* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/६/२४

सर्जरी : अँब्रोसी पारे Surgery: Ambrosi Pare

सर्जरी हा शब्द साधारण १३०० साली ग्रीकमधल्या केर (हात) आणि अर्गन (काम करणं) यांच्यापासून बनलेल्या कीसर्गीमधून आला आहे.खरं म्हणजे शस्त्रक्रियांना खूप आधी सुरुवात झाली असं मानलं जातं.ख्रिस्तपूर्व ३००० ते २००० या काळात माणसाच्या कवटीला भोक पाडायची शस्त्रक्रिया केली जायची.ही शस्त्रक्रिया का केली जायची यामागची कहाणीही गमतीशीरच आहे. 


माणसाला कुठलाही आजार व्हायचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यात भूतं घुसतात असं मानलं जायचं.मग ती भूतं बाहेर काढण्यासाठी माणसाच्या कवटीला भोक पाडलं जायचं.गंमत म्हणजे त्या भोकातून बाहेर काढलेलीही भूतं पुन्हा त्याच भोकातून माणसाच्या कवटीमध्ये घुसतील हे कुणाच्या लक्षात कसं यायचं नाही कोण जाणे! त्या काळात शस्त्रक्रिया करण्यासाठी टोकदार दगड,हातोडी अशी आयुधं वापरली जात असावीत असं मानलं जायचं.पण त्यात होणारा रक्तस्राव कसा थांबवला जायचा हे एक गूढच आहे.


पुराणकाळात हम्मुराबी नावाचा सम्राट होऊन गेला.त्यानं बनवलेल्या नियमावलीत शस्त्रक्रियांसंबंधीचेही उल्लेख होते.त्यानुसार शस्त्रक्रिया करून रुग्णाचा आजार बरा करणाऱ्या डॉक्टरला चांदीची १० नाणी इतका मोबदला मिळायचा.पण हा रुग्ण गुलाम असेल तर मात्र डॉक्टरला फक्त पाचच नाणी दिली जायची.त्या काळी डॉक्टरला कुणावरही शस्त्रक्रिया करताना धडकीच भरायची.कारण त्याच्या हातून शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्ण दगावला किंवा त्याचा एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाला तर मात्र त्या डॉक्टरचे हात छाटले जायचे! इजिप्शियन काळातल्या शस्त्रक्रियांमध्येही गमतीजमती असायच्या. कुणाला माणूस किंवा सुसर चावली तर त्या माणसावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्याच्या जखमांवर कच्चं मांस जोरानं दाबून धरावं असं मानलं जायचं.तसंच कुणाला भाजलं तर आज आपण तो भाग लगेच गार पाण्याखाली धरून त्यावर बरनॉलसारखं मलम लावतो तसं त्या काळात त्या ठिकाणी मंदाग्नीवर तळलेला बेडूक चोळावा किंवा बुरशीत कुजलेल्या लेंड्या लावाव्यात असलाही विचित्र उपाय केला जाई. हे सगळं निरुपयोगी ठरलं तरच शस्त्रक्रियेची वेळ येई.हिप्पोक्रॅटसनंही शस्त्रक्रियेविषयी विवेचन केलं होतं.ख्रिस्तपूर्व ८०० ते २०० या काळात भारतात सुश्रुत हा तर शस्त्रक्रियेच्या बाबतीत अतिशय गाजलेला तज्ज्ञ होऊन गेला.


आठव्या शतकात वैद्यकशास्त्राची खूप पीछेहाट झाली आणि त्याची जागा दैववाद,धर्माचं अवडंबर वगैरे गोष्टींनी घेतली.थिओडोरिक नावाच्या एका राजानं तर अतिशय चमत्कारिक पद्धतच सुरू केली.त्यानुसार जर डॉक्टरचा उपचार लागू न पडल्यामुळे एखादा रुग्ण दगावला तर त्या डॉक्टरला चक्क त्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केलं जायचं.मग त्या डॉक्टरचं पुढे काय करायचं ते त्या नातेवाइकांनी ठरवायचं म्हणे! त्यामुळे अवघड शस्त्रक्रिया करायला डॉक्टर्स धजावायचेच नाहीत! अकराव्या शतकात धार्मिक कारणांवरून मठांमध्ये राहणाऱ्या लोकांना दाढी वाढवायला बंदी घालण्यात आली.त्यामुळे न्हाव्यांची चांगलीच चांदी झाली.इतकंच नव्हे तर हळूहळू आपला वस्तरा हे न्हावी लोकांच्या दाढ्या आणि डोक्यावरचे केस साफ करण्याबरोबरच त्यांच्यावर आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर घेडगुजऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठीसुद्धा वापरायला लागले! असे हे बार्बर सर्जन पुढची ६ शतकं आपला दुहेरी व्यवसाय बिनबोभाटपणे चालवायचे.बोलोना नावाच्या गावात ह्यूज नावाच्या सर्जननं शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या जखमा कोरड्या ठेवल्या तर त्या लवकर भरून येतात असा सिद्धान्त मांडून गेलनच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संकल्पनांना मोठा धक्काच दिला.गेलननं जखमा नेहमी ओल्या ठेवाव्यात आणि त्यात पू साठू द्यावा म्हणजे त्या पटकन भरून येतात असं म्हणून ठेवलं होतं! ह्यूज आणि त्याचा शिष्य थिओडोरिक यांनी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना भूल द्यायचे प्रकारही करून बघितले होते. 


पंधराव्या शतकात न्हाव्यांनी शस्त्रक्रिया कराव्यात का नाही यावरून फ्रान्समध्ये गदारोळ माजला.याची सुरुवात न्हाव्यांनी आपल्या शस्त्रक्रिया रुग्णाच्या जखमांमधून वाहणारं रक्त त्या ठिकाणी जळवा चिकटवून थांबवणं,

दुखरा दात उपटणं,तसंच गळू फोडणं यांच्यापुरतं मर्यादित ठेवावं असा नवा नियम बनण्यातून झाली.न्हाव्यांनी साहजिकच आपल्या पोटापाण्यावर गदा आली असल्याच्या भावनेतून या नियमाला तीव्र विरोध केला.

त्यामुळे प्रकरण पाचव्या चार्ल्स राजापर्यंत गेलं.चार्ल्सकडे त्याच्या खास न्हाव्यानं वशिला लावला आणि आपल्या संघटनेच्या बाजूनं निर्णय मिळवला !


हिप्पोक्रॅट्सच्या काळातले उपचार त्या मानानं फारच अघोरी प्रकारातले होते.त्यात उपायांपेक्षा अपायच अनेकदा व्हायचे.शिवाय,सर्जरी करणं हे सर्जनचं काम नसून,न्हाव्याचं काम होतं अशा समजुतीमुळे सर्जरीज ह्या अशिक्षित न्हाव्यांच्या गंजलेल्या,आधी इतरांनी वापरलेल्या हत्यारांनी आणि अंधाऱ्या खोलीत केल्या जायच्या. बंदुकीची गोळी लागून झालेल्या जखमांवर त्या निर्जंतुक करण्यासाठी त्यावर गरम तेल ओतलं जायचं.

इतर कारणांनी झालेल्या जखमा त्यातल्या रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी त्यावर तापलेल्या लोखंडाच्या सळईच्या डागण्या देऊन बंद केल्या जायच्या.शिवाय ज्या वेळी रक्त वाहात नसेल त्या वेळी जळवा लावून किंवा मुद्दाम जखमा करून रक्त वाहू दिलं जायचं ही गोष्ट तर वेगळीच! हे सगळं आता बदलायला हवं होतं.अँब्रोसी पारे हे करणार होता.१५१० साली फ्रान्समधल्या बुर्ग-हन्सेंट परगण्यात जन्मलेल्या अँब्रोसी पारे या मुळातच प्रज्ञावंत मुलाच्या मनावर जे जे बघू त्या त्या गोष्टींचा खोलवर परिणाम होत होता.हाच मुलगा पुढे बायॉलॉजीच्या विज्ञानामध्ये प्रगतीचा मैलाचा दगड ठरणार होता.! 


त्या काळी अंधश्रद्धांनी आणि जादू‌टोण्यांनी लोकांच्या मनाचा चांगलाच ताबा घेतला होता.तेव्हा काही दगडांच्या उपचारांनी चक्क विषही उतरतं ही त्यातलीच एक समजूत होती.अँब्रोसीचा असल्या थोतांडावर विश्वास नव्हता.हे सिद्ध करायची संधीही त्याला चालून आली.त्या काळी एका श्रीमंत घरातला आचारीच त्या घरातल्या चांदीच्या वाट्या-चमच्यांची चोरी करतोय असा संशय त्याच्या मालकाला आला होता.त्यावर त्याला त्या काळच्या न्यायाधीशांनी फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली होती.पण या आचाऱ्याचा या विष उतरवणाऱ्या दगडावर विश्वास होता.तेव्हा त्यानंच मी फासावर जाणार नाही,

त्याऐवजी विष पिईन.पण मला लगेचच विष उतरवणारा खडा गिळायची परवानगी द्यावी.मी जर त्यातून वाचलो तर मला या आरोपातून मुक्त करावं अशी विनंती त्यानं केलीतेव्हा हा प्रयोग अँब्रोसीच्या देखरेखीखाली करण्याचं ठरलं.आणि त्या आचाऱ्याला विष प्यायला दिलं आणि लगेचच त्यानं तो विष उतरवणारा खडाही गिळून घेतला.पण दुर्दैवानं पुढच्या सातच तासांत त्या आचाऱ्याचा मृत्यू झाला आणि असले विष उतरवणारे दगड खोटे असतात हे अँब्रोसीनं सिद्ध केलं! या आणि अशा अनेक न्यायविषयक प्रयोगांतून अँब्रोसीनं मॉडर्न फॉरेन्सिक पॅथॉलॉजीचा पाया घातला.खरं तर अशाच सत्यावर आणि प्रयोगांवर विश्वास ठेवणाऱ्या वैज्ञानिकांमुळे विज्ञानाची आणि माणसाची प्रगती झाली आहे.लहान असताना अँब्रोसी हा आपल्याच सर्जन असलेल्या मोठ्या भावाच्या हाताखाली लुडबुड करत चक्क सर्जरी शिकला आणि नंतर त्याचाच मदतनीस झाला.त्यात त्यानं लवकरच प्रावीण्य मिळवलं.


त्याच वेळी मात्र त्यानं 'हॉटेल दियू' या फ्रान्समधल्या सगळ्यात जुन्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं.नंतर तो सैन्याचा सर्जन म्हणून फ्रेंच सैन्यात दाखल झाला.आधी त्यानं रुग्णांच्या वेदना पाहिल्या होत्या.

त्यामुळे त्यानं सैनिकांवर जरा कमी वेदना होतील असे उपचार करायला सुरुवात केली.यासाठी त्यानं प्रयोग केला.एकदा बऱ्याच सैनिकांना जखमा झाल्या होत्या.

त्यापैकी अर्ध्यांना त्यानं पूर्वीप्रमाणे तापलेल्या लोखंडी सळईच्या डागण्या दिल्या आणि अर्ध्यांना जखमा बांधून टाकून टर्पेटाइन असलेलं ऑइंटमेंट लावलं.दुसऱ्या दिवशी येऊन पाहिल्यानंतर डाग दिलेले रुग्ण अजूनही वेदनेनं विव्हळत होते,तर ऑइंटमेंट लावलेले सैनिक शांत होते.

डाग दिलेल्या सैनिकांना पुढे जखमा अजूनच चिघळल्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं होतं तर ऑइंटमेंटमध्ये असलेल्या टर्पेटाइनच्या अँटिबायोटिक परिणामांमुळे ऑइंटमेंट लावलेल्या सैनिकांच्या जखमा भरून येण्याचं प्रमाण लगेचच वाढलं होतं.


बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर पारे घरातल्या तापमानाचंच मलम लावत असे आणि रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या बांधून टाकत असे. या उपायांनी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे पारेला यशही मिळायला लागलं होतं.पारेनं सैनिकांचे हात आणि पाय तुटलेले पाहिले होते.त्यातून त्यानं अशा प्रकारे अपंग झालेल्या व्यक्तींसाठी पहिल्यांदाच कृत्रिम हात आणि पाय हे अवयव तयार केले होते.त्या काळी एखाद्या स्त्रीची प्रसूती होताना पोटात बाळ जर आडवं असेल किंवा एकच हात किंवा एकच पाय आधी बाहेर येऊन बाळ अडकलं असेल तर त्या काळी पोटातच त्या बाळाचे एक एक अवयव कापून टाकून मग एक एक अवयव पोटातून बाहेर काढावे लागत होते.अर्थातच,अशा अवस्थेत असलेल्या अर्भकांना निर्दयीपणे मारावं लागत होतं.

नाहीतर प्रचंड रक्तस्रावानं त्या स्त्रीचा बळी जायचा.

अँब्रोसीनं अशी बाळंतपणं कशी करावीत याचंही तंत्र त्या काळी विकसित केलं होतं.बाळंतपणातल्या पद्धतींमध्ये त्यानं अनेक सुधारणा केल्या.त्याची हीच परंपरा पुढे चालवत त्याचा शिष्य जॅकस गुलीमाऊ यानं पुढे स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्रात फारच प्रगती घडवून आणली.अँब्रोसीच्या याच शिष्यानं त्याचं काम लॅटिनमध्ये अनुवादित केलं.अँब्रोसीनं व्हेसायलियसच्या कामाचा फ्रेंचमध्ये अनुवादही केला.याचा त्या वेळच्या लॅटिन न शिकलेल्या अशिक्षित बार्बर सर्जन्सना मानवी शरीराबद्दल माहिती मिळावी असा त्याचा हेतू होता.अशा प्रकारे अँब्रोसी पारेनं सर्जरीचं शास्त्र पुढे नेलं.


रेनायसान्सच्या काळात इटलीमध्ये गॅस्पर ताग्लियाकोझी (१५४७ ते १५९९) यानं प्लॅस्टिक सर्जरीच्या बाबतीत खूप मोठी कामगिरी केली.

एखाद्या माणसाची नैसर्गिकरीत्या असलेली किंवा काही कारणांनी त्याच्यात निर्माण झालेली व्यंगं आणि वैगुण्य दूर करण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या त्वचेचं त्या वैगुण्य असलेल्या माणसाच्या त्वचेवर रोपण करावं असं ताग्लियाकोझीनं सुचवलं. 


यामुळे अनेक लोकांना आपापली व्यंगं झाकता आली.

पण त्याचबरोबर माणसाच्या मूळ रूपात बदल करायच्या या कल्पनेवर धार्मिक वृत्तीच्या लोकांनी आणि चर्चनं जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.तो इतका भयानक होता,की ताग्लियाकोझी दगावल्यावर त्याचं प्रेत जिथं पुरलं होतं तिथून ते उकरून काढण्यात आलं आणि ते एका घाणेरड्या ठिकाणी पुन्हा एकदा दफन करण्यात आलं.याच सुमाराला फ्रान्समध्ये मूळचे सर्जन्स असलेले आणि न्हावीकाम करत करत सर्जन झालेले बार्बर-सर्जन्स यांच्यात चांगलीच चढाओढ निर्माण झाली.आपल्या हातून काही चूक झाली तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील या भीतीनं सर्जन लोक हर्निया,

मूतखड्याची शस्त्रक्रिया वगैरे कामं करायला बिचकायचे.पण बार्बर-सर्जन्स मात्र बेधडकपणे या शस्त्रक्रिया करत गावोगाव फिरायचे.सतराव्या शतकात अचानकपणे आपल्या शरीरात दुसऱ्या माणसाचं रक्त भरून घ्यायची विचित्र प्रथा एकदम लोकप्रिय झाली! सुरुवातीला रोगांवर उपचार म्हणून या पद्धतीचा वापर केला जायचा.पण नंतर धडधाकट माणसंसुद्धा विनाकारणच आपल्या शरीरात रक्त भरून घ्यायला लागली.काही काळात ही एक फॅशनच बनली.

राजघराण्यातल्या माणसांनाही या गोष्टीचं आकर्षण वाटायला लागलं.त्यामुळे शरीरात रक्त भरून देणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांचं चांगलंच फावलं.एका माणसाच्या शरीरातून रक्त काढून ते दुसऱ्या माणसाच्या शरीरात भरण्यासाठी वेगवेगळी उपकरणं निघाली. १६६७ साली जाँ डेनिस या माणसानं एका मेंढीच्या शरीरातलं रक्त काढून ते १५ वर्षं वयाच्या एका मुलाच्या शरीरात भरलं. सुदैवानं त्या मुलाला काही अपाय न झाल्यामुळे सगळीकडे हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.त्या काळात माणसाच्या शरीरातल्या रक्ताचे वेगवेगळे रक्तगट असतात आणि कुठल्याही रक्तगटाचं रक्त दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या शरीरात भरून चालत नाही ही महत्त्वाची माहिती कुणाला नसल्यामुळे साहजिकच रक्त भरायच्या या प्रकारांमधून अनेक दुर्घटना घडल्या.


१७१५ साली फ्रान्समधला चौदावा लुई राजा पायाला गँगरिन होऊन मेला.पण त्याच्या अखेरच्या काळात मारेशा आणि फिगो या दोघा वैज्ञानिकांनी केलेल्या शस्त्रक्रियांची आणि उपचारांची सगळ्यांनीच स्तुती केली.यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिमा उजळायला मदत झाली.मारेशानं या परिस्थितीचा फायदा उठवून द पेरोनी या आपल्या शिष्याच्या मदतीनं राजदरबारातलं आणि एकूणच समाजातलं आपलं महत्त्व वाढवून घेतलं.पंधराव्या लुई राजाच्या काळापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेला खूपच मानाचं स्थान मिळवून दिलं.मरताना पेरोनी यानं आपली तब्बल ...


१५ लाख फ्रैंक्स इतकी संपत्ती पॅरिसमधल्या सर्जनच्या संघटनेला दान केली.सर्जन्स हे इतर शाखांमधल्या डॉक्टर्सप्रमाणेच अतिशय गुणवान असतात हे सिद्ध करण्यासाठी पेरोनीची धडपड सुरू होती. त्यामुळे त्यानं पॅरिसमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्यासाठी सर्जन्स नेमले जावेत अशी मागणी केली.राजानं ती मान्य करताच सर्जन्स सोडून इतर डॉक्टर्सचा जळफळाट झाला.

त्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला,पण त्यामुळे त्यांच्या हाती काही लागलं नाही.

७/६/२४

चूक कबूल करा..Admit your mistake..

२२.०५.२४ या लेखातील शेवटचा भाग…


तेव्हा त्याने कर्मचाऱ्याला सांगितले की,तो त्याच्या पुढच्या पगारातून ही पूर्ण रक्कम कापेल. कर्मचाऱ्याने विरोध केला की,पूर्ण रक्कम एकदमच कापल्यामुळे तो गंभीर आर्थिक समस्येमध्ये फसेल,यामुळे थोडी थोडी कापली जाणं उचित ठरेल.असं करण्याकरता हार्वेला आपल्या सुपरवायझरकडून अनुमती घेण्याची आवश्यकता होती.

हार्वेने सांगितलं,"आणि मला माहीत होतं की असं केल्याने साहेब खूपच रागवेल.कारण की,हा सारा गोंधळ माझ्या चुकीमुळे झाला होता,यामुळे मी हा निर्णय घेतला की,मी साहेबांसमोर आपली चूक कबूल करेन."मी साहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की,माझी एक चूक झाली आहे आणि यानंतर मी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली.साहेबांनी विस्फोटक आवाजात सांगितलं की,ही माझी नाही,तर पर्सनल डिपार्टमेंटची चूक आहे. मी परत म्हणालो नाही,ही माझीच चूक आहे. यावर साहेबांनी याला अकाउंटिंग डिपार्टमेंटची बेपर्वाई आहे म्हणून सांगितलं.परत एकदा साहेबांनी माझा बचाव करायला याचा दोष दोन लोकांवर थोपला;पण प्रत्येक वेळी मी परत परत म्हटलं की,चूक माझीच आहे.शेवटी,साहेबांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं : 'अच्छा,ही चूक तुमचीच आहे.आता जा आणि चूक दुरुस्त करा.'चूक ठीक केली गेली आणि कोणाला त्रासही झाला नाही.मला खूप छान वाटलं कारण की,मी एका तणावाच्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने दूर करण्यात यशस्वी झालो होतो आणि मी बहाणे बनवायच्याऐवजी 'खरी गोष्ट सांगण्याचं साहस' हा पर्याय निवडला होता. 


या घटनेनंतर बॉसच्या नजरेत माझी इज्जत पहिल्यापेक्षा जास्त वाढली.कोणी पण मूर्ख आपल्या चुकांकरता बहाणे बनवू शकतो आणि जास्त करून मूर्ख असे करतातही; पण तुमच्या चुका कबूल केल्यामुळे तुम्ही गर्दीपासून वेगळे पडता आणि यात तुम्हाला आनंद व प्रतिष्ठेचा अनुभवही मिळतो.


उदाहरणार्थ,इतिहासात रॉबर्ट ई.ली.बाबतीत जी सगळ्यात रोचक गोष्ट सांगतो ती ही की,त्यांनी स्वतःला आणि फक्त स्वतःला गेटिसबर्गच्या युद्धात पिकेटच्या आक्रमणाच्या नंतर होणाऱ्या पराजयामुळे अपराधी मानलं.


याच्यात काही शंका नाही की पिकेटचं आक्रमण पश्चिमी जगताच्या इतिहासात सगळ्यात शानदार आणि दर्शनीय आक्रमण होतं.जनरल जॉर्ज ई. पिकेट यांनी आपले केस इतके वाढवले होते की, ते त्यांच्या खांद्याला स्पर्श करत होते. नेपोलियनच्या पद्धतीने ते रणभूमीवर बहुतेक रोज भावनापूर्ण,उत्कटतापूर्ण प्रेमपत्र लिहायचे. त्यांच्या निष्ठावान सैनिकांनी त्या जुलैच्या दुपारी त्यांचा जोश वाढवत नारे लावले.पिकेट युनियन लाइन्सच्या दिशेने भराभरा पुढे गेले आणि पूर्ण सेना त्यांच्या मागे मागे गेली.


हे एक बघण्यासारखे दृश्य होते.साहसपूर्ण भव्य युनियन लाइन्समध्ये ज्यांनी हे दृश्य बघितलं,त्यांनी याची तारीफ केली.पिकेटची सेना सहजपणे पुढे चालली आणि एका खंदकाला पार करून पुढे निघाली.यामध्ये पूर्ण वेळ शत्रूच्या तोफेचे गोळे सेनेवर निशाणा साधून पडत होते; पण ती सेना न घाबरता,न थांबता पुढे जातच राहिली.

अचानक सीमेट्री रिजच्या दगडांच्या भिंतीमागून संघीय सेना प्रकट झाली,जी इथे लपली होती आणि त्यांनी पिकेटच्या पुढे जाणाऱ्या सेनेवर गोळीबार सुरू केला.

पहाडाचं शिखर या वेळी एका ज्वालामुखी सारखं जळत होतं,असं वाटत होतं की,जसं हे कत्तलीचं मैदान आहे.

काहीच मिनिटांत एकाला सोडून पिकेटचे सगळे ब्रिगेड कमांडर मृत्यूच्या दाढेत गेले आणि पाच हजार सैनिकांच्या सेनेमधून फक्त एक हजार सैनिकच जिवंत राहिले.


जनरल ल्युइस ए.आर्मिस्टीडने शेवटी चढाई करताना सैनिकांचं नेतृत्व केलं.ते समोर पळाले, दगडी भिंतीवर चढले आणि आपल्या तलवारीच्या टोकावर आपल्या कॅपला हलवत ते ओरडले,"माझ्या बहादूर शेरांनो त्यांना तुमची हिंमत दाखवा." सैनिकांनी तसंच केलं.त्यांनी भिंतीला पार केलं.आपल्या शत्रूवर बंदुकीने प्रहार केला आणि सीमेट्रीवर दक्षिणचे झेंडे गाडले.हे झेंडे फक्त एका क्षणाकरता तिथे राहिले;पण हा क्षण मग तो कितीही छोटा असो, इतिहासात कायमस्वरूपी कोरला गेला.


पिकेटचं आक्रमण अद्भुत आणि साहसाचं असूनही ती शेवटची सुरुवात होती.ते असफल झाले.ते उत्तर दिशेला भेदू शकले नाहीत आणि ते ही गोष्ट जाणत होते.


दक्षिणेची हार निश्चित होती.ली इतके दुःखी होते, इतक्या धक्क्यात होते की,त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आणि संघाच्या प्रेसिडेंट जेफरसन डेविडला सांगितलं की,त्यांच्या जागी एखाद्या 'युवा आणि अधिक योग्य' व्यक्तीला नियुक्त करावं.गेटिसबर्गच्या युद्धात पराजया करता जनरल लींना जर बहाणे बनवायचे असते, तर ते खूपच गोष्टींना बहाणा बनवू शकले असते. त्यांच्या अनेक डिव्हिजन कमांडर्सनी त्यांना धोका दिला होता.


पायदळाच्या सैनिकांच्या आक्रमणाच्या वेळी मदत करण्याकरता वेळेवर घोडेस्वारांची सेना पोहोचली नव्हती.ही गोष्ट चुकीची झाली होती,त्या गोष्टीत गडबड झाली होती.परंतु जनरल इतके महान होते की,त्यांनी कोण्या दुसऱ्याला दोष नाही दिला.जेव्हा पिकेटचे हारलेले आणि रक्तबंबाळ झालेले शिपाई परत आले तेव्हा रॉबर्ट ई.ली.त्यांना भेटायला एकटेच गेले आणि त्यांचं स्वागत मनापासून केलं,ज्यात त्यांची महानता झळकत होती.

त्यांनी सांगितलं,सगळी चूक त्यांचीच होती. मी आणि फक्त मीच या सगळ्या हरण्याला जबाबदार आहे." इतिहासात खूपच कमी सेनापतींनी इतक्या साहसपूर्ण आणि चारित्रिक दृढतेचा परिचय दिला आहे.


माइकेल च्यांग आमचा कोर्स हाँगकाँगमध्ये शिकवत होते.त्यांनी आम्हाला सांगितलं की, कशा प्रकारे चीनची संस्कृती अनेक वेळा काही विशेष समस्यांना निर्माण करते आणि कोणत्या तऱ्हेने जुन्या परंपरेला कायम ठेवण्याऐवजी आम्हाला नव्या सिद्धान्ताना स्वीकारल्यावर लाभ होतो.त्यांच्या वर्गात एक मध्यम वयाचा माणूस होता.ज्याचे अनेक वर्षांपासून आपल्या मुलाबरोबर मतभेद चालले होते.वडिलांना अफूची सवय होती,जी आत्ता सुटली होती. चीनमध्ये ही परंपरा आहे की,मोठे लोक माफी मागायला पहिलं पाऊल उचलत नाहीत.

याकरता वडिलांना वाटत होतं की, मुलानेच पहिलं पाऊल पुढे उचलायला हवं. सुरुवातीच्या सत्रात त्यांनी वर्गाला सांगितलं की, त्यांनी त्यांच्या नातवाचं तोंडसुद्धा बघितलं नव्हतं आणि त्यांना खूप इच्छा होती की,त्यांच्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये समझोता झाला पाहिजे.क्लासचे सगळेच विद्यार्थी चीनचे होते आणि त्यांना हे माहीत होतं की,त्यांच्या इच्छा आणि पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा यांच्यात किती जबरदस्त संघर्ष चालतो आहे.वडिलांना हे वाटत होतं की,तरुण पिढीला जुन्या पिढीचा सन्मान करायला पाहिजे आणि त्या कारणाकरिता ते आपल्या इच्छेच्या अनुसार पाऊल न उचलण्याला बरोबर ठरवत होते आणि वाट बघत होते की,त्यांचा मुलगा येईल आणि त्यांची माफी मागेल.


कोर्सच्या शेवटी वडिलांनी परत एकदा आपल्या वर्गाला संबोधित केलं.त्यांनी म्हटलं, "मी समस्येवर चांगल्या त-हेने विचार केला आहे." डेल कार्नेगी म्हणतात,'जर चूक तुमची असेल, तर तत्काळ आणि पूर्णपणे तुमची चूक कबूल करा.' खरंतर माझ्याकरिता तत्काळ चूक मान्य करण्याची वेळ कधीच निघून गेली आहे;पण मी माझी चूक पूर्णपणे तर मानूच शकतो.मी आपल्या मुलावर अन्याय केला आहे.यात त्याचा दोष नाही आहे की,तो मला परत बघू इच्छित नाही.यात त्याचा दोष नाही आहे की,त्यानं मला जीवनातून काढून टाकलं.खरंतर आपल्यापेक्षा लहानांसमोर माफी मागणं ही आमच्या इथं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते;पण चूक माझी होती आणि ती कबूल करण्याची जबाबदारीही माझीच आहे." वर्गाने टाळ्या वाजवून त्यांच्या गोष्टीचं स्वागत केलं आणि त्याला आपलं पूर्ण समर्थन दिलं.पुढच्या वर्गात त्यांनी सांगितलं की, कसा तरी तो आपल्या मुलाच्या घरी गेला,त्यांनी माफी मागितली आणि आता त्यांचं नातं सुधारलं आहे.आता त्यांची सून व नातू त्यांना पसंत करू लागले आहेत.त्यांना भेटण्यात ते यशस्वी झालेत.


अल्बर्ट हबार्ड देशाचे खूपच प्रतिष्ठित लेखक होते.

बऱ्याचदा त्यांच्या बोचऱ्या शब्दांनी लोकांच्या भावना भडकायच्या;पण हबार्डमध्ये लोकांच्या बरोबर व्यवहार करण्याची ती दुर्लभ कला होती ज्याच्या कारणामुळे ते आपल्या शत्रूलाही मित्र बनवायचे.


उदाहरणार्थ,जेव्हा कोणी वाचक चिडून त्यांना लिहायचा की,तो त्यांच्या अमुक अमुक लेखामधल्या व्यक्त केलेल्या विचारांबरोबर सहमत नाही.तर अल्बर्ट हबार्ड त्या पत्राला उत्तर साधारण या प्रकाराने द्यायचे -


जर विचार केला,तर मी आजच्या तारखेला आपल्या त्या लेखाच्या विचारांच्या बाबतीत पूर्णपणे सहमत नाही आहे.एका दिवसात मी जे लिहितो ते दुसऱ्या दिवशी मलाच स्वतःला चांगले वाटत नाही.मला या विषयी तुमचे विचार ऐकून आनंद झाला.पुढच्या वेळीही तुम्ही या बाजूला याल,तेव्हा आपण भेटून याबाबत सविस्तरपणे चर्चा करू शकतो,तर सद्यः परिस्थितीत मी तुमच्याशी दुरूनच हात मिळवू शकतो.जो माणूस पत्राचं या प्रकारे उत्तर देईल,त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणू शकता ?


जेव्हा आपलं बरोबर असतं,तेव्हा आमचा प्रयत्न हा व्हायला हवा की आम्ही हळुवारपणे आणि कूटनीतीने लोकांना मनवायचा प्रयत्न करू आणि जेव्हा आम्ही चूक असू तेव्हा आपण आपल्या चुकीचा तत्काळ आणि उत्साहानी स्वीकार करायला पाहिजे.या तंत्राचे न फक्त आश्चर्यजनक परिणाम मिळतील;परंतु विश्वास ठेवा,यामुळे आपल्याला स्वतःचा बचाव करण्याच्या तुलनेत जास्त आनंदही मिळेल.


जुनी म्हण आठवा -भांडणांनी तुम्हाला सर्व काही नाही मिळत;पण हार मानून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं.


जर चूक तुमची असेल,तर तत्काळ आणि पूर्णपणे ती मान्य करा…



५/६/२४

तीन पुरस्कर्ते Three advocates

०१.०६.२४ या भागातील पुढील शेवटचा भाग..


 तुम्ही या व पोप,सम्राट,तेवीस कार्डिनल्स, तेहतीस आर्चबिशप,दीडसे अँबट व चर्चची सुधारणा करण्यासाठी येणार असलेले शंभरावर ड्यूक व राजेरजवाडे वगैरेंना आपली मते समजावून सांगा.असे हसला कळविण्यात आले होते व तुम्ही याल तर तुमच्या सुरक्षिततेची हमी आम्ही घेतो.असेही आश्वासन त्याला देण्यात आले होते.


अशक्त,हाडकुळा,आजारी हस तिथे जाताच वचन मोडून त्याला पकडण्यात आले व नास्तिक म्हणून जिवंत जाळण्यात आले! हे दुष्ट कृत्य केल्यानंतर हे जमलेल्या कौन्सिलने जॉन वुक्लिफची हाडे उकरून काढून जाहीररीत्या जाळून टाकली! वेल्स लिहितो,"हे पापी,नीच कृत्य एखाद्या विक्षिप्त धर्मवेड्या पीराने केले नव्हते;तर अधिकृतरीत्या चर्चने केले होते."


हसच्या मरणानंतर पाच वर्षांनी पोप पाचवा मार्टिन याने वटहुकूम काढला की,सारे हसवाले, वुक्लिवाले व बोहेमियांतील नास्तिक नष्ट केले जावेत.क्रूसेड्स्वरून परत आलेल्यांनी पोपचे हे फर्मान वाचताच ठिकठिकाणी त्याची अंमलबजावणी केली.सर्वांच्या कत्तली झाल्या; पण हसचे विचार मारले गेले नाहीत.


पेट्रार्क हा नवयुगातील साहित्यिक जागृतीचा प्रतिनिधी होता,जोहान्स हस हा धार्मिक जागृतीचा प्रतिनिधी होता व जॉन बॉल हा सामाजिक जागृतीचा प्रतिनिधी होता. 


मध्ययुगाच्या अंती ही सारी पृथ्वी ओसाड झाली होती.

सर्वत्र विध्वंस व विनाश दिसून येत होते. क्रूसेड्सच्या युद्धांतून दुष्काळ व साथी यांचा उद्भव झाला.युद्धातून शेवटी सर्वत्रच रोग फैलावतात.मागील महायुद्धातही ही गोष्ट अनुभवास आली होती.क्रूसेड्समधून 'काळा मृत्यू' म्हणून एक भयंकर रोग सर्वत्र फैलावला. एका युरोपातच या रोगाने जवळजवळ दीड कोटी लोकांचा बळी घेतला! सर्वच मानवजातीचे उच्चाटन होणार असे दिसू लागले. या मरणांतिक साथीने लोकांचे डोळे उघडले व ते जीवनाच्या मूल्यांचा फेरविचार करू लागले. आपण ज्या मार्गांनी जात आहोत ते भले आहेत की बुरे आहेत,याची चिकित्सा ते करू लागले. मागील महायुद्धानंतर आपणही अशाच प्रकारे विचार करू लागलो होतो.आपले पुढारी,आपले राजेमहाराजे वगैरे ज्या रीतीने जात आहेत,त्यात कितपत अर्थ आहे,याची परीक्षा लोक करू लागले.युद्धे व साथी यांमुळे सर्वांहून अधिक धक्का जर कोणास बसला असेल तर तो शेतकऱ्यांना हे शेतकरी ठायी ठायी बंड करून उठले.ज्यांनी त्यांना निव्वळ पशुसम स्थितीत डांबून ठेवले होते त्यांच्या सत्तेविरुद्ध ते बंड करून उठले.त्या काळ्या आजाराने लाखो लोकांचे बळी घेतल्यामुळे मजूर भरपूर मिळेनासे झाले.ॲबट,बिशप व इतर जमीनदार यांचे अर्थशास्त्रविषयक अज्ञान जसे अपरंपार होते, तसाच त्यांचा स्वार्थही अपरंपार होता. 


शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी दुप्पट काम करावे असे जुलमी कायदे या प्रतिष्ठित वर्गांनी केले.काम वाढले,पण मजुरीत मात्र वाढ झाली नाही! आणि दुःखांवर डागणी म्हणूनच की काय कामगारांनी वा मजुरांनी स्वसंरक्षणार्थ संघटना करता कामा नयेत,असेही कायदे केले गेले. चांगली नोकरी शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्यासही त्यांना कायद्याने बंदी करण्यात आली.हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता.या सर्व जुलमांमुळे शेतकरी व कामकरी साहजिकच बंडास प्रवृत्त झाले.ही इतिहासातील एक नवीनच गोष्ट होती.समाजातील जे अन्याय व ज्या विषमता दैवायत्त व देवेच्छित म्हणून अनिर्बंध चालत आल्या होत्या,ज्याविरुद्ध कोणी ब्रही काढीत नसे,

त्याविरुद्ध सारी पददलित जनता गर्जना करून उठली.दारिद्र्य,दैन्य,दुष्काळ,रोग,उपासमार,मरण,

शक्तीबाहेर काम,या सर्वांविरुद्ध श्रमजीवी जनता निर्भयपणे गर्जना करून भिंतीस पाठ लावून उभी राहिली.वस्तुतः हे नवदर्शन होते.पण सनातनी वृत्तीचा फ्रॉइसार्ट राजा-महाराजांची व पोपबिशपांची बाजू घेऊन लिहितो की,जनता बंड करून उठली कारण ती सुखवस्तू होती म्हणून ! भरपूर खायला-प्यायला मिळत होते,म्हणून ही बंडाची शक्ती ! शेतकऱ्यांचे बंड प्रथम फ्रान्समध्ये पेटले.पुढे चारशे वर्षांनी झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची हे बंड ही एक आगाऊ सूचनाच होती म्हणा ना ! 


फ्रान्समधील बंडाच्या ज्वाला इंग्लंडात आल्या. केंट परगण्यातील जनतेला जॉन बॉल याने समतेचे तत्त्व उपदेशिले.फ्रॉइसार्ट,जॉन बॉल याचे हे धाडस पाहून चकित होतो.जॉन बॉल याची त्याला जणू गंमत वाटते.तो त्याला 'कॅटमधील वेडा धर्मोपदेशक' असे संबोधितो. 


त्याच्या प्रवचनाला बहुजन समाजातील पुढील सूत्राचा आधार असे : जेव्हा ॲडम काम करी आणि ईव्ह सूत कातत असे,तेव्हा प्रतिष्ठित वा सभ्य गृहस्थ होता का कोणी? काही लोक ईश्वराच्या कृपेनेच दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्यासाठी जन्माला येतात.असल्या चावट मतांची तो हुर्रवडी उडवी व शेतकऱ्यांस सांगे की,हा सारा फालतू पसारा आहे,अन्यायी व जुलमी लोकांचा हा पापमूलक अनाचार आहे.तो म्हणे,"बंधूंनो,जोपर्यंत आपण सारी संपत्ती सारखी विभागून घेत नाही,सर्वांस सारखे अन्नवस्त्र वाटून देत नाही,मिळेल ते सर्व सारे मिळून जोपर्यंत सारखे उपभोगीत नाही, तोपर्यंत जगात श्रीमंत-गरीब,मालक-मजूर असे भेद राहणारच.ज्यांना आपण लॉर्ड म्हणतो, त्यांच्यात आपणा सामान्य लोकांहून विशेष असे काय आहे? त्यांना का म्हणून मोठे मानायचे? त्यांची कोणती श्रेष्ठता? कोणती लायकी? ते आपणास दास्यात का ठेवतात? ते स्वामी का? व आपण त्यांची हीन-दीन कुळे का? आपण सारेच ॲडम व ईव्ह यांपासून जन्मलो,

तर 'आम्हीच श्रेष्ठ' असे हे कोणत्या तोंडाने म्हणतात? यांचा मोठेपणा एकच आहे व तो म्हणजे ते तुम्हा-आम्हास राबायला लावतात. त्यांना चैन करण्यासाठी जे जे लागते,

ते सारे आपण निर्माण करतो व ते बेटे गाद्यांवर बसून गर्वाने सारे भोगतात.ते गरम कपडे घालतात, मलमलीचे व लोकरीचे सुंदर कपडे वापरतात, पण आपल्या अंगावर मात्र चिंध्या ! त्यांना प्यावयास उंची मद्ये,खायला छानदार भाकरी, नाना भाज्या,नाना मसाले ! आणि आपणास मात्र साधी भाकर! आपण चंद्रमौळी झोपड्यांत राहतो,पेंढ्यावर निजतो,साधे पाणी पितो,तर त्यांना राहण्यास सुंदर घरे व भरपूर आराम! आपणास पावसापाण्यात व थंडी-वाऱ्यात शेतात राबावे लागते,हाल व कष्ट आपल्या कपाळी! हे बडे लोक जी ऐट व जे वैभव दाखवितात त्यांचा जन्म तुमच्या-आमच्या श्रमांतूनच होतो."


चौदाव्या शतकाच्या मध्याला उच्चारलेले हे क्रांतिकारक शब्द जणू काय मार्क्सचे, एंजल्सचे किंवा यूजेन डेब्सचेच आहेत असे वाटते.


जॉन बॉल जे सांगत होता ते लोकांना,विशेषतः वरिष्ठ वर्गातील लोकांना,जरी विचित्र वाटे,तरी त्यात खरोखर विचित्र असे काहीच नव्हते. ख्रिस्ताची शिकवणच तो जणू पुन्हा नव्याने सांगत होता.पण ती खरी ख्रिस्ताची शिकवण ऐकून कैंटरबरीचा आर्चबिशप दातओठ खाऊ लागला,तो अत्यंत संतप्त झाला.युरोपातील एक तृतीयांश जमीन चर्चच्या मालकीची होती,जॉन बॉल ख्रिस्ताची शिकवण शिकवू लागल्यापासून पाच वर्षांनी,म्हणजे इ.स.१३६६ मध्ये त्याला धर्मबाह्य ठरविण्यात आले.त्याचे प्रवचन या व्याख्यान कोणाही इंग्रजाने ऐकू नये असे फर्मान काढले गेले.पण त्या वटहुकूमामुळे जॉन बॉल डगमगला नाही,

शेतकरीही घाबरले नाहीत.त्याने आणखी पंधरा वर्षे आपली चळवळ सुरूच ठेवली.शेवटी,१३८१ मध्ये त्याला अटक करून मेडस्टन येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

पण या वेळपर्यंत शेतकरी चांगलेच उठले होते.ते चांगलेच जागृत झाले होते.त्यांनी तुरुंग फोडला व आपल्या पुढाऱ्यास वाचविले,जॉन बॉलने पुन्हा आपले काम सुरू केले.तो पुन्हा गिरफ्तार केला गेला.१३८१ च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस बड्या सरदार वर्गाच्या लोकांसमक्ष त्याला फाशी देण्यात आले.त्याची ती शिक्षा पाहण्यास दुसरा रिचर्ड राजाही हजर होता.


शेतकरी व कामकरी यांचे बंड तात्पुरते शमले; पण पुढे ते फ्रान्समध्ये,जर्मनीत बोहेमियांत तसेच रशियातही पेटले.हे पुस्तक लिहिण्यात येत असता ते चीनमध्येही पेटत आहे.जॉन बॉलचे बंड म्हणजे मानवजातीच्या इतिहासातला एक नवीनच म्हणजे नवयुगाचा,नवक्रांतीचा प्रारंभ होता.तो श्रमजीवी व कामगार वर्गाच्या पुरस्काराच्या युगाचा प्रारंभ होता.ऐतिहासिक चळवळीची बीजे रुजण्यास,वाढण्यास व फोफावण्यास बराच काळ लागतो.जॉन बॉल याने पेरलेली बीजे आज विसाव्या शतकात मूळ धरू लागली आहेत,असे दिसत आहे.


मानवजातीची कथा हेन्री थॉमस, अनुवाद-सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन


मानवजात संस्कृतीच्या मार्गावर एक पाऊल टाकायला कधीकधी कित्येक शतके घेते. चौदाव्या शतकापासून एक नवीनच शक्ती जगात प्रादुर्भूत झाली.पददलित लोकांना स्वतःच्या शक्तीचा साक्षात्कार झाला.स्वतःच्या हक्कांच्या रक्षणार्थ व समर्थनार्थ ते आपली शक्ती दाखवू लागले.या श्रमजीवी वर्गाला जागे होण्यास शेकडो वर्षे लागली,

तशीच आता शक्तिसंपन्न व्हायला आणखी कित्येक शतके लागतील.पण भविष्य निश्चितपणे त्याचे आहे.त्याचा भाग्याचा दिवस निश्चितपणे जवळ येत आहे.मानवी मनाची जागृती,मानवी आत्म्याचे मुक्त होणे, अशा अर्थाचे जे हे नवयुग उजाडले.ते इतिहासातले सर्वांत मोठे युग होय.इतिहासातील चळवळीत ही अत्यंत महत्त्वाची चळवळ होय. या नवयुगाचा आरंभ चौदाव्या शतकात झाला.ते नवयुग आज पाचशे वर्षे होऊन गेली तरी अद्यापिही बाल्यावस्थेतच आहे.ज्या वेळेस मानव

कुटुंबातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी लाभेल;ज्या वेळेस पक्षपात नाहीसा होईल;जेव्हा आवडता-नावडता हा भेद निघून जाईल;जेव्हा या धनधान्यसंपन्न वसुंधरेची फळे सर्वांना नीटपणे मिळतील व सर्वांना सुखी,सुंदर व निरामय जीवन कंठिता येईल,

तेव्हाच हे नवयुग विजयी,कृतार्थ झाले असे म्हणता येईल. जेव्हा युद्धे अज्ञान,जुलूम,असहिष्णुता,द्वेष व मत्सर पृथ्वीवरून निघून जातील,तेव्हाच नवयुगाची संपूर्ण कथा सांगण्याचा योग्य प्रसंग आला,असे म्हणता येईल.

३/६/२४

नवयुगाचे तीन पुरस्कर्ते Three advocates of the new age...

पेट्रार्क,जोहान्स हस,जॉन बॉल


पेट्रार्क - प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा ख्रिश्चन जगात झालेला पुनर्जन्म म्हणजे नवयुग असे सर्वसाधारणपणे समजण्यात येते.चौदाव्या शतकात केव्हातरी युरोपियनांस मातीत गाडलेले सौंदर्य आढळले.ते ते शोधू लागले.

उत्खनन सुरू झाले.ग्रीक लोकांनी तयार केलेले अप्रतिम पुतळे उपलब्ध झाले.पुन्हा एकदा या अप्रतिम शिल्पवस्तू निळ्या नभाखाली नीट मांडून ठेवण्यात आल्या.जुन्या मठातील ग्रंथालये धुंडाळण्यात येऊ लागली.जुन्या कचऱ्यात, गळाठ्यांत,रद्दीत रत्नांचे संशोधन होऊ लागले. धुळीने भरलेल्या कपाटात,पेट्यांत वगैरे पुस्तके सापडू लागली.


एसचायल्स,प्लेटो,रिस्टोफेन्स,सिसरो,होरेस, ल्युक्रेशियस इत्यादी थोर आचार्यांचे ग्रंथ मिळाले. ग्रीक लोकांच्या हास्याचा,आनंदाचा व विनोदाचा ध्वनी चौदाव्या शतकात पुन्हा युरोपच्या कानावर आला.गंभीर व चंबूसारखे तोंड करणारे सुतकी युरोप पुन्हा एकदा हसायला व विचार करायला शिकले. 


युरोपीय जनता दुसऱ्या देशांकडे,जातींकडे व काळाकडे पाहू लागली,तिचे डोळे उघडले; संकुचित,बंद मने जरा मोठी झाली,उघडली. चौदाव्या शतकातील युरोपियन लोक आपल्या उच्च शिक्षणासाठी साऱ्या जगातील ज्ञान घेऊ लागले.त्यांनी साऱ्या जगाचे जणू विद्यापीठच बनविले ! चिनी लोकांपासून ते छापण्याची कला व कागदांचा उपयोग शिकले,अरबांपासून बीजगणित व वैद्यक शिकले व प्राचीन ग्रीकांपासून तत्त्वज्ञान व काव्य शिकले.प्राचीन लोकांचे देव पुन्हा एकदा मानवात वावरायला लागले,मानवांशी हसायला,खेळायला व बोलायला आले.पुढच्या जन्मातील सुखासाठी अनिश्चित अशा भविष्य काळातील सुखासाठी ताटकळत बसण्यापेक्षा या जगातच प्रत्यक्ष सुख कसे मिळवावे,हे ते सांगू लागले.बहुतेक इतिहासात नवयुगाचे हे अशा अर्थाचे चित्र बहुधा आढळते व ते फारसे खोटे असते असेही नाही;पण ते अपुरे असते. झोपी गेलेल्या युरोपीय हृदयांत प्राचीनांचे ज्ञान-विज्ञान पुन्हा जिवंत झाले,एवढाच नवयुगाचा अर्थ नव्हता.नवयुग हे त्रिविध बंड होते;१.अज्ञानाविरुद्ध,२.असहिष्णुतेविरुद्ध,

३.छळ व जुलूम यांविरुद्ध अज्ञानाविरुद्ध बंडाचा झेंडा पेटार्क नामक पंडिताने उचलला; असहिष्णुतेविरुद्ध झेंडा धर्मोपदेशक जोहान्स हस याने उचलला;छळ व जुलूम यांविरुद्ध झेंडा प्रसिद्ध चळवळ्या जॉन बॉल याने उचलला.या तिघांचे जीवन थोडक्यात पाहू या.नवयुग या नावाने ज्ञात असलेल्या क्रांतीमध्ये जे तीन प्रवाह होते,ते या तिघांनी उचलून घेतले होते.


डान्टे मरण पावला.तेव्हा पेट्रार्क तेरा वर्षांचा होता.त्याचे पूर्ण नाव फॅन्सिस पेटार्क १३०४ मध्ये अरेझ्झी गावी त्याचा जन्म झाला.त्याचा बाप फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित नागरिक होता, पण त्याला तिथे हद्दपार करून ठेवण्यात आले होते.ज्या अल्पसंख्य पक्षाला मागाहून डान्टे मिळाला,त्याच पक्षाचा पेटार्कचा बापही होता; वयाच्या पंधराव्या वर्षी पेटार्कला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधील माँटपेलियर विद्यापीठात घालण्यात आले.

कायद्याकडे त्याच्या मनाचा ओढा नव्हता;पण बापाचा धंदा पुढे चालविण्यासाठी तो कायदेपंडित होणार होता. तो इतर वाचन करी,काव्य करी.त्याने लॅटिनचा सांगोपांग अभ्यास केला होता;पण तत्कालीन युरोपियन विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही ग्रीकचा गंधसुद्धा नव्हता.१३२६ साली त्याचा बाप वारला,तेव्हा तो ॲव्हिगनॉन येथे धर्मोपदेशक झाला.१३२७ सालच्या एप्रिलच्या सहाव्या तारखेस ॲव्हिगनॉनमधील एका चर्चमध्ये लॉरा नावाच्या तरुणीशी त्याची गाठ पडली,त्या वेळी तो तेवीस वर्षांचा हवा.लॉराचे लग्न झालेले होते. या तरुण कवीकडे - पेट्रार्ककडे तिचे मन आकर्षिला होते.ती त्याच्या भावना व वासना चेतवी,उचंबळवी,पेटवी; पण ती त्याला स्वतःच्या अधिक जवळ येऊ देत नसे.ती त्याला दुरून-दुरूनच खेळवी.त्यांची पहिली भेट झाली, त्या क्षणापासून लॉराने पेट्रार्कच्या मनावर व प्रतिभेवर सत्ता मिळविली.ती त्याच्या काव्याची स्वामिनी होती.त्याच्या सुनीतांमुळे ती अमर झाली आहे.नवयुगातील अत्यंत मनोहारिणी स्त्री म्हणून ती ओळखली जाते.चौदाव्या शतकातील या भावनाशून्य सुंदरीच्या सन्मानार्थ भावनाप्रधान तरुण आजपर्यंत भावनोत्कट काव्याच्या राशी निर्माण करीत आले आहेत.लॉराने जरी पेट्रार्कचे मन सर्वस्वी व्यापिले होते,तरी इतर स्त्रियांच्या बाबतीतही तो काही आंधळा नव्हता.

त्याला त्याच्या एका पूजकाने एक बेवारशी मूल अर्पण केले.दुसऱ्या एकाने एक बेवारशी मुलगी दिली व पोपच्या खास फर्मानाने पुढे ही मुले कायदेशीर मानली गेली.पेट्रार्क ॲव्हिगनॉन येथे १३३३ पर्यंत राहिला.नंतर तो प्राचीन काळातील सौंदर्य मिळविण्यासाठी आपल्या पहिल्या दीर्घ यात्रेवर निघाला.विनवुड रीड आपल्या ग्रंथात म्हणतो, "त्याने ग्रंथ धुंडाळण्याचे युग सुरू केले."पॅरिस,घेट,

लीज,कोलेन,रोम इत्यादी शहरी तो गेला.त्याने जुने हस्तलिखित लॅटिन ग्रंथ शोधून काढले व त्याच्या नकला करून घेऊन ते जुने ज्ञान व ते प्राचीन विचार त्याने आत्मसात करून घेतले.मॅटरजिकच्या 'निळा पक्षी' या पुस्तकात दोन जिज्ञासू भावंडांचे मृत बंधू जिवंत होतात. 


त्याप्रमाणे लॅटिन वाङ्मयातील प्राचीन वागीश्वर पेट्रार्कच्या स्मृतीचा जादूचा स्पर्श होताच जणू पुन्हा जिवंत झाले ! पेट्रार्कने सिसरो व सेनेका यांना पत्रे लिहिली;जणू ते त्याचे समकालीनच होते! शेकडो शतके ओलांडून तो आपल्या सहानुभूतिपूर्ण दृष्टीने त्यांना भेटला, त्यांच्याबरोबर त्यांच्याच भाषेत बोलला,त्यांचेच वाक्य सांप्रदाय वापरू लागला.जरी तो कॅथॉलिक चर्चचा धर्मनिष्ठ पुत्र होता,तरी तो प्राचीन ज्ञानमंदिराचा व प्राचीन धर्माचाही चाहता व उद्गता बनला.ईश्वराच्या तोंडावरील मध्ययुगीन बुरखा दूर करून त्याने ख्रिस्त केवळ दुःखमूर्ती नसून आनंदमूर्तीही आहे असे दाखवून युरोपला चकित केले. दुःखमूर्ती ख्रिस्त म्हणजे हास्यमूर्ती व विनोदमूर्ती बँकसचा जुळा भाऊ असे त्याने दाखविले.सौंदर्यासाठी ही भूतकाळातील यात्रा करण्यात पेट्रार्कची बरीच वर्षे गेली.नंतर तो लोकांपासून दूर अशा व्हॉक्लूज येथील भव्य व भीषण पर्वतांमधील एका दरीत घर करून राहिला व तिथे त्याने आपले शेष आयुष्य अत्यंत शांतपणे घालविले,प्राचीनांच्या काव्याचा अभ्यास केला आणि संगीत व नादमाधुर्य हे त्यांचे गुण आपल्या काव्यात आणले.वाङ्मयात त्याने एक नवीनच तार छेडली व मध्ययुगीन विचाराच्या छंदाला एक नवीन,तेजस्वी आणि उत्कट जोड दिली.मरण वा नरकयातना या विषयीच काव्ये करीत बसण्याऐवजी तो जीवनाविषयी व प्रेमाच्या आनंदाविषयी लिहू लागला.

झोपून उठल्याप्रमाणे जग त्याची ही गीते ऐकू लागले व टाळ्या वाजवून त्याची वाहवा करू लागले. पेट्रार्क जरी अवलियासारखा - संन्याशासारखा राहत होता, तरीही त्याला ही स्तुती आवडली नाही,असे नाही.ही स्तुती लाभावी म्हणून त्याने खटपट केली,प्रयत्न केले.तो सर्व प्रकारच्या संगीताचा भोक्ता होता.टाळ्यांचे तद्वतच स्तुती करणाऱ्या जिभेचेही संगीत त्याला आवडे.आपल्या लिखाणात जरी तो अधिकाऱ्यांची टिंगल करी, तरी प्रत्यक्ष वागताना मात्र तो त्यांच्याशी सौम्यपणानेच नव्हे;तर जरा आदबीनेही वागे. अधिकारीही त्याच्या साहित्यिक टिंगलीबद्दल स्मित करीत;पण खासगी वागणुकीत तो नमून वागे,म्हणून ते त्याचा मानसन्मान व उदोउदो करीत,पेट्रार्कचा देह,तसाच आत्मा कॅथॉलिक चर्चच्या प्रेमळ व वत्सल बाहुपाशात सुरक्षित असेतोपर्यंत त्याचे मन प्राचीनांच्या पुष्पवाटिकेत हिंडत-फिरत राहिले तरी चिंता नाही, असे ते अधिकारी म्हणत.त्याची ज्ञानाची तहान व रोमन वाङ्मयावरील त्याची उत्कट प्रीती या गोष्टी वगळल्या,तर पेट्रार्क धोकेबाज नव्हता. 


तो सनातनी,समतोल वृत्तीचा व शहाणा गृहस्थ होता.तो इतका साळसूद व भरवसा ठेवण्यालायक गृहस्थ होता की,तो काही वेडेवाकडे करील अशी कोणाला शंकाही येण्याची शक्यता नव्हती.पॅरिसच्या विद्यापीठाने त्याला प्राध्यापक म्हणून बोलाविले;पण नेपल्सचा राजा रॉबर्ट याच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमाला गुंफण्यासाठी आलेले आमंत्रण त्याला अधिक महत्त्वाचे वाटले. 


विद्यापीठातल्यापेक्षा प्रासादातला मानसन्मान त्याला अधिक आकर्षक वाटला.नेपल्सच्या वाटेवर रोम शहरी त्याचे सार्वजनिक स्वागत करण्यात आले.त्याला विजयमाला अर्पण करण्यात आली.श्रेष्ठतम कवी म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.तो अर्वाचीन जगातील पहिला राजकवी होय.


त्याच्या आयुष्यातील शेवटच्या भागात तर त्याच्यावर मानसन्मानाची नुसती वृष्टी झाली! परंतु या काळात त्याच्या वाट्यास दुःखेही आली. इ.स.१३४८मध्ये त्याची स्फूर्तिदेवता लॉराही मेली.युरोपातील काळ्या प्लेगने तिचा बळी घेतला.प्लेगने सर्वत्र कहर उडविला होता.थोड्या वर्षांनी याच रोगाला त्याचा एकुलता एक मुलगाही बळी पडला.याच साथीत त्याचे काही जिवाभावाचे मित्रही मेले.तो पुन्हा एकदा पुस्तकात शिरला;त्याने वाङ्मयात बुडी मारली.तो असा एक आश्रम काढू इच्छित होता की,तिथे ख्रिश्चन धर्मातील ज्ञानवैराग्यांबरोबरच प्राचीन काळातील मुक्त विचार व मोकळी संस्कृती यांची ही पूजा - अर्चा व्हावी; प्राचीन धर्म व ख्रिस्ती धर्म दोन्ही तिथे भेट व एकत्र नांद शकावेत.पण हे स्वप्न अशक्य आहे असे त्याला आढळून आले व त्याने तो नाद सोडून दिला.त्यावेळेस जगभर क्रांतिकारक वारे वाहू लागले होते.थोडावेळ पेट्रार्कही या क्रांतीच्या वातचक्रात सापडला,पण थोड्याशा अनुभवानंतर तो क्रांतीच्या लाटातून बाहेर पडला.त्याचा आत्मा प्रत्यक्ष सृष्टीत, आसपासच्या प्रत्यक्ष जीवनात रमत नसे; तर काव्यात रमत असे,वाङ्मयात विहरत असे.१३७४ च्या १८ जुलैला तो मरण पावला.मरताना त्याने आपले पवित्र मस्तक एका पुस्तकाच्या उशीवर ठेवले होते.


जोहान्स हस - पेट्रार्कचे नवयुग म्हणजे शाब्दिक क्रांती होती.त्याने रोमन वाङ्मय उजेडात आणले व त्याच्या अनुयायांनी ग्रीक साहित्य उजेडात आणले.चिनी लोकांची छापण्याची कला युरोपात वाढत होती.जर्मनीत गुटेम्बर्ग व हॉलंडमध्ये कोस्टर यांनी या कलेत शोध लावले.पुस्तके छापली जाऊ लागली,मृत भूतकाळ सजीव होऊ लागला,

पुस्तकांचा प्रसार होऊ लागल्यामुळे ज्ञान बहुजन समाजात जाऊ लागले.युरोपला आपल्या थोर साहित्यिक वारशाची जाणीव झाली. 


मध्ययुग रानटी युद्धात गुंतलेले होते.युद्धात गुंतलेल्या जगाला वाचण्याची सात्विक व सांस्कृतिक करमणूक लाभली.तलवार बाजूस ठेवून पुस्तक हातात घ्यावयास मानवजात प्रथमच शिकत होती.


नवयुगाची ही पहिली स्थिती.अज्ञानाविरुद्ध बंड ही नवयुगातील पहिली महत्त्वाची गोष्ट,दुसरी स्थिती म्हणजे असहिष्णुतेविरुद्ध बंड येथे शब्दांशी तितकेसे काम नसून प्रत्यक्ष कृतीशी काम होते.मध्ययुगातील असहिष्णू धर्मवेडेपणाविरुद्ध बंड उभारण्यामधील अग्रेसर वीर म्हणून जोहान्स हस याचा गौरव केला पाहिजे.हस हा बोहेमियन होता.तो प्रेगच्या विद्यापीठात प्राध्यापक होता.त्याला चर्चचे ठरीव विधिनिषेध पचेनात.

बायबलमधील शब्द न् शब्द तो विश्वासार्ह मानीत नसे.त्याचा ख्रिस्ताच्या शिकवणीवर विश्वास होता,पण बायबलमधील चमत्कारांचा काही उपयोग नाही,असे तो म्हणे. तो भटांभिक्षुकांच्या विरुद्ध होता.मधल्या उपाध्यायांच्या लुडबुडीशिवायही ईश्वर भक्तांच्या प्रार्थना समजू शकतो,असे तो म्हणे.पोपांच्या थाटमाटावर तद्वतच चर्चच्या उद्धटपणावर व धर्मांधतेवर तो टीका करी.तो जॉन वुक्लिफचा मित्र व अनुयायी होता.जॉन वुक्लिफने लॅटिनमधील बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले होते.चर्चने सांगितलेला अर्थ डोळे मिटून ऐकण्याऐवजी मित्र जनतेने बायबल स्वतः वाचून पाहावे म्हणून त्याने त्याचा इंग्रजीत अनुवाद केला होता.पदद‌लितांच्या हक्कांसाठी तो झगडे, त्या काळात युरोपातील भूमीपैकी तिसरा हिस्सा जमीन चर्चच्या मालकीची होती.ही सारी जमीन शेतकऱ्यांस परत दिली जावी असे हस म्हणे.आद्य ख्रिश्चन लोकांतले बंधुभाव व साम्यवाद पुन्हा येऊ देत,असे तो उपदेशी.थोडक्यात बोलायचे तर जोहान्स हा यथार्थपणे ख्रिश्चन होऊ पाहत होता.यामुळे संघटित चर्च त्याला शत्रू मानू लागले व चर्चचे अधिकारी त्याला पाण्यात पाहू लागले. इ.स. १४१२ मध्ये आर्चबिशपने जॉन वुक्लिफची दोनशे पुस्तके जाळून टाकली व हसला धर्मबाह्य केले.त्याने सारे प्रेग शहरच जणू कायदेबाह्य ठरविले.पण हस डगमगला नाही. आपले काम हाती घेऊन तो पुढे जात होता.त्या वेळी रोमन कॅथॉलिक चर्चचे दोन पोप असत. एक रोम येथे व दुसरा ॲव्हिगनॉन येथे. कॅथॉलिक धर्माला दुहीचा रोग मधूनमधून जडत असे,तसाच रोग या वेळेस जडला होता.असे तट पडल्यामुळे पृथ्वीवर ईश्वराचा एक प्रतिनिधी असण्याऐवजी दोन प्रतिनिधी झाले.वेल्स लिहितो,"प्रत्येक जण आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अनुयायांना शाप देई,त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाल्यास सारेच जणू नरकाचे धनी झाले। !"


इ.स.१४१५ मध्ये कॉन्स्टन्स येथे धर्मोपाध्यायांचा मेळावा जमला.चर्चमधली दुही मिटावी म्हणून ही परिषद भरली होती.या परिषदेसाठी हसलाही आमंत्रण देण्यात आले होते.


या लेखातील पुढील भाग…०५.०६.२४ या लेखामध्ये…!







१/६/२४

जंगलाचा शिष्टाचार..! Etiquette of the jungle..!

जंगलांमध्ये एक अलिखित शिष्टाचार असतो.यामध्ये झाडांच्या पेहराव आणि वागणुकीच्या नियमसूची असतात.या नियमांप्रमाणे सगळ्या झाडांना आपला पोशाख आणि सर्वमान्य वागणूक ठेवावी लागते.एक प्रगल्भ,चांगली वर्तणूक असणारा पानझडी वृक्ष असा दिसतो,


त्याचा बुंधा सरळसोट आकाशाकडे झेपलेला असतो आणि त्यांच्या लाकडी तंतूंची मांडणी नियमित व शिस्तबद्ध असते.मूळ सर्व दिशेला सारखीच पसरलेली असतात आणि झाडाखालीच जमिनीत गेलेली असतात. तरुणपणी झाडाच्या फांद्या बुंध्यापासून आडव्या पसरलेल्या आणि आखूड असतात. त्या फांद्या आज वठून गेलेल्या असतात.

त्या जागेवर लाकूड आणि साल धरलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रौढ झाडाचा बुंधा उंच आणि नितळ दिसू लागतो.झाडाच्या वरच्या भागात नजर टाकली तर त्याची प्रमाणबद्ध वाढ झालेली छत्री दिसते.

वरच्या भागातल्या फांद्या आकाशाच्या दिशेने वाढत असतात. असं वाटतं की झाड आभाळाकडे साकडं मागत आहे.अशाप्रकारे प्रमाणबद्ध वाढ झालेल्या झाडाला दीर्घायू लाभू शकतं. जंगलातल्या सूचीपर्णी वृक्षांनाही हाच शिष्टाचार लागू असतो पण त्यांच्या वरच्या भागातल्या फांद्या साधारण जमिनीला समांतर असतात किंवा जराशा जमिनीकडे वळलेल्या असतात.पण या सगळ्यांचं काय प्रयोजन असेल ? झाडाला सौंदर्याची जाण असेल की काय? ते मला नक्की सांगता येणार नाही पण एक मात्र निश्चित की अशा प्रकारच्या आदर्श वाढीमुळे झाडाला स्थिरता मिळते.प्रत्येक विशालवृक्षाच्या छत्रीला वादळी वारे,अफाट पाऊस आणि बर्फाचे वजन अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं.अशा परिस्थितीत उन्मळून पडू नये म्हणून झाडाला मुळांचा भक्कम आधार असावा लागतो.त्यासाठी मुळं जमिनीला आणि दगडांना घट्ट पकडून ठेवतात.पण शेंड्याला तीव्र फटका लागला की तो बुंध्यातून खालपर्यंत पोहोचतो.


काही वेळा याची तीव्रता २२० टनाहून जास्त असू शकते.बुंध्यात कुठेही कमकुवत भाग असला तर तिथे झाड मोडू शकते.पण प्रमाणबद्ध वाढीच्या झाडांना हा फटका सहन करता येतो कारण त्यांच्या शरीरातून धक्क्याचा प्रवाह समान होतो आणि कोणत्याही एका भागाला जास्त धक्का लागत नाही.


जी झाडं त्यांचा अलिखित शिष्टाचार पाळत नाहीत त्यांना मात्र धोका असतो. 


उदाहरणार्थ,एखाद्याचं खोड वाकलेलं असेल तर त्याला साधं उभं राहायलाही त्रास होतो. त्याच्या छत्रीचं वजन बुंध्याकडून समप्रमाणात पेललं जात नाही आणि झाड एका बाजूला झुकतं.त्या बाजूने झाड पडू नये यासाठी त्याला तिथल्या लाकडाची अधिक वाढ करावी लागते.ही वाढ यातल्या वाढीच्या वर्तुळांमध्ये गडद रंगाची दिसते.इथे हवा कमी असते आणि लाकडाची घनता अधिक असते.दुपाखी बुंधा असलेल्या झाडांना तर अधिक धोका असतो.फाटा बनत असताना जणू दोन बुंदे एकत्र वाढत असल्याचा भार झाडावर पडतो.दोन्ही बुंधे आपल्या फांद्या आणि छत्री वाढविण्यात व्यस्त असतात. वादळी वाऱ्यामध्ये दोन्ही बुंधे वेगळ्या दिशेने हलतात आणि झाडाच्या मुख्य बुंध्यावर प्रचंड ताण पडतो.जर फाटा इंग्रजी u अक्षरासारखा असेल तर फार धोका नसतो. पण जर का झाडाचा फाटा अक्षरासारखा असला तर मात्र वादळात झाडावर मोठं संकट येऊ शकतं.हा फाटा सर्वांत कमकुवत जागेवर,म्हणजेच त्याच्या जोडापाशी मोडू शकतो.आणि जर असं झालं तर त्याचा झाडावर प्रचंड ताण पडतो.तुटलेल्या भागावर झाड लगेच लाकूड आणि सालाची वाढ सुरू करतात.पण हे नेहमीच यशस्वी होत नाही.त्याच्या आधी किटाणूंची लागवड झाली की जखमेतून काळं द्रव्य बाहेर येत राहतं.पण त्याहून वाईट म्हणजे तुटलेल्या फाट्यामध्ये पाणी साठून राहतं आणि बुंध्यात जाऊ लागतं.काही काळातच बुंधा तुटून जातो आणि झाड अधिकच अस्थिर होतं.असं झाड फारफार तर एक-दोन दशकं जिवंत राहतं कारण कधी भरून न आलेल्या या जखमेवर सूक्ष्म किटाणूंचं सतत आक्रमण चालूच असतं.जंगलातली काही झाडं तर शिष्टाचाराच्या पूर्ण विरोधातच वागतात.


झाडाच्या इतर भागाने कष्टाने सरळसोट वाढ केल्यानंतरही त्याच्या काही फांद्या केळी सारख्या बाहेर येतात.काही वेळा जंगलाचा एक भाग शिष्टाचार पाळत नाही.याला काय म्हणावं? हा भाग निसर्गाचे नियम धाब्यावर टाकतोय की काय? नक्कीच नाही! कारण हे निसर्गाचं प्रयोजन असतं,ज्यामुळे काही झाडांत अशी वाढ होते.


उदाहरणार्थ,एका विशिष्ट उंचीनंतर डोंगरावर झाड दिसत नाहीत.तिथल्या तीव्र उतारावर वाढणारी झाडंही अशाच प्रकारे शिष्टाचार न पाळून बंडखोरी करतात.या उंचीवर थंडीत बर्फाचे ढीग रचले जातात.

ते अस्थिर असतात कारण उतारावरून अगदी संथ गतीने ते खाली सरकत असतात.हे मोठे ढिगारे जेव्हा सरकतात तेव्हा रोपटी आणि लहान झाडं त्यांच्यामुळे वाकली जातात, तरीही झाडं मरत नाहीत.पण दहा-एक फूट वाढलेल्या झाडांची खोडं मात्र दुखावली जातात.काही वेळेला खोड तुटून जातं.जी तुटत नाहीत ती खोडं तिरकस राहतात. झाडाची वाढ वरच्या टोकातून होत असल्यामुळे वर वाढणारं खोड सरळ आकाशाकडे जाऊ लागतं आणि खालचा भाग मात्र वाकडाच राहतो.बर्फाचा जोर काही वर्ष असाच सुरू राहिला तर झाडाचं खोड एखाद्या तलवारीसारखं वक्राकार दिसू लागतं.काही वर्षांनी जेव्हा खोड धष्टपुष्ट होतं त्यानंतर मात्र बर्फाचा लोड त्याला सावरता येतो पण तोपर्यंत बुंध्याचा खालचा भाग तलवारी सारखाच असतो आणि वरचा मात्र सरळसोट.बर्फ नसलेल्या डोंगर उतारावरच्या झाडांनाही अशाच प्रकारचा ताण पडू शकतो.इथे मातीच काही वेळा खाली सरकत असते.यामुळे झाडं थोडी खाली सरकतात आणि तशीच सरळ आकाशाकडे वाढू लागतात.अशी खूप बदल झालेली झाडं अलास्का आणि सायबेरियात दिसतात. 


जागतिक तापमान वाढीमुळे इथला बर्फ वितळत आहे.इथली माती भुसभुशीत असल्यामुळे झाडं अस्थिर होतात.प्रत्येक झाड वेगळ्या दिशेला ढकललं गेलं असल्यामुळे इथली जंगलं कशीही वाढलेली दिसतात.शास्त्रज्ञ यांना 'दारूडी जंगलं' म्हणतात.

जंगलाच्या कडेला वाढणाऱ्या झाडांसाठी मात्र नियम थोडे शिथिल केलेले असतात.इथे सूर्यप्रकाश बाजूनेही येऊ शकतो.कारण शेजारी मोकळी जागा किंवा एखादा तलाव असतो जिथं झाडांनी सूर्यप्रकाश अडलेला नसतो. 


छोट्या झाडांना आणि रोपट्यांना त्या दिशेने वाढता येतं.पानझडी वृक्ष याचा नक्कीच फायदा करून घेतात.जर आपल्या मुख्य खोडाची वाढ जमिनीला जवळजवळ समांतर केली तर त्यांना आपला पसारा तीस फुटांपर्यंत वाढवता येतो.अर्थातच जोरदार बर्फवृष्टीमध्ये फांद्या मोडण्याची त्यांना भीती असतेच.

कारण फांद्यांच्या टोकाला बर्फाचं वजन पडतं आणि फांदीचा तरफा होऊन तुटण्याची शक्यता वाढते.

तरीही अल्पायुषी असूनही सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेमुळे आपली प्रजा वाढवणं झाडाला शक्य होतं.पानझडी वृक्ष जसे सूर्यप्रकाशाकडे झेप घेतात तसे मात्र सूचीपर्णी वृक्ष अजिबात करत नाहीत.

त्यांची वाढ सरळ तरी होते नाहीतर खुंटलेली राहते.

गुरुत्वाकर्षणाच्या विरोधातच त्यांची वाढ चालू असते.त्यामुळे मोठी झाडं सरळसोट वाढतात आणि स्थिरावतात.त्यांच्या काही फांद्या जमिनीला समांतर फक्त जाणवतील किंवा दिसतील एवढ्याच जाडीचे बुंधे घेऊन पसरलेले असतात,सूर्यप्रकाश शोधण्याच्या प्रयत्नात ! पण त्यांना तेवढीच काय ती परवानगी असते.याचा अपवाद म्हणजे पाईन झाड. आपला सगळा घेर ते बेफिकिरीने सूर्यप्रकाशाकडे वाढवतात.

कदाचित त्यामुळेच सूचीपर्णी जंगलात पाईनची झाडं सर्वाधिक तुटलेली दिसतात.


१७.०३.२४ या लेखातील पुढील लेख...



..मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) माझ्यासाठी सावलीचं झाडं..!