इंग्लंडमधील लीस्टरशायर परगण्यातल्या एका खेडेगावात तो वेडा माणूस राहत असे.तो एका चांभाराजवळ उमेदवार म्हणून होता.पण १६४३ च्या जुलै महिन्यात मूसा,येशू,बुद्ध यांच्याप्रमाणे तो फकीर होऊन सत्य
शोधनार्थ बाहेर पडला.या साहसी सत्यशोधकाचे नाव जॉर्ज फॉक्स.त्याची जीवनात निराशा झाली होती.
सभोवतालचे जीवन पाहून तो दुःखी होई.आपण या जगातले नाही असेच जणू त्याला पदोपदी वाटे.या जगातील पशुता व हालअपेष्टा तो समजू शकत नसे.त्या वेळी युरोपात त्रिशतवार्षिक युद्ध जोरात चालू होते.
इंग्लंडात पहिला चार्लस शत्रूंची मुंडकी उडवून ती कुंपणावर लावून ठेवीत होता.
अखेर पार्लमेंट संतापून राजाच्या मुंडक्यांची मागणी करू लागले.राजकारणाची या लढाईची अजिबात नसणाऱ्यांना घरातून ओढून आणून सक्तीने लढायाला लावण्यात येई.घरी असणाऱ्यांवर अपरंपार कर बसवून त्यांना भिकारी करण्यात येई.वेळच्या वेळी कर न देणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात येई व त्यांच्या घरातले सामान जप्त करण्यात येई.एकदा तर राजाचे हे दूत एका घरात घुसून लहान मुलाचे दूध ठेवलेले भांडे त्यातील दूध ओतून घेऊन गेले. राजे व सेनापती यांच्यापुढे मानवजात मेटाकुटीस आली होती.रोगग्रस्त शरीर हळूहळू मरणाकडे जाते,तद्वत मानवसमाज मरणाकडे जात होता.
वीस वर्षांचा तरुण जॉर्ज जगातल्या या दुःखांवर काही उपाय सापडतो का,हे पाहण्यासाठी आपला धंदा सोडून बाहेर पडला.ईश्वराच्या इच्छेने ज्ञान आपणास आहे.
मानवांना कशाची जरुरी आहे हे आपणास कळते,असा आव आणणाऱ्या धर्मोपदेशकांकडे तो गेला व "माझ्या सत्यशोधनात मला मदत करा." असे त्यांना म्हणाला.पण त्यांनी त्याची टिंगल केली.एक म्हणाला,"लग्न कर म्हणजे सार समजेल." दुसऱ्याने उपदेशिले,"युद्धात जा व युद्धाच्या रणधुमाळीत मनाचा सारा गोंधळ विसरून जा." तिसरा म्हणाला, "मानवजातीच्या चिंतेचा हा तुम्हाला जडलेला रोग बरा होण्यासाठी काही औषध वगैरे घ्या." कोणी सुचविले, 'तंबाखू ओढू लागा!' कोणी म्हटले, 'धार्मिक स्तोत्रे वगैरे म्हणत जा.' जॉर्ज सांगतो,'देवाचे हे जे पाईक,त्यातील एकानेही माझे मन का अशांत आहे ते समजून घेण्याची खटपट केली नाही.ते सारे पोकळ पिशव्या होते.' फॉक्सच्या अनुभवास आले की, सुशिक्षित मनुष्य विचार करणारा असतोच असे नाही.त्या वेळेपासून त्याला नाना भाषा बोलणाऱ्या सुशिक्षित पढतमूर्खाबद्दल व पोकळ धर्मप्रचारकांबद्दल सदैव तिरस्कार वाटे.
चार वर्षे तो स्वतःच्याच मनात विचार करीत होता आणि स्वतःच्या मनाला त्रास देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले.जगातील दुःखांची मुख्यतः तीन कारणे आहेत असे त्याला दिसले.
१. ख्रिश्चन राष्ट्रांना ख्रिश्चन धर्माविषयी काही कळत नव्हते...
२. स्वतःला पुढारी म्हणविणारे फार अहंमन्य असतात,या पुढाऱ्यांच्या पाठोपाठ जाणारे फारच नेभळट असतात..
३. जगातील निर्दय युद्धांमुळे मानवजात जणू मरणाच्या पंथाला लागली आहे.ही तीन कारणे शोधून या जगात प्रचार करण्यासाठी,युद्धप्रिय जगाला शांतीचे मार्ग दाखविण्यासाठी तो बाहेर पडला.त्याची आमरण प्रचारयात्रा सुरू झाली. त्याने पाऊस,बर्फ व वारा यांपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी कातड्याची एक कोट-पाटलोण शिवली व रुंद कडांची एक टोपी तयार करून घेतली आणि निघाला.हा यात्रेकरू !
'सॉर्टर रिसॉटर्स्' या ग्रंथात कार्लाईल म्हणतो, 'अर्वाचीन इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध व लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वॉटर्लूची. ऑस्टरलिट्झची किंवा आणखी कुठली लढाई नव्हे;तर पुष्कळशा इतिहासकारांनी उल्लेखही न केलेली आणि टिंगल करण्यासाठीच काहींनी उल्लेख केलेली गोष्ट होय.सर्वांनी ती लक्षात ठेवण्या -
सारखी आहे.ती म्हणजे जॉर्ज फॉक्सने आपल्या यात्रेसाठी शिवलेला कातडी सूट,तो क्वेकर पंथाचा आद्य संस्थापक होता.त्याचा धंदा चांभाराचा होता.या विश्वाची दैवी कल्पना ज्यांना आविर्भूत होते.अशांपैकी तो एक होता.काहींना या विश्वाची दिव्यता अधिक उदात्त स्वरूपात दिसते.काहींना जरा कमी उदात्त स्वरूपात दिसते,तर कोणाकोणाला अधिक विशुद्ध स्वरूपात दिसते.ते काहीही असो,जॉर्ज त्यांपैकी एक होता.
ज्यांच्यासमोर विश्वाचे सत्यस्वरूप आविर्भूत होते.त्यांना प्रॉफेट्स,पैगंबर या ईश्वरी वृत्तीने रंगलेले अवलिये असे म्हणतात.जॉर्ज फॉक्सचे लिस्टरशायरमधले चांभाराचे दुकान पोपांच्या प्रासादांपेक्षाही अधिक पवित्र होते.'हे थोर जॉर्ज फॉक्स,शीव,तुझा तो कातड्याचा सूट शीव त्या कोटाला जो जो टांका तू घालीत जाशील.तो तो गुलामगिरीच्या हृदयालाच जाऊन पोहोचेल,धनपूजा व ऐहिकाची पूजा यांच्या हृदयात घुसेल.तुझे हे काम संपले म्हणजे युरोपात एक मुक्त पुरुष दिसेल,एक खरा स्वतंत्र पुरुष दिसेल आणि तो म्हणजे तूच.'
कातड्याच्या सुटातील या शांतिदूताला कधीकधी शेतातील गवताच्या गंजीजवळ निजावे लागे. तुरुंगातल्या थंडगार जमिनीवर,दमट व ओलसर जागेत कित्येक वर्षे त्याला सक्तीने निजायला लावण्यात आले.असा हा जॉर्ज फॉक्स जगातील अत्यंत आश्चर्यकारक अशा सैन्याचा सेनापती होता.'शांतीसाठी झगडणारी अहिंसेने लढणारी सेना!'
जॉर्ज फॉक्सच्या काळातले क्वेकर म्हणजे स्वातंत्र्यार्थ लढणारे वीर शिरोमणी होत.हे सर्वांत शूर असे स्वातंत्र्य
सैनिक धर्मप्रांतातले अराजकवादी होते.धर्माच्या बाबतीत ते कोणाचीही सत्ता मानीत नसत.सतराव्या शतकातल्या या अहिंसक प्रतिकारांनी शत्रूच्या रक्ताचा एकही थेंब न सांडता दीर्घकालपर्यंत लढाई चालविली व अखेर या शांततावीरांनी विजय मिळविला.
जॉर्ज फॉक्स प्रचारार्थ बाहेर पडल्याला आता सहा वर्षे झाली होती.या सहा वर्षांत त्याला साठ निष्ठावंत स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले.ख्रिश्चनांना खरा धर्म देण्यासाठी त्याचा प्रचार सारखा सुरू होता.दोनच वर्षांत साठांचे पन्नास हजार अनुयायी झाले.ते आपणास 'प्रकाशबाळे' किंवा 'मित्रसंघ' म्हणवीत.पण पुढे त्यांना केकर हे नाव मिळाले.एका विरोधकाने म्हटले, "प्रभूचे नाव उच्चारताच कापू लागावे,असे हा आपल्या अनुयायांना सांगतो." क्वेक होतो,अर्थात कापतो तो केकर.
लोकांची अशी समजूत आहे की,क्वेकर भितुरडे असतात.
शांतीचा प्रचार करणाऱ्या दुबळ्यांचा हा संघ झगडण्याची भीती वाटत असल्यामुळे हे जीवनात प्रत्यक्ष भाग घेण्याला भितात.पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे.
क्वेकरांचा इतिहास हा जगातील अत्यंत रोमहर्षक इतिहास होय.जॉर्ज फॉक्स व कायदा न मानणारे त्याचे सैनिक प्रत्यक्ष क्रियात्मक प्रतिकारांचे पुरस्कर्ते होते.ते मवाळ किंवा क्रियाशून्य प्रतिकाराचे पुरस्कर्ते नव्हते.सर्व प्रकारच्या अन्यायाशी,वाईट गोष्टींशी झगडण्याचा उपदेश ते निर्भयपणे करीत.ते प्रथम चढाई करीत व शत्रूच्या गोटाला जाऊन भिडत.उपवास,कैद,अत्याचार,मरण, कशाचीही त्यांना भीती वाटत नसे.ते राजासमोरही कधी टोपी काढीत नसत.राजांच्या डामडौलाचा त्यांना तिटकारा वाटे.सर्व गुलामांना मुक्त करा असे ते जगातील गुलामांच्या धन्यांना सांगत,धर्मोंपदेशकांच्या उद्धटपणाबद्दल त्यांची हजेरी घेत.अन्याय करणाऱ्या न्यायाधीशांची कानउघडणी करीत,युद्ध सुरू असताना सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगायला ते कचरत नसत.
तो एकदा 'तुम्ही माणुसकी दाखवा.दया व प्रेम दाखवा, माणसांसारखे वागा.' असा उपदेश करीत असता एकाने त्याच्या तोंडावर ठोसा मारला,तरी फक्त तोंड पुसून फॉक्सने आपले प्रवचन पुढे चालू केले.त्याने उलट कधीही मारले नाही.स्वतःच्या लढाया लढण्याचे त्याच्या
जवळचे अधिक प्रभावी हत्यार म्हणजे बुद्धी.न्याय्य गोष्ट पटवून देण्याची तो पराकाष्ठा करी.एकदा तर त्याला गुंडांनी खाली पाडून लाथांखाली इतके तुडवले की,शेवटी तो मूच्छित झाला.पण शुद्धीवर येताच उभा राहून व हात पसरून तो म्हणाला, "या, मारा. हे बघा माझे हात,हे माझे डोके, हे माझे गाल.हाणा, मारा." तेव्हा एका धर्माळू गवंड्याने आपल्या हातातल्या फिरायच्या वेळी नेण्याच्या काठीने खरोखरच त्याला चांगले झोडपून काढले.या गुंडांवर कायदेशीर इलाज करण्याचा त्याला देण्यात आलेला सल्ला त्याने मानला नाही.तो म्हणे, "माझे काय त्यांच्याशी भांडण आहे का वैयक्तिक हेवा दावा आहे? मी सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.जगाच्या स्वातंत्र्याच्या या विश्वव्यापी लढाईत माझ्या जीवनाची काय मातब्बरी! प्रभूने माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना क्षमा केली असता मी त्याच्या बाबतीत का त्रास घ्यावा ?"
आणि यानंतर तो शांतीचा युद्धविरोधाचा प्रचार सर्वत्र करू लागल्यामुळे त्याला तुरुंगात घालण्यात आले.तेव्हापासून त्याचे सारे आयुष्य तुरुंग व प्रचार यातच विभागले गेले.
तुरुंगातून सुटताच प्रचार की पुन्हा तुरुंगवास असे सारखे सुरू होते.मानवावर प्रेम करण्याच्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा मिळाली.तो ज्या कोठडीत होता,तिचे वर्णन त्याने पुढीलप्रमाणे केले आहे.
'मला उंच टॉवरमध्ये ठेवण्यात आले होते. दुसऱ्या कैद्यांच्या कोठड्यांतला सारा धूर तिथे येई.धुक्याप्रमाणे दाट येणारा तो धूर जणू भिंतींवर चिकटून बसे.तीन कुलपांच्या आत मला कोंडण्यात येत असे.धूर फार झाला,तरी वरचा एखादा दरवाजा उघडण्यासाठीही दुय्यम जेलर येत नसे.आपण धुरात गुदमरून जाऊ असेच जणू त्याला वाटत असावे.शिवाय माझ्या अंथरुणावर गळतही असे.कधी बाहेर थंडी असे, कधी पाऊस पडत असे.गळू नये म्हणून व्यवस्था करावयाला मी गेलो की माझा सदरा भिजून ओलाचिंब होऊन जाई.सर्व हिवाळा पडून राहण्यात गेला.थंडीने मी गारठून जात असे. माझी उपासमारही होत असे.माझ्या शरीराला सूज आली.
अवयव बधिर होऊन गेले!'
आयुष्याचा बराचसा भाग जॉर्ज फॉक्सला अशा प्रकारच्या तुरुंगात काढावा लागला.पापभीरू व ईश्वरभीरू इंग्रज लोक कैद्यांपैक्षा आपल्या कुत्र्यांचीच अधिक काळजी घेत.जॉर्ज फॉक्सची मुक्तता होणे शक्य नसल्यास त्याच्या
ऐवजी तुरुंगात पडून आपलं स्वातंत्र्य गमावण्यास किती
तरी क्वेकरबंधू तयार होते.(मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी) पण मॅजिस्ट्रेट व जेलर जॉर्जला भयंकर माणूस मानीत.जगात शांती असावी असे तो म्हणे, म्हणूनच शांतीला त्याचा धोका होता असे मानून ते त्याला तुरुंगात ठेवू इच्छित.त्यालानास्तिक,पाखंडी,ठक,
देशद्रोही म्हणण्यात येई.दंडे मारून त्याच्या डोक्यातले शांतीचे विचार ते काढून टाकू पाहत.त्याचा शांतीचा रोग गेला असे वाटून त्याला मुक्त करण्यात आले की लगेच त्याचा शांततेचा प्रचार पूर्ववत पुन्हा सुरू होई.माणसे वाईट नसतात.ती स्वभावतः चांगली असतात. इत्यादी कल्पनांचा प्रचार त्याने सुरू केला की पुन्हा त्याला तुरुंगात अडकवीत.असा हा धरसोडीचा खेळ सारखा चालला होता.जॉर्जचे शरीर दणकट होते.तरीही त्याची प्रकृती शेवटी तुरुंगात बिघडलीच.पण तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याचे शरीर मारले,तरी त्यांना त्याचे मन मारता आले नाही.इंग्लंडमधील कारागृहाच्या घाणीत व अंधारात मानवी स्वातंत्र्याच्या ध्येयाचे बी फुलले.
ऑलिव्हर क्रॉम्बेल इंग्लंडचा हुकूमशहा होता.तेव्हा सरकारविरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून फॉक्सला पकडण्यात आले.या आरोपाला उत्तर म्हणून फॉक्सने क्रॉम्बेलला एक पत्र पाठवले. त्यात तो लिहितो, "ईश्वरसाक्ष,मी अशी घोषणा केली आहे की,मी कोणाही मानवाविरुद्ध कधीही शस्त्र उचलणार नाही.तुमच्याविरुद्ध किंवा कोणाच्याही विरुद्ध कोणतेही पाशवी शस्त्र मी उचलणार नाही.ईश्वराने सर्व हिंसेच्याविरुद्ध साक्षी म्हणून मला पाठवले आहे.लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मला पाठवण्यात आले आहे.लढाया व लढायांची कारणे यांपासून मानवांना परावृत्त करून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणे हे माझे जीवितकार्य आहे."