* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२६/५/२४

वेध कुर्दी स्त्रीजीवनाचा Vedha Kurdish women's life

डोंगर चढताना हॅन्सनचा पाय निसटला.त्या गडगडत काही अंतर खाली गेल्या त्यांच्या खांद्याला,जबड्याला दुखापत झाली;दातांतून रक्त येऊ लागलं.त्यावेळी त्या मायलेकींनी ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना फार गंभीर इजा न झाल्याबद्दल अल्लाचे आभार मानले त्याने हॅन्सन भारावल्या.त्या दोघी काय बोलत होत्या हे कळायला हॅन्सनकडे मार्ग नव्हता,पण त्यांच्या हालचालींवरून त्यांनी बहुधा परमेश्वराचे आभार मानले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला.'माझी कुर्दी भाषेची जाण प्राथमिक गरजांपुरती मर्यादित होती.अमूर्त भावनांचं ज्ञान मला होणं शक्य नव्हतं',असं त्या या प्रसंगाबद्दल लिहिताना म्हणतात.पुढे दुभाषीची मदत मिळाल्यावर त्यांना कुर्दाच्या चालीरीती आणि धार्मिक समजुतींची माहिती हळूहळू होत गेली.


यानंतर काही दिवसांतच त्या खेड्यात आणखी एक लग्न होतं.आता हॅन्सन या शेखच्या कुटुंबाचा एक भाग बनल्या होत्या.त्या वेळी तिथल्या शहरी भागात एक नवी फॅशन आली होती.स्त्रियांच्या अंगरख्यासाठी अतिशय तलम आणि पारदर्शक कापड वापरलं जायला लागलं होतं.

त्यातला एक धागा कुठल्या तरी धातूच्या अतिशय पातळ जरीचा असे.उन्हात ही जर तापून चटके बसत,तरीसुद्धा आपला श्रीमंती तोरा मिरवण्यासाठी वराकडच्या स्त्रियांनी या जरीचे कपडे परिधान केले होते.हॅन्सन वरपक्षाकडल्या असल्यामुळे त्यांनाही हाच वेष घालणं भाग पडलं होतं.

याउलट खेड्यातल्या बाकीच्या स्त्रियांचे कपडे साधेच होते.त्या खेडूत स्त्रिया शेतात काम करणाऱ्या,शेळ्या राखणाऱ्या होत्या.त्या स्त्रिया शेळ्या आणि गाढवांना घेऊन सकाळीच डोंगरात जायला निघत.द्राक्षबागांची निगराणी करणं,शेतातील तण उपटणं,शेळ्यांची देखरेख करणं,दूध काढणं,तसंच सरपण गोळा करून ते गाढवांच्या पाठीवर लादणं अशी कामं करून त्यांची त्वचा चांगलीच रापलेली असे. शेखच्या घरच्या स्त्रियांना अशा प्रकारची कामं करण्याची सवयच नव्हती.त्या क्वचितच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचा गोरा रंग या गर्दीत उठून दिसत होता.शेखच्या घरातल्या स्त्रियांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने.


एकदा हॅन्सनचा मुक्काम असलेल्या घरातल्या एका तरुणाला लग्न करायचं होतं.त्यासाठी तो बरेच दिवस पैसे साठवत होता.त्याने ५०० पौंड होतील एवढी रक्कम साठवली.चांगली बायको मिळवायची तर एवढी रक्कम हवीच.(ही १९५७ ची रक्कम आहे.) तेव्हा त्याने घरातल्या कर्त्या स्त्रीजवळ त्याची लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आयांपैकी एका आईजवळ आणि एका बहिणीजवळ


त्याला मुलगी कशी हवी याबद्दल तो बोलला. त्याच्या वडिलांचा बारदाना खूप मोठा होता. त्यात एक स्त्री कशीही सामावून गेली असती. उलट,मदतीला नवे हात आले असते.त्या मुलाची सख्खी मोठी बहीण आणि त्याच्या वडिलांची सर्वांत धाकटी बायको यांनी या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलं होतं.खरं तर त्याची आई ही सर्वांत पहिली पत्नी होती,पण ती गावठी समजली जात होती.लग्न जुळवणं तिच्या कुवती

पलीकडचं काम आहे,असं सर्वांचं मत पडलं.त्या बहिणीने एक मुलगी बघून ठेवली होती.पण बहीण आणि सावत्र आई थेट त्या मुलीच्या घरी जाऊन बोलणी सुरू करू शकत नव्हत्या,याचं कारण त्या वयाने लहान होत्या.

हॅन्सननी जाऊन उपयोग नव्हता.त्यांना ते लोक 'आपल्यातली' मानत नव्हते.मग त्यांच्या ओळखीच्या एका प्रौढ स्त्रीवर ही जबाबदारी टाकण्यात आली.ती स्त्री,घरातल्या या दोघी आणि हॅन्सन अशा चौघीजणी लग्न ठरवायला निघाल्या.त्या प्रौढ स्त्रीच्या अंगावर सोन्याचे दागिने अंगभर घातलेले होते.साधारणपणे बोलण्याच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. 


मुलीकडची बाजू ऐकीव माहितीवर दर वेळेस नवी खुसपटं काढायची.मुलीची किंमत वाढवायची ही युक्ती होती.शिवाय मुलीसाठी इतर मुलांकडूनही चौकश्या होत आहेत,हेही मुलाच्या बाजूच्या कानावर पडेल ही व्यवस्था केलेली होती.अशा बैठका तासन्तास चालत.शिवाय त्या प्रत्येक बैठकीत चार-सहा आठवड्यांचं अंतर असे.

अखेरीस मुलीच्या आईने ही बाब नवऱ्याच्या कानावर घालण्याचं कबूल केलं. लग्नाच्या बोलण्यामध्ये पुरुषांची परवानगी म्हणजे केवळ औपचारिकताच ! यानंतर मग मुलीला किती दागिने मिळणार,एकूण खर्च किती होणार वगैरे आर्थिक बाबींची चर्चा सुरू झाली. अजूनही हॅन्सननी ती भावी वधू बघितलेली नव्हती.ही आर्थिक बोलणी झाल्यावर मुलगा बघण्याचा कार्यक्रम ठरला.

त्याच्या फोटोचा विषयही निघाला नव्हता.कुर्दघरांमधून माणसांचे फोटो नसतात.माणसांचे फोटो असणं हे इस्लामला मान्य नाही,असं हॅन्सनना सांगण्यात आलं.स्थानिक माणसं, त्यांची संस्कृती,चालीरिती समजावून घ्यायच्या तर लग्नसमारंभासारखा दुसरा हुकुमी प्रसंग नाही.हॅन्सननी नोंदवलेल्या बारीकसारीक निरिक्षणांतून याचाच प्रत्यय येतो.


या पुस्तकात हॅन्सन कुर्दी घरांचं,तसंच त्यांना वापरासाठी दिलेल्या खोल्यांचंही सविस्तर वर्णन करतात.त्यांचं घर डोंगर उतारावरल्या एका शेतात होतं.एक बैठकीची मोठी खोली आणि तिच्या दोन बाजूंना दोन छोट्या खोल्या,असं त्याचं रूप होतं.वाळवंटी भागात घरांना खिडक्या नसतात,तशा त्या या घराला देखील नव्हत्या. घराला व्हरांडा होता.मागच्या बाजूला खोल्यांना भिंत नव्हती.तिथे मोकळं अंगण आणि त्यानंतर संरक्षक भिंत होती.या बंदिस्न अंगणातल्या कोंबड्या आणि शेळ्या घरभरही फिरू शकत. घराच्या छत्तासाठी दोन तुळयांवर मातीच्या सपाट विटा रचण्यात आल्या होत्या.या विटा छोट्याछोट्या फांद्यांवर चटया पसरून त्यावर ठेवण्यात आल्या होत्या.

तुळयांच्या आधाराने भांडिक पक्ष्यांची चिखलाचे गोळे लिंपून तयार केलेली घरटी होती.जमीन मातीची होती.

तिच्यावर सिमेंटचा पातळ थर होता.फार गरम होऊ नये म्हणून या जमिनीवर दिवसभर पाणी मारलं जायचं.


बैठकीच्या खोलीत दोन भिंतींना टेकून ठेवलेले दोन सोफे होते.त्यांचे हात खूप रुंद होते.त्यावर चहाचे कप ठेवता येत असत.बाजूच्या दोन खोल्यांमध्ये गालिचे आणि तक्तपोशी होत्या.त्यावर बसण्यासाठी सोय होती.मागच्या अंगणात एक कॉट होती.भिंतींवर कावेत बुडवून उठवलेले हाताच्या पंज्याचे ठसे होते.त्यातल्या एका खोलीला लागून अंधारात हमामखाना होता. त्याला तर खिडकी असणं शक्यच नव्हते.


दुसरी खोली कोठीची खोली होती.त्या खोलीत शेतीची अवजारं होती.मजूर सकाळी ती घेऊन जात.संध्याकाळी परत आणून ठेवत.दुपारी इथेच ते जेवण करून विश्रांती घेत.मागच्या अंगणातच एक आडोसा होता.तिथे स्वयंपाक व्हायचा. इथल्या व्हरांड्यात कधी कधी पाळणा टांगला जायचा.त्यात घरातलं मूल पडून राहत असे. येणारी जाणारी व्यक्ती त्या पाळण्याला झोका देऊन जायची.


कुर्दी घरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही दोन भिंती एकमेकींशी काटकोन करत नाहीतच,पण कुठल्याही दोन खोल्यांच्या जमिनी एका पातळीवर नसतात.त्यामुळे त्यांची छतंही पायऱ्या पायऱ्यांची असतात.याचं कारण ही घरं जमीन नैसर्गिकरीत्या जशी असेल तशीच ठेवून त्या जमिनीवर भिंती उभ्या करून बांधलेली असतात.फर्निचर ठेवण्यापुरतीच जमीन सपाट करण्यात येते.शेतात झाडांच्या फांद्यांनी शाकारलेल्या काही झोपड्या होत्या.

त्या दोन भक्कम ओंडक्यांच्या आधारावर उभ्या होत्या. सूर्य डोक्यावर आला की शेतमजूर या आडोशाला विश्रांती घेत.या झोपड्यांना भिंती नव्हत्या,तर चटया आणि जुनी जाजमं लटकवून आडोसा तयार करण्यात आला होता.

इथेच दुपारचं जेवणही व्हायचं. 'काळा वारा', म्हणजे वाळूचं वादळ आलं,की सर्व गावावर धुळीची चादर पसरली जायची.सगळं जग त्या धुळीसारखंच पिवळं व्हायचं.फाटकं आणि खिडक्या खिळखिळ्या व्हायच्या.

इथल्या घरांना फार खिडक्या का नसतात ते अशा वेळी लक्षात यायचं.


खेडूत कुर्दी स्त्रिया बुरखा आणि आभा म्हणजे शरीर झाकणारा काळा वेष घालत नाहीत. शहरात मात्र तो पेहराव सक्तीचा असतो.कुर्द एकूणच अशिक्षित असतात.

खेडेगावात सुशिक्षित व्यक्ती सापडणं अवघडच.शहरात साक्षरतेचं प्रमाण थोडं अधिक असतं.स्त्रिया अपवादानेच शिकतात.इतर मुस्लिम समाजांप्रमाणेच कुर्दी स्त्रियांना घरात आणि घराबाहेर दुय्यम वागणूक मिळते.घरकामाचा सर्व भार स्त्रियांनाच उचलावा लागतो.हॅन्सन राहत होत्या त्या घरात कामाचा सर्व बोजा सतरा वर्षांची सर्वांत धाकटी मुलगी,अज्जा आणि बारा वर्षांची नोकराणी यांच्यावर होता. अज्जाला घरातले पुरुष जेवत असताना त्यांच्या सेवेसाठी तिथे उपस्थित राहावं लागत असे. ताटावर माश्या बसू नयेत याची काळजी घेणं हे तिचं प्रमुख काम.ज्यांचं जेवण होईल त्यांच्या हातावर पाणी घालायचं;नंतर ती सर्व खरकटी भांडी घेऊन जवळच्या झऱ्याकाठी जायचं आणि तिथे ती घासून,धुऊन,वाळवून परत घरात आणायची हे कामही या मुलीच करत.अंगण झाडणं हे अज्जाचं आणखी एक काम होतं.हॅन्सन पाहुण्या होत्या.त्यांची सर्व सेवाही त्यांनी नको म्हटलं तरी या दोन मुलीच करत असत. एक दिवस त्यांनी त्या मुलींशी बोलताना सहजच त्यांचे हात हातात घेतले.तर त्या दोघींच्या हातांना काम करून घट्टे पडलेले असल्याचं त्यांना दिसलं.


घराच्या मागच्या अंगणामध्ये चटयांचा आडोसा करून न्हाणीघर तयार केलेलं होतं.तिथे अंघोळ करणं हॅन्सनना योग्य वाटत नव्हतं.त्या त्यांच्या खोलीतच दोन घमेल्यांमध्ये पाणी घेऊन ओल्या पंचाने अंग पुसून काढत असत.पण यासाठी त्या स्वतः पाणी आणू लागल्या,तर अज्जा धावत येऊन त्यांच्या हातातून मडकं हिसकावून घेई. मग ती आणि तिची मदतनीस त्यांच्या खोलीत पाणी भरून ठेवत असत.वाळवंटी प्रदेशातल्या विविध प्रथाही हॅन्सनना बघायला मिळाल्या.त्याबद्दलही त्यांनी अगदी बारकाईने निरीक्षणं नोंदवली आहेत.कुर्दामध्ये कुणीही व्यक्ती जखमी झाली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल तर तिला इतरांच्या आधाराने चालवतच हकिमाकडे किंवा दवाखान्यात नेलं जातं.सर्वच वाळवंटी प्रदेशात उष्माघाताचा अनेकांना त्रास होतो.हॅन्सननी अशा दोन प्रसंगी त्या व्यक्तींना असं चालवत वैद्यकीय उपचाराला नेलं जातं हे बघितलं.दैनंदिन कुर्दी जीवनातले असे विविध प्रसंग हॅन्सननी पुस्तकात विस्तृतपणे मांडलेले आहेत.


त्या रोगात कोरोनातले संदर्भ देऊन स्त्रियांच्या दुय्यम स्थानाची चर्चा केली आहे.या पुस्तकात कुठलीही सनसनाटी घटना नाही हे खरे;पण सहा देशात पसरलेल्या आणि तरीही आपली संस्कृती आणि भाषा जपणाऱ्या,ती नष्ट होऊ नये म्हणून जिवापाड प्रयत्न करणाऱ्या एका जमातीबद्दल खात्रीशीर माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे.ज्या वेळी 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा कुर्दांपुढे काय वाढून ठेवलंय याची हॅन्सननाच काय पण इतर कुणालाही कल्पना नव्हती.कुर्द जमात सहा-सात देशांत पसरलेली आहे.कुर्द अशिक्षित असण्यातच या देशांचा फायदा आहे.(त्याला अर्थातच इतर काही काही भूराजकीय कारणंही आहेत.) कुर्द शिकले तर स्वातंत्र्याची चळवळ उभी करतील आणि वेगळा कुर्दिस्तान होणं या देशांना परवडणारं नाही. कारण कुर्दिस्तान भूभागात तेल आहे.त्यामुळे इतर अनेक वेळी एकमेकांशी न पटणारे हे देश कुर्दाना दडपण्यात मात्र एकमेकांना मदत करतात.कुर्द सुन्नी मुस्लिम आहेत.इराण आणि उत्तर इराक वगळता इतर देशांमध्येही सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे;पण तरीही कुर्दावरच्या दडपशाहीत सर्वजण एकत्र आहेत. अमेरिकेने कुर्दाचा आधी रशियाविरोधात,मग खोमेनीच्या इराणविरोधात आणि नंतर सद्दामविरोधात वापर करून घेतला.नंतर कुर्दाना वाऱ्यावर सोडलं.या पार्श्वभूमीवर हॅन्सन यांच्या अभ्यासाचं महत्त्व आणखीनच वाढतं.१९६० मध्ये इराकमध्ये बाथ पक्षाची सत्ता आली. त्यानंतर काही काळातच सद्दाम हुसेनच्या हाती सत्ता गेली आणि कुर्दाचं पद्धतशीर शिरकाण सुरू झालं.त्यामुळे त्यानंतरही कुर्दी स्त्रियांचा कधीच कुणी अभ्यास करू शकलं नाही. कुर्दामध्ये निरक्षरतेचं प्रमाण भरपूर असल्याने कुणी कुर्द उठून आपल्या जमातीवर लिहील हे अवघडच.त्यामुळे कुर्दी स्त्रीजीवनाचं जगाला दर्शन घडवणारं एकमेव अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणून मानवशास्त्रीय अभ्यासात या ग्रंथाची दखल घ्यावी लागते.'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे त्यामुळेच एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं.


२४.०५.२४ या लेखातील अंतिम भाग…

२४/५/२४

कुर्दी स्त्रीजीवनाचा वेध / Kurdish women's life

एका पुरातत्त्व संशोधन मोहिमेसाठी हेनी हॅन्सन हराकी कुर्दिस्तानात पोहोचल्या.तिथल्या लोकजीवनाशी एकरूप होऊन त्यांनी आजवर जगाला न दिसलेला कुर्दी समाज आणि त्यांची संस्कृती वाचकांसमोर आणली.त्यांच्या या चाकोरीपल्याडच्या अभ्यासपूर्ण भटकंतीतून साकारलेलं 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक आज मानवशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्वाचं मानलं जातं.


कुर्दिस्तान हा इराक,इराण,तुर्कस्तान आणि सिरीया या देशांमध्ये विभागला गेलेला कुर्दी वंशाच्या लोकांचा प्रदेश.

देशापेक्षाही आपल्या वंशाची अस्मिता बाळगणारे कुर्दी हे धर्माने सुन्नी मुस्लिम आहेत.पण अनेक वर्षं आसपासच्या इतर मुस्लिम समाजाशी त्यांचा फार कमी संबंध होता.

किंबहुना विसाव्या शतकातल्या साठच्या दशकापर्यंत बाहेरच्या समाजालाही कुर्दीबद्दल फार कमी माहिती होती.प्रत्यक्ष कुर्दी गावांमध्ये राहून या लोकांचं जगणं समजून घेण्याचं आणि ते जगासमोर मांडण्याचं श्रेय जातं ते हेन्त्री हॅरॉल्ड हॅन्सन या डॅनिश पुरातत्वज्ञ बाईंना.कुर्दी लोकजीवन समजून घेण्यासाठी इराकी कुर्दिस्तानात मुक्काम ठोकून त्यांनी केलेलं काम हे एखादा झंगड माणूसच करू जाणे! त्यांच्या या मुक्कामातल्या अनुभवांतून 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक साकारलं.


त्याचं झालं असं की इराकमधल्या 'छोट्या झाब' नदीवर १९५७ मध्ये डोकान धरण बांधायचं ठरलं.या धरणामुळे इराकमधल्या अनेक पुरातत्त्वीय महत्त्वाच्या स्थानांना जलसमाधी मिळणार होती.त्याचबरोबर कुर्दी लोकांची बरीच खेडीही पाण्याखाली जाणार होती.त्यामुळे धरण बांधून पूर्ण होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पुरातत्वीय ठेवा जतन करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं होतं.तसंच आजवर जगाला अज्ञात असणाऱ्या कुर्दी लोकजीवनाचं दस्तावेजीकरण करणंही आवश्यक होतं.हे काम डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयातील तज्ज्ञांवर सोपवण्यात आलं.त्या मोहिमेत या राष्ट्रीय संग्रहालयातील वांशिक अभ्यासक (एथ्नोग्राफर) हेत्री हॅन्सन यांचाही समावेश होता.(अज्ञात कुर्दी स्त्रीजीवनाचा वेध - हेन्नी हॅन्सन,हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


हेन्नी हॅन्सन ज्या मोहिमेच्या सदस्य होत्या त्या मोहिमेला कार्ल्सवर्ग प्रतिष्ठानचा भक्कम आर्थिक पाठिंबा होता.

हॅन्सन ऐन मे महिन्यात बगदाद आणि किर्कुकमार्गे डोकान धरणाच्या परिसरात पोहोचल्या.डोकान धरण उत्तर इराकी कुर्दिस्तानात आहे. '४५ पूर्व रेखांश आणि ३६ उत्तर अक्षांशावर हा भाग नकाशात पाहावयास मिळतो,' असं पुस्तकात त्या सुरुवातीलाच सांगतात.पुढच्या काही पानांमध्ये आपल्याला त्या भागाचे नकाशेही बघायला मिळतात.सुरुवातीला हॅन्सन यांनी त्या पुरातत्त्वीय मोहिमेच्या मुख्य ठाण्यावर मोहिमेच्या इतर सदस्यांबरोबर राहावं असं ठरलं होतं.हा मुक्काम 'तेल शमशारा' इथे होता. (तेलचा तिथल्या भाषेतील अर्थ उंचवटा) हॅन्सननी तेल शमशारा इथे राहून पुरातत्त्वीय उत्खननात भाग घ्यावा आणि जमल्यास अधूनमधून जवळपासच्या कुर्दी खेड्यांमधून स्त्रियांशी संपर्क साधून लोक संस्कृतीचा अभ्यास करावा,अशी कामाची पूर्वनियोजित रूपरेखा ठरली होती.हॅन्सन यांना कुर्दी लोकसंस्कृतीचं असं दुरून दर्शन घेणं मान्य नव्हतं.त्यांनी ठरवलं,आपण एखाद्या कुर्दी खेड्यातल्या घरातच मुक्काम ठोकायचा.


तसं बघायला गेलं तर हे पाऊल भलतंच धाडसाचं होतं.कुर्दी लोक एखाद्या एकट्या स्त्रीला पाहुणी म्हणून स्वीकारतील का,त्यांना हवी ती माहिती देतील का,हा प्रश्नच होता.पण हॅन्सन यांनी ते धाडस दाखवलं.त्यानुसार टोपझावा नावाच्या खेड्यातल्या शेखकडे,म्हणजे ग्रामप्रमुखाकडे त्यांनी स्वतःची राहण्याची सोय करून घेतली.या खेड्यातले काही गावकरी डोकान धरणाच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते.स्थानिक लोकांसमवेत राहण्याची सोय तर झाली होती,पण प्रश्न भाषेचा होता.तिथल्या लोकांना कुर्दीशिवाय दुसऱ्या भाषेचा गंध नव्हता,तर हॅन्सनना फक्त डॅनिश आणि थोडंफार इंग्रजी येत होतं तेवढंच.पण बरीच शोधाशोध केल्यावर त्यांना जवळच्याच शहरात इंग्रजी शिकवणारी एक दुभाषी मुलगी मिळाली.तिचं नाव मलिहा करीम सैद. पुढे हॅन्सन मलिहाच्याच घरी राहू लागल्या.त्यामुळे कुर्दी महिला आणि कुर्दीचे सांस्कृतिक व्यवहार यांचा त्यांना अगदी जवळून अनुभव घेता आला.मलिहाचे अनेक नातेवाईक आसपासच्या खेड्यांमध्येच राहत असल्यामुळे अनेक गावांमध्ये त्यांना फिरता आलं.थोडक्यात, पुरातत्वज्ञांसोबत राहून जमेल तसा लोक संस्कृतीचा अभ्यास करण्याऐवजी आता हॅन्सन त्या गावात स्थानिकांबरोबर राहून मजुरांबरोबर धरणाजवळच्या तळावर जाऊन पुरातत्त्वीय काम करू लागल्या.


'टोप'झावाबरोबरच राकावाह,सुलेमानैया आणि मिर्झा रुस्तम या गावांमध्येोले हॅन्सन यांनी वास्तव्य केलं.यातलं मिर्झा रुस्तम हे झाब नदीच्या काठी असलेले गाव.तिथे नदी ओलांडण्यासाठी 'तर' होती.शिवाय बस सेवाही होती.त्यामुळे हॅन्सननी मिर्झा रुस्तम इथे सर्वाधिक मुक्काम केला.या तरीतूनच त्या डोकान धरणाजवळच्या तळाजवळ जायच्या. बसने त्या शडाला,तसंच चार्मबान पर्वतराजी ओलांडून सर्गालूसारख्या गावीही जाऊन आल्या. त्यांनी इराणच्या सीमेलगत असलेल्या हलाबया, बल्ख आणि तवेला या डोंगरी वस्त्यांची,तसंच इराकच्या उत्तर सीमेवरील सर्कान,अर्बिल, मोसुल आणि रोवांदुझ या गावांचीही पाहणी केली.(सध्या इसिसच्या संदर्भात यातल्या बऱ्याच गावांची नावं ऐकायला मिळतात.)


कुर्दी लोकजीवन,विशेषतः तिथल्या स्त्रियांचं जगणं उलगडून दाखवण्यापूर्वी हॅन्सन आपल्याला कुर्दाचा इतिहास सांगतात.हा इतिहास सततच्या झगड्यांचाच आहे.एकीकडे ग्रीस,रोम आणि दुसरीकडे मेसोपोटेमिया,

पर्शिया ही साम्राज्यं.त्यांच्यामध्ये वसलेल्या कुर्द जमातीला आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता लढाऊ बाणा अंगीकारणं क्रमप्राप्तच होतं. इ. स. पू. ४०० च्या सुमारास झेनोफोन आणि त्याचे दहा हजार ग्रीक योद्धे बॅबिलॉनला गेले होते.तिथे एका पर्शियन राजाने त्यांना बोलावून घेतलं होतं.त्यांची बोलणी संपवून परतताना त्यांना 'कार्दुशी'शी लढावं लागलं.हाच आजच्या कुर्द वसाहतींचा प्रदेश.आजही या भूभागात ही हकीकत लोककथेत अमर झाली आहे.या भूभागावर वेळोवेळी वेगवेगळ्या साम्राज्यांची नाममात्र सत्ता असली, तरी अगदी काल-परवापर्यंत कुर्दावर खऱ्या अर्थाने कुणीच राज्य करू शकलं नव्हतं, पर्शियन,अरब,नंतर पुन्हा पर्शियन,मग मंगोल्स, त्यानंतर तुर्की साम्राज्याचा एक भूभाग म्हणून कुर्दिस्तानची ओळख होती.पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तान,सीरिया,इराक,इराण, सोव्हिएत संघराज्य या देशांत कुर्दिस्तान विभागलं गेलं.कुर्दामध्ये दोन प्रकार आहेत. काही कुर्दी टोळ्या भटक्या असून त्या ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करतात,तर हॅन्सन ज्या कुर्दामध्ये वावरल्या ते कुर्द स्थिरावलेले होते. शेती आणि पशुपालन हा त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्त्रोत होता.जमीन-पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते गहू,तांदूळ,

तंबाखू,कापूस आणि फळांचं उत्पादन करत होते.

त्याचबरोबर शेळ्या,मेंढ्या आणि कुक्कुटपालन हे जोडधंदे त्यांनी अंगीकारले होते.किर्कुक आणि सुलेमानैया या शहरांतला व्यापारबहुतांशी कुर्दाच्या हाती होता.

याशिवाय इराक पेट्रोलियम या कंपनीच्या तेलविहिरींवर ते काम करत असत.पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात स्वतंत्र कुर्दिस्तानच्या स्थापनेचा पाश्चात्त्यांनी काही काळ विचार केला होता;पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही.

तेव्हापासून कुर्द विरुद्ध अरब,इराणी आणि तुर्की हा लढा आजही चालू आहे.कुर्द हे जरी सुन्नी मुस्लिम असले तरी त्यांची अरबांशी कधीच जवळीक नव्हती.ते स्वतःला इराकी किंवा तुर्की किंवा उझबेकी समजत नाहीत,तर त्यांची कुर्द ही ओळख त्यांच्या अभिमानाची बाब आहे.इराकी कुर्दी इराकमधल्या सत्ताधाऱ्यांशीही फटकून वागत आले होते.इंडो-युरोपी भाषागटातील त्यांची भाषा फार्सी (पर्शियन) भाषेशी संलग्न आहे.


सेमाइट म्हणजे पश्चिम आशियाई वाळवंटी जमातींच्या भाषागटातली अरबी भाषा ही कुर्दी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.कुर्दाची ही पार्श्वभूमी स्पष्ट केल्यावर हॅन्सन आपल्याला प्रत्यक्ष कुर्दाच्या वस्तीत घेऊन जातात आणि त्यांच्या मुक्कामांतल्या प्रसंगांमधून कुर्दी स्त्रीजीवन वाचकांसमोर उलगडतात.इराकी-कुर्दी लोकसंस्कृतीचा अभ्यास हा जरी हॅन्सन यांचा इराकमध्ये येण्यामागचा मुख्य उद्देश असला,तरी त्या स्त्री असल्यामुळे त्यांना कुर्दिश स्वयंपाक घरात सहज प्रवेश मिळू शकेल,ही सुप्त अपेक्षा त्यांच्या निवडीमागे असावी.कारण तोपर्यंत कुर्दिश स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि त्यांचा जीवनाचा कुणीच अभ्यास केलेला नव्हता.या पुस्तकामार्फत हॅन्सन यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केली आहे असं म्हणता येईल.इराकी कुर्दीस्तानात दाखल होईपर्यंत हॅन्सन यांचं संपूर्ण आयुष्य डेन्मार्कमध्ये व्यतीत झालं होतं. हा देश उत्तर युरोपातला.उत्तर धृवावरून येणारं गार वारं इथलं तापमान कधीच फारसं वाढू देत नाहीत.वर्षातले सहा महिने बर्फाच्छादित असणाऱ्या या देशातून हॅन्सन जगातल्या एका अतिशय उष्ण अशा वाळवंटी देशात पोहोचल्या होत्या.खरं तर इराकचा उत्तर भूभाग वाळवंटी नव्हे,तर सपाट गवताळ भूप्रदेशाचा एक भाग आहे.फक्त तिथे गवताऐवजी खुरटी काटेरी झुडुपं पसरलेली आहेत.

इथे जमीन खूप तापल्यामुळे हवेचे कमी दाबाचे पट्टे तयार होतात.त्यात धूळ वर उचलली जाते;ती काही उंचीवर पोहोचली की हवेची उद्धरणशक्ती कमी होते;त्यानंतर काही मीटर ते काही किलोमीटर एवढा प्रवास केल्यावर ही धूळ खाली बसते.धूळ आणि अतिउष्णता यामुळे या भागात दुपारी मोटारीने प्रवास करत नाहीत.मोटारीचे धातूचे भाग तापतात.त्यांना स्पर्श केला तर हात भाजून निघतो.गाडीत भट्टीसारखं वातावरण असतं. काचा उघड्या ठेवल्या तर वाऱ्याबरोबर फिरणारी धूळ गाडीत शिरते.कपड्यांत आणि केसांत शिरलेली धूळ नंतर काढून टाकणं हा एक उद्योगच होऊन बसतो.


हॅन्सनना याची कल्पना नव्हती.पहिल्या दिवशी त्या डोकान धरणाकडे जायला निघाल्या त्या मोटारीनेच.त्या ऊष्ण प्रवासाचा अनुभव घेतल्यावर त्या जाग्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांना कळलं की दुपारी धरणाचं कामही बंद असतं । तापलेल्या अवजारांना स्पर्श करणंही शक्य नसल्यामुळे दुपारी सक्तीची सुट्टी घ्यावी लागते.


हॅन्सन यांना कुर्दी लोकांच्या घरांमध्ये राहण्याची सवय करून घेण्यासाठीही प्रयास पडले.डोंगरी भागातील कुर्दी घरं ही डोंगर उतारावर एकावर एक अशी वसलेली असतात.खालच्या घराचा वरचा मजला त्यावरच्या घराच्या तळमजल्याच्या पातळीवर असतो.घरं मातीचीच असतात. त्यांच्या छतांना उतार असतो.जमिनी त्यातल्या त्यात सपाट केलेल्या असतात.कुंभाराने चिखल रचून घरं केली तर ती कशी दिसतील तशी ही घरं असतात.फक्त त्यांच्या निर्मितीत चाक वापरलेलं नसतं.तिथल्याच मातीचा चिखल करून तो उन्हात वाळवून केलेल्या विटांची ही बैठी घरं सुबक वाटली तरी त्यांच्या छतावर जाण्यासाठी केलेल्या जिन्यांना जिने आणि त्यांच्या पायऱ्यांना पायऱ्या का म्हणायचं,असा प्रश्न हॅन्सनना पडत असे.कुर्दी स्त्रिया सवयीने या जिन्यांवरून झटपट चढून जात,पण हॅन्सनना ते जिने चढताना खूप कसरत करावी लागत असे.हॅन्सनना दुभाषी मिळाली आणि त्यांच्या महिलांसोबतच्या संवादात थोडी सुलभता आली. ही दुभाषी,मलिहा मुस्लिम असल्याने तिला एकटीने हिंडण्याची परवानगी नव्हती.ती आली तेव्हा तिच्याबरोबर दोन पुरुष होते.एक तिचा छोटा भाऊ.तो बारा-तेरा वर्षांचा म्हणजे कुर्दाच्या दृष्टीने पुरुषच होता.दुसरा तिच्या बहिणीचा नवरा.मलिहा कशी कुठे राहणार,तिचं नक्की काम काय आणि इतर पुरुषांशी तिचा संबंध येण्याची शक्यता नाही ना,हे तपासून बघायला आला होता.पुढे तिचा भाऊ सतत तिच्याबरोबर असे.कुर्दिस्तानमधल्या वास्तव्यात हॅन्सननी अनेक लग्नं जवळून बघितली.हे विवाह समारंभ त्यांना कुर्दी लोकसंस्कृतीबद्दल बरंच काही शिकवून गेले.अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांना एका विवाह समारंभाचं आमंत्रण मिळालं.त्या वेळेला अजून दुभाषीची सोय व्हायची होती. त्या पुढे ज्या कुटुंबात राहिल्या त्याच कुटुंबात हे लग्न होतं.वधू जवळच्याच एका खेड्यातली होती.तिला आणायच्या काफिल्यात सामील होशील का,असं हॅन्सनना विचारलं गेलं. 


इराकमध्ये तेव्हा रस्ते कमी,पण मोटारी भरपूर अशी परिस्थिती होती.पेट्रोल अतिशय स्वस्त होतं.त्यामुळे वधूला आणायला जाणारा मोटारींचा ताफा खूप मोठा होता.त्या ताफ्यात सर्व गावच सामील झालं होतं.

मोटारींच्या टपांवरसुद्धा वऱ्हाड्यांची गर्दी होती.हॅन्सनना एक गोष्ट त्या वेळी लक्षात आली - वधूला आणण्याच्या ताफ्यात स्त्रियांना स्थान नसतं. त्यामुळे मग त्यांनी वधूच्या आगमनाची तयारी करणाऱ्या स्त्रियांमध्ये सामील व्हायचं ठरवलं.गावाच्या सीमेबाहेर मोटारीतून उतरवलेल्या वधूला एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसवण्यात आलं.ती बुरख्यात होती.ती घोड्यावर स्वार होताच संगीत सुरू झालं आणि हळूहळू त्या संगीताचा आवाज वाढू लागला.सर्वच लग्नांमध्ये हेच संगीत वाजतं,असं पुढे हॅन्सनच्या लक्षात आलं. या संगीताचा शेवट बहुधा कुणी तरी उत्साही तरुण हवेत गोळी झाडून करायचा.कधी एका गोळीत हा उत्साह आवरला जात असे,तर कधी बंदुकांच्या अनेक फैरी झडत असत.या समारंभात फक्त पुरुष उत्साहाने नाचत असत. स्त्रिया घरांच्या छतांवर बसून हे सर्व बघत असत. तिथेच त्यांचं जेवणही होई.छतावर चढणं-उतरणं ही कसरत रिकाम्या पिंपाच्या आधाराने करावी लागत असे.नवरी मुलगी घरात एका अंधाऱ्या खोलीत पूर्ण लांबीचा झगा घालून बसलेली असे. या खोलीला एक चौकोनी बिनगजांची खिडकी असे.या चौकोनाच्या कडा वर्तुळाकृती बनवायचा प्रयत्न झाल्याचं लक्षात येई.वधूच्या झग्यावर जरतारी नक्षीकाम असे.या वधूचं आधी एक लग्न झालं होतं.ते का रद्द झालं त्याबद्दल कुणी काही बोलत नव्हतं.ती आता २६ वर्षांची होती,

म्हणजे कुर्दी पद्धतीनुसार तिच्या लग्नाला खूपच उशीर झाला होता.तरीही तिच्यासाठी वराला भरपूर किंमत मोजावी लागली होती.हे लग्न झालं आणि काही दिवसांतच हॅन्सन या खेड्यातल्या शेखच्या घरी राहायला आल्या. पहिले पंधरा दिवस त्यांच्यासोबत दुभाषी नव्हती.'त्या काळात घरातल्या यजमानणीबरोबर मी कसा काय संवाद साधला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.ना तिला माझी भाषा येत होती, ना मला तिची;पण आमचं काहीच अडलं नाही. खुणांची भाषा आणि सातत्याने वापरावे लागणारे शब्द आम्ही एकमेकींना सांगत होतो. त्या थोडं डॅनिश शिकल्या आणि मी कुर्दी भाषेचे प्राथमिक धडे घेतले.पण तिच्याशी आणि तिच्या मुलीशीही माझी चांगली गट्टी जमली होती.' असं हॅन्सन सांगतात.


एक दिवस या तिघी डोंगर उतारावर असलेल्या द्राक्षांच्या मळ्यात गेल्या.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २६.०५.२४ या लेखामध्ये…

२२/५/२४

चूक कबूल करा..Admit your mistake..

माझ्या घराच्या अगदी जवळ एक जंगल होतं ज्यात खूप उंच - उंच वृक्ष होते.वसंत ऋतूमध्ये इथे ब्लॅकबेरीच्या झाडींवर पांढरट छटा पसरत होती,खारी आपलं घर बनवत होत्या आणि उंच उंच गवत उगवत होतं.या सुंदर जंगलाचं नाव फॉरेस्ट पार्क होतं आणि हे तसंच दिसत होतं जसं ते त्या वेळी असेल,ज्या वेळी कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला होता.मी नेहमीच या जंगलात आपल्या छोट्या बोस्टन बुलडॉग रेक्सला फिरवायला घेऊन जात होतो. रेक्स प्रेमळ स्वभावाचा निरूपद्रवी छोटासा कुत्रा होता आणि जंगलात आमच्याशिवाय कोणी नसल्यामुळे मी त्याला मोकळे सोडून देत होतो.एक दिवस तिथे आम्हाला एक पोलीस दिसला जो आपली सत्ता दाखवायला आसुसलेला होता.


तुम्ही कुत्र्याला मोकळं का सोडलं आहे? याला पट्ट्याने बांधलं का नाही? तुम्हाला माहीत आहे की,हे कायद्याच्या विरुद्ध आहे? पोलिसांनी मला फटकारत विचारलं.


"हो, मी जाणतो," मी हळू आवाजात उत्तर दिलं. मला असं वाटलं की,तो इथे कोणाला नुकसान नाही पोहोचवणार.

तुम्हाला वाटतं आहे? कायद्याला या गोष्टीचं काही घेणं-देणं नाही की तुम्हाला काय वाटतं.कुत्रा एखाद्या खारीला मारू शकतो वा कोणा मुलाला चावू शकतो.मी या वेळेस तर तुम्हाला सोडतोय:पण पुढच्या वेळेस जर मी कुत्र्याला बिनासाखळीचं पाहिलं,तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुत्र्याला दोघांनाही कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं करीन.


मी पुढच्या वेळी असं करणार नाही म्हणून वचन दिलं.

आणि मी आपलं वचन निभावलं;पण काही दिवसां -

पर्यंतच;ना रेक्सला साखळी आवडत होती आणि मला,

यामुळे आम्ही नशिबावर सोडायचं ठरवलं.काही काळ तर सगळं ठीकठाक राहिलं; पण एका दुपारी जेव्हा मी आणि रेक्स पहाडावर धावत होतो,तर अचानक आम्हाला परत तोच पोलीस भेटला.रेक्स सरळ धावत होता,नेमका पोलीस ऑफिसरच्या दिशेने.


मला कळलं की,मी वाईट रितीने फसलो होतो. यामुळे मी पोलीस ऑफिसरच्या बोलण्याची वाट नाही पाहिली.

पोलीस ऑफिसर बोलण्याच्या आधीच मी बोललो,

ऑफिसर आम्ही रंगे हाथ पकडले गेलो आहोत.मी अपराधी आहे.मी कुठलाच बहाणा नाही करणार,कुठलीच सफाईसुद्धा देणार नाही.तुम्ही मला मागच्या आठवड्यातच चेतावणी दिली होती की,मी जर कुत्र्याला विनासाखळीचं फिरवलं तर तुम्ही मला दंड कराल.यानंतर पण मी कुत्र्याला विनासाखळीचं फिरवतो आहे.


पोलिसवाल्याने हळू आवाजात म्हटलं,मला माहीत आहे की,कुत्र्याला विनासाखळीने फिरवायला छान वाटतं,खास करून जेव्हा आसपास कोणी नसताना.

हो,चांगलं तर वाटतं; पण हे कायद्याच्या विरुद्ध आहे,मी उत्तर दिलं.पण इतका छोटा कुत्रा कोणाचं काय नुकसान करेल? पोलिसवाला म्हणाला.


"तरी पण ऑफिसर,हा खारींना मारू शकतो."

मला असं वाटतं की,या गोष्टीला तुम्ही खूपच गंभीरपणे घेत आहात,तो म्हणाला,तुम्ही कुत्र्याला माझ्या नजरेपासून दूर धावत जायला सांगा.मग तुम्ही आणि मी दोघेही या गोष्टीला विसरून जावू या.पोलिसवालासुद्धा मनुष्य होता.तो पण महत्त्वपूर्ण दिसायचा प्रयत्न करीत होता,याकरता जेव्हा मी स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली,तर त्याच्यापाशी आपल्या आत्मसन्मानाला दाखवण्याचा एकच मार्ग उरला होता आणि तो होता दया आणि उदारता दाखवणे.


पण जर मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असता,तर मग काय झालं असतं? तुम्ही तर जाणताच,

पोलिसवाल्याशी वादात कोणीच जिंकू शकत नाही.

त्याच्या बरोबर शाब्दिक तलवारबाजी करण्याऐवजी मी कबूल केलं की, तो पूर्णपणे बरोबर होता आणि मी पूर्णपणे चूक.मी आपली चूक,तत्काळ,पूर्णतः आणि उत्साहाने स्वीकारली.या बाबतीत मी त्याचा पक्ष घेतला आणि त्याने माझा.या प्रकारे पूर्ण गोष्ट चांगल्या प्रकारे सोडवली गेली.लॉर्ड चेस्टरफील्डही इतक्या चांगल्या पद्धतीने उदारता नसते दाखवू शकले,जितकी की त्या पोलीस ऑफिसरने दाखवली.खरं तर त्या पोलिसाने ज्याने मला एक आठवडा आधीच कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भीती दाखवली होती.


जर तुमच्या चुकांवर कोणी तुम्हाला रागावणार असेल,तर हे चांगलं होणार का? असं होण्याआधीच आपण स्वतः आपली चूक मान्य करावी.समोरचा आपल्याला आपल्या चुका सांगण्याऐवजी आणि नावं ठेवण्याऐवजी आपणच चूक मान्य करावी.

आपल्या बाबतीतल्या सगळ्या चुकांचा उल्लेख करा जो तुमच्या हिशेबाने समोरचा सांगणार आहे किंवा विचार करा आणि त्याला संधी न देता ते काम स्वतःच करून टाका.शंभरातल्या नळ्याण्णव वेळा समोरचा तुमच्या बाबतीत उदार आणि क्षमेचा 

 ठेवेल आणि तुमच्या चुकांना कमी करून सांगेल जसे त्या पोलीसवाल्याने केलं.


कमर्शियल आर्टिस्ट फर्डिनन्ड ई.वॉरेनने आपल्या एका चिडचिड्या ग्राहकासमोर याच तंत्राचा प्रयोग केला.


जाहिरातीकरता आणि प्रकाशनाकरता ड्रॉइंग करण्याच्या वेळी एकदम एकाग्रता असणं महत्त्वाचं असतं,मिस्टर वॉरेननी आम्हाला ही गोष्ट सांगताना म्हटलं.


अनेक आर्ट एडिटर्स खूप लवकर आपलं काम करतात आणि अशा वेळी छोट्या छोट्या चुकांची संभावना जास्त असते.मी अशा एका आर्ट एडिटरला ओळखतो की,

ज्याला छोट्या छोट्या चुका शोधायला नेहमीच खूप मजा यायची. त्याच्या ऑफिसमधून निघताना माझा मूड नेहमीच खराब व्हायचा.टीकेमुळे नाही,तर त्याच्या आक्रमक पद्धतीमुळे!आत्ताच मी एका शीघ्र कामाला ताबडतोब करून या एडिटरकडे पाठवलं आणि त्याने तत्काळ मला ऑफिसमध्ये बोलावलं.फोनवर त्यानी मला सांगितलं की, माझ्याकडून एक चूक झाली होती.जेव्हा मी पोहोचलो,तर मी बघितलं की वातावरण अगदी तसंच होतं जशी की मी कल्पना केली होती आणि ज्याला मी घाबरत होतो.तो शत्रूच्या रूपात होता आणि मनातल्या मनात खूश होता की,परत एकदा त्याला टीका करायची संधी मिळाली.त्यांनी रागानं विचारलं की,मी अमुक अमुक गोष्ट का बरं केली? मी तुमच्या कोर्समध्ये वाचलेल्या आत्मपरीक्षणाच्या धड्याचा प्रयोग करायचा निश्चय केला,त्यामुळे मी म्हणालो, 


मित्र जोडा प्रभावशाली बना..डेल कार्नेगी,अनु- कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिसिंग हाऊस..


तुम्ही जे म्हणत आहात,ते बरोबर आहे आणि मी चूक आहे आणि माझ्या चुकीचा मी काही बहाणा पण बनवू शकत नाही.मी खूप वेळापासून ड्रॉइंग करतोय आणि माझ्याकडून या प्रकारची चूक व्हायला नको होती.माझ्या चुकीची मला लाज वाटते.


 लगेच तो माझा बचाव करायला लागला, हो तुम्ही ठीक बोलता आहात;परंतु तसं पाहिलं,तर ही काही गंभीर चूक नाही आहे.हे तर केवळ,'मी त्याला मध्येच टोकलं',

कोणतीही चूक महागात पडू शकते आणि त्यामुळे राग तर येतोच. तो मध्येच बोलायला बघत होता;पण मी त्याला बोलायची संधीच दिली नाही.मला खूप मजा येत होती.आपल्या जीवनात पहिल्यांदाच मी स्वतःवर टीका करत होतो आणि मला यात खूप मजा येत होती. 


मी म्हटलं,मला जास्त सावध राहायला हवं होतं. तुम्ही मला खूप काम देता आणि मला तुमचं काम सर्वश्रेष्ठ पद्धतीनेच करायला हवं आणि म्हणून मी हे ड्रॉइंग दुसऱ्यांदा बनवून देईन.नाही, नाही!" त्यांनी विरोध केला.मी तुम्हाला इतका त्रास नाही देऊ इच्छित.त्यांनी माझ्या कामाची तारीफ केली आणि मला आश्वासन दिले की,यात फक्त एक छोटीशी सुधारणा करण्याची जरुरी आहे आणि माझ्या छोट्याशा चुकीमुळे त्या फर्मचं - काही नुकसान होणार नाही.तसं पण यात केवळ तपशिलाचीच चूक आहे ज्याची चिंता करायची काहीच जरुरी नाही.


स्वतःची चूक लगेच मानल्यामुळे आणि स्वतःची नालस्ती - आधीच केल्यामुळे त्याचा राग थंड पडला.तो मला जेवायला घेऊन गेला आणि जाण्यापूर्वी त्यानं मला चेक दिला आणि दुसरं कामही दिलं. स्वतःची चूक मानायला हिंमत तर लागते;पण यात आम्हाला समाधानाची जाणीवही होते. यामुळे न फक्त आमच्या - आतला अपराधीपणा आणि सुरक्षितपणा संपतो,तर नेहमी उत्पन्न झालेली समस्या सोडवायला मदत मिळते.


अल्बकर्की,न्यू मेक्सिकोच्या ब्रूस हार्वेने मेडिकल लीव्हवर - गेलेल्या एका कर्मचाऱ्याला चुकीने पूर्ण पगार दिला. जेव्हा त्याला आपल्या चुकीचा पत्ता लागला.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..

२०/५/२४

व्हर्जिनिया हॉल…Virginia Hall...

महिला - अबला की सबला,स्त्रीमुक्ती,अशा विषयांवरून आजही आपल्याकडे चर्चा झडताना,

आंदोलनं होताना दिसतात.खरं तर हा वादाचा मुद्दा नाहीच किंवा नसावा.पण लोकांना वाद घालायची सवयच असते असे मानून इतर क्षेत्रांतील या वादाकडे आपण दुर्लक्ष करू या. 


इतर क्षेत्रांत जरी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत वाद घातले जात असले,तरी गुप्तहेर जगतात मात्र सर्वोत्तम हेर म्हणून स्त्रियांना मानाचं स्थान आहे.हेरगिरीतील स्त्रियांचं कर्तृत्वही तसचं मोठं आहे.अशाच एका कर्तृत्ववान महिला हेराचं नाव आहे व्हर्जिनिया हॉल.त्यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात परिचय आपण येथे करून घेऊ.

( अमेरिकेची सी.आय.ए.- पंकज कालुवाला, परममित्र पब्लिकेशन,ठाणे )


व्हर्जिनियाचा जन्म बाल्टीमोर,मेरीलँड येथला. जन्मतारीख १ एप्रिल १९०६.ती आपल्या बालपणी इतर सामान्य मुलींपेक्षा नक्कीच वेगळी होती.जिज्ञासू,चौकस स्वभावाच्या व्हर्जिनियाला आपल्या आजूबाजूच्या जगात काय चालले आहे हे जाणून घ्यायची अदम्य उत्सुकता असायची.ज्ञानपिपासू असलेल्या व्हर्जिनियाने फ्रेंच,

इटालियन आणि जर्मन या भाषा शिकून घेतल्या होत्या.ते शिक्षण रॅडक्लिफ आणि बार्नार्ड कॉलेजातून तसेच पॅरिस व व्हिएन्ना येथे पूर्ण केले होते.ते पूर्ण होईपर्यंत १९२१ हे वर्ष उजाडलं.त्याच वर्षी ती अमेरिकेला परत आली.अमेरिकेत येऊन ती स्वस्थ बसली नाही.तेथे जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत पुन्हा फ्रेंच तसेच अर्थशास्त्र शिकण्यासाठी तिने प्रवेश घेतला.त्यानंतर १९३० च्या सुरुवातीला ती पोलंडची राजधानी वॉर्सा येथल्या अमेरिकी दूतवासात क्लर्क म्हणून रुजू झाली.


तरुण आणि हुशार माणसांना महत्वाकांक्षा या असतातच.

व्हर्जिनियाही त्याला अपवाद नव्हती.तिची महत्त्वाकांक्षा होती ती परराष्ट्रसेवेत नाव कमावायची.मात्र प्रत्येक वेळी आपण ठरवितो तसं होतंच असं नाही.काही गोष्टी नियतीने आपल्यासाठी आधीच आखून ठेवलेल्या असतात हेच खरे.नियतीनेही व्हर्जिनियासाठी काहीतरी ठरवून ठेवले असावे. नाहीतर अमेरिकेत दूरवर राहणाऱ्या व्हर्जिनियाला युरोपातील तीन वेगळ्या भाषा शिकून घ्यायची इच्छा का व्हावी? त्यानंतरही एक मोठा पण दुर्दैवी योगायोग घडला.या योगायोगाने तिचं आयुष्यच बदलून गेलं असं मानायला हरकत नाही.त्याचं झालं असं की, एकदा व्हर्जिनिया शिकारीसाठी तुर्कस्तानांतील इझमीर या ठिकाणी गेली होती.मात्र तेथे शॉटगनची गोळी आपल्या शिकारीवर झाडण्याऐवजी चुकून आपल्या डाव्या पायावरच झाडून बसली.दुर्दैवाने तिच्यावर लवकर औषधोपचार झाले नाहीत.औषधोपचार होईपर्यंत वेळ निघून गेला होता.तिच्या पायाला गैंग्रीन झाल्यामुळे गुडघ्याखालून कापावा लागला.पण म्हणून व्हर्जिनिया निराश झाली नाही.पाय बरा होऊन ती कृत्रिम पाय वापरू लागल्यानंतर तिने फॉरिन सर्व्हिस बोर्ड एक्झेंमसाठी अर्ज केला.मात्र तिच्या अपंगत्वाचे कारण पुढे करत तो अर्ज फेटाळण्यात आला. परराष्ट्र सेवेत काहीतरी करून दाखविण्याच्या तिच्या आशेवर पाणी पडलं.पुढे प्रगती करण्यास वाव नाही,हे पाहून १९३९ च्या मे महिन्यात तिने अमेरिकी दूतावासातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.नंतर फ्रान्समध्ये जाण्याचा निर्णय व्हर्जिनियाने घेतला.या वेळेपर्यंत युरोपात युद्धाचे पडघम वाजू लागले होते.जर्मनीची घोडदौड़ वेगाने सुरू झाली होती. व्हर्जिनिया त्यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वास्तव्याला होती.मानवतेच्या नात्याने तिने फ्रेंच ॲम्ब्युलन्स सर्व्हिसमध्ये प्रायव्हेट सेकंडक्लास म्हणून जाण्याचा निर्णय घेतला.


तेथे खूप काळ तिला सेवा करता आली नाही. १९४० च्या जून महिन्यात संपूर्ण फ्रान्स जर्मनांच्या टाचेखाली आला आणि व्हर्जिनियाला इंग्लंडमध्ये पळून जावे लागले.मात्र येथेही ती गप्प बसली नाही.आपल्या देशाच्या युद्धप्रयत्नांना मदत म्हणून तिने अमेरिकी दूतावासातील मिलिटरी ॲटशेची कोडक्लर्क म्हणून नोकरी पत्करली.

मात्र लवकरच ती घातपाती कारवाया करण्यासाठी ब्रिटिशांनी नुकत्याच स्थापन केलेल्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (SOE) या संस्थेत दाखल झाली.


युद्धकाळात चालविण्यात येणाऱ्या घातपाती कारवायांचं सगळं प्रशिक्षण तिला देण्यात आलं.या प्रशिक्षणांत निरनिराळी शस्त्रास्त्रं चालविण्यापासून संपर्कसाधने चालविणे तसेच सशस्त्र प्रतिकार करण्याच्या योजना आखून त्या कार्यान्वित करण्यापर्यंतच्या सगळ्याच बाबींचा समावेश होता.आपल्या अपंगत्वावर मात करून व्हर्जिनियाने हे खडतर प्रशिक्षण नेटाने पूर्ण केले. १९४१ च्या ऑगस्टमध्ये फ्रान्समधील व्हिची (Vichy) या ठिकाणी तिला मोहिमेवर पाठविण्यात आले.तेथे तिला शिरकाव करता यावा म्हणून 'न्यूयॉर्क पोस्ट' या वर्तमानपत्राची वार्ताहर असल्याचं कव्हर देण्यात आलं.



वार्ताहराच्या या खोठ्या ओळखीखाली राहून तिला दोस्तांसाठी गुप्तहेरांचं जाळं उभं करायचं होतं.असं कार्यक्षम हेरांचं जाळं तिने तेथे उभारलंचं,पण त्याचबरोबर युद्धकैद्यांना, वैमानिकांना पळून जाण्यात मदत करणे,फ्रेंच भूमिगत क्रांतिकारकांबरोबर काम करणे,अशी कामेही तिने प्रभावीपणे केली.तिच्या या कारवायांचा प्रचंड फटका जर्मनांना बसू लागला तेव्हा तिला पकडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली.


ही शोधमोहीम १९४२ नंतर तीव्र करण्यात आली.एका शोधमोहिमेदरम्यान ती जर्मनांच्या हातात सापडणारच होती;पण काहीतरी उचापत करून निसटून जाण्यात ती सफल झाली. ती 'पायरिनीज माऊंटनस' हा पहाडी प्रदेश ओलांडून स्पेनमध्ये गेली.या तिच्या पलायनाचं वैशिष्ट्य म्हणजे,भल्याभल्या गिर्यारोहकांनाही थकविणारा हा प्रवास तिने आपल्या कृत्रिम पायांसह आणि हाडे गोठविणाऱ्या थंडीत केला होता. जिद्दीने तो पूर्णही केला.


मात्र ती स्पेनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तुरुंगाची हवा खायला लागली.स्पेनमधील अमेरिकन दूतावासाने विनंती केल्यानंतर तिची सुटका झाली.येथेही तिच्या हेरगिरी

कारवायांना सुरुवात झाली.येथे तिचे कव्हर होते 'शिकागो टाइम्स'ची वार्ताहर त्यासाठी ती काही महिने स्पेनची राजधानी माद्रिद येथे तळ ठोकून होती.तिचं येथील काम जोरात सुरू असतानाच तिला परत इंग्लंडला बोलविण्यात आलं. इंग्लंडमध्ये पोहचल्यावर तिला इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज यांच्या हस्ते 'मेम्बर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर' हा किताब देण्यात आला.इंग्लडला तिला परत बोलवण्यामागचा खरा उद्देश वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण देणे हा होता.तिचं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची बदली अमेरिकेच्या OSS मध्ये करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर १९४३ मध्ये ती नाझीव्याप्त फ्रान्समध्ये परत गेली.


मात्र त्या वेळी तिने वार्ताहराचा वेष धारण केला नाही.

त्याऐवजी तिने निरुपद्रवी सहज लक्षात न येणाऱ्या गौळणीचा वेष धारण करणे पसंत केले.सकाळी गौळण बनलेली व्हर्जिनिया सर्वत्र फिरून बातम्या गोळा करीत असे आणि रात्री बिनतारी संदेशाद्वारे इंग्लडला पोहचवत असे.तिच्या या कारवायांच्या खबरा जर्मनापर्यंत पोहचल्या.गेस्तापो तिच्या मागावर निघाले.संपूर्ण फ्रान्समध्ये ती हवी असल्याची पोस्टर्स झळकविण्यात आली.त्यात 'लंगडत चालणारी दोस्तांची हेर' असा खास उल्लेख होता.त्यावर सरळ सामान्य माणसांसारखं चालायला शिकून,वेषांतर करून तिने जर्मनांना गुंगारा दिला.गुप्त माहिती गोळा करणे व ती आपल्या राष्ट्रापर्यंत पोहचविणे हे तर तिचं मोठं काम होतंच,पण या कामाव्यतिरिक्त तिने दोस्त राष्ट्रांना आणखी बऱ्याच मार्गांनी मदत केली.जून १९४४ मध्ये दोस्तांनी नॉर्मडीवर हल्ला चढविला.तेव्हा हवाई मार्गाने रसद,शस्त्रास्त्रे व सैनिक पोहोचावेत म्हणून तिने साहाय्य केलं.


त्याचबरोबर फ्रेंच प्रतिकार दलं उभारून त्यांना घातपाताचं प्रशिक्षण देणं व स्वतः त्यांचं नेतृत्व घेऊन अनेक घातपाती मोहिमा व्हर्जिनियाने तडीस नेल्या.

युद्धकाळात व्हर्जिनियाने निरनिराळी नावे धारण केली होती.त्यांतली काही मारिया,मोनिन,जर्मेन,डायनी,कॅमिली, निकोला तर जर्मनांनी तिला दिलेलं लिम्पिंग लेडी (लंगडणारी बाई) हे.


महायुद्धाच्या दरम्यान व्हर्जिनियाने आपल्या देशाची अन् मानवतेची फार मोठी सेवा केली.या सेवेची आठवण अर्थातच अमेरिकेने ठेवली. महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा ती अमेरिकेत परत गेली तेव्हा तिला डिस्टिंग्विश सर्व्हिस क्रॉस देऊन सन्मानित केलं गेलं.


अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात हे पदक मिळविणारी ती एकमेव महिला आहे,याची नोंद आपण घेतली पाहिजे.तिच्या कार्याचं महत्त्व समजायला तेवढं पुरेसं आहे.


महायुद्धानंतर तिने आपल्या या हेरगिरीच्या उद्योगाला रामराम ठोकला.मात्र केवळ चार-पाच वर्षेच ती या उद्योगातून दूर राहिली. १९५७ मध्ये ती एजन्सीमध्ये रुजू झाली.एजन्सीच्या ऑफीस ऑफ पॉलिसी कोऑर्डिनेशन विभागात विश्लेषक म्हणून काम करू लागली.१९५२ मध्ये तिची नेमणूक नवीन स्थापन करण्यात आलेल्या ऑफिस ऑफ डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्लॅन्स(ऑपरेशन्स) या ठिकाणी करण्यात आली.या विभागात काम करणारी ती पहिली महिला होती.या विभागात काम करताना ती राजकीय मोहिमा आखणे,विस्थापितांच्या मुलाखती घेणे आणि यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर सोव्हिएत संघाविरुद्ध सुनियोजित प्रतिकार तसेच घातपात कारवाया करणारं जाळं उभारणं अशी काम करत होती.एजन्सीसाठी तिने पुढील १४ वर्षे काम केलं.या काळात परदेशांतही काही मोहिमा तिने पार पाडल्या.मात्र त्या कोणत्या, त्यांचे स्वरूप,ठिकाण यांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.१९६० मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी ती एजन्सीमधून निवृत्त झाली.


आयुष्याचा पुढील काळ व्हर्जिनिया यांनी बागकामात व्यतीत केला.१९८२ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.अशा रितीने हेरगिरीच्या विश्वातील तेजाने तळपणारा तारा निखळला.व्हर्जिनियाबाईच्या त्या तेजस्वी कारकिर्दीस अंतःकरणपूर्वक प्रणाम !