* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अब्राहम लिंकन - २ Abraham Lincoln 2

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/४/२४

अब्राहम लिंकन - २ Abraham Lincoln 2

कोणाही नाटककाराने लिंकनच्या चरित्रापेक्षा अधिक दुःखद संविधानक निर्मिलेले नाही.तो इतिहासातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पुरुष होता,पण त्याने जे- जे हाती घेतले,त्या सर्वांत त्याला अपयशच आले आणि अखेर जेव्हा यश आले,तेव्हा ते अपयशापेक्षाही कटू तर वाटले.ज्या एकमेव स्त्रीवर त्याचे प्रेम होते.ती मरण पावली व जिच्याशी लग्न केले तिला पती सुखी व्हावा यापेक्षा पती किर्तिमान व्हावा याचीच चिंता जास्त असे. तो काँग्रेससाठी दोनदा,सीनेटसाठी दोनदा उभा राहिला पण चारही वेळा पडला.तो धंद्यात शिरला;

पण त्यातही त्याला अपयशच आले. युनायटेड स्टेट्सच्या लँड-ऑफिसमध्ये नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला,पण तो नामंजूर झाला.व्हाईस प्रेसिडेंटच्या जागेसाठी तो उभा राहिला व अयशस्वी झाला आणि अखेर जेव्हा तो प्रेसिडेंट म्हणून निवडला गेला,तेव्हा तो अत्यंत शांतिप्रिय असूनही त्याला अत्यंत रानटी असे युद्ध पुकारावे लागले ! कुटुंबीयांवर त्याचे फार प्रेम होते.पण दोन मुले अकाली मेली व त्याला रडावे लागले.एक तर अगदीच अर्भकावस्थेत वारले व दुसरे वयाच्या बाराव्या वर्षी त्या वेळी लिंकन प्रेसिडेंट होता.युद्धाची भीषण व गंभीर जबाबदारी खांद्यावर असताना प्रिय पुत्राच्या मृत्यूचा असह्य व जबरदस्त धक्का त्याला बसला. शेवटी,

१८६५ साली युद्ध एकदाचे संपले.दैवाने विजयानंदाचा व यशाचा पेला भरून आणला.पण तो पेला ओठाशी आणणार,तोच गोळी घालून कोणीतरी त्याचा प्राण घेतला.

जनरल ली शरण आल्यावर पाचच दिवसांनी त्याचा खून झाला.खरी ट्रॅजेडी कशी लिहावी हे देवांनी लिंकनच्या चारित्र्याने मानवी नाटककारांना शिकवले आहे.


मी वर म्हटले की,लिंकनजवळ शहाणपण कमी होते.

म्हणून हे अंतर्गत युद्ध झाले.माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करू दे.लिंकन जगातला एक मोठा मुत्सद्दी होता खरा.तरी पण प्रथम तो राजकारणी होता.त्याला मानवांच्या कल्याणाची तळमळ होती.पण तो स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला आधी पूजिणारा होता.तो अभिजात व प्रतिभावान विचारद्रष्टा नव्हता. तो विचाराने जुन्या वळणाचाच होता. वैयक्तिक सूड घ्यायचा असेल, तर त्यासाठी लढण्यास तो तयार असे.राष्ट्राचा कोणी अपमान केला अगर राष्ट्रावर कोणी अन्याय केला,तर त्यासाठीही लढावयास तो तयार असे. लढाईशिवाय अन्य मार्गच त्याला कधी दिसत नसे.अन्यायाविरुद्ध हत्यार उपसणे हा एकच मार्ग त्याला शिकवण्यात आला होता.

त्याला धीर धरवत नसे.बुद्ध,कन्फ्यूशियस,टॉलस्टॉय यांच्याप्रमाणे त्याला गंभीर व प्रशांत अशी दीर्घदृष्टी नव्हती.त्याने गुलामगिरीचे पाप पाहिले; पण पाप मरणोन्मुख आहे.लवकरच नष्ट होणार आहे. हे मात्र त्याने ओळखले नाही. आपल्या राजकीय आशा-आकांक्षांच्या धुमाकुळात जीवनाकडे विश्वव्यापक दृष्टीने पाहण्याची सवय त्याला लावून घेता आली नाही. तसे करण्यास त्याला वेळही झाला नाही व तसा त्याचा स्वभावही नव्हता.तो प्रेसिडेंट होण्यास उत्सुक होता.पण आपल्या निवडणुकीमुळे दक्षिणेकडील व उत्तरेकडील संस्थानांमध्ये नक्की युद्ध होणार,हे मात्र त्याच्या लक्षात आले नाही. १८६० साली प्रेसिडेंटच्या जागेसाठी चार उमेदवार उभे होते.गुलामगिरीविरुद्ध जोरदार आणि चढाईचे धोरण अवलंबावे असे म्हणणारा त्यांपैकी फक्त लिंकनच होता.

उत्तरेकडच्यांनी ढवळाढवळ केल्यावाचूनही दक्षिणेकडची गुलामगिरी नष्ट होईल अशी लिंकनचा प्रतिस्पर्धी डग्लस याची श्रद्धा होती.डग्लसची दृष्टी मोठी होती.पण लिंकन हुशार राजकारणपटू होता.डग्लस निवडला गेला असता तर युद्ध झाले नसते.गुलामगिरी नैसर्गिकरीत्याच मेली असती.लिंकन इतिहासात कमी प्रसिद्ध झाला असता;पण अधिक दैववान ठरला असता.पण संकुचित दृष्टी व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यामुळे देशात मरण व विनाश ही मात्र त्याने ओढवून घेतली.युद्धाशिवाय जे करता आलेच नसते,असे कोणतेही भले त्याने केले नाही.कोणतेही हितमंगल त्याला करता आले नाही.


जेव्हा लिंकन प्रेसिडेंटशिपसाठी उभा राहिला, तेव्हा दाक्षिणात्य म्हणाले की,"लिंकन अध्यक्ष म्हणून निवडून आला,तर आम्ही फुटून निघू. उत्तरेकडच्या संस्थानांपासून अलग होऊ." लिंकन निवडून आला आणि दाक्षिणात्यांनी दिलेली धमकी खरी केली.त्या अंतर्गत युद्धाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.ती हकिकत येथे सांगण्यात अर्थ नाही.लिंकन गुलामगिरीच्या विरुद्ध होता.पण गुलामगिरी रद्द करण्यासाठी ते युद्ध नव्हते.आरंभीचा त्याचा उद्देश बंडखोर संस्थानांना पुन्हा संयुक्त संस्थानात आणणे,हा होता. प्रेसिडेंट निवडून आल्यामुळे जी गोष्ट झाली होती.

ती दूर करण्याकरता तो हत्यार हाती घेऊन उभा राहिला.

युद्ध सुरू होऊन दोन वर्षे झाल्यावर गुलामगिरीचा प्रश्न अधिक प्रामुख्याने पुढे आला.युरोपातील तटस्थ राष्ट्रांची सहानुभूती मिळावी,त्याचप्रमाणे स्वतःच्या राष्ट्राची नैतिक भूमिका अधिकच उच्च दिसावी म्हणून गुलामगिरी रद्द करण्याच्या प्रश्नाला लिंकनने महत्त्व दिले.दक्षिणेकडची संस्थाने केवळ राजकीय बाबींसाठी भांडत होती.तोपर्यंत युरोपियन राष्ट्र केवळ तटस्थ होती.काही तटस्थ राष्ट्र तर म्हणत होती की,अमेरिकेतील संस्थाने इंग्लंडपासून फुटून निघाली.त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या संघातूनही फुटता येईल.पण १८६३ च्या जानेवारीच्या पहिल्या तारखेस ही लढाई नीग्रोंना अमेरिकेत सुरक्षितपणे राहता यावे यासाठी असल्याचे लिंकनने जगाला जाहीर केले.त्याच्या या घोषणेने जगाची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. 


मागील महायुद्धात प्रेसिडेंट वुइल्सन याने १९१७ साली 'जग लोकशाहीसाठी बिनधोक व निर्वेध करण्यासाठी हे युद्ध आहे' असे जाहीर करून जगाची सहानुभूती आपल्याकडे ओढून घेतली.तसेच लिंकननेही केले होते. 'नीग्रोंचा उद्धार करायचा आहे.' या घोषणेमुळे काहीसा इच्छित परिणाम झाला.त्यामुळे युरोपचीच सद् विवेक बुद्धी जागृत झाली असे नव्हे;तर स्वतः लिंकनचीही विवेकबुद्धी जागृत झाली.हुशार राजकारणी पुरुष आता उदात्त महापुरुष झाला. 'एका महनीय ध्येयासाठी झगडणारा' असे तेजोवलय त्याच्याभोवती पसरले.

स्वतःची इच्छा नसूनही किंवा मनापासून तसे वाटत नसतानाही 'मानवजातीचा एक परित्राता उद्धारकर्ता' म्हणून त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले.(मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनु- साने गुरुजी भधचश्री पब्लिकेशन, कृष्णवर्णीयांचा त्राता अब्राहम लिंकन )


पण युद्धाला हे नवीन ध्येय मिळाले,तरी ते अप्रियच राहिले.सारीच युद्धे अप्रिय असतात.पण इतिहासकार खरे सांगत नाही. उत्तरेकडच्यांचे व दक्षिणेकडच्यांचे कितीतरी सैनिक त्यांना सोडून जात होते.कोणालाच उत्सुकता वाटत नव्हती.बहुजन समाजाला युद्ध नको होते.सक्ती करण्याशिवाय गत्यंतरच नसल्यामुळे लोकांना कुटुंबातून बळजबरीने ओढून नेऊन लढावयास लावण्यात आले. हा जो सक्तीचा मानव-यज्ञ चालू होता,त्यात श्रीमंतांवर मात्र सक्ती नव्हती.हा आणखी एक अन्याय होता.ते शे-दोनशे डॉलर देऊन स्वतःऐवजी दुसऱ्याला मरायला पाठवीत.यामुळे गरिबांवरच या हत्याकांडाचे सारे ओझे पडले.त्यांना बळी पुरवावे लागत.ही सक्ती अत्यंत अमानूष व निर्दय होती.

स्वतःबदली दुसरा एखादा बळी ज्यांना पाठवता येत नसे ते या धोरणाविरुद्ध कडक टीका करू लागले.सक्तीविरुद्ध देशात सर्वत्र बंडाळी होऊ लागली.दंगेधोपे होऊ लागले. न्यूयॉर्कमध्ये हे दंगे बरेच दिवस चालू राहिले व त्यात हजारो लोक मरण पावले.या अंतर्गत युद्धातल्या अनेक लढायांपैकी नागरिकांची सरकारशी झालेली लढाई महत्त्वाची असूनही बहुतेक इतिहासकारांनी तिचा उल्लेख देखील केलेला नाही.युद्धाबद्दल संपूर्ण सत्य सांगणे फायद्याचे नसते व ते कोणाला आवडतही नाही.


हे अंतर्गत युद्ध ही दुःखद व लज्जास्पद घटना होती,हा कलंक होता.या युद्धामुळे लिंकनचे चारित्र्य उन्नत व धीरोदात्त झाले.पण त्यासाठी केवढी जबरदस्त किंमत घावी लागली.युद्धामुळे सर्वत्र पसरलेल्या व पेटलेल्या प्रक्षुब्ध भावनांमुळेच शेवटी त्याचाही खून झाला व त्यानंतर देशात सर्वत्र सामाजिक व राजकीय बेदिली माजली.पण असे होणे स्वाभाविकच होते.मागल्या महायुद्धानंतर प्रेसिडेंट हार्डिंगच्या कारकिर्दीत आपल्या पिढीनेही तीच बेदिली अनुभवली आहे.युद्धात भाग घेणाऱ्या सर्वच राष्ट्रांची नैतिक दृष्टी युद्धामुळे अधःपतित होते. नैतिक मूल्ये नष्ट केली जातात.

शांतताकाली दुर्गुण समजल्या जाणाऱ्या गोष्टी युद्धकाळात सद्गुण मानल्या जातात आणि युद्धकाली वर तोंड करून सर्वत्र मिरवणारे दुर्गुण युद्धाबरोबर नष्ट न होता पुढे बरीच वर्षे सर्वत्र वावरत राहतात.

अश्रद्धा,नास्तिकता,सिनसिझम,अप्रामाणिकपणा, पशुता,दुष्टता,खून वगैरेंच्या पायावरच युद्धोत्तर संस्कृती उभारण्यात येत असते.


सिव्हिल वॉर संपताच लिंकनने आपल्या राष्ट्राला 'कोणाशीही द्वेषमत्सराची वागणूक करू नका,सारे विसरून जा,सर्वांशी प्रेमाने व स्नेहाने वागा' अशी सूचना दिली.हे शब्द सुंदर,अमर व उदात्त आहेत.पण वाईट एवढ्याचकरता वाटते की,ते तो वाजवीपेक्षा पाच वर्षे उशिराने बोलला.


लिंकनचे जीवन बनवणारे,त्याचे चारित्र्य बनवणारे काही धागे आपण पाहिले.मानव जातीचा तो एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. त्याच्यामध्ये मर्त्य व अमर्त्य दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे.सूर्यप्रकाश व ही खालची माती या दोहोंपासून त्याचे जीवन बनले आहे.बेदरकार महत्त्वाकांक्षा व व्यापक सहानुभूती दोन्ही त्याच्या जीवनात आहेत.क्षुद्रता व उदात्तता यांचे तो एक चमत्कारिक मिश्रण आहे.निर्दयता व प्रेम दोन्ही त्याच्या ठायी होती.त्याचा पोशाख शेतकऱ्यासारखा असे,पण त्याची वाणी राजाची वाटे.कोणाहीसमोर तो गांगरत नसे.त्याची मान खाली होत नसे.पण पत्नीपुढे मात्र तो नांगी टाकी!राजकारणात तो कारस्थाने करी.पण इतर सर्व व्यवहारांत तो अत्यंत प्रामाणिकपणे वागे. तो सामान्य मनोबुद्धीचा;पण अद्वितीय इच्छाशक्तिचा मनुष्य होता.

सामान्य जनांपैकीच एक होता.तो सर्वांकडे बंधुभावाने व बंधुप्रेमाने पाही.पण स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी त्याने साडेसात लाख लोकांना मृत्यूकडे पाठवले मानवजातीचा मोठेपणा व तिचे दुर्दैव यांचे प्रतीक म्हणजे लिंकन.


१६.०४.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..