मानवजातीची धार्मिक,सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कसकशी प्रगत होत गेली हे आतापर्यंत आपण पाहत आलो. कितीतरी राष्ट्र रानटी स्थितीतून सुधारणेच्या आसपास येत आहेत,असे आपणास दिसले. आपल्या काळाबरोबर पुढे न जाता शेकडो वर्षे मागे रेंगाळत राहणारे,मध्ययुगीन विचारांनी अंध झालेले व प्रगतीला अडथळा करणारे कितीतरी मुत्सद्दी आपणास अधूनमधून आढळले ! पावले पुढे टाकीत असतानाही दृष्टी मात्र भूतकाळच ठेवणारे व ठेवावयास लावणारे ते प्रतिगामी मुत्सद्दी लोकशाहीच्या काळात पुन्हा राजशाह्या दृढ करीत,नवप्रकाश येत असता दुष्ट रूढींनाच सिंहासनावर बसवू पाहत.
आंधळ्यांचे हे आंधळे नेते जगात धुडगूस घालीत असूनही मानवजात चुकूनमाकून का होईना,पण न्यायाच्या, सहिष्णुतेच्या,उदारतेच्या व अधिक स्वच्छ आणि सुंदर विचारांच्या अधिकाधिक जवळे जात चालली आहे असे आपणास आढळले.
आतापर्यंत आपण आशिया व युरोप यातच वावरलो.
त्यावरच आपली दृष्टी खिळली होती. आता आपण अटलांटिक ओलांडून अमेरिकेत जाऊ या व युरोपातून आणखी पश्चिमेकडे चाललेला संस्कृतीचा प्रवाह पाहू या.जगातल्या विचारहीन लेखकांनी कितीतरी वर्षे अमेरिकेची उगीचच टर उडविली आहे.अमेरिकन लोक असंस्कृत आहेत.त्यांनी नीट चालरीत व रीतभात नाही,ते रानटी आहेत.जुन्या जगातील नवाबी व रुबाबी संस्कृतीच्या मानाने ते फारच मागासलेले आहेत,असे हे लेखक खुशाल लिहितात ! ते थोडेसे खरेही असेल;पण त्या टीकेच्या आवाजात एक प्रकारची कुरुची,एक प्रकारची अशिष्टता नाही का? त्यात एक प्रकारचा रानवटपणा दिसत नाही का?अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांना अस्तन्या वर सारून रात्रंदिवस अविश्रांत श्रमावे लागले.जंगले तोडावी लागली. युरोपातील आपल्या बांधवांची संस्कृती आपलीशी करून घ्यायला त्यांना अवसर तरी कुठे होता? युरोपीय संस्कृतीतील सद्गुण अभ्यासायलाच नव्हेत,तर दुर्गुण उचलायलाही त्यांना फुरसत नव्हती.त्यांना अठराव्या शतकातला बराचसा काळ स्वतःचे घर व्यवस्थित करण्यातच घालवावा लागला. त्या वेळी युरोपच दुसऱ्यांच्या घरात लुडबूड करीत होते.अमेरिकन जरा रानवट व आडदांड दिसले,तरी ते युरोपियनांपेक्षा खास अधिक शांतताप्रिय होते. दरबारी चालीरीती त्यांना माहीत नसल्या,तरी ते उगीचच कोणाच्या माना कापायलाही धावत नसत.साम्राज्यवादी कवी किप्लिंग युद्धाच्या वैभवाची गाणी अत्यंत सुंदर व अलंकृत शब्दांत गातो,तर वाल्ट व्हिटमन ओबडधोबड वाणीने मानवी बंधुतेची गीते गातो.
एकोणिसाव्या शतकातील प्रबल राष्ट्रांत अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे एकच राष्ट्र खरोखर अनाक्रमणशील राष्ट्र होते. अमेरिकनांतही गर्जना करणारे हडेलहप्प मधूनमधून दिसत,अगदीच दिसत नव्हते असे नाही.मेक्सिकन व स्पॅनिश युद्धाच्या वेळी अमेरिकेनेही लष्करी मूठ दाखविण्याचा बेशरमपणा केलाच.जंगली रानवट-
पणापासून कोणते राष्ट्र पूर्णपणे मुक्त झाले आहे? पण विचारहीन स्वार्थांधतेचे प्रकार अमेरिकेच्या बाबतीत कधीकधी दिसून आले असले,तरी एकंदरीत अमेरिका फारशी युद्धप्रिय होती,असे म्हणता येणार नाही.
पण अमेरिकेला एक दुष्ट रोग जडलेला होता. तो म्हणजे गुलामगिरीचा.तो मारून टाकण्यासाठी अनिच्छेने तिला एका यादवी युद्धात भावाभावांमधल्या निर्दय आणि निष्ठुर युद्धात भाग घ्यावा लागला.ती इतिहासातील अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक घटना होती.असे घडले नसते तर काय झाले असते,असल्या चर्चा आता काय कामाच्या? इतिहासात टाकलेली पावले पुन्हा बदलून टाकण्यात काय अर्थ ? ही यादवी टाळता आली असती असा युक्तिवाद करण्यात येतो.ती निःसंशय टाळता आली असती.हेच काय,पण जगातले कोणते युद्ध त्यातील पुढारी वेगळे असते तर टाळता आले नसते? त्या त्या युद्धातील सूत्रधार व प्रमुख पात्रे वेगळी असती,तर प्रत्येक युद्ध टळले असते.
पण ते सूत्रधार मानवीच होते.त्यांच्या ठायी मानवांचे क्रोध-मत्सर व स्वार्थ-दंभ भरपूर होते.त्यांची दृष्टी संकुचित व मर्यादित असल्यामुळेच ते जराही दूरचे बघत नसल्यामुळेच,इतिहास जसा घडावासा आपणास वाटते तसा तो घडला नाही.
भूतकाळाचे पुस्तक पुरे झाले आहे.आता कितीही काथ्याकूट केला,त्यातील कितीही घोडचुका दाखवल्या,
तरी भूतकाळातले एक अक्षरही बदलणे आता शक्य नाही.पोप म्हणे, 'जे आहे ते योग्यच आहे.' भूतकाळाला हेच वचन आपण लावू तर ते बरोबरच ठरेल. भूतकाळात जे जे घडले ते ते तसतसे घडण्यावाचून गत्यंतरच नव्हते.प्राप्त परिस्थितीत तसे व्हावयाचे.१८६१ सालचे अमेरिकेतील अंतर्युद्ध टाळणे अशक्य होते.पण त्या युद्धानेही भूतकाळातील इतर प्रत्येक युद्धाप्रमाणे भविष्यकाळासाठी मात्र रक्ताने संदेश लिहून ठेवला आहे.
धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. भूतकाळ बदलता येणार नाही,भविष्यकाळ मात्र बदलता येईल.कोणती ती सूचना? कोणता तो संदेश? ती सूचना,तो संदेश हाच की,
'काही युद्धे टाळता येतात,मानवजातीच्या सुधारणेसाठी युद्ध ही एक आवश्यक गोष्ट नाही.
अमेरिकेतील गुलामगिरी अंतर्गत युद्धामधील रक्तपाताशिवाय रद्द करता आली असती.' हा संदेश नीट ध्यानी घ्यावा म्हणून अमेरिकेतील गुलामगिरीचा इतिहास जरा पाहू या.कोलंबस प्रथम अमेरिकेत आला तेव्हा तो तीन वस्तूंच्या शोधात होता.सोने,बाटविण्यासाठी माणसे व गुलाम म्हणून विकायला मानवी शरीरे.. त्याच्या पाठोपाठ स्पॅनिश लोक येऊन इंडियनांना गुलाम करू लागले.पण इंडियनांना तो ताण सहन होईना आणि म्हणून (व्हॅन लून म्हणतो) 'एका दयाळू धर्मोपदेशकाने लेंस कॅससने आफ्रिकेतून नीग्रो आणावेत असे सुचवले.इंडियन गुलामांची जागा भरून काढावी असा त्याचा मथितार्थ. नीग्रो अमेरिकेस बऱ्याच वर्षांपूर्वी आले होते. पहिले पांढरे यात्रेकरू मॅसेच्युसेट्समध्ये १६२० साली प्लायमाऊथ येथे व गुलामांचे पहिले यात्रेकरू व्हर्जिनियामध्ये जेम्स टाऊन येथे उतरले.
उत्तरेकडील संस्थानांना गुलागिरीचा वीट आला. मॅसेच्युसेट्समध्ये तर १७८३ सालीच गुलामगिरी रद्द करण्यात आली.इतरही काही संस्थांनानीही मॅसेच्युसेट्सचे अनुकरण केले.उत्तरेकडच्यांना कळून आले की,स्वातंत्र्यापेक्षा दास्यासाठीच अधिक खर्च लागतो.हेच दाक्षिणात्यांच्याही डोक्यात लवकरच आले असते.बेंजामीन जैकलीनने हे ओळखले होते.तो म्हणाला,"ग्रेट ब्रिटनमध्ये कामगार जितके स्वस्त आहेत तितके आपल्या इकडे गुलामही स्वस्त नाहीत,कोणीही गणित करून पडताळा पाहावा.आपण गुलाम विकत घेतला,त्या रकमेवरचे व्याज धरा.त्या गुलामाच्या जीविताचे इन्शुअरन्स जमेस धरा. त्याच्या प्राणांची अश्वाशक्ती लक्षात घ्या.त्याला लागणारे कपडे,त्याला द्यावे लागणारे अन्न, त्याच्या आजारात करावा लागणारा खर्च. त्यामुळे फुकट जाणारा वेळ,कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे होणारे नुकसान (आणि कितीही काळजी घेतली तरी,
आपला फायदा नाही हे माहीत असल्यावर कोणता माणूस मनापासून व लक्ष देऊन काम करील?) गुलामांनी काम चुकवू नये म्हणून त्यांच्यावर ठेवलेल्या पर्यवेक्षकांचा खर्च,पुन्हा होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या (गुलाम हे गुलाम असल्यामुळे व गुलाम हे चोरही असावयाचेच,म्हणून या चोऱ्या होतच राहणार) या साऱ्या खर्चाची इंग्लंडमधील लोखंडाच्या वा लोकरीच्या कारखान्यांतील मजुरांच्या मजुरीशी तुलना करून पाहिल्यास लक्षात येईल की, येथील नीग्रोंकडून आपण कितीही काम करून घेत असलो,तरी ते इंग्लंडमधील मजुरांपेक्षा एकंदरीत अखेर महागच पडतात."
दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे,तर गुलामगिरी फायदेशीर नव्हती.दक्षिणेकडच्यांना ती दरिद्रीच करीत होती.
युरोपातील राष्ट्रे हे पाहत होती. एकामागून एक सर्वांनी गुलामगिरी टाकून दिली. १८६०च्या सुमारास जगातील बहुतेक सर्व देशांत गुलामगिरी ही एक मृतसंस्था झाली होती. अमेरिकेतही ती मृत्यूपंथास लागली होती. १८३३ साली ग्रेट ब्रिटनने आपल्या सर्व भागांतील गुलामगिरी रद्द केली.१८२७ साली मेक्सिकोने सर्वांना मुक्त केले. फ्रान्सने १८४८ साली,पोर्तुगालने १८५८ साली,रशियाचा झार अलेक्झांडर याने १८३३ साली सर्व गुलामांना मुक्त केले.भू-दासांना स्वातंत्र्य दिले.अमेरिकेतील दक्षिणी संस्थानेही पुढच्या पिढीत गुलामगिरी रद्द करायला तयार झाली असती.पण नैतिकदृष्ट्या गुलामगिरी वाईट म्हणून मात्र नव्हे,तर आर्थिकदृष्ट्या ती परवडत नव्हती म्हणून.अमेरिकन नीग्रोंचे स्वातंत्र्य दहा लाख लोकांच्या रक्ताने पवित्र करण्याची जरुरी नव्हती.हे अंतर्गत युद्ध एक अनावश्यक अशी दुःखद घटना होती.
पण तत्कालीन स्वभावाप्रमाणे हे अंतर्गत युद्ध टाळणेही अशक्य होते.अमेरिकेतील मोठ्यातल्यामोठ्या मुत्सद्द्यांनीही युद्ध व्हावे, म्हणूनच प्रयत्न केले आणि दुःखाची गोष्ट ही की, आपण काय करीत आहोत हे त्यांनाही कळत नव्हते.यांपैकी सर्वांत मोठा मुत्सद्दी उदात्त चारित्र्याचा पण संकुचित दृष्टीचा अब्राहम लिंकन होय.तो थोर;पण करुणास्पद पुरुष होता. युद्ध होण्याला त्याचीच अप्रबुद्धता बरीचशी कारणीभूत झाली.थोडे शहाणपण त्याच्या ठायी असते,तर युद्ध होतेच ना.पण युद्ध सुरू झाल्यावर त्याने अनुपमेय धैर्य दाखवल्यामुळे यश मिळाले व गुलामगिरी रद्द झाली.
या भागातील राहिलेला उर्वरित शिल्लक शेवटचा भाग १८.०४.२४ या दिवशीच्या लेखामध्ये.