पेट्रार्क,जोहान्स हस,जॉन बॉल
पेट्रार्क - प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा ख्रिश्चन जगात झालेला पुनर्जन्म म्हणजे नवयुग असे सर्वसाधारणपणे समजण्यात येते.चौदाव्या शतकात केव्हातरी युरोपियनांस मातीत गाडलेले सौंदर्य आढळले.ते ते शोधू लागले.
उत्खनन सुरू झाले.ग्रीक लोकांनी तयार केलेले अप्रतिम पुतळे उपलब्ध झाले.पुन्हा एकदा या अप्रतिम शिल्पवस्तू निळ्या नभाखाली नीट मांडून ठेवण्यात आल्या.जुन्या मठातील ग्रंथालये धुंडाळण्यात येऊ लागली.जुन्या कचऱ्यात, गळाठ्यांत,रद्दीत रत्नांचे संशोधन होऊ लागले. धुळीने भरलेल्या कपाटात,पेट्यांत वगैरे पुस्तके सापडू लागली.
एसचायल्स,प्लेटो,रिस्टोफेन्स,सिसरो,होरेस, ल्युक्रेशियस इत्यादी थोर आचार्यांचे ग्रंथ मिळाले. ग्रीक लोकांच्या हास्याचा,आनंदाचा व विनोदाचा ध्वनी चौदाव्या शतकात पुन्हा युरोपच्या कानावर आला.गंभीर व चंबूसारखे तोंड करणारे सुतकी युरोप पुन्हा एकदा हसायला व विचार करायला शिकले.
युरोपीय जनता दुसऱ्या देशांकडे,जातींकडे व काळाकडे पाहू लागली,तिचे डोळे उघडले; संकुचित,बंद मने जरा मोठी झाली,उघडली. चौदाव्या शतकातील युरोपियन लोक आपल्या उच्च शिक्षणासाठी साऱ्या जगातील ज्ञान घेऊ लागले.त्यांनी साऱ्या जगाचे जणू विद्यापीठच बनविले ! चिनी लोकांपासून ते छापण्याची कला व कागदांचा उपयोग शिकले,अरबांपासून बीजगणित व वैद्यक शिकले व प्राचीन ग्रीकांपासून तत्त्वज्ञान व काव्य शिकले.प्राचीन लोकांचे देव पुन्हा एकदा मानवात वावरायला लागले,मानवांशी हसायला,खेळायला व बोलायला आले.पुढच्या जन्मातील सुखासाठी अनिश्चित अशा भविष्य काळातील सुखासाठी ताटकळत बसण्यापेक्षा या जगातच प्रत्यक्ष सुख कसे मिळवावे,हे ते सांगू लागले.बहुतेक इतिहासात नवयुगाचे हे अशा अर्थाचे चित्र बहुधा आढळते व ते फारसे खोटे असते असेही नाही;पण ते अपुरे असते. झोपी गेलेल्या युरोपीय हृदयांत प्राचीनांचे ज्ञान-विज्ञान पुन्हा जिवंत झाले,एवढाच नवयुगाचा अर्थ नव्हता.नवयुग हे त्रिविध बंड होते;१.अज्ञानाविरुद्ध,२.असहिष्णुतेविरुद्ध,
३.छळ व जुलूम यांविरुद्ध अज्ञानाविरुद्ध बंडाचा झेंडा पेटार्क नामक पंडिताने उचलला; असहिष्णुतेविरुद्ध झेंडा धर्मोपदेशक जोहान्स हस याने उचलला;छळ व जुलूम यांविरुद्ध झेंडा प्रसिद्ध चळवळ्या जॉन बॉल याने उचलला.या तिघांचे जीवन थोडक्यात पाहू या.नवयुग या नावाने ज्ञात असलेल्या क्रांतीमध्ये जे तीन प्रवाह होते,ते या तिघांनी उचलून घेतले होते.
डान्टे मरण पावला.तेव्हा पेट्रार्क तेरा वर्षांचा होता.त्याचे पूर्ण नाव फॅन्सिस पेटार्क १३०४ मध्ये अरेझ्झी गावी त्याचा जन्म झाला.त्याचा बाप फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित नागरिक होता, पण त्याला तिथे हद्दपार करून ठेवण्यात आले होते.ज्या अल्पसंख्य पक्षाला मागाहून डान्टे मिळाला,त्याच पक्षाचा पेटार्कचा बापही होता; वयाच्या पंधराव्या वर्षी पेटार्कला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधील माँटपेलियर विद्यापीठात घालण्यात आले.
कायद्याकडे त्याच्या मनाचा ओढा नव्हता;पण बापाचा धंदा पुढे चालविण्यासाठी तो कायदेपंडित होणार होता. तो इतर वाचन करी,काव्य करी.त्याने लॅटिनचा सांगोपांग अभ्यास केला होता;पण तत्कालीन युरोपियन विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही ग्रीकचा गंधसुद्धा नव्हता.१३२६ साली त्याचा बाप वारला,तेव्हा तो ॲव्हिगनॉन येथे धर्मोपदेशक झाला.१३२७ सालच्या एप्रिलच्या सहाव्या तारखेस ॲव्हिगनॉनमधील एका चर्चमध्ये लॉरा नावाच्या तरुणीशी त्याची गाठ पडली,त्या वेळी तो तेवीस वर्षांचा हवा.लॉराचे लग्न झालेले होते. या तरुण कवीकडे - पेट्रार्ककडे तिचे मन आकर्षिला होते.ती त्याच्या भावना व वासना चेतवी,उचंबळवी,पेटवी; पण ती त्याला स्वतःच्या अधिक जवळ येऊ देत नसे.ती त्याला दुरून-दुरूनच खेळवी.त्यांची पहिली भेट झाली, त्या क्षणापासून लॉराने पेट्रार्कच्या मनावर व प्रतिभेवर सत्ता मिळविली.ती त्याच्या काव्याची स्वामिनी होती.त्याच्या सुनीतांमुळे ती अमर झाली आहे.नवयुगातील अत्यंत मनोहारिणी स्त्री म्हणून ती ओळखली जाते.चौदाव्या शतकातील या भावनाशून्य सुंदरीच्या सन्मानार्थ भावनाप्रधान तरुण आजपर्यंत भावनोत्कट काव्याच्या राशी निर्माण करीत आले आहेत.लॉराने जरी पेट्रार्कचे मन सर्वस्वी व्यापिले होते,तरी इतर स्त्रियांच्या बाबतीतही तो काही आंधळा नव्हता.
त्याला त्याच्या एका पूजकाने एक बेवारशी मूल अर्पण केले.दुसऱ्या एकाने एक बेवारशी मुलगी दिली व पोपच्या खास फर्मानाने पुढे ही मुले कायदेशीर मानली गेली.पेट्रार्क ॲव्हिगनॉन येथे १३३३ पर्यंत राहिला.नंतर तो प्राचीन काळातील सौंदर्य मिळविण्यासाठी आपल्या पहिल्या दीर्घ यात्रेवर निघाला.विनवुड रीड आपल्या ग्रंथात म्हणतो, "त्याने ग्रंथ धुंडाळण्याचे युग सुरू केले."पॅरिस,घेट,
लीज,कोलेन,रोम इत्यादी शहरी तो गेला.त्याने जुने हस्तलिखित लॅटिन ग्रंथ शोधून काढले व त्याच्या नकला करून घेऊन ते जुने ज्ञान व ते प्राचीन विचार त्याने आत्मसात करून घेतले.मॅटरजिकच्या 'निळा पक्षी' या पुस्तकात दोन जिज्ञासू भावंडांचे मृत बंधू जिवंत होतात.
त्याप्रमाणे लॅटिन वाङ्मयातील प्राचीन वागीश्वर पेट्रार्कच्या स्मृतीचा जादूचा स्पर्श होताच जणू पुन्हा जिवंत झाले ! पेट्रार्कने सिसरो व सेनेका यांना पत्रे लिहिली;जणू ते त्याचे समकालीनच होते! शेकडो शतके ओलांडून तो आपल्या सहानुभूतिपूर्ण दृष्टीने त्यांना भेटला, त्यांच्याबरोबर त्यांच्याच भाषेत बोलला,त्यांचेच वाक्य सांप्रदाय वापरू लागला.जरी तो कॅथॉलिक चर्चचा धर्मनिष्ठ पुत्र होता,तरी तो प्राचीन ज्ञानमंदिराचा व प्राचीन धर्माचाही चाहता व उद्गता बनला.ईश्वराच्या तोंडावरील मध्ययुगीन बुरखा दूर करून त्याने ख्रिस्त केवळ दुःखमूर्ती नसून आनंदमूर्तीही आहे असे दाखवून युरोपला चकित केले. दुःखमूर्ती ख्रिस्त म्हणजे हास्यमूर्ती व विनोदमूर्ती बँकसचा जुळा भाऊ असे त्याने दाखविले.सौंदर्यासाठी ही भूतकाळातील यात्रा करण्यात पेट्रार्कची बरीच वर्षे गेली.नंतर तो लोकांपासून दूर अशा व्हॉक्लूज येथील भव्य व भीषण पर्वतांमधील एका दरीत घर करून राहिला व तिथे त्याने आपले शेष आयुष्य अत्यंत शांतपणे घालविले,प्राचीनांच्या काव्याचा अभ्यास केला आणि संगीत व नादमाधुर्य हे त्यांचे गुण आपल्या काव्यात आणले.वाङ्मयात त्याने एक नवीनच तार छेडली व मध्ययुगीन विचाराच्या छंदाला एक नवीन,तेजस्वी आणि उत्कट जोड दिली.मरण वा नरकयातना या विषयीच काव्ये करीत बसण्याऐवजी तो जीवनाविषयी व प्रेमाच्या आनंदाविषयी लिहू लागला.
झोपून उठल्याप्रमाणे जग त्याची ही गीते ऐकू लागले व टाळ्या वाजवून त्याची वाहवा करू लागले. पेट्रार्क जरी अवलियासारखा - संन्याशासारखा राहत होता, तरीही त्याला ही स्तुती आवडली नाही,असे नाही.ही स्तुती लाभावी म्हणून त्याने खटपट केली,प्रयत्न केले.तो सर्व प्रकारच्या संगीताचा भोक्ता होता.टाळ्यांचे तद्वतच स्तुती करणाऱ्या जिभेचेही संगीत त्याला आवडे.आपल्या लिखाणात जरी तो अधिकाऱ्यांची टिंगल करी, तरी प्रत्यक्ष वागताना मात्र तो त्यांच्याशी सौम्यपणानेच नव्हे;तर जरा आदबीनेही वागे. अधिकारीही त्याच्या साहित्यिक टिंगलीबद्दल स्मित करीत;पण खासगी वागणुकीत तो नमून वागे,म्हणून ते त्याचा मानसन्मान व उदोउदो करीत,पेट्रार्कचा देह,तसाच आत्मा कॅथॉलिक चर्चच्या प्रेमळ व वत्सल बाहुपाशात सुरक्षित असेतोपर्यंत त्याचे मन प्राचीनांच्या पुष्पवाटिकेत हिंडत-फिरत राहिले तरी चिंता नाही, असे ते अधिकारी म्हणत.त्याची ज्ञानाची तहान व रोमन वाङ्मयावरील त्याची उत्कट प्रीती या गोष्टी वगळल्या,तर पेट्रार्क धोकेबाज नव्हता.
तो सनातनी,समतोल वृत्तीचा व शहाणा गृहस्थ होता.तो इतका साळसूद व भरवसा ठेवण्यालायक गृहस्थ होता की,तो काही वेडेवाकडे करील अशी कोणाला शंकाही येण्याची शक्यता नव्हती.पॅरिसच्या विद्यापीठाने त्याला प्राध्यापक म्हणून बोलाविले;पण नेपल्सचा राजा रॉबर्ट याच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमाला गुंफण्यासाठी आलेले आमंत्रण त्याला अधिक महत्त्वाचे वाटले.
विद्यापीठातल्यापेक्षा प्रासादातला मानसन्मान त्याला अधिक आकर्षक वाटला.नेपल्सच्या वाटेवर रोम शहरी त्याचे सार्वजनिक स्वागत करण्यात आले.त्याला विजयमाला अर्पण करण्यात आली.श्रेष्ठतम कवी म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.तो अर्वाचीन जगातील पहिला राजकवी होय.
त्याच्या आयुष्यातील शेवटच्या भागात तर त्याच्यावर मानसन्मानाची नुसती वृष्टी झाली! परंतु या काळात त्याच्या वाट्यास दुःखेही आली. इ.स.१३४८मध्ये त्याची स्फूर्तिदेवता लॉराही मेली.युरोपातील काळ्या प्लेगने तिचा बळी घेतला.प्लेगने सर्वत्र कहर उडविला होता.थोड्या वर्षांनी याच रोगाला त्याचा एकुलता एक मुलगाही बळी पडला.याच साथीत त्याचे काही जिवाभावाचे मित्रही मेले.तो पुन्हा एकदा पुस्तकात शिरला;त्याने वाङ्मयात बुडी मारली.तो असा एक आश्रम काढू इच्छित होता की,तिथे ख्रिश्चन धर्मातील ज्ञानवैराग्यांबरोबरच प्राचीन काळातील मुक्त विचार व मोकळी संस्कृती यांची ही पूजा - अर्चा व्हावी; प्राचीन धर्म व ख्रिस्ती धर्म दोन्ही तिथे भेट व एकत्र नांद शकावेत.पण हे स्वप्न अशक्य आहे असे त्याला आढळून आले व त्याने तो नाद सोडून दिला.त्यावेळेस जगभर क्रांतिकारक वारे वाहू लागले होते.थोडावेळ पेट्रार्कही या क्रांतीच्या वातचक्रात सापडला,पण थोड्याशा अनुभवानंतर तो क्रांतीच्या लाटातून बाहेर पडला.त्याचा आत्मा प्रत्यक्ष सृष्टीत, आसपासच्या प्रत्यक्ष जीवनात रमत नसे; तर काव्यात रमत असे,वाङ्मयात विहरत असे.१३७४ च्या १८ जुलैला तो मरण पावला.मरताना त्याने आपले पवित्र मस्तक एका पुस्तकाच्या उशीवर ठेवले होते.
जोहान्स हस - पेट्रार्कचे नवयुग म्हणजे शाब्दिक क्रांती होती.त्याने रोमन वाङ्मय उजेडात आणले व त्याच्या अनुयायांनी ग्रीक साहित्य उजेडात आणले.चिनी लोकांची छापण्याची कला युरोपात वाढत होती.जर्मनीत गुटेम्बर्ग व हॉलंडमध्ये कोस्टर यांनी या कलेत शोध लावले.पुस्तके छापली जाऊ लागली,मृत भूतकाळ सजीव होऊ लागला,
पुस्तकांचा प्रसार होऊ लागल्यामुळे ज्ञान बहुजन समाजात जाऊ लागले.युरोपला आपल्या थोर साहित्यिक वारशाची जाणीव झाली.
मध्ययुग रानटी युद्धात गुंतलेले होते.युद्धात गुंतलेल्या जगाला वाचण्याची सात्विक व सांस्कृतिक करमणूक लाभली.तलवार बाजूस ठेवून पुस्तक हातात घ्यावयास मानवजात प्रथमच शिकत होती.
नवयुगाची ही पहिली स्थिती.अज्ञानाविरुद्ध बंड ही नवयुगातील पहिली महत्त्वाची गोष्ट,दुसरी स्थिती म्हणजे असहिष्णुतेविरुद्ध बंड येथे शब्दांशी तितकेसे काम नसून प्रत्यक्ष कृतीशी काम होते.मध्ययुगातील असहिष्णू धर्मवेडेपणाविरुद्ध बंड उभारण्यामधील अग्रेसर वीर म्हणून जोहान्स हस याचा गौरव केला पाहिजे.हस हा बोहेमियन होता.तो प्रेगच्या विद्यापीठात प्राध्यापक होता.त्याला चर्चचे ठरीव विधिनिषेध पचेनात.
बायबलमधील शब्द न् शब्द तो विश्वासार्ह मानीत नसे.त्याचा ख्रिस्ताच्या शिकवणीवर विश्वास होता,पण बायबलमधील चमत्कारांचा काही उपयोग नाही,असे तो म्हणे. तो भटांभिक्षुकांच्या विरुद्ध होता.मधल्या उपाध्यायांच्या लुडबुडीशिवायही ईश्वर भक्तांच्या प्रार्थना समजू शकतो,असे तो म्हणे.पोपांच्या थाटमाटावर तद्वतच चर्चच्या उद्धटपणावर व धर्मांधतेवर तो टीका करी.तो जॉन वुक्लिफचा मित्र व अनुयायी होता.जॉन वुक्लिफने लॅटिनमधील बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले होते.चर्चने सांगितलेला अर्थ डोळे मिटून ऐकण्याऐवजी मित्र जनतेने बायबल स्वतः वाचून पाहावे म्हणून त्याने त्याचा इंग्रजीत अनुवाद केला होता.पददलितांच्या हक्कांसाठी तो झगडे, त्या काळात युरोपातील भूमीपैकी तिसरा हिस्सा जमीन चर्चच्या मालकीची होती.ही सारी जमीन शेतकऱ्यांस परत दिली जावी असे हस म्हणे.आद्य ख्रिश्चन लोकांतले बंधुभाव व साम्यवाद पुन्हा येऊ देत,असे तो उपदेशी.थोडक्यात बोलायचे तर जोहान्स हा यथार्थपणे ख्रिश्चन होऊ पाहत होता.यामुळे संघटित चर्च त्याला शत्रू मानू लागले व चर्चचे अधिकारी त्याला पाण्यात पाहू लागले. इ.स. १४१२ मध्ये आर्चबिशपने जॉन वुक्लिफची दोनशे पुस्तके जाळून टाकली व हसला धर्मबाह्य केले.त्याने सारे प्रेग शहरच जणू कायदेबाह्य ठरविले.पण हस डगमगला नाही. आपले काम हाती घेऊन तो पुढे जात होता.त्या वेळी रोमन कॅथॉलिक चर्चचे दोन पोप असत. एक रोम येथे व दुसरा ॲव्हिगनॉन येथे. कॅथॉलिक धर्माला दुहीचा रोग मधूनमधून जडत असे,तसाच रोग या वेळेस जडला होता.असे तट पडल्यामुळे पृथ्वीवर ईश्वराचा एक प्रतिनिधी असण्याऐवजी दोन प्रतिनिधी झाले.वेल्स लिहितो,"प्रत्येक जण आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अनुयायांना शाप देई,त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाल्यास सारेच जणू नरकाचे धनी झाले। !"
इ.स.१४१५ मध्ये कॉन्स्टन्स येथे धर्मोपाध्यायांचा मेळावा जमला.चर्चमधली दुही मिटावी म्हणून ही परिषद भरली होती.या परिषदेसाठी हसलाही आमंत्रण देण्यात आले होते.
या लेखातील पुढील भाग…०५.०६.२४ या लेखामध्ये…!