलला एक पत्र पाठवले. त्यात तो लिहितो, "ईश्वरसाक्ष,मी अशी घोषणा केली आहे की,मी कोणाही मानवाविरुद्ध कधीही शस्त्र उचलणार नाही.तुमच्याविरुद्ध किंवा कोणाच्याही विरुद्ध कोणतेही पाशवी शस्त्र मी उचलणार नाही.ईश्वराने सर्व हिंसेच्याविरुद्ध साक्षी म्हणून मला पाठवले आहे.लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मला पाठवण्यात आले आहे.लढाया व लढायांची कारणे यांपासून मानवांना परावृत्त करून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणे हे माझे जीवितकार्य आहे."