* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

५/७/२४

टच ॲण्ड गो / Touch and Go

प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बातमी नेहमीच वाऱ्यासारखी पसरते.मागच्या दहा दिवसात बिबळ्याला विषबाधा झाल्याची व तो गुहेत कायमचा बंदिस्त झाल्याची बातमी संपूर्ण गढवालमध्ये प्रत्येकाला कळली होती. त्यामुळे थोडा धोका पत्करण्याचा मोह होणं नैसर्गिक होतं.साहजिकच मागच्या दहा दिवसांत विषाच्या परिणामांमधून सावरलेल्या व गुहेतून निसटलेल्या बिबळ्याने असा धोका पत्करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा बळी घेतला होता.गुहेला भेट देऊन मी बराच लवकर परतलो होतो.त्यामुळे आम्हाला आख्खा दिवस तयारीसाठी मिळणार होता.ब्रेकफास्टनंतर रायफली घेऊन इबॉटसनच्या घोड्यांवरून दौडत आम्ही निघालो.


यात्रामार्गावरून जोराची दौड मारून आम्ही डोंगरावरून तिरप्या जाणाऱ्या पायवाटेवर लागलो.ही वाट गावाकडून येणाऱ्या पायवाटेला जिथे मिळत होती तिथेच आम्हाला झटापट झाल्याचा खाणाखुणा आणि रक्ताचं मोठं थारोळं दिसलं.मुखिया व मयत स्त्रीचे नातेवाईक गावात आमच्यासाठी थांबलेच होते. त्यांनी आम्हाला,दरवाजा बंद करत असताना ज्या ठिकाणी बिबळ्याने हल्ला केला होता ती जागा दाखवली.तिथून पुढे तिला पाठीवर फरफटत नेत तो शंभर यार्ड अंतरावर थारोळ पडलेल्या जागी घेऊन आला होता.तिथे त्याने पकड सोडली होती आणि बऱ्याच झटापटीनंतर त्या बाईला ठार केलं.त्याने तिला ओढत नेतानाचा व जीव वाचवण्यासाठी अखेरची झुंज देताना,तिच्या किंकाळ्या सर्वांनी ऐकल्या होत्या. पण मदत करायला पुढे येण्याचं धाडस त्यांना झालं नव्हतं.त्या बाईची शेवटची धडपड थांबल्यानंतर बिबळ्याने तिला तोंडात पकडलं आणि काही अंतर वैराण जमीनीवरून जाऊन साधारण शंभर यार्ड रुंदीची घळ ओलांडून पलीकडे दोनशे यार्ड नेलं होतं. 


ओढत नेल्याचा माग तिथे दिसत नव्हता पण रक्ताचा माग स्पष्ट दिसत होता.हा माग काढत आम्ही एका चार फूट रुंद व वीस फूट लांबीच्या सपाट जागेवर पोचलो.या निमुळत्या पट्टीच्या डोंगराकडच्या बाजूला एक आठ फूट उंच उभा चढाव होता व त्यावर 'मेडलर'चं झाड वाढलं होतं.आमच्या बाजूला उतार होता आणि त्यावर वाढलेल्या जंगली गुलाबाची झुडपं मेडलरच्या झाडापर्यंत पसरत गेली होती.त्यामुळे त्या झाडाची वाढ खुंटली होती.या उभ्या आठ फूट बांधाच्या व मेडलरच्या झाडाच्या दाटीमध्ये,मधोमध,डोकं बांधाकडे असलेला व संपूर्ण नग्नावस्थेतला तिचा मृतदेह पडला होता.त्यावर जंगली गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या.ही पांढऱ्या केसाची म्हातारी स्त्री किमान सत्तरीची तरी असावी.या दुर्दैवी स्त्रीच्या हृदयद्रावक मृत्यूसाठी बिबळ्याला देहदंड मिळायलाच पाहिजे होता.थोडावेळ 'कॉउन्सिल ऑफ वॉर' घेतल्यानंतर इबॉटसन काही आवश्यक वस्तू घेऊन येण्यासाठी रुद्रप्रयागला दौडत गेला व मी दिवसा उजेडी बिबळ्याचा ठावठिकाणा मिळतो का ते पाहण्यासाठी रायफल घेऊन निघालो.हा भाग मला तसा अनोळखी होता आणि त्याची नीट तपासणी करणं गरजेचं होतं.मी गावात असतानाच बघून ठेवलं होतं की हा डोंगर घळीपासून सुरू होऊन चार-पाच हजार फूट चढत गेला होता.माथ्याकडचे दोन हजार फूट ओक व पाईनचं गच्च जंगल होतं व त्याच्या खाली अर्धा मैल रुंदीचा गवताळ पट्टा होता. त्याही खाली परत झुडुपी जंगल होतं.


गवताळ पट्टा व डोंगराच्या खांद्यावरून वळसा घातला तर मला माझ्यासमोरच एक बराच रुंद असा खोलगट भाग दिसला.तो तसाच खाली अर्धा मैलावर यात्रामार्गाला मिळत होता.बहुतेक हा खोलगट भाग काही वर्षापूर्वी झालेल्या लैंडस्लाईड मुळे तयार झाला असावा.डोंगराच्या बाजूला शंभर यार्ड रुंद व यात्रामार्गावर मिळेपर्यंत तीनशे यार्ड रुंद होत गेलेल्या या खोलगट भागाच्या पलीकडे तशी मोकळी जमीन होती पण खोलगट भागातली जमीन मात्र दमट ओलसर होती म्याच्यावर मोठमोठे वृक्ष वाढले होते.झाडाखालची झुडुपी वाढही चांगली दाट होती.

खोलगट भागाच्या डोंगराकडच्या बाजूला एका पुढे आलेल्या कातळामुळे एक वीस ते चाळीस फूट उंचीचा व शंभर यार्ड लांबीचा कडा तयार झाला होता व त्याच्या मधोमध एक खोल फट तयार झाली होती. 


या फटीतून एक झरा वाहत होता.या कातळानंतर झुडुपी जंगलाचा पट्टा होता व नंतर परत तो गवताळ पट्टा लागत होता.मी या सर्व भागाचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं.

कारण माझा अंदाज होता की बिबळ्या ह्या खोलगट भागातच लपला असणार आणि त्याला माझा सुगावा लागू द्यायचा नव्हता.आता एवढ्या मोठ्या खोलगट भागात तो नक्की कुठे असावा हे कळणं आवश्यक होतं.

त्यासाठी मी परत भक्ष्याजवळ गेलो.आम्हाला गावात सांगण्यात आलं होतं की जेव्हा त्या बाईला मारण्यात आलं. त्यानंतर लगेचच तांबडं फुटलं होतं.आता तिला ठार मारणे,चारशे यार्ड ओढत डोंगरावर घेऊन जाणे आणि थोडंसं खाणे या सर्व गोष्टीला थोडातरी वेळ लागणारच होता व असा अंदाज करायला काहीच हरकत नव्हती की बिबळ्या भक्ष्य सोडून जाताना बऱ्यापैकी उजाडलं असणार.हे ठिकाण डोंगरावर दोनशे यार्ड उंचीवर होतं आणि गावातून व्यवस्थित दिसत होतं.


यावेळेपर्यंत गावात या घटनेमुळे बऱ्याच हालचालीही होत असणार.त्यामुळे भक्ष्य सोडून जाताना तो आडोसा धरूनच निघाला असणार. तेव्हा याच अंदाजाच्या आधारे मी त्याच्या मागावर निघालो.जवळजवळ अर्धा मैल चालल्यानंतर गाव दिसेनासं झालं आणि तिथून त्या खोलगट भागाच्या दिशेला येताना मला कळलं की मी बिबळ्याच्या पावलावर पाऊल टाकत आलोय... इथे एका झुडुपाच्या सावलीत थोडी मोकळी माती होती व तिथे तो बराच वेळ पडून राहिल्याचं दिसत होतं.ही छान सावलीची जागा सोडतानाच्या त्याच्या पगमार्क् वरून कळत होतं की त्याने त्या कड्याच्या खाली पन्नास फूटांवर असलेल्या उतारावरच त्या खोलगट भागात प्रवेश केला होता.

बिबळ्या जिथे पडून राहिला होता त्याच ठिकाणी जवळ जवळ अर्धातास मी उभा राहिलो व एक क्षणभर का होईना त्या बिबळ्याकडून काहीतरी हालचाल होईल आणि त्याचा ठावठिकाणा कळेल या आशेने मी समोरच्या जंगलाचा इंच न् इंच नजरेखाली घातला.मी तिथे एक टक बघत असताना वाळलेल्या पानामधल्या एका हालचालीकडे माझं लक्ष वेधलं आणि आता मला 'स्किमिटार बॅब्लर्सची' एक जोडी किड्यांच्या शोधात पानं उलटी पालटी करत असलेली आढळली. (सातभाई पक्ष्यांची एक जात,बाकदार चोचीमुळे यांना scimitar म्हणतात.) जिथे शिकारी प्राण्यांचा संबंध येतो तेव्हा हे पक्षी जंगलातले सर्वांत भरवशाचे खबरे असतात आणि या जोडीचा उपयोग करून घेता येईल याची मी खूणगाठ बांधली.

बिबळ्या त्या भागात आहे याचा निर्देश करणारी एकही हालचाल किंवा एकही आवाज कुठूनही येत नव्हता.पण तरी तिथे तो आहे याबद्दल मला खात्री होती. त्यामुळे या नाही तर दुसऱ्या मार्गाने मी प्रयत्न करायचं ठरवलं.


एकदम उघड्यावर न येता निसटण्याचे दोन मार्ग त्या बिबळ्याला खुले होते.एक म्हणजे डोंगर उतरून यात्रामार्गावर जाणे किंवा डोंगरावर चढून जाणे.जर तो डोंगर उतरून गेला तर परत त्याच्याशी संपर्क होणं अवघड होतं पण जर मी त्याला वर जायला भाग पाडू शकलो तर तो निश्चितपणे त्या फटीमधून कड्यावर जाण्याचा प्रयत्न करणार होता.कारण तिथे त्याला जंगलाचा आडोसा मिळत होता.तसं करत असताना मला माझी संधी मिळणार होती.बिबळ्या जिथे असेल असा माझा अंदाज होता त्याच्या थोडंसं खालून मी त्या खोलगट भागात प्रवेश केला व अगदी सावकाश एकेका पावलागणिक थोडी थोडी उंची गाठत मी वर जायला सुरुवात केली.कड्यावरच्या त्या फटीकडे डोळे लावून बसण्याची तशी गरज नव्हती कारण त्या स्किमिटार बॅब्लर्सची जोडी तिथेच कड्याखाली होती आणि बिबळ्याने कोणतीही हालचाल केली तर तेच त्याचं भांडं फोडणार होते.अतिशय सावधपणे मी जवळजवळ चाळीस यार्ड वर,त्या कड्याच्या दहा फूट खाली व किंचित डाव्या बाजूला पोचलो तेवढ्यात ती बॅब्लर्सची जोडी एकदम उडाली आणि जवळच्याच ओकच्या झाडावरून या फांदीवरून त्या फांदीवर उत्तेजीत होऊन उड्या मारत त्यांनी त्यांचा स्पष्ट व घुमणारा असा अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली.पहाडी भागात हा कॉल अगदी अर्ध्या मैलांपर्यंत पण ऐकू जाऊ शकतो त्याच जागी स्तब्ध होऊन मी झटकन शॉट घेण्यासाठी सज्ज झालो आणि नंतर सावकाश कड्याच्या दिशेने सरकायला सुरुवात केली.या ठिकाणी जमीन निसरडी होती माझे डोळे त्या कड्यातल्या फटीवर रोखलेल्या अवस्थेत मी एक दोन पावलं पुढे गेलो असेन तेवढ्यात माझे रबरी सोलचे बूट निसरड्या चिखलावरून घसरले व मी तोल सांभाळण्यासाठी धडपड करत असतानाच बिबळ्याने त्या फटीमध्ये झेप घेतली व तिच्या पलीकडच्या जंगलातून जाताना त्याने काही कालीज फिझन्स्टना दचकवलं.हे फिझन्ट्स पंख पसरवत माझ्या डोक्यावरून उडत गेले.


माझा दुसरा प्रयत्नही फसला होता.बिबळ्याला परत त्या खोलगट भागात यायला भाग पाडणं सोपं होतं.पण त्याचा मला फारसा उपयोग झाला नसता.कारण वरच्या बाजूने अगदी जवळ जाईपर्यंत ती फट दिसण्याची शक्यता नव्हती आणि मी नेम धरेपर्यंत बिबळ्या वेगाने डोंगर उतरून गेला असता.इबॉटसन आणि मी दोन वाजता त्या घळीजवळ भेटायचं ठरवलं होतं. थोडंसं आधीच इबॉटसन येऊन पोचला होता. आवश्यक त्या सर्व वस्तू घेऊन.

त्याच्या बरोबर बरीच माणसंही त्याने आणली होती.या वस्तू म्हणजे जेवण,चहा,आपला जुना मित्र पेट्रोमॅक्स (यावेळी मात्र हा पेट्रोमॅक्स मीच हातात घ्यायचं ठरवलं होतं) दोन जास्तीच्या रायफल्स,बुलेट्स माझी फिशिंगची रीळ,सायनाईडच्या कॅप्सूल्स व जिन ट्रॅप ! घळीमध्ये स्वच्छ पाण्याजवळ बसून आम्ही जेवण उरकलं,जरा चहा घेतला व त्यानंतर आम्ही मृतदेहाजवळ गेलो.


आमच्या पुढच्या सर्व हालचाली व घटनाक्रम नीट कळावा म्हणून मी तुम्हाला त्या जागेचं संपूर्ण वर्णन करून सांगणार आहे.


चार फूट रुंद व वीस फूट लांब अशा या सपाट अरुंद पट्ट्याच्या,घळीच्या बाजूला पाच फूटांवर तो मृतदेह पडला होता.सपाट जागेला पलीकडच्या बाजूने आठ फूट उंच बांधाचं संरक्षण होतं तर खालच्या बाजूने उभाउतार व जंगली गुलाबाच्या पसरलेल्या काटेरी झुडुपाचं संरक्षण होते.बांधावरचं मेडलरचं झाड मचाण बांधण्याच्या दृष्टीने फारच छोटं होतं म्हणून आम्ही जीन टॅप,गनट्रॅप व विष यावरच पूर्ण विसंबून राहायचं ठरवलं व त्यानुसार तयारीला लागलो.वेळ कमी उरल्यामुळे बिबळ्याने मृतदेहाचा फारच थोडा भाग खाल्ला होता.तिथे आम्ही विषाच्या कॅप्सूल्स पुरल्या पण योग्य तेवढ्याच मात्रेत ! त्यानंतर मी मृतदेहावर बिबळ्या जसा बसेल असं आम्हाला वाटत होतं तसा वाकून बसलो व आमच्या बाजूची दोन झाडं निवडून त्यावर इबॉटसनने नेम जुळवून त्याची ०.२५६ मॅनलिचर व माझी ०.४५० वेगवान रायफल बांधून टाकल्या.


भक्ष्याजवळ येण्यासाठी बिबळ्याला कोणत्याच दिशेकडून अडथळा असा नव्हता पण मघाशी मी त्याला ज्या ठिकाणी सोडून दिलं होतं त्या दिशेने तो येण्याची शक्यता जास्त होती; म्हणजेच त्या सपाट जागेच्या उरलेल्या पंधरा फूट भागाकडून ! म्हणून आम्ही तिथेच जिनट्रॅप पुरायचं ठरवलं.त्यासाठी तिथली माती,गवताची पाती,वाळलेली पानं नीट बघून ठेऊन बाजूला काढून ठेवली. त्यानंतर चांगला लांब,रुंद व खोल खड्डा केल्यावर त्यात तो जिन ट्रॅप ठेवला.ताकदवान स्प्रिंग्ज दाबून बसवल्यावर ट्रीगर असलेल्या प्लेट्स नाजूकपणे जुळवून ठेवल्या.त्यावर माती टाकून अगदी पूर्वी होती त्याच स्थितीत तिथे माती,वाळलेली पानं व गवताची पाती पसरून ठेवली.

आम्ही हे सर्व इतकं काळजीपूर्वक केलं होतं की अगदी आम्हाला सुद्धा नंतर त्या ट्रॅपची अचूक जागा सांगता आली नसती.आता माझं फिशिंगचं रीळ काढलं गेलं आणि रेशमी दोरीचं एक टोक एका रायफलच्या ट्रीगरला बांधून दस्त्याच्या भोवती गुंडाळून मृतदेहापासून दहा फुटावर आणलं गेलं,तिथून ती दोरी परत फिरवून दुसऱ्या रायफलच्या दस्त्याला गुंडाळून ट्रीगरला बांधली गेली.या ठिकाणी ती दोरी आम्ही तोडली (ही लाईन अगदी चांगल्या दर्जाची व नवीन होती त्यामुळे ती तोडणं माझ्या जीवावरच आलं होतं) आता दुसऱ्या दोरीचं एक टोक मृतदेहाच्या कमरेभोवती बांधलं.दहा फूटावर मघाशी तयार झालेल्या लूपमधून दुसरं टोक टाकलं गेलं व नंतर सर्वच्या सर्व दोऱ्या ताणून जागच्या जागी लावल्या गेल्या व लूपमध्ये गाठ मारली गेली.इथे ही दुसरी दोरी परत एकदा कापली गेली. आमच्या सर्व कलाकुसरीवर शेवटची नजर टाकताना आम्हाला जाणवलं की जर ह्या बिबळ्याने वळसा घालून आमच्या म्हणजे गावाच्या दिशेने भक्ष्यावर जाण्याचा निर्णय घेतला तर त्याची जिनट्रॅप आणि गनट्रॅप,


उर्वरीत शिल्लक राहिलेला भाग..!

दि.०७.०७.२४ या दिवशीच्या लेखामध्ये..! 

३/७/२४

काँगोच्या दलदलीत..In the swamps of the Congo..

पॉइंट-नॉयर शहर हे या देशांच प्रवेशद्वार.फ्रैंक;सर्व व्यवहार रोखीने.केटला इथे पहिला सांस्कृतिक धक्का बसला तो पेहरावाच्या बाबतीत.तिच्या कपड्यांकडे इथे लोक विचित्र नजरेने पाहत होते.

तेव्हा नवे कपडे आलं.दुसरं म्हणजे तिच्या अर्जात तिने पाच-सहा तरुणांना प्रशिक्षण द्यायचं मान्य केलं होतं,पण या देशात असे तरुण सापडणं जरासं अवघडच आहे.तिच्या लवकरच लक्षात आलं.ती 'लाक तेले वाईल्डलाईफ रिझव्हें'मध्ये आहे,करणार होती.हे संरक्षित अभयारण्य कायमस्वरूपी दलदलीच्या स्वरूपातच असतं.ब्राझाव्हिलमधली सर्व शासकीय परवानगीची कामं पार पाडून ती अभयारण्यानजिकच्या इंपफोंडो नावाच्या गावी पोहोचली.इंपफोंडो हे अगदी छोटंसं गाव आहे.तिथे दळणवळणाच्या शहरी सोयींची वानवा होती.

भाषेचाही प्रश्न होताच. तरी तिने स्थानिकांमध्ये मिसळायला सुरूवात केली.आफ्रिकेत शंभराहून अधिक जाती-उपजातींचे साप आढळतात.काँगो आणि आसपासच्या प्रदेशात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जगातल्या इतर कुठल्याही भागाच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय इथल्या लोकांमध्ये सर्पविष प्रतिबंधक उपायांबद्दलचं अज्ञान खूप होतं. केटला सापांबद्दल खूप माहिती आहे हे हळूहळू इंपफोंडोतल्या गावकऱ्यांच्या लक्षात आलं.पुढे पुढे ती जिथे जायची तिथले स्थानिक लोक तिला भेटायला यायचे; सर्पदंशावर तिचा सल्ला घ्यायचे.

सर्पदंशावर हमखास खात्रीचा म्हणून उपचार करणारे काही स्थानिकही तिला भेटले.त्यांची उपचारपद्धती जगन्मान्य नव्हती;मात्र स्थानिक जनतेचा त्या उपचारांवर विश्वास होता,असं तिला दिसलं.


इंपफोंडोमधला केटचा मुक्काम बराच लांबला.

तिला तिच्या कामासंदर्भातल्या बऱ्याच परवानग्या मिळालेल्या असल्या तरी त्यात 'अभयारण्यात काम करण्याची आणि नमुने गोळा करण्याची परवानगी',

असा स्पष्ट उल्लेख कुठेच नव्हता.इंपफोंडोत आल्याबरोबर कुणीतरी हे तिच्या लक्षात आणून दिलं.तिने ब्राझाव्हिलला असलेल्या वनविभागाच्या मुख्यालयाकडे नवा अर्ज पाठवला;पण त्यांच्याकडून काहीच उत्तर येत नव्हतं.तेव्हा तिने अभयारण्याच्या सीमेबाहेर काही अंतरावर तळ ठोकायला हवा,असं तिला सुचवण्यात आलं.त्याप्रमाणे स्थानिकांच्या मदतीने तिने तिचा तळ उभा केला.आता मोहिमेला सुरुवात करायची होती.सापांचे,इतर प्राण्यांचे विविध नमुने गोळा करण्यासाठी जंगलात शोध घेणं आवश्यक होतं.पण पायवाट सोडून आसपासच्या जंगलात शिरणं आणि वावरणं सोपं नव्हतं. 

कमरेएवढं चिखलयुक्त पाणी,खाली भक्कम जमीन;त्यामुळे दलदलीत रूतून बसण्याची भीती नव्हती. मात्र तळाशी आधीच पडलेल्या झाडांचे ओंडके आणि खोडांचे खुंट आडवे येत असल्याने भरभर हालचाली करणं अवघड होतं.हातातली जाळी सांभाळत चालताना अडखळून पडलं की नाका-तोंडात पाणी जायचं;काना-नाकातला चिखल काढण्यात वेळ जायचा.केटच्या पायात बूट असायचे. त्यामुळे तिचा चालण्याचा वेग खूप धीमा असायचा.


काही ठिकाणी झाडांची आडवी झालेली खोडं पाण्याबाहेर डोकावत; अनवाणी स्थानिक ती सहज ओलांडत. पोटरीपर्यंत येणारी ओली पँट आणि पाण्याने जड झालेले बूट घालून ते ओलांडायचा प्रयत्न करण्यात केट घसरून पाण्यात पडायची.

काही ठिकाणी एखादा खड्डा आला की पाणी डोक्यावरून जायचं.हे पाहता तिने पायातले बूट काढून चालायला सुरूवात केली.मात्र तिला अनवाणी चालायची सवय नसल्यामुळे तिच्या पायाला अनेक जखमा झाल्या.एतिएन आणि फ्लोरेन्स हे केटचे स्थानिक साहाय्यक होते.एतिएन कायम तिच्यासोबत असे.रोज ते चालताना जागोजागी खड्डे खणून ठेवत.दुसऱ्या दिवशी त्यात कुठला प्राणी सापडला आहे का ते बघत.मात्र एतिएनला चिखलात काम करणं मनापासून आवडत नसे.दलदलीतलं काम आटपून परतताना तो अनेकदा घाईत चालत असे.त्यामुळे खूप आवाज होत असे. कधीतरी तो विरंगुळा म्हणून जोरजोरात एखादं गाणंही म्हणत असे.तो जर शांतपणे चालला तर वाटेत एखादा प्राणी सापडेल असं केटला वाटत असे.त्यामुळे त्याची ती सवय मोडण्याचा केट सतत प्रयत्न करत असे;कधीकधी त्याला त्यावरून दमही देत असे.एक दिवस त्यांनी पाण्यामध्ये लावलेल्या जाळ्यात एक नाग सापडला.तो मावेल एवढी नमुना-पिशवी केटजवळ नव्हती.एतिएन भीतीने कापत होता.पण नागाला कसं हाताळायचं याची केटला कल्पना होती.तिने मोठ्या कौशल्याने नागाचं डोकं मानेजवळ पकडलं आणि एकीकडे एतिएनच्या मदतीने आपली बॅकपॅक मोकळी केली.त्यात त्या नागाला बंद करून ते दोघं तळाकडे परतले.तळावर पोहोचल्यावर तिला कळलं की गावकऱ्यांनी आणखी एक साप पकडला होता.गावकरी तिला तिकडे चलण्याचा आग्रह करत होते. खरं तर तिला तिने पडकलेल्या नागाचं छायाचित्रण करायचं होतं,पण गावकऱ्यांचा जबरदस्त आग्रह पाहून ती साप पकडण्याची सर्व आयुधं आणि साप ठेवण्याची थैली घेऊन त्या ठिकाणी पोहोचली.तर, गावकऱ्यांनी एक भलामोठा नाग पकडल्याचं तिला दिसलं.तो नाग चिडलेला होता.फणा उगारून तो जवळ येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला चढवत होता.केटने वाट बघायचं ठरवलं.थोड्या वेळातच त्या नागाची दमछाक झाली.तो जमिनीवर निपचित पडला.मग तिने गावकऱ्यांना तो सापळा उघडायला सांगितलं आणि तो नाग मानेमागून पकडून तळापर्यंत आणला.तळावर पोहोचल्यावर तिने मदतनीसांकरवी आपली एक सामानाची पेटी रिकामी करवून घेतली आणि नागाला त्या पेटीत बंद करून टाकलं.तिला थकवा आला होता.नाग पडकलेल्या हाताला मुंग्या येऊन तो संवेदनाविरहित बनला होता.


त्या गावकऱ्यांना तशाही अवस्थेत तिने बक्षिसी देऊन निरोप दिला.त्या दोन नागांनी केटकडचं सर्व फॉरमॅलीन संपवलं.एकदा त्यांनी लावलेल्या जाळ्यात दोन अंगठ्याएवढे छोटे बेडूक सापडले.केट आणि एतिएनला ते दिसले तेव्हा त्यांची मैथूनक्रिया सुरू होती.केटने त्यांना उचलून पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं.त्यांनी अंडी घातली आणि ती जोडी वेगळी झाली की ती अंडी परत डबक्यात साठलेल्या पाण्यात सोडायची आणि ती बेडकांची जोडी नमुने म्हणून अमेरिकेत न्यायची,

असा तिचा बेत होता.


जंगलात काम करताना येणाऱ्या इतर असंख्य अडचणींमध्ये तिथल्या स्थानिकांशी जुळवून घेणं ही मुख्य समस्या होती.एतिएन आणि फ्लॉरेन्स दोघंही कमी पगाराच्या कारणाने अस्वस्थ होते.पण ठरलेला पगार वाढवणं केटला परवडणारं नव्हतं.कारण या दोघांच्या पगाराखेरीज गावकऱ्यांनी आणलेल्या सरड्यांच्या आणि बेडकांच्या नमुन्यांसाठी तिला वेगळे पैसे द्यावे लागत होते,ते वेगळंच.सरडे,भेक,

बेडूक,कासवं, वेगवेगळे साप यांचा संग्रह वाढत चालला होता;त्याबरोबरच तिच्या जवळचे पैसे कमी कमी होत होते.त्यामुळेही ती फ्लॉरेन्स आणि एतिएनला जास्त पैसे द्यायला नाखूष होती.


साधनांचा,औषधांचा तुटवडा जाणवायला लागल्यावर अखेर केटने त्या भागातलं आपलं काम थांबवण्याचं ठरवलं.जेमतेम एका दिवसात तिने आपल्या तळाची आवराआवरी केली.देशात प्रवेश करताना शासकीय लालफीत जसा त्रास देते, तितकाच त्रास देश सोडतानाही देते याचाही तिला अनुभव आला.अखेरीस एक दिवस सर्व प्राण्यांचे नमुने कुरियरने स्मिथ्सोनियनला पाठवून ती टोरोंटोकडे जाणाऱ्या विमानात बसली.


कुठलाही निसर्गशास्त्रज्ञ विशेषतः जीवशास्त्रज्ञ एखाद्या दुर्गम प्रदेशातून परतला की त्याला नेहेमीच एक त्रासदायक प्रश्न विचारला जातो,'नवीन काही सापडलं का?' पण कुठलीही नवी प्राणीजात किंवा वनस्पतीची प्रजाती ही अशी पाहताक्षणी नवी आहे,असं ठरवता येत नाही.त्या नमुन्यांचा तौलनिक अभ्यास,वर्गीकरण निश्चित करावं लागतं.नवी जात ठरवण्याचीही एक पद्धत असते. त्यासाठी त्या प्रकारच्या प्राण्यावर आधी वैज्ञानिक नियतकालिकांमधून कुठे कुठे काय काय लिहून आलंय त्याचाही अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यातून ही पूर्वीच ज्ञात असलेली एखादी दुर्मिळ प्रजाती तर नाही ना याची खात्री करावी लागते.


केटने एक मोठ्या आकाराचा बेडूक पकडला होता.

त्याचं शास्त्रीय नाव 'ऑब्रिया मासाक्ले' असं ठरलं. याचं पहिलं वर्णन १९८९ मध्ये पॅरिसमधल्या एका बेडूकतज्ज्ञ स्त्रीने केलं होतं.तिने त्या बेडकाचे संग्रहालयातले नमुनेच फक्त बघितलेले होते.तिला त्या प्रकारच्या जिवंत बेडकाची छायाचित्रं बघून खूप आनंद झाल्याचं तिने केटला कळवलं. केटने गोळा केलेल्या नमुन्यांत बरेच प्राणी दुर्मिळ होते;काही तोवर नामशेष झाल्याचंही मानलं गेलं होतं.कॅनडात परतून केटला बरीच वर्षं लोटली.दळणवळण व्यवस्थेत खूपच बदल झाला.आंतरजालाने जग जवळ आलं.काँगोतल्या बऱ्याच माणसांशी - विशेषतःजीवशास्त्रज्ञांशी - केटचा संपर्क वाढला.

आपण त्या मोहिमेत काय करायला हवं होतं,आपलं वागणं कुठं चुकलं,हे तिच्या हळूहळू लक्षात यायला लागलं.आपल्याला काँगोत परत जायचंय,या विचाराने तिच्या मनात परत जोर धरला.त्या आधी तिथली स्थानिक भाषा लिंगाला शिकून घ्यायचीच, असं तिने ठरवलं.टोरोंटोमध्ये तिने लिंगाला भाषेच्या स्वशिक्षणाची काही सोय आहे का, याची शोधाशोध सुरू केली.तिचं नशीब जोरावर होतं.वॉशिंग्टनमधल्या साम्यवादी काँगोच्या वकिलातीमार्फत टोरांटोमधल्या एका चांगल्या शिक्षकाबद्दल केटला समजलं. लिंगाला शिक्षण चालू असतानाच एकीकडे केटचं आंतरजालामार्फत वेगवेगळ्या सरीसृपतज्ज्ञांशी संपर्क साधणं चालूच होतं.


केटने डॉ.चिपाँ या ख्यातनाम सर्पतज्ज्ञासोबत काही काळ बोलिव्हियात काम केलं.त्यानंतर तिला स्मिथ्सोनियनने परत काँगोत जाण्याबद्दल विचारलं.

तिने लगेचच होकार दिला.मात्र या वेळेस तिला काँगोमधील दोन विद्यार्थी तयार करावे लागणार होते.ती काँगो प्रशासनाचीच अट होती.त्यामुळे नाइलाजाने ती त्या गोष्टीला तयार झाली.तिला दोन विद्यार्थी मिळाले- इंगेला उभयचरी प्राण्यांमध्ये रस होता;तर लिसेला सापांचा अभ्यास करायचा होता.हे सोडलं तर बाकीचे अनुभव नवे नव्हते.तीच सरकारी लाल फीत,तीच कामातली दिरंगाई. पण ते सगळं अपरिहार्य म्हणून सोसत केटने पुन्हा एकदा काँगोच्या दलदलीच्या जंगलात मुक्काम ठोकला आणि त्या दोन विद्यार्थ्यांबरोबर काम केलं. त्या दोन विद्यार्थ्यांना तयार करून स्मिथ्सोनियनसाठी भरपूर नमुने गोळा करून केटची परतायची तयारी सुरू झाली.यावेळी तिच्याकडे वेगवेगळ्या सापांचे बरेच नमुने होते,याचं कारण डॉ.चिपों यांनी तिला एक नवं तंत्र शिकवलं होतं - एका जातीचा एकच साप अखंड ठेवायचा.बाकीच्या नमुन्यांचं फक्त डोकं आणि चामडी ठेवायची,आतला भाग काढून टाकायचा.त्यामुळे तो मृतदेह कुजण्याची शक्यता राहत नाहीच;शिवाय जास्तीचं वजनही जवळ बाळगावं लागत नाही.


काँगोची तिसरी सफर पार पडली आणि केटला व्हिटमन महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापकपदी नेमणूक मिळाली.पश्चिम आफ्रिकेतील सापांची जागतिक पातळीवरची तज्ज्ञ म्हणून किर्ती मिळवलेली केट आपल्या कुटुंबासमवेत आता टोरांटोत स्थिरावली आहे.तिला एक लहान मुलगी आहे.आपल्या मुलीला कळू लागलं की तिला घेऊन परत काँगोत जायचं असं तिने ठरवलं आहे.

सरिसृपांचं आपलं लाडकं विश्व आपल्या मुलीसमोर उलगडतानाच्या जगावेगळ्या अनुभवांवर केट आणखी एखादं पुस्तक लिहील का ? 


०१.०७.२४ या लेखातील शेवटचा भाग..

१/७/२४

केट जॅक्सन - Kate Jackson

सरिसृपतज्ज्ञ केट जॅक्सनने लहानपणापासूनच त्या विषयाचा ध्यास घेतला होता.त्यात डॉक्टरेट मिळवून पुढे ती एकटीच्या जोरावर काँगोच्या अनोळखी जंगलात गेली.तिथली भाषा-संस्कृती परिचित नसतानाही तिथे ठाण मांडून राहिली.तिथल्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं विश्व तिने जगासमोर आणलं.

तिच्या विलक्षण अनुभवांविषयी... (केट जॅक्सन काँगोच्या दलदलीत ) 


वस्तुसंग्रहालयांसाठी,विशेषतः निसर्गशास्त्र

विषयक वस्तुसंग्रहालयांसाठी वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने गोळा करणं,ही विज्ञानशाखा कुणाच्याही खिजगणतीत नसते.

मुळात तिचं अस्तित्वच फार थोड्या लोकांना माहीत असतं.त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमं या विज्ञानशाखेला स्पर्श देखील करत नाहीत.केट जॅक्सन याच शाखेची अभ्यासक आहे.ती हर्पेटॉलॉजिस्ट,म्हणजे सरीसृपतज्ज्ञ आहे;अर्थात सरपटणाऱ्या प्राण्यांची अभ्यासक,केट जॅक्सनचं 'मीन अँड लोअली थिंग्ज - स्नेक्स,सायन्स अँड सर्व्हयव्हल इन काँगो' हे काँगोतील वास्तव्यात आलेल्या अनुभवांचं पुस्तक.मी हे पुस्तक अगदी तहानभूक विसरून वाचलं.इंग्रजीत ज्याला 'अनपुटडाऊनेबल' म्हणतात,म्हणजे वाचायला सुरुवात केली की परत खाली ठेवणं अशक्य,या प्रकारचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेलं असून ते इ.स.२००८ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालं.केट मूळची कॅनडातल्या टोरांटो शहरात राहणारी.तिला लहानपणापासूनच सरीसृप (रेप्टाइल्स) आणि उभयचरी (अँफिबियन) प्राण्यांची आवड होती;तिच्या मते ते तिचं एकमेव वेडच होतं.

मात्र हे वेड आपल्याला आयुष्यभर जोपासता येईल,याची मात्र तिला अजिबात कल्पना नव्हती.

टोरोंटो हायस्कूलमध्ये ती अखेरच्या वर्षात शिकत असताना शाळेतर्फे त्यांच्या वर्गावर एक तज्ज्ञ सल्लागार आला.त्याने सर्वांना 'तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं हे एका कागदावर लिहून द्या' असं सांगितलं. केटने आपल्या चिठ्ठीवर 'हर्पेटॉलॉजिस्ट'असं उत्तर लिहिलं.हर्पेटॉलॉजिस्टसाठी पुढील आयुष्यात अनेक संधी उपलब्ध असतात. प्राणीसंग्रहालय व त्यातील सपोंद्यानं, जीवशास्त्र शिक्षक किंवा प्राध्यापक,तसंच प्राण्याचे डॉक्टर हाही एक मार्ग असतोच. वेगवेगळ्या व्यवसायातले स्त्री-पुरुषही हौशी सरीसृपतज्ज्ञ असू शकतात.अर्थात तेव्हा केटला यातलं काहीही ठाऊक नव्हतं.यथावकाश तिच्या मार्गदर्शनासाठी एका तज्ज्ञाची नेमणूक केली गेली;तो 'रॉयल ओंटारियो म्युझियम' च्या सरीसृप विभागाचा व्यवस्थापक होता.त्या तज्ज्ञासोबत केटने प्रथमच एक प्राणी

संग्रहालय आंतर्बाह्य पाहिलं.बहुतेक व्यक्तींना संग्रहालयाचा दर्शनी भाग ठाऊक असतो.मात्र मोठ्या नावाजलेल्या निसर्गशास्त्रीय वस्तुसंग्रहालयांमध्ये जनसामान्य जो भाग पाहतात,ते हिमनगाचं टोक असतं. वस्तुसंग्रहालयाचा आत्मा त्याच्या तळघरात किंवा पडद्याआडच्या मागील भागात असतो.तिथे संग्रहालयातील अनेक वस्तूंचा खजिना साठवलेला असतो. नमुन्यांचा अभ्यास करून त्यांचं पृथक्करण करणं,त्यांची वर्गवारी करून त्यावर शोधनिबंध लिहिणं,आदी निसर्गशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी तिथे घडतात.केटला या गोष्टींची कल्पनाच नव्हती. 


ती मार्गदर्शकाच्या मागोमाग त्या संग्रहालयाच्या सरीसृप विभागात पोहोचली. तिथली कपाटं,

फडताळं आणि त्यामध्ये ठेवलेले सरपटणाऱ्या प्राण्यांचे असंख्य मृतदेह बघून ती थक्क झाली.हे नमुने अनेक संग्राहकांनी जगभरातून गोळा केलेले होते. त्यातले काही तर साठ- सत्तर वर्षांपूर्वीपासून संग्रहालयाच्या साठवणीत होते.तिथल्या सर्पविभागात तिने एका भल्यामोठ्या बरणीमध्ये ठेवलेला एक नाग बघितला. तोवर तिने नागाचं केवळ नाव ऐकलेलं होतं. इतरही अशाच अनेक प्राण्यांचं पहिलं दर्शन तिला तिथे झालं.केटला तिच्या मार्गदर्शकाने एका वेगळ्या विभागात नेलं.त्या ठिकाणी टोरांटो आणि जवळपासच्या इतर शहरातील प्राणीसंग्रहालयात मरण पावलेल्या प्राण्यांचे देह पुढील प्रक्रियेसाठी ठेवले होते.सांगाडा मिळवण्यासाठी आधी या मृत प्राण्याचं कातडं पद्धतशीरपणे सोलून काढावं लागतं. ते वेगळं जपून ठेवलं जातं.नंतर त्या सांगाड्यावरचं सर्व मांस,स्नायू वगैरे गोष्टी खरवडून काढाव्या लागतात.नंतर हाडांवरचं उरलंसुरलं मांस खाऊन हाडं साफ करणारे कीटक या सांगाड्यावर सोडले जातात.सांगाड्याच्या आकारानुसार कीटकांचं प्रमाण ठरतं.साधारणपणे एका दिवसात ते सांगाडा स्वच्छ आणि मांसविरहित करतात. केटने पहिल्याच दिवशी एक घोरपड,एक नाग आणि एक छोटी सुसर साफ केले.ती सलग सहा तास त्या कामात पूर्णपणे गुंगून गेली होती.


अखेर संग्रहालयाची वेळ संपत आल्याने तिला तिथून निघावं लागलं.या अनुभवामुळे केटला तिच्या पुढल्या कामाची एका अथनि दिशा मिळाली.तिला पदवी परीक्षापूर्व अनुभव घेण्यासाठी स्मिथ्सोनियन या जगप्रसिद्ध निसर्गशास्त्र संग्रहालयात एक सत्र काम करण्याची संधी मिळाली.तिथेही ती सरीसृप विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाली.तिथे तिला सापांच्या विषग्रंथी आणि दंशसुळे यांचा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली अभ्यास करता आला.स्मिथ्सोनियनमध्ये उत्कृष्ट काम केल्याचं प्रशस्तीपत्र मिळाल्यामुळे केटला हार्वर्डसारख्या प्रख्यात विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी सहज प्रवेश मिळाला.हॉर्वर्ड विद्यापीठाचं तौलनिक प्राणीशास्त्र (कंपरेटिव्ह झूलॉजी) विभागाचं संग्रहालय अगदी स्मिथ्सोनियनच्या तोडीचं असल्यामुळे केट तिथेही छान रुळली.तिथे तिला सरीसृप विभागाला लागूनच असलेली एक खोली आणि सरीसृप विभागाची किल्ली देण्यात आली.

त्यामुळे रात्री किंवा पहाटे जाग आल्यानंतर कुठल्याही वेळी ती संग्रहालयात जाऊन हव्या त्या कलेवराचा अभ्यास करू शकत असे.


केटने डॉक्टरेट मिळवण्यासाठी संशोधन सुरू केलं.तेव्हा निसर्गशास्त्राचे नमुने गोळा करून काय मिळतं या प्रश्नाचं उत्तर शोधायलाही सुरुवात केली. 


पृथ्वीवर प्रामुख्याने विषुववृत्तीय पर्जन्यारण्यांमध्ये जीववैविध्य आढळतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही निसर्गसंपत्ती ज्या देशांमध्ये आढळते त्या देशांमध्ये पृथ्वीवरील सर्वात गरीब लोक राहतात.त्यांची जगण्यासाठीची धडपड इतकी कष्टप्रद असते,की त्यांना निसर्गरक्षण वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्यास फुरसत नसते.मग जीववैविध्य वगैरे गोष्टींना केवळ चैन समजायचं का,हा प्रश्न केटने एक दिवस त्यांच्या साप्ताहिक सामूहिक कॉफीपानाच्या वेळी उपस्थित केला.तेव्हा एका विद्यार्थ्यान तिला सविस्तर उत्तरातून समजावून दिलं,की 'प्रत्येक सजीवाचं त्या त्या परिस्थिती प्रणालीत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असतं.

जर तो सजीव त्या परिस्थिती प्रणालीतून काढून घेतला तर ती प्रणाली डळमळीत होते.त्याचे एकंदर परिस्थितीवर खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात.' ते ऐकून केटला तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं,असं वाटलं.


केट रात्री उशीरापर्यंत एकेका नमुन्याचा अभ्यास करत बसायची.ते नमुने गोळा केलेल्या संशोधकाचं नाव विस्मृतीत गेलेलं असायचं;नमुने जिथून आणले गेले होते त्या भूप्रदेशांची नावंही तिला अनेकदा अज्ञात असायची.मात्र,आपल्याला अशी कुठेतरी दूरवर जायची संधी कधी मिळेल,याचा ती विचार करायची.तिने आपल्या पीएच.डी.च्या संशोधनासाठी जाणीवपूर्वक हॉर्वर्ड विद्यापीठाची निवड केली होती.

तिला ज्या सहाय्यक प्राध्यापकांच्या हाताखाली काम करायची इच्छा होती.त्यांच्या साहसांच्या कहाण्या जगभरच्या प्राणीशास्त्रीय जगामध्ये गाजत होत्या.

त्यांनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलांमधून सजीवांचे विशेषतः होरीसृपांचे अतिशय दुर्मिळ नमुने गोळा केले होते.मात्र ते मनस्वी वृत्तीचे एकांडे शिलेदार होते.(हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)त्यांना आपल्या मोहिमांमध्ये विद्याथ्यर्थ्यांचं लोढणं बरोबर न्यायची इच्छाच नव्हती.


केटला त्यांनी तसं स्पष्टच सांगितलं होतं;वर 'तुझा प्रश्न तूच सोडव, कुठं जायचंय ते तूच ठरव' असा सल्लाही दिला होता.'त्यामुळे केट खूप निराश झाली. शिवाय,कुठल्यातरी अज्ञात प्रदेशात जायचं, तिथे कुणाच्याही मदतीशिवाय काम करायचं,आपल्या चुका सुधारून योग्य मार्ग दाखवायला तिथे कुणीच नसणार,या कल्पनेनेच तिला काही सुचेनासं झालं.ती म्हणते,'मला एक दुःस्वप्न सतत घाबरवायचं.मी कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या कोपऱ्यातल्या एका जंगलात एकटीच काम करते आहे.तिथं मला एक महाविषारी साप मिळतो.मी त्याला बिनविषारी समजून पकडते.तो साप मला डसतो.मग मला एक कोडं पडायचं.मी उपचार करून घ्यायला लगेचच गेले नाही तर मी नक्की मरणार; पण जर मी उपचार करून घ्यायला गेले तर माझ्या मार्गदर्शकाला,मी साप विषारी की बिनविषारी हे ओळखू शकले नाही,

हे कळणार.आता काय करायचं,या पेचात सापडून मी जागी होत असे.'


या दुःस्वप्नातून सुटका करवून घेण्यासाठी केटने एक मार्ग शोधला.तिने ॲटलास उघडला आणि पृथ्वीवर कुठे कुठे निबीड अरण्यं शिल्लक आहेत,हे पाहायला सुरुवात केली.या शोधात तिला मध्य आफ्रिकेतल्या काँगो नदीच्या खोऱ्यातलं घनदाट अरण्य खुणावायला लागलं.या जंगलातल्या सरीसृपांबद्दल तेव्हा कुणालाच जवळजवळ काहीच माहीत नव्हतं.

याचं कारण काँगोच्या परिसरात कुणीच सरीसृपतज्ज्ञ कधीच गेलेला नव्हता.केटने तिथे जाण्याचा निर्णय घेतला.तेव्हा तिला त्या भूभागाबद्दल कोणतीही माहिती नव्हती.पण अज्ञानात सुख असतं,असं म्हणतात.प्रत्यक्षात तिथल्या परिस्थितीची कल्पना असती तर तिने हा निर्णय कधीच घेतला नसता,असं पश्चातबुद्धीने म्हणता येतं.


केटची पहिली काँगो-मोहिम अल्पजीवी ठरली.तिथे झालेल्या क्रांतीमुळे तिला तडकाफडकी देश सोडावा लागला.या पहिल्या मोहिमेबद्दल ती काय म्हणते,ते बघा- 'माझ्या मार्गदर्शकानं सांगितल्यानुसार मी एकटीच या मोहिमेवर गेले.माझ्या हातून काही वेळा मीच माझ्यावर अतिशय धोकादायक प्रसंग ओढवून घेतले.त्यातून मार्ग काढायला माझी मीच शिकले. काँगोच्या परिचयाचा हा पहिला धडा होता.मी काँगोत पाऊल ठेवलं आणि तिथं यादवी युद्धाला सुरुवात झाली.पण काँगोबाहेर पडताकच माझ्या मनामध्ये काँगोला पुन्हा परतायचं हा निश्चय पक्का झाला होता.'मध्ये सात वर्ष गेली.केटने 'सापांच्या शरीरांतर्गत रचनेची वैशिष्ट्ये' या विषयात पीएच.

डी.मिळवली.तिचा प्रबंध वाखाणला गेला.पुढील संशोधनासाठी ती हात धुवून सुसरींच्या मागे लागली;

पण तिच्या डोक्यातून काँगो काही हटायला तयार नव्हतं.सुसरींच्या अभ्यासासाठी मिळालेली शिष्यवृत्ती थांबली,तेव्हा तिने परत काँगोला जायचा निर्णय घेतला.काँगो हा दोन देशांत विभागलेला भूप्रदेश आहे.यातला मोठा देश म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. याची राजधानी किन्शासा.

केटने जिथे काम केलं तो काँगोचा प्रदेश काँगो नदीच्या वायव्येस असून त्याची राजधानी ब्राझाव्हिल आहे.या दोन देशांची विभागणी काँगो नदीमुळे झालेली आहे;ही नदीच त्यांची सीमारेषा आहे.या काँगो-ब्राझाव्हिलचा उत्तरेकडचा एक तृतीयांश भाग घनदाट अरण्याने व्यापलेला आहे.


कुठल्याही प्रकारची मोहीम काढायची असेल तर त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते, हे पहिल्या मोहिमेच्या अनुभवातून केट शिकली होती.सर्वप्रथम अशा मोहिमेसाठी आर्थिक तरतूद करणं आवश्यक असतं. सुदैवाने स्मिथ्सोनियन संग्रहालयाने तिला काँगोतील प्राण्यांच्या नमुन्यांच्या बदल्यात आर्थिक मदत देऊ केली.आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भूभागात जायचं तिथल्या लोकांशी संपर्क साधणं आणि शासकीय परवानग्या मिळवणं. १९९६ साली केटला जेव्हा तिथल्या राज्यक्रांतीमुळे घाईघाईने तो देश सोडावा लागला होता,त्यावेळी तिच्या काहीजणांशी ओळखी झाल्या होत्या.पण आता त्यातल्या कुणाशीही तिचा संपर्क होऊ शकत नव्हता. क्रांतीने त्यांना गिळलं होतं.मात्र तिला अनपेक्षित मदत मिळाली ती फ्रान्समधल्या संशोधन विभागाची.त्या विभागाच्या ब्राझाव्हिल इथल्या प्रतिनिधीने तिच्या अर्जातल्या फ्रेंच भाषेत सुधारणा केल्या; इतर काही गोष्टी सुचवल्या आणि तिला हव्या त्या परवानग्या मिळवून दिल्या.त्याने सुचवलेल्या गोष्टींतील एक सूचनेनुसार केटने आपल्या मोहिमेत ५-६ स्थानिक तरुणांना सरीसृपविज्ञानाचं प्रशिक्षण देणं अपेक्षित होतं.केटने पूर्वतयारी केली आणि ब्राझाव्हिल-काँगोच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.


शिल्लक राहिलेला भाग ०३.०७.२४ या दिवशीच्या लेखांमध्ये..!

२९/६/२४

गब्बरसिंगची जोडीदार - Spouse of Gabbar Singh

▶ राजा बिबट्या नव्या पिंजऱ्यात स्थिरावल्यावर त्याचा जुना पिंजरा रिकामा होता.गब्बरसिंगला छानसं घर मिळालं. पकडताना आम्हाला हुलकावणी देणारा गब्बरसिंग पार्कमध्ये आल्यावरही थोड्या नाखुषीनेच रुळला.गब्बर बुद्धिमान तर होताच,पण रुबाबदारही होता.एखाद्या कसलेल्या व्यायामपटूसारखे त्याचे स्नायू मजबूत होते.नजर शोधक आणि भेदक होती.त्याचा सगळा थाट एखाद्या राजपुत्राला शोभेल असा होता.त्याच्या आवडीही अगदी उच्चभ्रू होत्या.काजू,बदाम,

केळी,सफरचंदं आणि उकडलेलं अंडं असा त्याचा रोजचा खुराक होता.आमच्याकडे हिसस जातीचं दुसरं माकड नसल्यामुळे त्याला एकट्यालाच ठेवणं भाग होतं.हे माकड मंकी हिलवर इतर भाईबंदांसोबत राहू शकेल अशी शक्यता नव्हती.त्यामुळे एक तर त्याला त्याच्या अधिवासात सोडणं आवश्यक होतं,किंवा त्याला जोडीदार शोधणं तरी.('सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक-समकालीन प्रकाशन पुणे)


त्यानंतर थोड्याच दिवसांतली गोष्ट.हिंजवडी परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बांधकामं सुरू होती.तिथल्या एका बांधकामावर कासारवाडीच्या झोपडपट्टीतील एक बाई काम करत होती.एके दिवशी दुपारी झाडाखाली बसून जेवण करत असताना त्या झाडावरून लाल तोंडाचं एक माकड तिच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं.बहुतेक उपाशी असावं.बाईने त्याला थोडी भाकरी दिली. त्याने ती अधाशासारखी खाल्ली.थोडं बेसनही चाखलं.पाणी प्यायलं आणि मुकाट झाडावर जाऊन बसलं.दिवस संपल्यावर त्या मावशी इतर बायकांसोबत लगबगीने बसस्टॉपकडे निघाल्या.हे माकड झाडावरून उतरून त्यांच्यासोबत चालू लागलं.बाई आणि त्यांच्या मैत्रिणीने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला;पण ते अगदी केविलवाणा चेहरा करून त्या बाईंकडे पाहत राहिलं. बाईंनाही दया आली.त्यांनी माकडाला कडेवर घेतलं आणि त्या चालू लागल्या.पण बस कंडक्टरने मात्र त्या माकडाला आत घ्यायला साफ नकार दिला.हे माकड काही बाईच्या खांद्यावरून उतरेना.

शेवटी बाई चालतच निघाल्या,वाटेत एका सिक्स सीटरवाल्याला त्यांची दया आली.त्याने या बाईंना माकडासहित घरी पोहोचवलं. बाईंच्या कुटुंबाबरोबर या माकडालाही जेवण मिळालं,सारेजण झोपल्यावर हे माकड छताच्या पत्र्यावर जाऊन झोपून गेलं.


दुसऱ्या दिवशी सकाळी वस्तीतल्या कुणी तरी आम्हाला कॉल केला,गाडी घेऊन आम्ही कासारवाडी गाठली,तेव्हाही ते माकड पत्र्यावरच बसून होतं.

सुंदर,गुबगुबीत देखणी हिसस मादी होती ती.बाईंच्या मदतीने तिला खाणं दाखवून घरात घेतली.दार लावून मोठ्या रिंग स्टिकमध्ये पकडली,तिला पकडलं आणि गाडीत टाकून निघालो,तर बाईंचे डोळे पाण्याने डबडबलेले.एवढ्याशा काळात त्यांना या माकडिणीचा केवढा लळा लागला होता! मी त्यांना समजावलं.म्हटलं, "अजिबात काळजी करू नका.आम्ही छान बडदास्त राखू तुमच्या गंगूबाईची." तोंडात एक नाव आलं,ते मी म्हणून गेलो.पुढे तेच तिचं नाव पडलं.असा रीतीने आमच्या गब्बरला जोडीदार मिळाली.


गंगूबाईला पहिल्या दिवशी गब्बरसिंगच्या पिंजऱ्यातल्या ट्रॅपिंग सेक्शनमध्ये ठेवलं. दोघांना एकत्र ठेवता येईल का याचा मला अंदाज घ्यायचा होता.दोघांची प्रतिक्रिया काय होते ते बघायचं होतं.दोघांनीही एकमेकांना काही विरोध दर्शवला नाही. उलट,त्यांच्यात काही मूकसंवाद झाला असावा.कारण दोन दिवसांनी मी गंगूबाईला गब्बरच्या पिंजऱ्यात सोडलं तेव्हा वाट बघत असल्यासारखे ते एकमेकांशी खेळू लागले. रात्री नऊ वाजता मी राऊंडला आलो,तेव्हा बॅटरीचा झोत टाकून हे दोघं कुठे आहेत ते पाहू लागलो,तर दोघं एकमेकांच्या मिठीत विसावलेले! मी झटकन बॅटरी बंद केली आणि सॉरी म्हणून तिथून पसार झालो.


गंगूबाईसुद्धा तरुण आणि देखणी माकडीण होती.तिचे डोळे खूपच बोलके होते.तिला काय हवं-काय नको ते आम्हाला तिच्या डोळ्यांमधले भावच सांगायचे.स्वभावाने ती चांगलीच अल्लड होती.

आम्ही तिला मोठ्या प्रेमाने खायला दिलेला एखादा नवा पदार्थ आवडला नाही तर ती सरळ पिंजऱ्याबाहेर फेकून द्यायची.


एकदा गंमत झाली.अधूनमधून पार्कमध्ये चक्कर टाकणारं मांजराचं एक पिल्लू कुठून भरकटत त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलं.म्याव म्याव करत थेट आतच शिरलं.बाहेरच्या लोकांना वाटलं,आता मांजराचं काही खरं नाही;पण झालं उलटंच,गंगूबाई हलकेच पुढे सरकली.मोठ्या मायेने तिने मांजराचं पिल्लू छातीशी धरलं,कुरवाळलं,पापे घेतले.या अति प्रेमाने पिल्लू गांगरलं.थोडा वेळ प्रेक्षकांची करमणूक झाली;

पण बराच वेळ झाला तरी गंगूबाई त्या पिल्लाला सोडेना तेव्हा मात्र आम्हाला काळजी वाटू लागली.

पिल्लू अस्वस्थ झालं,सुटायचा प्रयत्न करू लागलं. गुदमरतं की काय असं वाटू लागलं तरी हिची 'माया माया' चालूच ! शेवटी आम्ही चुचकारून,खाण्याचं आमिष दाखवून तिच्या हातून ते पिल्लू काढून घेतलं.दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची एकदाची सुटका केली.ते पिल्लू नंतर त्या पिंजऱ्याच्या जवळपासही कधी फिरकलं नाही.


वर्षभरामध्ये गंगूबाईला स्वतःचंच पिल्लू मिळालं.तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.इवलेसे डोळे आणि अंगावरची सोनेरी लव यामुळे आम्ही त्याचं नाव ठेवलं - सोन्या. पार्कमधल्या आम्हा सगळ्यांना तर आनंद झालात,पण पार्कमध्ये नेहमी येणारे प्रेक्षकही अतिशय खूष होते.एका काकांनी तर आनंदाने सगळ्यांना लाडू वाटले.अगदी थोड्या दिवसांत गब्बरसिंग आणि गंगूबाईंनी लोकांची मनं जिंकली होती,त्याचाच हा पुरावा होता.


काही नोंदी वाचताना वेचलेल्या..


एखादा पदार्थ किंवा धान्य /भाजी खाण्याजोगे करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्यावर करतो ? बघुया किती आठवतात ते .....


१) खुडून २) निवडून ३) पाखडून ४) चाळून ५) वेचून ६) दळून ७) कांडून ८) मळून ९) भिजवून १०) शिजवून ११) भाजून १२) परतून १३) गाळून १४) धुवून १५) वाळवून १६) आटवून १७) मुरवून १८) तळून १९) लाटून २०) पसरुन २१) वाफवून २२) कुटून २३) वाटून २४) कालवून २५) साठवून २६) खारवून २७) पाकवून २८) ठेचून २९) सोलून ३०) चिरुन ३१) कापून ३२) नासवून ३३) फेटून ३४) ढवळून ३५) उकळून ३६) वळून ३७) थापून ३८) उकडून ३९) उलथवून ४०) तिंबून ४१) मिसळून ४२) घुसळून ४३) चोचवून ४४) कातरून ४५) फोडून ४६) पाडून ४७) ओतून ४८) काढून ४९) झाकून ५०) खरवडून ५१) विरजून ५२) गुंडाळून ५३) बांधून ५४) टांगून ५५) रांधून ५६) कुस्करुन ५७) चापून ५८ ) पेरून ५९) कोचून ६०) उगाळून ६१) आंबवून ६२) उकडवून ६३) फुंकून ६४) वाफवून ६५) आधण आणून ६६) खोवून ६७) घोळून ६८) रोळून ६९) चेचून ७०) परतून ७१) चुरून ७२) चुरडून ७३) निथळून ७४) हलवून ७५)सारखं करून ७६) भुरभुरून ७७) लावून ७८) भरून ७९) किसून ८०) चिकटवून ८१) मुरडून ८२) फेसून ८३)चिंबवून ८४) बरबटून ८५) पसरून ८६) वेळून ८७) बुडवून ८८) कुस्करून


फक्त मराठी 'भाषे'त मिळणारे खाद्यपदार्थ. 

चापटपोळी,धम्मकलाडू,बोलाची कढी

उतू आणलेली शिळी कढी,बोलाचा भात 

तिंबलेली कणीक,नाकाने सोललेले कांदे 

नाकाला झोंबणाऱ्या मिरच्या

भ्रमाचा भोपळा,पाठीचे धिरडे 

कानामागून येऊन झालेले तिखट 

डोक्यातील कांदे-बटाटे,मनातील मांडे 

डोक्यावर वाटलेल्या मिऱ्या 

हास्याची खसखस,इज्जतीचा फालुदा, 

अक्षतांच्या वाटाण्याची उसळ 

पुराणातील (भरलेली) वांगी

न  शिजणारी डाळ

अंगाचा होणारा तिळपापड 

नावडतीचे अळणी मीठ,

चर्चेचं कडबोळे,अमिषाचं गाजर

पुंगी बनवायचे गाजर

लपवलेल्या भांड्यातील ताक

बाजारातील तुरी

हातावर दिलेल्या तुरी

ताकास लावलेली तूर,पचका वडा

लाडीगोडी लावायचा मस्का (लोणी) 

कोल्ह्याला आंबट असणारी द्राक्षे

कोल्हा राजी असणारी काकडी

स्वतः च्याच पोळीवर वाढलेले तूप

आवळा देऊन काढलेला कोहळा

गोरी होण्यासाठी प्यायची हळद

अकलेचा कांदा,डोक्याचं भजं

डोक्याच दही,रगील दोडका

भ्रमाचा भोपळा... 


एक मजेशीर घटना..


१९०१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपले अधिकृत सल्लागार असणा-या बुकर टी वॉशिंग्टन यांना 'व्हाइट हाउस'वर डिनरला बोलावले. वॉशिंग्टन हे प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक.

पण,ते कृष्णवर्णीय.मग काय! 'व्हाइट हाउस'मध्ये 'ब्लॅक' माणूस गेलाच कसा,असा प्रश्न विचारत अमेरिकेतले कडवे गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी 'व्हाइट हाऊस' धुऊन काढले. त्यानंतर पुढची तीस वर्षे 'व्हाइट हाऊस'कडे कोणी 'ब्लॅक' फिरकू शकला नाही.कोण्या अध्यक्षाची तशी हिंमतही झाली नाही.आणि,हाच तो काळ होता,ज्या काळात

राजर्षी शाहू महाराज आपल्याकडे कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमनपद तत्कालीन 'अस्पृश्य' माणसाकडे देत होते.अस्पृश्यांचे अवघे शिक्षण मोफत करत होते.त्यांच्यासाठी वसतिगृहे उभी करत होते. आंतरजातीय लग्नं लावत होते. महिलांसाठी वेगवेगळे कायदे करत, त्यांना माणूसपणाचे सगळे हक्क देत होते. विरोधाची तमा न बाळगता, धर्मसत्तेला आव्हान देत होते. 


एखादा माणूस काळाच्या किती पुढे असावा! 


- संजय आवटे