या विक्षिप्त व्यक्तीविषयी क्रॉम्वेलला कुतूहल वाटले.
त्याची जिज्ञासा जागृत झाली.त्याने फॉक्सला बोलावले.
सकाळी सहाच्या सुमारास क्रॉम्वेलसमोर त्याला आणण्यात आले.क्रॉम्वेल अंथरुणात होता.त्याचा पोशाख अर्धवट होता.क्वेकर जॉर्ज फॉक्स आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे म्हणाला,"या घराला शांती लाभो..! " क्रॉम्वेलने प्रत्याभिवादन केले.पण तसे करताना त्याने जरा स्मित केले.ते दोघे धर्म,राजकारण,लढाया यांवर बोलले. प्रत्येकाला दुसऱ्याच्या सहानुभूतीविषयी,सूक्ष्म दृष्टीविषयी व विचारशक्तीविषयी आदर वाटत होता,आश्चर्यही वाटत होते. दोघेही क्रांतिकारक होते.मानवामानवांत अधिक मोकळेपणाचे, शहाणपणाचे आणि मित्रभावाचे संबंध असावेत, असे दोघांनाही मनापासून वाटत होते.दोघांचेही ध्येय एकच होते;पण दोघांच्या कार्यपद्धतीत व साधनांत दोन ध्रुवांचा फरक होता.जगात न्यायबुद्धी यावी म्हणून क्रॉम्वेल डोकी उडवीत होता.तर सर्वांच्या हृदयात करुणा व भूतदया यांचा उद्भाव व्हावा म्हणून फॉक्स धडपडत होता.क्वेकर - पंथाचा पुढारी जॉर्ज फॉक्स हासुद्धा एक क्रॉम्वेलच होता.पण आपल्या देशबांधवांचे रक्त सांडण्याचा गुन्हा त्याने कधीही केला नाही.
फॉक्स जाण्यास निघाला,तेव्हा क्रॉम्वेलने त्याचा हात धरून सजल दृष्टीने त्याच्याकडे पाहून म्हटले,"पुन्हा एकदा माझ्या घरी ये.आपण रोज तासभर एकत्र बसल्यास दोघेही परस्परांच्या अधिक जवळ येऊ.मी आपल्या स्वतःच्या आत्म्याचे वाईट चिंतणार नाही." तद्वतच तुमचेही वाईट चिंतणार नाही.तेव्हा फॉक्स शून्यपणे एवढेच म्हणाला,"तू माझे अशुभ चिंतशील तर तू स्वतःच्या आत्म्याचीच हानी करून घेशील." आणि पुन्हा शेवटी म्हणाला, "तू आपले हृदय कठोर होऊ देऊ नको.मी गेल्यावर पुन्हा तुझे हृदय निर्भय होईल,जप." आणि तो चांभार ऋषी त्या हुकूमशहाला सोडून गेला.
क्रॉम्वेल क्केकरचा उपदेश विसरला.त्याच्या घरात तर कधी शांती नांदलीच नाही.पण त्याची हाडेही थडग्यात सुखाने राहू दिली गेली नाहीत. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा राजेशाही सुरू झाल्यावर वेस्ट मिन्स्टर अॅबेमधून त्याचे थडगे उकरून त्याचा देह बाहेर काढण्यात आला व त्याला फाशी देण्यात आले.नंतर छिन्नविछिन्न करून तो देह एका कुंभाराच्या शेतात फेकून देण्यात आला.जो क्रॉम्वेल तलवारीच्या जोरावर स्वतःला कीर्ती व स्वतःच्या राष्ट्राला स्वातंत्र्य आणू पाहत होता,त्याच्या जीवनाची शेवटची इतिश्री अशा प्रकारे लिहिली गेली.त्याची क्रांती त्याच्या मृत्यूबरोबरच अस्तास गेली.पण जॉर्ज फॉक्सने सुरू केलेली अहिंसक क्रांती अद्यापि आहे. एवढेच नव्हे;तर ती जगभर अधिकाधिक दृढतेने व तेजाने पसरत आहे.
दुसरा चार्लस गादीवर आला.क्रॉम्वेलच्या कारकिर्दीत क्वेकर मंडळींवर रिपब्लिकविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्यांच्यावर राजाविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला.विद्यार्थी,धर्मोपदेशक, मेरी,इंग्लंडचे मॅजिस्ट्रेट साऱ्यांनाच क्वेकरांचा छळ म्हणजे गंमत वाटत असे.एकदा तर पंधरा हजार क्वेकर तुरुंगात होते.त्यातील पुष्कळ जण तुरुंगातच मेले.तथापि,त्यांचे छळकही त्यांना जरा भीत असत.क्वेकरांविषयी त्यांना जरा काहीतरी गूढ वाटे.क्वेकर अत्याचाराची परतफेड मधुर वाणीने करीत.अपमानाला स्मिताने उत्तर देत. त्यामुळे हे श्रेष्ठ अशा जगात राहणारे जादूगार आहे असे केव्हा केव्हा वाटे.एकदा फॉक्सला अटक झाली तेव्हा तो उडून जाऊ नये म्हणून चिमणीच्या धुराड्याजवळही एक रखवालदार ठेवण्यात आला होता.फॉक्सवर देखरेख करणारे सैनिक त्याचे धैर्य,त्याचे व्यक्तिमत्त्व व त्याचे विभूतिमत्त्व पाहून दिपून जात.ते त्याला म्हणत, "तुम्ही आमच्या पलटणीत सामील व्हाल तर आम्ही तुम्हाला कॅप्टन करू." फॉक्सने शिपाई व्हावे म्हणून त्या शिपायांनी पराकाष्ठा केली.पण त्यांना यश येण्याऐवजी त्यांच्या -
तल्याच पुष्कळांवर त्यांच्या पंथाचे अहिंसक सैनिक बनण्याची पाळी आली.
१६६९ सालच्या ऑक्टोबरच्या अठराव्या तारखेस त्याने स्वार्थमूर हॉल येथील न्यायाधीश फेल याच्या विधवेशी लग्न केले.तिचे नाव मागरिट फेल.ती आठ मुलांची आई होती.फेल घराण्याशी फॉक्सचा सतरा वर्षांचा संबंध होता. मागरिट मित्रसंघाची सभासद होती.क्वेकर लोक तुरुंगात होते तेव्हा ती त्यांच्यासाठी रदबदली करी.एकदोनदा तर ती स्वतः त्याच्यासाठी तुरुंगात गेली होती.ती उच्च कुळात जन्मली होती.ती सुंदर व सुसंस्कृत होती.जे जे काम ती हाती घेई,त्यात त्यात तिला यशच येई.ती मनात आणती,
तर समाजात श्रेष्ठ पदवी व राजदरबारांत सत्कार मिळवू शकली असती.पण बहिष्कृत जॉर्ज फॉक्सची संगती लाभावी म्हणून तिने या सर्व गोष्टींवर लाथ मारली.क्वेकर लोकांसाठी तिने मानसन्मान व सुखोपभोग दूर लोटले. फॉक्सशी लग्न करतेवेळी तिचे वय पंचावन्न वर्षांचे होते.
फॉक्स सेहेचाळीस वर्षांचा होता.हे दांपत्य तुरुंगात नसे,
तेव्हा दोघेही शांततेचा संदेश देत सगळीकडे हिंडत असत.
एकमेकांना एकमेकांच्या संगतीत फारसे राहता येत नसे. त्यांच्या बावीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात फार फार तर पाच वर्षे ती दोघे एकत्र राहिली असतील.पण दोघांमध्ये कोमल व गाढ प्रेम होते. त्यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे.
दोघेही परस्परांना पत्रात प्रथम परस्परांचे कुशल विचारतात.फॉक्सने स्वत:साठी एक गरम कोट विकत घ्यावा म्हणून त्याच्या पत्नीने पाठवलेले पैसे एके दिवशी त्याला मिळाले.पण त्या पैशांचे त्याने एक नारिंगी रंगाचे कापड खरेदी करून त्याचा मागरिटकरता एक लांब झगा शिवविला व म्हटले, 'मला कोटाची जरुरी आहे.पण मागरिटला झग्याची अधिक जरुरी आहे.' कधीकधी तो थकल्यासारखा दिसे तेव्हा ती त्याला म्हणायची, "पुरे आता हिंडणे-फिरणे. स्वार्थमूरला घरी येऊन राहा.विश्रांती घे." पण दूर करायला अन्याय शिल्लक असेपर्यंत फॉक्सला विसावा कोठला ? अमेरिकेत केकरांचा छळ होत असल्याचे फॉक्सच्या कानांवर आले, तेव्हा इंडस्ट्री नावाच्या एका फुटक्या जहाजात बसून तो अमेरिकेत जाण्यास निघाला. खलाशी व उतारू गलबतांतील पाणी पंप करून सारखे बाहेर काढीत होते.गलबत बुडू नये रात्रंदिवस सुरू असे.म्हणून हा जलोत्सर्गप्रकार वारा व पाणी यांपासून धोका होता,तसाच समुद्रावरच्या चाच्यांपासूनही होता.पुष्कळ दिवस बार्बरी येथील चाचे त्यांच्या गलबताचा पाठलाग करीत होते.पण 'इंडस्ट्री' कशीतरी निभावली व साठ दिवसांनंतर ब्रिटिश वेस्ट इंडिजमधील बार्बोडास येथे येऊन लागली.
प्रवासात फॉक्सला संधिवात व ताप यांचा आजार जडला.अमेरिकेत उतरल्यावरही या रोगाने तो आजारी होताच.पण तो शारीरिक दुःखाकडे लक्ष देत नसे.
आजारपण त्याला एक किरकोळ बाब वाटत असे.तो आपले काम सारखे करी.पण शेवटी गळून जाई.
गलबतांतून उतरताच त्याने वेस्ट इंडीजमधल्या क्वेकर संस्थेत व्यवस्थितपणा आणला.त्याने निग्रो गुलामांना स्वातंत्र्य दिल्याचे जाहीर केले.. १६७१मध्ये जॉर्ज फॉक्सचे म्हणणे जर अमेरिका ऐकती,तर अमेरिकेत १८६१ साली अमेरिकेमधील आपसांतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जे युद्ध झाले ते झालेच नसते. वेस्ट इंडिज बेटांतून तो अमेरिकेत गेला.अमेरिकन वसाहतीत त्याच्या येण्याची फार आवश्यकता होती.ह्या नवीन खंडात जणू प्रॉटेस्टंटांचीच सत्ता होती.हे खंड प्रॉटेस्टंटांना निर्धोक करता करता क्वेकरांना मात्र ते धोक्याचे झाले.
मॅसाच्युसेट्स वसाहतीचा गव्हर्नर एन्डिकॉम याच्या परवानगीशिवाय चार क्वेकरांनी बोस्टन येथे पाऊल टाकले म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.त्यांची नावे वुइल्यम रॉबिन्सन, मार्मड्यूक रॉबिन्सन,वुइल्यम लेड्रा व मेरी डायर. याच बोस्टन शहरात क्वेकरांना दूध देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.डोव्हर गावी तीन क्वेकर बायांना गाडीपाठीमागे बांधून बर्फातून ओढत फरफटत नेण्याची सजा देण्यात आली होती.आणखी नऊ गावांनाही अशीच शिक्षा फर्मावण्यात आली होती. "या भटक्या क्केकरांना पकडा... त्यांच्या पाठीवर दहा- दहा फटके मारा." असे हुकूम त्या शहराच्या सुटले होते.या हुकमांवर राइट ऑनरेबल रिचर्ड वाल्डेन याची सही होती.अंमलबजावणी करण्याचे काम रेव्हरेंड रेनॉर याच्याकडे होते. एका गावच्या पोलिसांनी फटके मारून त्यांना पुढच्या गावच्या पोलिसांच्या ताब्यात द्यायचे व आपल्या वसाहतींमधून त्यांची पीडा घालवून घायची.
अमेरिकेतील प्यूरिटनांची हृदये विरघळण्याचे कामी फॉक्सला फारसे यश आले नाही.पण क्वेकरांची हृदये मजबूत व अविकंप करण्यात त्याला यश लाभले.
'बलवंतांसमोर निर्भय राहा व दुबळ्यांसमोर दयेने वागा.'असे त्याने आपल्या अनुयायांच्या मनावर अत्यंत उत्कृष्टपणे बिंबवले. क्वेकर शरण गेल्याचे उदाहरण इतिहासात नाहीं. त्याचप्रमाणे शरण येण्यासाठी त्यांनीही कोणावर कधी सक्ती केली नाही.पेनसिल्व्हानियात क्वेकरांचे प्रभुत्व पाऊणशे वर्षे होते.पण तेवढ्या काळात क्वेकरांकडून एकही इंडियन कधी फसवला गेला नाही की कत्तल केला गेला नाही.
फॉक्स अमेरिकेतून परत आल्यावर धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत इंग्लंडमध्ये फिरत राहिला.जगात सर्वत्र शांतीचे साम्राज्य स्थापा, असे तो शिकवत असे.मरणाआधी चार वर्षे म्हणजे १६८७ साली त्याच्या प्रयत्नांना निम्मे यश आले.दुसऱ्या जेम्सने धर्माच्या बाबतीत भाषणस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य देणारा कायदा पास केला.पण जागतिक शांततेची उरलेली निम्मी लढाई हळूहळू तथापि निश्चितपणे जिंकली जात होती.इतिहासात आपणास प्रथमच युद्धांची जरा लाज वाटू लागली आहे. लष्करी हडेलप्पींवरची श्रद्धा कमी होत चालली आहे.लवकरच एक दिवस असा उजाडेल, की जेव्हा लीस्टरशायरमधील हा अशिक्षित चर्मकार मानवजातीच्या थोर शिक्षकांपैकी एक म्हणून सर्वत्र गौरविला जाईल.
२५.९.२३ या लेखातील शेवटचा भाग..