▶ राजा बिबट्या नव्या पिंजऱ्यात स्थिरावल्यावर त्याचा जुना पिंजरा रिकामा होता.गब्बरसिंगला छानसं घर मिळालं. पकडताना आम्हाला हुलकावणी देणारा गब्बरसिंग पार्कमध्ये आल्यावरही थोड्या नाखुषीनेच रुळला.गब्बर बुद्धिमान तर होताच,पण रुबाबदारही होता.एखाद्या कसलेल्या व्यायामपटूसारखे त्याचे स्नायू मजबूत होते.नजर शोधक आणि भेदक होती.त्याचा सगळा थाट एखाद्या राजपुत्राला शोभेल असा होता.त्याच्या आवडीही अगदी उच्चभ्रू होत्या.काजू,बदाम,
केळी,सफरचंदं आणि उकडलेलं अंडं असा त्याचा रोजचा खुराक होता.आमच्याकडे हिसस जातीचं दुसरं माकड नसल्यामुळे त्याला एकट्यालाच ठेवणं भाग होतं.हे माकड मंकी हिलवर इतर भाईबंदांसोबत राहू शकेल अशी शक्यता नव्हती.त्यामुळे एक तर त्याला त्याच्या अधिवासात सोडणं आवश्यक होतं,किंवा त्याला जोडीदार शोधणं तरी.('सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक-समकालीन प्रकाशन पुणे)
त्यानंतर थोड्याच दिवसांतली गोष्ट.हिंजवडी परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बांधकामं सुरू होती.तिथल्या एका बांधकामावर कासारवाडीच्या झोपडपट्टीतील एक बाई काम करत होती.एके दिवशी दुपारी झाडाखाली बसून जेवण करत असताना त्या झाडावरून लाल तोंडाचं एक माकड तिच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं.बहुतेक उपाशी असावं.बाईने त्याला थोडी भाकरी दिली. त्याने ती अधाशासारखी खाल्ली.थोडं बेसनही चाखलं.पाणी प्यायलं आणि मुकाट झाडावर जाऊन बसलं.दिवस संपल्यावर त्या मावशी इतर बायकांसोबत लगबगीने बसस्टॉपकडे निघाल्या.हे माकड झाडावरून उतरून त्यांच्यासोबत चालू लागलं.बाई आणि त्यांच्या मैत्रिणीने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला;पण ते अगदी केविलवाणा चेहरा करून त्या बाईंकडे पाहत राहिलं. बाईंनाही दया आली.त्यांनी माकडाला कडेवर घेतलं आणि त्या चालू लागल्या.पण बस कंडक्टरने मात्र त्या माकडाला आत घ्यायला साफ नकार दिला.हे माकड काही बाईच्या खांद्यावरून उतरेना.
शेवटी बाई चालतच निघाल्या,वाटेत एका सिक्स सीटरवाल्याला त्यांची दया आली.त्याने या बाईंना माकडासहित घरी पोहोचवलं. बाईंच्या कुटुंबाबरोबर या माकडालाही जेवण मिळालं,सारेजण झोपल्यावर हे माकड छताच्या पत्र्यावर जाऊन झोपून गेलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी वस्तीतल्या कुणी तरी आम्हाला कॉल केला,गाडी घेऊन आम्ही कासारवाडी गाठली,तेव्हाही ते माकड पत्र्यावरच बसून होतं.
सुंदर,गुबगुबीत देखणी हिसस मादी होती ती.बाईंच्या मदतीने तिला खाणं दाखवून घरात घेतली.दार लावून मोठ्या रिंग स्टिकमध्ये पकडली,तिला पकडलं आणि गाडीत टाकून निघालो,तर बाईंचे डोळे पाण्याने डबडबलेले.एवढ्याशा काळात त्यांना या माकडिणीचा केवढा लळा लागला होता! मी त्यांना समजावलं.म्हटलं, "अजिबात काळजी करू नका.आम्ही छान बडदास्त राखू तुमच्या गंगूबाईची." तोंडात एक नाव आलं,ते मी म्हणून गेलो.पुढे तेच तिचं नाव पडलं.असा रीतीने आमच्या गब्बरला जोडीदार मिळाली.
गंगूबाईला पहिल्या दिवशी गब्बरसिंगच्या पिंजऱ्यातल्या ट्रॅपिंग सेक्शनमध्ये ठेवलं. दोघांना एकत्र ठेवता येईल का याचा मला अंदाज घ्यायचा होता.दोघांची प्रतिक्रिया काय होते ते बघायचं होतं.दोघांनीही एकमेकांना काही विरोध दर्शवला नाही. उलट,त्यांच्यात काही मूकसंवाद झाला असावा.कारण दोन दिवसांनी मी गंगूबाईला गब्बरच्या पिंजऱ्यात सोडलं तेव्हा वाट बघत असल्यासारखे ते एकमेकांशी खेळू लागले. रात्री नऊ वाजता मी राऊंडला आलो,तेव्हा बॅटरीचा झोत टाकून हे दोघं कुठे आहेत ते पाहू लागलो,तर दोघं एकमेकांच्या मिठीत विसावलेले! मी झटकन बॅटरी बंद केली आणि सॉरी म्हणून तिथून पसार झालो.
गंगूबाईसुद्धा तरुण आणि देखणी माकडीण होती.तिचे डोळे खूपच बोलके होते.तिला काय हवं-काय नको ते आम्हाला तिच्या डोळ्यांमधले भावच सांगायचे.स्वभावाने ती चांगलीच अल्लड होती.
आम्ही तिला मोठ्या प्रेमाने खायला दिलेला एखादा नवा पदार्थ आवडला नाही तर ती सरळ पिंजऱ्याबाहेर फेकून द्यायची.
एकदा गंमत झाली.अधूनमधून पार्कमध्ये चक्कर टाकणारं मांजराचं एक पिल्लू कुठून भरकटत त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलं.म्याव म्याव करत थेट आतच शिरलं.बाहेरच्या लोकांना वाटलं,आता मांजराचं काही खरं नाही;पण झालं उलटंच,गंगूबाई हलकेच पुढे सरकली.मोठ्या मायेने तिने मांजराचं पिल्लू छातीशी धरलं,कुरवाळलं,पापे घेतले.या अति प्रेमाने पिल्लू गांगरलं.थोडा वेळ प्रेक्षकांची करमणूक झाली;
पण बराच वेळ झाला तरी गंगूबाई त्या पिल्लाला सोडेना तेव्हा मात्र आम्हाला काळजी वाटू लागली.
पिल्लू अस्वस्थ झालं,सुटायचा प्रयत्न करू लागलं. गुदमरतं की काय असं वाटू लागलं तरी हिची 'माया माया' चालूच ! शेवटी आम्ही चुचकारून,खाण्याचं आमिष दाखवून तिच्या हातून ते पिल्लू काढून घेतलं.दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची एकदाची सुटका केली.ते पिल्लू नंतर त्या पिंजऱ्याच्या जवळपासही कधी फिरकलं नाही.
वर्षभरामध्ये गंगूबाईला स्वतःचंच पिल्लू मिळालं.तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.इवलेसे डोळे आणि अंगावरची सोनेरी लव यामुळे आम्ही त्याचं नाव ठेवलं - सोन्या. पार्कमधल्या आम्हा सगळ्यांना तर आनंद झालात,पण पार्कमध्ये नेहमी येणारे प्रेक्षकही अतिशय खूष होते.एका काकांनी तर आनंदाने सगळ्यांना लाडू वाटले.अगदी थोड्या दिवसांत गब्बरसिंग आणि गंगूबाईंनी लोकांची मनं जिंकली होती,त्याचाच हा पुरावा होता.
काही नोंदी वाचताना वेचलेल्या..
एखादा पदार्थ किंवा धान्य /भाजी खाण्याजोगे करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्यावर करतो ? बघुया किती आठवतात ते .....
१) खुडून २) निवडून ३) पाखडून ४) चाळून ५) वेचून ६) दळून ७) कांडून ८) मळून ९) भिजवून १०) शिजवून ११) भाजून १२) परतून १३) गाळून १४) धुवून १५) वाळवून १६) आटवून १७) मुरवून १८) तळून १९) लाटून २०) पसरुन २१) वाफवून २२) कुटून २३) वाटून २४) कालवून २५) साठवून २६) खारवून २७) पाकवून २८) ठेचून २९) सोलून ३०) चिरुन ३१) कापून ३२) नासवून ३३) फेटून ३४) ढवळून ३५) उकळून ३६) वळून ३७) थापून ३८) उकडून ३९) उलथवून ४०) तिंबून ४१) मिसळून ४२) घुसळून ४३) चोचवून ४४) कातरून ४५) फोडून ४६) पाडून ४७) ओतून ४८) काढून ४९) झाकून ५०) खरवडून ५१) विरजून ५२) गुंडाळून ५३) बांधून ५४) टांगून ५५) रांधून ५६) कुस्करुन ५७) चापून ५८ ) पेरून ५९) कोचून ६०) उगाळून ६१) आंबवून ६२) उकडवून ६३) फुंकून ६४) वाफवून ६५) आधण आणून ६६) खोवून ६७) घोळून ६८) रोळून ६९) चेचून ७०) परतून ७१) चुरून ७२) चुरडून ७३) निथळून ७४) हलवून ७५)सारखं करून ७६) भुरभुरून ७७) लावून ७८) भरून ७९) किसून ८०) चिकटवून ८१) मुरडून ८२) फेसून ८३)चिंबवून ८४) बरबटून ८५) पसरून ८६) वेळून ८७) बुडवून ८८) कुस्करून
फक्त मराठी 'भाषे'त मिळणारे खाद्यपदार्थ.
चापटपोळी,धम्मकलाडू,बोलाची कढी
उतू आणलेली शिळी कढी,बोलाचा भात
तिंबलेली कणीक,नाकाने सोललेले कांदे
नाकाला झोंबणाऱ्या मिरच्या
भ्रमाचा भोपळा,पाठीचे धिरडे
कानामागून येऊन झालेले तिखट
डोक्यातील कांदे-बटाटे,मनातील मांडे
डोक्यावर वाटलेल्या मिऱ्या
हास्याची खसखस,इज्जतीचा फालुदा,
अक्षतांच्या वाटाण्याची उसळ
पुराणातील (भरलेली) वांगी
न शिजणारी डाळ
अंगाचा होणारा तिळपापड
नावडतीचे अळणी मीठ,
चर्चेचं कडबोळे,अमिषाचं गाजर
पुंगी बनवायचे गाजर
लपवलेल्या भांड्यातील ताक
बाजारातील तुरी
हातावर दिलेल्या तुरी
ताकास लावलेली तूर,पचका वडा
लाडीगोडी लावायचा मस्का (लोणी)
कोल्ह्याला आंबट असणारी द्राक्षे
कोल्हा राजी असणारी काकडी
स्वतः च्याच पोळीवर वाढलेले तूप
आवळा देऊन काढलेला कोहळा
गोरी होण्यासाठी प्यायची हळद
अकलेचा कांदा,डोक्याचं भजं
डोक्याच दही,रगील दोडका
भ्रमाचा भोपळा...
एक मजेशीर घटना..
१९०१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपले अधिकृत सल्लागार असणा-या बुकर टी वॉशिंग्टन यांना 'व्हाइट हाउस'वर डिनरला बोलावले. वॉशिंग्टन हे प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक.
पण,ते कृष्णवर्णीय.मग काय! 'व्हाइट हाउस'मध्ये 'ब्लॅक' माणूस गेलाच कसा,असा प्रश्न विचारत अमेरिकेतले कडवे गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी 'व्हाइट हाऊस' धुऊन काढले. त्यानंतर पुढची तीस वर्षे 'व्हाइट हाऊस'कडे कोणी 'ब्लॅक' फिरकू शकला नाही.कोण्या अध्यक्षाची तशी हिंमतही झाली नाही.आणि,हाच तो काळ होता,ज्या काळात
राजर्षी शाहू महाराज आपल्याकडे कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमनपद तत्कालीन 'अस्पृश्य' माणसाकडे देत होते.अस्पृश्यांचे अवघे शिक्षण मोफत करत होते.त्यांच्यासाठी वसतिगृहे उभी करत होते. आंतरजातीय लग्नं लावत होते. महिलांसाठी वेगवेगळे कायदे करत, त्यांना माणूसपणाचे सगळे हक्क देत होते. विरोधाची तमा न बाळगता, धर्मसत्तेला आव्हान देत होते.
एखादा माणूस काळाच्या किती पुढे असावा!
- संजय आवटे