* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शेतकरी मार्टिन ल्यूथर ..। Farmer Martin Luther..।

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/३/२४

शेतकरी मार्टिन ल्यूथर ..। Farmer Martin Luther..।

लिओनार्डोच्या मृत्यूने आपणास सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात आणून सोडले आहे.दीड हजार वर्षे ख्रिश्चन धर्मात राहणारी मानवजात आपण पाहिली व आपणाला लाजेने कबूल करावे लागते की,हे चित्र काही फारसे अभिमानास्पद आहे,असे नाही.मनुष्यप्राण्याच्या आरंभीच्या वृत्तीच्या रानांतून तो बराचसा बाहेर पडला आहेसे दिसत नाही.अद्यापीही तो पशूच आहे..अद्यापीही तो विनाशाची साधनेच निर्मिताना दिसतो.त्याची भाषा पुष्कळ वेळा फसवी व दांभिकच असते.सत्यापासून व अहिंसेपासून तो अद्यापि दूर आहे.तो प्रासाद व मंदिरे बांधण्यास शिकला,काव्ये-चित्रे-प्रवचने निर्माण करण्यास शिकला,आपल्या करमणुकीसाठी चुना व संगमरवर यांच्या उत्कृष्ट बाहुल्या करावयास शिकला;पण कलेच्या पूजेने जीवनाची पूजा करायला मात्र तो अद्याप शिकला नव्हता.तो ईश्वराची पूजा करीत असूनही अद्यापि मानवबंधूना खुशाल ठार करतो! तो खुनाचा जणू धर्मच बनवितो. तो ख्रिस्ताच्या पावलांवर पावले ठेवून जाणाऱ्यांचा ख्रिस्ताच्याच नावाने छळ करतो.ख्रिश्चन धर्मात पंधराशे वर्षे राहूनही मानव अद्यापि माणुसकी शिकला नव्हता.पण या चित्राला दुसरी,आशादायक अशीही एक बाजू आहे.हा जो मानवांचा-दांभिकांचा, दुबळ्यांचा,पशुंचा मेळावा दिसतो त्यातूनच कधीकधी प्रज्ञेचे व अनंत धैर्याचे पुरुषही निघतात,ज्या मानवी मातीतून आपण वनविले जातो,तिच्यातूनच कधीकधी दैवी सौंदर्यही प्रकट होऊ शकते,असे दैवी पुरुष विरळा ही गोष्ट खरी; पण इतिहासात मधूनमधून दिसणाऱ्या या व्यक्ती आशा दाखवितात की,याहून थोर मानव पुढे पैदा होतील,

या नमुन्याहून अधिक थोर नमुने या मातीतूनच पुढे आणखीही प्रकट होतील,भावी पिढ्यांना या व्यक्ती नीट दिसाव्यात म्हणूनच जणू त्या थोर व्यक्तींना त्यांच्या समकालीनांनी क्रॉसवर खिळे ठोकून टांगून ठेवले किंवा पुढील पिढ्यांना प्रकाश दिसावा म्हणूनच त्यांच्या शरीरांच्या मशाली पेटवून ठेवल्या..!


जोपर्यंत माणसे आपल्या मनातील कल्पना व विचार स्थापण्यासाठी दुसऱ्यास ठार करीत आहेत,तोपर्यंत मानवजात जंगलीच राहणार! तथापि,आपल्या ध्येयासाठी शांतपणे मरणास मिठी मारणारेही आहेत,तोपर्यंत आपण अखेर सुधारणार,शेवटी का होईना;पण सुसंस्कृत होणार,अशी अमर आशा बाळगण्यासही जागा आहे.


कधी कधी आपल्या ध्येयार्थ स्वतःचे बलिदान करू पाहणारा मरायला तयार असणारा समकालीनांच्या विषमय वृत्तीस बळी न पडतानाही दिसतो,मग ते सुदैव म्हणा वा दुर्दैव म्हणा.समकालीनांच्या तावडीतून वाचलेल्यांपैकी मार्टिन ल्यूथर हा एक होता.त्याला पाखंडीपणाबद्दल पुन्हापुन्हा मरणाची धमकी देण्यात येत होती.पण तो नेहमी निसटे.त्याचे वाचलेले दीर्घ जीवन मानवजातीला केवळ आशीर्वादरूप व मंगलमय होते का? आपण पाहू या.


इ.स. १५१० मधील गोष्ट.त्यावेळी रोममधील सेंट पीटर चर्चची दुरुस्ती करायची होती,त्याचा जीर्णोद्धार करायचा होता.त्यासाठी पोपने क्षमापत्रे द्यायचे ठरविले.जो कोणी या कामाला मदत करील,त्याला पापमुक्तीची प्रशस्ति-पत्रे पोप दुसरा ज्यूलियस हा देणार होता.या प्रॉमिसरी नोटांत 'चर्चला मदत करतील त्यांना प्रभू मरणोत्तर सर्व पापांची क्षमा करील.'असे आश्वासन देण्यात येत असे.सनातनी लोकांना यात काही वावगे आहे असे वाटले नाही.पोपचा स्वर्गाशी प्रत्यक्ष व्यवहार असतो,असे समजले जाई.

एखाद्याने चर्चला लहानशी देणगी दिली तर त्याचा नरकातील निवास थोडा कमी होई;देणगी मोठी असेल तर नरक नक्की चुकविता येत असे.यामुळे क्षमापत्रांचा हा पोपचा पापी धंदा चांगलाच तेजीत होता.ही पापमुक्ती पत्रे जास्तीतजास्त पैसे घेऊनच भटभिक्षुक विकीत.सेंट पीटर चर्चच्या जीर्णोद्धारार्थ ही पापमोचन-पत्रे मोठ्या गाजावाजाने विकली जाऊ लागली.ऐपतीपेक्षा अधिक पैसे देऊनही शेतकऱ्यांनी ही चिठोरी विकत घ्यावी अशी जबरदस्ती त्यांच्यावर होऊ लागली.यामुळे ल्यूथरचा संताप जागृत झाला.तो धार्मिक वृत्तीचा कॅथॉलिक व डोमिनिकन पंथी होता,तरी त्याचे मन स्वतंत्र विचारांचे होते.तो विटेनबर्ग विद्यापीठात धर्म या विषयाचा प्राध्यापक होता.ईश्वर राजकारणात ढवळाढवळ करणार नाही,तद्वतच पोपांच्या या पापमोचक पत्रांशीही त्याचा काहीच संबंध नाही,

याविषयी ल्यूथर निःशंक होता.


१५५७ सालच्या ऑक्टोबरच्या एकतिसाव्या तारखेस त्याने तेथील किल्ल्यातल्या चर्चच्या दारावर पोपच्या कृत्यांचा जाहीर निषेध करणारे पत्रक लावले,"मनुष्यांनी केलेल्या पापांच्या बाबतीत प्रभूची जी काही इच्छा असेल,

तिच्यात ढवळाढवळ करण्याची शक्ती पोपला नाही, पोपचा असा हेतू असणे शक्य नाही.पोपकडून असली क्षमापत्रे घेण्यापेक्षा काही खरीखुरी सत्कर्मे केल्यास मात्र ईश्वराचे लक्ष वेधले जाण्याचा अधिक संभव आहे.भाडोत्री धर्मोपदेशक बहुजन समाजावर करीत असलेले अनन्वित जुलूम पोपला समजल्या सेंट पीटर चर्च धुळीस मिळाले तरी चालेल;पण जनतेच्या रक्ताने व हाडामांसानी ते बांधणे नको,असेच त्यालाही निःसंशय वाटेल.ख्रिश्चन धर्मीयांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,पोप अत्यंत श्रीमंतांहूनही श्रीमंत,कुबेराचाही कुबेर आहे; तेव्हा त्याला एकट्याला सेंट पीटर चर्च बांधून काढणे मुळीच अवघड नाही.गरीब श्रद्धाळू लोकांपासून पैसे उकळून त्या पैशाने हे चर्च बांधण्यापेक्षा पोपने आपल्या स्वतःच्याच पैशाने ते का बांधू नये?" या जाहीर पत्रकाच्या शेवटी तो म्हणतो, "माझ्याशी मतभेद असणाऱ्यांना माझे आव्हान आहे.वाटल्यास त्यांनी माझी मते व माझे मुद्दे खोडून काढावेत." या वेळी ल्यूथर चौतीस वर्षांचा नवजवान होता.ल्यूथरच्या आव्हानामुळे वादाचे वादळच उठले ! पोपची सत्ता धुडकावून लावणारा हा ल्यूथर पाखंडी आहे,असे भटभिक्षुक,धर्मोपदेशक,सारे म्हणू लागले.पण जुलमामुळे गांजलेली जनता नवीन धर्म बंड करणाऱ्या या वीराभोवती उभी राहिली व 'हा आमचा पुढारी!' असे म्हणू लागली.पोपला सेंट पीटरचे कॅथॉलिक चर्च बांधायचे होते.त्याला विरोध करण्यास उभा राहिलेला ल्यूथर 'प्रॉटेस्टंट चर्च बांधणारा' म्हणून अमर झालाच,त्याच्या मनात नसतानाही त्याला प्रॉटेस्टंट चर्चचा पाया घालावा लागला. पण प्रॉटेस्टंट पंथीय सुधारणेचे कारण केवळ एवढेच नव्हते.खरी कारणे दुसरीच व फार खोल आणि गंभीर होती.या चळवळीची बीजे कित्येक शतकांपूर्वीच नास्तिक म्हणून समजल्या गेलेल्या लोकांकडून पेरली गेलेली होती.ती नवयुगात नीट रुजली;त्यांनी मूळ धरले व चर्चने जुलूम केला.तरी नव्हे,चर्चने जुलूम केल्यामुळेच - ती अंकुरली व योग्य वेळी ल्यूथरने केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या घोषणेच्या रूपाने फुलली.धार्मिक स्वातंत्र्याचा आत्मा चारशे वर्षे साकार होऊ पाहत होता.ल्यूथरने त्या आत्म्याला देह दिला; पण देह देऊन त्याने आत्मा मारला,असेच पुढे दिसून येईल.


ल्यूथरने धार्मिक वादळ उत्पन्न केल्यामुळे त्याला १५१८ सालच्या ऑक्टोबरात ऑग्सबर्ग येथे बोलावण्यात आले व बंडखोर विचार सोडून देण्याबद्दल आज्ञा करण्यात आली.

पण ल्यूथर ठाण मांडून उभा होता.त्याने काहीही करण्याचे नाकारले.तो जर्मनीत फारच लोकप्रिय होता. दोन वर्षांपर्यंत चर्च त्याच्या वाटेला गेले नाही. पण सौम्यतेने मन वळवून काम होत नाही असे आढळताच पोप छळण्यास उभा राहिला.१५२० सालच्या जूनमध्ये एक आज्ञापत्र काढून 'ल्यूथरची मते अधार्मिक आहेत',

असा शिक्का पोपने त्यावर मारला आणि ल्यूथरची सर्व पुस्तके जाळून टाकण्याची आज्ञा केली.त्याने ल्यूथरला क्षमा मागण्यासाठी साठ दिवसांची मुदत दिली. तेवढ्या मुदतीत क्षमा मागून आपले म्हणणे मागे न घेतल्यास त्याला शापित ठरविण्यात येईल अशी धमकी दिली!ल्यूथरने शापित होणेच पसंत केले.पोपच्या पत्रकाला त्याने तेजस्वी उत्तर देऊन पोपला त्याच्या चिल्यापिल्यांसकट आशीर्वादपूर्वक सैतानाकडे पाठवून दिले.विटेनबर्ग येथील जनता व विद्यार्थी यांचा उत्साह उचंबळला. ल्यूथरने पोपच्या पत्रकाची व विरोधकाच्या लिखाणाची जाहीररीत्या होळी केली !


पोपने नाटकाच्या शेवटच्या अंकाची सजावट सुरू केली व पाखंडी ल्यूथरला भस्मसात करण्याचे ठरविले.पण अंकाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य पात्रच पळून गेले! ल्यूथरला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मित्रांनी वार्टबर्गच्या किल्ल्यात नेले व तो तिथे नाव बदलून राहू लागला.

जर्मनीमध्ये नव्या कराराचे ग्रीकमधून भाषांतर करून तो आपला वेळ घालवीत होता. 'बायबल प्रत्येकाला वाचता आले पाहिजे' असे वुइक्लिफप्रमाणेच त्याचेही मत होते व पोपांची भाष्ये,विवरणे व स्पष्टीकरणे वाचण्याऐवजी बायबल स्वतः वाचून स्वतःच त्याचा अर्थ करावा, असे त्याने प्रतिपादिले.ल्यूथर अदृश्य झाल्यावर एक महिन्याने सम्राटाने 'ल्यूथर चर्चचा पाखंडी शत्रू व स्टेटचाही वैरी आहे' असे जाहीर केले.ल्यूथर कायद्याच्या ऐहिक व पारमार्थिक बाहूत (दोर्दंडांत) सापडला.ल्यूथर आता एक तर कायमचा अंधारात तरी गडप होणार;अगर हुतात्मा तरी होणार असे स्पष्ट दिसत असता पुन्हा त्याला दैवाने हात दिला. कारण याच वेळी फ्रेंचांनी जर्मनीशी युद्ध सुरू केल्यामुळे नास्तिकांना माफी देण्यात आली! सम्राट दहा वर्षे युद्धात गुंतल्यामुळे ल्यूथरला आपल्या सुधारणेची योजना आखून कार्यक्रम निश्चित करण्यात भरपूर वेळ मिळाला.त्याला प्रारंभी तरी कॅथॉलिक चर्चपासून अलग होण्याची इच्छा नव्हती,नवीन धर्म सुरू करण्याचीही त्याची मनीषा नव्हती.तो जुन्याच धर्मातील दोष काढून टाकू इच्छित होता.त्याचा धर्मोपाध्यायाच्या उद्दामपणाला विरोध होता.या धर्मोपाध्यायांनी आपण इतरांहून श्रेष्ठ असे का समजावे,हेच त्याला कळेना.चर्चच्या अधिकाऱ्यांनी केवळ ईश्वराचेच सेवक होऊन भागणार नाही,तर त्यांनी जनतेचेही सेवक झाले पाहिजे असे त्याला वाटे. ल्यूथरने धर्मोपदेशकांना "सामान्य लोकांप्रमाणे राहा,विवाह करा,आपली वागणूक सुधारा, आढ्यतेने जनतेपासून दूर राहू नका,निराळे पोषाख नकोत,

काही नको!"असे सांगितले.


चर्चच्या काही उत्सव-समारंभानाही ल्यूथरचा विरोध होता.एका विशिष्ट पद्धतीनेच प्रार्थना केली पाहिजे,असा सनातनी कॅथॉलिकांचा आग्रह असे.ल्यूथर म्हणे की,

आपलीच प्रार्थनापद्धती प्रभूला अधिक पसंत पडेल. अर्थातच हा प्रश्न औपचारिक होता.पण सोळाव्या शतकात औपचारिकपणालाही फार महत्त्व असे. एखाद्या धार्मिक वचनाचा अर्थ कसा लावावा, यावर रणे माजत; कत्तलीही होत! एखाद्या आध्यात्मिक वाक्यात स्वल्पविराम कोठे असावा इतक्या क्षुल्लक मुद्द्यावरूनही युद्धे पेटत.!


ल्यूथरची सनातन कॅथॉलिक चर्चवरची श्रद्धा अजिबात उडाली होती असे नव्हे.'थोडी नवी तत्त्वे,थोडे नवे विचार,

काही नवे विधिनिषेध, काही जुन्या अवडंबरांची काटाछाट',असे जुने चर्च सुधारण्याचे त्याचे धोरण होते.

त्याचे काही विचार उदात्त असले,तरी त्याचे पुष्कळसे म्हणणे हास्यास्पदच होते.त्याला नवे बांधायचे नव्हते;तर जुन्यालाच थोडेसे वळण द्यायचे होते.त्याला कॅथॉलिकांनी बहिष्कृत केल्यामुळेच तो स्वतःचे नवे प्रॉटेस्टंट चर्च स्थापण्यास सिद्ध झाला.कॅथॉलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च यांत केवळ बाह्यतःच फरक होता असे नव्हे;तर आंतर फरकही होणार होता.दोन्ही चर्चमध्ये अंतर्बाह्य भेद होता.प्रॉटेस्टंट चर्चमध्ये जो तो आपापला धर्मोपाध्याय होता,ईश्वर व भक्त यांच्या दरम्यान मधल्या पंड्यांची जरुरी राहिली नव्हती. प्रत्येकास आपापल्या इच्छेनुसार ईश्वराची पूजा करण्याची मुभा देण्यात आली होती.प्रॉटेस्टंट पंथीयांनी पोपची सत्ता मानण्याऐवजी बायबलची सत्ता मानायची होती व हे आपले धोरणच अधिक चांगले,असे प्रॉटेस्टंट रोमन कॅथॉलिकांनी पटवून देत असत.पण आता प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांस जाळू लागले,फाशी देऊ लागले.चर्चच्या पूर्वीच्या काही पाद्रयांप्रमाणे ल्यूथरही आपल्या अनुयायांना सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट सांगायला विसरला.त्याने धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व शिकविले नाही.ल्यूथर आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरंभी दयाळू,धैर्यशाली व शहाणा होता.त्याचे धैर्य शेवटपर्यंत टिकले;पण दया व प्रज्ञा यांनी मात्र त्याला पुढील वादविवादाच्या गोंधळात दगा दिला.तरुणपणी तो परित्यक्तांना व धर्मबाह्यांना दया दाखवी.स्वतः शेतकरी असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा कैवारी व मोठा मित्र होता.

छळाची कटुता त्याने स्वतः चाखली होती,त्यामुळे छळल्या जाणाऱ्या राज्यांविषयी त्याला सहानुभूती वाटे.'येशू हा ज्यू होता' या निबंधात ल्यूथर लिहितो,"ज्यू हे येशूचे आप्तच आहेत. त्यांचे रक्त एकच आहे आणि रक्त व मांस यांची प्रतिष्ठा अधिक असेल तर आपण जितके ख्रिस्ताचे आहोत,त्यापेक्षा ज्यूच ख्रिस्ताचे अधिक आहेत... म्हणून माझे सांगणे आहे की,ज्यूंना आपण दयाळूपणाने वागविले पाहिजे.पोपच्या कायद्याला न मानता आपण ख्रिस्ताने शिकविलेला प्रेमाचा कायदाच पाळला पाहिजे.आपण ज्यूंचे मित्र होऊ या.पण पुढे जेव्हा शेतकरी (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-सानेगुरुजी) राजेरजवाड्यांच्या जुलमाविरुद्ध बंडाची भाषा बोलू लागले,तेव्हा पोपच्या जुलमाविरुद्ध बंड करणारा ल्यूथरच राजाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना शाप देऊ लागला.त्याने 'वरिष्ठ सत्ता प्रत्येकाने मानलीच पाहिजे,'अशी गर्जना केली.पोपच्या बाबतीत निर्णय ठरविण्याचा हक्क लोकांस आहे,असे म्हणणाराच ल्यूथर राजाच्या बाबतीत मात्र जनतेचा निर्णय ठरविण्याचा हक्क नाकारीत होता.राजाने काहीही अन्याय केला.तरी त्याच्याविरुद्ध बंड करणे कधीही क्षम्य होणार नाही असे तो म्हणे.स्वर्गामध्ये सामाजिक न्याय स्थापण्यासाठी तो जन्मभर धडपडला;पण पृथ्वीवर सामाजिक न्याय स्थापण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याने शिव्याशाप दिले. 'खुनी व लुटालूट करणारे गुंड शेतकरी' असे एक पत्रक त्याने लिहिले.थोर इरॅस्मसूने या पत्रकावर 'केवळ रानटी' असा शेरा मारला. या पत्रकात ल्यूथर राजांना आग्रहाने सांगतो,हे शेतकऱ्यांचे बंड रक्तात बुडवून टाका." ख्रिस्ताच्या प्रेमधर्माचा हा शेवटचा भाष्यकार लिहितो, "राजेरजवाड्यांनो,इकडे या.हे बंड मोडायचे

आहे.हे अराजक थांबवायचे आहे.स्टेट वाचायचे आहे.या सारे धावून,हाणा,मारा,भोसका,ठार करा,गळे दाबा." राजेरजवाड्यांना पुन्हा असे प्रवचन पाजण्याची गरज नव्हती.या नवीन धर्मसुधारकांपासून स्फूर्ती व संदेश घेऊन त्यांनी शेतकऱ्यांस ठायी ठायी ठेचले,मारले, हाणले,ठार केले आणि अल्पावधीतच हे बंड शांत केले.ज्यूंच्या बाबतीतही त्याची पूर्वीची वृत्ती बदलली.ज्यूंना ते पुढे प्रॉटेस्टंट होतील,या आशेने त्याने सहानुभूती दाखविली होती.पण आपल्याच धर्माला चिकटून राहण्याचा त्यांचा अभंग निश्चय जेव्हा दिसून आला,तेव्हा तो त्यांच्यावरही आग पाखडू लागला.पूर्वी जसा तो शेतकऱ्यांवर तुटून पडला तसा आता तो ज्यूंवरही उलटला."ज्यूंच्या बाबतीत काय करावे?"असा प्रश्न विचारला असता त्याने जाहीररीत्या दिलेल्या उत्तरात तो म्हणतो,"त्यांची धर्ममंदिरे व त्यांच्या पाठशाळा जाळून टाका." जे जळणार नाहीत, ते मातीत गाडून टाका.त्यांची घरे लुटा,बरबाद करा.त्याची प्रार्थनापुस्तके,त्यांचे धर्मग्रंथ सारे जप्त करा. त्यांच्या धर्मोपाध्यायांना धर्म शिकविण्याची बंदी करा.जर ते ऐकणार नाहीत,तर त्यांना 'तुम्हाला ठार मारण्यात येईल,

तुमचे अवयवच्छेदन होईल', असे सांगा व तरीही त्यांनी न ऐकल्यास त्यांच्या जिभा उपटा." ज्या ज्यूंनी ल्यूथरला त्याचा देव दिला, येशू दिला,त्या ज्यूवरच त्याने अशी आग पाखडली!जवळजवळ चारशे पृष्ठांचे शापपुराण त्याने ज्यूंच्या बाबतीत खरडले आहे.


वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी,म्हणजे १५४६ साली ल्यूथर मरण पावला.जुलमांविरुद्ध बंड करून त्याने सार्वजनिक जीवनास आरंभ केला;पण शेवटी तो स्वतःच जुलूम करणारा ठरला.प्रो. जॉर्ज फूट मूर हा आपल्या 'धर्माचा इतिहास' नामक ग्रंथाच्या दुसऱ्या भागात लिहितो, " मध्ययुगातील चर्च ज्याप्रमाणे सत्ता व मत्ता यामागे उभे असे,त्याचप्रमाणे ल्यूथरचा धर्मही सत्ताधीशांना व मालदारांना आशीर्वाद देण्यासाठीच उभा राहिला.

बायबलातून इहलोकी व परलोकी नवीन आशा मिळेल असे ज्यांस वाटत होते,त्यांच्या आशेची ल्यूथरने राखरांगोळी करून टाकली..! " हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की,ख्रिस्ताने पददलितांच्या रक्षणासाठी धर्म स्थापला;पण ल्यूथरने मात्र पूर्वीच्या कित्येक कॅथॉलिकांप्रमाणेच पददलितांवर जुलूम करणारा धर्मच स्थापण्याचा यत्न केला.रूढ ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्मापासून अद्याप फार दूर होता.