* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/३/२४

भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुला Global footprint of Indian culture

सोमनाथ मंदिराच्या बाणस्तंभावर कोरलेला श्लोक असा आहे.


आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतीर्मार्ग...!


(या मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रस्त्यात एकही अडथळा [जमीन] नाही.येथून ज्योतीचा मार्ग [प्रकाश] सरळ तिथपर्यंत पोहोचू शकेल.)


अर्थात दीड-दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना जर दक्षिण ध्रुव माहीत असेल तर त्यांनी नक्कीच पृथ्वी

प्रदक्षिणा केलेली असणार.म्हणजे जगाच्या पाठीवर भारतीयांच्या पाऊलखुणा निश्चितच असतील.आजपासून एक हजार वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक व्यापारात भारत २७% ते ३०% हिस्सा घेऊन पहिल्या क्रमांकावर होता.आता व्यापाराला जाणारा माणूस त्या त्या क्षेत्रात आपल्या अगदी लहानशा का होईना, वसाहती निर्माण करतोच.जसं भारतात राजस्थानच्या मारवाडी समुदायांनी अगदी बांगलादेशपासून ते आसाम,दक्षिण भारतापर्यंत अनेक ठिकाणी लहान लहानशा वसाहती निर्माण केल्या.मात्र अशा प्राचीन भारतीयांच्या जागतिक पाउलखुणाबद्दल फारसं डॉक्युमेंटेशन कुठं आढळत नाही.अंबेजोगाईच्या डॉ.शरद हेबाळकरांनी एक छानसं पुस्तक लिहिलंय - 'भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार'.साधारण १९८० मध्ये लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकानंतर अनेक ठिकाणी उत्खनन होऊन बरीच नवीन माहिती मिळाली आहे.

त्यामुळे ह्या विषयावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे. डॉ.रघुवीर यांनी जगातील भारतीय लोकांच्या उपस्थितीविषयी भरपूर लेखन केले आहे.विशेषतः

मंगोलियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.डॉ.चमनलाल यांचे 'हिंदू अमेरिका' हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.


या सर्व पुस्तकांमधून हिंदू अथवा भारतीय संस्कृतीचा जगभर झालेला प्रवास दिलेला आहे. पण इतिहास संशोधकाला पुरावे लागतात.तसे पुरावे गोळा करण्याचे काम गेल्या वीस / पंचवीस वर्षांत फारसे झालेले नाही.

डॉ.विष्णू श्रीधर (हरिभाऊ) वाकणकर हे नावाजलेले पुरातत्ववेत्ता.मध्यप्रदेशातील आदिम खुणा असलेल्या 'भीमबेटका' गुहांचा शोध यांनीच लावला आहे.डॉ.शरद हेबाळकरांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना हरिभाऊंनी त्यांच्या १९८४ सालच्या अमेरिका आणि मेक्सिको प्रवासाचा अनुभव दिलेला आहे.तो सांगताना त्यांनी अमेरिकेच्या सन डियागोच्या पुरातत्व संग्रहालयाचे अध्यक्ष बेरीफेल यांचा उल्लेख केला आहे.या बेरीफेल महोदयांनी मेक्सिकोच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या युकाटन प्रांतात तावसुको नावाच्या जागी,माया संस्कृतीच्या मंदिरांमधे मिळालेल्या 'वासुलून' नावाच्या भारतीय महानाविकाच्या भाषा आणि लिपीमधे लिहिलेल्या मजकुराचा उल्लेख केला आहे. आणि या पुराव्यावरून बेरीफेल यांनी निर्विवादपणे सांगितले आहे की,आठव्या / नवव्या शतकात तिथे भारतीय जात होते. दुर्दैवाने ह्या 'वासुलून' महानाविकाच्या शिलालेखाचा फोटो कुठेच उपलब्ध नाही. म्हणजे तो शिलालेख तिथल्या संग्रहालयात नक्कीच असेल,पण कोणी तेथे जाऊन त्याचा फोटो प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एखादे प्रतिपादन करायला ठाम पुरावे लागतात. ते गोळा करण्याचं मोठं काम करण्याची फार आवश्यकता आहे.


मात्र आता असे पुरावे मिळताहेत.भारतीय / हिंदू / वैदिक,अगदी कुठलंही नाव आपण दिलं तरी आपल्या प्राचीन संस्कृतीचं अस्तित्व जगभर सापडतंय.भारताच्या पूर्वेला तर आपल्या संस्कृतीचे अंश आजही बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात.पण भारताच्या पश्चिमेला विशेषतः इजिप्त,युरोप इथेही दोन - तीन हजार वर्षांपूर्वीचे वैदिक संस्कृतीचे अस्तित्व उठून दिसते.मध्यंतरी Out of India Theory (OIT), मांडली गेली होती.या सिद्धांताप्रमाणे, भारतातील काही सुसंस्कृत पंथ/जमाती/ समूह, वेगवेगळ्या कारणांनी युरोपात,आफ्रिकेत स्थलांतरित झाले.यात एक प्रमुख नाव आहे, केल्टिक (Celtic) लोकांचं.


केल्टिक ही युरोपात बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा (किंवा भाषासमूह) बोलणारे लोक हे ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांपूर्वी युरोपात होते असं संशोधनाने सिद्ध झाले आहे.ख्रिस्तपूर्व सातव्या आणि आठव्या शतकांतले त्यांच्या अस्तित्वाचे बरेच पुरावेही मिळाले आहेत.त्या काळात रोमन त्यांना 'गल्ली' म्हणत,तर ग्रीक 'केल्टोई' म्हणत.ह्या दोनही शब्दांचा अर्थ बार्बेरिक असा होतो.

साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हे केल्टिक लोक ब्रिटनच्या आजूबाजूला आले आणि स्थिरावले.आजही आयर्लंड,स्कॉटलंड,वेल्स,कॉर्नवॉल,ब्रिटन या भागात चार प्रकारच्या केल्टिक भाषा,ह्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात.एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी ह्या केल्ट मंडळींचे मूळ हे फ्रांस आणि जर्मनीच्या आसपास मानले गेले होते.मात्र नंतर त्यांच्या मूळ जागेबद्दल अनेक सिद्धांत मांडले गेले.दुईस बेलेनोईस आतेग्नातोस (Druuis Belenois Ategnatos) ह्या पुरातत्त्व संशोधकाने केल्टिक ही जमात हिंदू / वैदिक जमातींपैकी एक असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच्या सिद्धांताप्रमाणे ह्या केल्टिक लोकांचे मूळ हे 'उत्तर कुरु' ह्या राज्यात होते. उत्तर कुरु म्हणजे हिमालयाचा उत्तर पश्चिम भाग. अनेक इतिहास संशोधकांच्या मते हिमालयाच्या उत्तरेतही,पूर्वी वैदिक संस्कृतीच होती.

विशेषतः डावीकडे किर्गीस्तानपासून ते उजवीकडील तिबेट- पर्यंतच्या फार मोठ्या प्रदेशात वैदिक संस्कृती नांदत होती.पुढे बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे या जमातीतील काही लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.ते तिथेच राहिले आणि ज्यांनी सनातन वैदिक धर्माची कास सोडली नाही,ते युरोपच्या दिशेने स्थलांतरित झाले.तेच हे केल्टिक लोक..!! आजही त्यांच्या नैमित्तिक गोष्टींमधील अनेक प्रथा आणि पद्धती वैदिक प्रकाराच्या जवळ जाणाऱ्या आहेत.अनेक युरोपियन इतिहासतज्ज्ञांनी ह्या केल्टिक लोकांना 'युरोपातील ब्राम्हण' हे नाव दिले आहे.कारण वैदिक धर्माप्रमाणे चालणाऱ्या अनेक प्रथा,ही मंडळी आजही पाळतात.पीटर बेरेस्फोर्ड एलिस (Peter Berresford Ellis) ह्या इतिहासतज्ज्ञाने देखील केल्टिक समूह म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती मानणारा हिंदूंचाच समूह आहे,जो पुढे कालांतराने युरोपात स्थलांतरित झाला,असे म्हटले आहे.


श्री.श्रीकांत तलगेरी ह्या इतिहासविषयक अभ्यासकांचे या विषयावर विपुल लेखन उपलब्ध आहे.तलगेरींच्या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेदपूर्वीच्या काळापासून अनेक हिंदू समूहांनी अफगाणिस्तान आणि युरोपच्या दिशेला स्थलांतर करायला सुरुवात केली होती.त्यामुळे अनेक युरोपियन संस्कृतींच्या मुळाशी हिंदू संस्कृतीच्या लहान-मोठ्या पाऊलखुणा आढळतात.तलगेरींच्या मते ऋग्वेद लिहिण्याचा काळ हा दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे.'द ऋग्वेद - ए हिस्टॉरिकल ॲनालिसिस' या आपल्या ग्रंथात ते  ऋग्वेदात वर्णन केलेल्या राजवंशांचा मागोवा घेतात.त्यांच्या मताप्रमाणे भारताबाहेर स्थलांतरित झालेले इतर हिंदू समूह आहेत.


१.पार्थस किंवा पार्थवस (ऋग्वेद ७ - ८३ - १) 

 पार्थियन्स


२.पार्सस किंवा पर्सवास (ऋग्वेद ७ - ८३ - १)

 पर्शियन (पारसी)


३.पख्तास (ऋग्वेद ७ - १८ - ७) पख्तून


४.भालानास (ऋग्वेद ७ - १८ - ७) बलुची


५.शिवस (ऋग्वेद ७ - १८ - ७) किवास


कोनराड ईस्ट (Koenraad Eist) ह्या संशोधकानेही श्रीकांत तलगेरींचे मत उचलून धरलेले आहे.


असाच एक समूह आहे, जो इराक,सिरीया, जर्मनी,आर्मेनिया,रशिया येथे राहतो.हा 'येझिदी' समूह मुस्लीम नाही.ख्रिश्चनही नाही.पारशी धर्म मानणारा पण नाही.यांचा स्वतःचा 'येझिदी पंथ' आहे.मात्र हा पंथ,हिंदू धर्माच्या अगदी जवळ जाणारा आहे.अनेक संशोधकांनी ह्या 'येझिदी' पंथाला,हिंदूंचा एक पश्चिम आशियात हरवलेला पंथ म्हटले आहे.

यांच्या नेमक्या संख्येबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत.अनेक लोकांच्या मते ह्या पंथाची संख्या १५ लाख आहे.हा पंथ मानणारे लोक प्रामुख्याने इराक आणि सिरीया इथे राहतात.


गंमत म्हणजे,पाकिस्तानचे एक पोर्टल आहे.'पाकिस्तान डिफेन्स' नावाचे (www.defence.pk). ह्या पोर्टलवर त्यांनी एक सविस्तर लेख दिलाय,ज्याचं शीर्षक आहे - "The Yazidi Culture is Very Similar to a Hindu sect'.या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे जगात फक्त ७ लाख येझिदी शिल्लक राहिलेले आहेत आणि ते मुख्यतः इराकजवळच्या कुर्दिश भागात राहताहेत.या लेखात अनेक पुरावे देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की,येझिदी म्हणजे प्राचीन हिंदूंचा एक स्थलांतरित झालेला समूह आहे.या येझिदीची प्रार्थनास्थळे ही अगदी हिंदूंच्या देवळासारखी दिसतात.त्यांच्या मंदिरांवर नागाचे चित्र चितारलेले असते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येझिदी लोकांची जी पवित्र खूण आहे,त्यात पिसारा फुलवलेला मोर प्रामुख्याने आहे.गंमत म्हणजे इराक,सिरीया वगैरे ठिकाणी कुठेही मोर हा प्राणीच आढळत नाही.आणि ह्या मोराचं साम्य,तामिळ भगवान सुब्रमण्यम यांच्या परंपरागत चित्राशी / प्रतिमेशी आहे.पिवळा सूर्य हा येझिदींचं प्रतीक आहे.या सूर्याची २१ किरणं आहेत.२१ ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते.आपल्यासारख्याच समया,

तसंच दीप प्रज्वलन, स्त्रियांच्या कपाळावर पवित्रतेची बिंदी,तीच पुनर्जन्माची श्रद्धा... हिंदूंच्या अनेक चाली-रीती येथे ठळकपणाने उठून दिसतात.आपल्या हिंदूंसारखेच तेही हात जोडून त्यांच्या देवाला नमस्कार करतात.

आपल्यासारखेच तेही यज्ञ करतात.आपल्यासारखीच पूजा करतात, आरतीची ताटं तयार करतात.अशी कितीतरी साम्यस्थळे ह्या दोन संस्कृतीत दिसून येतात.


याचा अर्थ स्पष्ट आहे.अत्यंत संपन्न अन् वैभवशाली अशा हिंदू / वैदिक संस्कृतीचे पाईक, हे समूह,

ख्रिस्तपूर्व दोन हजार / तीन हजार वर्षांआधी निरनिराळ्या कारणांनी स्थलांतर करून जगातल्या वेगवेगळ्या भागात गेले. काहींनी आजूबाजूच्या परिस्थितीशी / वातावरणाशी मिळतंजुळतं घेतलं अन् थोडीफार तरी संस्कृती टिकविली,तर काहींनी थोडी जास्त..! त्यांच्या ह्या प्रवासाच्या पाऊलखुणा,शोधल्या तर सापडतात.रशियाच्या दक्षिणेला युक्रेन हा देश आहे,जो पूर्वी रशियाचाच एक भाग होता.या युक्रेनमधे,काळ्या समुद्रकिनारी एक मोठं शहर आहे,ओदेसा (ओडीसा..?) नावाचं.याचं इंग्रजीत स्पेलिंग आहे - Odessa. या शहरात पुष्किन संग्रहालय आहे. या संग्रहालयात भारतीय देवतांच्या तीन प्रतिमा ठेवलेल्या आहेत, ज्या अगदी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेसारख्याच दिसतात...! या ओदेसा शहरात,काही वर्षांपूर्वी,अगदी प्राचीन आणि मोडकळीस आलेल्या,हजार वर्षं जुन्या स्मारकाच्या जागी खोदकाम करताना ह्या प्रतिमा सापडल्या.धातूच्या ह्या प्रतिमा,हुबेहूब जगन्नाथपुरीच्या देवांसारख्या आहेत..!


भारतीयांच्या विश्वव्यापी पाऊलखुणा ठसठशीतपणे बघायच्या असतील तर बेरेनाईक (Berenike) प्रकल्पाचा अभ्यास करणं आवश्यक होऊन जातं.

बेरेनाईक हे इजिप्तमधले अतिशय प्राचीन असे बंदर आहे.सुवेझ कालव्याच्या दक्षिणेला ८०० किलोमीटरवर असलेले हे बंदर लाल समुद्राच्या पश्चिम तटावर आहे.हा बेरेनाईक प्रकल्प,पुरातत्त्व उत्खनन प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प आहे.१९९४ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प,अजूनही चालूच आहे. नेदरलंड फाउंडेशन फॉर साइंटिफिक रिसर्च, नॅशनल जिओग्राफी,नेदरलंडचे विदेश मंत्रालय, युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाला पैसा पुरवला आहे.


ख्रिस्तपूर्व २७५ वर्षांपूर्वी,टोलेमी - द्वितीय (Ptolemy II) ह्या इजिप्तच्या राजाने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर हे बंदर बांधले आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले - बेरेनाईक.हे बेरेनाईक स्वाभाविक बंदर तर होतेच,पण हवामानाच्या दृष्टीनेही व्यापारी मालासाठी अनुकूल होते.या बंदरापासून,उंटांच्या द्वारे मालाचे दळणवळण इजिप्तच्या आणि शेजारील देशांच्या इतर भागात सहजतेने होत होते.भारताच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे, येथे भारतीयांच्या प्राचीन वैश्विक व्यापाराचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.या उत्खननात त्यांना सुमारे ८ किलो काळी मिरी सापडली,जी निर्विवादपणे दक्षिण भारतातच उगवली जायची.याशिवाय भारतातून निर्यात झालेले काही कपडे,चटया,आणि पिशव्या मिळाल्या.कार्बन डेटिंगमधे हे सर्व सामान इसवी सन ३० ते इसवी सन ७० चे निघाले.


या उत्खननात संशोधकांना एक रोमन पेटी मिळाली,ज्यात भारताच्या 'बाटिक प्रिंट'चे कपडे आणि भारतीय शैलीतले चित्र काढलेले कपडे मिळाले. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


या सर्व उत्खननातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला की,भारताचा हा समुद्री 'स्पाईस रूट', लोकप्रिय आणि प्रचलित असलेल्या 'सिल्क रूट' पेक्षाही आधीचा होता.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून बेरेनाईकच्या बंदरापर्यंत समुद्री मार्गाने भारताच्या जहाजांची ये-जा होत होती. पुढे इसवी सन ५०० च्या नंतर बेरेनाईकमधे प्लेगची साथ उद्भवल्याने ह्या बंदराचा व्यापार जवळजवळ बंद झाला.


एकुणात काय तर ख्रिस्तपूर्व दोन / तीन हजार वर्षांपूर्वी,म्हणजे आजपासून चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू आपल्या समृद्ध आणि संपन्न संस्कृतीला घेऊन जगप्रवास करत होते.व्यापार करत होते.ज्ञान-विज्ञानाचा वसा जगाला देत होते.जगातील अनेक ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले ते हिंदू नाविक/ व्यापारी.


दुर्दैवानं या सर्वांचा इतिहास आपल्याला जपता आला नाही.म्हणूनच कोलंबस,वॉस्को-डी-गामा, मार्को पोलो,

ह्यूएनत्संग सारखी नावं जगप्रसिद्ध झाली अन् आपल्या पराक्रमी नाविकांची / व्यापाऱ्यांची / धाडसी राजांची नावं इतिहासाच्या काळोखात बुडून गेली..!


मग कधीतरी बेरेनाईकसारख्या उत्खनन प्रकल्पाचे गवाक्ष उघडते.प्रकाशाची तिरीप येते आणि त्या लहानशा प्रकाशकिरणात प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास झळाळून उठतो..!!

११/३/२४

शेतकरी मार्टिन ल्यूथर ..। Farmer Martin Luther..।

लिओनार्डोच्या मृत्यूने आपणास सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात आणून सोडले आहे.दीड हजार वर्षे ख्रिश्चन धर्मात राहणारी मानवजात आपण पाहिली व आपणाला लाजेने कबूल करावे लागते की,हे चित्र काही फारसे अभिमानास्पद आहे,असे नाही.मनुष्यप्राण्याच्या आरंभीच्या वृत्तीच्या रानांतून तो बराचसा बाहेर पडला आहेसे दिसत नाही.अद्यापीही तो पशूच आहे..अद्यापीही तो विनाशाची साधनेच निर्मिताना दिसतो.त्याची भाषा पुष्कळ वेळा फसवी व दांभिकच असते.सत्यापासून व अहिंसेपासून तो अद्यापि दूर आहे.तो प्रासाद व मंदिरे बांधण्यास शिकला,काव्ये-चित्रे-प्रवचने निर्माण करण्यास शिकला,आपल्या करमणुकीसाठी चुना व संगमरवर यांच्या उत्कृष्ट बाहुल्या करावयास शिकला;पण कलेच्या पूजेने जीवनाची पूजा करायला मात्र तो अद्याप शिकला नव्हता.तो ईश्वराची पूजा करीत असूनही अद्यापि मानवबंधूना खुशाल ठार करतो! तो खुनाचा जणू धर्मच बनवितो. तो ख्रिस्ताच्या पावलांवर पावले ठेवून जाणाऱ्यांचा ख्रिस्ताच्याच नावाने छळ करतो.ख्रिश्चन धर्मात पंधराशे वर्षे राहूनही मानव अद्यापि माणुसकी शिकला नव्हता.पण या चित्राला दुसरी,आशादायक अशीही एक बाजू आहे.हा जो मानवांचा-दांभिकांचा, दुबळ्यांचा,पशुंचा मेळावा दिसतो त्यातूनच कधीकधी प्रज्ञेचे व अनंत धैर्याचे पुरुषही निघतात,ज्या मानवी मातीतून आपण वनविले जातो,तिच्यातूनच कधीकधी दैवी सौंदर्यही प्रकट होऊ शकते,असे दैवी पुरुष विरळा ही गोष्ट खरी; पण इतिहासात मधूनमधून दिसणाऱ्या या व्यक्ती आशा दाखवितात की,याहून थोर मानव पुढे पैदा होतील,

या नमुन्याहून अधिक थोर नमुने या मातीतूनच पुढे आणखीही प्रकट होतील,भावी पिढ्यांना या व्यक्ती नीट दिसाव्यात म्हणूनच जणू त्या थोर व्यक्तींना त्यांच्या समकालीनांनी क्रॉसवर खिळे ठोकून टांगून ठेवले किंवा पुढील पिढ्यांना प्रकाश दिसावा म्हणूनच त्यांच्या शरीरांच्या मशाली पेटवून ठेवल्या..!


जोपर्यंत माणसे आपल्या मनातील कल्पना व विचार स्थापण्यासाठी दुसऱ्यास ठार करीत आहेत,तोपर्यंत मानवजात जंगलीच राहणार! तथापि,आपल्या ध्येयासाठी शांतपणे मरणास मिठी मारणारेही आहेत,तोपर्यंत आपण अखेर सुधारणार,शेवटी का होईना;पण सुसंस्कृत होणार,अशी अमर आशा बाळगण्यासही जागा आहे.


कधी कधी आपल्या ध्येयार्थ स्वतःचे बलिदान करू पाहणारा मरायला तयार असणारा समकालीनांच्या विषमय वृत्तीस बळी न पडतानाही दिसतो,मग ते सुदैव म्हणा वा दुर्दैव म्हणा.समकालीनांच्या तावडीतून वाचलेल्यांपैकी मार्टिन ल्यूथर हा एक होता.त्याला पाखंडीपणाबद्दल पुन्हापुन्हा मरणाची धमकी देण्यात येत होती.पण तो नेहमी निसटे.त्याचे वाचलेले दीर्घ जीवन मानवजातीला केवळ आशीर्वादरूप व मंगलमय होते का? आपण पाहू या.


इ.स. १५१० मधील गोष्ट.त्यावेळी रोममधील सेंट पीटर चर्चची दुरुस्ती करायची होती,त्याचा जीर्णोद्धार करायचा होता.त्यासाठी पोपने क्षमापत्रे द्यायचे ठरविले.जो कोणी या कामाला मदत करील,त्याला पापमुक्तीची प्रशस्ति-पत्रे पोप दुसरा ज्यूलियस हा देणार होता.या प्रॉमिसरी नोटांत 'चर्चला मदत करतील त्यांना प्रभू मरणोत्तर सर्व पापांची क्षमा करील.'असे आश्वासन देण्यात येत असे.सनातनी लोकांना यात काही वावगे आहे असे वाटले नाही.पोपचा स्वर्गाशी प्रत्यक्ष व्यवहार असतो,असे समजले जाई.

एखाद्याने चर्चला लहानशी देणगी दिली तर त्याचा नरकातील निवास थोडा कमी होई;देणगी मोठी असेल तर नरक नक्की चुकविता येत असे.यामुळे क्षमापत्रांचा हा पोपचा पापी धंदा चांगलाच तेजीत होता.ही पापमुक्ती पत्रे जास्तीतजास्त पैसे घेऊनच भटभिक्षुक विकीत.सेंट पीटर चर्चच्या जीर्णोद्धारार्थ ही पापमोचन-पत्रे मोठ्या गाजावाजाने विकली जाऊ लागली.ऐपतीपेक्षा अधिक पैसे देऊनही शेतकऱ्यांनी ही चिठोरी विकत घ्यावी अशी जबरदस्ती त्यांच्यावर होऊ लागली.यामुळे ल्यूथरचा संताप जागृत झाला.तो धार्मिक वृत्तीचा कॅथॉलिक व डोमिनिकन पंथी होता,तरी त्याचे मन स्वतंत्र विचारांचे होते.तो विटेनबर्ग विद्यापीठात धर्म या विषयाचा प्राध्यापक होता.ईश्वर राजकारणात ढवळाढवळ करणार नाही,तद्वतच पोपांच्या या पापमोचक पत्रांशीही त्याचा काहीच संबंध नाही,

याविषयी ल्यूथर निःशंक होता.


१५५७ सालच्या ऑक्टोबरच्या एकतिसाव्या तारखेस त्याने तेथील किल्ल्यातल्या चर्चच्या दारावर पोपच्या कृत्यांचा जाहीर निषेध करणारे पत्रक लावले,"मनुष्यांनी केलेल्या पापांच्या बाबतीत प्रभूची जी काही इच्छा असेल,

तिच्यात ढवळाढवळ करण्याची शक्ती पोपला नाही, पोपचा असा हेतू असणे शक्य नाही.पोपकडून असली क्षमापत्रे घेण्यापेक्षा काही खरीखुरी सत्कर्मे केल्यास मात्र ईश्वराचे लक्ष वेधले जाण्याचा अधिक संभव आहे.भाडोत्री धर्मोपदेशक बहुजन समाजावर करीत असलेले अनन्वित जुलूम पोपला समजल्या सेंट पीटर चर्च धुळीस मिळाले तरी चालेल;पण जनतेच्या रक्ताने व हाडामांसानी ते बांधणे नको,असेच त्यालाही निःसंशय वाटेल.ख्रिश्चन धर्मीयांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,पोप अत्यंत श्रीमंतांहूनही श्रीमंत,कुबेराचाही कुबेर आहे; तेव्हा त्याला एकट्याला सेंट पीटर चर्च बांधून काढणे मुळीच अवघड नाही.गरीब श्रद्धाळू लोकांपासून पैसे उकळून त्या पैशाने हे चर्च बांधण्यापेक्षा पोपने आपल्या स्वतःच्याच पैशाने ते का बांधू नये?" या जाहीर पत्रकाच्या शेवटी तो म्हणतो, "माझ्याशी मतभेद असणाऱ्यांना माझे आव्हान आहे.वाटल्यास त्यांनी माझी मते व माझे मुद्दे खोडून काढावेत." या वेळी ल्यूथर चौतीस वर्षांचा नवजवान होता.ल्यूथरच्या आव्हानामुळे वादाचे वादळच उठले ! पोपची सत्ता धुडकावून लावणारा हा ल्यूथर पाखंडी आहे,असे भटभिक्षुक,धर्मोपदेशक,सारे म्हणू लागले.पण जुलमामुळे गांजलेली जनता नवीन धर्म बंड करणाऱ्या या वीराभोवती उभी राहिली व 'हा आमचा पुढारी!' असे म्हणू लागली.पोपला सेंट पीटरचे कॅथॉलिक चर्च बांधायचे होते.त्याला विरोध करण्यास उभा राहिलेला ल्यूथर 'प्रॉटेस्टंट चर्च बांधणारा' म्हणून अमर झालाच,त्याच्या मनात नसतानाही त्याला प्रॉटेस्टंट चर्चचा पाया घालावा लागला. पण प्रॉटेस्टंट पंथीय सुधारणेचे कारण केवळ एवढेच नव्हते.खरी कारणे दुसरीच व फार खोल आणि गंभीर होती.या चळवळीची बीजे कित्येक शतकांपूर्वीच नास्तिक म्हणून समजल्या गेलेल्या लोकांकडून पेरली गेलेली होती.ती नवयुगात नीट रुजली;त्यांनी मूळ धरले व चर्चने जुलूम केला.तरी नव्हे,चर्चने जुलूम केल्यामुळेच - ती अंकुरली व योग्य वेळी ल्यूथरने केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या घोषणेच्या रूपाने फुलली.धार्मिक स्वातंत्र्याचा आत्मा चारशे वर्षे साकार होऊ पाहत होता.ल्यूथरने त्या आत्म्याला देह दिला; पण देह देऊन त्याने आत्मा मारला,असेच पुढे दिसून येईल.


ल्यूथरने धार्मिक वादळ उत्पन्न केल्यामुळे त्याला १५१८ सालच्या ऑक्टोबरात ऑग्सबर्ग येथे बोलावण्यात आले व बंडखोर विचार सोडून देण्याबद्दल आज्ञा करण्यात आली.

पण ल्यूथर ठाण मांडून उभा होता.त्याने काहीही करण्याचे नाकारले.तो जर्मनीत फारच लोकप्रिय होता. दोन वर्षांपर्यंत चर्च त्याच्या वाटेला गेले नाही. पण सौम्यतेने मन वळवून काम होत नाही असे आढळताच पोप छळण्यास उभा राहिला.१५२० सालच्या जूनमध्ये एक आज्ञापत्र काढून 'ल्यूथरची मते अधार्मिक आहेत',

असा शिक्का पोपने त्यावर मारला आणि ल्यूथरची सर्व पुस्तके जाळून टाकण्याची आज्ञा केली.त्याने ल्यूथरला क्षमा मागण्यासाठी साठ दिवसांची मुदत दिली. तेवढ्या मुदतीत क्षमा मागून आपले म्हणणे मागे न घेतल्यास त्याला शापित ठरविण्यात येईल अशी धमकी दिली!ल्यूथरने शापित होणेच पसंत केले.पोपच्या पत्रकाला त्याने तेजस्वी उत्तर देऊन पोपला त्याच्या चिल्यापिल्यांसकट आशीर्वादपूर्वक सैतानाकडे पाठवून दिले.विटेनबर्ग येथील जनता व विद्यार्थी यांचा उत्साह उचंबळला. ल्यूथरने पोपच्या पत्रकाची व विरोधकाच्या लिखाणाची जाहीररीत्या होळी केली !


पोपने नाटकाच्या शेवटच्या अंकाची सजावट सुरू केली व पाखंडी ल्यूथरला भस्मसात करण्याचे ठरविले.पण अंकाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य पात्रच पळून गेले! ल्यूथरला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मित्रांनी वार्टबर्गच्या किल्ल्यात नेले व तो तिथे नाव बदलून राहू लागला.

जर्मनीमध्ये नव्या कराराचे ग्रीकमधून भाषांतर करून तो आपला वेळ घालवीत होता. 'बायबल प्रत्येकाला वाचता आले पाहिजे' असे वुइक्लिफप्रमाणेच त्याचेही मत होते व पोपांची भाष्ये,विवरणे व स्पष्टीकरणे वाचण्याऐवजी बायबल स्वतः वाचून स्वतःच त्याचा अर्थ करावा, असे त्याने प्रतिपादिले.ल्यूथर अदृश्य झाल्यावर एक महिन्याने सम्राटाने 'ल्यूथर चर्चचा पाखंडी शत्रू व स्टेटचाही वैरी आहे' असे जाहीर केले.ल्यूथर कायद्याच्या ऐहिक व पारमार्थिक बाहूत (दोर्दंडांत) सापडला.ल्यूथर आता एक तर कायमचा अंधारात तरी गडप होणार;अगर हुतात्मा तरी होणार असे स्पष्ट दिसत असता पुन्हा त्याला दैवाने हात दिला. कारण याच वेळी फ्रेंचांनी जर्मनीशी युद्ध सुरू केल्यामुळे नास्तिकांना माफी देण्यात आली! सम्राट दहा वर्षे युद्धात गुंतल्यामुळे ल्यूथरला आपल्या सुधारणेची योजना आखून कार्यक्रम निश्चित करण्यात भरपूर वेळ मिळाला.त्याला प्रारंभी तरी कॅथॉलिक चर्चपासून अलग होण्याची इच्छा नव्हती,नवीन धर्म सुरू करण्याचीही त्याची मनीषा नव्हती.तो जुन्याच धर्मातील दोष काढून टाकू इच्छित होता.त्याचा धर्मोपाध्यायाच्या उद्दामपणाला विरोध होता.या धर्मोपाध्यायांनी आपण इतरांहून श्रेष्ठ असे का समजावे,हेच त्याला कळेना.चर्चच्या अधिकाऱ्यांनी केवळ ईश्वराचेच सेवक होऊन भागणार नाही,तर त्यांनी जनतेचेही सेवक झाले पाहिजे असे त्याला वाटे. ल्यूथरने धर्मोपदेशकांना "सामान्य लोकांप्रमाणे राहा,विवाह करा,आपली वागणूक सुधारा, आढ्यतेने जनतेपासून दूर राहू नका,निराळे पोषाख नकोत,

काही नको!"असे सांगितले.


चर्चच्या काही उत्सव-समारंभानाही ल्यूथरचा विरोध होता.एका विशिष्ट पद्धतीनेच प्रार्थना केली पाहिजे,असा सनातनी कॅथॉलिकांचा आग्रह असे.ल्यूथर म्हणे की,

आपलीच प्रार्थनापद्धती प्रभूला अधिक पसंत पडेल. अर्थातच हा प्रश्न औपचारिक होता.पण सोळाव्या शतकात औपचारिकपणालाही फार महत्त्व असे. एखाद्या धार्मिक वचनाचा अर्थ कसा लावावा, यावर रणे माजत; कत्तलीही होत! एखाद्या आध्यात्मिक वाक्यात स्वल्पविराम कोठे असावा इतक्या क्षुल्लक मुद्द्यावरूनही युद्धे पेटत.!


ल्यूथरची सनातन कॅथॉलिक चर्चवरची श्रद्धा अजिबात उडाली होती असे नव्हे.'थोडी नवी तत्त्वे,थोडे नवे विचार,

काही नवे विधिनिषेध, काही जुन्या अवडंबरांची काटाछाट',असे जुने चर्च सुधारण्याचे त्याचे धोरण होते.

त्याचे काही विचार उदात्त असले,तरी त्याचे पुष्कळसे म्हणणे हास्यास्पदच होते.त्याला नवे बांधायचे नव्हते;तर जुन्यालाच थोडेसे वळण द्यायचे होते.त्याला कॅथॉलिकांनी बहिष्कृत केल्यामुळेच तो स्वतःचे नवे प्रॉटेस्टंट चर्च स्थापण्यास सिद्ध झाला.कॅथॉलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च यांत केवळ बाह्यतःच फरक होता असे नव्हे;तर आंतर फरकही होणार होता.दोन्ही चर्चमध्ये अंतर्बाह्य भेद होता.प्रॉटेस्टंट चर्चमध्ये जो तो आपापला धर्मोपाध्याय होता,ईश्वर व भक्त यांच्या दरम्यान मधल्या पंड्यांची जरुरी राहिली नव्हती. प्रत्येकास आपापल्या इच्छेनुसार ईश्वराची पूजा करण्याची मुभा देण्यात आली होती.प्रॉटेस्टंट पंथीयांनी पोपची सत्ता मानण्याऐवजी बायबलची सत्ता मानायची होती व हे आपले धोरणच अधिक चांगले,असे प्रॉटेस्टंट रोमन कॅथॉलिकांनी पटवून देत असत.पण आता प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांस जाळू लागले,फाशी देऊ लागले.चर्चच्या पूर्वीच्या काही पाद्रयांप्रमाणे ल्यूथरही आपल्या अनुयायांना सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट सांगायला विसरला.त्याने धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व शिकविले नाही.ल्यूथर आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरंभी दयाळू,धैर्यशाली व शहाणा होता.त्याचे धैर्य शेवटपर्यंत टिकले;पण दया व प्रज्ञा यांनी मात्र त्याला पुढील वादविवादाच्या गोंधळात दगा दिला.तरुणपणी तो परित्यक्तांना व धर्मबाह्यांना दया दाखवी.स्वतः शेतकरी असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा कैवारी व मोठा मित्र होता.

छळाची कटुता त्याने स्वतः चाखली होती,त्यामुळे छळल्या जाणाऱ्या राज्यांविषयी त्याला सहानुभूती वाटे.'येशू हा ज्यू होता' या निबंधात ल्यूथर लिहितो,"ज्यू हे येशूचे आप्तच आहेत. त्यांचे रक्त एकच आहे आणि रक्त व मांस यांची प्रतिष्ठा अधिक असेल तर आपण जितके ख्रिस्ताचे आहोत,त्यापेक्षा ज्यूच ख्रिस्ताचे अधिक आहेत... म्हणून माझे सांगणे आहे की,ज्यूंना आपण दयाळूपणाने वागविले पाहिजे.पोपच्या कायद्याला न मानता आपण ख्रिस्ताने शिकविलेला प्रेमाचा कायदाच पाळला पाहिजे.आपण ज्यूंचे मित्र होऊ या.पण पुढे जेव्हा शेतकरी (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-सानेगुरुजी) राजेरजवाड्यांच्या जुलमाविरुद्ध बंडाची भाषा बोलू लागले,तेव्हा पोपच्या जुलमाविरुद्ध बंड करणारा ल्यूथरच राजाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना शाप देऊ लागला.त्याने 'वरिष्ठ सत्ता प्रत्येकाने मानलीच पाहिजे,'अशी गर्जना केली.पोपच्या बाबतीत निर्णय ठरविण्याचा हक्क लोकांस आहे,असे म्हणणाराच ल्यूथर राजाच्या बाबतीत मात्र जनतेचा निर्णय ठरविण्याचा हक्क नाकारीत होता.राजाने काहीही अन्याय केला.तरी त्याच्याविरुद्ध बंड करणे कधीही क्षम्य होणार नाही असे तो म्हणे.स्वर्गामध्ये सामाजिक न्याय स्थापण्यासाठी तो जन्मभर धडपडला;पण पृथ्वीवर सामाजिक न्याय स्थापण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याने शिव्याशाप दिले. 'खुनी व लुटालूट करणारे गुंड शेतकरी' असे एक पत्रक त्याने लिहिले.थोर इरॅस्मसूने या पत्रकावर 'केवळ रानटी' असा शेरा मारला. या पत्रकात ल्यूथर राजांना आग्रहाने सांगतो,हे शेतकऱ्यांचे बंड रक्तात बुडवून टाका." ख्रिस्ताच्या प्रेमधर्माचा हा शेवटचा भाष्यकार लिहितो, "राजेरजवाड्यांनो,इकडे या.हे बंड मोडायचे

आहे.हे अराजक थांबवायचे आहे.स्टेट वाचायचे आहे.या सारे धावून,हाणा,मारा,भोसका,ठार करा,गळे दाबा." राजेरजवाड्यांना पुन्हा असे प्रवचन पाजण्याची गरज नव्हती.या नवीन धर्मसुधारकांपासून स्फूर्ती व संदेश घेऊन त्यांनी शेतकऱ्यांस ठायी ठायी ठेचले,मारले, हाणले,ठार केले आणि अल्पावधीतच हे बंड शांत केले.ज्यूंच्या बाबतीतही त्याची पूर्वीची वृत्ती बदलली.ज्यूंना ते पुढे प्रॉटेस्टंट होतील,या आशेने त्याने सहानुभूती दाखविली होती.पण आपल्याच धर्माला चिकटून राहण्याचा त्यांचा अभंग निश्चय जेव्हा दिसून आला,तेव्हा तो त्यांच्यावरही आग पाखडू लागला.पूर्वी जसा तो शेतकऱ्यांवर तुटून पडला तसा आता तो ज्यूंवरही उलटला."ज्यूंच्या बाबतीत काय करावे?"असा प्रश्न विचारला असता त्याने जाहीररीत्या दिलेल्या उत्तरात तो म्हणतो,"त्यांची धर्ममंदिरे व त्यांच्या पाठशाळा जाळून टाका." जे जळणार नाहीत, ते मातीत गाडून टाका.त्यांची घरे लुटा,बरबाद करा.त्याची प्रार्थनापुस्तके,त्यांचे धर्मग्रंथ सारे जप्त करा. त्यांच्या धर्मोपाध्यायांना धर्म शिकविण्याची बंदी करा.जर ते ऐकणार नाहीत,तर त्यांना 'तुम्हाला ठार मारण्यात येईल,

तुमचे अवयवच्छेदन होईल', असे सांगा व तरीही त्यांनी न ऐकल्यास त्यांच्या जिभा उपटा." ज्या ज्यूंनी ल्यूथरला त्याचा देव दिला, येशू दिला,त्या ज्यूवरच त्याने अशी आग पाखडली!जवळजवळ चारशे पृष्ठांचे शापपुराण त्याने ज्यूंच्या बाबतीत खरडले आहे.


वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी,म्हणजे १५४६ साली ल्यूथर मरण पावला.जुलमांविरुद्ध बंड करून त्याने सार्वजनिक जीवनास आरंभ केला;पण शेवटी तो स्वतःच जुलूम करणारा ठरला.प्रो. जॉर्ज फूट मूर हा आपल्या 'धर्माचा इतिहास' नामक ग्रंथाच्या दुसऱ्या भागात लिहितो, " मध्ययुगातील चर्च ज्याप्रमाणे सत्ता व मत्ता यामागे उभे असे,त्याचप्रमाणे ल्यूथरचा धर्मही सत्ताधीशांना व मालदारांना आशीर्वाद देण्यासाठीच उभा राहिला.

बायबलातून इहलोकी व परलोकी नवीन आशा मिळेल असे ज्यांस वाटत होते,त्यांच्या आशेची ल्यूथरने राखरांगोळी करून टाकली..! " हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की,ख्रिस्ताने पददलितांच्या रक्षणासाठी धर्म स्थापला;पण ल्यूथरने मात्र पूर्वीच्या कित्येक कॅथॉलिकांप्रमाणेच पददलितांवर जुलूम करणारा धर्मच स्थापण्याचा यत्न केला.रूढ ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्मापासून अद्याप फार दूर होता.



९/३/२४

सॉक्रेटिसचं रहस्य..Secret of Socrates..

लोकांशी बोलणं सुरू करताना तुम्ही तुमच्या मतभेदाचा उल्लेख सगळ्यात आधी करू नका. तुम्ही आधी त्या गोष्टींवर जोर द्या आणि जोर देत राहा ज्यावर तुम्ही दोघे सहमत आहात.जर संभव असेल,तर या गोष्टीवर जोर द्या की, तुमच्या दोघांचं लक्ष्य एकच आहे आणि तुमच्यात अंतर फक्त त्या वस्तूचं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कक्षापर्यंत पोहोचायला बघता आहात.


सुरुवातीपासूनच समोरच्या व्यक्तीकडून होकार मिळवत राहा.जिथपर्यंत होऊ शकेल तिथपर्यंत अशी नौबतच येऊ देऊ नका की,समोरची व्यक्ती 'नाही' म्हणेल.एकदा का समोरच्यानेही नाही म्हटलं की,

तेव्हा प्रोफेसर ओवरस्ट्रीटच्या मतानुसार नंतर त्याच्याशी सामना करणे कठीण होतं.एकदा 'नाही' म्हटल्यानंतर तुमच्या व्यक्तित्वाच्या गर्वाचं हे मागणं असतं की,तुम्ही तुमच्या बोलण्यावर अडून राहा.

तुम्हाला नंतर असं वाटू शकतं की,तुम्ही चुकीने 'नाही' म्हटलं;परंतु तुम्ही आपल्या गर्वामुळे हे स्वीकारू शकत नाही.तुम्ही एकदा जे सांगितलं,त्यावरच अडून राहणं पसंत करता.याकरता हे खूप महत्त्वाचं होऊन जातं की गप्पांची सुरुवात 'होकारानी' व्हावी.


समजदार वक्ता आपल्या श्रोत्यांकडून सुरुवातीपासूनच 'हो' म्हणवत जातो.या प्रकारे श्रोत्यांची मानसिकता सकारात्मक दिशेची बनते. हे एका बिलियर्डच्या चेंडूच्या गतीसारखं आहे. दिशा बदलण्याकरता शक्तीची आवश्यकता असते आणि त्याला विरुद्ध दिशेकडे घेऊन जायला तर खूपच शक्तीची जरूर पडते.


इथे मनोवैज्ञानिक पॅटर्न खूपच स्पष्ट आहे.जेव्हा कोणी व्यक्ती 'नाही' म्हणते तेव्हा त्याचं पूर्ण शरीर त्याच्या ग्रंथी,त्याची नर्व्हस सिस्टिम आणि त्याचं मांसपेशीय तंत्र सगळंच एका नकारात्मक स्थितीत येऊन जातं.

साधारणतःखूप सूक्ष्म परंतु नजरेत येणारी लक्षणं बघू शकतो की शारीरिक वेगळेपण आहे किंवा त्याची तयारी आहे.पूर्ण न्यूरोमस्क्युलर सिस्टिम स्वीकार करण्याच्या विरोधात जाते.याच्या विपरीत जेव्हा कोणी व्यक्ती 'हो' म्हणते तेव्हा वेगळेपणाची कुठलीच लक्षणं नजरेस येत नाहीत.पूर्ण सिस्टिम पुढे जाणारी,स्वीकार करणारी आणि सैल असते. याकरता आपण सुरुवातीलाच समोरच्या

कडून जितक्या वेळा 'हो' म्हणवतो,आपण आपल्या शेवटच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यात सफलतेच्या जवळ जातो.हे तंत्र खूपच सोपे आहे,तरीपण याकडे नेहमी दुर्लक्षच केले जाते.असे वाटते की,जास्त करून लोक सुरुवातीलाच विरोध प्रदर्शन करून आपलं महत्त्व दाखवतात.जेव्हा कोणी विद्यार्थी किंवा ग्राहक,मुलगा,पती किंवा पत्नी सुरुवातीला 'नाही' म्हणतात,तेव्हा तुम्हाला देवदूताची बुद्धी आणि धैर्याची जरूर असते.


'हो' म्हणवण्याच्या याच तंत्रामुळे न्यू यॉर्कमधले ग्रीनविच सेविंग्ज बँकेचे टेलर जेम्स एबरसन एका ग्राहकाला आपल्या बँकेत खातं उघडण्यासाठी तयार करू शकले.


मिस्टर एबरसननी सांगितलं,हा माणूस आमच्या बँकेत खातं उघडायचं म्हणत होता.मी त्याला भरायला सामान्य फॉर्म दिला.त्याने काही प्रश्नांची उत्तरं तर इच्छेनी दिली;

पण काही प्रश्नांची उत्तरं देण्याबद्दल सरळ नाही म्हणून सांगितलं.जर असे झालं असतं,तर मी या संभावित ग्राहकाला सरळ सांगितल असतं की,जर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर आम्ही त्याचं खातं उघडू शकत नाही.मला हे स्वीकारायला लाज वाटते की,मी भूतकाळात या प्रकाराच्या गोष्टी अनेक वेळा सांगून चुकलो आहे.स्वाभाविक रूपात या प्रकारचं अल्टीमेटम देण्यानंतर मला आनंद होतो.मी या प्रकारे सांगत होतो की,बॉस कोण होता आणि बँकेच्या नियम कायद्यांची अवहेलना नाही करू शकत;पण ही गोष्ट तर निश्चित होती की माझ्या या प्रकारच्या वागण्यामुळे समोरच्या त्या व्यक्तीला महत्त्व आणि स्वागताची भावना मिळत नव्हती जो आमच्या बँकेत ग्राहक बनायला आला होता.त्या दिवशी मी बुद्धीचा प्रयोग करायचं ठरवलं.मी निश्चय केला की मी त्याला हे नाही सांगणार की बँकेला काय हवंय, तर हे सांगेन की,त्या प्रश्नांची उत्तर देणं ग्राहकाच्या हिताचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही की मी त्याला सुरुवातीपासूनच 'हो, हो' म्हणायला विवश केलं.मी त्याला सांगितलं की त्याने माहिती नाही दिली तरी त्याने काही बँकेला फरक पडत नाही.मग मी त्याला सांगितलं की,पण जर तुमचा मृत्यू झाला,तर तुम्हाला वाटणार नाही का की तुमचा पैसा तुमच्या वारसाना मिळावा,जो की कायद्याने त्यांना मिळाला पाहिजे.बिलकुल त्याने उत्तर दिलं.मी म्हटलं,काय तुम्हाला नाही वाटत की तुम्ही आम्हाला तुमच्या वारसाचं नाव सांगावं म्हणजे आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मृत्यूनंतर पैसे उशीर न होता आणि न चुकता देऊ शकू.परत एकदा त्याने म्हटलं 'हो'.


त्या व्यक्तीचा मूड बदलून गेला.कारण की आता त्याला कळलं होतं की,ही माहिती बँकेच्या फायद्याकरता नसून,

उलट त्याच्याच फायद्याकरता जरुरी आहे.बँकेतून रवाना व्हायच्या आधी न फक्त तो मलाच पूर्ण माहिती देऊन गेला तर त्याने माझ्या सुचवण्यावरून आपल्या आईच्या नावावरही एक ट्रस्ट अकाउंट उघडलं.हेच नाही,तर त्यांनी आपल्या आईच्या बाबतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आनंदाने दिली.मला लक्षात आलं की, सुरुवाती

पासूनच त्याला 'हो,हो' करवल्यामुळे तो विसरून गेला की,मुद्दा काय होता आणि तो माझ्या सुचवण्यावरून एका मागून एक मानत गेला.जोसेफ एलिसन बेस्टिंग हाउस इलेक्ट्रिक कंपनीचे सेल्समन होते.त्यांनी आम्हाला त्यांची गोष्ट सांगितली,माझ्या एरियात एक माणूस होता,ज्याला आमची कंपनी सामान विकायचं म्हणत होती.माझ्या आधीचा सेल्समन दहा वर्षांपर्यंत प्रयत्न करून चुकला होता.जेव्हा मी तो भाग सांभाळला तेव्हा तीन वर्षं मीसुद्धा प्रयत्न केला पण मला काही कुठलीच ऑर्डर मिळाली नाही.शेवटी तेरा वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही त्याला काही मोटरी विकण्यात यश मिळवलं.मला अशी आशा होती की,जर आमची मोटर त्याला पसंत पडली तर तो आमच्याकडून खूप मोटरी खरेदी करेल.


माझा विश्वास होता की,आमच्या मोटर्स त्याला निश्चितपणे आवडतील,याकरता जेव्हा तीन आठवड्यांनंतर मी त्याला भेटायला गेलो तेव्हा मी चांगल्या मूडमध्ये होतो;परंतु चीफ इंजिनिअरने मला धक्का देणारी बातमी ऐकवली,

एलिसन,मी तुमच्याकडून बाकी मोटर्स नाही विकत घेऊ इच्छित." का? मी हैराण होऊन विचारलं.कारण तुमची मोटर बरीच गरम होते.मी त्यावर हातपण ठेवू शकत नाही.मी खूप वेळपर्यंत या त-हेच्या मामल्यांवर वाद घातले होते;पण आता मी समजलो की,अशा स्थितीत वाद घालून काही फायदा होणार नाही.याकरता मी 'हो हो' करायला लावणाऱ्या तंत्रांचा उपयोग केला. अच्छा,मिस्टर स्मिथ ! मी म्हटलं.मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की जर आमची मोटर जास्त गरम होते,तर तुम्हाला ती विकत घ्यायला नको.तुम्हाला तीच मोटर विकत घ्यायला पाहिजे जी नॅशनल इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्सच्या स्टँडर्डनी जास्त गरम नाही होत.नाही का?" तो सहमत झाला.मला माझा पहिला होकार मिळाला.इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या नियमाप्रमाणे मोटरचे तापमान खोलीच्या तापमानाच्या ७२ डिग्री फॅरेनहीटपेक्षा जास्त नको पाहिजे.बरोबर ना?"


हो तो सहमत झाला.हे अगदी ठीक आहे.पण तुमची मोटर त्यापेक्षा जास्त गरम होते.मी त्याच्याशी वाद घातला नाही.मी त्याला फक्त एवढंच विचारलं की,मिलच्या खोलीचे तापमान किती आहे.त्याने उत्तर दिलं की,

जवळपास ७५ डिग्री फॅरेनहीट्स.यावर मी म्हटलं की,जर मिलच्या खोलीचं तापमान ७५ डिग्री आणखीन जोडलं,तर ते सगळं मिळून १४७ डिग्री फॅरेनहीटपेक्षा जास्त होईल.

जर तुम्ही १४७ डिग्री फॅरेनहीटच्या गरम पाण्यात हात बुडवले तर काय तुमचे हात भाजणार नाहीत का?


एकदा परत त्याला म्हणावं लागलं,'हो'.


मला असं वाटतं की तुम्ही बरोबर आहात,त्यांनी मान्य केलं.आम्ही काही वेळ बोललो.त्याच्या नंतर त्याने आपल्या सेक्रेटरीला बोलवलं आणि आम्हाला पुढच्या महिन्याकरता ३५,००० डॉलरच्या बिझनेसची ऑर्डर दिली.अनेक वर्षांनंतर आणि बिझनेसमध्ये हजारो डॉलर्सचा घाटा सहन केल्यानंतर शेवटी हे शिकलो की,

वाद घालून कोणताच फायदा होत नाही.दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजणं जास्त महत्त्वपूर्ण आणि जास्त फायद्याचं असतं.त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेत मग त्याच्याकडून हो हो करवण्यात जास्त कुशलता आहे.

एड्डी स्नो ओकलँड,कॅलिफोर्नियामध्ये आमचा कोर्स स्पॉन्सर करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की,ते एका दुकानाचे चांगले ग्राहक फक्त याकरता बनले की प्रोपरायटरने त्यांना 'हो,हो' करण्यावर विवश केलं होतं.एड्डीची रुची बो हंटिंगमध्ये होती आणि त्यांनी एका स्थानिक बो स्टोअरमधून उपकरण आणि सप्लाई विकत घेण्यात बरेच पैसे खर्च केले होते.जेव्हा त्यांचा भाऊ त्यांना भेटायला आला तेव्हा त्यांनी आपल्या भावाकरता एक धनुष्य भाड्यानी घ्यायचं ठरवलं.त्यांनी एका दुकानात फोन केला जिथे सेल्स क्लार्कने त्यांना सांगितलं की,ते लोक धनुष्य भाड्याने नाही देत.त्याच्या पुढे काय झालं हे सांगताना एड्डी म्हणाले की -


एका खूप आनंदी व्यक्तीने फोनला उत्तर दिलं. भाड्यानी धनुष्य देण्याच्या बाबतीतला त्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा होता.त्याने सांगितलं की,त्याला खेद आहे की तो आम्हाला धनुष्य भाड्याने देऊ शकत नाही.त्यांनी मला विचारलं की,मी याआधी कधी धनुष्य भाड्याने घेतले आहे का? मी उत्तर दिलं की,हो खूप वर्षांपूर्वी. त्यांनी मला आठवण दिली की,बहुतेक मी भाड्याचे २५ किंवा ३० डॉलर्स दिले असेन.मी परत एकदा 'हो' म्हणालो.मग त्यानी विचारलं की काय मी अशा प्रकारची व्यक्ती आहे जी पैसे वाचवू इच्छिते.सरळच होतं की मी परत 'हो' म्हणेन.मग त्याने पुढे माहिती दिली की,त्यांच्या इथे धनुष्याचे असे सेट आहेत ज्यात आवश्यक सगळे उपकरण लागले आहेत आणि त्यांची किंमत फक्त ३४.९५ डॉलर्स आहे.मी धनुष्याच्या भाड्यात जेवढे पैसे खर्च करतोय,त्याच्यापेक्षा फक्त ४.९५ डॉलर्स जास्त पैसे खर्च केल्यास मी (मित्र जोडा-डेल कार्नेगी-मंजुल पब्लिसिंग हाऊस-पूणे-अनुवाद- कृपा कुलकर्णी)


धनुष्याचा पूर्ण सेट विकत घेऊ शकतो.त्याने सांगितलं की,याच कारणाकरता त्यांनी धनुष्य भाड्याने देणे बंद करून टाकलंय.त्याचा तो तर्क मला पटला? माझ्या 'हो' च्या प्रतिक्रियेच्या कारणामुळे मी सेट खरेदी केला.सेट विकत घेण्याबरोबर मी त्याच्या दुकानातून आणखीन काही सामान खरेदी केलं आणि तेव्हापासून मी तिथला कायमचा ग्राहक बनलो.


अथेन्सचे सॉक्रेटिस जगातील महानतम दार्शनिकामधले एक होते.त्यांनी असं काही केलं जे इतिहासात केवळ मूठभर लोकच करू शकले.त्यांनी मानवाची चिंतनाची दिशाच बदलून टाकली.त्यांचा मृत्यू २४ व्या शतकाच्या आधी झाला होता;पण आजपण ते सर्वश्रेष्ठ वादविवाद करणाऱ्यांमधले मोजले जातात,जे लोकांना आपली गोष्ट पटवायला समर्थ होते.


त्यांची पद्धत काय होती? ते लोकांना हे सांगत होते की ते चूक आहेत? नाही,ते असं कधी करत नव्हते.ते त्यापेक्षा जास्त चतुर होते.त्यांचं तंत्र ज्याला सॉक्रेटिसचं तंत्र असं म्हटलं जातं,हो हो चं उत्तर येण्यावर आधारित होती. ते असे प्रश्न विचारायचे की,समोरच्याला सहमत व्हावंच लागायचं.ते एकामागून एक हो म्हणवत आणि शेवटी त्यांचे विरोधक या स्थितीत यायचे की, त्यांना त्याच निष्कर्षावर यावं लागायचं,ज्याला मानायला ते काही वेळ आधी बिलकूल तयार नसायचे.पुढच्या वेळी जेव्हा आमची इच्छा कोणाला सांगायची असेल की,ते चूक आहेत तर सॉक्रेटिसला आठवा आणि एक नम्रपणे प्रश्न विचारा - एक असा प्रश्न विचारा ज्याचं उत्तर 'हो' असेल.चीनमध्ये एक म्हण आहे ज्यात पूर्वेकडल्या खूप वर्षं जुन्या बुद्धिमत्तेचे सार आहेअलगद चालणारी व्यक्ती दूरपर्यंत जाते.त्यांनी मानवी स्वभावाला समजण्याकरता पाच हजार वर्षं लावली आणि त्यांनी आपल्या निष्कर्षाला खूपच चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं आहे.अलगद चालणारी व्यक्ती दूरपर्यंत पोहोचते.

७/३/२४

गोष्ट शिकण्यासारखी A thing to learn

स्काॅटलंडयार्ड मधील ही गोष्ट आहे..!


'बेकर' नावाचा एका अतिशय श्रीमंत गृहस्थाचा पुतण्या जाॅन हा एकमेव सख्खा वारसदार होता. काका अगदी मुलाप्रमाणे जाॅन शी व्यवहार करीत होते.जाॅन चं मात्र काकांशी कधी फारसं पटत नसे.दोघांच्या विचारात जमीन

अस्मानाचा फरक होता.जाॅन ला भटकंती अतिशय प्रिय होती.वेगवेगळे प्रदेश फिरुन यावे धमाल आयुष्य जगावं,

ह्या उद्देशाने एक दिवस जाॅन घरातून बाहेर पडला... जाॅन च्या सात पिढ्या बसून खातील एवढी रग्गड संपत्ती असल्याने कसलीही कमी नव्हती. भटक-भटक भटकावं,

एखाद्या उंची हाॅटेलमधे मुक्काम ठोकावा,चैन करावी,

कंटाळा आला की दुसर्‍या शहरात जावं;हा त्याचा आयुष्यक्रम होता.इकडे काका मात्र त्याला दरवेळेस तो म्हणेल तेवढा पैसा ठरावीक तारखेला त्याने कळवलेल्या ठिकाणी पाठवत असत. 


'जाॅनने महिन्यातून एखादं पत्र लिहून आपला समाचार व झालेल्या खर्चाचा आकडा त्याने विनातपशील कळवावा.पण पत्र नसेल तर त्या महिन्यात मात्र पैसा मिळणार नाही.'


एवढी एकच त्यांची अट होती.


असे दिवसांमागून दिवस जात होते.भटक्या जाॅनला प्रवासात 'निक' नावाचा त्याच्याच वयाचा एक सोबती मिळाला.निक अतिशय चलाख व कामसू होता.तो सुद्धा तसा भटक्या स्वभावाचा होता.त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य तसं दारिद्र्यात व्यतीत झालं होतं. 


जाॅनने त्याला मित्राचं स्थान व मान दिला.त्याचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं.जाॅन तसा आळशी प्रवृत्तीचा होता काकांना पत्र लिहिण्याची जबाबदारी त्याने निक वर टाकली. मैत्रीचं नातं मिळालं तरी निक मात्र जाॅन ला मालक समजायचा.


जाॅन ची लहानसहान सर्व कामं तो करायचा. जाॅन च्या काकांना 'जाॅन' च्या नावाने वेळच्या वेळी पत्र पाठवायचा,

काकांनी विचारणा केली नसूनही रोजच्या रोज खर्चाचा हिशोब ठेवायचा.


जाॅन चा आळस इतका वाढत गेला की पत्राखाली आपली स्वाक्षरी करायलासुद्धा तो निक लाच सांगू लागला. हळूहळू जाॅन च्या वतीने निकच सर्व ख्यालीखुशाली व पैशाचा तपशील काकांना कळवू लागला.'जाॅन' च्या सांगण्यावरुन 'निक' नावाचा मित्र मिळाल्याचं काकांना कळवलं.व 'जाॅन' च्याच सांगण्यावरुन 'निक' चं कौतुकही पत्रामधून काकांना कळवलं. काळ पुढे सरकत होता... आता काकांच्या पत्रांमधेही निक चं कौतुक येऊ लागलं.


" निक तुझ्याबरोबर आहे,तुझी काळजी घेतो, सगळे हिशोब ठेवतो,दर महिन्याला पत्रव्यवहाराची आठवण करुन देतो.निक मुळे मला आता तुझी काळजी राहिली नाही,त्याला तुझ्या मित्राप्रमाणेच वागवत जा..." असा मजकूरही त्यात वारंवार दिसू लागला.


दिवस... महिने... वर्ष... मजेत चालली होती. जाॅन प्रमाणे निक ला सुद्धा आता ऐषारामाची सवय जडली होती;पण

'जाॅन ची लहर मधेच फिरली व त्याने आपल्याला दूर लोटलं तर आपले हाल कुत्रा खाणार नाही...'असे विचार निक च्या मनात येऊ लागले.तो बोलता-बोलता हा विषय आडमार्गाने काढायचा म्हणायचा,


"अरे जाॅन,माझ्या आयुष्याचा विचार मला कधीतरी करायलाच हवा.असं किती दिवस मी तुमच्या पैशावर अवलंबून राहू?"_


"त्याची काही गरज नाही रे मित्रा,मी तुला कधीही अंतर देणार नाही."


" पण... तुझी मर्जी अचानक फिरली तर....?"_


" नाही रेऽ ते अशक्य आहे!"_


तरीदेखील माझ्या समाधानासाठी काहीतरी तू लेखी लिहून दे ना...माझ्या नावाने एखादी रक्कम बँकेत जमा करुन दे."


" कशाला? तसंही येणारे सर्व पैसे तुझ्याजवळच असतात...त्यातले हवे तेवढे पैसे काढून ठेवत जा.मला सांगूदेखील नकोस."


"अरे नाही,ही लबाडी माझ्या हातून होणार नाही; म्हणून तर काही रक्कम लेखी माझ्या नावाने करायला सांगतोय ना?" जाॅन त्यावर फक्त हसायचा व तो विषय तिथंच संपायचा. पण निक च्या मनातली काळजी मात्र कमी होत नव्हती आणि लबाडी करायला मन धजावतही नव्हतं.वर्षांमागून वर्ष गेली... हे दोघं अनेक शहरांचा दौरा करत करत स्काॅटलंडयार्डपासून खूप दूरच्या शहरात आले असताना एक दिवस अचानक तिथे एक तार आली...

 

'Mr.Becker dead.Start early...'


काका अचानक वारल्याची तार निक ने जाॅन ला वाचून दाखवली.तारेमधे लिहिल्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब काकांकडे जाणं किती आवश्यक आहे ते जाॅन ला सांगितलं. " थोड्या वेळाने बोलू,माझं डोकं आत्ता खूप दुखतंय...मला जरा विश्रांती घेऊ दे." जॉन एवढंच म्हणाला... "अरे असं काय म्हणतोस? तिथं तू नाहीस... काका अचानक वारले आहेत आणि त्यांच्या अमाप संपत्तीचा तू एकमेव सख्खा वारसदार आहेस...! तू तिथं लगेच गेला नाहीस व इतर नातेवाईकांनी सगळी संपत्ती गिळंकृत केली तर...?? "

 

"हे बघ निक,माझं डोकं प्रचंड दुखतंय.मला झोपू दे."_ एवढंच बोलून जाॅन झोपून गेला.


निक ची ती रात्र तंद्रीतच गेली.सकाळी 'बिग बेन'च्या आवाजाने तो भानावर आला.बघतो तर जाॅन तापाने फणफणला होता.निक ने ताबडतोब डाॅक्टरला बोलावलं.डाॅक्टरांनी जाॅन ला तपासलं.स्टेथोस्कोप बाजूला काढून ते म्हणाले, 


" दोन दिवसांची औषधं देतो... तोपर्यंत काही चाचण्या करुन घेऊ;कारण मला हा साधा ताप वाटत नाही.ह्या परिस्थितीत तुम्ही मात्र ह्याला सोडून कुठेही जाऊ नका...!"_


डाॅक्टरांनी असं सांगितल्यावर निक ला काही सुचेनासं झालं. 'जाॅन चं काही कमी जास्त झालं तर आपलं काय होईल? आपण तर रस्त्यावर येऊ...!'_ ह्या विचाराने निक च्या छातीत धऽस्स झालं,जाॅन ची प्रकृती ढासळत गेली व चार दिवसातच जाॅन ने जगाचा निरोप घेतला...!


डेथ सर्टिफिकेट लिहिताना डाॅक्टरने विचारलं, 


"ह्याचं आणि तुमचं नातं काय? "


"अंऽऽऽ.... नातंऽऽ.....?? नातं म्हणजे खरं सांगायचं तर नोकर व मालकाचं!"_निक म्हणाला.


" म्हणजेऽऽऽ... हा इसम तुमचा?...."


क्षणभर निक च्या मनात वादळ घोंगावलं व स्वतःच्या भविष्याची काळजी भेडसावली...


डाॅक्टरांना नजरेस नजर न मिळवता तो पटकन् म्हणाला, 


"हा 'निक'...!! माझा नोकर

व मी त्याचा मालक... 'जाॅन'...!!!


डाॅक्टरांकडून निक नं 'निक' च्या नावाचं डेथ सर्टिफिकेट घेतलं व 'जाॅन' चा दफनविधी उरकला.रुमवर येऊन सामानाची आवराआवर केली व निक ने 'जॉन' बनून तडक स्काॅटलंडयार्ड गाठलं...!


.....आणि....


काकांच्या भव्य अशा 'बेकर्स व्हिला' मध्ये तो  'जाॅन' ह्या नावाने दाखल झाला.


अनेक वर्षांच्या पत्रव्यवहारातून त्याला जाॅन च्या कुटुंबाची पूर्ण माहिती झाली होती... त्याचं व जाॅन चं वयसुद्धा जवळपास सारखंच होतं... जाॅन कितीतरी वर्ष घराबाहेर असल्याने कुणाला जाॅन चा चेहरा आठवण्याची शक्यताही नव्हती व काका तर वारले होते..!!!


त्यामुळे 'निक' हा जाॅन'म्हणून तिथे सहज स्वीकारला गेला...! काकांचा एकुलता एक सख्खा पुतण्या आल्याची खबर लागल्याने १-२ दिवसातच काकांचे साॅलिसिटर आले.


"जाॅन,मी तार पाठवली होती... तुम्ही लगेच इथे याल अशी अपेक्षा होती."


"सर,मी येणारच होतो पण माझा मित्र 'निक' आजारी पडला.त्याला एकट्याला अनोळखी शहरात सोडून जाणं मला गैर वाटलं व त्या आजारातच 'निक' चा मृत्यू झाला.सारं दुःख गिळून मी इथे आलो..."_ असं म्हणून त्याने 'निक'च्या नावे बनवलेलं डेथ सर्टिफिकेट साॅलिसिटरपुढे ठेवलं.


ओऽऽह... नोऽ.!! साॅलिसिटरने दीर्घ सुस्कारा सोडला..'जाॅन',हे फार वाईट झालं...!


" काकांनी ह्या मृत्यूपत्रात आपली सर्व संपत्ती तुमच्या ह्या प्रामाणिक मित्राच्या; म्हणजे 'निक'च्या नावाने केली आहे.जाॅन,तुमच्यापेक्षा ह्या 'निक' वरच काकांचा अधिक विश्वास होता....!!!


"आणि... आता मात्र 'निक च्या पश्चात् ही सर्व संपत्ती जवळपासच्या सर्व चर्चेसमधे दान देण्यात यावी... आपल्या संपत्तीमधला एक कणही अप्रामाणिक व्यक्तीला मिळू नये',अशी काकांची अखेरची इच्छा होती..!!"_

 

हे ऐकल्यावर मात्र कोणीतरी येऊन फाऽडकन् थोबाडीत मारावी आणि डोळ्यासमोर काजवे चमकावेत...असं निक चं झालं व त्याला जाॅन बरोबरचा काही दिवसांपूर्वीच  झालेला संवाद आठवला....


सिग्नलपाशी उभे असताना जाॅन म्हणाला होता..


समोर पोलिस असताना सिग्नल न तोडणे ही तर 'Honesty' आहे;पण पोलिस नसतानाही नियमांचे उल्लंघन न करणे ही झाली.' 'INTEGRITY!!!'


साॅलिसिटरने आपल्या ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढून वाचायला सुरुवात केली... पण,सुन्न अवस्थेत असलेल्या निक च्या कानात त्यातला एकही शब्द घुसत नव्हता... त्याचं डोकं बधीर झालं होतं.त्याच्या डोळ्यासमोर फक्त समोरच्या टेबलवरील डेथ सर्टिफिकेट मधली अक्षरं नाचत होती...


_'Mr. Nick is clinically dead...!'_


लेखक - अनामिक / अज्ञात