०१.०६.२४ या भागातील पुढील शेवटचा भाग..
तुम्ही या व पोप,सम्राट,तेवीस कार्डिनल्स, तेहतीस आर्चबिशप,दीडसे अँबट व चर्चची सुधारणा करण्यासाठी येणार असलेले शंभरावर ड्यूक व राजेरजवाडे वगैरेंना आपली मते समजावून सांगा.असे हसला कळविण्यात आले होते व तुम्ही याल तर तुमच्या सुरक्षिततेची हमी आम्ही घेतो.असेही आश्वासन त्याला देण्यात आले होते.
अशक्त,हाडकुळा,आजारी हस तिथे जाताच वचन मोडून त्याला पकडण्यात आले व नास्तिक म्हणून जिवंत जाळण्यात आले! हे दुष्ट कृत्य केल्यानंतर हे जमलेल्या कौन्सिलने जॉन वुक्लिफची हाडे उकरून काढून जाहीररीत्या जाळून टाकली! वेल्स लिहितो,"हे पापी,नीच कृत्य एखाद्या विक्षिप्त धर्मवेड्या पीराने केले नव्हते;तर अधिकृतरीत्या चर्चने केले होते."
हसच्या मरणानंतर पाच वर्षांनी पोप पाचवा मार्टिन याने वटहुकूम काढला की,सारे हसवाले, वुक्लिवाले व बोहेमियांतील नास्तिक नष्ट केले जावेत.क्रूसेड्स्वरून परत आलेल्यांनी पोपचे हे फर्मान वाचताच ठिकठिकाणी त्याची अंमलबजावणी केली.सर्वांच्या कत्तली झाल्या; पण हसचे विचार मारले गेले नाहीत.
पेट्रार्क हा नवयुगातील साहित्यिक जागृतीचा प्रतिनिधी होता,जोहान्स हस हा धार्मिक जागृतीचा प्रतिनिधी होता व जॉन बॉल हा सामाजिक जागृतीचा प्रतिनिधी होता.
मध्ययुगाच्या अंती ही सारी पृथ्वी ओसाड झाली होती.
सर्वत्र विध्वंस व विनाश दिसून येत होते. क्रूसेड्सच्या युद्धांतून दुष्काळ व साथी यांचा उद्भव झाला.युद्धातून शेवटी सर्वत्रच रोग फैलावतात.मागील महायुद्धातही ही गोष्ट अनुभवास आली होती.क्रूसेड्समधून 'काळा मृत्यू' म्हणून एक भयंकर रोग सर्वत्र फैलावला. एका युरोपातच या रोगाने जवळजवळ दीड कोटी लोकांचा बळी घेतला! सर्वच मानवजातीचे उच्चाटन होणार असे दिसू लागले. या मरणांतिक साथीने लोकांचे डोळे उघडले व ते जीवनाच्या मूल्यांचा फेरविचार करू लागले. आपण ज्या मार्गांनी जात आहोत ते भले आहेत की बुरे आहेत,याची चिकित्सा ते करू लागले. मागील महायुद्धानंतर आपणही अशाच प्रकारे विचार करू लागलो होतो.आपले पुढारी,आपले राजेमहाराजे वगैरे ज्या रीतीने जात आहेत,त्यात कितपत अर्थ आहे,याची परीक्षा लोक करू लागले.युद्धे व साथी यांमुळे सर्वांहून अधिक धक्का जर कोणास बसला असेल तर तो शेतकऱ्यांना हे शेतकरी ठायी ठायी बंड करून उठले.ज्यांनी त्यांना निव्वळ पशुसम स्थितीत डांबून ठेवले होते त्यांच्या सत्तेविरुद्ध ते बंड करून उठले.त्या काळ्या आजाराने लाखो लोकांचे बळी घेतल्यामुळे मजूर भरपूर मिळेनासे झाले.ॲबट,बिशप व इतर जमीनदार यांचे अर्थशास्त्रविषयक अज्ञान जसे अपरंपार होते, तसाच त्यांचा स्वार्थही अपरंपार होता.
शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी दुप्पट काम करावे असे जुलमी कायदे या प्रतिष्ठित वर्गांनी केले.काम वाढले,पण मजुरीत मात्र वाढ झाली नाही! आणि दुःखांवर डागणी म्हणूनच की काय कामगारांनी वा मजुरांनी स्वसंरक्षणार्थ संघटना करता कामा नयेत,असेही कायदे केले गेले. चांगली नोकरी शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्यासही त्यांना कायद्याने बंदी करण्यात आली.हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता.या सर्व जुलमांमुळे शेतकरी व कामकरी साहजिकच बंडास प्रवृत्त झाले.ही इतिहासातील एक नवीनच गोष्ट होती.समाजातील जे अन्याय व ज्या विषमता दैवायत्त व देवेच्छित म्हणून अनिर्बंध चालत आल्या होत्या,ज्याविरुद्ध कोणी ब्रही काढीत नसे,
त्याविरुद्ध सारी पददलित जनता गर्जना करून उठली.दारिद्र्य,दैन्य,दुष्काळ,रोग,उपासमार,मरण,
शक्तीबाहेर काम,या सर्वांविरुद्ध श्रमजीवी जनता निर्भयपणे गर्जना करून भिंतीस पाठ लावून उभी राहिली.वस्तुतः हे नवदर्शन होते.पण सनातनी वृत्तीचा फ्रॉइसार्ट राजा-महाराजांची व पोपबिशपांची बाजू घेऊन लिहितो की,जनता बंड करून उठली कारण ती सुखवस्तू होती म्हणून ! भरपूर खायला-प्यायला मिळत होते,म्हणून ही बंडाची शक्ती ! शेतकऱ्यांचे बंड प्रथम फ्रान्समध्ये पेटले.पुढे चारशे वर्षांनी झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची हे बंड ही एक आगाऊ सूचनाच होती म्हणा ना !
फ्रान्समधील बंडाच्या ज्वाला इंग्लंडात आल्या. केंट परगण्यातील जनतेला जॉन बॉल याने समतेचे तत्त्व उपदेशिले.फ्रॉइसार्ट,जॉन बॉल याचे हे धाडस पाहून चकित होतो.जॉन बॉल याची त्याला जणू गंमत वाटते.तो त्याला 'कॅटमधील वेडा धर्मोपदेशक' असे संबोधितो.
त्याच्या प्रवचनाला बहुजन समाजातील पुढील सूत्राचा आधार असे : जेव्हा ॲडम काम करी आणि ईव्ह सूत कातत असे,तेव्हा प्रतिष्ठित वा सभ्य गृहस्थ होता का कोणी? काही लोक ईश्वराच्या कृपेनेच दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्यासाठी जन्माला येतात.असल्या चावट मतांची तो हुर्रवडी उडवी व शेतकऱ्यांस सांगे की,हा सारा फालतू पसारा आहे,अन्यायी व जुलमी लोकांचा हा पापमूलक अनाचार आहे.तो म्हणे,"बंधूंनो,जोपर्यंत आपण सारी संपत्ती सारखी विभागून घेत नाही,सर्वांस सारखे अन्नवस्त्र वाटून देत नाही,मिळेल ते सर्व सारे मिळून जोपर्यंत सारखे उपभोगीत नाही, तोपर्यंत जगात श्रीमंत-गरीब,मालक-मजूर असे भेद राहणारच.ज्यांना आपण लॉर्ड म्हणतो, त्यांच्यात आपणा सामान्य लोकांहून विशेष असे काय आहे? त्यांना का म्हणून मोठे मानायचे? त्यांची कोणती श्रेष्ठता? कोणती लायकी? ते आपणास दास्यात का ठेवतात? ते स्वामी का? व आपण त्यांची हीन-दीन कुळे का? आपण सारेच ॲडम व ईव्ह यांपासून जन्मलो,
तर 'आम्हीच श्रेष्ठ' असे हे कोणत्या तोंडाने म्हणतात? यांचा मोठेपणा एकच आहे व तो म्हणजे ते तुम्हा-आम्हास राबायला लावतात. त्यांना चैन करण्यासाठी जे जे लागते,
ते सारे आपण निर्माण करतो व ते बेटे गाद्यांवर बसून गर्वाने सारे भोगतात.ते गरम कपडे घालतात, मलमलीचे व लोकरीचे सुंदर कपडे वापरतात, पण आपल्या अंगावर मात्र चिंध्या ! त्यांना प्यावयास उंची मद्ये,खायला छानदार भाकरी, नाना भाज्या,नाना मसाले ! आणि आपणास मात्र साधी भाकर! आपण चंद्रमौळी झोपड्यांत राहतो,पेंढ्यावर निजतो,साधे पाणी पितो,तर त्यांना राहण्यास सुंदर घरे व भरपूर आराम! आपणास पावसापाण्यात व थंडी-वाऱ्यात शेतात राबावे लागते,हाल व कष्ट आपल्या कपाळी! हे बडे लोक जी ऐट व जे वैभव दाखवितात त्यांचा जन्म तुमच्या-आमच्या श्रमांतूनच होतो."
चौदाव्या शतकाच्या मध्याला उच्चारलेले हे क्रांतिकारक शब्द जणू काय मार्क्सचे, एंजल्सचे किंवा यूजेन डेब्सचेच आहेत असे वाटते.
जॉन बॉल जे सांगत होता ते लोकांना,विशेषतः वरिष्ठ वर्गातील लोकांना,जरी विचित्र वाटे,तरी त्यात खरोखर विचित्र असे काहीच नव्हते. ख्रिस्ताची शिकवणच तो जणू पुन्हा नव्याने सांगत होता.पण ती खरी ख्रिस्ताची शिकवण ऐकून कैंटरबरीचा आर्चबिशप दातओठ खाऊ लागला,तो अत्यंत संतप्त झाला.युरोपातील एक तृतीयांश जमीन चर्चच्या मालकीची होती,जॉन बॉल ख्रिस्ताची शिकवण शिकवू लागल्यापासून पाच वर्षांनी,म्हणजे इ.स.१३६६ मध्ये त्याला धर्मबाह्य ठरविण्यात आले.त्याचे प्रवचन या व्याख्यान कोणाही इंग्रजाने ऐकू नये असे फर्मान काढले गेले.पण त्या वटहुकूमामुळे जॉन बॉल डगमगला नाही,
शेतकरीही घाबरले नाहीत.त्याने आणखी पंधरा वर्षे आपली चळवळ सुरूच ठेवली.शेवटी,१३८१ मध्ये त्याला अटक करून मेडस्टन येथील तुरुंगात ठेवण्यात आले.
पण या वेळपर्यंत शेतकरी चांगलेच उठले होते.ते चांगलेच जागृत झाले होते.त्यांनी तुरुंग फोडला व आपल्या पुढाऱ्यास वाचविले,जॉन बॉलने पुन्हा आपले काम सुरू केले.तो पुन्हा गिरफ्तार केला गेला.१३८१ च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस बड्या सरदार वर्गाच्या लोकांसमक्ष त्याला फाशी देण्यात आले.त्याची ती शिक्षा पाहण्यास दुसरा रिचर्ड राजाही हजर होता.
शेतकरी व कामकरी यांचे बंड तात्पुरते शमले; पण पुढे ते फ्रान्समध्ये,जर्मनीत बोहेमियांत तसेच रशियातही पेटले.हे पुस्तक लिहिण्यात येत असता ते चीनमध्येही पेटत आहे.जॉन बॉलचे बंड म्हणजे मानवजातीच्या इतिहासातला एक नवीनच म्हणजे नवयुगाचा,नवक्रांतीचा प्रारंभ होता.तो श्रमजीवी व कामगार वर्गाच्या पुरस्काराच्या युगाचा प्रारंभ होता.ऐतिहासिक चळवळीची बीजे रुजण्यास,वाढण्यास व फोफावण्यास बराच काळ लागतो.जॉन बॉल याने पेरलेली बीजे आज विसाव्या शतकात मूळ धरू लागली आहेत,असे दिसत आहे.
मानवजातीची कथा हेन्री थॉमस, अनुवाद-सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन
मानवजात संस्कृतीच्या मार्गावर एक पाऊल टाकायला कधीकधी कित्येक शतके घेते. चौदाव्या शतकापासून एक नवीनच शक्ती जगात प्रादुर्भूत झाली.पददलित लोकांना स्वतःच्या शक्तीचा साक्षात्कार झाला.स्वतःच्या हक्कांच्या रक्षणार्थ व समर्थनार्थ ते आपली शक्ती दाखवू लागले.या श्रमजीवी वर्गाला जागे होण्यास शेकडो वर्षे लागली,
तशीच आता शक्तिसंपन्न व्हायला आणखी कित्येक शतके लागतील.पण भविष्य निश्चितपणे त्याचे आहे.त्याचा भाग्याचा दिवस निश्चितपणे जवळ येत आहे.मानवी मनाची जागृती,मानवी आत्म्याचे मुक्त होणे, अशा अर्थाचे जे हे नवयुग उजाडले.ते इतिहासातले सर्वांत मोठे युग होय.इतिहासातील चळवळीत ही अत्यंत महत्त्वाची चळवळ होय. या नवयुगाचा आरंभ चौदाव्या शतकात झाला.ते नवयुग आज पाचशे वर्षे होऊन गेली तरी अद्यापिही बाल्यावस्थेतच आहे.ज्या वेळेस मानव
कुटुंबातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी लाभेल;ज्या वेळेस पक्षपात नाहीसा होईल;जेव्हा आवडता-नावडता हा भेद निघून जाईल;जेव्हा या धनधान्यसंपन्न वसुंधरेची फळे सर्वांना नीटपणे मिळतील व सर्वांना सुखी,सुंदर व निरामय जीवन कंठिता येईल,
तेव्हाच हे नवयुग विजयी,कृतार्थ झाले असे म्हणता येईल. जेव्हा युद्धे अज्ञान,जुलूम,असहिष्णुता,द्वेष व मत्सर पृथ्वीवरून निघून जातील,तेव्हाच नवयुगाची संपूर्ण कथा सांगण्याचा योग्य प्रसंग आला,असे म्हणता येईल.