साऱ्या जगात अंदाजे आठ हजार प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात.त्यापैकी सुमारे दोन हजार ते अडीच हजार पक्षिकुळं भारत आणि पाकिस्तानात दिसून येतात.म्हणजे जगातील एकूण पक्षिकुळांपैकी एक तृतीयांश जाती वरील क्षेत्रात आढळून येतात.
पक्षिगणाविषयीची ही विविधता जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.याचं मुख्य कारण आहे या प्रदेशातील निसर्गसृष्टीची विविधता.इथे राजस्थानमधील काटेरी झाडांची वनं आहेत, तशीच हिमालयात देवदाराची अरण्यं आहेत.जसा वाळवंटी प्रदेश आहे,तशीच बर्फानं आच्छादलेली हिमालयाची उंच शिखरं आहेत.नुसता हिमालय पर्वत आहे असं नव्हे,तर साऱ्या भारतात पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत.पश्चिम घाटासारखी हिरवीगार पर्वतमाळा आहे.तसेच सातपुडा,विंध्य अरवली,खाशी आणि गारो या पर्वतांच्या रांगा आहेत.
या साऱ्याच पर्वतश्रेणींत विविधता आहे.
पर्वत आले की त्यावरचा वनप्रदेश आला.भारतातील वनं प्रामुख्यानं रुंदपर्णी वृक्षांची आहेत.हिमालयात सूचिपर्णी झाडांची जंगलं आहेत.या दोहोंतदेखील अनेक प्रकारच्या वनांचा समावेश होतो.सदाहरित,अर्ध (सेमी) सदाहरित वनं.पानगळ,काटेरी आणि समशीतोष्ण जंगलं. या समृद्ध वनांतून विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.ते पानं,फुलं,
फळं आणि मध यावर उपजीविका करतात.कीटकांची सृष्टीदेखील बहुविध आहे.हे पक्षी अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया त्यांच्या शिटेतून आणि पिसांतून आणतात.त्यांच्या माध्यमातून वृक्षांच्या बियांचा प्रसार होतो.त्यात एखादी त्या क्षेत्रात न येणारी वनस्पतीदेखील असते.तीदेखील तिथे वाढू लागते.झाडांच्या शेंड्यांवर पर्णपक्षी असतात,तर मधल्या छतावर शिलींद्री आणि सुतार पक्षी आश्रय घेतात. जमिनीवर झुडपं असतात, गवत उगवतं, पालापाचोळा पडलेला असतो, हवेमुळे पडलेली पोकळ झाडं असतात. या क्षेत्रात मुख्यत्वे जमिनीवरील पक्षी राहतात.
वनं आणि पर्वतमाळा पक्षिसृष्टीतील विविधता वाढविण्यास अनुकूल असतात.त्या पर्वतांवरून उगम पावणाऱ्या नद्यादेखील पक्ष्यांची निवासस्थानं असतात.
त्या नद्या सखल प्रदेशातून वाहत शेवटी समुद्राला मिळतात.हा सारा जलमय प्रदेशदेखील पक्ष्यांसाठी आदर्श वसतिस्थान असतो.गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम हिमालयात झाल्यामुळे बर्फाच्या पाण्यामुळे त्या बारमाही वाहत असतात.गंगेचं विशाल खोरं प्रसिद्ध आहे. तिथल्या भूप्रदेशात जलचर पक्षी विपुल प्रमाणात आढळून येतात.
भारत द्वीपकल्पातील नद्या पावसावर अवलंबून आहेत.
उन्हाळ्यात त्या कोरड्या होतात.अति दक्षिणेकडच्या केरळ प्रदेशात तर समुद्राचं पाणी आत दूरवर घुसलं आहे.
या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे समुद्राच्या मुखावर खाजणीची अतिशय समृद्ध जंगलं आहेत.हा प्रदेशदेखील पक्षिकुलाचा निवास आणि वीण यांसाठी उपयुक्त आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता आणि वीज निर्माण करण्याकरिता नद्यांवर लहानमोठी धरणं बांधण्यात आली.ही नवनिर्मित जलाशयं पाणपक्ष्यांसाठी उपयुक्त ठरली.भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील अनुकूल भूरचना आणि माती यामुळे मूळ पर्यावरणाला धक्का न देता लहानमोठ्या तलावांचं जाळं निर्माण झालं आहे. हा तलावाचा प्रदेशदेखील पक्षिकुलाच्या निवासासाठी योग्य आहे.
साऱ्या महाराष्ट्रात सुमारे साडेपाचशे प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. परंतु,एकट्या विदर्भातच अंदाजे पाचशे प्रकारचे पक्षी आढळून येतात.
जैविक विविधता पक्षिसृष्टीला कशी अनुकूल होऊ शकते हे आत्तापर्यंत सांगितलं.शास्त्रीयदृष्ट्या पक्षिकुलाचं वर्गीकरण सांगणं अवघड असलं तरी सामान्य लोकांना समजेल असं वर्गीकरण करता येईल.
■.सागरीय पक्ष्यांत वादळी पक्षी म्हणजे पेट्रेल, पाणकावळा,गंगाचिल्ली म्हणजे गल,कावळा, समुद्र-कावळा यांचा समावेश होतो.
■.जलचर पक्ष्यांतबगळा,ढोकरी,ढोक,सारस, क्रौंच,हंस,रानबदक आणि पाणकोंबडी यांचा समावेश होतो.
■.शिकारी पक्ष्यांत गरुड,ससाणा,श्येन,शिक्रा, घार, घुबड आणि पिंगळा यांचा समावेश होतो.
■.स्थळनिवासी पक्ष्यांत मोर,रानकोंबडा,तित्तिर,
लावा,हिमालयातील पिझंट आणि चकोर यांचा समावेश होतो.
■.वृक्षारोहक पक्ष्यांत पोपट,कोकिळा,भारद्वाज, नीळकंठ इत्यादींचा समावेश होतो.
पक्षिसृष्टीतील आजपर्यंत न सुटलेलं कोडं आणि विशेष प्रकार म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर.
हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला लक्षावधी पक्षी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात आकाशमार्गानं उडत जातात.हा प्रवास ते काही वेळा समुद्रावरून किंवा खुश्कीच्या मार्गाने करतात.त्यांना हा आवश्यक प्रवास का करावा लागतो?इतक्या लांबच्या प्रवासाचा धोका ते का स्वीकारतात? ते आपला मार्ग कसा शोधतात? या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत.अलीकडे पक्ष्यांच्या पायांना कडी बांधून आणि इतर काही प्रयोगांमुळे या रहस्यमय गोष्टी पूर्वी-पेक्षा जास्त समजू लागल्या आहेत.
एका मुलुखातून दुसऱ्या मुलुखातील उलटसुलट प्रवासाचा नियमितपणा पक्षिस्थलांतराचा एक खास गुण आहे.हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलुखात पुष्कळ वेळा तेच तळं किंवा त्याच रानात हे पक्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात परत येतात.
सैबेरियातून भारतात येणारी रानबदकं आणि हंस यांचं उदाहरण आपण घेऊ या.
निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी नागपूर
हिवाळ्यात सैबेरियात खूप थंडी पडते. तिथे बर्फ पडू लागतो. जलाशयं गोठून जातात.या पक्ष्यांना अन्न मिळेनासं होतं.अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात हे पक्षी स्थलांतर करून येऊ लागतात.स्थलांतर करणारे हे पक्षी रोजी पाचशे किलोमीटर अंतर सहज ओलांडून जातात.ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं ते उडतात.स्थलांतर करणारे हे पक्षी प्रामुख्यानं थव्यांतून राहणारे असतात.
आकाशातून उडताना ते बाणाच्या टोकासारखी रचना करतात,टोकावर सर्वांत अनुभवी पक्षी असतो.तो इतरांना मार्ग दाखवितो.त्यांच्या शरीररचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं.त्यामुळे त्यांना उत्तर-दक्षिण दिशेचं ज्ञान होतं.शत्रुपक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून हे पक्षी रात्री प्रवास करतात.त्यावेळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या साह्यानं ते उडण्याची दिशा निश्चित करतात.त्याच मार्गानं वर्षानुवर्षे प्रवास करीत असल्यानं भूगोलावरील पर्वतशिखरं,नदींचा प्रवाह आणि इतर ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात.मार्ग अचूक शोधण्यासाठी ते या गोष्टींचा देखील उपयोग करतात.
उन्हाळ्याच्या सुरवातीला हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मुलुखात परतू लागतात.तोपर्यंत तेथील हिवाळा संपलेला असतो.स्थलांतराच्या वेळी पक्ष्यांच्या पिलांचं आचरण फारच आश्चर्यकारक असतं.त्या काळात ही पिलं उडण्यास थोडीफार समर्थ झाली असल्यास,ती नैसर्गिक प्रेरणेनं मातापित्यांबरोबर उड्डाण करून जातात.त्यांच्या अंगी इतका धीटपणा असतो की,हजारो किलोमीटरचं अंतर ती सहज उडून जातात.
आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो.त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.
कित्येक जण मला विचारतात की, ह्या पक्ष्यांचा आपणास उपयोग काय?पक्षी आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.आर्थिक दृष्ट्यादेखील त्यांचं महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडींवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदीरघुशींवर काही पक्षी उपजीविका करीत असल्यानं शेतीसाठी ते उपकारकच ठरतात.घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते.याशिवाय ते फुलांचं परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.मृत झालेले कीटक आणि सरपटणाऱ्या, कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे गावातील घाण नाहीशी करतात.घारी आणि गिधाडं मृत जनावरांवर तुटून पडतात.एक प्रकारे हे पक्षी नगर
पालिकेला घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात.
परंतु कावळ्यांची संख्या शहरातून तसंच खेडेगावातून उत्तरोत्तर कमी होत आहे.याचं मुख्य कारण म्हणजे विषारी औषधांचा अति वापर.विषारी द्रव्यं खाल्यामुळे जे कीटक,उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात ते कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्युमुखी पडतात.यातील जे जगतात,ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.हजारो वर्षांपासून कावळे हे माणसाबरोबर राहत आले आहेत.गावातील कावळे जंगलात राहू शकत नाहीत.कावळ्याचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे.म्हणजे तो सरासरीनं माणसापेक्षा अधिक काळ जगतो.
महाभारतात अर्जुनाचा उल्लेख पूर्णपुरुष केला आहे.तसाच पक्ष्यांत कावळा हा पूर्णपक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांतून तो माणसाबरोबर जगत असतो.हा अतिशय सामान्य पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो.म्हणून आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अंतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्यासाठी कावळ्याची निवड केली होती.कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात.त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेता येतो.वराहमिहिर,पराशर,गार्ग्य,नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणा
वरून पूर्वी पावसाचा अंदाज दिला आहे.याकरिता कावळ्यांच्या संबंधाने तीन घटकांचा विचार केला आहे :
१.आंबा,निंब,पिंपळ,करंज,अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी घरटी केली तर पाऊस चांगला पडतो.बाभूळ,बोर,खैर,
हिवर आणि सावर या काटेरी झाडावर घरटी केली तर अवर्षण पडतं.
२.पूर्व,उत्तर,ईशान्य,नैर्ऋत्य आणि वायव्य या दिशांना कावळ्यांनी घरटी केली,तर पाऊस चांगला पडतो.
पश्चिम,दक्षिण,आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी घरटी केली तर पाऊस कमी पडतो.
३.तिसऱ्या घटकात कावळ्यांनी किती अंडी घातली याचा विचार केला आहे.तीन ते चार अंडी घातली तर चांगली वृष्टी होते. एक अंडं घातलं तर अवर्षण पडतं.
याची खात्री करण्यासाठी १९९४ सालच्या उन्हाळ्यात मी कावळ्यांच्या घरट्यांचं निरीक्षण महाराष्ट्रातील पक्षि मित्रांच्या साहाय्यानं केलं.त्या पाहणीत मला आढळून आलं :
१. यंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडावा.
२.मराठवाड्यातील भूकंपग्रस्त लातूर विभागातील कावळे लुप्त झाले आहेत. कुठेही त्यांची घरटी दिसून आली नाहीत. यात धोक्याची सूचना आहे.
३.गडचिरोली भागात कावळे अजिबात नाहीत.ही चिन्हंदेखील चांगली नाहीत.
कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे.
कावळ्यासारखा पूर्णपक्षी आपल्यातून हळूहळू निघून चालला आहे.तो अशा रीतीनं लुप्त होणं ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कावळ्यां
बरोबर आणखीन एक पक्षिकुल नष्ट होईल;ते म्हणजे गोड गळ्यानं,पंचम स्वरानं गाणाऱ्या कोकिळांचं.
कारण कोकिळेची अंडी कावळे उबवितात.त्यांच्या पिलांची वाढ करतात.
पुस्तकं - books
मी गेल्यावर,
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तकं...
पण नाही,
अर्धही वाचता आलेलं नाहीय,
येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी,
मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं...
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागं,
ही अक्षर ओळख सोडून फक्त...
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर,
तुला सांगण्या समजावण्यासाठी की,
मलाही सोडता येणार नाहीय मागे,
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी...
ही काही पुस्तकं आहेत फक्त,
जी तुला दाखवतिल वाट.
चालवतील,तुला थांबवतील,
कधी पळवतील,कधी
निस्तब्ध करतिल,
बोलतं करतील,कधी
टाकतिल संभ्रमात,
सोडवतिल गुंते,
वाढवतील पायाखालचा चिखल,
कधी बुडवतील,तरवतील,कधी
वाहवतील,कधी थोपवतील,प्रवाह
अडवतील,तुडवतील,सडवतील,
बडवतील,हरवतील,सापडतील...
तुझ्याशी काहीही करतील,
ही पुस्तकं...
तू समोर आल्यावर,
नेहेमीच कवेत घेवुन मी माझ्यातली
धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो...
तशीच ही पुस्तकं
उघडतील मधोमध,पसरतील हात,
मिठीत घेतील तुला,
आपोआप होतील हृदयाचे ठोके...
यांच्यात रहस्य आहेत दडलेली,
अनेक उत्तरंही असतील,
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील...
एक लक्षात ठेव,
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन,कधी क्लासिक,सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल,कधी कवितीक,कधी किचकट,कधी सोपं असतं, ध्यानात असु दे या सगळ्यात वाईट काहिच नसतं...
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक,
त्याच वेळची गरज असतं,समज नसतं...
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील,
जी नेतील तुला जायचं आहे तिथं,
फक्त मी असेन,तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही... कारण मी आधीच
होवुन गेलेलो असेन तुझ्यासाठी,
एखादी कथा,एखादी कादंबरी,
एखादी कविता,एखाद्या पुस्तकातली...
माझी आठवण आली की,
या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध...
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होवुन जाईल...
(प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम )
भास एक भयकथा,लेखक - विष्णू गोपाळ सुतार,
यांच्याकडून व्हाट्सअप वरून आलेली ही कवीता…