एके दिवशी रात्री उशिरा वाकड पोलिस चौकीतून फोन आला,'एक विचित्र प्राणी आमच्या चौकीत शिरलाय ! आम्ही त्याला दार बंद करून कोंडलं आहे.' मी आमचा स्वयंसेवक मित्र डॉ.अमित कामतला फोन लावला.अमित हा त्या वेळी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रात (गायनॅकालॉजी) पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता.गेल्या दोन तीन वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून तो रोजच पार्कवर येत होता. तो लगेचच गाडी घेऊन आला आणि पंधरा वीस मिनिटात आम्ही पोलीस चौकी गाठली.आत जाऊन बघतो,तर इन्स्पेक्टरच्या टेबलाखाली एक खवल्या मांजर शरीराची गुंडाळी करून बसलं होतं.गंमत म्हणजे सगळा पोलिस स्टाफ त्या प्राण्याला घाबरून चौकीच्या बाहेर थांबला होता.मी खुणावल्यावर अमित ते मुटकुळं उचलून मांडीवर घेऊन बसला. 'रेस्क्यू फॉर्म' भरण्यासाठी पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पार्कला यायला सांगून आम्ही त्या खवल्या मांजरासह पार्कवर आलो.
खवल्या मांजर हा एक अद्भुत सस्तन प्राणी आहे.
इंग्रजीमध्ये या प्राण्याला 'मँगोलिन' म्हणतात.मराठी भाषेतल्या नावात मांजर असलं तरी त्याचा मांजराशी काही संबंध नाही.हा प्राणी आकाराने मुंगसापेक्षा थोडासा मोठा असतो, दिसतोही थोडाफार तसाच.त्याच्या संपूर्ण अंगावर एकमेकांवर रचल्यासारखे कठीण खवले असतात.त्रिकोणी आणि चपटे.प्रत्येक खवला म्हणजे खरंतर केसांचा एक पुंजकाच. खवल्यांच्या मधल्या भागात आणि पोटाच्या बाजूला तुरळक राठ केसही असतात.त्याच्या जवळपास कोणी फिरकलं तर नाराज होऊन तो हलकासा फुत्कार टाकतो.कोणी स्पर्श केला तर मात्र लाजून मुटकुळं करून बसतो. त्याच्या तोंडात दात नसतात.त्याची जीभ एखाद्या चिकट वादीसारखी असते.
धोक्याची चाहूल लागून त्याने एकदा का शेपटी पोटाकडून डोक्याकडे वळवून शरीराचा फुटबॉल केला की कितीही ताकद लावली तरी तो उघडता येत नाही.त्यामुळे शत्रू दातांनी आणि नख्यांनी त्याला काहीही इजा करू शकत नाही.त्याला चावण्याचा आणि ओरखडण्याचा प्रयत्न करून कटाळून शत्रू निघून जातो.खवल्या मांजराची नखं खूप लांब आणि तीक्ष्ण असतात.त्यांचा वापर करून ते जमिनीमध्ये माती खोदन बिळं करतात.बिळं कसली,चार ते आठ फूट लांबीच्या छोट्याशा गुहाच असतात त्या! मुंग्या आणि वाळवी हे त्यांचं मुख्य खाद्य.त्यांच्या वारुळावर खवल्या मांजर धाड टाकतं.भराभरा वारूळ उकरत असताना बंद तोंडातल्या फटीतून त्याच्या जिभेची आत-बाहेर हालचाल होत असते. वारुळातल्या मुंग्या आणि वाळवी जिभेला चिकटून त्याच्या पोटात जातात.
त्याच्या पोटातली रसायनं हे खाद्य सहज पचवू शकतात.
खवले मांजर झाडावर चढण्यातही तरबेज असतं.आपल्या
तीक्ष्ण नख्या झाडाच्या खोडावर रोवून ते झाडावर चढतं.
ताकदवान शेपटी झाडाच्या फांदीला आवळून शरीराचा भार तोलून वर चढतं आणि तिथे राहणाऱ्या किडा-मुंग्यांवर डल्ला मारतं.दृष्टी क्षीण असली तरी त्याचं वासाचं ज्ञान अचूक असतं.त्याआधारे ते बरोबर त्याच्या खाद्या
पर्यंत पोहोचतं.दिवसभर स्वतः खणलेल्या घरात मुटकुळं करून झोपा काढतं आणि संध्याकाळी जेवायला घराबाहेर पडतं.
तर मी सांगत होतो आमच्याकडच्या पाहुण्या खवल्या मांजराबद्दल.या प्राण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.
रात्री उशिरा हे खवले मांजर पार्कवर आलं आणि सकाळीच वृत्तपत्रांचे छायाचित्रकार त्याचे फोटो काढण्यासाठी येऊन ठेपले.अजून ते पुरतं रुळलंही नव्हतं.
आपण कुठे आलोय याचीही त्याला धड कल्पना नव्हती. त्यामुळे मी छायाचित्रकारांना विनंती करून त्यांना संध्याकाळी यायला सांगितलं.ते गेल्यावर माझे सहकारी नेवाळे यांच्या मदतीने त्या खवले मांजराला उन्हासाठी हिरवळीवर आणून ठेवलं. थोड्याच वेळात डॉ.अमितही त्याची विचारपूस करण्यासाठी येऊन पोहोचला.अमित हा जसा हाडाचा स्वयंसेवक,तसाच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थीही.त्याने रात्रभर जागून खवल्या मांजराच्या खाद्यसवयींचा,त्याला आवश्यक असणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा अभ्यास केला होता.दूध,मध,रताळी आणि कच्च्या अंड्यामधून त्याला आवश्यक असणारी प्रथिनं आणि इतर घटक मिळत असतात.त्यामुळे हे सर्व पदार्थ एकत्र भरडून आणि त्यानंतर विशिष्ट तापमानापर्यंत शिजवून,थंड करून अत्यंत चविष्ट असं 'पॉरिज' (आपल्याकडची लापशी) तयार केलं.ते चाखून पाहण्याचा मोह मला आवरला नाही.मस्तच चव होती त्याची.आमच्या
खवल्या मांजरासमोर ठेवल्यावर एका दीर्घ श्वासाने हुंगून त्यानेही ते चविष्ट पॉरिज जिभेने लपालपा खाऊन टाकल.
पोटभर नाष्टा झाल्यावर आमचा पाहुणा गाढ झोपून गेला.माझे गुरू जेराल्ड ड्युरेल यांनी 'जर्सी वाइल्डलाइफ प्रिझर्वेशन ट्रस्ट'मध्ये प्राणी-पक्षांना संतुलित पोषक आहार मिळण्यासाठी असेच अनेकविध प्रयोग केलेले मी अनुभवले होते.वन्य प्राण्यांना नैसर्गिक वास्तव्यामध्ये मिळणाऱ्या अन्नघटकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रथिनांचा अन् जीवनसत्त्वांचा अभ्यास करून हा भला माणूस त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे पदार्थ तयार करून घ्यायचा.
अगदी केक,पेस्ट्री,पॉरिज आणि पुडिंग्जसुद्धा! अशा नव्या पदार्थाची चव पहिल्यांदा जेराल्ड स्वतः बघत असत,मगच तो प्राणी-पक्ष्यांना दिला जात असते.अमितने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हा नवा प्रयोग यशस्वी केला होता आणि त्यात त्याला यशही आलं.
संध्याकाळच्या सुमारास आमचा पाहुणा झोपेतून उठला.मनसोक्त शीशूचा कार्यक्रम आटोपला आणि तो इकडे-तिकडे पळू लागला.संध्याकाळी त्याला घेऊन वारुळ शोधायला जायचं असं आम्ही ठरवलं होतं.
त्यासाठी नेवाळे त्याला उचलायला गेला,तर लगेच त्याने स्वतःचा फुटबॉल करून घेतला.तो फुटबॉल मांडीवर घेऊन नेवाळे माझ्या शेजारी गाडीत बसला.आम्ही थेट हिंजवडी गाठलं.त्या वेळी आयटी पार्कमधल्या कंपन्यांच्या बांधकामांना सुरुवात झाली होती,पण तरीही तिथे अजून समृद्ध असं माळरान शाबूत होतं.बाभळीची आणि हिवराची झाडंही शिल्लक होती.त्या झाडांच्या खोडालगत लाल,काळ्या आणि पांढऱ्या मुंग्यांची थोडीफार वारुळ होती.त्यांच्यापाशी आम्ही खवल्या मांजराला मोकळं सोडलं.जराही वेळ न दवडता त्याने एका वारुळावर हल्ला चढवला.पुढच्या पायाने तो भराभर वारूळ उकरायला लागला. चामड्याच्या वादीसारखी त्याची लवचिक जीभ आत बाहेर होऊ लागली.मुंडकं आत खुपसून त्याने हजारो मुंग्या चापल्या असाव्यात.त्याची भूक भागली असावी.
अर्ध्या तासानंतर तो गुमान माघारी आमच्याजवळ आला.आम्ही पार्कला परतलो आणि जेवून झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाष्ट्याला लापशी. दुपारी झोप झाल्यावर कालच्यासारखाच 'नेचर वॉक' झाला. दरम्यान,त्याच्या रीहायड्रेशनसाठी आम्ही मध आणि पाण्याचं मिश्रण करून त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं.आवश्यकतेनुसार आपल्या लांबुळक्या जिभेने तो ते चाटून घेत होता.दरम्यान,या खवल्या मांजराला निसर्गात पुन्हा मुक्त करण्यासाठी मी वन विभागाकडे अर्ज
करून ठेवला होता.पाच दिवसांनी त्याला परवानगी मिळाली;पण तोपर्यंत या विचित्र प्राण्याला सांभाळण्याची,
त्याचा जवळून अभ्यास करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं नशीब..! (सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन )
त्याला रात्रीच्या वेळी निसर्गात सोडावं असं ठरलं.
आमच्याबरोबर वन विभागाचे कर्मचारीही येणार होते.
जाण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा लापशीची ट्रीट दिली,मध-पाणी पाजलं.एका भक्कम लाकडी पेटीत ब्लँकेट अंथरून त्याचा फुटबॉल त्यात ठेवला.त्याला हिंजवडीच्या मागे माणच्या जंगलात सोडायचं ठरवलं होतं.तो याच परिसरात सापडला होता.या परिसरात खवले मांजरं आढळतात असं कानावरही आलं होतं आणि तोही तिथूनच केवळ अनवधानाने वाट चुकून आमच्याकडे आला होता.त्यामुळे त्या भागात त्याला त्याची आप्त
मंडळी भेटण्याची शक्यता बरीच होती.
माणला पोचल्यावर एक टेकडी चढून वर गेलो.एव्हाना रात्र झाली होती.वेळ न दवडता आम्ही हलकेच त्याला पेटीबाहेर काढून जमिनीवर ठेवलं आणि दूर जाऊन उभे राहिलो.खवल्या मांजराने स्वतःहून मुटकुळं सोडवलं.