एका पुरातत्त्व संशोधन मोहिमेसाठी हेनी हॅन्सन हराकी कुर्दिस्तानात पोहोचल्या.तिथल्या लोकजीवनाशी एकरूप होऊन त्यांनी आजवर जगाला न दिसलेला कुर्दी समाज आणि त्यांची संस्कृती वाचकांसमोर आणली.त्यांच्या या चाकोरीपल्याडच्या अभ्यासपूर्ण भटकंतीतून साकारलेलं 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक आज मानवशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्वाचं मानलं जातं.
कुर्दिस्तान हा इराक,इराण,तुर्कस्तान आणि सिरीया या देशांमध्ये विभागला गेलेला कुर्दी वंशाच्या लोकांचा प्रदेश.
देशापेक्षाही आपल्या वंशाची अस्मिता बाळगणारे कुर्दी हे धर्माने सुन्नी मुस्लिम आहेत.पण अनेक वर्षं आसपासच्या इतर मुस्लिम समाजाशी त्यांचा फार कमी संबंध होता.
किंबहुना विसाव्या शतकातल्या साठच्या दशकापर्यंत बाहेरच्या समाजालाही कुर्दीबद्दल फार कमी माहिती होती.प्रत्यक्ष कुर्दी गावांमध्ये राहून या लोकांचं जगणं समजून घेण्याचं आणि ते जगासमोर मांडण्याचं श्रेय जातं ते हेन्त्री हॅरॉल्ड हॅन्सन या डॅनिश पुरातत्वज्ञ बाईंना.कुर्दी लोकजीवन समजून घेण्यासाठी इराकी कुर्दिस्तानात मुक्काम ठोकून त्यांनी केलेलं काम हे एखादा झंगड माणूसच करू जाणे! त्यांच्या या मुक्कामातल्या अनुभवांतून 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक साकारलं.
त्याचं झालं असं की इराकमधल्या 'छोट्या झाब' नदीवर १९५७ मध्ये डोकान धरण बांधायचं ठरलं.या धरणामुळे इराकमधल्या अनेक पुरातत्त्वीय महत्त्वाच्या स्थानांना जलसमाधी मिळणार होती.त्याचबरोबर कुर्दी लोकांची बरीच खेडीही पाण्याखाली जाणार होती.त्यामुळे धरण बांधून पूर्ण होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पुरातत्वीय ठेवा जतन करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं होतं.तसंच आजवर जगाला अज्ञात असणाऱ्या कुर्दी लोकजीवनाचं दस्तावेजीकरण करणंही आवश्यक होतं.हे काम डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयातील तज्ज्ञांवर सोपवण्यात आलं.त्या मोहिमेत या राष्ट्रीय संग्रहालयातील वांशिक अभ्यासक (एथ्नोग्राफर) हेत्री हॅन्सन यांचाही समावेश होता.(अज्ञात कुर्दी स्त्रीजीवनाचा वेध - हेन्नी हॅन्सन,हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)
हेन्नी हॅन्सन ज्या मोहिमेच्या सदस्य होत्या त्या मोहिमेला कार्ल्सवर्ग प्रतिष्ठानचा भक्कम आर्थिक पाठिंबा होता.
हॅन्सन ऐन मे महिन्यात बगदाद आणि किर्कुकमार्गे डोकान धरणाच्या परिसरात पोहोचल्या.डोकान धरण उत्तर इराकी कुर्दिस्तानात आहे. '४५ पूर्व रेखांश आणि ३६ उत्तर अक्षांशावर हा भाग नकाशात पाहावयास मिळतो,' असं पुस्तकात त्या सुरुवातीलाच सांगतात.पुढच्या काही पानांमध्ये आपल्याला त्या भागाचे नकाशेही बघायला मिळतात.सुरुवातीला हॅन्सन यांनी त्या पुरातत्त्वीय मोहिमेच्या मुख्य ठाण्यावर मोहिमेच्या इतर सदस्यांबरोबर राहावं असं ठरलं होतं.हा मुक्काम 'तेल शमशारा' इथे होता. (तेलचा तिथल्या भाषेतील अर्थ उंचवटा) हॅन्सननी तेल शमशारा इथे राहून पुरातत्त्वीय उत्खननात भाग घ्यावा आणि जमल्यास अधूनमधून जवळपासच्या कुर्दी खेड्यांमधून स्त्रियांशी संपर्क साधून लोक संस्कृतीचा अभ्यास करावा,अशी कामाची पूर्वनियोजित रूपरेखा ठरली होती.हॅन्सन यांना कुर्दी लोकसंस्कृतीचं असं दुरून दर्शन घेणं मान्य नव्हतं.त्यांनी ठरवलं,आपण एखाद्या कुर्दी खेड्यातल्या घरातच मुक्काम ठोकायचा.
तसं बघायला गेलं तर हे पाऊल भलतंच धाडसाचं होतं.कुर्दी लोक एखाद्या एकट्या स्त्रीला पाहुणी म्हणून स्वीकारतील का,त्यांना हवी ती माहिती देतील का,हा प्रश्नच होता.पण हॅन्सन यांनी ते धाडस दाखवलं.त्यानुसार टोपझावा नावाच्या खेड्यातल्या शेखकडे,म्हणजे ग्रामप्रमुखाकडे त्यांनी स्वतःची राहण्याची सोय करून घेतली.या खेड्यातले काही गावकरी डोकान धरणाच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते.स्थानिक लोकांसमवेत राहण्याची सोय तर झाली होती,पण प्रश्न भाषेचा होता.तिथल्या लोकांना कुर्दीशिवाय दुसऱ्या भाषेचा गंध नव्हता,तर हॅन्सनना फक्त डॅनिश आणि थोडंफार इंग्रजी येत होतं तेवढंच.पण बरीच शोधाशोध केल्यावर त्यांना जवळच्याच शहरात इंग्रजी शिकवणारी एक दुभाषी मुलगी मिळाली.तिचं नाव मलिहा करीम सैद. पुढे हॅन्सन मलिहाच्याच घरी राहू लागल्या.त्यामुळे कुर्दी महिला आणि कुर्दीचे सांस्कृतिक व्यवहार यांचा त्यांना अगदी जवळून अनुभव घेता आला.मलिहाचे अनेक नातेवाईक आसपासच्या खेड्यांमध्येच राहत असल्यामुळे अनेक गावांमध्ये त्यांना फिरता आलं.थोडक्यात, पुरातत्वज्ञांसोबत राहून जमेल तसा लोक संस्कृतीचा अभ्यास करण्याऐवजी आता हॅन्सन त्या गावात स्थानिकांबरोबर राहून मजुरांबरोबर धरणाजवळच्या तळावर जाऊन पुरातत्त्वीय काम करू लागल्या.
'टोप'झावाबरोबरच राकावाह,सुलेमानैया आणि मिर्झा रुस्तम या गावांमध्येोले हॅन्सन यांनी वास्तव्य केलं.यातलं मिर्झा रुस्तम हे झाब नदीच्या काठी असलेले गाव.तिथे नदी ओलांडण्यासाठी 'तर' होती.शिवाय बस सेवाही होती.त्यामुळे हॅन्सननी मिर्झा रुस्तम इथे सर्वाधिक मुक्काम केला.या तरीतूनच त्या डोकान धरणाजवळच्या तळाजवळ जायच्या. बसने त्या शडाला,तसंच चार्मबान पर्वतराजी ओलांडून सर्गालूसारख्या गावीही जाऊन आल्या. त्यांनी इराणच्या सीमेलगत असलेल्या हलाबया, बल्ख आणि तवेला या डोंगरी वस्त्यांची,तसंच इराकच्या उत्तर सीमेवरील सर्कान,अर्बिल, मोसुल आणि रोवांदुझ या गावांचीही पाहणी केली.(सध्या इसिसच्या संदर्भात यातल्या बऱ्याच गावांची नावं ऐकायला मिळतात.)
कुर्दी लोकजीवन,विशेषतः तिथल्या स्त्रियांचं जगणं उलगडून दाखवण्यापूर्वी हॅन्सन आपल्याला कुर्दाचा इतिहास सांगतात.हा इतिहास सततच्या झगड्यांचाच आहे.एकीकडे ग्रीस,रोम आणि दुसरीकडे मेसोपोटेमिया,
पर्शिया ही साम्राज्यं.त्यांच्यामध्ये वसलेल्या कुर्द जमातीला आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता लढाऊ बाणा अंगीकारणं क्रमप्राप्तच होतं. इ. स. पू. ४०० च्या सुमारास झेनोफोन आणि त्याचे दहा हजार ग्रीक योद्धे बॅबिलॉनला गेले होते.तिथे एका पर्शियन राजाने त्यांना बोलावून घेतलं होतं.त्यांची बोलणी संपवून परतताना त्यांना 'कार्दुशी'शी लढावं लागलं.हाच आजच्या कुर्द वसाहतींचा प्रदेश.आजही या भूभागात ही हकीकत लोककथेत अमर झाली आहे.या भूभागावर वेळोवेळी वेगवेगळ्या साम्राज्यांची नाममात्र सत्ता असली, तरी अगदी काल-परवापर्यंत कुर्दावर खऱ्या अर्थाने कुणीच राज्य करू शकलं नव्हतं, पर्शियन,अरब,नंतर पुन्हा पर्शियन,मग मंगोल्स, त्यानंतर तुर्की साम्राज्याचा एक भूभाग म्हणून कुर्दिस्तानची ओळख होती.पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तान,सीरिया,इराक,इराण, सोव्हिएत संघराज्य या देशांत कुर्दिस्तान विभागलं गेलं.कुर्दामध्ये दोन प्रकार आहेत. काही कुर्दी टोळ्या भटक्या असून त्या ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करतात,तर हॅन्सन ज्या कुर्दामध्ये वावरल्या ते कुर्द स्थिरावलेले होते. शेती आणि पशुपालन हा त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्त्रोत होता.जमीन-पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते गहू,तांदूळ,
तंबाखू,कापूस आणि फळांचं उत्पादन करत होते.
त्याचबरोबर शेळ्या,मेंढ्या आणि कुक्कुटपालन हे जोडधंदे त्यांनी अंगीकारले होते.किर्कुक आणि सुलेमानैया या शहरांतला व्यापारबहुतांशी कुर्दाच्या हाती होता.
याशिवाय इराक पेट्रोलियम या कंपनीच्या तेलविहिरींवर ते काम करत असत.पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात स्वतंत्र कुर्दिस्तानच्या स्थापनेचा पाश्चात्त्यांनी काही काळ विचार केला होता;पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
तेव्हापासून कुर्द विरुद्ध अरब,इराणी आणि तुर्की हा लढा आजही चालू आहे.कुर्द हे जरी सुन्नी मुस्लिम असले तरी त्यांची अरबांशी कधीच जवळीक नव्हती.ते स्वतःला इराकी किंवा तुर्की किंवा उझबेकी समजत नाहीत,तर त्यांची कुर्द ही ओळख त्यांच्या अभिमानाची बाब आहे.इराकी कुर्दी इराकमधल्या सत्ताधाऱ्यांशीही फटकून वागत आले होते.इंडो-युरोपी भाषागटातील त्यांची भाषा फार्सी (पर्शियन) भाषेशी संलग्न आहे.
सेमाइट म्हणजे पश्चिम आशियाई वाळवंटी जमातींच्या भाषागटातली अरबी भाषा ही कुर्दी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.कुर्दाची ही पार्श्वभूमी स्पष्ट केल्यावर हॅन्सन आपल्याला प्रत्यक्ष कुर्दाच्या वस्तीत घेऊन जातात आणि त्यांच्या मुक्कामांतल्या प्रसंगांमधून कुर्दी स्त्रीजीवन वाचकांसमोर उलगडतात.इराकी-कुर्दी लोकसंस्कृतीचा अभ्यास हा जरी हॅन्सन यांचा इराकमध्ये येण्यामागचा मुख्य उद्देश असला,तरी त्या स्त्री असल्यामुळे त्यांना कुर्दिश स्वयंपाक घरात सहज प्रवेश मिळू शकेल,ही सुप्त अपेक्षा त्यांच्या निवडीमागे असावी.कारण तोपर्यंत कुर्दिश स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि त्यांचा जीवनाचा कुणीच अभ्यास केलेला नव्हता.या पुस्तकामार्फत हॅन्सन यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केली आहे असं म्हणता येईल.इराकी कुर्दीस्तानात दाखल होईपर्यंत हॅन्सन यांचं संपूर्ण आयुष्य डेन्मार्कमध्ये व्यतीत झालं होतं. हा देश उत्तर युरोपातला.उत्तर धृवावरून येणारं गार वारं इथलं तापमान कधीच फारसं वाढू देत नाहीत.वर्षातले सहा महिने बर्फाच्छादित असणाऱ्या या देशातून हॅन्सन जगातल्या एका अतिशय उष्ण अशा वाळवंटी देशात पोहोचल्या होत्या.खरं तर इराकचा उत्तर भूभाग वाळवंटी नव्हे,तर सपाट गवताळ भूप्रदेशाचा एक भाग आहे.फक्त तिथे गवताऐवजी खुरटी काटेरी झुडुपं पसरलेली आहेत.
इथे जमीन खूप तापल्यामुळे हवेचे कमी दाबाचे पट्टे तयार होतात.त्यात धूळ वर उचलली जाते;ती काही उंचीवर पोहोचली की हवेची उद्धरणशक्ती कमी होते;त्यानंतर काही मीटर ते काही किलोमीटर एवढा प्रवास केल्यावर ही धूळ खाली बसते.धूळ आणि अतिउष्णता यामुळे या भागात दुपारी मोटारीने प्रवास करत नाहीत.मोटारीचे धातूचे भाग तापतात.त्यांना स्पर्श केला तर हात भाजून निघतो.गाडीत भट्टीसारखं वातावरण असतं. काचा उघड्या ठेवल्या तर वाऱ्याबरोबर फिरणारी धूळ गाडीत शिरते.कपड्यांत आणि केसांत शिरलेली धूळ नंतर काढून टाकणं हा एक उद्योगच होऊन बसतो.
हॅन्सनना याची कल्पना नव्हती.पहिल्या दिवशी त्या डोकान धरणाकडे जायला निघाल्या त्या मोटारीनेच.त्या ऊष्ण प्रवासाचा अनुभव घेतल्यावर त्या जाग्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांना कळलं की दुपारी धरणाचं कामही बंद असतं । तापलेल्या अवजारांना स्पर्श करणंही शक्य नसल्यामुळे दुपारी सक्तीची सुट्टी घ्यावी लागते.
हॅन्सन यांना कुर्दी लोकांच्या घरांमध्ये राहण्याची सवय करून घेण्यासाठीही प्रयास पडले.डोंगरी भागातील कुर्दी घरं ही डोंगर उतारावर एकावर एक अशी वसलेली असतात.खालच्या घराचा वरचा मजला त्यावरच्या घराच्या तळमजल्याच्या पातळीवर असतो.घरं मातीचीच असतात. त्यांच्या छतांना उतार असतो.जमिनी त्यातल्या त्यात सपाट केलेल्या असतात.कुंभाराने चिखल रचून घरं केली तर ती कशी दिसतील तशी ही घरं असतात.फक्त त्यांच्या निर्मितीत चाक वापरलेलं नसतं.तिथल्याच मातीचा चिखल करून तो उन्हात वाळवून केलेल्या विटांची ही बैठी घरं सुबक वाटली तरी त्यांच्या छतावर जाण्यासाठी केलेल्या जिन्यांना जिने आणि त्यांच्या पायऱ्यांना पायऱ्या का म्हणायचं,असा प्रश्न हॅन्सनना पडत असे.कुर्दी स्त्रिया सवयीने या जिन्यांवरून झटपट चढून जात,पण हॅन्सनना ते जिने चढताना खूप कसरत करावी लागत असे.हॅन्सनना दुभाषी मिळाली आणि त्यांच्या महिलांसोबतच्या संवादात थोडी सुलभता आली. ही दुभाषी,मलिहा मुस्लिम असल्याने तिला एकटीने हिंडण्याची परवानगी नव्हती.ती आली तेव्हा तिच्याबरोबर दोन पुरुष होते.एक तिचा छोटा भाऊ.तो बारा-तेरा वर्षांचा म्हणजे कुर्दाच्या दृष्टीने पुरुषच होता.दुसरा तिच्या बहिणीचा नवरा.मलिहा कशी कुठे राहणार,तिचं नक्की काम काय आणि इतर पुरुषांशी तिचा संबंध येण्याची शक्यता नाही ना,हे तपासून बघायला आला होता.पुढे तिचा भाऊ सतत तिच्याबरोबर असे.कुर्दिस्तानमधल्या वास्तव्यात हॅन्सननी अनेक लग्नं जवळून बघितली.हे विवाह समारंभ त्यांना कुर्दी लोकसंस्कृतीबद्दल बरंच काही शिकवून गेले.अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांना एका विवाह समारंभाचं आमंत्रण मिळालं.त्या वेळेला अजून दुभाषीची सोय व्हायची होती. त्या पुढे ज्या कुटुंबात राहिल्या त्याच कुटुंबात हे लग्न होतं.वधू जवळच्याच एका खेड्यातली होती.तिला आणायच्या काफिल्यात सामील होशील का,असं हॅन्सनना विचारलं गेलं.
इराकमध्ये तेव्हा रस्ते कमी,पण मोटारी भरपूर अशी परिस्थिती होती.पेट्रोल अतिशय स्वस्त होतं.त्यामुळे वधूला आणायला जाणारा मोटारींचा ताफा खूप मोठा होता.त्या ताफ्यात सर्व गावच सामील झालं होतं.
मोटारींच्या टपांवरसुद्धा वऱ्हाड्यांची गर्दी होती.हॅन्सनना एक गोष्ट त्या वेळी लक्षात आली - वधूला आणण्याच्या ताफ्यात स्त्रियांना स्थान नसतं. त्यामुळे मग त्यांनी वधूच्या आगमनाची तयारी करणाऱ्या स्त्रियांमध्ये सामील व्हायचं ठरवलं.गावाच्या सीमेबाहेर मोटारीतून उतरवलेल्या वधूला एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसवण्यात आलं.ती बुरख्यात होती.ती घोड्यावर स्वार होताच संगीत सुरू झालं आणि हळूहळू त्या संगीताचा आवाज वाढू लागला.सर्वच लग्नांमध्ये हेच संगीत वाजतं,असं पुढे हॅन्सनच्या लक्षात आलं. या संगीताचा शेवट बहुधा कुणी तरी उत्साही तरुण हवेत गोळी झाडून करायचा.कधी एका गोळीत हा उत्साह आवरला जात असे,तर कधी बंदुकांच्या अनेक फैरी झडत असत.या समारंभात फक्त पुरुष उत्साहाने नाचत असत. स्त्रिया घरांच्या छतांवर बसून हे सर्व बघत असत. तिथेच त्यांचं जेवणही होई.छतावर चढणं-उतरणं ही कसरत रिकाम्या पिंपाच्या आधाराने करावी लागत असे.नवरी मुलगी घरात एका अंधाऱ्या खोलीत पूर्ण लांबीचा झगा घालून बसलेली असे. या खोलीला एक चौकोनी बिनगजांची खिडकी असे.या चौकोनाच्या कडा वर्तुळाकृती बनवायचा प्रयत्न झाल्याचं लक्षात येई.वधूच्या झग्यावर जरतारी नक्षीकाम असे.या वधूचं आधी एक लग्न झालं होतं.ते का रद्द झालं त्याबद्दल कुणी काही बोलत नव्हतं.ती आता २६ वर्षांची होती,
म्हणजे कुर्दी पद्धतीनुसार तिच्या लग्नाला खूपच उशीर झाला होता.तरीही तिच्यासाठी वराला भरपूर किंमत मोजावी लागली होती.हे लग्न झालं आणि काही दिवसांतच हॅन्सन या खेड्यातल्या शेखच्या घरी राहायला आल्या. पहिले पंधरा दिवस त्यांच्यासोबत दुभाषी नव्हती.'त्या काळात घरातल्या यजमानणीबरोबर मी कसा काय संवाद साधला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.ना तिला माझी भाषा येत होती, ना मला तिची;पण आमचं काहीच अडलं नाही. खुणांची भाषा आणि सातत्याने वापरावे लागणारे शब्द आम्ही एकमेकींना सांगत होतो. त्या थोडं डॅनिश शिकल्या आणि मी कुर्दी भाषेचे प्राथमिक धडे घेतले.पण तिच्याशी आणि तिच्या मुलीशीही माझी चांगली गट्टी जमली होती.' असं हॅन्सन सांगतात.
एक दिवस या तिघी डोंगर उतारावर असलेल्या द्राक्षांच्या मळ्यात गेल्या.
शिल्लक राहिलेला भाग पुढील २६.०५.२४ या लेखामध्ये…