महिला - अबला की सबला,स्त्रीमुक्ती,अशा विषयांवरून आजही आपल्याकडे चर्चा झडताना,
आंदोलनं होताना दिसतात.खरं तर हा वादाचा मुद्दा नाहीच किंवा नसावा.पण लोकांना वाद घालायची सवयच असते असे मानून इतर क्षेत्रांतील या वादाकडे आपण दुर्लक्ष करू या.
इतर क्षेत्रांत जरी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत वाद घातले जात असले,तरी गुप्तहेर जगतात मात्र सर्वोत्तम हेर म्हणून स्त्रियांना मानाचं स्थान आहे.हेरगिरीतील स्त्रियांचं कर्तृत्वही तसचं मोठं आहे.अशाच एका कर्तृत्ववान महिला हेराचं नाव आहे व्हर्जिनिया हॉल.त्यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात परिचय आपण येथे करून घेऊ.
( अमेरिकेची सी.आय.ए.- पंकज कालुवाला, परममित्र पब्लिकेशन,ठाणे )
व्हर्जिनियाचा जन्म बाल्टीमोर,मेरीलँड येथला. जन्मतारीख १ एप्रिल १९०६.ती आपल्या बालपणी इतर सामान्य मुलींपेक्षा नक्कीच वेगळी होती.जिज्ञासू,चौकस स्वभावाच्या व्हर्जिनियाला आपल्या आजूबाजूच्या जगात काय चालले आहे हे जाणून घ्यायची अदम्य उत्सुकता असायची.ज्ञानपिपासू असलेल्या व्हर्जिनियाने फ्रेंच,
इटालियन आणि जर्मन या भाषा शिकून घेतल्या होत्या.ते शिक्षण रॅडक्लिफ आणि बार्नार्ड कॉलेजातून तसेच पॅरिस व व्हिएन्ना येथे पूर्ण केले होते.ते पूर्ण होईपर्यंत १९२१ हे वर्ष उजाडलं.त्याच वर्षी ती अमेरिकेला परत आली.अमेरिकेत येऊन ती स्वस्थ बसली नाही.तेथे जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत पुन्हा फ्रेंच तसेच अर्थशास्त्र शिकण्यासाठी तिने प्रवेश घेतला.त्यानंतर १९३० च्या सुरुवातीला ती पोलंडची राजधानी वॉर्सा येथल्या अमेरिकी दूतवासात क्लर्क म्हणून रुजू झाली.
तरुण आणि हुशार माणसांना महत्वाकांक्षा या असतातच.
व्हर्जिनियाही त्याला अपवाद नव्हती.तिची महत्त्वाकांक्षा होती ती परराष्ट्रसेवेत नाव कमावायची.मात्र प्रत्येक वेळी आपण ठरवितो तसं होतंच असं नाही.काही गोष्टी नियतीने आपल्यासाठी आधीच आखून ठेवलेल्या असतात हेच खरे.नियतीनेही व्हर्जिनियासाठी काहीतरी ठरवून ठेवले असावे. नाहीतर अमेरिकेत दूरवर राहणाऱ्या व्हर्जिनियाला युरोपातील तीन वेगळ्या भाषा शिकून घ्यायची इच्छा का व्हावी? त्यानंतरही एक मोठा पण दुर्दैवी योगायोग घडला.या योगायोगाने तिचं आयुष्यच बदलून गेलं असं मानायला हरकत नाही.त्याचं झालं असं की, एकदा व्हर्जिनिया शिकारीसाठी तुर्कस्तानांतील इझमीर या ठिकाणी गेली होती.मात्र तेथे शॉटगनची गोळी आपल्या शिकारीवर झाडण्याऐवजी चुकून आपल्या डाव्या पायावरच झाडून बसली.दुर्दैवाने तिच्यावर लवकर औषधोपचार झाले नाहीत.औषधोपचार होईपर्यंत वेळ निघून गेला होता.तिच्या पायाला गैंग्रीन झाल्यामुळे गुडघ्याखालून कापावा लागला.पण म्हणून व्हर्जिनिया निराश झाली नाही.पाय बरा होऊन ती कृत्रिम पाय वापरू लागल्यानंतर तिने फॉरिन सर्व्हिस बोर्ड एक्झेंमसाठी अर्ज केला.मात्र तिच्या अपंगत्वाचे कारण पुढे करत तो अर्ज फेटाळण्यात आला. परराष्ट्र सेवेत काहीतरी करून दाखविण्याच्या तिच्या आशेवर पाणी पडलं.पुढे प्रगती करण्यास वाव नाही,हे पाहून १९३९ च्या मे महिन्यात तिने अमेरिकी दूतावासातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.नंतर फ्रान्समध्ये जाण्याचा निर्णय व्हर्जिनियाने घेतला.या वेळेपर्यंत युरोपात युद्धाचे पडघम वाजू लागले होते.जर्मनीची घोडदौड़ वेगाने सुरू झाली होती. व्हर्जिनिया त्यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वास्तव्याला होती.मानवतेच्या नात्याने तिने फ्रेंच ॲम्ब्युलन्स सर्व्हिसमध्ये प्रायव्हेट सेकंडक्लास म्हणून जाण्याचा निर्णय घेतला.
तेथे खूप काळ तिला सेवा करता आली नाही. १९४० च्या जून महिन्यात संपूर्ण फ्रान्स जर्मनांच्या टाचेखाली आला आणि व्हर्जिनियाला इंग्लंडमध्ये पळून जावे लागले.मात्र येथेही ती गप्प बसली नाही.आपल्या देशाच्या युद्धप्रयत्नांना मदत म्हणून तिने अमेरिकी दूतावासातील मिलिटरी ॲटशेची कोडक्लर्क म्हणून नोकरी पत्करली.
मात्र लवकरच ती घातपाती कारवाया करण्यासाठी ब्रिटिशांनी नुकत्याच स्थापन केलेल्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (SOE) या संस्थेत दाखल झाली.
युद्धकाळात चालविण्यात येणाऱ्या घातपाती कारवायांचं सगळं प्रशिक्षण तिला देण्यात आलं.या प्रशिक्षणांत निरनिराळी शस्त्रास्त्रं चालविण्यापासून संपर्कसाधने चालविणे तसेच सशस्त्र प्रतिकार करण्याच्या योजना आखून त्या कार्यान्वित करण्यापर्यंतच्या सगळ्याच बाबींचा समावेश होता.आपल्या अपंगत्वावर मात करून व्हर्जिनियाने हे खडतर प्रशिक्षण नेटाने पूर्ण केले. १९४१ च्या ऑगस्टमध्ये फ्रान्समधील व्हिची (Vichy) या ठिकाणी तिला मोहिमेवर पाठविण्यात आले.तेथे तिला शिरकाव करता यावा म्हणून 'न्यूयॉर्क पोस्ट' या वर्तमानपत्राची वार्ताहर असल्याचं कव्हर देण्यात आलं.
वार्ताहराच्या या खोठ्या ओळखीखाली राहून तिला दोस्तांसाठी गुप्तहेरांचं जाळं उभं करायचं होतं.असं कार्यक्षम हेरांचं जाळं तिने तेथे उभारलंचं,पण त्याचबरोबर युद्धकैद्यांना, वैमानिकांना पळून जाण्यात मदत करणे,फ्रेंच भूमिगत क्रांतिकारकांबरोबर काम करणे,अशी कामेही तिने प्रभावीपणे केली.तिच्या या कारवायांचा प्रचंड फटका जर्मनांना बसू लागला तेव्हा तिला पकडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली.
ही शोधमोहीम १९४२ नंतर तीव्र करण्यात आली.एका शोधमोहिमेदरम्यान ती जर्मनांच्या हातात सापडणारच होती;पण काहीतरी उचापत करून निसटून जाण्यात ती सफल झाली. ती 'पायरिनीज माऊंटनस' हा पहाडी प्रदेश ओलांडून स्पेनमध्ये गेली.या तिच्या पलायनाचं वैशिष्ट्य म्हणजे,भल्याभल्या गिर्यारोहकांनाही थकविणारा हा प्रवास तिने आपल्या कृत्रिम पायांसह आणि हाडे गोठविणाऱ्या थंडीत केला होता. जिद्दीने तो पूर्णही केला.
मात्र ती स्पेनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तुरुंगाची हवा खायला लागली.स्पेनमधील अमेरिकन दूतावासाने विनंती केल्यानंतर तिची सुटका झाली.येथेही तिच्या हेरगिरी
कारवायांना सुरुवात झाली.येथे तिचे कव्हर होते 'शिकागो टाइम्स'ची वार्ताहर त्यासाठी ती काही महिने स्पेनची राजधानी माद्रिद येथे तळ ठोकून होती.तिचं येथील काम जोरात सुरू असतानाच तिला परत इंग्लंडला बोलविण्यात आलं. इंग्लंडमध्ये पोहचल्यावर तिला इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज यांच्या हस्ते 'मेम्बर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर' हा किताब देण्यात आला.इंग्लडला तिला परत बोलवण्यामागचा खरा उद्देश वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण देणे हा होता.तिचं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची बदली अमेरिकेच्या OSS मध्ये करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर १९४३ मध्ये ती नाझीव्याप्त फ्रान्समध्ये परत गेली.
मात्र त्या वेळी तिने वार्ताहराचा वेष धारण केला नाही.
त्याऐवजी तिने निरुपद्रवी सहज लक्षात न येणाऱ्या गौळणीचा वेष धारण करणे पसंत केले.सकाळी गौळण बनलेली व्हर्जिनिया सर्वत्र फिरून बातम्या गोळा करीत असे आणि रात्री बिनतारी संदेशाद्वारे इंग्लडला पोहचवत असे.तिच्या या कारवायांच्या खबरा जर्मनापर्यंत पोहचल्या.गेस्तापो तिच्या मागावर निघाले.संपूर्ण फ्रान्समध्ये ती हवी असल्याची पोस्टर्स झळकविण्यात आली.त्यात 'लंगडत चालणारी दोस्तांची हेर' असा खास उल्लेख होता.त्यावर सरळ सामान्य माणसांसारखं चालायला शिकून,वेषांतर करून तिने जर्मनांना गुंगारा दिला.गुप्त माहिती गोळा करणे व ती आपल्या राष्ट्रापर्यंत पोहचविणे हे तर तिचं मोठं काम होतंच,पण या कामाव्यतिरिक्त तिने दोस्त राष्ट्रांना आणखी बऱ्याच मार्गांनी मदत केली.जून १९४४ मध्ये दोस्तांनी नॉर्मडीवर हल्ला चढविला.तेव्हा हवाई मार्गाने रसद,शस्त्रास्त्रे व सैनिक पोहोचावेत म्हणून तिने साहाय्य केलं.
त्याचबरोबर फ्रेंच प्रतिकार दलं उभारून त्यांना घातपाताचं प्रशिक्षण देणं व स्वतः त्यांचं नेतृत्व घेऊन अनेक घातपाती मोहिमा व्हर्जिनियाने तडीस नेल्या.
युद्धकाळात व्हर्जिनियाने निरनिराळी नावे धारण केली होती.त्यांतली काही मारिया,मोनिन,जर्मेन,डायनी,कॅमिली, निकोला तर जर्मनांनी तिला दिलेलं लिम्पिंग लेडी (लंगडणारी बाई) हे.
महायुद्धाच्या दरम्यान व्हर्जिनियाने आपल्या देशाची अन् मानवतेची फार मोठी सेवा केली.या सेवेची आठवण अर्थातच अमेरिकेने ठेवली. महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा ती अमेरिकेत परत गेली तेव्हा तिला डिस्टिंग्विश सर्व्हिस क्रॉस देऊन सन्मानित केलं गेलं.
अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात हे पदक मिळविणारी ती एकमेव महिला आहे,याची नोंद आपण घेतली पाहिजे.तिच्या कार्याचं महत्त्व समजायला तेवढं पुरेसं आहे.
महायुद्धानंतर तिने आपल्या या हेरगिरीच्या उद्योगाला रामराम ठोकला.मात्र केवळ चार-पाच वर्षेच ती या उद्योगातून दूर राहिली. १९५७ मध्ये ती एजन्सीमध्ये रुजू झाली.एजन्सीच्या ऑफीस ऑफ पॉलिसी कोऑर्डिनेशन विभागात विश्लेषक म्हणून काम करू लागली.१९५२ मध्ये तिची नेमणूक नवीन स्थापन करण्यात आलेल्या ऑफिस ऑफ डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्लॅन्स(ऑपरेशन्स) या ठिकाणी करण्यात आली.या विभागात काम करणारी ती पहिली महिला होती.या विभागात काम करताना ती राजकीय मोहिमा आखणे,विस्थापितांच्या मुलाखती घेणे आणि यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर सोव्हिएत संघाविरुद्ध सुनियोजित प्रतिकार तसेच घातपात कारवाया करणारं जाळं उभारणं अशी काम करत होती.एजन्सीसाठी तिने पुढील १४ वर्षे काम केलं.या काळात परदेशांतही काही मोहिमा तिने पार पाडल्या.मात्र त्या कोणत्या, त्यांचे स्वरूप,ठिकाण यांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.१९६० मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी ती एजन्सीमधून निवृत्त झाली.
आयुष्याचा पुढील काळ व्हर्जिनिया यांनी बागकामात व्यतीत केला.१९८२ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.अशा रितीने हेरगिरीच्या विश्वातील तेजाने तळपणारा तारा निखळला.व्हर्जिनियाबाईच्या त्या तेजस्वी कारकिर्दीस अंतःकरणपूर्वक प्रणाम !