सोमनाथ मंदिराच्या बाणस्तंभावर कोरलेला श्लोक असा आहे.
आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतीर्मार्ग...!
(या मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रस्त्यात एकही अडथळा [जमीन] नाही.येथून ज्योतीचा मार्ग [प्रकाश] सरळ तिथपर्यंत पोहोचू शकेल.)
अर्थात दीड-दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना जर दक्षिण ध्रुव माहीत असेल तर त्यांनी नक्कीच पृथ्वी
प्रदक्षिणा केलेली असणार.म्हणजे जगाच्या पाठीवर भारतीयांच्या पाऊलखुणा निश्चितच असतील.आजपासून एक हजार वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक व्यापारात भारत २७% ते ३०% हिस्सा घेऊन पहिल्या क्रमांकावर होता.आता व्यापाराला जाणारा माणूस त्या त्या क्षेत्रात आपल्या अगदी लहानशा का होईना, वसाहती निर्माण करतोच.जसं भारतात राजस्थानच्या मारवाडी समुदायांनी अगदी बांगलादेशपासून ते आसाम,दक्षिण भारतापर्यंत अनेक ठिकाणी लहान लहानशा वसाहती निर्माण केल्या.मात्र अशा प्राचीन भारतीयांच्या जागतिक पाउलखुणाबद्दल फारसं डॉक्युमेंटेशन कुठं आढळत नाही.अंबेजोगाईच्या डॉ.शरद हेबाळकरांनी एक छानसं पुस्तक लिहिलंय - 'भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार'.साधारण १९८० मध्ये लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकानंतर अनेक ठिकाणी उत्खनन होऊन बरीच नवीन माहिती मिळाली आहे.
त्यामुळे ह्या विषयावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे. डॉ.रघुवीर यांनी जगातील भारतीय लोकांच्या उपस्थितीविषयी भरपूर लेखन केले आहे.विशेषतः
मंगोलियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.डॉ.चमनलाल यांचे 'हिंदू अमेरिका' हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.
या सर्व पुस्तकांमधून हिंदू अथवा भारतीय संस्कृतीचा जगभर झालेला प्रवास दिलेला आहे. पण इतिहास संशोधकाला पुरावे लागतात.तसे पुरावे गोळा करण्याचे काम गेल्या वीस / पंचवीस वर्षांत फारसे झालेले नाही.
डॉ.विष्णू श्रीधर (हरिभाऊ) वाकणकर हे नावाजलेले पुरातत्ववेत्ता.मध्यप्रदेशातील आदिम खुणा असलेल्या 'भीमबेटका' गुहांचा शोध यांनीच लावला आहे.डॉ.शरद हेबाळकरांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना हरिभाऊंनी त्यांच्या १९८४ सालच्या अमेरिका आणि मेक्सिको प्रवासाचा अनुभव दिलेला आहे.तो सांगताना त्यांनी अमेरिकेच्या सन डियागोच्या पुरातत्व संग्रहालयाचे अध्यक्ष बेरीफेल यांचा उल्लेख केला आहे.या बेरीफेल महोदयांनी मेक्सिकोच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या युकाटन प्रांतात तावसुको नावाच्या जागी,माया संस्कृतीच्या मंदिरांमधे मिळालेल्या 'वासुलून' नावाच्या भारतीय महानाविकाच्या भाषा आणि लिपीमधे लिहिलेल्या मजकुराचा उल्लेख केला आहे. आणि या पुराव्यावरून बेरीफेल यांनी निर्विवादपणे सांगितले आहे की,आठव्या / नवव्या शतकात तिथे भारतीय जात होते. दुर्दैवाने ह्या 'वासुलून' महानाविकाच्या शिलालेखाचा फोटो कुठेच उपलब्ध नाही. म्हणजे तो शिलालेख तिथल्या संग्रहालयात नक्कीच असेल,पण कोणी तेथे जाऊन त्याचा फोटो प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एखादे प्रतिपादन करायला ठाम पुरावे लागतात. ते गोळा करण्याचं मोठं काम करण्याची फार आवश्यकता आहे.
मात्र आता असे पुरावे मिळताहेत.भारतीय / हिंदू / वैदिक,अगदी कुठलंही नाव आपण दिलं तरी आपल्या प्राचीन संस्कृतीचं अस्तित्व जगभर सापडतंय.भारताच्या पूर्वेला तर आपल्या संस्कृतीचे अंश आजही बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात.पण भारताच्या पश्चिमेला विशेषतः इजिप्त,युरोप इथेही दोन - तीन हजार वर्षांपूर्वीचे वैदिक संस्कृतीचे अस्तित्व उठून दिसते.मध्यंतरी Out of India Theory (OIT), मांडली गेली होती.या सिद्धांताप्रमाणे, भारतातील काही सुसंस्कृत पंथ/जमाती/ समूह, वेगवेगळ्या कारणांनी युरोपात,आफ्रिकेत स्थलांतरित झाले.यात एक प्रमुख नाव आहे, केल्टिक (Celtic) लोकांचं.
केल्टिक ही युरोपात बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा (किंवा भाषासमूह) बोलणारे लोक हे ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांपूर्वी युरोपात होते असं संशोधनाने सिद्ध झाले आहे.ख्रिस्तपूर्व सातव्या आणि आठव्या शतकांतले त्यांच्या अस्तित्वाचे बरेच पुरावेही मिळाले आहेत.त्या काळात रोमन त्यांना 'गल्ली' म्हणत,तर ग्रीक 'केल्टोई' म्हणत.ह्या दोनही शब्दांचा अर्थ बार्बेरिक असा होतो.
साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हे केल्टिक लोक ब्रिटनच्या आजूबाजूला आले आणि स्थिरावले.आजही आयर्लंड,स्कॉटलंड,वेल्स,कॉर्नवॉल,ब्रिटन या भागात चार प्रकारच्या केल्टिक भाषा,ह्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात.एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी ह्या केल्ट मंडळींचे मूळ हे फ्रांस आणि जर्मनीच्या आसपास मानले गेले होते.मात्र नंतर त्यांच्या मूळ जागेबद्दल अनेक सिद्धांत मांडले गेले.दुईस बेलेनोईस आतेग्नातोस (Druuis Belenois Ategnatos) ह्या पुरातत्त्व संशोधकाने केल्टिक ही जमात हिंदू / वैदिक जमातींपैकी एक असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच्या सिद्धांताप्रमाणे ह्या केल्टिक लोकांचे मूळ हे 'उत्तर कुरु' ह्या राज्यात होते. उत्तर कुरु म्हणजे हिमालयाचा उत्तर पश्चिम भाग. अनेक इतिहास संशोधकांच्या मते हिमालयाच्या उत्तरेतही,पूर्वी वैदिक संस्कृतीच होती.
विशेषतः डावीकडे किर्गीस्तानपासून ते उजवीकडील तिबेट- पर्यंतच्या फार मोठ्या प्रदेशात वैदिक संस्कृती नांदत होती.पुढे बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे या जमातीतील काही लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.ते तिथेच राहिले आणि ज्यांनी सनातन वैदिक धर्माची कास सोडली नाही,ते युरोपच्या दिशेने स्थलांतरित झाले.तेच हे केल्टिक लोक..!! आजही त्यांच्या नैमित्तिक गोष्टींमधील अनेक प्रथा आणि पद्धती वैदिक प्रकाराच्या जवळ जाणाऱ्या आहेत.अनेक युरोपियन इतिहासतज्ज्ञांनी ह्या केल्टिक लोकांना 'युरोपातील ब्राम्हण' हे नाव दिले आहे.कारण वैदिक धर्माप्रमाणे चालणाऱ्या अनेक प्रथा,ही मंडळी आजही पाळतात.पीटर बेरेस्फोर्ड एलिस (Peter Berresford Ellis) ह्या इतिहासतज्ज्ञाने देखील केल्टिक समूह म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती मानणारा हिंदूंचाच समूह आहे,जो पुढे कालांतराने युरोपात स्थलांतरित झाला,असे म्हटले आहे.
श्री.श्रीकांत तलगेरी ह्या इतिहासविषयक अभ्यासकांचे या विषयावर विपुल लेखन उपलब्ध आहे.तलगेरींच्या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेदपूर्वीच्या काळापासून अनेक हिंदू समूहांनी अफगाणिस्तान आणि युरोपच्या दिशेला स्थलांतर करायला सुरुवात केली होती.त्यामुळे अनेक युरोपियन संस्कृतींच्या मुळाशी हिंदू संस्कृतीच्या लहान-मोठ्या पाऊलखुणा आढळतात.तलगेरींच्या मते ऋग्वेद लिहिण्याचा काळ हा दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे.'द ऋग्वेद - ए हिस्टॉरिकल ॲनालिसिस' या आपल्या ग्रंथात ते ऋग्वेदात वर्णन केलेल्या राजवंशांचा मागोवा घेतात.त्यांच्या मताप्रमाणे भारताबाहेर स्थलांतरित झालेले इतर हिंदू समूह आहेत.
१.पार्थस किंवा पार्थवस (ऋग्वेद ७ - ८३ - १)
पार्थियन्स
२.पार्सस किंवा पर्सवास (ऋग्वेद ७ - ८३ - १)
पर्शियन (पारसी)
३.पख्तास (ऋग्वेद ७ - १८ - ७) पख्तून
४.भालानास (ऋग्वेद ७ - १८ - ७) बलुची
५.शिवस (ऋग्वेद ७ - १८ - ७) किवास
कोनराड ईस्ट (Koenraad Eist) ह्या संशोधकानेही श्रीकांत तलगेरींचे मत उचलून धरलेले आहे.
असाच एक समूह आहे, जो इराक,सिरीया, जर्मनी,आर्मेनिया,रशिया येथे राहतो.हा 'येझिदी' समूह मुस्लीम नाही.ख्रिश्चनही नाही.पारशी धर्म मानणारा पण नाही.यांचा स्वतःचा 'येझिदी पंथ' आहे.मात्र हा पंथ,हिंदू धर्माच्या अगदी जवळ जाणारा आहे.अनेक संशोधकांनी ह्या 'येझिदी' पंथाला,हिंदूंचा एक पश्चिम आशियात हरवलेला पंथ म्हटले आहे.
यांच्या नेमक्या संख्येबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत.अनेक लोकांच्या मते ह्या पंथाची संख्या १५ लाख आहे.हा पंथ मानणारे लोक प्रामुख्याने इराक आणि सिरीया इथे राहतात.
गंमत म्हणजे,पाकिस्तानचे एक पोर्टल आहे.'पाकिस्तान डिफेन्स' नावाचे (www.defence.pk). ह्या पोर्टलवर त्यांनी एक सविस्तर लेख दिलाय,ज्याचं शीर्षक आहे - "The Yazidi Culture is Very Similar to a Hindu sect'.या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे जगात फक्त ७ लाख येझिदी शिल्लक राहिलेले आहेत आणि ते मुख्यतः इराकजवळच्या कुर्दिश भागात राहताहेत.या लेखात अनेक पुरावे देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की,येझिदी म्हणजे प्राचीन हिंदूंचा एक स्थलांतरित झालेला समूह आहे.या येझिदीची प्रार्थनास्थळे ही अगदी हिंदूंच्या देवळासारखी दिसतात.त्यांच्या मंदिरांवर नागाचे चित्र चितारलेले असते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येझिदी लोकांची जी पवित्र खूण आहे,त्यात पिसारा फुलवलेला मोर प्रामुख्याने आहे.गंमत म्हणजे इराक,सिरीया वगैरे ठिकाणी कुठेही मोर हा प्राणीच आढळत नाही.आणि ह्या मोराचं साम्य,तामिळ भगवान सुब्रमण्यम यांच्या परंपरागत चित्राशी / प्रतिमेशी आहे.पिवळा सूर्य हा येझिदींचं प्रतीक आहे.या सूर्याची २१ किरणं आहेत.२१ ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते.आपल्यासारख्याच समया,
तसंच दीप प्रज्वलन, स्त्रियांच्या कपाळावर पवित्रतेची बिंदी,तीच पुनर्जन्माची श्रद्धा... हिंदूंच्या अनेक चाली-रीती येथे ठळकपणाने उठून दिसतात.आपल्या हिंदूंसारखेच तेही हात जोडून त्यांच्या देवाला नमस्कार करतात.
आपल्यासारखेच तेही यज्ञ करतात.आपल्यासारखीच पूजा करतात, आरतीची ताटं तयार करतात.अशी कितीतरी साम्यस्थळे ह्या दोन संस्कृतीत दिसून येतात.
याचा अर्थ स्पष्ट आहे.अत्यंत संपन्न अन् वैभवशाली अशा हिंदू / वैदिक संस्कृतीचे पाईक, हे समूह,
ख्रिस्तपूर्व दोन हजार / तीन हजार वर्षांआधी निरनिराळ्या कारणांनी स्थलांतर करून जगातल्या वेगवेगळ्या भागात गेले. काहींनी आजूबाजूच्या परिस्थितीशी / वातावरणाशी मिळतंजुळतं घेतलं अन् थोडीफार तरी संस्कृती टिकविली,तर काहींनी थोडी जास्त..! त्यांच्या ह्या प्रवासाच्या पाऊलखुणा,शोधल्या तर सापडतात.रशियाच्या दक्षिणेला युक्रेन हा देश आहे,जो पूर्वी रशियाचाच एक भाग होता.या युक्रेनमधे,काळ्या समुद्रकिनारी एक मोठं शहर आहे,ओदेसा (ओडीसा..?) नावाचं.याचं इंग्रजीत स्पेलिंग आहे - Odessa. या शहरात पुष्किन संग्रहालय आहे. या संग्रहालयात भारतीय देवतांच्या तीन प्रतिमा ठेवलेल्या आहेत, ज्या अगदी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेसारख्याच दिसतात...! या ओदेसा शहरात,काही वर्षांपूर्वी,अगदी प्राचीन आणि मोडकळीस आलेल्या,हजार वर्षं जुन्या स्मारकाच्या जागी खोदकाम करताना ह्या प्रतिमा सापडल्या.धातूच्या ह्या प्रतिमा,हुबेहूब जगन्नाथपुरीच्या देवांसारख्या आहेत..!
भारतीयांच्या विश्वव्यापी पाऊलखुणा ठसठशीतपणे बघायच्या असतील तर बेरेनाईक (Berenike) प्रकल्पाचा अभ्यास करणं आवश्यक होऊन जातं.
बेरेनाईक हे इजिप्तमधले अतिशय प्राचीन असे बंदर आहे.सुवेझ कालव्याच्या दक्षिणेला ८०० किलोमीटरवर असलेले हे बंदर लाल समुद्राच्या पश्चिम तटावर आहे.हा बेरेनाईक प्रकल्प,पुरातत्त्व उत्खनन प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प आहे.१९९४ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प,अजूनही चालूच आहे. नेदरलंड फाउंडेशन फॉर साइंटिफिक रिसर्च, नॅशनल जिओग्राफी,नेदरलंडचे विदेश मंत्रालय, युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाला पैसा पुरवला आहे.
ख्रिस्तपूर्व २७५ वर्षांपूर्वी,टोलेमी - द्वितीय (Ptolemy II) ह्या इजिप्तच्या राजाने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर हे बंदर बांधले आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले - बेरेनाईक.हे बेरेनाईक स्वाभाविक बंदर तर होतेच,पण हवामानाच्या दृष्टीनेही व्यापारी मालासाठी अनुकूल होते.या बंदरापासून,उंटांच्या द्वारे मालाचे दळणवळण इजिप्तच्या आणि शेजारील देशांच्या इतर भागात सहजतेने होत होते.भारताच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे, येथे भारतीयांच्या प्राचीन वैश्विक व्यापाराचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.या उत्खननात त्यांना सुमारे ८ किलो काळी मिरी सापडली,जी निर्विवादपणे दक्षिण भारतातच उगवली जायची.याशिवाय भारतातून निर्यात झालेले काही कपडे,चटया,आणि पिशव्या मिळाल्या.कार्बन डेटिंगमधे हे सर्व सामान इसवी सन ३० ते इसवी सन ७० चे निघाले.
या उत्खननात संशोधकांना एक रोमन पेटी मिळाली,ज्यात भारताच्या 'बाटिक प्रिंट'चे कपडे आणि भारतीय शैलीतले चित्र काढलेले कपडे मिळाले. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )
या सर्व उत्खननातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला की,भारताचा हा समुद्री 'स्पाईस रूट', लोकप्रिय आणि प्रचलित असलेल्या 'सिल्क रूट' पेक्षाही आधीचा होता.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून बेरेनाईकच्या बंदरापर्यंत समुद्री मार्गाने भारताच्या जहाजांची ये-जा होत होती. पुढे इसवी सन ५०० च्या नंतर बेरेनाईकमधे प्लेगची साथ उद्भवल्याने ह्या बंदराचा व्यापार जवळजवळ बंद झाला.
एकुणात काय तर ख्रिस्तपूर्व दोन / तीन हजार वर्षांपूर्वी,म्हणजे आजपासून चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू आपल्या समृद्ध आणि संपन्न संस्कृतीला घेऊन जगप्रवास करत होते.व्यापार करत होते.ज्ञान-विज्ञानाचा वसा जगाला देत होते.जगातील अनेक ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले ते हिंदू नाविक/ व्यापारी.
दुर्दैवानं या सर्वांचा इतिहास आपल्याला जपता आला नाही.म्हणूनच कोलंबस,वॉस्को-डी-गामा, मार्को पोलो,
ह्यूएनत्संग सारखी नावं जगप्रसिद्ध झाली अन् आपल्या पराक्रमी नाविकांची / व्यापाऱ्यांची / धाडसी राजांची नावं इतिहासाच्या काळोखात बुडून गेली..!
मग कधीतरी बेरेनाईकसारख्या उत्खनन प्रकल्पाचे गवाक्ष उघडते.प्रकाशाची तिरीप येते आणि त्या लहानशा प्रकाशकिरणात प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास झळाळून उठतो..!!