सरिसृपतज्ज्ञ केट जॅक्सनने लहानपणापासूनच त्या विषयाचा ध्यास घेतला होता.त्यात डॉक्टरेट मिळवून पुढे ती एकटीच्या जोरावर काँगोच्या अनोळखी जंगलात गेली.तिथली भाषा-संस्कृती परिचित नसतानाही तिथे ठाण मांडून राहिली.तिथल्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं विश्व तिने जगासमोर आणलं.
तिच्या विलक्षण अनुभवांविषयी... (केट जॅक्सन काँगोच्या दलदलीत )
वस्तुसंग्रहालयांसाठी,विशेषतः निसर्गशास्त्र
विषयक वस्तुसंग्रहालयांसाठी वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने गोळा करणं,ही विज्ञानशाखा कुणाच्याही खिजगणतीत नसते.
मुळात तिचं अस्तित्वच फार थोड्या लोकांना माहीत असतं.त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमं या विज्ञानशाखेला स्पर्श देखील करत नाहीत.केट जॅक्सन याच शाखेची अभ्यासक आहे.ती हर्पेटॉलॉजिस्ट,म्हणजे सरीसृपतज्ज्ञ आहे;अर्थात सरपटणाऱ्या प्राण्यांची अभ्यासक,केट जॅक्सनचं 'मीन अँड लोअली थिंग्ज - स्नेक्स,सायन्स अँड सर्व्हयव्हल इन काँगो' हे काँगोतील वास्तव्यात आलेल्या अनुभवांचं पुस्तक.मी हे पुस्तक अगदी तहानभूक विसरून वाचलं.इंग्रजीत ज्याला 'अनपुटडाऊनेबल' म्हणतात,म्हणजे वाचायला सुरुवात केली की परत खाली ठेवणं अशक्य,या प्रकारचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेलं असून ते इ.स.२००८ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालं.केट मूळची कॅनडातल्या टोरांटो शहरात राहणारी.तिला लहानपणापासूनच सरीसृप (रेप्टाइल्स) आणि उभयचरी (अँफिबियन) प्राण्यांची आवड होती;तिच्या मते ते तिचं एकमेव वेडच होतं.
मात्र हे वेड आपल्याला आयुष्यभर जोपासता येईल,याची मात्र तिला अजिबात कल्पना नव्हती.
टोरोंटो हायस्कूलमध्ये ती अखेरच्या वर्षात शिकत असताना शाळेतर्फे त्यांच्या वर्गावर एक तज्ज्ञ सल्लागार आला.त्याने सर्वांना 'तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं हे एका कागदावर लिहून द्या' असं सांगितलं. केटने आपल्या चिठ्ठीवर 'हर्पेटॉलॉजिस्ट'असं उत्तर लिहिलं.हर्पेटॉलॉजिस्टसाठी पुढील आयुष्यात अनेक संधी उपलब्ध असतात. प्राणीसंग्रहालय व त्यातील सपोंद्यानं, जीवशास्त्र शिक्षक किंवा प्राध्यापक,तसंच प्राण्याचे डॉक्टर हाही एक मार्ग असतोच. वेगवेगळ्या व्यवसायातले स्त्री-पुरुषही हौशी सरीसृपतज्ज्ञ असू शकतात.अर्थात तेव्हा केटला यातलं काहीही ठाऊक नव्हतं.यथावकाश तिच्या मार्गदर्शनासाठी एका तज्ज्ञाची नेमणूक केली गेली;तो 'रॉयल ओंटारियो म्युझियम' च्या सरीसृप विभागाचा व्यवस्थापक होता.त्या तज्ज्ञासोबत केटने प्रथमच एक प्राणी
संग्रहालय आंतर्बाह्य पाहिलं.बहुतेक व्यक्तींना संग्रहालयाचा दर्शनी भाग ठाऊक असतो.मात्र मोठ्या नावाजलेल्या निसर्गशास्त्रीय वस्तुसंग्रहालयांमध्ये जनसामान्य जो भाग पाहतात,ते हिमनगाचं टोक असतं. वस्तुसंग्रहालयाचा आत्मा त्याच्या तळघरात किंवा पडद्याआडच्या मागील भागात असतो.तिथे संग्रहालयातील अनेक वस्तूंचा खजिना साठवलेला असतो. नमुन्यांचा अभ्यास करून त्यांचं पृथक्करण करणं,त्यांची वर्गवारी करून त्यावर शोधनिबंध लिहिणं,आदी निसर्गशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी तिथे घडतात.केटला या गोष्टींची कल्पनाच नव्हती.
ती मार्गदर्शकाच्या मागोमाग त्या संग्रहालयाच्या सरीसृप विभागात पोहोचली. तिथली कपाटं,
फडताळं आणि त्यामध्ये ठेवलेले सरपटणाऱ्या प्राण्यांचे असंख्य मृतदेह बघून ती थक्क झाली.हे नमुने अनेक संग्राहकांनी जगभरातून गोळा केलेले होते. त्यातले काही तर साठ- सत्तर वर्षांपूर्वीपासून संग्रहालयाच्या साठवणीत होते.तिथल्या सर्पविभागात तिने एका भल्यामोठ्या बरणीमध्ये ठेवलेला एक नाग बघितला. तोवर तिने नागाचं केवळ नाव ऐकलेलं होतं. इतरही अशाच अनेक प्राण्यांचं पहिलं दर्शन तिला तिथे झालं.केटला तिच्या मार्गदर्शकाने एका वेगळ्या विभागात नेलं.त्या ठिकाणी टोरांटो आणि जवळपासच्या इतर शहरातील प्राणीसंग्रहालयात मरण पावलेल्या प्राण्यांचे देह पुढील प्रक्रियेसाठी ठेवले होते.सांगाडा मिळवण्यासाठी आधी या मृत प्राण्याचं कातडं पद्धतशीरपणे सोलून काढावं लागतं. ते वेगळं जपून ठेवलं जातं.नंतर त्या सांगाड्यावरचं सर्व मांस,स्नायू वगैरे गोष्टी खरवडून काढाव्या लागतात.नंतर हाडांवरचं उरलंसुरलं मांस खाऊन हाडं साफ करणारे कीटक या सांगाड्यावर सोडले जातात.सांगाड्याच्या आकारानुसार कीटकांचं प्रमाण ठरतं.साधारणपणे एका दिवसात ते सांगाडा स्वच्छ आणि मांसविरहित करतात. केटने पहिल्याच दिवशी एक घोरपड,एक नाग आणि एक छोटी सुसर साफ केले.ती सलग सहा तास त्या कामात पूर्णपणे गुंगून गेली होती.
अखेर संग्रहालयाची वेळ संपत आल्याने तिला तिथून निघावं लागलं.या अनुभवामुळे केटला तिच्या पुढल्या कामाची एका अथनि दिशा मिळाली.तिला पदवी परीक्षापूर्व अनुभव घेण्यासाठी स्मिथ्सोनियन या जगप्रसिद्ध निसर्गशास्त्र संग्रहालयात एक सत्र काम करण्याची संधी मिळाली.तिथेही ती सरीसृप विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाली.तिथे तिला सापांच्या विषग्रंथी आणि दंशसुळे यांचा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली अभ्यास करता आला.स्मिथ्सोनियनमध्ये उत्कृष्ट काम केल्याचं प्रशस्तीपत्र मिळाल्यामुळे केटला हार्वर्डसारख्या प्रख्यात विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी सहज प्रवेश मिळाला.हॉर्वर्ड विद्यापीठाचं तौलनिक प्राणीशास्त्र (कंपरेटिव्ह झूलॉजी) विभागाचं संग्रहालय अगदी स्मिथ्सोनियनच्या तोडीचं असल्यामुळे केट तिथेही छान रुळली.तिथे तिला सरीसृप विभागाला लागूनच असलेली एक खोली आणि सरीसृप विभागाची किल्ली देण्यात आली.
त्यामुळे रात्री किंवा पहाटे जाग आल्यानंतर कुठल्याही वेळी ती संग्रहालयात जाऊन हव्या त्या कलेवराचा अभ्यास करू शकत असे.
केटने डॉक्टरेट मिळवण्यासाठी संशोधन सुरू केलं.तेव्हा निसर्गशास्त्राचे नमुने गोळा करून काय मिळतं या प्रश्नाचं उत्तर शोधायलाही सुरुवात केली.
पृथ्वीवर प्रामुख्याने विषुववृत्तीय पर्जन्यारण्यांमध्ये जीववैविध्य आढळतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही निसर्गसंपत्ती ज्या देशांमध्ये आढळते त्या देशांमध्ये पृथ्वीवरील सर्वात गरीब लोक राहतात.त्यांची जगण्यासाठीची धडपड इतकी कष्टप्रद असते,की त्यांना निसर्गरक्षण वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्यास फुरसत नसते.मग जीववैविध्य वगैरे गोष्टींना केवळ चैन समजायचं का,हा प्रश्न केटने एक दिवस त्यांच्या साप्ताहिक सामूहिक कॉफीपानाच्या वेळी उपस्थित केला.तेव्हा एका विद्यार्थ्यान तिला सविस्तर उत्तरातून समजावून दिलं,की 'प्रत्येक सजीवाचं त्या त्या परिस्थिती प्रणालीत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असतं.
जर तो सजीव त्या परिस्थिती प्रणालीतून काढून घेतला तर ती प्रणाली डळमळीत होते.त्याचे एकंदर परिस्थितीवर खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात.' ते ऐकून केटला तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं,असं वाटलं.
केट रात्री उशीरापर्यंत एकेका नमुन्याचा अभ्यास करत बसायची.ते नमुने गोळा केलेल्या संशोधकाचं नाव विस्मृतीत गेलेलं असायचं;नमुने जिथून आणले गेले होते त्या भूप्रदेशांची नावंही तिला अनेकदा अज्ञात असायची.मात्र,आपल्याला अशी कुठेतरी दूरवर जायची संधी कधी मिळेल,याचा ती विचार करायची.तिने आपल्या पीएच.डी.च्या संशोधनासाठी जाणीवपूर्वक हॉर्वर्ड विद्यापीठाची निवड केली होती.
तिला ज्या सहाय्यक प्राध्यापकांच्या हाताखाली काम करायची इच्छा होती.त्यांच्या साहसांच्या कहाण्या जगभरच्या प्राणीशास्त्रीय जगामध्ये गाजत होत्या.
त्यांनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलांमधून सजीवांचे विशेषतः होरीसृपांचे अतिशय दुर्मिळ नमुने गोळा केले होते.मात्र ते मनस्वी वृत्तीचे एकांडे शिलेदार होते.(हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)त्यांना आपल्या मोहिमांमध्ये विद्याथ्यर्थ्यांचं लोढणं बरोबर न्यायची इच्छाच नव्हती.
केटला त्यांनी तसं स्पष्टच सांगितलं होतं;वर 'तुझा प्रश्न तूच सोडव, कुठं जायचंय ते तूच ठरव' असा सल्लाही दिला होता.'त्यामुळे केट खूप निराश झाली. शिवाय,कुठल्यातरी अज्ञात प्रदेशात जायचं, तिथे कुणाच्याही मदतीशिवाय काम करायचं,आपल्या चुका सुधारून योग्य मार्ग दाखवायला तिथे कुणीच नसणार,या कल्पनेनेच तिला काही सुचेनासं झालं.ती म्हणते,'मला एक दुःस्वप्न सतत घाबरवायचं.मी कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या कोपऱ्यातल्या एका जंगलात एकटीच काम करते आहे.तिथं मला एक महाविषारी साप मिळतो.मी त्याला बिनविषारी समजून पकडते.तो साप मला डसतो.मग मला एक कोडं पडायचं.मी उपचार करून घ्यायला लगेचच गेले नाही तर मी नक्की मरणार; पण जर मी उपचार करून घ्यायला गेले तर माझ्या मार्गदर्शकाला,मी साप विषारी की बिनविषारी हे ओळखू शकले नाही,
हे कळणार.आता काय करायचं,या पेचात सापडून मी जागी होत असे.'
या दुःस्वप्नातून सुटका करवून घेण्यासाठी केटने एक मार्ग शोधला.तिने ॲटलास उघडला आणि पृथ्वीवर कुठे कुठे निबीड अरण्यं शिल्लक आहेत,हे पाहायला सुरुवात केली.या शोधात तिला मध्य आफ्रिकेतल्या काँगो नदीच्या खोऱ्यातलं घनदाट अरण्य खुणावायला लागलं.या जंगलातल्या सरीसृपांबद्दल तेव्हा कुणालाच जवळजवळ काहीच माहीत नव्हतं.
याचं कारण काँगोच्या परिसरात कुणीच सरीसृपतज्ज्ञ कधीच गेलेला नव्हता.केटने तिथे जाण्याचा निर्णय घेतला.तेव्हा तिला त्या भूभागाबद्दल कोणतीही माहिती नव्हती.पण अज्ञानात सुख असतं,असं म्हणतात.प्रत्यक्षात तिथल्या परिस्थितीची कल्पना असती तर तिने हा निर्णय कधीच घेतला नसता,असं पश्चातबुद्धीने म्हणता येतं.
केटची पहिली काँगो-मोहिम अल्पजीवी ठरली.तिथे झालेल्या क्रांतीमुळे तिला तडकाफडकी देश सोडावा लागला.या पहिल्या मोहिमेबद्दल ती काय म्हणते,ते बघा- 'माझ्या मार्गदर्शकानं सांगितल्यानुसार मी एकटीच या मोहिमेवर गेले.माझ्या हातून काही वेळा मीच माझ्यावर अतिशय धोकादायक प्रसंग ओढवून घेतले.त्यातून मार्ग काढायला माझी मीच शिकले. काँगोच्या परिचयाचा हा पहिला धडा होता.मी काँगोत पाऊल ठेवलं आणि तिथं यादवी युद्धाला सुरुवात झाली.पण काँगोबाहेर पडताकच माझ्या मनामध्ये काँगोला पुन्हा परतायचं हा निश्चय पक्का झाला होता.'मध्ये सात वर्ष गेली.केटने 'सापांच्या शरीरांतर्गत रचनेची वैशिष्ट्ये' या विषयात पीएच.
डी.मिळवली.तिचा प्रबंध वाखाणला गेला.पुढील संशोधनासाठी ती हात धुवून सुसरींच्या मागे लागली;
पण तिच्या डोक्यातून काँगो काही हटायला तयार नव्हतं.सुसरींच्या अभ्यासासाठी मिळालेली शिष्यवृत्ती थांबली,तेव्हा तिने परत काँगोला जायचा निर्णय घेतला.काँगो हा दोन देशांत विभागलेला भूप्रदेश आहे.यातला मोठा देश म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. याची राजधानी किन्शासा.
केटने जिथे काम केलं तो काँगोचा प्रदेश काँगो नदीच्या वायव्येस असून त्याची राजधानी ब्राझाव्हिल आहे.या दोन देशांची विभागणी काँगो नदीमुळे झालेली आहे;ही नदीच त्यांची सीमारेषा आहे.या काँगो-ब्राझाव्हिलचा उत्तरेकडचा एक तृतीयांश भाग घनदाट अरण्याने व्यापलेला आहे.
कुठल्याही प्रकारची मोहीम काढायची असेल तर त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते, हे पहिल्या मोहिमेच्या अनुभवातून केट शिकली होती.सर्वप्रथम अशा मोहिमेसाठी आर्थिक तरतूद करणं आवश्यक असतं. सुदैवाने स्मिथ्सोनियन संग्रहालयाने तिला काँगोतील प्राण्यांच्या नमुन्यांच्या बदल्यात आर्थिक मदत देऊ केली.आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भूभागात जायचं तिथल्या लोकांशी संपर्क साधणं आणि शासकीय परवानग्या मिळवणं. १९९६ साली केटला जेव्हा तिथल्या राज्यक्रांतीमुळे घाईघाईने तो देश सोडावा लागला होता,त्यावेळी तिच्या काहीजणांशी ओळखी झाल्या होत्या.पण आता त्यातल्या कुणाशीही तिचा संपर्क होऊ शकत नव्हता. क्रांतीने त्यांना गिळलं होतं.मात्र तिला अनपेक्षित मदत मिळाली ती फ्रान्समधल्या संशोधन विभागाची.त्या विभागाच्या ब्राझाव्हिल इथल्या प्रतिनिधीने तिच्या अर्जातल्या फ्रेंच भाषेत सुधारणा केल्या; इतर काही गोष्टी सुचवल्या आणि तिला हव्या त्या परवानग्या मिळवून दिल्या.त्याने सुचवलेल्या गोष्टींतील एक सूचनेनुसार केटने आपल्या मोहिमेत ५-६ स्थानिक तरुणांना सरीसृपविज्ञानाचं प्रशिक्षण देणं अपेक्षित होतं.केटने पूर्वतयारी केली आणि ब्राझाव्हिल-काँगोच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.
शिल्लक राहिलेला भाग ०३.०७.२४ या दिवशीच्या लेखांमध्ये..!