स्काॅटलंडयार्ड मधील ही गोष्ट आहे..!
'बेकर' नावाचा एका अतिशय श्रीमंत गृहस्थाचा पुतण्या जाॅन हा एकमेव सख्खा वारसदार होता. काका अगदी मुलाप्रमाणे जाॅन शी व्यवहार करीत होते.जाॅन चं मात्र काकांशी कधी फारसं पटत नसे.दोघांच्या विचारात जमीन
अस्मानाचा फरक होता.जाॅन ला भटकंती अतिशय प्रिय होती.वेगवेगळे प्रदेश फिरुन यावे धमाल आयुष्य जगावं,
ह्या उद्देशाने एक दिवस जाॅन घरातून बाहेर पडला... जाॅन च्या सात पिढ्या बसून खातील एवढी रग्गड संपत्ती असल्याने कसलीही कमी नव्हती. भटक-भटक भटकावं,
एखाद्या उंची हाॅटेलमधे मुक्काम ठोकावा,चैन करावी,
कंटाळा आला की दुसर्या शहरात जावं;हा त्याचा आयुष्यक्रम होता.इकडे काका मात्र त्याला दरवेळेस तो म्हणेल तेवढा पैसा ठरावीक तारखेला त्याने कळवलेल्या ठिकाणी पाठवत असत.
'जाॅनने महिन्यातून एखादं पत्र लिहून आपला समाचार व झालेल्या खर्चाचा आकडा त्याने विनातपशील कळवावा.पण पत्र नसेल तर त्या महिन्यात मात्र पैसा मिळणार नाही.'
एवढी एकच त्यांची अट होती.
असे दिवसांमागून दिवस जात होते.भटक्या जाॅनला प्रवासात 'निक' नावाचा त्याच्याच वयाचा एक सोबती मिळाला.निक अतिशय चलाख व कामसू होता.तो सुद्धा तसा भटक्या स्वभावाचा होता.त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य तसं दारिद्र्यात व्यतीत झालं होतं.
जाॅनने त्याला मित्राचं स्थान व मान दिला.त्याचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं.जाॅन तसा आळशी प्रवृत्तीचा होता काकांना पत्र लिहिण्याची जबाबदारी त्याने निक वर टाकली. मैत्रीचं नातं मिळालं तरी निक मात्र जाॅन ला मालक समजायचा.
जाॅन ची लहानसहान सर्व कामं तो करायचा. जाॅन च्या काकांना 'जाॅन' च्या नावाने वेळच्या वेळी पत्र पाठवायचा,
काकांनी विचारणा केली नसूनही रोजच्या रोज खर्चाचा हिशोब ठेवायचा.
जाॅन चा आळस इतका वाढत गेला की पत्राखाली आपली स्वाक्षरी करायलासुद्धा तो निक लाच सांगू लागला. हळूहळू जाॅन च्या वतीने निकच सर्व ख्यालीखुशाली व पैशाचा तपशील काकांना कळवू लागला.'जाॅन' च्या सांगण्यावरुन 'निक' नावाचा मित्र मिळाल्याचं काकांना कळवलं.व 'जाॅन' च्याच सांगण्यावरुन 'निक' चं कौतुकही पत्रामधून काकांना कळवलं. काळ पुढे सरकत होता... आता काकांच्या पत्रांमधेही निक चं कौतुक येऊ लागलं.
" निक तुझ्याबरोबर आहे,तुझी काळजी घेतो, सगळे हिशोब ठेवतो,दर महिन्याला पत्रव्यवहाराची आठवण करुन देतो.निक मुळे मला आता तुझी काळजी राहिली नाही,त्याला तुझ्या मित्राप्रमाणेच वागवत जा..." असा मजकूरही त्यात वारंवार दिसू लागला.
दिवस... महिने... वर्ष... मजेत चालली होती. जाॅन प्रमाणे निक ला सुद्धा आता ऐषारामाची सवय जडली होती;पण
'जाॅन ची लहर मधेच फिरली व त्याने आपल्याला दूर लोटलं तर आपले हाल कुत्रा खाणार नाही...'असे विचार निक च्या मनात येऊ लागले.तो बोलता-बोलता हा विषय आडमार्गाने काढायचा म्हणायचा,
"अरे जाॅन,माझ्या आयुष्याचा विचार मला कधीतरी करायलाच हवा.असं किती दिवस मी तुमच्या पैशावर अवलंबून राहू?"_
"त्याची काही गरज नाही रे मित्रा,मी तुला कधीही अंतर देणार नाही."
" पण... तुझी मर्जी अचानक फिरली तर....?"_
" नाही रेऽ ते अशक्य आहे!"_
तरीदेखील माझ्या समाधानासाठी काहीतरी तू लेखी लिहून दे ना...माझ्या नावाने एखादी रक्कम बँकेत जमा करुन दे."
" कशाला? तसंही येणारे सर्व पैसे तुझ्याजवळच असतात...त्यातले हवे तेवढे पैसे काढून ठेवत जा.मला सांगूदेखील नकोस."
"अरे नाही,ही लबाडी माझ्या हातून होणार नाही; म्हणून तर काही रक्कम लेखी माझ्या नावाने करायला सांगतोय ना?" जाॅन त्यावर फक्त हसायचा व तो विषय तिथंच संपायचा. पण निक च्या मनातली काळजी मात्र कमी होत नव्हती आणि लबाडी करायला मन धजावतही नव्हतं.वर्षांमागून वर्ष गेली... हे दोघं अनेक शहरांचा दौरा करत करत स्काॅटलंडयार्डपासून खूप दूरच्या शहरात आले असताना एक दिवस अचानक तिथे एक तार आली...
'Mr.Becker dead.Start early...'
काका अचानक वारल्याची तार निक ने जाॅन ला वाचून दाखवली.तारेमधे लिहिल्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब काकांकडे जाणं किती आवश्यक आहे ते जाॅन ला सांगितलं. " थोड्या वेळाने बोलू,माझं डोकं आत्ता खूप दुखतंय...मला जरा विश्रांती घेऊ दे." जॉन एवढंच म्हणाला... "अरे असं काय म्हणतोस? तिथं तू नाहीस... काका अचानक वारले आहेत आणि त्यांच्या अमाप संपत्तीचा तू एकमेव सख्खा वारसदार आहेस...! तू तिथं लगेच गेला नाहीस व इतर नातेवाईकांनी सगळी संपत्ती गिळंकृत केली तर...?? "
"हे बघ निक,माझं डोकं प्रचंड दुखतंय.मला झोपू दे."_ एवढंच बोलून जाॅन झोपून गेला.
निक ची ती रात्र तंद्रीतच गेली.सकाळी 'बिग बेन'च्या आवाजाने तो भानावर आला.बघतो तर जाॅन तापाने फणफणला होता.निक ने ताबडतोब डाॅक्टरला बोलावलं.डाॅक्टरांनी जाॅन ला तपासलं.स्टेथोस्कोप बाजूला काढून ते म्हणाले,
" दोन दिवसांची औषधं देतो... तोपर्यंत काही चाचण्या करुन घेऊ;कारण मला हा साधा ताप वाटत नाही.ह्या परिस्थितीत तुम्ही मात्र ह्याला सोडून कुठेही जाऊ नका...!"_
डाॅक्टरांनी असं सांगितल्यावर निक ला काही सुचेनासं झालं. 'जाॅन चं काही कमी जास्त झालं तर आपलं काय होईल? आपण तर रस्त्यावर येऊ...!'_ ह्या विचाराने निक च्या छातीत धऽस्स झालं,जाॅन ची प्रकृती ढासळत गेली व चार दिवसातच जाॅन ने जगाचा निरोप घेतला...!
डेथ सर्टिफिकेट लिहिताना डाॅक्टरने विचारलं,
"ह्याचं आणि तुमचं नातं काय? "
"अंऽऽऽ.... नातंऽऽ.....?? नातं म्हणजे खरं सांगायचं तर नोकर व मालकाचं!"_निक म्हणाला.
" म्हणजेऽऽऽ... हा इसम तुमचा?...."
क्षणभर निक च्या मनात वादळ घोंगावलं व स्वतःच्या भविष्याची काळजी भेडसावली...
डाॅक्टरांना नजरेस नजर न मिळवता तो पटकन् म्हणाला,
"हा 'निक'...!! माझा नोकर
व मी त्याचा मालक... 'जाॅन'...!!!
डाॅक्टरांकडून निक नं 'निक' च्या नावाचं डेथ सर्टिफिकेट घेतलं व 'जाॅन' चा दफनविधी उरकला.रुमवर येऊन सामानाची आवराआवर केली व निक ने 'जॉन' बनून तडक स्काॅटलंडयार्ड गाठलं...!
.....आणि....
काकांच्या भव्य अशा 'बेकर्स व्हिला' मध्ये तो 'जाॅन' ह्या नावाने दाखल झाला.
अनेक वर्षांच्या पत्रव्यवहारातून त्याला जाॅन च्या कुटुंबाची पूर्ण माहिती झाली होती... त्याचं व जाॅन चं वयसुद्धा जवळपास सारखंच होतं... जाॅन कितीतरी वर्ष घराबाहेर असल्याने कुणाला जाॅन चा चेहरा आठवण्याची शक्यताही नव्हती व काका तर वारले होते..!!!
त्यामुळे 'निक' हा जाॅन'म्हणून तिथे सहज स्वीकारला गेला...! काकांचा एकुलता एक सख्खा पुतण्या आल्याची खबर लागल्याने १-२ दिवसातच काकांचे साॅलिसिटर आले.
"जाॅन,मी तार पाठवली होती... तुम्ही लगेच इथे याल अशी अपेक्षा होती."
"सर,मी येणारच होतो पण माझा मित्र 'निक' आजारी पडला.त्याला एकट्याला अनोळखी शहरात सोडून जाणं मला गैर वाटलं व त्या आजारातच 'निक' चा मृत्यू झाला.सारं दुःख गिळून मी इथे आलो..."_ असं म्हणून त्याने 'निक'च्या नावे बनवलेलं डेथ सर्टिफिकेट साॅलिसिटरपुढे ठेवलं.
ओऽऽह... नोऽ.!! साॅलिसिटरने दीर्घ सुस्कारा सोडला..'जाॅन',हे फार वाईट झालं...!
" काकांनी ह्या मृत्यूपत्रात आपली सर्व संपत्ती तुमच्या ह्या प्रामाणिक मित्राच्या; म्हणजे 'निक'च्या नावाने केली आहे.जाॅन,तुमच्यापेक्षा ह्या 'निक' वरच काकांचा अधिक विश्वास होता....!!!
"आणि... आता मात्र 'निक च्या पश्चात् ही सर्व संपत्ती जवळपासच्या सर्व चर्चेसमधे दान देण्यात यावी... आपल्या संपत्तीमधला एक कणही अप्रामाणिक व्यक्तीला मिळू नये',अशी काकांची अखेरची इच्छा होती..!!"_
हे ऐकल्यावर मात्र कोणीतरी येऊन फाऽडकन् थोबाडीत मारावी आणि डोळ्यासमोर काजवे चमकावेत...असं निक चं झालं व त्याला जाॅन बरोबरचा काही दिवसांपूर्वीच झालेला संवाद आठवला....
सिग्नलपाशी उभे असताना जाॅन म्हणाला होता..
समोर पोलिस असताना सिग्नल न तोडणे ही तर 'Honesty' आहे;पण पोलिस नसतानाही नियमांचे उल्लंघन न करणे ही झाली.' 'INTEGRITY!!!'
साॅलिसिटरने आपल्या ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढून वाचायला सुरुवात केली... पण,सुन्न अवस्थेत असलेल्या निक च्या कानात त्यातला एकही शब्द घुसत नव्हता... त्याचं डोकं बधीर झालं होतं.त्याच्या डोळ्यासमोर फक्त समोरच्या टेबलवरील डेथ सर्टिफिकेट मधली अक्षरं नाचत होती...
_'Mr. Nick is clinically dead...!'_
लेखक - अनामिक / अज्ञात