" पाण्यात बुडून जाण्याचा आवाज मीच तुम्हाला वर्णन करून सांगू शकते,इतर कोणीही नाही.तो अत्यंत भयप्रद असा आवाज आहे आणि त्यापाठोपाठ नेहमीच एक भयचकित करणारी शांतता असते."
Ms. Eva Hart, Titanic survivor
" ती एक अत्यंत काळीभोर रात्र होती. आकाशात चंद्र नव्हताच.निरीक्षणे करायला लागणारे एकमेव असे बायनोक्युलर्स आम्ही साउथहॅम्प्टनला ठेवून आलो होतो."
टायटॅनिक पहाऱ्यावरील Reginald Fleet चे अमेरिकन सिनेटच्या चौकशीतील विधान.
नोंद क्रमांक १,सन १९०९ - नुकतीच आणि अचानक 'व्हाईट स्टार लाईन' नावाची शिपिंग कंपनी,अमेरिकेचा रेलरोड सम्राट जे. पी. मॉर्गनने ताब्यात घेतली होती.ह्या व्यवहारामागची कारणे अज्ञात असली तरी मॉर्गन हा प्रथितयश,यशस्वी व्यावसायिक होता.ही जी व्हाईट स्टारलाईन शिपिंग कंपनी होती,ती प्रचंड तोट्यात होती. तिच्याकडे एक मोठे प्रवासी जहाज होते.त्याचे नाव RMS Olympic,जे सतत दुरुस्तीसाठी डॉकयार्डमध्ये पडून असे.हा एक पांढरा हत्ती होता आणि त्यामुळे मॉर्गनने ही कंपनी घेतली, तेव्हा तो त्याच्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याने ही कंपनी रुळावर आणेल असेच सगळ्यांना वाटले आणि झालेही तसेच.मॉर्गनने या व्यवहारानंतर अजिबात वेळ दवडला नाही.जणू काही ती खरेदी पुढे घडून येणाऱ्या एका प्रत्ययकारी मोठ्या हालचालीचा एक टप्पा होती. त्याने तातडीने आयर्लंडच्या बेलफास्टच्या देखण्या शिपयार्डमध्ये १९०९ साली व्हाईट स्टारलाईन्सचे एक मोठे प्रवासी जहाज बांधायला घेतले इथे हे सांगितले पाहिजे की, बेलफास्ट हे गाव प्रोटेस्टंट*
(प्रोटेस्टंट हा पंथ कॅथलिक ख्रिश्चनांच्या कर्मठपणाला कंटाळून त्यात सुधारणा करणाऱ्यांची चळवळ होती. कॅथलिक चर्चने त्याला अतिशय हिंसक पद्धतीने सतत विरोध केला.) लोकांचे.
नोंद क्रमांक २,सन १९९१० - जॉर्जियाचा निसर्गरम्य किनारा.त्या ऊबदार किनाऱ्यावरच्या अनेक छोट्या बेटांपैकी एक शांत आणि निर्जन बेट,जॅकील आयलंड.
नोव्हेंबरचा महिना हा खरे तर पानगळ झालेला ऋतू,शुष्क झाडांचा आणि विषण्ण वाऱ्याचा! पण या बेटावर मात्र त्याचा अजिबात मागमूस नव्हता.इथले वातावरण ऊबदार झालेले.इथे अमेरिकेच्या आर्थिक जगातली सात अत्यंत निवडक महत्त्वाची माणसे अमेरिकेत येऊ घातलेल्या मध्यवर्ती बँकेची काही गुप्त गंभीर खलबते करण्यसाठी जमली होती.सतत काळाच्या पुढे आणि नफ्याच्या मागे धावणारी ही मंडळी,तब्बल सात दिवस,ह्या नव्या आर्थिक सत्तेच्या चर्चेत आणि शक्यतांच्या समीकरणात खोलवर आणि गहनपणे बुडाली होती.शेवटी एक मसुदा घेऊन त्या हिशेबी,धोरणी माणसांचा ताफा न्यूयॉर्कला परतला.
नोंद क्रमांक ३,जानेवारी १९११ - नवीन वर्ष उंबरठ्यावर,अमेरिका गारठलेली.ख्रिसमसच्या थंडीची गंमत आता संपली होती आणि उरले होते ते केवळ अंग ठणकावून टाकणारे गार वारे. ह्या कडक थंडीत मात्र न्यूयॉर्कच्या एखाद्या धातूसारख्या थंडगार इमारतीत उंचीवर असणाऱ्या अर्थसत्तांच्या मजल्यांवर मात्र वातावरण पेटले होते.न्यूयॉर्कचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा आर्थिक लगाम आपल्या विवेकी हातात ठेवणाऱ्या त्या तीन धनाढ्य माणसांना अमेरिकेत होऊ घातलेली मध्यवर्ती बँक अजिबात मान्य नव्हती.ही बँक लोकांच्या स्वातंत्र्यावर कायमची गदा आणेल असे त्यांचे मत होते आणि ते त्यांच्या तापलेल्या स्वरातून व्यक्त होत होते. यातला एक होता बेंजामिन गुग्गेनहेम. हा अमेरिकन आणि जर्मन नागरिक. वंशाने ज्यू. गर्भश्रीमंत.
अमेरिकेतील खाण उद्योगसम्राट असणाऱ्या गुग्गेनहेम कुटुंबातला.याचे टोपण नावच मुळी सिल्वर प्रिन्स.दुसरा होता इसीडोर स्ट्रोउस.हा सुद्धा जर्मन- अमेरिकन नागरिक.वंश ज्यू. अमेरिकेन काँग्रेसमन.अत्यंत धनाढ्य माणूस. याचा पक्ष 'डेमोक्रेटिक'. 'मेसीज' या जगप्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक. तिसरा होता जॉन जेकब अॅस्टर.हा सुद्धा जर्मन-अमेरिकन. अमेरिकेतल्या पहिले दशलक्षाधीश असणाऱ्या अॅस्टर कुटुंबातला.हा अमेरिकेतला पहिला व्यापार-सम्राट.याने अमेरिकेतला पहिला ट्रस्ट सुरू केला.ह्या तीनही माणसांनी त्या जॅकील बेटावर इतक्या गंभीरपणे आणि मेहनतीने तयार केलेल्या मध्यवर्ती बँकेच्या मसुद्याला धुडकावून लावले.हे तिघेही अमेरिकेतले कमालीचे धनाढ्य आणि जगातील काही मोजक्या गर्भश्रीमंत लोकांपैकी एक.ह्यांच्या श्रीमंतीचा आणि नैतीकतेचा दबदबा दूरवर पसरलेला.संपूर्ण नैतिकतेने व्यवसाय करीत अमेरिकन समाजाचे भले केलेली,आपल्या संपत्तीचा दबाव चांगल्या गोष्टींसाठी वापरणारी ही माणसे;त्यामुळे यांच्या नकाराला अमेरिकेच्या अर्थवर्तुळात एक उच्च दर्जा आणि मजबूत महत्त्व.यांचा नकार म्हणजे जणू अमेरिकन अर्थविश्वाला दिला जाणारा व्हेटोच..!
नोंद क्रमांक ४,सन १९११ - बेलफास्टमध्ये नवीन आलिशान बोट बांधून तयार होत आलेली. जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायनिष्ठेचा हा एक पुरावा.त्यापूर्वी कोणीही बांधली नसेल आणि कोणीही स्वप्नात बघितली नसेल अशी ही आलिशान बोट.समुद्रावर तरंगणारा प्रचंड भव्य राजवाडाच जणू.'कधीही न बुडणारी जगातील एकमेव बोट' अशी तिची जाहिरात सगळ्या जगभरच्या वर्तमानपत्रात झळकत होती.तिचा पहिला मेडनप्रवासही घोषित झाला.त्याची जाहिरातबाजी सुरू झाली आणि तिने जगभरच्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसांच्या मनाचा ठाव घेतला.तिच्यातला पहिला प्रवासी होण्याची त्या लोकांची अधीर लगबग सुरू झालेली.त्या आलिशान बोटीच्या प्रवासाचा दिवस ठरला,१२ एप्रिल १९१२.या सगळ्या प्रवासाला अजून एक वैयक्तिक टच देताना जॉन पियर पौट मॉर्गनने जगभरच्या प्रतिष्ठित लोकांना खास वैयक्तिक आमंत्रणे द्यायला सुरुवात केली. प्रवास सुरू होणार होता,इंग्लंडमधील साउथहॅम्पटन डॉकपासून संपणार होता लुभावणाऱ्या लालसी न्यूयॉर्कच्या किनाऱ्यावर. एक देखणी प्रशस्त बोट,अत्यंत शाही प्रवासी मार्ग आणि जगभरच्या मातब्बर लोकांना स्वत: जॉन पिएरपोट मॉर्गनने दिलेली आमंत्रणे स्वतः मॉर्गनने मालक असून या प्रवासाचे तिकीट काढलेले.साहजिकच बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अॅस्टर या मान्यवरांना त्याकाळातली इतक्या आलिशान आणि इतक्या प्रतिष्ठित प्रवासाची भुरळ न पडती तरच नवल.हे तिघेही त्या प्रवासाला तयार झालेले आणि त्या बातमीने या मेडन प्रवासाला जगभर एक वेगळीच उंची आणि झळाळी दिलेली !
बोटीचा कप्तान एडवर्ड स्मिथ.हा कप्तान उत्तर अटलांटिक समुद्राच्या लाटांवर जवळपास सव्वीस वर्षे सहज स्वार झालेला माणूस.त्या नुसत्या स्पर्शाने अंगभर शहारा आणणाऱ्या थंडगार शांत पाण्यातला तो माहितगार असामी. त्याची नजर अटलांटिकच्या लाटांवर वृद्ध झालेली.याचा अजून एक परिचय म्हणजे हा ज्येसूट.
ज्येसूटस् रोमन कॅथलिकातले अत्यंत कडवे म्हणून प्रसिद्ध.कडवे आणि मर्मभेदी.असे का तर,ज्येसूटचे तत्त्वज्ञान म्हणजे पवित्रतेचे तत्त्वज्ञान.अत्यंत उच्च चांगल्या गोष्टीसाठी प्रसंगी नरसंहार झाला तरी तो मान्य.कारण ज्याचा शेवट पवित्र त्याचे सगळेच मार्गही शुचितेचे.जे पी मॉर्गन हाही ज्येसूटच.त्याचा पगारी नोकर असणारा कप्तान स्मिथ सुद्धा ज्येसूट.या ज्येसूट लोकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते मालकाची आज्ञा शतश: पाळणारे.त्यांचा मालक म्हणजे त्यांचा परमेश्वरच.या पंथाची शिकवणच अशी.तर आपल्या कप्तान स्मिथचा ज्येसूट मालक - गुरु म्हणजे फ्रान्सिस ब्राऊनी.हा आयर्लंडचा अगदी सुप्रसिद्ध हार्डकोर,दादा ज्येसूट.
बोटीवर अनेक आयरिश इटालियन आणि फ्रेंच माणसे होती.मुख्य म्हणजे,जिथे बोट बांधली गेली त्या बेलफास्टच्या प्रोटेस्टंटना तर या प्रवासाच्या निमित्ताने अमेरिकेला स्थलांतरित होण्याची दुर्मीळ ऑफरही जाहीर झालेली.
दिनांक २ एप्रिल १९१२
साडेतीन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असणारे एक आलिशान आणि तरंगते गाव पाण्यात सोडण्यात आले.दिवसाला तब्बल ६१० टन कोळसा जाळून तोपर्यंत कधीही तयार झाली नाही,अशी प्रचंड वाफ तयार करणारी ही महाकाय बोट नजरेच्या एका टप्प्यात मावणार नाही आणि मावली तरी काय पाहिले हे पट्कन सांगता येणार नाही,इतकी अवाढव्य होती.हिची लांबी होती ८८२ फूट आणि वजन तब्बल ४६,००० टन. हिचे नाव होते आर. एम. एस. टायटॅनिक !
दिनांक १२ एप्रिल १९१२
टायटॅनिक निघाली.डेकवरच्या सुबक पॉलिश केलेल्या चकचकीत फळ्या काढण्यात आल्या आणि साधारण पंचवीस मैलापर्यंत ऐकू जाईल असा एक आकाशातल्या ढगांना धडकी भरविणारा,खणखणीत भोंगा या बोटीने दिला, तेव्हा जाणारे आणि मागे राहिलेले सगळेच आयुष्यातला एखादा अविश्वसनीय, अविस्मरणीय प्रसंग पाहत असल्यासारखे गहिवरून गेले.निरोपाचे हात व्याकुळ होऊन थरथरत होते तर डेकवर उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या भाग्यवान प्रवाशांचे हात मात्र एकमेकात घट्ट गुंफलेले.भोंगा वाजताच टायटॅनिकवर घाईघाईने पोचला,तो आपला हार्डकोर ज्येसूट फ्रान्सिस ब्राऊन हा गृहस्थ लगबगीने बोटीवर चढला.त्याने त्या बोटीकडे डोळे भरून पहिले. तिच्यावरची देखणी आणि पारणे फेडणारी श्रीमंती नजरेत सामावली.तिचे फोटो काढले. बोटीवरच्या प्रवाशांचे आणि वेगवेगळ्या मजल्यांचे सुद्धा एका
पाठोपाठ बरेच फोटोग्राफ्स काढले.तो एडवर्ड स्मिथकडे गेला.कदाचित कप्तानाला त्याच्या ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची जाणीवसुद्धा करून दिली असणार. हे सगळे अतिशय चटपटीतपणे करीत हा माणूस, दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आयर्लंडच्या क्वीन्सलंड बंदरात सगळ्यांचा हृद्य निरोप घेऊन उतरला आणि काही क्षणात बोट करड्या लाटांवर झेपावली.बोटीवरच्या लोकांचे दिवसभराचे रुटीन उत्साहाने सुरू होते.
१४ एप्रिल १९९२ ( रात्र) १५ एप्रिल (पहाट)
टायटॅनिकवर रात्र झालेली.एक दमलेली, प्रवासाच्या तृप्तीचे उसासे टाकणारी,रेंगाळलेली रात्र.क्वचित कुठेतरी तिच्या एलिगंट कार्डक्लबमध्ये पत्ते खेळणारे आणि रंगीबेरंगी दबक्या प्रकाशासोबत प्रत्येक घोट सावकाश जिभेवर घोळवत दारू पिणारे काही जण रेंगाळत होते.
अनेकांना आता या शाही प्रवासाची सवय होत आलेली.
त्यामुळे सगळ्याच खोल्यातून विझणाऱ्या दिव्यांसोबत निजानीज झालेली.टायटॅनिक आता न्यूफौंडलंडच्या जवळपास ७०० किलोमीटर दक्षिणेला, अटलांटिकच्या लहरी लाटांवर डुलत होती. समुद्रावरची दमट हवा आता झरझर थंड होत चालली होती.खालचा करडा समुद्र एखाद्या तळ्यासारखा अत्यंत शांत,स्तब्ध.समुद्राचा निर्मम पडदा.डोळ्यात काजळ ओतावे असा काळभोर आणि त्यावर मात्र चांदणखडीची विशाल चादर असावी तसे ताऱ्यांनी खचाखच भरलेलं रत्नजडित आकाश.
अटलांटिकच्या लहरी लाटांवरचा तोच तो थंडगार होणारा हलका वारा. त्या निर्मम निसर्गाच्या जल आणि आकाश या दोन मूलतत्त्वात एखाद्या मंद ताऱ्याप्रमाणे, कालगती
सारखी सरकणारी टायटॅनिक !
बेल वाजली आणि बोटीवर पाळी बदलली.ऑफिसर बदलले.पहारा करणाऱ्या ऑफिसरकडे मात्र बायनॉक्युलर्स नव्हते. इन्फ्रारेड तंत्र,सोनार,ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि रडार या सगळ्यांचाच शोध अजून लागायचा होता.सारे कसे शांत आणि मंद असताना अचानक वॉचटॉवरवरच्या ऑफिसरच्या नजरेला एक मोठा काळसर खंड पडला. "ओ माय गॉड!" तो जवळपास किंचाळला.थरथरत त्याने चेकपोस्ट असणारी फोनची वायर खेचली.अधीरपणे तो पलीकडून फोन उचलण्याची वाट पाहू लागला.साधारण तीन-चार दीर्घ रिंगनंतर फोनवर आलेल्या पलीकडच्या माणसाला त्याने त्या बर्फखंडावरील नजर न हलवत ह्याची माहिती दिली. "थँक्स!" ह्या अदबीच्या उद्गारासहित फोन कट झाला. त्याने अस्वस्थ होऊन पुन्हा फोन लावला.परत त्याने सांगितले, "मला खात्री आहे,पुढे प्रचंड आईसबर्ग आहे!" त्याच्या त्या तारस्वराने मग धावपळ सुरू झाली आणि त्याचवेळी अचानक बोटीचा वेग मात्र वाढू लागला.आता तिचा वेग होता २२ नॉट फुल! दुसरीकडे फुल रिव्हर्सच्या ऑर्डर्स दिल्या गेल्या.हे फारच अनाकलनीय होते. आता ती महाकाय बोट वेगात असतानाच वळवायला सुरुवात झाली.टॉवरवरच्या ऑफिसरची बोट वळणे आणि आईसबर्गचे वेगाने कमी होत जाणारे अंतर याची अस्वस्थ मोजदाद सुरू झालेली.
बोटीवर निद्राधीन असणाऱ्या माणसांना अर्थात याची काहीही जाणीव नाही.अनुभवी कप्तान स्मिथला आता हळूहळू अंदाज येऊ लागलेला.अमावस्येची रात्र. आकाशात चंद्राचा पत्ता नाही आणि समोर तब्बल ८० चौरस मैलाचे अवाढव्य आईसफिल्ड. या दृश्यासोबत ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची त्याला आता तीव्र आठवण होऊ लागली असावी.कदाचित कप्तान स्मिथ त्या क्षणांत,आपली सदसदविवेकबुद्धी आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या ज्येसूट गुरूचे आदेश यांच्यात घुसमटला असावा.कारण त्या शेवटच्या तासातल्या त्याच्या
सूचना अत्यंत अनाकलनीय, विचित्र आणि त्याच्या प्रदीर्घ अनुभवाच्या ठिकऱ्या उडविणाऱ्या होत्या.त्याच्या लक्षात आले,बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नाहीत. कारण? अगम्य...! आयुष्यात प्रथमच त्याने सगळ्यांनी बोट सोडण्याच्या आदेशाचा उच्चार केला.लोक डेकवर जमा होऊ लागले. त्यांना जाणवले काहीतरी भयाण घडते आहे. हळूहळू सगळ्यांच्या डोळ्यांत भीती उमटायला लागली.आकाश आणि पाणी या निसर्गाच्या दोन महाभूतात सापडलेल्या लोकांना आता आपल्या क्षुद्रतेची जाणीव होऊ लागली.सगळेच हवालदिल झालेले असताना एकदम टायटॅनिकचा बँड डेकवर आला आणि त्या मध्यरात्रीच्या गोंधळात,लोकांचे मनोधैर्य टिकविण्या -
साठी त्या बँडचे प्रामाणिक आणि आज्ञाधारक वादक प्राणपणाने आपापल्या वाद्यांवर आनंदाचे सूर वाजवू लागले.वर ताऱ्यांनी पेटलेले आकाश,खाली शांत काळ्या डोहासारखा समुद्र आणि अस्वस्थ विदीर्ण झालेले बोटीवरचे जीवन,या सगळ्यात प्राण फुंकणारे त्या वाद्यांचे सूर यांचा एक वेगळाच ऑर्केस्ट्रा आता अटलांटिकच्या लाटांवर सजू लागला होता.इतक्या सुसज्ज आणि आलिशान बोटीवर पुरेशा लाईफ बोट नव्हत्या हे कसे पटावे?आता सगळ्यांना भविष्य कळून चुकले होते. कप्तान स्मिथने स्वत: जाऊन स्ट्रेस कॉल पाठवला.
इशाऱ्यासाठी बाहेर फेकण्यात येणारे प्रकाशझोत (डिस्ट्रेस रॉकेटस्) सुरू झाले,पण ते रंगीबेरंगी होते. अशावेळी ते झोत फक्त लाल रंगाचेच असायला हवे असतात.लाल रंग म्हणजे धोक्याचे निशाण,पण ते रंगीबेरंगी असल्याने त्यातल्या त्यात जवळ असणारी बोट कॅलिफोर्नियाला (California) हे धोक्याचे इशारे आहेत,हे कळलेच नाही.बोटीवर मोठी पार्टी चालू असावी असा समज करून घेत ती पुन्हा दूरवर निघून गेली. ( घातसूत्र,दीपक करंजीकर, ग्रंथाली प्रकाशन )
टायटॅनिकवरील लोकांना वाचवू शकेल अशी अजून एक बोट कार्पाथिया (Carpathia) ५८ मैल म्हणजे चार तासांवर होती.तिने आपण येत असल्याचा संदेश पाठवला खरा,पण अथांग समुद्रावर केस पांढरे झालेल्या स्मिथला माहीत होते की,तोपर्यंत सारे संपलेले असेल.आता बोटीची विचित्र हालचाल सुरू झाली.त्या प्रचंड हेलकाव्यांनी अजस्त्र बॉयलर कोसळून पडले. आता लोकांची धावपळ टिपेला पोचली होती. कुठूनशी दैवानेच आर्त आणि दीर्घ हाक मारल्यासारखी एक अतिप्रचंड लाट उसळली आणि तिने एक वरचे उरले सुरले सगळे एका तडाख्यात पुसून टाकले.
अपूर्ण.. उर्वरीत लेखाचा दुसरा भाग ०५.१०.२३ या लेखामध्ये…