* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/४/२४

पक्षिसृष्टी - birdlife

साऱ्या जगात अंदाजे आठ हजार प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात.त्यापैकी सुमारे दोन हजार ते अडीच हजार पक्षिकुळं भारत आणि पाकिस्तानात दिसून येतात.म्हणजे जगातील एकूण पक्षिकुळांपैकी एक तृतीयांश जाती वरील क्षेत्रात आढळून येतात. 


पक्षिगणाविषयीची ही विविधता जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.याचं मुख्य कारण आहे या प्रदेशातील निसर्गसृष्टीची विविधता.इथे राजस्थानमधील काटेरी झाडांची वनं आहेत, तशीच हिमालयात देवदाराची अरण्यं आहेत.जसा वाळवंटी प्रदेश आहे,तशीच बर्फानं आच्छादलेली हिमालयाची उंच शिखरं आहेत.नुसता हिमालय पर्वत आहे असं नव्हे,तर साऱ्या भारतात पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत.पश्चिम घाटासारखी हिरवीगार पर्वतमाळा आहे.तसेच सातपुडा,विंध्य अरवली,खाशी आणि गारो या पर्वतांच्या रांगा आहेत.

या साऱ्याच पर्वतश्रेणींत विविधता आहे.


पर्वत आले की त्यावरचा वनप्रदेश आला.भारतातील वनं प्रामुख्यानं रुंदपर्णी वृक्षांची आहेत.हिमालयात सूचिपर्णी झाडांची जंगलं आहेत.या दोहोंतदेखील अनेक प्रकारच्या वनांचा समावेश होतो.सदाहरित,अर्ध (सेमी) सदाहरित वनं.पानगळ,काटेरी आणि समशीतोष्ण जंगलं. या समृद्ध वनांतून विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.ते पानं,फुलं,

फळं आणि मध यावर उपजीविका करतात.कीटकांची सृष्टीदेखील बहुविध आहे.हे पक्षी अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया त्यांच्या शिटेतून आणि पिसांतून आणतात.त्यांच्या माध्यमातून वृक्षांच्या बियांचा प्रसार होतो.त्यात एखादी त्या क्षेत्रात न येणारी वनस्पतीदेखील असते.तीदेखील तिथे वाढू लागते.झाडांच्या शेंड्यांवर पर्णपक्षी असतात,तर मधल्या छतावर शिलींद्री आणि सुतार पक्षी आश्रय घेतात. जमिनीवर झुडपं असतात, गवत उगवतं, पालापाचोळा पडलेला असतो, हवेमुळे पडलेली पोकळ झाडं असतात. या क्षेत्रात मुख्यत्वे जमिनीवरील पक्षी राहतात.


वनं आणि पर्वतमाळा पक्षिसृष्टीतील विविधता वाढविण्यास अनुकूल असतात.त्या पर्वतांवरून उगम पावणाऱ्या नद्यादेखील पक्ष्यांची निवासस्थानं असतात.

त्या नद्या सखल प्रदेशातून वाहत शेवटी समुद्राला मिळतात.हा सारा जलमय प्रदेशदेखील पक्ष्यांसाठी आदर्श वसतिस्थान असतो.गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम हिमालयात झाल्यामुळे बर्फाच्या पाण्यामुळे त्या बारमाही वाहत असतात.गंगेचं विशाल खोरं प्रसिद्ध आहे. तिथल्या भूप्रदेशात जलचर पक्षी विपुल प्रमाणात आढळून येतात.

भारत द्वीपकल्पातील नद्या पावसावर अवलंबून आहेत.

उन्हाळ्यात त्या कोरड्या होतात.अति दक्षिणेकडच्या केरळ प्रदेशात तर समुद्राचं पाणी आत दूरवर घुसलं आहे.

या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे समुद्राच्या मुखावर खाजणीची अतिशय समृद्ध जंगलं आहेत.हा प्रदेशदेखील पक्षिकुलाचा निवास आणि वीण यांसाठी उपयुक्त आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता आणि वीज निर्माण करण्याकरिता नद्यांवर लहानमोठी धरणं बांधण्यात आली.ही नवनिर्मित जलाशयं पाणपक्ष्यांसाठी उपयुक्त ठरली.भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील अनुकूल भूरचना आणि माती यामुळे मूळ पर्यावरणाला धक्का न देता लहानमोठ्या तलावांचं जाळं निर्माण झालं आहे. हा तलावाचा प्रदेशदेखील पक्षिकुलाच्या निवासासाठी योग्य आहे.

साऱ्या महाराष्ट्रात सुमारे साडेपाचशे प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. परंतु,एकट्या विदर्भातच अंदाजे पाचशे प्रकारचे पक्षी आढळून येतात.


जैविक विविधता पक्षिसृष्टीला कशी अनुकूल होऊ शकते हे आत्तापर्यंत सांगितलं.शास्त्रीयदृष्ट्या पक्षिकुलाचं वर्गीकरण सांगणं अवघड असलं तरी सामान्य लोकांना समजेल असं वर्गीकरण करता येईल.


■.सागरीय पक्ष्यांत वादळी पक्षी म्हणजे पेट्रेल, पाणकावळा,गंगाचिल्ली म्हणजे गल,कावळा, समुद्र-कावळा यांचा समावेश होतो.


■.जलचर पक्ष्यांतबगळा,ढोकरी,ढोक,सारस, क्रौंच,हंस,रानबदक आणि पाणकोंबडी यांचा समावेश होतो.


■.शिकारी पक्ष्यांत गरुड,ससाणा,श्येन,शिक्रा, घार, घुबड आणि पिंगळा यांचा समावेश होतो.


■.स्थळनिवासी पक्ष्यांत मोर,रानकोंबडा,तित्तिर,

लावा,हिमालयातील पिझंट आणि चकोर यांचा समावेश होतो.


.वृक्षारोहक पक्ष्यांत पोपट,कोकिळा,भारद्वाज, नीळकंठ इत्यादींचा समावेश होतो.


पक्षिसृष्टीतील आजपर्यंत न सुटलेलं कोडं आणि विशेष प्रकार म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर. 


हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला लक्षावधी पक्षी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात आकाशमार्गानं उडत जातात.हा प्रवास ते काही वेळा समुद्रावरून किंवा खुश्कीच्या मार्गाने करतात.त्यांना हा आवश्यक प्रवास का करावा लागतो?इतक्या लांबच्या प्रवासाचा धोका ते का स्वीकारतात? ते आपला मार्ग कसा शोधतात? या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत.अलीकडे पक्ष्यांच्या पायांना कडी बांधून आणि इतर काही प्रयोगांमुळे या रहस्यमय गोष्टी पूर्वी-पेक्षा जास्त समजू लागल्या आहेत.


एका मुलुखातून दुसऱ्या मुलुखातील उलटसुलट प्रवासाचा नियमितपणा पक्षिस्थलांतराचा एक खास गुण आहे.हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलुखात पुष्कळ वेळा तेच तळं किंवा त्याच रानात हे पक्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात परत येतात.

सैबेरियातून भारतात येणारी रानबदकं आणि हंस यांचं उदाहरण आपण घेऊ या. 


निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी नागपूर


हिवाळ्यात सैबेरियात खूप थंडी पडते. तिथे बर्फ पडू लागतो. जलाशयं गोठून जातात.या पक्ष्यांना अन्न मिळेनासं होतं.अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात हे पक्षी स्थलांतर करून येऊ लागतात.स्थलांतर करणारे हे पक्षी रोजी पाचशे किलोमीटर अंतर सहज ओलांडून जातात.ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं ते उडतात.स्थलांतर करणारे हे पक्षी प्रामुख्यानं थव्यांतून राहणारे असतात. 


आकाशातून उडताना ते बाणाच्या टोकासारखी रचना करतात,टोकावर सर्वांत अनुभवी पक्षी असतो.तो इतरांना मार्ग दाखवितो.त्यांच्या शरीररचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं.त्यामुळे त्यांना उत्तर-दक्षिण दिशेचं ज्ञान होतं.शत्रुपक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून हे पक्षी रात्री प्रवास करतात.त्यावेळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या साह्यानं ते उडण्याची दिशा निश्चित करतात.त्याच मार्गानं वर्षानुवर्षे प्रवास करीत असल्यानं भूगोलावरील पर्वतशिखरं,नदींचा प्रवाह आणि इतर ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात.मार्ग अचूक शोधण्यासाठी ते या गोष्टींचा देखील उपयोग करतात.


उन्हाळ्याच्या सुरवातीला हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मुलुखात परतू लागतात.तोपर्यंत तेथील हिवाळा संपलेला असतो.स्थलांतराच्या वेळी पक्ष्यांच्या पिलांचं आचरण फारच आश्चर्यकारक असतं.त्या काळात ही पिलं उडण्यास थोडीफार समर्थ झाली असल्यास,ती नैसर्गिक प्रेरणेनं मातापित्यांबरोबर उड्डाण करून जातात.त्यांच्या अंगी इतका धीटपणा असतो की,हजारो किलोमीटरचं अंतर ती सहज उडून जातात.


आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो.त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.


कित्येक जण मला विचारतात की, ह्या पक्ष्यांचा आपणास उपयोग काय?पक्षी आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.आर्थिक दृष्ट्यादेखील त्यांचं महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडींवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदीरघुशींवर काही पक्षी उपजीविका करीत असल्यानं शेतीसाठी ते उपकारकच ठरतात.घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते.याशिवाय ते फुलांचं परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.मृत झालेले कीटक आणि सरपटणाऱ्या, कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे गावातील घाण नाहीशी करतात.घारी आणि गिधाडं मृत जनावरांवर तुटून पडतात.एक प्रकारे हे पक्षी नगर

पालिकेला घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात.


परंतु कावळ्यांची संख्या शहरातून तसंच खेडेगावातून उत्तरोत्तर कमी होत आहे.याचं मुख्य कारण म्हणजे विषारी औषधांचा अति वापर.विषारी द्रव्यं खाल्यामुळे जे कीटक,उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात ते कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्युमुखी पडतात.यातील जे जगतात,ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.हजारो वर्षांपासून कावळे हे माणसाबरोबर राहत आले आहेत.गावातील कावळे जंगलात राहू शकत नाहीत.कावळ्याचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे.म्हणजे तो सरासरीनं माणसापेक्षा अधिक काळ जगतो. 


महाभारतात अर्जुनाचा उल्लेख पूर्णपुरुष केला आहे.तसाच पक्ष्यांत कावळा हा पूर्णपक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांतून तो माणसाबरोबर जगत असतो.हा अतिशय सामान्य पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो.म्हणून आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अंतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्यासाठी कावळ्याची निवड केली होती.कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात.त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेता येतो.वराहमिहिर,पराशर,गार्ग्य,नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणा

वरून पूर्वी पावसाचा अंदाज दिला आहे.याकरिता कावळ्यांच्या संबंधाने तीन घटकांचा विचार केला आहे :


१.आंबा,निंब,पिंपळ,करंज,अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी घरटी केली तर पाऊस चांगला पडतो.बाभूळ,बोर,खैर,

हिवर आणि सावर या काटेरी झाडावर घरटी केली तर अवर्षण पडतं.


२.पूर्व,उत्तर,ईशान्य,नैर्ऋत्य आणि वायव्य या दिशांना कावळ्यांनी घरटी केली,तर पाऊस चांगला पडतो.

पश्चिम,दक्षिण,आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी घरटी केली तर पाऊस कमी पडतो. 


३.तिसऱ्या घटकात कावळ्यांनी किती अंडी घातली याचा विचार केला आहे.तीन ते चार अंडी घातली तर चांगली वृष्टी होते. एक अंडं घातलं तर अवर्षण पडतं.


याची खात्री करण्यासाठी १९९४ सालच्या उन्हाळ्यात मी कावळ्यांच्या घरट्यांचं निरीक्षण महाराष्ट्रातील पक्षि मित्रांच्या साहाय्यानं केलं.त्या पाहणीत मला आढळून आलं :


१. यंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडावा.


२.मराठवाड्यातील भूकंपग्रस्त लातूर विभागातील कावळे लुप्त झाले आहेत. कुठेही त्यांची घरटी दिसून आली नाहीत. यात धोक्याची सूचना आहे.


३.गडचिरोली भागात कावळे अजिबात नाहीत.ही चिन्हंदेखील चांगली नाहीत.


कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. 


कावळ्यासारखा पूर्णपक्षी आपल्यातून हळूहळू निघून चालला आहे.तो अशा रीतीनं लुप्त होणं ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कावळ्यां

बरोबर आणखीन एक पक्षिकुल नष्ट होईल;ते म्हणजे गोड गळ्यानं,पंचम स्वरानं गाणाऱ्या कोकिळांचं.

कारण कोकिळेची अंडी कावळे उबवितात.त्यांच्या पिलांची वाढ करतात.


पुस्तकं - books


मी गेल्यावर, 

तुला वाटेल की आपल्या बाबांनी 

वाचलियेत ही सारी पुस्तकं... 


पण नाही, 

अर्धही वाचता आलेलं नाहीय, 

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी, 

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं... 


माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागं, 

ही अक्षर ओळख सोडून फक्त... 


जिच्या मागे धावत मी 

पोहोचलो आहे इथवर, 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की, 

मलाही सोडता येणार नाहीय मागे, 

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी... 


ही काही पुस्तकं आहेत फक्त, 

जी तुला दाखवतिल वाट. 

चालवतील,तुला थांबवतील, 

कधी पळवतील,कधी 

निस्तब्ध करतिल, 

बोलतं करतील,कधी

टाकतिल संभ्रमात, 

सोडवतिल गुंते, 

वाढवतील पायाखालचा चिखल, 

कधी बुडवतील,तरवतील,कधी

वाहवतील,कधी थोपवतील,प्रवाह

अडवतील,तुडवतील,सडवतील, 

बडवतील,हरवतील,सापडतील... 


तुझ्याशी काहीही करतील, 

ही पुस्तकं... 


तू समोर आल्यावर, 

नेहेमीच कवेत घेवुन मी माझ्यातली

धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो... 


तशीच ही पुस्तकं 

उघडतील मधोमध,पसरतील हात, 

मिठीत घेतील तुला, 

आपोआप होतील हृदयाचे ठोके... 


यांच्यात रहस्य आहेत दडलेली,

अनेक उत्तरंही असतील,

प्रश्नांमधे कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील... 


एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच पल्प फिक्शन,कधी क्लासिक,सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल,कधी कवितीक,कधी किचकट,कधी सोपं असतं, ध्यानात असु दे या सगळ्यात वाईट काहिच नसतं... 


त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक, 

त्याच वेळची गरज असतं,समज नसतं... 


मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील, 

जी नेतील तुला जायचं आहे तिथं, 

फक्त मी असेन,तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही... कारण मी आधीच

होवुन गेलेलो असेन तुझ्यासाठी, 

एखादी कथा,एखादी कादंबरी, 

एखादी कविता,एखाद्या पुस्तकातली... 


माझी आठवण आली की, 

या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध... 


तुझा प्रवास बघ कसा

सोपा होवुन जाईल... 


(प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम )


भास एक भयकथा,लेखक - विष्णू गोपाळ सुतार,

यांच्याकडून व्हाट्सअप वरून आलेली ही कवीता…




२२/४/२४

थेंब मधाचे Drops of honey

माझ्या व्यवहारामध्ये सद् भाव आणि उत्साह सरळ सरळ झळकत होता.मी हे नाही सांगितलं की,भाडं खूप जास्त आहे.मी सुरुवात या गोष्टींनी केली की,मला त्याचं घर खूप आवडतं.विश्वास ठेवा,मी त्याच्या घराची मनसोक्त तारीफ केली. मी त्याला हेपण सांगितलं की,तो त्याच्या घराची काळजी खूपच चांगल्या प्रकारे करतो.यानंतर मी त्याला सांगितलं की,खरंतर मी पुढच्या वर्षीही इतक्या चांगल्या घरात राहायचा विचार केला होता;पण मी विवश आहे,मी इतकं भाडं देऊ नाही शकत.जाहीर होतं,कोणी भाडेकरू त्याच्या बरोबर या प्रकारे वागला नव्हता.त्याला समजत नव्हतं की,तो या परिस्थितीत काय करेल.त्याने मला त्याच्या अडचणींबद्दल सांगितलं.तो नेहमी तक्रार करणाऱ्या भाडेकरूंवर वैतागला होता.एका भाडेकरूने तर त्याला चौदा पत्रं लिहिली होती, ज्यातली खूप सारी आचरटपणाने लिहिलेली होती.दुसऱ्या मजल्यावरच्या भाडेकरूने याकरता घर सोडायची धमकी दिली होती कारण वरच्या माळ्यावरचा भाडेकरू घोरत होता.त्याने सांगितलं की,तुमच्यासारख्या समाधानी भाडेकरूंना बघून किती छान वाटतं.मग त्याने माझ्या न सांगण्यावरही थोडं भाडं कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला.मी भाडं जास्त कमी करायला बघत होतो.याकरता मी त्याला सांगितलं की,मी किती भाडं देऊ शकतो आणि त्याने त्याविरुद्ध काही न बोलता माझं म्हणणं मान्य केलं.जेव्हा तो जाऊ लागला तेव्हा वळून त्याने मला विचारले की,तुम्ही आपल्या घरात कोणत्या प्रकारचं डेकोरेशन पसंत कराल? जर मी भाडं कमी करण्याकरता दुसऱ्या भाडेकरूंसारखा प्रयोग केला असता,तर निश्चित रूपानं मीसुद्धा त्यांच्याच सारखा असफल झालो असतो.मित्रत्व,सहानुभूतीपूर्ण,प्रशंसात्मक पद्धतीनेच मी सफल झालो. 


पेनसिल्व्हेनियाच्या पिटस बर्गमध्ये राहणाऱ्या डीन वुडकॉक स्थानिक इलेक्ट्रिक कंपनीच्या एका डिपार्टमेंटमध्ये सुपरिटेंडेंट आहे.त्यांच्या स्टाफला एका खांबावर लागलेल्या एका उपकरणाला ठीक करण्याचं काम दिलं.या प्रकारचं काम आधी दुसऱ्या डिपार्टमेंटला आत्ताच दिलं गेलं होतं.त्याच्या कामगारांना या कामाचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं;परंतु पहिलीच वेळ होती की,

त्यांना हे काम करण्याची संधी मिळाली होती.कंपनीचा प्रत्येक माणूस हे बघू इच्छित होता की,ते हे काम करू शकतात की नाही आणि जर ते करत आहेत तर कोणत्या प्रकारे करत आहे.मिस्टर वुडकॉक,त्याचे हाताखालचे मॅनेजर आणि डिपार्टमेंटचे दुसरे सदस्य या कामाला बघण्याकरता गेले.अनेक कार आणि ट्रक तिथे उभे होते आणि खूप सारे लोक खांबावर चढलेल्या दोन माणसांना बघण्याकरता जमा झाले होते.


तेव्हा वुडकॉकला रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून एक माणूस उतरताना दिसला, ज्याच्या हातात कॅमेरा होता.त्यांची कंपनी सार्वजनिक फोटोला घेऊन खूप जास्त सजग होती.वुडकॉकच्या मनात विचार आला की, कॅमेरा घेऊन आलेल्या माणसाला बहुतेक असं वाटेल जसं दोन माणसांच्या कामाकरिता डझनभर लोक उगीचच गोळा झाले आहेत.ते फोटोग्राफरच्या दिशेने पुढे झाले.


मला असं वाटतं की,तुम्ही आमच्या कामात रस घेत आहात.हो आणि माझी आई तर जास्तच रस घेईल.ती तुमच्या कंपनीची स्टॉकहोल्डर आहे.यामुळे त्यांचे डोळे उघडले जातील.आता त्यांना हे समजू शकेल की,त्यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे.मी त्यांना अनेक वर्षांपासून समजावतो आहे की,तुमच्यासारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे पैशांची बर्बादी आहे.आता हे खरं सिद्ध होईल. पेपरवाल्यांनाही हे फोटो आवडतील.तुम्ही ठीक म्हणता आहात.तुमच्या जागी मी असतो,तर मीसुद्धा याच प्रकारानी विचार केला असता;

पण वुडकॉकनी त्याला सांगितलं की,हे त्यांच्या डिपार्टमेंटचे पहिले काम आहे आणि याचकरता त्यांच्या कंपनीचे एक्झिक्युटीव्हपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत याच्या सफलतेमध्ये रस घेत आहेत.त्यांनी त्या व्यक्तीला आश्वस्त केलं की, सामान्य परिस्थितीमध्ये या कामाकरता केवळ दोनच लोक असतात.हे ऐकून फोटोग्राफरने आपला कॅमेरा ठेवून दिला,त्याने वुडकॉक बरोबर हात मिळवला आणि त्याला धन्यवाद दिले की, त्यानी इतक्या चांगल्या प्रकारे मामला समजवला.डीन वुडकॉकने दोस्तीच्या शैलीने त्याच्या कंपनीला वाईट प्रचारापासून वाचवलं.


आमच्या क्लासचे आणखी एक सदस्य न्यू हॅम्पेशायरच्या जेरॉल्ड एच.विनने सांगितलं की,कोणत्या प्रकारे मैत्रीपूर्ण शैलीच्या कारणामुळे त्यांना एक डॅमेज क्लेमवर समाधानकारक सेटलमेंट मिळाली.


त्यांनी सांगितलं, वसंताच्या सुरुवातीस जेव्हा जमिनीवर बर्फ जमा झाला होता तेव्हा खूप पाऊस पडला.जास्त करून जवळच्या नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी त्या भागात शिरलं ज्यामध्ये मी नुकतंच घर बांधलं होतं. पाण्याला जायला काहीच जागा नव्हती,यामुळे घराच्या पायथ्याच्या चारी बाजूंनी दबाव पडायला लागला.पाणी काँक्रीटच्या तळघराच्या भिंतींना तोडत आतमध्ये शिरलं आणि पूर्ण तळघर पाण्याने भरलं.यामुळे फर्नेस आणि हॉट वॉटर मीटर खराब झालेत.या दुरुस्तीचा खर्च दोन हजार डॉलर्सपेक्षा जास्त होता.माझ्यापाशी या प्रकारच्या नुकसानीचा कुठलाही विमा नव्हता; पण मी लवकरच या गोष्टीचा पत्ता लावला की, सबडिव्हिजनच्या मालकांनी घराजवळ स्टॉर्म ड्रेन बनवण्याचे कष्ट घेतले नव्हते.जर स्टॉर्म ड्रेन असतं,तर या समस्येपासून दूर राहता आलं असतं.मी त्याला भेटण्याकरता अपॉइंटमेंट घेतली,त्याच्या ऑफिसपर्यंत जाताना पंचवीस मैल लांब प्रवासात मी स्थितीचे पूर्ण अवलोकन केले आणि या कोर्समध्ये शिकलेल्या सिद्धान्तांना लक्षात ठेवून मी ठरवलं की,

रागवून काही फायदा होणार नाही.जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मी शांत होतो.सुरुवातीला मी त्याच्या आत्ताच्या वेस्ट इंडिज प्रवासाबद्दल विचारपूस केली.मग मला जेव्हा वाटलं की,आता योग्य वेळ आलीये तेव्हा मी त्याला सांगितलं की पाण्यामुळे माझं 'थोडंसं' नुकसान झालंय.तो तत्काळ तयार झाला की,या समस्येला सोडवायला तो आपल्या बाजूने पूर्ण सहयोग देईल.


काही दिवसांनंतर तो आला आणि त्यानी म्हटलं की,तो नुकसानभरपाई देईल व स्टॉमड्रेनही बनवेल.खरंतर ही सबडिव्हिजनच्या मालकाची चूक होती;पण जर मी मित्रत्वाच्या पद्धतीने चर्चा सुरू नसती केली तर बहुतेक तो पूर्ण नुकसानाची भरपाई करण्याकरता इतक्या लवकर तयार झाला नसता.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन


अनेक वर्षांआधी उत्तर-पश्चिमी मिसुरीमध्ये शिकणाऱ्या खेड्यातील मुलांप्रमाणे मी अनवाणी पायांनी जंगलातून जात येत होतो.मी माझ्या लहानपणी सूर्य आणि हवा यांची नीतिकथा वाचली होती.दोघांमध्ये वाद झाला होता की, जास्त ताकदवान कोण आहे.हवेने म्हटलं,मी आत्ताच सिद्ध करून दाखवते की कोण जास्त ताकदीचा आहे.

कोट घातलेल्या त्या म्हाताऱ्या माणसाला बघतो आहेस? मी शर्यत लावते की, मी या म्हाताऱ्या माणसाच्या कोटाला तुझ्यापेक्षा जास्त लवकर उतरवू शकते.सूर्य ढगामागे चालला आणि हवा जोरात वाहू लागली,इतकी जोरात की,जसं वादळ आलं आहे;परंतु हवा जेवढी जोरात वाहत होती,म्हातारा माणूस आपल्या कोटाला तितकंच कसून पकडत होता.शेवटी हवेने हार मानली आणि परत नेहमीप्रमाणे वाहू लागली.याच्यानंतर सूर्य ढगांमागून पुढे आला आणि त्या म्हाताऱ्या माणसाने आपला घाम पुसला आणि आपला कोट काढून ठेवला, तेव्हा सूर्याने हवेला समजावलं की शक्ती आणि क्रोध यापेक्षा दयाळूपणा आणि मैत्री यांच्यामुळे कोणतंही काम करवणं जास्त सोपं असतं.जे लोक हे जाणतात की,एक गॅलन व्हिनेगरपेक्षा एक थेंब मधाने जास्त माशा पकडल्या जातात,ते विनम्र आणि दोस्तीच्या शैलीचाच प्रयोग करतात.जेव्हा लूथरविले, मेरीलँड एफ.गॅल कॉनर आपल्या चार महिने जुन्या कारला कार डीलरच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये तिसऱ्या वेळी घेऊन आला,तेव्हा त्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला.त्यांनी आमच्या वर्गात सांगितले,हे स्पष्ट होतं की, मॅनेजरशी वाद करणं,त्याच्याशी तर्क करणं किंवा त्याच्यावर ओरडण्यानं माझी समस्या सुटणार नव्हती.मी शोरूममध्ये गेलो आणि एजन्सीच्या मालकाला - मिस्टर व्हाइटला भेटण्याची इच्छा दर्शवली. थोडा वेळ वाट बघितल्यावर,मला मिस्टर व्हाइटच्या ऑफिसमध्ये पाठवलं गेलं.मी आपला परिचय दिला आणि त्यांना सांगितलं की,मी त्यांच्या डिलरशीपकडून कार याकरता विकत घेतली होती,कारण त्यांच्या इथून कार विकत घेणाऱ्या माझ्या काही मित्रांनी मला असं करण्याचा सल्ला दिला होता.सांगितलं होतं की, तुमच्या किमती एकदम रास्त असतात,तेव्हा मिस्टर व्हाइटच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.मग मी त्यांना सांगितलं मला सर्व्हिस डिपार्टमेंटमधून काय समस्या येते आहे.मला वाटलं बहुतेक तुम्ही अशा स्थितीला समजणं उचित समजाल, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला डाग लागू शकतो.पुढे मी म्हणालो की,त्यांनी मला या गोष्टी सांगण्याबद्दल धन्यवाद दिले.मला आश्वासन दिलं की,माझी समस्या दूर होईल.


एवढंच नाही तर त्यांनी माझ्या व्यक्तिगत समस्येत रुची घेतली.त्यांनी माझी कार दुरुस्त होईपर्यंत स्वतःची कार मला दिली.


ईसाप एक ग्रीक गुलाम होते.जे क्रॉसियसच्या दरबारात राहत होते.त्यांनी ईसा मसीहच्या सहाशे वर्षांआधी आपली अमर कथा लिहिली होती;परंतु मानवी स्वभावाच्या बाबतीत ज्या सत्याला त्यांनी उजागर केलं होतं ते आजच्या बॉस्टनमध्येही तितकंच बरोबर आहे.


जितकं की, ते सव्वीसाव्या शतकाच्या आधी अथेन्समध्ये होते.हवेऐवजी सूर्य तुमचा कोट अधिक लवकर उतरवू शकतो आणि राग किंवा आलोचनेऐवजी दयाळू मैत्रीची शैली आणि प्रशंसेने लोकांची मानसिकता अधिक लवकर बदलू शकते.लक्षात ठेवा लिंकनने काय सांगितलं होतं एक गॅलन व्हिनेगारपेक्षा मधाचा एक थेंब जास्त माशा पकडू शकतो.


२०.०४.२४ या लेखातील पुढील हा शेवटचा भाग..


२०/४/२४

मधाचे थेंब / Honey drops

जर तुम्ही रागावलेला आहात आणि जर तुम्ही समोरच्याला दोन-चार गोष्टी ऐकवून देता आहात,तर यामध्ये तुमच्या मनातला राग तर निघून जाईल;पण समोरच्या व्यक्तीला काय वाटेल? समोरच्याला पण तुमच्या एवढा आनंद मिळेल का? तुमच्या रागानी,तुमच्या शत्रुत्वपूर्ण व्यवहाराने तो तुमची गोष्ट मानेल का ?


वुडरो विल्सनने सांगितलं होतं : जर तुम्ही माझ्या दिशेने मूठ वळवून येता,तर मी तुम्हाला विश्वास देतो की,मीसुद्धा माझी मूठ उगारेन;पण जर शांतपणे येऊन मला तुम्ही हे सांगता की,चला, आपण बसून यावर चर्चा करू आणि जर आमच्यात काही मतभेद असतील,तर हे समजायचा प्रयत्न करू की कोणकोणत्या मुद्यावर मतभेद आहेत.आम्हाला हा पत्ता लागेल की,आपले खूपच मुद्दे एकसमान आहेत आणि आपल्या दोघांत खूपच कमी मुद्यांवर मतभिन्नता आहे आणि जर आमच्यात धैर्य आहे,

स्पष्टपणे भावना व्यक्त करायची इच्छा आहे आणि आपण भेटून-बसून चर्चा करायला तयार आहोत,तर आपण आपल्या मतभेदांना दूर करू शकतो."

वुड्रो विल्सनच्या या गोष्टीचं जॉन डी.रॉकफेलर,जुनियरहून कोणतंही चांगलं उदाहरण होऊ शकत नाही.१९१५ साली रॉकफेलरला कोलोरॅडोमध्ये तिरस्का नजरेने बघितले जात होते.दोन वर्षांपासून रॉकफेलरच्या कंपनीत संप चालला होता.रागानी बिथरलेले मजूर कोलोरॅडो फ्यूल अँड आयरन कंपनीहून जास्त पगार मागत होते.रॉकफेलरच्या हातात त्या कंपनीचे नेतृत्व होते.मजुरांनी यंत्र आणि इमारतींची तोडफोड केली आणि पोलिसांना बोलवायला लागलं.खूप खूनखराबी झाली.संप करणाऱ्या मजुरांवर गोळ्या चालवल्या गेल्या आणि अनेक मजूर बळी गेले.

अशा वेळी जेव्हा वातावरणात इतका द्वेष पसरला होता,

की रॉकफेलर संप करणाऱ्याबरोबर आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि तसं त्यांनी केलंही.


कसं ? अनेक आठवडे खर्च केल्यावर रॉकफेलरने संपवाल्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं.त्यांचं हे भाषण एक मास्टरपीस आहे.याचा आश्चर्यकारक परिणाम झाला.

यामुळे द्वेषाच्या त्या तुफानी लाटा शांत झाल्या ज्या रॉकफेलरला बुडवणार होत्या.त्यांच्या भाषणानी त्यांच्या प्रशंसकांची संख्या वाढली.यामध्ये तथ्यांना धरून असं प्रस्तुत केलं गेलं होतं की,संप करणारे कर्मचारी चुपचाप आपल्या कामावर परत गेले आणि त्यांनी पगारवाढी

बद्दल एकही अवाक्षर काढलं नाही,ज्याबद्दल त्यांनी एवढा दंगा केला होता.या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात पुढे दिली आहे.असं बघा की,यामध्ये मित्रत्वाची किनार आहे.

रॉकफेलर त्या लोकांबरोबर बोलत होते,जे काही दिवस आधी त्यांचा गळा घोटण्याची भाषा करत होते आणि अशी इच्छा करत होते की, त्यांना झाडाला टांगून फाशी द्यावी;परंतु रॉकफेलर इतके चांगले मित्रत्वपूर्ण होते,इतके उदार होते की,जसे काही ते मेडिकल मिशनरीला संबोधित करत होते.त्यांच्या या भाषणात या प्रकारची वाक्यं होती : मला अभिमान आहे की मी इथे आहे.मी तुमच्या घरी पाहुणा बनून गेलो होतो.मी तुमच्या बायका-मुलांना भेटलो आहे.आपण इथे काही अनोळखी लोकांप्रमाणे नाही आहोत,तर मित्रांप्रमाणे भेटत आहोत आणि आपलं हित समान आहे आणि आपल्या सदाचरणामुळेच मी इथे आहे.रॉकफेलरने आपल्या भाषणाची सुरुवात साधारण या प्रकाराने केली,"माझ्या जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.पहिल्यांदाच मला या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी भेटण्याचं सौभाग्य मिळत आहे.मला तुम्हाला भेटल्यामुळे अभिमान वाटतो आहे आणि मी ही भेट जीवनभर कधीच विसरणार नाही.जर ही बैठक दोन आठवडे आधी झाली असती,तर मी तुमच्या समोर कोणी अनोळखी माणूस म्हणून उभा असतो आणि फक्त काही लोकांनाच ओळखू शकलो असतो; पण मागच्या आठवड्यात मी दक्षिणेकडे कोळसा क्षेत्रात सगळ्याच कँपमध्ये फिरलो आणि मी तुमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन व्यक्तिगत सगळ्यांना भेटलो आहे आणि मी तुमच्या कुटुंबियांनाही भेटलो.आपण इथे अनोळखी लोकांसारखे नाही; पण मित्रत्वाच्या नात्याने भेटतो आहोत आणि मी याच मित्रत्वाच्या वातावरणात तुम्हाला आणि आपल्या परस्पर हितांच्या संबंधांबद्दल काही चर्चा करणार आहे.कारण ही कंपनीच्या ऑफिसर्सची आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची मीटिंग आहे.


यामुळे तुमच्या सद्इच्छेच्या कारणामुळेच मी इथे आहे.

कारण की दुर्भाग्यानी मी या दोन्ही श्रेणीत येऊ शकत नाही; पण मला असं वाटतं की,मी तुमच्या अंतरंगाशी जोडलेला आहे आणि एक प्रकारे मी स्टॉकहोल्डर्स आणि डायरेक्टर्सचा प्रतिनिधी आहे." हे शत्रूला मित्र बनवण्याच्या कलेचे उत्तम उदाहरण नाही आहे काय ?असं समजा की,

रॉकफेलरने दुसऱ्याच शैलीत चर्चा केली असती,असं समजा त्यांनी संपवाल्यांना दोषी ठरवलं असतं,त्यांच्या समोर विनाशकारी तथ्य सांगितलं असतं,त्यांना धमकी दिली असती,असं समजा त्यांनी आपल्या आवाजातल्या भावाने किंवा हावभावाने हे सांगितलं असतं की ते चूक आहेत, समजा की त्यांनी तर्कशास्त्राच्या एकूण एक नियमांचा प्रयोग करून हे सिद्ध केलं असतं की कामगार चूक होते, तर काय झालं असतं? त्याचा परिणाम हा झाला असता की दोन्ही पक्षांत तणाव वाढला असता, द्वेष वाढला असता, विद्रोह वाढला असता.जर कोण्या मनुष्याच्या मनात तुमच्या्बद्दल दुर्भावना आणि द्वेष आहे तर तुम्ही तर्कशास्त्राच्या आधाराने आपली गोष्ट मनवू शकत नाही.रागवणारे आई-बाप,फटकारणारे बॉस आणि नवरा तसंच चिडचिड्या बायकांना हे समजलं पाहिजे की,लोक आपले विचार बदलत नाहीत.जबरदस्तीचे प्रयोग करून त्यांना यापासून आपण परावृत्त नाही करू शकत की, ते तुमच्या-माझ्याबरोबर सहमत होतील; 


पण जर आम्ही त्यांच्या प्रति नम्रपणे आणि मित्रत्वाच्या नात्याने व्यवहार केला तर होऊ शकतं.आम्ही त्यांच्या

कडून आपली गोष्ट मनवून घेऊ शकू.लिंकनने हीच गोष्ट शंभर वर्षाअगोदर सांगितली होती.हे आहेत त्यांचे शब्द :


एक जुनी आणि खरी म्हण आहे, एक गॅलन व्हिनेगरपेक्षा मधाचा एक थेंब जास्त माश्या पकडू शकतो.या प्रकारेच जर तुम्हाला कोणाचं मन जिंकायचं असेल,त्यालाआपल्या पक्षात आणायचं असेल,तर आधी त्याला जाणीव करून द्या की,तो तुमचा मित्र आहे.हाच तो मधाचा थेंब आहे जो त्याच्या हृदयाला हात घालेल आणि हाच तो महान रस्ता आहे ज्याच्याद्वारे तुम्ही त्याच्या विचारांना बदलू शकता.


बिझनेस एक्झिक्युटीव्हना कळलंय की संपकर्त्यांच्या प्रति मित्रत्वाच्या वागणुकीने फायदाच होतो.उदाहरणार्थ,व्हाइट मोटर कंपनीचे २,५०० कर्मचारी जेव्हा पगार वाढवण्या

करीता आणि युनियन शॉपच्या मागणीला घेऊन संपावर गेले,तर कंपनीचे प्रेसिडेंट रॉबर्ट एफ.क्लॅकनी आपलं स्व नाही गमावलं. त्यांनी त्यांच्यावर टीका नाही केली, त्यांना घाबरवलं-धमकावलं नाही, त्यांनी साम्यवाद किंवा तानाशाहीचा उल्लेखपण केला नाही.याच्याऐवजी त्यांनी उलट संपवाल्यांचे कौतुकच केले.त्यांनी क्लीवलँडच्या पेपरमध्ये एक जाहिरात प्रकाशित केली,ज्यात संपवाल्यांच्या शांतिपूर्ण मार्गाने हरताळ करण्याकरता त्यांची प्रशंसा केली गेली. संपवाल्यांना बेकार बसलेले बघून त्यांनी त्यांच्याकरता दोन डझन बेसबॉल बॅट आणि ग्लोव्हजसुद्धा खरेदी केले आणि त्यांना रिकाम्या जागांवर बेसबॉल खेळण्याचं सुचवलं. बॉलिंगमध्ये इंटरेस्ट घेण्याकरता त्यांनी एका बॉलिंग जॅलीला भाड्यानीपण घेतले आणि कामगारांना तिथं खेळण्याचे आमंत्रण दिले.


ब्लॅकच्या मित्रत्वाच्या सुरुवातीने तोच असर झाला जो मित्रत्वामुळे नेहमी होतो.याला उत्तर म्हणून कामगारांनीही मित्रत्वाचंच उत्तर दिलं. संपवाल्यांनी फावडी,कुदळी उचलल्या आणि फॅक्टरीच्या चारी बाजूंना जमा असलेले कागद, माचिस,सिगरेट थोटकांचा कचरा साफ केला. कल्पना करा की,संपावर गेलेले कामगार जास्त पगार आणि युनियनच्या मान्यतेकरता संघर्ष करत फॅक्टरीच्या आसपास जमलेल्या कचऱ्याला साफ करत होते.या प्रकारची घटना अमेरिकेच्या औद्योगिक संपामधल्या मोठ्या आणि तुफानी इतिहासात कधीच घडली नव्हती. हा संप एका आठवड्यातच संपला आणि कडवटपणा किंवा तणाव निर्माण होण्याचा तर काहीच प्रश्नच नव्हता.


डॅनियल वेब्स्टर जे ईश्वरासारखे दिसायचे आणि देवदूतांसारखे गोष्टी करायचे,जगातल्या नावाजलेल्या वकिलांमधले एक होते; पण ते आपल्या सगळ्यात सशक्त तर्वांना या प्रकारे मित्रत्वाच्या टिपणीने सुरुवात करायचे : ज्युरीला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, बहुधा यामुळे हे कळून येईल किंवा आम्हालाही तथ्य विसरायला नाही पाहिजे किंवा तुमच्यासारखे बुद्धिमान लोक सहजपणे या तथ्यांच्या महत्त्वांना समजू शकतात. कुठेही कोणतीही आक्रमकता नाही,कुठेच कोणता दबाव नाही,आपले विचार दुसऱ्यांवर थोपवण्याचा कुठलाच हेतू नाही. वेब्स्टरच्या याच दोस्तीच्या शांत आणि मृदू शैलीमुळे ते इतके सफल आणि महान वकील बनले.हे होऊ शकतं की,तुमच्या जीवनात संप तोडण्याची किंवा कोणत्याही खटल्याची बाजू मांडण्याची नौबत न येवो;पण जर तुम्हाला तुमचं भाडं कमी करायचं असेल,तेव्हा ही मित्रत्वाची शैली तुमच्या कामाला येईल का? या बघू या.


ओ.एल.स्ट्रॉब एक इंजिनिअर होते.ते आपल्या घराचं भाडं कमी करायला बघत होते;परंतु ते हेही जाणत होते की,त्यांचा घरमालक खूपच कडक होता.मिस्टर स्ट्रॉबनी आमच्या क्लासमध्ये सांगितलं,मी घर मालकाला लिहून दिलं की,मी आपली लीझ संपल्यानंतर घर रिकामं करू इच्छितो.खरी गोष्ट तर ही होती की,मी सोडू इच्छित नव्हतो.जर माझं भाडं कमी झालं असतं, तर मी आनंदाने तिथेच राहिलो असतो;पण याची काही संभावना नव्हती.

दुसऱ्या भाडेकरूनी पण असाच प्रयत्न केला होता आणि ते सफल झाले नव्हते.सगळ्यांनी मला हेच सांगितलं की, मालकाकडून भाडं कमी करवणं,खरंतर शक्य नाही;पण मी स्वतःला म्हणतो,'मी लोकांना प्रभावित करण्याचा कोर्स करतो आहे,याकरता मी आपल्या घर मालकावर काही सिद्धान्ताचा प्रयोग करून हे बघेन की,ते सिद्धान्त किती काम करतात.' पत्र मिळताच तो आपल्या सेक्रेटरी बरोबर माझ्याकडे आला.मी दरवाज्यातच मित्रत्वाचं अभिवादन करून त्याचं स्वागत केलं.


शिल्लक राहिलेला भाग २२.०४.२४ या दिवशीच्या लेखांमध्ये..



१८/४/२४

अब्राहम लिंकन - २ Abraham Lincoln 2

कोणाही नाटककाराने लिंकनच्या चरित्रापेक्षा अधिक दुःखद संविधानक निर्मिलेले नाही.तो इतिहासातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पुरुष होता,पण त्याने जे- जे हाती घेतले,त्या सर्वांत त्याला अपयशच आले आणि अखेर जेव्हा यश आले,तेव्हा ते अपयशापेक्षाही कटू तर वाटले.ज्या एकमेव स्त्रीवर त्याचे प्रेम होते.ती मरण पावली व जिच्याशी लग्न केले तिला पती सुखी व्हावा यापेक्षा पती किर्तिमान व्हावा याचीच चिंता जास्त असे. तो काँग्रेससाठी दोनदा,सीनेटसाठी दोनदा उभा राहिला पण चारही वेळा पडला.तो धंद्यात शिरला;

पण त्यातही त्याला अपयशच आले. युनायटेड स्टेट्सच्या लँड-ऑफिसमध्ये नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला,पण तो नामंजूर झाला.व्हाईस प्रेसिडेंटच्या जागेसाठी तो उभा राहिला व अयशस्वी झाला आणि अखेर जेव्हा तो प्रेसिडेंट म्हणून निवडला गेला,तेव्हा तो अत्यंत शांतिप्रिय असूनही त्याला अत्यंत रानटी असे युद्ध पुकारावे लागले ! कुटुंबीयांवर त्याचे फार प्रेम होते.पण दोन मुले अकाली मेली व त्याला रडावे लागले.एक तर अगदीच अर्भकावस्थेत वारले व दुसरे वयाच्या बाराव्या वर्षी त्या वेळी लिंकन प्रेसिडेंट होता.युद्धाची भीषण व गंभीर जबाबदारी खांद्यावर असताना प्रिय पुत्राच्या मृत्यूचा असह्य व जबरदस्त धक्का त्याला बसला. शेवटी,

१८६५ साली युद्ध एकदाचे संपले.दैवाने विजयानंदाचा व यशाचा पेला भरून आणला.पण तो पेला ओठाशी आणणार,तोच गोळी घालून कोणीतरी त्याचा प्राण घेतला.

जनरल ली शरण आल्यावर पाचच दिवसांनी त्याचा खून झाला.खरी ट्रॅजेडी कशी लिहावी हे देवांनी लिंकनच्या चारित्र्याने मानवी नाटककारांना शिकवले आहे.


मी वर म्हटले की,लिंकनजवळ शहाणपण कमी होते.

म्हणून हे अंतर्गत युद्ध झाले.माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करू दे.लिंकन जगातला एक मोठा मुत्सद्दी होता खरा.तरी पण प्रथम तो राजकारणी होता.त्याला मानवांच्या कल्याणाची तळमळ होती.पण तो स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला आधी पूजिणारा होता.तो अभिजात व प्रतिभावान विचारद्रष्टा नव्हता. तो विचाराने जुन्या वळणाचाच होता. वैयक्तिक सूड घ्यायचा असेल, तर त्यासाठी लढण्यास तो तयार असे.राष्ट्राचा कोणी अपमान केला अगर राष्ट्रावर कोणी अन्याय केला,तर त्यासाठीही लढावयास तो तयार असे. लढाईशिवाय अन्य मार्गच त्याला कधी दिसत नसे.अन्यायाविरुद्ध हत्यार उपसणे हा एकच मार्ग त्याला शिकवण्यात आला होता.

त्याला धीर धरवत नसे.बुद्ध,कन्फ्यूशियस,टॉलस्टॉय यांच्याप्रमाणे त्याला गंभीर व प्रशांत अशी दीर्घदृष्टी नव्हती.त्याने गुलामगिरीचे पाप पाहिले; पण पाप मरणोन्मुख आहे.लवकरच नष्ट होणार आहे. हे मात्र त्याने ओळखले नाही. आपल्या राजकीय आशा-आकांक्षांच्या धुमाकुळात जीवनाकडे विश्वव्यापक दृष्टीने पाहण्याची सवय त्याला लावून घेता आली नाही. तसे करण्यास त्याला वेळही झाला नाही व तसा त्याचा स्वभावही नव्हता.तो प्रेसिडेंट होण्यास उत्सुक होता.पण आपल्या निवडणुकीमुळे दक्षिणेकडील व उत्तरेकडील संस्थानांमध्ये नक्की युद्ध होणार,हे मात्र त्याच्या लक्षात आले नाही. १८६० साली प्रेसिडेंटच्या जागेसाठी चार उमेदवार उभे होते.गुलामगिरीविरुद्ध जोरदार आणि चढाईचे धोरण अवलंबावे असे म्हणणारा त्यांपैकी फक्त लिंकनच होता.

उत्तरेकडच्यांनी ढवळाढवळ केल्यावाचूनही दक्षिणेकडची गुलामगिरी नष्ट होईल अशी लिंकनचा प्रतिस्पर्धी डग्लस याची श्रद्धा होती.डग्लसची दृष्टी मोठी होती.पण लिंकन हुशार राजकारणपटू होता.डग्लस निवडला गेला असता तर युद्ध झाले नसते.गुलामगिरी नैसर्गिकरीत्याच मेली असती.लिंकन इतिहासात कमी प्रसिद्ध झाला असता;पण अधिक दैववान ठरला असता.पण संकुचित दृष्टी व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यामुळे देशात मरण व विनाश ही मात्र त्याने ओढवून घेतली.युद्धाशिवाय जे करता आलेच नसते,असे कोणतेही भले त्याने केले नाही.कोणतेही हितमंगल त्याला करता आले नाही.


जेव्हा लिंकन प्रेसिडेंटशिपसाठी उभा राहिला, तेव्हा दाक्षिणात्य म्हणाले की,"लिंकन अध्यक्ष म्हणून निवडून आला,तर आम्ही फुटून निघू. उत्तरेकडच्या संस्थानांपासून अलग होऊ." लिंकन निवडून आला आणि दाक्षिणात्यांनी दिलेली धमकी खरी केली.त्या अंतर्गत युद्धाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.ती हकिकत येथे सांगण्यात अर्थ नाही.लिंकन गुलामगिरीच्या विरुद्ध होता.पण गुलामगिरी रद्द करण्यासाठी ते युद्ध नव्हते.आरंभीचा त्याचा उद्देश बंडखोर संस्थानांना पुन्हा संयुक्त संस्थानात आणणे,हा होता. प्रेसिडेंट निवडून आल्यामुळे जी गोष्ट झाली होती.

ती दूर करण्याकरता तो हत्यार हाती घेऊन उभा राहिला.

युद्ध सुरू होऊन दोन वर्षे झाल्यावर गुलामगिरीचा प्रश्न अधिक प्रामुख्याने पुढे आला.युरोपातील तटस्थ राष्ट्रांची सहानुभूती मिळावी,त्याचप्रमाणे स्वतःच्या राष्ट्राची नैतिक भूमिका अधिकच उच्च दिसावी म्हणून गुलामगिरी रद्द करण्याच्या प्रश्नाला लिंकनने महत्त्व दिले.दक्षिणेकडची संस्थाने केवळ राजकीय बाबींसाठी भांडत होती.तोपर्यंत युरोपियन राष्ट्र केवळ तटस्थ होती.काही तटस्थ राष्ट्र तर म्हणत होती की,अमेरिकेतील संस्थाने इंग्लंडपासून फुटून निघाली.त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या संघातूनही फुटता येईल.पण १८६३ च्या जानेवारीच्या पहिल्या तारखेस ही लढाई नीग्रोंना अमेरिकेत सुरक्षितपणे राहता यावे यासाठी असल्याचे लिंकनने जगाला जाहीर केले.त्याच्या या घोषणेने जगाची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. 


मागील महायुद्धात प्रेसिडेंट वुइल्सन याने १९१७ साली 'जग लोकशाहीसाठी बिनधोक व निर्वेध करण्यासाठी हे युद्ध आहे' असे जाहीर करून जगाची सहानुभूती आपल्याकडे ओढून घेतली.तसेच लिंकननेही केले होते. 'नीग्रोंचा उद्धार करायचा आहे.' या घोषणेमुळे काहीसा इच्छित परिणाम झाला.त्यामुळे युरोपचीच सद् विवेक बुद्धी जागृत झाली असे नव्हे;तर स्वतः लिंकनचीही विवेकबुद्धी जागृत झाली.हुशार राजकारणी पुरुष आता उदात्त महापुरुष झाला. 'एका महनीय ध्येयासाठी झगडणारा' असे तेजोवलय त्याच्याभोवती पसरले.

स्वतःची इच्छा नसूनही किंवा मनापासून तसे वाटत नसतानाही 'मानवजातीचा एक परित्राता उद्धारकर्ता' म्हणून त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले.(मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनु- साने गुरुजी भधचश्री पब्लिकेशन, कृष्णवर्णीयांचा त्राता अब्राहम लिंकन )


पण युद्धाला हे नवीन ध्येय मिळाले,तरी ते अप्रियच राहिले.सारीच युद्धे अप्रिय असतात.पण इतिहासकार खरे सांगत नाही. उत्तरेकडच्यांचे व दक्षिणेकडच्यांचे कितीतरी सैनिक त्यांना सोडून जात होते.कोणालाच उत्सुकता वाटत नव्हती.बहुजन समाजाला युद्ध नको होते.सक्ती करण्याशिवाय गत्यंतरच नसल्यामुळे लोकांना कुटुंबातून बळजबरीने ओढून नेऊन लढावयास लावण्यात आले. हा जो सक्तीचा मानव-यज्ञ चालू होता,त्यात श्रीमंतांवर मात्र सक्ती नव्हती.हा आणखी एक अन्याय होता.ते शे-दोनशे डॉलर देऊन स्वतःऐवजी दुसऱ्याला मरायला पाठवीत.यामुळे गरिबांवरच या हत्याकांडाचे सारे ओझे पडले.त्यांना बळी पुरवावे लागत.ही सक्ती अत्यंत अमानूष व निर्दय होती.

स्वतःबदली दुसरा एखादा बळी ज्यांना पाठवता येत नसे ते या धोरणाविरुद्ध कडक टीका करू लागले.सक्तीविरुद्ध देशात सर्वत्र बंडाळी होऊ लागली.दंगेधोपे होऊ लागले. न्यूयॉर्कमध्ये हे दंगे बरेच दिवस चालू राहिले व त्यात हजारो लोक मरण पावले.या अंतर्गत युद्धातल्या अनेक लढायांपैकी नागरिकांची सरकारशी झालेली लढाई महत्त्वाची असूनही बहुतेक इतिहासकारांनी तिचा उल्लेख देखील केलेला नाही.युद्धाबद्दल संपूर्ण सत्य सांगणे फायद्याचे नसते व ते कोणाला आवडतही नाही.


हे अंतर्गत युद्ध ही दुःखद व लज्जास्पद घटना होती,हा कलंक होता.या युद्धामुळे लिंकनचे चारित्र्य उन्नत व धीरोदात्त झाले.पण त्यासाठी केवढी जबरदस्त किंमत घावी लागली.युद्धामुळे सर्वत्र पसरलेल्या व पेटलेल्या प्रक्षुब्ध भावनांमुळेच शेवटी त्याचाही खून झाला व त्यानंतर देशात सर्वत्र सामाजिक व राजकीय बेदिली माजली.पण असे होणे स्वाभाविकच होते.मागल्या महायुद्धानंतर प्रेसिडेंट हार्डिंगच्या कारकिर्दीत आपल्या पिढीनेही तीच बेदिली अनुभवली आहे.युद्धात भाग घेणाऱ्या सर्वच राष्ट्रांची नैतिक दृष्टी युद्धामुळे अधःपतित होते. नैतिक मूल्ये नष्ट केली जातात.

शांतताकाली दुर्गुण समजल्या जाणाऱ्या गोष्टी युद्धकाळात सद्गुण मानल्या जातात आणि युद्धकाली वर तोंड करून सर्वत्र मिरवणारे दुर्गुण युद्धाबरोबर नष्ट न होता पुढे बरीच वर्षे सर्वत्र वावरत राहतात.

अश्रद्धा,नास्तिकता,सिनसिझम,अप्रामाणिकपणा, पशुता,दुष्टता,खून वगैरेंच्या पायावरच युद्धोत्तर संस्कृती उभारण्यात येत असते.


सिव्हिल वॉर संपताच लिंकनने आपल्या राष्ट्राला 'कोणाशीही द्वेषमत्सराची वागणूक करू नका,सारे विसरून जा,सर्वांशी प्रेमाने व स्नेहाने वागा' अशी सूचना दिली.हे शब्द सुंदर,अमर व उदात्त आहेत.पण वाईट एवढ्याचकरता वाटते की,ते तो वाजवीपेक्षा पाच वर्षे उशिराने बोलला.


लिंकनचे जीवन बनवणारे,त्याचे चारित्र्य बनवणारे काही धागे आपण पाहिले.मानव जातीचा तो एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. त्याच्यामध्ये मर्त्य व अमर्त्य दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे.सूर्यप्रकाश व ही खालची माती या दोहोंपासून त्याचे जीवन बनले आहे.बेदरकार महत्त्वाकांक्षा व व्यापक सहानुभूती दोन्ही त्याच्या जीवनात आहेत.क्षुद्रता व उदात्तता यांचे तो एक चमत्कारिक मिश्रण आहे.निर्दयता व प्रेम दोन्ही त्याच्या ठायी होती.त्याचा पोशाख शेतकऱ्यासारखा असे,पण त्याची वाणी राजाची वाटे.कोणाहीसमोर तो गांगरत नसे.त्याची मान खाली होत नसे.पण पत्नीपुढे मात्र तो नांगी टाकी!राजकारणात तो कारस्थाने करी.पण इतर सर्व व्यवहारांत तो अत्यंत प्रामाणिकपणे वागे. तो सामान्य मनोबुद्धीचा;पण अद्वितीय इच्छाशक्तिचा मनुष्य होता.

सामान्य जनांपैकीच एक होता.तो सर्वांकडे बंधुभावाने व बंधुप्रेमाने पाही.पण स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी त्याने साडेसात लाख लोकांना मृत्यूकडे पाठवले मानवजातीचा मोठेपणा व तिचे दुर्दैव यांचे प्रतीक म्हणजे लिंकन.


१६.०४.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..


१६/४/२४

अब्राहम लिंकन Abraham Lincoln

मानवजातीची धार्मिक,सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कसकशी प्रगत होत गेली हे आतापर्यंत आपण पाहत आलो. कितीतरी राष्ट्र रानटी स्थितीतून सुधारणेच्या आसपास येत आहेत,असे आपणास दिसले. आपल्या काळाबरोबर पुढे न जाता शेकडो वर्षे मागे रेंगाळत राहणारे,मध्ययुगीन विचारांनी अंध झालेले व प्रगतीला अडथळा करणारे कितीतरी मुत्सद्दी आपणास अधूनमधून आढळले ! पावले पुढे टाकीत असतानाही दृष्टी मात्र भूतकाळच ठेवणारे व ठेवावयास लावणारे ते प्रतिगामी मुत्सद्दी लोकशाहीच्या काळात पुन्हा राजशाह्या दृढ करीत,नवप्रकाश येत असता दुष्ट रूढींनाच सिंहासनावर बसवू पाहत.


आंधळ्यांचे हे आंधळे नेते जगात धुडगूस घालीत असूनही मानवजात चुकूनमाकून का होईना,पण न्यायाच्या, सहिष्णुतेच्या,उदारतेच्या व अधिक स्वच्छ आणि सुंदर विचारांच्या अधिकाधिक जवळे जात चालली आहे असे आपणास आढळले. 


आतापर्यंत आपण आशिया व युरोप यातच वावरलो.

त्यावरच आपली दृष्टी खिळली होती. आता आपण अटलांटिक ओलांडून अमेरिकेत जाऊ या व युरोपातून आणखी पश्चिमेकडे चाललेला संस्कृतीचा प्रवाह पाहू या.जगातल्या विचारहीन लेखकांनी कितीतरी वर्षे अमेरिकेची उगीचच टर उडविली आहे.अमेरिकन लोक असंस्कृत आहेत.त्यांनी नीट चालरीत व रीतभात नाही,ते रानटी आहेत.जुन्या जगातील नवाबी व रुबाबी संस्कृतीच्या मानाने ते फारच मागासलेले आहेत,असे हे लेखक खुशाल लिहितात ! ते थोडेसे खरेही असेल;पण त्या टीकेच्या आवाजात एक प्रकारची कुरुची,एक प्रकारची अशिष्टता नाही का? त्यात एक प्रकारचा रानवटपणा दिसत नाही का?अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांना अस्तन्या वर सारून रात्रंदिवस अविश्रांत श्रमावे लागले.जंगले तोडावी लागली. युरोपातील आपल्या बांधवांची संस्कृती आपलीशी करून घ्यायला त्यांना अवसर तरी कुठे होता? युरोपीय संस्कृतीतील सद्‌गुण अभ्यासायलाच नव्हेत,तर दुर्गुण उचलायलाही त्यांना फुरसत नव्हती.त्यांना अठराव्या शतकातला बराचसा काळ स्वतःचे घर व्यवस्थित करण्यातच घालवावा लागला. त्या वेळी युरोपच दुसऱ्यांच्या घरात लुडबूड करीत होते.अमेरिकन जरा रानवट व आडदांड दिसले,तरी ते युरोपियनांपेक्षा खास अधिक शांतताप्रिय होते. दरबारी चालीरीती त्यांना माहीत नसल्या,तरी ते उगीचच कोणाच्या माना कापायलाही धावत नसत.साम्राज्यवादी कवी किप्लिंग युद्धाच्या वैभवाची गाणी अत्यंत सुंदर व अलंकृत शब्दांत गातो,तर वाल्ट व्हिटमन ओबडधोबड वाणीने मानवी बंधुतेची गीते गातो.


एकोणिसाव्या शतकातील प्रबल राष्ट्रांत अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे एकच राष्ट्र खरोखर अनाक्रमणशील राष्ट्र होते. अमेरिकनांतही गर्जना करणारे हडेलहप्प मधूनमधून दिसत,अगदीच दिसत नव्हते असे नाही.मेक्सिकन व स्पॅनिश युद्धाच्या वेळी अमेरिकेनेही लष्करी मूठ दाखविण्याचा बेशरमपणा केलाच.जंगली रानवट-

पणापासून कोणते राष्ट्र पूर्णपणे मुक्त झाले आहे? पण विचारहीन स्वार्थांधतेचे प्रकार अमेरिकेच्या बाबतीत कधीकधी दिसून आले असले,तरी एकंदरीत अमेरिका फारशी युद्धप्रिय होती,असे म्हणता येणार नाही.


पण अमेरिकेला एक दुष्ट रोग जडलेला होता. तो म्हणजे गुलामगिरीचा.तो मारून टाकण्यासाठी अनिच्छेने तिला एका यादवी युद्धात भावाभावांमधल्या निर्दय आणि निष्ठुर युद्धात भाग घ्यावा लागला.ती इतिहासातील अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक घटना होती.असे घडले नसते तर काय झाले असते,असल्या चर्चा आता काय कामाच्या? इतिहासात टाकलेली पावले पुन्हा बदलून टाकण्यात काय अर्थ ? ही यादवी टाळता आली असती असा युक्तिवाद करण्यात येतो.ती निःसंशय टाळता आली असती.हेच काय,पण जगातले कोणते युद्ध त्यातील पुढारी वेगळे असते तर टाळता आले नसते? त्या त्या युद्धातील सूत्रधार व प्रमुख पात्रे वेगळी असती,तर प्रत्येक युद्ध टळले असते.

पण ते सूत्रधार मानवीच होते.त्यांच्या ठायी मानवांचे क्रोध-मत्सर व स्वार्थ-दंभ भरपूर होते.त्यांची दृष्टी संकुचित व मर्यादित असल्यामुळेच ते जराही दूरचे बघत नसल्यामुळेच,इतिहास जसा घडावासा आपणास वाटते तसा तो घडला नाही


भूतकाळाचे पुस्तक पुरे झाले आहे.आता कितीही काथ्याकूट केला,त्यातील कितीही घोडचुका दाखवल्या,

तरी भूतकाळातले एक अक्षरही बदलणे आता शक्य नाही.पोप म्हणे, 'जे आहे ते योग्यच आहे.' भूतकाळाला हेच वचन आपण लावू तर ते बरोबरच ठरेल. भूतकाळात जे जे घडले ते ते तसतसे घडण्यावाचून गत्यंतरच नव्हते.प्राप्त परिस्थितीत तसे व्हावयाचे.१८६१ सालचे अमेरिकेतील अंतर्युद्ध टाळणे अशक्य होते.पण त्या युद्धानेही भूतकाळातील इतर प्रत्येक युद्धाप्रमाणे भविष्यकाळासाठी मात्र रक्ताने संदेश लिहून ठेवला आहे.

धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. भूतकाळ बदलता येणार नाही,भविष्यकाळ मात्र बदलता येईल.कोणती ती सूचना? कोणता तो संदेश? ती सूचना,तो संदेश हाच की, 


'काही युद्धे टाळता येतात,मानवजातीच्या सुधारणेसाठी युद्ध ही एक आवश्यक गोष्ट नाही.

अमेरिकेतील गुलामगिरी अंतर्गत युद्धामधील रक्तपाताशिवाय रद्द करता आली असती.' हा संदेश नीट ध्यानी घ्यावा म्हणून अमेरिकेतील गुलामगिरीचा इतिहास जरा पाहू या.कोलंबस प्रथम अमेरिकेत आला तेव्हा तो तीन वस्तूंच्या शोधात होता.सोने,बाटविण्यासाठी माणसे व गुलाम म्हणून विकायला मानवी शरीरे.. त्याच्या पाठोपाठ स्पॅनिश लोक येऊन इंडियनांना गुलाम करू लागले.पण इंडियनांना तो ताण सहन होईना आणि म्हणून (व्हॅन लून म्हणतो) 'एका दयाळू धर्मोपदेशकाने लेंस कॅससने आफ्रिकेतून नीग्रो आणावेत असे सुचवले.इंडियन गुलामांची जागा भरून काढावी असा त्याचा मथितार्थ. नीग्रो अमेरिकेस बऱ्याच वर्षांपूर्वी आले होते. पहिले पांढरे यात्रेकरू मॅसेच्युसेट्समध्ये १६२० साली प्लायमाऊथ येथे व गुलामांचे पहिले यात्रेकरू व्हर्जिनियामध्ये जेम्स टाऊन येथे उतरले.


उत्तरेकडील संस्थानांना गुलागिरीचा वीट आला. मॅसेच्युसेट्समध्ये तर १७८३ सालीच गुलामगिरी रद्द करण्यात आली.इतरही काही संस्थांनानीही मॅसेच्युसेट्सचे अनुकरण केले.उत्तरेकडच्यांना कळून आले की,स्वातंत्र्यापेक्षा दास्यासाठीच अधिक खर्च लागतो.हेच दाक्षिणात्यांच्याही डोक्यात लवकरच आले असते.बेंजामीन जैकलीनने हे ओळखले होते.तो म्हणाला,"ग्रेट ब्रिटनमध्ये कामगार जितके स्वस्त आहेत तितके आपल्या इकडे गुलामही स्वस्त नाहीत,कोणीही गणित करून पडताळा पाहावा.आपण गुलाम विकत घेतला,त्या रकमेवरचे व्याज धरा.त्या गुलामाच्या जीविताचे इन्शुअरन्स जमेस धरा. त्याच्या प्राणांची अश्वाशक्ती लक्षात घ्या.त्याला लागणारे कपडे,त्याला द्यावे लागणारे अन्न, त्याच्या आजारात करावा लागणारा खर्च. त्यामुळे फुकट जाणारा वेळ,कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे होणारे नुकसान (आणि कितीही काळजी घेतली तरी,

आपला फायदा नाही हे माहीत असल्यावर कोणता माणूस मनापासून व लक्ष देऊन काम करील?) गुलामांनी काम चुकवू नये म्हणून त्यांच्यावर ठेवलेल्या पर्यवेक्षकांचा खर्च,पुन्हा होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या (गुलाम हे गुलाम असल्यामुळे व गुलाम हे चोरही असावयाचेच,म्हणून या चोऱ्या होतच राहणार) या साऱ्या खर्चाची इंग्लंडमधील लोखंडाच्या वा लोकरीच्या कारखान्यांतील मजुरांच्या मजुरीशी तुलना करून पाहिल्यास लक्षात येईल की, येथील नीग्रोंकडून आपण कितीही काम करून घेत असलो,तरी ते इंग्लंडमधील मजुरांपेक्षा एकंदरीत अखेर महागच पडतात."


दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे,तर गुलामगिरी फायदेशीर नव्हती.दक्षिणेकडच्यांना ती दरिद्रीच करीत होती.

युरोपातील राष्ट्रे हे पाहत होती. एकामागून एक सर्वांनी गुलामगिरी टाकून दिली. १८६०च्या सुमारास जगातील बहुतेक सर्व देशांत गुलामगिरी ही एक मृतसंस्था झाली होती. अमेरिकेतही ती मृत्यूपंथास लागली होती. १८३३ साली ग्रेट ब्रिटनने आपल्या सर्व भागांतील गुलामगिरी रद्द केली.१८२७ साली मेक्सिकोने सर्वांना मुक्त केले. फ्रान्सने १८४८ साली,पोर्तुगालने १८५८ साली,रशियाचा झार अलेक्झांडर याने १८३३ साली सर्व गुलामांना मुक्त केले.भू-दासांना स्वातंत्र्य दिले.अमेरिकेतील दक्षिणी संस्थानेही पुढच्या पिढीत गुलामगिरी रद्द करायला तयार झाली असती.पण नैतिकदृष्ट्या गुलामगिरी वाईट म्हणून मात्र नव्हे,तर आर्थिकदृष्ट्या ती परवडत नव्हती म्हणून.अमेरिकन नीग्रोंचे स्वातंत्र्य दहा लाख लोकांच्या रक्ताने पवित्र करण्याची जरुरी नव्हती.हे अंतर्गत युद्ध एक अनावश्यक अशी दुःखद घटना होती.


पण तत्कालीन स्वभावाप्रमाणे हे अंतर्गत युद्ध टाळणेही अशक्य होते.अमेरिकेतील मोठ्यातल्यामोठ्या मुत्सद्द्यांनीही युद्ध व्हावे, म्हणूनच प्रयत्न केले आणि दुःखाची गोष्ट ही की, आपण काय करीत आहोत हे त्यांनाही कळत नव्हते.यांपैकी सर्वांत मोठा मुत्सद्दी उदात्त चारित्र्याचा पण संकुचित दृष्टीचा अब्राहम लिंकन होय.तो थोर;पण करुणास्पद पुरुष होता. युद्ध होण्याला त्याचीच अप्रबुद्धता बरीचशी कारणीभूत झाली.थोडे शहाणपण त्याच्या ठायी असते,तर युद्ध होतेच ना.पण युद्ध सुरू झाल्यावर त्याने अनुपमेय धैर्य दाखवल्यामुळे यश मिळाले व गुलामगिरी रद्द झाली.


या भागातील राहिलेला उर्वरित शिल्लक शेवटचा भाग १८.०४.२४ या दिवशीच्या लेखामध्ये.