प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बातमी नेहमीच वाऱ्यासारखी पसरते.मागच्या दहा दिवसात बिबळ्याला विषबाधा झाल्याची व तो गुहेत कायमचा बंदिस्त झाल्याची बातमी संपूर्ण गढवालमध्ये प्रत्येकाला कळली होती. त्यामुळे थोडा धोका पत्करण्याचा मोह होणं नैसर्गिक होतं.साहजिकच मागच्या दहा दिवसांत विषाच्या परिणामांमधून सावरलेल्या व गुहेतून निसटलेल्या बिबळ्याने असा धोका पत्करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा बळी घेतला होता.गुहेला भेट देऊन मी बराच लवकर परतलो होतो.त्यामुळे आम्हाला आख्खा दिवस तयारीसाठी मिळणार होता.ब्रेकफास्टनंतर रायफली घेऊन इबॉटसनच्या घोड्यांवरून दौडत आम्ही निघालो.
यात्रामार्गावरून जोराची दौड मारून आम्ही डोंगरावरून तिरप्या जाणाऱ्या पायवाटेवर लागलो.ही वाट गावाकडून येणाऱ्या पायवाटेला जिथे मिळत होती तिथेच आम्हाला झटापट झाल्याचा खाणाखुणा आणि रक्ताचं मोठं थारोळं दिसलं.मुखिया व मयत स्त्रीचे नातेवाईक गावात आमच्यासाठी थांबलेच होते. त्यांनी आम्हाला,दरवाजा बंद करत असताना ज्या ठिकाणी बिबळ्याने हल्ला केला होता ती जागा दाखवली.तिथून पुढे तिला पाठीवर फरफटत नेत तो शंभर यार्ड अंतरावर थारोळ पडलेल्या जागी घेऊन आला होता.तिथे त्याने पकड सोडली होती आणि बऱ्याच झटापटीनंतर त्या बाईला ठार केलं.त्याने तिला ओढत नेतानाचा व जीव वाचवण्यासाठी अखेरची झुंज देताना,तिच्या किंकाळ्या सर्वांनी ऐकल्या होत्या. पण मदत करायला पुढे येण्याचं धाडस त्यांना झालं नव्हतं.त्या बाईची शेवटची धडपड थांबल्यानंतर बिबळ्याने तिला तोंडात पकडलं आणि काही अंतर वैराण जमीनीवरून जाऊन साधारण शंभर यार्ड रुंदीची घळ ओलांडून पलीकडे दोनशे यार्ड नेलं होतं.
ओढत नेल्याचा माग तिथे दिसत नव्हता पण रक्ताचा माग स्पष्ट दिसत होता.हा माग काढत आम्ही एका चार फूट रुंद व वीस फूट लांबीच्या सपाट जागेवर पोचलो.या निमुळत्या पट्टीच्या डोंगराकडच्या बाजूला एक आठ फूट उंच उभा चढाव होता व त्यावर 'मेडलर'चं झाड वाढलं होतं.आमच्या बाजूला उतार होता आणि त्यावर वाढलेल्या जंगली गुलाबाची झुडपं मेडलरच्या झाडापर्यंत पसरत गेली होती.त्यामुळे त्या झाडाची वाढ खुंटली होती.या उभ्या आठ फूट बांधाच्या व मेडलरच्या झाडाच्या दाटीमध्ये,मधोमध,डोकं बांधाकडे असलेला व संपूर्ण नग्नावस्थेतला तिचा मृतदेह पडला होता.त्यावर जंगली गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या.ही पांढऱ्या केसाची म्हातारी स्त्री किमान सत्तरीची तरी असावी.या दुर्दैवी स्त्रीच्या हृदयद्रावक मृत्यूसाठी बिबळ्याला देहदंड मिळायलाच पाहिजे होता.थोडावेळ 'कॉउन्सिल ऑफ वॉर' घेतल्यानंतर इबॉटसन काही आवश्यक वस्तू घेऊन येण्यासाठी रुद्रप्रयागला दौडत गेला व मी दिवसा उजेडी बिबळ्याचा ठावठिकाणा मिळतो का ते पाहण्यासाठी रायफल घेऊन निघालो.हा भाग मला तसा अनोळखी होता आणि त्याची नीट तपासणी करणं गरजेचं होतं.मी गावात असतानाच बघून ठेवलं होतं की हा डोंगर घळीपासून सुरू होऊन चार-पाच हजार फूट चढत गेला होता.माथ्याकडचे दोन हजार फूट ओक व पाईनचं गच्च जंगल होतं व त्याच्या खाली अर्धा मैल रुंदीचा गवताळ पट्टा होता. त्याही खाली परत झुडुपी जंगल होतं.
गवताळ पट्टा व डोंगराच्या खांद्यावरून वळसा घातला तर मला माझ्यासमोरच एक बराच रुंद असा खोलगट भाग दिसला.तो तसाच खाली अर्धा मैलावर यात्रामार्गाला मिळत होता.बहुतेक हा खोलगट भाग काही वर्षापूर्वी झालेल्या लैंडस्लाईड मुळे तयार झाला असावा.डोंगराच्या बाजूला शंभर यार्ड रुंद व यात्रामार्गावर मिळेपर्यंत तीनशे यार्ड रुंद होत गेलेल्या या खोलगट भागाच्या पलीकडे तशी मोकळी जमीन होती पण खोलगट भागातली जमीन मात्र दमट ओलसर होती म्याच्यावर मोठमोठे वृक्ष वाढले होते.झाडाखालची झुडुपी वाढही चांगली दाट होती.
खोलगट भागाच्या डोंगराकडच्या बाजूला एका पुढे आलेल्या कातळामुळे एक वीस ते चाळीस फूट उंचीचा व शंभर यार्ड लांबीचा कडा तयार झाला होता व त्याच्या मधोमध एक खोल फट तयार झाली होती.
या फटीतून एक झरा वाहत होता.या कातळानंतर झुडुपी जंगलाचा पट्टा होता व नंतर परत तो गवताळ पट्टा लागत होता.मी या सर्व भागाचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं.
कारण माझा अंदाज होता की बिबळ्या ह्या खोलगट भागातच लपला असणार आणि त्याला माझा सुगावा लागू द्यायचा नव्हता.आता एवढ्या मोठ्या खोलगट भागात तो नक्की कुठे असावा हे कळणं आवश्यक होतं.
त्यासाठी मी परत भक्ष्याजवळ गेलो.आम्हाला गावात सांगण्यात आलं होतं की जेव्हा त्या बाईला मारण्यात आलं. त्यानंतर लगेचच तांबडं फुटलं होतं.आता तिला ठार मारणे,चारशे यार्ड ओढत डोंगरावर घेऊन जाणे आणि थोडंसं खाणे या सर्व गोष्टीला थोडातरी वेळ लागणारच होता व असा अंदाज करायला काहीच हरकत नव्हती की बिबळ्या भक्ष्य सोडून जाताना बऱ्यापैकी उजाडलं असणार.हे ठिकाण डोंगरावर दोनशे यार्ड उंचीवर होतं आणि गावातून व्यवस्थित दिसत होतं.
यावेळेपर्यंत गावात या घटनेमुळे बऱ्याच हालचालीही होत असणार.त्यामुळे भक्ष्य सोडून जाताना तो आडोसा धरूनच निघाला असणार. तेव्हा याच अंदाजाच्या आधारे मी त्याच्या मागावर निघालो.जवळजवळ अर्धा मैल चालल्यानंतर गाव दिसेनासं झालं आणि तिथून त्या खोलगट भागाच्या दिशेला येताना मला कळलं की मी बिबळ्याच्या पावलावर पाऊल टाकत आलोय... इथे एका झुडुपाच्या सावलीत थोडी मोकळी माती होती व तिथे तो बराच वेळ पडून राहिल्याचं दिसत होतं.ही छान सावलीची जागा सोडतानाच्या त्याच्या पगमार्क् वरून कळत होतं की त्याने त्या कड्याच्या खाली पन्नास फूटांवर असलेल्या उतारावरच त्या खोलगट भागात प्रवेश केला होता.
बिबळ्या जिथे पडून राहिला होता त्याच ठिकाणी जवळ जवळ अर्धातास मी उभा राहिलो व एक क्षणभर का होईना त्या बिबळ्याकडून काहीतरी हालचाल होईल आणि त्याचा ठावठिकाणा कळेल या आशेने मी समोरच्या जंगलाचा इंच न् इंच नजरेखाली घातला.मी तिथे एक टक बघत असताना वाळलेल्या पानामधल्या एका हालचालीकडे माझं लक्ष वेधलं आणि आता मला 'स्किमिटार बॅब्लर्सची' एक जोडी किड्यांच्या शोधात पानं उलटी पालटी करत असलेली आढळली. (सातभाई पक्ष्यांची एक जात,बाकदार चोचीमुळे यांना scimitar म्हणतात.) जिथे शिकारी प्राण्यांचा संबंध येतो तेव्हा हे पक्षी जंगलातले सर्वांत भरवशाचे खबरे असतात आणि या जोडीचा उपयोग करून घेता येईल याची मी खूणगाठ बांधली.
बिबळ्या त्या भागात आहे याचा निर्देश करणारी एकही हालचाल किंवा एकही आवाज कुठूनही येत नव्हता.पण तरी तिथे तो आहे याबद्दल मला खात्री होती. त्यामुळे या नाही तर दुसऱ्या मार्गाने मी प्रयत्न करायचं ठरवलं.
एकदम उघड्यावर न येता निसटण्याचे दोन मार्ग त्या बिबळ्याला खुले होते.एक म्हणजे डोंगर उतरून यात्रामार्गावर जाणे किंवा डोंगरावर चढून जाणे.जर तो डोंगर उतरून गेला तर परत त्याच्याशी संपर्क होणं अवघड होतं पण जर मी त्याला वर जायला भाग पाडू शकलो तर तो निश्चितपणे त्या फटीमधून कड्यावर जाण्याचा प्रयत्न करणार होता.कारण तिथे त्याला जंगलाचा आडोसा मिळत होता.तसं करत असताना मला माझी संधी मिळणार होती.बिबळ्या जिथे असेल असा माझा अंदाज होता त्याच्या थोडंसं खालून मी त्या खोलगट भागात प्रवेश केला व अगदी सावकाश एकेका पावलागणिक थोडी थोडी उंची गाठत मी वर जायला सुरुवात केली.कड्यावरच्या त्या फटीकडे डोळे लावून बसण्याची तशी गरज नव्हती कारण त्या स्किमिटार बॅब्लर्सची जोडी तिथेच कड्याखाली होती आणि बिबळ्याने कोणतीही हालचाल केली तर तेच त्याचं भांडं फोडणार होते.अतिशय सावधपणे मी जवळजवळ चाळीस यार्ड वर,त्या कड्याच्या दहा फूट खाली व किंचित डाव्या बाजूला पोचलो तेवढ्यात ती बॅब्लर्सची जोडी एकदम उडाली आणि जवळच्याच ओकच्या झाडावरून या फांदीवरून त्या फांदीवर उत्तेजीत होऊन उड्या मारत त्यांनी त्यांचा स्पष्ट व घुमणारा असा अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली.पहाडी भागात हा कॉल अगदी अर्ध्या मैलांपर्यंत पण ऐकू जाऊ शकतो त्याच जागी स्तब्ध होऊन मी झटकन शॉट घेण्यासाठी सज्ज झालो आणि नंतर सावकाश कड्याच्या दिशेने सरकायला सुरुवात केली.या ठिकाणी जमीन निसरडी होती माझे डोळे त्या कड्यातल्या फटीवर रोखलेल्या अवस्थेत मी एक दोन पावलं पुढे गेलो असेन तेवढ्यात माझे रबरी सोलचे बूट निसरड्या चिखलावरून घसरले व मी तोल सांभाळण्यासाठी धडपड करत असतानाच बिबळ्याने त्या फटीमध्ये झेप घेतली व तिच्या पलीकडच्या जंगलातून जाताना त्याने काही कालीज फिझन्स्टना दचकवलं.हे फिझन्ट्स पंख पसरवत माझ्या डोक्यावरून उडत गेले.
माझा दुसरा प्रयत्नही फसला होता.बिबळ्याला परत त्या खोलगट भागात यायला भाग पाडणं सोपं होतं.पण त्याचा मला फारसा उपयोग झाला नसता.कारण वरच्या बाजूने अगदी जवळ जाईपर्यंत ती फट दिसण्याची शक्यता नव्हती आणि मी नेम धरेपर्यंत बिबळ्या वेगाने डोंगर उतरून गेला असता.इबॉटसन आणि मी दोन वाजता त्या घळीजवळ भेटायचं ठरवलं होतं. थोडंसं आधीच इबॉटसन येऊन पोचला होता. आवश्यक त्या सर्व वस्तू घेऊन.
त्याच्या बरोबर बरीच माणसंही त्याने आणली होती.या वस्तू म्हणजे जेवण,चहा,आपला जुना मित्र पेट्रोमॅक्स (यावेळी मात्र हा पेट्रोमॅक्स मीच हातात घ्यायचं ठरवलं होतं) दोन जास्तीच्या रायफल्स,बुलेट्स माझी फिशिंगची रीळ,सायनाईडच्या कॅप्सूल्स व जिन ट्रॅप ! घळीमध्ये स्वच्छ पाण्याजवळ बसून आम्ही जेवण उरकलं,जरा चहा घेतला व त्यानंतर आम्ही मृतदेहाजवळ गेलो.
आमच्या पुढच्या सर्व हालचाली व घटनाक्रम नीट कळावा म्हणून मी तुम्हाला त्या जागेचं संपूर्ण वर्णन करून सांगणार आहे.
चार फूट रुंद व वीस फूट लांब अशा या सपाट अरुंद पट्ट्याच्या,घळीच्या बाजूला पाच फूटांवर तो मृतदेह पडला होता.सपाट जागेला पलीकडच्या बाजूने आठ फूट उंच बांधाचं संरक्षण होतं तर खालच्या बाजूने उभाउतार व जंगली गुलाबाच्या पसरलेल्या काटेरी झुडुपाचं संरक्षण होते.बांधावरचं मेडलरचं झाड मचाण बांधण्याच्या दृष्टीने फारच छोटं होतं म्हणून आम्ही जीन टॅप,गनट्रॅप व विष यावरच पूर्ण विसंबून राहायचं ठरवलं व त्यानुसार तयारीला लागलो.वेळ कमी उरल्यामुळे बिबळ्याने मृतदेहाचा फारच थोडा भाग खाल्ला होता.तिथे आम्ही विषाच्या कॅप्सूल्स पुरल्या पण योग्य तेवढ्याच मात्रेत ! त्यानंतर मी मृतदेहावर बिबळ्या जसा बसेल असं आम्हाला वाटत होतं तसा वाकून बसलो व आमच्या बाजूची दोन झाडं निवडून त्यावर इबॉटसनने नेम जुळवून त्याची ०.२५६ मॅनलिचर व माझी ०.४५० वेगवान रायफल बांधून टाकल्या.
भक्ष्याजवळ येण्यासाठी बिबळ्याला कोणत्याच दिशेकडून अडथळा असा नव्हता पण मघाशी मी त्याला ज्या ठिकाणी सोडून दिलं होतं त्या दिशेने तो येण्याची शक्यता जास्त होती; म्हणजेच त्या सपाट जागेच्या उरलेल्या पंधरा फूट भागाकडून ! म्हणून आम्ही तिथेच जिनट्रॅप पुरायचं ठरवलं.त्यासाठी तिथली माती,गवताची पाती,वाळलेली पानं नीट बघून ठेऊन बाजूला काढून ठेवली. त्यानंतर चांगला लांब,रुंद व खोल खड्डा केल्यावर त्यात तो जिन ट्रॅप ठेवला.ताकदवान स्प्रिंग्ज दाबून बसवल्यावर ट्रीगर असलेल्या प्लेट्स नाजूकपणे जुळवून ठेवल्या.त्यावर माती टाकून अगदी पूर्वी होती त्याच स्थितीत तिथे माती,वाळलेली पानं व गवताची पाती पसरून ठेवली.
आम्ही हे सर्व इतकं काळजीपूर्वक केलं होतं की अगदी आम्हाला सुद्धा नंतर त्या ट्रॅपची अचूक जागा सांगता आली नसती.आता माझं फिशिंगचं रीळ काढलं गेलं आणि रेशमी दोरीचं एक टोक एका रायफलच्या ट्रीगरला बांधून दस्त्याच्या भोवती गुंडाळून मृतदेहापासून दहा फुटावर आणलं गेलं,तिथून ती दोरी परत फिरवून दुसऱ्या रायफलच्या दस्त्याला गुंडाळून ट्रीगरला बांधली गेली.या ठिकाणी ती दोरी आम्ही तोडली (ही लाईन अगदी चांगल्या दर्जाची व नवीन होती त्यामुळे ती तोडणं माझ्या जीवावरच आलं होतं) आता दुसऱ्या दोरीचं एक टोक मृतदेहाच्या कमरेभोवती बांधलं.दहा फूटावर मघाशी तयार झालेल्या लूपमधून दुसरं टोक टाकलं गेलं व नंतर सर्वच्या सर्व दोऱ्या ताणून जागच्या जागी लावल्या गेल्या व लूपमध्ये गाठ मारली गेली.इथे ही दुसरी दोरी परत एकदा कापली गेली. आमच्या सर्व कलाकुसरीवर शेवटची नजर टाकताना आम्हाला जाणवलं की जर ह्या बिबळ्याने वळसा घालून आमच्या म्हणजे गावाच्या दिशेने भक्ष्यावर जाण्याचा निर्णय घेतला तर त्याची जिनट्रॅप आणि गनट्रॅप,
उर्वरीत शिल्लक राहिलेला भाग..!
दि.०७.०७.२४ या दिवशीच्या लेखामध्ये..!