डोंगर चढताना हॅन्सनचा पाय निसटला.त्या गडगडत काही अंतर खाली गेल्या त्यांच्या खांद्याला,जबड्याला दुखापत झाली;दातांतून रक्त येऊ लागलं.त्यावेळी त्या मायलेकींनी ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना फार गंभीर इजा न झाल्याबद्दल अल्लाचे आभार मानले त्याने हॅन्सन भारावल्या.त्या दोघी काय बोलत होत्या हे कळायला हॅन्सनकडे मार्ग नव्हता,पण त्यांच्या हालचालींवरून त्यांनी बहुधा परमेश्वराचे आभार मानले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला.'माझी कुर्दी भाषेची जाण प्राथमिक गरजांपुरती मर्यादित होती.अमूर्त भावनांचं ज्ञान मला होणं शक्य नव्हतं',असं त्या या प्रसंगाबद्दल लिहिताना म्हणतात.पुढे दुभाषीची मदत मिळाल्यावर त्यांना कुर्दाच्या चालीरीती आणि धार्मिक समजुतींची माहिती हळूहळू होत गेली.
यानंतर काही दिवसांतच त्या खेड्यात आणखी एक लग्न होतं.आता हॅन्सन या शेखच्या कुटुंबाचा एक भाग बनल्या होत्या.त्या वेळी तिथल्या शहरी भागात एक नवी फॅशन आली होती.स्त्रियांच्या अंगरख्यासाठी अतिशय तलम आणि पारदर्शक कापड वापरलं जायला लागलं होतं.
त्यातला एक धागा कुठल्या तरी धातूच्या अतिशय पातळ जरीचा असे.उन्हात ही जर तापून चटके बसत,तरीसुद्धा आपला श्रीमंती तोरा मिरवण्यासाठी वराकडच्या स्त्रियांनी या जरीचे कपडे परिधान केले होते.हॅन्सन वरपक्षाकडल्या असल्यामुळे त्यांनाही हाच वेष घालणं भाग पडलं होतं.
याउलट खेड्यातल्या बाकीच्या स्त्रियांचे कपडे साधेच होते.त्या खेडूत स्त्रिया शेतात काम करणाऱ्या,शेळ्या राखणाऱ्या होत्या.त्या स्त्रिया शेळ्या आणि गाढवांना घेऊन सकाळीच डोंगरात जायला निघत.द्राक्षबागांची निगराणी करणं,शेतातील तण उपटणं,शेळ्यांची देखरेख करणं,दूध काढणं,तसंच सरपण गोळा करून ते गाढवांच्या पाठीवर लादणं अशी कामं करून त्यांची त्वचा चांगलीच रापलेली असे. शेखच्या घरच्या स्त्रियांना अशा प्रकारची कामं करण्याची सवयच नव्हती.त्या क्वचितच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचा गोरा रंग या गर्दीत उठून दिसत होता.शेखच्या घरातल्या स्त्रियांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने.
एकदा हॅन्सनचा मुक्काम असलेल्या घरातल्या एका तरुणाला लग्न करायचं होतं.त्यासाठी तो बरेच दिवस पैसे साठवत होता.त्याने ५०० पौंड होतील एवढी रक्कम साठवली.चांगली बायको मिळवायची तर एवढी रक्कम हवीच.(ही १९५७ ची रक्कम आहे.) तेव्हा त्याने घरातल्या कर्त्या स्त्रीजवळ त्याची लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आयांपैकी एका आईजवळ आणि एका बहिणीजवळ
त्याला मुलगी कशी हवी याबद्दल तो बोलला. त्याच्या वडिलांचा बारदाना खूप मोठा होता. त्यात एक स्त्री कशीही सामावून गेली असती. उलट,मदतीला नवे हात आले असते.त्या मुलाची सख्खी मोठी बहीण आणि त्याच्या वडिलांची सर्वांत धाकटी बायको यांनी या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलं होतं.खरं तर त्याची आई ही सर्वांत पहिली पत्नी होती,पण ती गावठी समजली जात होती.लग्न जुळवणं तिच्या कुवती
पलीकडचं काम आहे,असं सर्वांचं मत पडलं.त्या बहिणीने एक मुलगी बघून ठेवली होती.पण बहीण आणि सावत्र आई थेट त्या मुलीच्या घरी जाऊन बोलणी सुरू करू शकत नव्हत्या,याचं कारण त्या वयाने लहान होत्या.
हॅन्सननी जाऊन उपयोग नव्हता.त्यांना ते लोक 'आपल्यातली' मानत नव्हते.मग त्यांच्या ओळखीच्या एका प्रौढ स्त्रीवर ही जबाबदारी टाकण्यात आली.ती स्त्री,घरातल्या या दोघी आणि हॅन्सन अशा चौघीजणी लग्न ठरवायला निघाल्या.त्या प्रौढ स्त्रीच्या अंगावर सोन्याचे दागिने अंगभर घातलेले होते.साधारणपणे बोलण्याच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या.
मुलीकडची बाजू ऐकीव माहितीवर दर वेळेस नवी खुसपटं काढायची.मुलीची किंमत वाढवायची ही युक्ती होती.शिवाय मुलीसाठी इतर मुलांकडूनही चौकश्या होत आहेत,हेही मुलाच्या बाजूच्या कानावर पडेल ही व्यवस्था केलेली होती.अशा बैठका तासन्तास चालत.शिवाय त्या प्रत्येक बैठकीत चार-सहा आठवड्यांचं अंतर असे.
अखेरीस मुलीच्या आईने ही बाब नवऱ्याच्या कानावर घालण्याचं कबूल केलं. लग्नाच्या बोलण्यामध्ये पुरुषांची परवानगी म्हणजे केवळ औपचारिकताच ! यानंतर मग मुलीला किती दागिने मिळणार,एकूण खर्च किती होणार वगैरे आर्थिक बाबींची चर्चा सुरू झाली. अजूनही हॅन्सननी ती भावी वधू बघितलेली नव्हती.ही आर्थिक बोलणी झाल्यावर मुलगा बघण्याचा कार्यक्रम ठरला.
त्याच्या फोटोचा विषयही निघाला नव्हता.कुर्दघरांमधून माणसांचे फोटो नसतात.माणसांचे फोटो असणं हे इस्लामला मान्य नाही,असं हॅन्सनना सांगण्यात आलं.स्थानिक माणसं, त्यांची संस्कृती,चालीरिती समजावून घ्यायच्या तर लग्नसमारंभासारखा दुसरा हुकुमी प्रसंग नाही.हॅन्सननी नोंदवलेल्या बारीकसारीक निरिक्षणांतून याचाच प्रत्यय येतो.
या पुस्तकात हॅन्सन कुर्दी घरांचं,तसंच त्यांना वापरासाठी दिलेल्या खोल्यांचंही सविस्तर वर्णन करतात.त्यांचं घर डोंगर उतारावरल्या एका शेतात होतं.एक बैठकीची मोठी खोली आणि तिच्या दोन बाजूंना दोन छोट्या खोल्या,असं त्याचं रूप होतं.वाळवंटी भागात घरांना खिडक्या नसतात,तशा त्या या घराला देखील नव्हत्या. घराला व्हरांडा होता.मागच्या बाजूला खोल्यांना भिंत नव्हती.तिथे मोकळं अंगण आणि त्यानंतर संरक्षक भिंत होती.या बंदिस्न अंगणातल्या कोंबड्या आणि शेळ्या घरभरही फिरू शकत. घराच्या छत्तासाठी दोन तुळयांवर मातीच्या सपाट विटा रचण्यात आल्या होत्या.या विटा छोट्याछोट्या फांद्यांवर चटया पसरून त्यावर ठेवण्यात आल्या होत्या.
तुळयांच्या आधाराने भांडिक पक्ष्यांची चिखलाचे गोळे लिंपून तयार केलेली घरटी होती.जमीन मातीची होती.
तिच्यावर सिमेंटचा पातळ थर होता.फार गरम होऊ नये म्हणून या जमिनीवर दिवसभर पाणी मारलं जायचं.
बैठकीच्या खोलीत दोन भिंतींना टेकून ठेवलेले दोन सोफे होते.त्यांचे हात खूप रुंद होते.त्यावर चहाचे कप ठेवता येत असत.बाजूच्या दोन खोल्यांमध्ये गालिचे आणि तक्तपोशी होत्या.त्यावर बसण्यासाठी सोय होती.मागच्या अंगणात एक कॉट होती.भिंतींवर कावेत बुडवून उठवलेले हाताच्या पंज्याचे ठसे होते.त्यातल्या एका खोलीला लागून अंधारात हमामखाना होता. त्याला तर खिडकी असणं शक्यच नव्हते.
दुसरी खोली कोठीची खोली होती.त्या खोलीत शेतीची अवजारं होती.मजूर सकाळी ती घेऊन जात.संध्याकाळी परत आणून ठेवत.दुपारी इथेच ते जेवण करून विश्रांती घेत.मागच्या अंगणातच एक आडोसा होता.तिथे स्वयंपाक व्हायचा. इथल्या व्हरांड्यात कधी कधी पाळणा टांगला जायचा.त्यात घरातलं मूल पडून राहत असे. येणारी जाणारी व्यक्ती त्या पाळण्याला झोका देऊन जायची.
कुर्दी घरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही दोन भिंती एकमेकींशी काटकोन करत नाहीतच,पण कुठल्याही दोन खोल्यांच्या जमिनी एका पातळीवर नसतात.त्यामुळे त्यांची छतंही पायऱ्या पायऱ्यांची असतात.याचं कारण ही घरं जमीन नैसर्गिकरीत्या जशी असेल तशीच ठेवून त्या जमिनीवर भिंती उभ्या करून बांधलेली असतात.फर्निचर ठेवण्यापुरतीच जमीन सपाट करण्यात येते.शेतात झाडांच्या फांद्यांनी शाकारलेल्या काही झोपड्या होत्या.
त्या दोन भक्कम ओंडक्यांच्या आधारावर उभ्या होत्या. सूर्य डोक्यावर आला की शेतमजूर या आडोशाला विश्रांती घेत.या झोपड्यांना भिंती नव्हत्या,तर चटया आणि जुनी जाजमं लटकवून आडोसा तयार करण्यात आला होता.
इथेच दुपारचं जेवणही व्हायचं. 'काळा वारा', म्हणजे वाळूचं वादळ आलं,की सर्व गावावर धुळीची चादर पसरली जायची.सगळं जग त्या धुळीसारखंच पिवळं व्हायचं.फाटकं आणि खिडक्या खिळखिळ्या व्हायच्या.
इथल्या घरांना फार खिडक्या का नसतात ते अशा वेळी लक्षात यायचं.
खेडूत कुर्दी स्त्रिया बुरखा आणि आभा म्हणजे शरीर झाकणारा काळा वेष घालत नाहीत. शहरात मात्र तो पेहराव सक्तीचा असतो.कुर्द एकूणच अशिक्षित असतात.
खेडेगावात सुशिक्षित व्यक्ती सापडणं अवघडच.शहरात साक्षरतेचं प्रमाण थोडं अधिक असतं.स्त्रिया अपवादानेच शिकतात.इतर मुस्लिम समाजांप्रमाणेच कुर्दी स्त्रियांना घरात आणि घराबाहेर दुय्यम वागणूक मिळते.घरकामाचा सर्व भार स्त्रियांनाच उचलावा लागतो.हॅन्सन राहत होत्या त्या घरात कामाचा सर्व बोजा सतरा वर्षांची सर्वांत धाकटी मुलगी,अज्जा आणि बारा वर्षांची नोकराणी यांच्यावर होता. अज्जाला घरातले पुरुष जेवत असताना त्यांच्या सेवेसाठी तिथे उपस्थित राहावं लागत असे. ताटावर माश्या बसू नयेत याची काळजी घेणं हे तिचं प्रमुख काम.ज्यांचं जेवण होईल त्यांच्या हातावर पाणी घालायचं;नंतर ती सर्व खरकटी भांडी घेऊन जवळच्या झऱ्याकाठी जायचं आणि तिथे ती घासून,धुऊन,वाळवून परत घरात आणायची हे कामही या मुलीच करत.अंगण झाडणं हे अज्जाचं आणखी एक काम होतं.हॅन्सन पाहुण्या होत्या.त्यांची सर्व सेवाही त्यांनी नको म्हटलं तरी या दोन मुलीच करत असत. एक दिवस त्यांनी त्या मुलींशी बोलताना सहजच त्यांचे हात हातात घेतले.तर त्या दोघींच्या हातांना काम करून घट्टे पडलेले असल्याचं त्यांना दिसलं.
घराच्या मागच्या अंगणामध्ये चटयांचा आडोसा करून न्हाणीघर तयार केलेलं होतं.तिथे अंघोळ करणं हॅन्सनना योग्य वाटत नव्हतं.त्या त्यांच्या खोलीतच दोन घमेल्यांमध्ये पाणी घेऊन ओल्या पंचाने अंग पुसून काढत असत.पण यासाठी त्या स्वतः पाणी आणू लागल्या,तर अज्जा धावत येऊन त्यांच्या हातातून मडकं हिसकावून घेई. मग ती आणि तिची मदतनीस त्यांच्या खोलीत पाणी भरून ठेवत असत.वाळवंटी प्रदेशातल्या विविध प्रथाही हॅन्सनना बघायला मिळाल्या.त्याबद्दलही त्यांनी अगदी बारकाईने निरीक्षणं नोंदवली आहेत.कुर्दामध्ये कुणीही व्यक्ती जखमी झाली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल तर तिला इतरांच्या आधाराने चालवतच हकिमाकडे किंवा दवाखान्यात नेलं जातं.सर्वच वाळवंटी प्रदेशात उष्माघाताचा अनेकांना त्रास होतो.हॅन्सननी अशा दोन प्रसंगी त्या व्यक्तींना असं चालवत वैद्यकीय उपचाराला नेलं जातं हे बघितलं.दैनंदिन कुर्दी जीवनातले असे विविध प्रसंग हॅन्सननी पुस्तकात विस्तृतपणे मांडलेले आहेत.
त्या रोगात कोरोनातले संदर्भ देऊन स्त्रियांच्या दुय्यम स्थानाची चर्चा केली आहे.या पुस्तकात कुठलीही सनसनाटी घटना नाही हे खरे;पण सहा देशात पसरलेल्या आणि तरीही आपली संस्कृती आणि भाषा जपणाऱ्या,ती नष्ट होऊ नये म्हणून जिवापाड प्रयत्न करणाऱ्या एका जमातीबद्दल खात्रीशीर माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे.ज्या वेळी 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा कुर्दांपुढे काय वाढून ठेवलंय याची हॅन्सननाच काय पण इतर कुणालाही कल्पना नव्हती.कुर्द जमात सहा-सात देशांत पसरलेली आहे.कुर्द अशिक्षित असण्यातच या देशांचा फायदा आहे.(त्याला अर्थातच इतर काही काही भूराजकीय कारणंही आहेत.) कुर्द शिकले तर स्वातंत्र्याची चळवळ उभी करतील आणि वेगळा कुर्दिस्तान होणं या देशांना परवडणारं नाही. कारण कुर्दिस्तान भूभागात तेल आहे.त्यामुळे इतर अनेक वेळी एकमेकांशी न पटणारे हे देश कुर्दाना दडपण्यात मात्र एकमेकांना मदत करतात.कुर्द सुन्नी मुस्लिम आहेत.इराण आणि उत्तर इराक वगळता इतर देशांमध्येही सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे;पण तरीही कुर्दावरच्या दडपशाहीत सर्वजण एकत्र आहेत. अमेरिकेने कुर्दाचा आधी रशियाविरोधात,मग खोमेनीच्या इराणविरोधात आणि नंतर सद्दामविरोधात वापर करून घेतला.नंतर कुर्दाना वाऱ्यावर सोडलं.या पार्श्वभूमीवर हॅन्सन यांच्या अभ्यासाचं महत्त्व आणखीनच वाढतं.१९६० मध्ये इराकमध्ये बाथ पक्षाची सत्ता आली. त्यानंतर काही काळातच सद्दाम हुसेनच्या हाती सत्ता गेली आणि कुर्दाचं पद्धतशीर शिरकाण सुरू झालं.त्यामुळे त्यानंतरही कुर्दी स्त्रियांचा कधीच कुणी अभ्यास करू शकलं नाही. कुर्दामध्ये निरक्षरतेचं प्रमाण भरपूर असल्याने कुणी कुर्द उठून आपल्या जमातीवर लिहील हे अवघडच.त्यामुळे कुर्दी स्त्रीजीवनाचं जगाला दर्शन घडवणारं एकमेव अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणून मानवशास्त्रीय अभ्यासात या ग्रंथाची दखल घ्यावी लागते.'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे त्यामुळेच एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं.
२४.०५.२४ या लेखातील अंतिम भाग…