* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/७/२४

प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato

युरोपच्या नकाशाकडे नजर फेका,भूमध्य समुद्रात आपली वाकडी बोटे लांबवणारा ग्रीसचा कृश हात तुम्हाला दिसेल.ग्रीसच्या दक्षिणेस महान् क्रीट बेट आहे.या बेटापासून ख्रिस्तपूर्वीच्या दुसऱ्या सुवर्णयुगात संस्कृती व सुधारणा यांना आरंभ झाला.

त्याला ग्रीसच्या देशाने घट्ट पकडून जिंकून घेतले.या बेटापासूनच ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सुवर्णयुगात ग्रीसने संस्कृती सुधारणा यांना पकडून हस्तगत केले.पूर्वेकडे ईजिप्तसमुद्राचे पलीकडे आशिया मायनर आहे.

आशिया मायनर आज शांत व स्वस्थ दिसले तरी एकेकाळी ते चैतन्याने मुसमुस होते. प्लेटोच्या पूर्वकाळात उद्योगधंदे, व्यापार व मुक्त विचार या सर्वांनी आशिया मायनर चैतन्याने सळसळत होते.

पश्चिमेस पलीकडे इटली उभा आहे.तो जणू समुद्रातील स्तंभ,झुलता मनोरा आहे आणि सिसिली व स्पेनही पश्चिमेसच आहेत.या भागांतून ग्रीकांच्या भरभराटीस आलेल्या वसाहती होत्या आणि सर्वांच्या पलीकडे ज्याला आपण जिब्राल्टर म्हणतो ते हरक्युलिसचे खांब उभे आहेत.जिब्राल्टरच्या भव्य भीषण जबड्यातून पलीकडे जावयास फारसे प्राचीन खलाशी धजत नसत आणि उत्तरेस माणसाळलेले अर्धवट रानटी असे थिसली, एपिरस व मॅसिडोनिया वगैरे भाग होते.या भागातूनच होमर व पेरिक्लीस या ग्रीसांच्या काळातील प्रज्ञावंत पुरुषांच्या पूर्वजांच्या टोळ्या ग्रीसमध्ये आल्या होत्या.


पुन्हा या नकाशाकडे नीट पहा.समुद्राचा ठायीठायी फाटलेला दंतुर किनारा तुम्हास दिसेल व जमिनीचे चढावही दिसतील. जिकडे तिकडे आखाते,भूशिरे आणि आत शिरलेला सागर.समुद्र व जमीन जणू पर्वत व टेकड्या यांच्यात ठेचकाळत आणि हेलकावे खात आहे.समुद्र व जमीन यांच्या या नैसर्गिक अडथळ्यांमुळे ग्रीस देशाचे अलग अलग असे अनेक तुकडे पडले होते.त्या काळात प्रवास व दळणवळण करणे आताच्या मानाने फारच कठीण व दगदगीचे असे.म्हणून प्रत्येक दरी आपापले स्वतंत्र आर्थिक जीवन निर्माण करीत असे व स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत असे.त्या त्या भागात प्रत्येकाने स्वायत्त सरकार,स्वतःच्या स्वतंत्र संस्था,त्यांची विशिष्ट बोली भाषा, विशिष्ट धर्म व संस्कृती वगैरेंची निर्मिती होत असे.प्रत्येक भागाचा असा अलग अलग विकास होई.त्या त्या स्वतंत्र भागात एक दोन मोठी शहरे असत व त्यांच्याभोवती डोंगर उतरणीवरून पसरलेली शेतजमीन असे.ही शेतजमीन संपली की,दुसऱ्या स्वतंत्र भागाची शेतजमीन सुरू होई.

इयुबा,लोक्रिस,इटोलिया,फोसिस,बोटिया,अकिया,

अर्गोलिस,एलिस,मेसेनिया आणि लॅकोनिया,स्पार्टा आणि अत्तिका आणि त्याचे अथेन्स अशी अनेक नगरराज्ये विखुरलेली होती.


आणि अखेरची पुन्हा एकवार दृष्टी फेका आणि त्यातील अथेन्सचे स्थान नीट पहा. ग्रीसच्या मोठ्या शहरांच्या अती पूर्वेस ते आहे.आशिया मायनरच्या भरभराटलेल्या शहरांशी दळणवळण ठेवण्यासाठी अथेन्सच्या दरवाज्यातून जाणे सोयीचे पडे. आशिया मायनरमधील जूनी शहरे ग्रीस देशांतील विकास पावणाऱ्या शहरांना येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांच्या द्वारा आपल्या ऐषआरामाच्या वस्तू तर पाठवीतच; परंतु आपली संस्कृतीही पाठवीत असत. आशिया मायनरमध्ये एक फार सुंदर बंदर होते,याचे नाव पिरस.समुद्राच्या प्रक्षुब्ध पाण्यापासून शकडो गलबते या बंदरात निवारा घेऊ शकत.तसेच या शहराजवळ भलामोठा आरमारी ताफाही होता.


ख्रिस्तपूर्व ४९० ते ४७० या काळात स्पार्ट व अथेन्स परस्परांचे हेवेदावे विसरून एक झाली.डरायस व झर्सिस हे ग्रीक लोकांस गुलाम करू पहात होते.

आशियायी साम्राज्य वाढवून ग्रीस देशाला आपली वसाहत करू पहात होते.परंतु एकजूट झालेल्या अथेन्स व स्पार्ट यांच्या सैन्याने त्यांचे हेतू विफल केले. तरुण नवजवान व युरोपचा वृद्ध आशियाशी हा सामना होता.या युद्धात स्पार्टाने सैन्य पुरविले व अथेन्सने आरमार दिले.युद्ध संपले.स्पार्टाने आपल्या सैन्यास रजा दिली. स्पार्टात एकप्रकारची आर्थिक अव्यवस्था माजली.युद्धानंतर सर्वत्रच तसा अनुभव येतो.परंतु अथेन्सने मात्र आपल्या आरमाराचे व्यापारी काफिल्यात रूपांतर केले.लढणारी गलबते व्यापार करू लागली.अथेन्स हे प्राचीन जगातील सर्वांत महत्त्वाचे असे व्यापारी शहर बनले स्पार्टा पुन्हा शेतीभाती करू लागले व एका बाजूस पडले.त्याची वाढ खुंटली.परंतु अथेन्स गजबजले.व्यापार वाढला.बंदर वाढले.शेकडो जातिजमातीचे, नाना वंशाचे लोक,येथे एकत्र येत,भेटत, बोलत.विविध मानवांचे हे मीलनस्थान झाले. नाना प्रकारच्या चालीरीती,नाना संस्कृती, नाना विचार यांचा संबंध येऊ लागला.या संबंधांमुळे व स्पर्धांमुळे तुलना करण्याची प्रवृत्ती बळावली.लोक पृथक्करण व विचार करू लागले.


जेथे अशी मिळणी होत असते,तेथे परंपरा, रूढी,

समजुती व आग्रही मते ही एकमेकांवर घासून शेवटी काहीच उरत नसते.जेथे हजारो पंथ व संप्रदाय असतात तेथे त्या सर्वांविषयी एकप्रकारची साशंकवृत्ती व अंधश्रद्धा उत्पन्न होते.बहुधा व्यापारी हे पहिले नास्तिक असावेत.त्यांनी इतके पाहिलेले असे की,त्यांची फारशी कशावर श्रद्धा उरतच नसे आणि व्यापाऱ्यांची सर्वसाधारण प्रवृत्ती जगातील लोक ठक तरी असतील नाहीतर मूर्ख तरी असतील असे मानण्याची असल्याने प्रत्येक धर्माबद्दल ते साशंक असत.प्रत्येक पंथ व संप्रदाय याविषयी ते प्रश्न करीत.

या व्यापाऱ्यात आस्ते आस्ते विज्ञानही वाढू लागले.

विनिमयाचे व्यवहार अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागल्यामुळे गणित वाढले.समुद्रप्रवास अधिक धाडसाचा होऊ लागल्यामुळे खगोल विद्या वाढली. संपत्ती वाढल्यामुळे फुरसत व सुरक्षितता आली आणि त्यामुळे शोधबोधास अनुकूल परिस्थिती उत्पन्न झाली.अशा काळातच तत्त्वज्ञाते जन्मतात.चिंतेन-मनन सुरू होतात. आता समुद्रावरून जाताना दिग्दर्शन करा एवढेच ताऱ्यांना विचारून माणसे स्वस्थ बसतानाशी झाली,तर या विश्वाच्या कोड्याचे उत्तर द्या अशीही मागणी ते ताऱ्यांजवळ करू लागले.

आरंभीचे ग्रीक तत्त्ववेत्ते खगोलशास्त्रज्ञ होते.

ॲरिस्टॉटल म्हणतो, मिळालेल्या सिद्धीमुळे ग्रीकांना अभिमान वाटून ते अधिक पुढे जाऊ लागले. इराणजवळ झालेल्या लढ्यानंतर सर्व क्षेत्रांत ग्रीक पुढे सरसावू लागले.संपूर्ण ज्ञानाचा प्रांत ते आपला मानू लागले.त्यांची बुद्धी सर्वत्र संचरू लागली.

उत्तरोत्तर अधिक व्यापक व विशाल अध्ययन होऊ लागले.पूर्वी घडामोडी अतीमानवी शक्तीने होतात असे वाटे,त्याची कारणमीमांसा ते धैर्याने करू लागले.निरनिराळ्या घडामोडी व गोष्टी यांचे नैसर्गिक पद्धतीने स्पष्टीकरण ते विचारू लागले. जादुटोणे व धार्मिक कर्मकांड यांचे स्तोम हळूहळू कमी होऊन विज्ञान व त्याद्वारे नियंत्रण यांना स्थान मिळू लागले;

तत्त्वज्ञानास आरंभ झाला.


आरंभी हे तत्त्वज्ञान सृष्टिज्ञानात्मक होते.या भौतिक जगाकडे दृष्टी फेकून या सर्व वस्तूजातीचे अंतिम आणि अविच्छेद्य घटक कोणते याचा तपास तत्त्वज्ञानाने सुरू केला.या सर्व विचारांचे पर्यवसान म्हणजे डेमॉक्रिटसचा भौतिकवाद


(डिमॉक्रिटस ख्रि.पू.४६० ते ३६०) डेमॉक्रिटस म्हणे,वस्तूतःदोनच तत्त्वे उरतात.अणू व अवकाश.

ग्रीकांच्या तात्त्विक विचारातील हा एक महत्त्वाचा प्रवाह होता.प्लेटोच्या काळी हा प्रवाह जरा लुप्त झाल्यासारखा वाटला. परंतु एपिक्युरसच्या काळात पुन्हा वर आला (एपिक्युरसचा काळ ख्रि.पू. ३४२ ते २७०); आणि या प्रवाहाचे मोठ्या प्रचंड घवघवीत नदीमध्ये ल्युक्रेशियसच्या काळात रूपांतर झाले.(ल्युक्रेशियसचा काळ खि.पू. ९८ ते ५५),परंतु ग्रीकांचे सर्जक विचारदर्शन सोफिस्टांकडून झाले.सोफिस्ट म्हणजे प्रज्ञानाचे फिरते आचार्य.या बाह्य वस्तुमानाकडे पाहण्याऐवजी ते अंतर्मुख होऊन स्वतःचे विचार व स्वतःची वृत्ती यांचा विचार करीत.हे फार हुशार लोक होते. (उदाहरणार्थजॉर्जियास व हिप्पियाज) यापैकी काही काही फार खोल विचार करणारे होते.उदा.प्रोटॅगोरस,प्रॉडिकस.आजच्या अर्वाचीन तत्त्वज्ञानात मनाचा व वर्तनाचा असा एकही प्रश्न किंवा उत्तर नाही की,जे त्या लोकांना जाणवले नाही व ज्याची त्यांनी चर्चा केली नाही.

आजचे नीतिशास्त्र व आजचे मानसशास्त्र, आजचे तत्त्वज्ञान व आजचे जीवनाचे प्रश्न या सर्वांचे पडसाद त्या सोफिस्ट लोकांच्या विवेचनांत दिसून येतात. हे सोफिस्ट कोणत्याही गोष्टींबद्दल प्रश्न करीत.धार्मिक व राजकीय विधिनिषेधांची ते पर्वा करीत नसत.ते निर्भयपणे सर्व प्रश्नांची चर्चा करीत.बुद्धीच्या सिंहासनासमोर प्रत्येक पंथ,संस्था व मत आणून ते उभे करीत. शासनविषयक क्षेत्रात त्यांच्यात दोन पक्ष होते.एक पक्ष रूसोप्रमाणे जे स्वाभाविक आहे ते चांगले आहे,सारी सुधारणा वाईट आहे असे म्हणे.

निसर्गतः सारी माणसे समान असतात परंतु वर्गनिर्मित संस्थांमुळे माणसात विषमता उत्पन्न होते.कायदा ही वस्तू बळवंतांनी निर्मिली आहे,

दुबळ्यांवर सत्ता चालविण्याचे ते साधन आहे.असे त्याचे मत होते.आणखी एक पक्ष होता,त्याचे नीत्शेप्रमाणे मत होते.निसर्ग हा सद्सताच्या पलीकडे आहे.त्याच्यामते स्वभावतःसारी माणसे असमानच असतात.बळवंतांना मर्यादा घालण्यासाठी,त्यांनाना रोखण्यासाठी दुबळ्यांनी नीतिशास्त्र निर्मिले आहे. 


बलशाली होणे हा मानवाचा सर्वोत्कृष्ट सद्‌गुण होय;मानवाची हीच खरीखुरी इच्छा असते.

शासनाच्या सर्व प्रकारात अत्यंत शहाणपणाचा व स्वाभाविक प्रकार म्हणजे नबाबशाही,अमीरशाही ही होय.लोकशाहीवर हा जो हल्ला अथेन्समध्ये सुरू झाला त्याचे कारण काय बरे होते?अथेन्स शहरात श्रीमंतांचा एक अल्पसंख्य वर्ग वाढत होता,उदयास येत होता.हा पक्ष स्वतःला अल्प लोकसत्ताकं राज्यपद्धतीचा पुरस्कर्ता म्हणवी.लोकशाहीत राम नाही,लोकशाही कुचकामी आहे,कार्यक्षम नाही,असे ते म्हणत.खरे पाहता अथेन्समध्ये फारशी लोकसत्ता नव्हती की जिला नावे ठेवावी. अथेन्सच्या ४ लाख लौकांपैकी अडीच लक्ष गुलाम होते.त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय हक्क नव्हता.जे दीड लाख स्वतंत्र नागरिक उरले,त्यांच्यापैकी फारच थोडे सर्वसामान्य सभेला उपस्थित रहात. एक्लेशिया या सर्वसामान्य सभेत राज्याचे सारे धोरण आखण्यात येई,चर्चिले जाई. परंतु जी काही लोकशाही तेथे होती,ती एकप्रकारे परिपूर्ण होती.


इतकी परिपूर्ण लोकसत्ता कुठेही आपणास दिसणार नाही.सर्वश्रेष्ठ अधिकारी मंडळाला डिकास्टेरिया (Dikasteria) म्हणत.यात जवळजवळ एक हजार लोक त्यांच्या यादीतून आद्याक्षराप्रमाणे घेतले जात. लोकशाहीचे शत्रू म्हणत की,अशी,इतकी परिपूर्ण आणि तरीही विरोधकांच्याच मते तितकीच हास्यापद लोकशाही अन्यत्र क्वचितच कोठे असेल.


ख्रिस्तपूर्व ४३० ते ४०० पर्यंत जी पेलोपोनेशियन लढाई एक पिढीभर सारखी चालली होती तीत स्पार्टाने अथेन्सची आरमारी सत्ता शेवटी नष्ट केली.

त्यामुळे क्रिटियाज ज्याचा नेता होता.अशा अथेन्समधील मूठभर वरिष्ठ वर्ग म्हणू लागला की,लोकशाही कुचकामी आहे.लोकशाहीमुळे आपणास युद्ध यशस्वीरित्या करता आले नाही.हे श्रीमंत अथेनियन स्पार्टातील वरिष्ठ वर्गाच्या सत्तेची गुप्तरीतीने स्तुती करीत.अथेन्समधील अल्पसंख्याची सत्ता असावी असे म्हणणाऱ्यांमध्ये बरेचसे पुढारी हद्दपार केले गेले.परंतु जेव्हा अथेन्स स्पार्टाला शरण गेले व शेवटी तह झाला तेव्हा त्या तहात अशी एक अट होती की,हद्दपार झालेले बडे लोक परत बोलविले जावेत.ते अथेन्समध्ये आले व त्यांनी लगेच वरिष्ठ वर्गाचे बंड पुकारले.


क्रिटियाज त्यांचा पुढारी होता.राष्ट्राची दुर्दशा करून टाकणाऱ्या लोकशाही सत्तेविरुद्ध त्यांचा हा उठाव होता.परंतु श्रीमंतांची ही क्रांती अपयशी झाली. क्रिटियाज रणांगणी धारातीर्थी पडला.हा क्रिट्यीज सॉक्रेटिसचा शिष्य होता;प्लेटोचा चुलता होता.

१३/७/२४

झाडांची शाळा / School of Trees

झाडांना आपली भूक कधीही भागवता येते, पण तहानेचं मात्र तसं नसतं,त्यामुळे भुकेपेक्षा त्यांच्यासाठी तहान अधिक त्रासदायक असते.ज्याप्रमाणे एखाद्या ब्रेडच्या भट्टीमध्ये ब्रेड कधीही बनू शकतो तसंच भूक लागली की झाडांना खाद्य बनवता येतं.पण बेकरीत पाणी नसलं तर ब्रेड बनत नाही त्याप्रमाणे पाण्याशिवाय झाडंही खाद्य बनवू शकत नाहीत.


जेव्हा पाणी उपलब्ध असतं तेव्हा एक प्रौढ बीच झाड दिवसाला १३० गॅलन पाणी आपल्या फांद्यांना पोचवत असतं.पण उन्हाळ्यात असं केलं तर मात्र मातीतील आर्द्रता संपून जाते.गर्मीमध्ये रोज पाऊस पडत नाही त्यामुळे माती जरा कोरडीच राहते.म्हणून झाड थंडीमध्ये पाण्याचा साठा करून ठेवतं.थंडीत जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा झाड पाण्याचा अगदी कमी वापर करतं,कारण या काळात त्याला स्वतःची वाढ करायची नसते. 


जमिनीखालील पाणी आणि झाडामधला साठा यातून त्याची उन्हाळ्याची सोय होणार असते.पण काही वर्षांनी पाण्याची कमतरता जाणवू लागते.

उन्हाळा काही आठवडे जास्त रेंगाळला आणि पावसाने दांडी मारली तर मात्र जंगलावर त्याचा विपरीत परिणाम सुरू होतो.भरपूर आर्द्रता असलेल्या मातीत उगवणाऱ्या झाडांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो,कारण त्यांनी पाण्याचा वापर कधीही काटकसरीने केलेला नसतो.पाण्याबाबतच्या अशा उधळ्या सवयीचा फटका विशाल आणि जोमदार असलेल्या वृक्षालाही बसतो.


मी ज्या जंगलाचा सांभाळ करतो तिथे स्प्रूस झाडांना पाणी तुटवड्याचा सर्वाधिक त्रास होतो.जेव्हा जमीन सुकून जाते तरीही त्यांची टोकाकडची सुईसारखी पानं पाणी मागत राहतात तेव्हा या झाडांची कोरडी पडलेली खोडं हा ताण सहन करू शकत नाहीत. आणि त्यांच्या खोडाचं साल फाटू लागतं.तीन फुटांपर्यंत फाटलेल्या सालाची जखम आतपर्यंत पोहोचते आणि झाडाला मोठी इजा करू शकते.याचा फायदा फंगस लगेच घेतात आणि झाडाच्या आतपर्यंत जाऊन आपलं कारस्थान सुरू करतात.

येणाऱ्या काळात स्प्रूस आपली जखम भरण्याचा प्रयत्न करतो,पण साल काही बंद होत नाही. लांबूनही काळा ओघळ येणारी जखम दिसून येते.आणि या चर्चेद्वारे आपण झाडाच्या शाळेत प्रवेश करीत आहोत.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)


निसर्ग एक कठोर शिक्षक असल्यामुळे या शाळांमधून अजूनही शारीरिक शिक्षेची पद्धत सुरू आहे. एखाद्या झाडाने सांगितलेले काम केलं नाही तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागते. 


कुठे लाकूड मोडतं तर कुठे झाडाचा कॅम्बियम नावाचा सर्वांत संवेदनशील जीवनदायी भाग फाटतो.हा कॅम्बियम थर खोडाच्या खाली लागूनच असतो,पण जखम भरणे इतकाच धडा झाडाला मिळत नाही तर यामुळे ते पाण्याचा वापर काटकसरीने करायला सुरुवात करतं.

जमिनीत भरपूर आर्द्रता असली तरीही हे झाड यापुढे पाण्याची उधळपट्टी करणार नाही,कारण पुढे पाणी मिळेल का नाही,काही सांगता येत नाही!हा धडा मिळतो तो जास्त करून भरपूर आर्द्रता असलेल्या जमिनीत उगवणाऱ्या स्प्रूस झाडांना.पण यात काही आश्चर्य नाही. पाण्याच्या मुबलक पुरवठ्यामुळे ते असे खट्याळ झालेले असतात.जेमतेम अर्ध्या मैलावर कोरड्या दगडी भागात उतारावर वाढणाऱ्या झाडांच्यात दृश्य वेगळंच असतं. पहिल्यांदा मला वाटायचं पाण्याच्या अभावाचा सर्वाधिक फटका इथल्या झाडांना बसेल.पण इथं तर चित्र उलटच होतं. तिथल्या उतारावर वाढणारी झाडे पाण्याचा संयमित वापर करून स्वतःला कणखर बनवतात.त्यामुळे ते याहीपेक्षा प्रखर परिस्थितीत तग धरू शकतात.

इथल्या मातीत आर्द्रता कमी राहते कारण सूर्य कडक असतो.तरीही इथले स्प्रूस धडधाकट राहतात.आपली वाढ अगदी संथ करून मिळेल तेवढ्या पाण्यात स्वतःला जिवंत ठेवण्याची कला त्यांना जमलेली आहे.याहून महत्त्वाचा एक धडा झाडांच्या शाळेत शिकवला जातो,तो म्हणजे स्वतःच स्वतःला आधार द्यायला कसं शिकायचं? झाडांना उगाचच गोष्टी अवघड करून ठेवायला आवडत नाही.जर सुदैवाने एखादा धष्टपुष्ट शेजारी मिळाला आणि त्याच्या आधाराने उंच होता आलं तर उगीच स्वतःचं खोड वाढवण्यात ऊर्जा कशाला खर्च करायची? जोपर्यंत दोघेही उभे आहेत तोपर्यंत काहीच भीती नाही.पण मध्य युरोपातील व्यवसायिक लागवडीच्या जंगलात दर थोड्या वर्षांनी झाड कापण्याची यंत्रसामग्री आणली जाते आणि १० टक्के झाडं कापली जातात.नैसर्गिक जंगलात मात्र एखादं वयोवृद्ध वृक्ष वठला की मगच पोकळी निर्माण होते.अशा वेळेस आधार गेला की आधार घेणारं झाड अचानक अस्थिर होऊ लागतं.मग स्वतःची मजबुती वाढवत ते स्वतःचाच आधार बन्नू लागत.झाडांच्या वाढीचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे पुन्हा स्थिरता यायला तीन ते दहा वर्षे लागू शकतात.


आधार कसा मिळवावा,या शिक्षणात वाऱ्याचीही भूमिका असते.वाऱ्याने झाड एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला वाकवलं जाते.त्यामुळे खोडाला सूक्ष्म छेद जातात.आणि ज्या बाजूला जास्त भार पडतो तिथे झाडाला खोडातील ताकद वाढवावी लागते.हे करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते मग वृक्षाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा इकडे वळवावी लागते.ताकदीचा उपयोग पुढे वाढण्यात कामी येतो. शेजाऱ्याचा आधार गेला की झाडाला थोडंसं जास्त ऊन मिळू लागतं,हा थोडा फायदा होतो पण हा फायदा घ्यायलाही अनेक वर्षं लागतात.कारण आजपर्यंत झाडाची पानं कमी सूर्यप्रकाशासाठी अनुकूल झालेली असतात,ती नाजूक आणि प्रकाशाला संवेदनशील असतात.आता अचानक लख्ख सूर्यप्रकाश मिळाल्यावर त्यांना चटके बसतात.

झाडांवर नवीन पालवीचे अंकुर आदल्या वर्षीच्या वसंत ऋतूतच तयार होऊन गेलेले असतात.

त्यामुळे पानझडी झाडाला जास्त सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी किमान दोन ऋतूंची वाट पाहावी लागते. सूचीपर्णी झाडांना तर यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो कारण त्यांची सुयांसारखी पाने जवळजवळ दहा वर्षांपर्यंत फांद्यांवर राहतात.

जोपर्यंत सर्व पानं किंवा सूचीपर्णी झाडांची पालवी बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती जरा गंभीरच असते.

खोडाच्या घेराची वाढ सुरू असेपर्यंत आणि स्थैर्य मिळेपर्यंत झाडाला अनेक छोटी-मोठी दुखणी आणि इजा सहन कराव्या लागत असतात.नैसर्गिक जंगलांमधल्या झाडाच्या आयुष्यात हे असं अनेक वेळा होणार असतं.वठलेल्या झाडांमुळे आच्छादनात पडलेली खिंडारं एकदा का झाडांनी आपली छत्री वाढवून भरून काढली,की मगच पुन्हा एकमेकांचा आधार घेत वाढणं शक्य होतं. आणि असं झालं की खोडाचा घेर वाढवण्यापेक्षा उंची वाढवण्यासाठी झाड अधिक ऊर्जा खर्च करतं.पण परत आपण झाडांच्या शाळेकडे येऊ या.जर झाडांना शिकण्याची कला जमत असेल,जसं आपण आत्ता अनुभवलं,तर मग असा प्रश्न पडतो की या शिक्षणाची नोंद कुठल्या अवयवात होते? मिळालेले ज्ञान,अनुभव कुठं साठवलं जातं? त्यांना आकडेवारी साठवण्यासाठी किंवा त्यावर काही प्रक्रिया करण्यासाठी मेंदू नसतो.हे सगळ्या झाडांच्या बाबत असंच असतं.त्यामुळे शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो की खरंच झाडांना शिकण्याची कला अवगत आहे का? परत एकदा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मोनिका गॅगलियानोचा अभ्यास इथे आपल्याला दिशा दाखवतो.


या शास्त्रज्ञ मिमोसास (लाजाळू) नावाच्या सूक्ष्म संवेदनशील वनस्पतींचा अभ्यास करीत आहेत.मिमोसास या उष्ण कटिबंध भागातील वेली आहेत.अभ्यासासाठी ही वनस्पती साजेशी आहे,कारण तिला लगेच चिथवता येते.त्यांना हात लावताच त्यांची इवलीशी पानं स्वसंरक्षणासाठी बंद होतात.गॅगलियानोच्या प्रयोगात या पानांवर ठरावीक वेळेला एक पाण्याचा थेंब पडत राहतो. सुरुवातीला ही सतर्क पानं लगेच बंद होतात, पण काही वेळातच त्यांना लक्षात येतं की या थेंबांपासून आपल्याला धोका नाही.त्यानंतर पानं उघडीच राहतात.यातली सर्वांत आश्चर्यकारक सत्य म्हणजे गॅगलियानोला असं दिसलं की एका आठवड्यानंतरही त्या पानांना हे मिळालेले हे नवं ज्ञान त्यांच्या लक्षात राहिलं होतं. 


बीच किंवा एक सबंध झाड प्रयोगशाळेत नेऊन त्यावर असे प्रयोग करता येत नाहीत, हे किती दुर्दैवी आहे! पण पाण्याच्या बाबतीत मात्र यावर अभ्यास आहे.त्यात असं दिसतं की प्रचंड तहान लागली की झाडे किंचाळू लागतात.तुम्ही जंगलात असाल तर मात्र हे ऐकू येणार नाही कारण हे मानवी श्रवण मर्यादेबाहेरच्या ध्वनिलहरी असतात. स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट फॉर फॉरेस्ट,स्नो अँड लँडस्केप रिसर्च नावाच्या संस्थेत झाडांच्या ध्वनींचा अभ्यास केला गेला आहे.ते म्हणतात की,जेव्हा मुळाकडून पानांपर्यंत पाण्याचा प्रवाह होत नाही तेव्हा खोडातून कंपन होते.कदाचित हा एक तांत्रिक प्रतिसाद असेल... पण तरीही?


आपल्याला ध्वनी कसा तयार होतो,याची वैज्ञानिक माहिती आहे.मानव ध्वनी कसे काढतात,हे जर आपण सूक्ष्मदर्शिकेतून पाहिलं तर फार काही वेगळं दिसणार नाही. आपल्या श्वासनलिकेतून जेव्हा हवा जाते, त्या वेळेस आपल्या स्वरतंतूंचं कंपन होतं आणि ध्वनी तयार होतो.त्या दृष्टीने मी जेव्हा खोडांच्या या कंपनाचा विचार करतो, खासकरून मागे वर्णन केलल्या रोपट्यांच्या मुळांचा 'तडतडणारा' आवाजाच्या संदर्भात ! मला अशी खात्री वाटू लागली की ही स्पंदनेसुद्धा खोडाकडून मारलेल्या तहानेच्या हाका आहेत.झाड आपल्या मित्रांना ओरडून सांगायचा प्रयत्न करत असतील की पाणीपुरवठा धोक्यात आला आहे.


वाचता..वाचता… वेचलेले..।


रूसोचे पुस्तक स्विस अधिकाऱ्यांनी जाळले हे एकून तो रागावला.कारण विचार स्वातंत्र्याचा तो भोक्ता होता.तो रूसोला लिहिता झाला.


तुम्ही लिहिता त्यातील एका अक्षराशीही मीसहमत नाही परंतु तुम्हाला ते लिहिण्याचा हक्क आहे व त्या हक्काचे मी मरेपर्यंत समर्थन करीन.तुमच्या विचार करण्याच्या व ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे अखेरपर्यंत संरक्षण करीन.


आणि रूसोला जेव्हा कोठे आधार मिळेना, शकडो शत्रू त्याचा पाठलाग करीत होते, त्याला सतावीत होते व रूसो सारखा इकडे तिकडे पळता पळता थकून जात होता.त्यावेळेस व्हॉल्टेअरने त्याला लिहिले.


माझ्या घरी येऊन रहामी तुमचे मनापासून स्वागत करीन. हे दोन महान पुरुष एकत्र राहते तर केवढा चमत्कार झाला असता !


दुखण्यातून सुधारणा होत जाणे यासारख्या गोष्टी झोपेतच होत असतात.निद्रा ही मूळ अवस्थेसारखी असते असे बुर्ताशा जे म्हणाला होता ते त्याचे म्हणणे बरोबर होतेः

गर्भाशायातील जीव सदैव झोपलेलाच असतो;लहान मूल बरेचसे झोपेतच असते.जीवन म्हणजे गमावलेले परत मिळविणे.झोप म्हणजे मरणाचा घास; दिवसाच्या श्रमाने जीवनाचा जो भाग झिजला, श्रमला असतो त्या भागाला पुन्हा तरतरीत करण्यासाठी झोप असते.मरणापासून उसनां घेतलेला हा घास खाऊन ते जीवन पुन्हा तरतरीत होते.निद्रा म्हणजे आपला चिरशत्रू. आपण जागे असतानाही ती थोडीफार आपणाजवळ असते.शेवटी अगदी शहाण्या लोकांच्या डोक्यातही प्रत्येक रात्री अत्यंत चमत्कारिक व अर्थहीन स्वप्नांचा धूमाकूळ चालत असतो.अशा डोक्यांकडून (मेंदूकडून) कशाची अपेक्षा करायची? त्यांना आपल्या स्वप्नांतून जागे झाल्यानंतर पूनःआपले नित्याचे विचार करणे सुरू करावयाचे असते.असे मेंदू अधिक काय करणार? इच्छाशक्ती म्हणजे माणसाचे सारस्वरूप.जीवनाचे ते स्वरूप आहे.जीवन कोणत्याही स्वरूपात असो;निर्जीव सृष्टीही का असेना.

सर्वत्रही जडातही तर तीच संकल्पशक्ती जर भरून राहिली असेल तर मग काय? इतका दीर्घ काल जिचा शोध केला जात आहे,व जिने इतका दीर्घकाल निराश केलेली असेल,अशीच जर ती 'स्वरूप सत्ता' असेल,तीच संकल्पशक्ती जर अंतिम अन्नःसत्ता असेल व सर्व गोष्टींचे तो गुप्त रहस्य असेल तर काय?


प्रत्येक वस्तूत एक अंतःशक्ती आहे,ती त्या वस्तूला आकार देते.झाडे घ्या;ग्रह घ्या; पशुपक्षी घ्या,त्या सर्वांत ती असते व त्यांना आकार देत असते.प्राण्यातील सहजप्रवृत्ती निसर्गात जी सहेतूकता शिल्लक राहिली आहे तिचे हे उदाहरण आहे.जी कृती हेतूच्या प्राप्तीने प्रेरित झालेली म्हणजे सहेतूक असते तशीच सहज प्रवृत्तीही असते;

आणि तरीही ती हेतुविरहित असते.निसर्गातील सर्व रचनानिर्मिती ही हेतुप्रधान कृतीच्या सदृशा असते,आणि तरीही ती हेतुविरहित असते.बुद्धीपेक्षा संकल्पशक्ती किती आधीची,किती पूर्वीची आहे ते प्राण्यांतील आश्चर्यकारक यांत्रिक कुशलतेवरून दिसून येते. 


युरोपातून सर्वत्र हिंडलेला असा एक हत्ती होता. त्याने शकडो पूल ओलांडले होते जरी त्या पुलावरून अनेक माणसे,घोडे जाताना तो बघत होता तरी त्या तकलुपी पुलावरून स्वतः मात्र पुढे जाईना.कारण त्याला आधी तसा अनुभव कधी आलेला नसतो.तर त्याला तसे सहजप्रवृत्तीकडे तसे वाटते. 


ओरँग ऊटँग माकडे कोठे विस्तव दिसला तर त्याच्याजवळ शकत बसतो;परंतु विस्तवात तो जळण नाही घालीत.अर्थातच अशी ही कृत्ये सहजप्रवृत्त असतात,तर्कशुद्ध विचारांचे फलित नसतात.ती बुद्धीची अभिव्यक्ती नसते,तर तो संकल्पशक्तीचा आविष्कार असतो. ही जिजीविषा,अर्थात जगण्याची इच्छा असते. जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा असते. सर्व जिवंत प्राण्यांना जीवन किती प्यारे असते ! आणि किती धीराने,काही न बोलता,गाजावाजा न करता,धिम्मेपणाने संकल्पशक्ती आपली कालक्रमण करीत असते ! हजारो वर्षे विद्युत तांबे व जस्त यात गाढ झोपून राहिली होती; आणि तांबे व जस्त रूप्याजवळ पडून होती. काही विवक्षित वेळी तिन्ही आणली तर आगीत जळून जातात.

सजीव सृष्टीतही पाहू तर बीज आपल्यामध्ये सर्जनशक्ती सुप्तरूपात तीन तीन हजार वर्षे साठवून पडून राहू शकते;

आणि अनुकुल परिस्थिती येताच ती बी अंकुरते, वनस्पतीच नाही तर बेडूक वगैरे प्राणी सुद्धा हजारो वर्षे दगड धोंड्यात जगू शकतात.म्हणून ही संकल्पशक्ती म्हणजे जगण्याची इच्छा; संकल्पशक्ती असते आणि तिचा सनातन शत्रू म्हणजे मरण असते.परंतु ही संकल्पशक्ती मरणासही कदाचित पराभूत करू शकते का?


प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दुःखाचे माप तिच्या प्रकृतीने,स्वभावानेच एकदा निश्चित करून टाकलेले असते.तो पेला कधी रिकामा होणार नाही किंवा भरलेला आहे.त्याहून अधिक भरला जाणार नाही... एखादी थोडी भारी चिंता आपल्या छातीवरून दूर झाली तर दुसरी तेथे येऊन बसते.या दुसऱ्या चिंतेचे सारे साहित्य आधीपासून होतो तयार.काळजीच्या स्वरूपात आपल्या जाणिवेत शिरायला तिला जागा नव्हती,परंतु जागा रिकामी होताच ती घुसते बघा आत.बसते सिंहासनावर राणी.


हे जीवन दुरितमय,वाईट आहे,कारण दुःख हेच जीवनाचे मूलभूत यथार्थ स्वरूप आहे. दुःखातूनच प्रेरणा मिळते.Pain is basic stimulus & reality.सुख म्हणजे दुःखाचे केवळ थांबण असते.सुख अनुभवरूप आहे. दुःखाचा अभाव म्हणजे सुख.


ॲरिस्टॉटल म्हणे की,शहाणा मनुष्य सुख नाही शोधीत,तर चिंता व दुःख यातून तो मुक्ती मिळवू पाहतो.त्याचे म्हणणे यथार्थ होते.


पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी - सानेगुरुजी, इंद्रनिल प्रकाशन,कोल्हापूर


ऑस्ट्रेलियातील बुलडाग मुंगीचे उदाहरण फारच आश्चर्यकारक आहे.तिचे जर दोन तुकडे केले तर त्या दोन तुकड्यांत लढाई सुरू होते,शेपटी व डोळे यांचे युद्ध सुरू होते.डोके दातांनी शेवटीला चावू पाहते तर शेपटी डोक्यात नांगी मारू पाहते व शौर्याने स्वरंक्षण करते.अर्धा तास चालते अशी लढायी,शेवटी दोन्ही तुकडे मरतात,

किंवा दुसऱ्या मुंग्या त्यांना ओढून नेतात.ज्या ज्या वेळेस हा प्रयोग करण्यात आला त्या त्या वेळेस हा झगडा दिसून आला.Yunghahn युंघान एका जावा बेटातील अशी गोष्ट सांगतो.जावा बेटात एक विस्तृत मैदान आहे.त्या मैदानात जिकडे तिकडे हाडे पडलेली आहेत.हे रणक्षेत्र असावे असे मला वाटले.परंतु ही हाडे large turtles (हाडे) मोठ्या कासव प्राण्याची होती... अंडी घालण्याकरीता ते समुद्रातून येथे जमिनीवर येतात आणि नंतर रानकुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात.ते कुत्रे यांच्या पाठी उलट्या करून त्यांच्यावर बसतात.त्यांच्या पोटापासून लहानसे कवच दूर करून त्यांना जिवंत खाऊन टाकतात. परंतु पुष्कळदा असे होते की,एखादा वाघ या कुत्र्यांवर झडप घालतो.




११/७/२४

वाद घालू नका/Don't argue

जिथे विलियम जेचं शरीर पडलं आहे,तिथे योग्य रस्त्यावर चालण्यामुळे तो मेला.गाडी चालवताना तो बरोबर होता,

पूर्णपणे बरोबर;पण तो तितकाच मृत आहे.जशी काही चूक त्याचीच होती.तुम्ही तुमच्या वादाची गाडी जोरात चालवता,तेव्हा तुम्ही पूर्णपणे बरोबर असू शकता;पण समोरच्याची मानसिकता बदलायचा प्रश्न असतो. तुमचे प्रयत्न तितकेच निरर्थक होतील,जसे की,तुम्हीच चूक आहात.फ्रेंडिक एस.पार्सन्स आयकर सल्लागार होते.ते एका सरकारी टॅक्स इन्स्पेक्टर बरोबर एक तास वाद घालत होते.नऊ हजार डॉलरच्या रकमेचा प्रश्न होता.

पार्सन्सचा दावा होता की,ही रक्कम एक बॅड डेब्ट (Bad debt) होती (एक असं कर्ज ज्याच्या भरण्याची मुळीच उमेद नव्हती) आणि याकरता त्यावर टॅक्स नको लावायला.इन्स्पेक्टरचं उत्तर होतं,"बॅड डेब्ट ! अजिबात नाही.यावर तर टॅक्स लागेल."


इन्स्पेक्टर भावशून्य,हट्टी आणि जिद्दी होता.मिस्टर पार्सन्सने आमच्या क्लाससमोर आपली गोष्ट सांगताना म्हटलं की,तर्काचा काही प्रभाव नाही पडला.तथ्याला सांगितल्यावरही तो नाही विरघळला.आम्ही जितका जास्त वाद घातला, तो तितकाच जास्त अडत गेला.

याकरिता मी वादाचा रस्ता सोडून दिला.चर्चेचा विषय बदलला आणि त्याची प्रशंसा करायला सुरुवात केली.


मी त्याला म्हटलं की,मला असं वाटतं की,ही छोटीशी रक्कम तुमच्याकरिता काही खास महत्त्वाची नाही आहे.कारण तुम्हाला तर खूप मोठ्या रकमांचे महत्त्वपूर्ण आणि कठीण गोष्टी निपटाव्या लागतात.खरं तर मी टॅक्सेशनच्या बाबतीत वाचलं आहे;पण माझं ज्ञान पुस्तकी आहे.जेव्हा की तुम्हाला या विषयावर अनेक वर्षं काम करण्याचा अनुभव आहे.मला तर तुमच्या इतका अनुभव असता,तर याच्यामुळे मी बरंच काही शिकू शकलो असतो.हे मी जे सांगितलं ते सगळं खरंच आहे."


यानंतर इन्स्पेक्टर आपल्या खुर्चीवर सरळ झाला.

पाठीमागच्या बाजूला टेकून बसला आणि बऱ्याच वेळापर्यंत मला त्याच्या कामाच्या बाबतीत सांगत राहिला.

त्यांनी मला सांगितलं की,त्यांनी कोणत्या प्रकारे अनेक मोठ्या मोठ्या घोटाळ्यांना पकडलं आहे.त्याचा आविर्भाव हळूहळू मित्रत्वात झाला.थोड्या वेळानंतर तो माझ्याशी आपल्या मुलांबाबत बोलू लागला. जेव्हा तो गेला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तो या समस्येबाबत थोडा आणखीन विचार करेल आणि काही दिवसांनंतर मला त्याचा निर्णय कळवेल.तीन दिवसांनंतर तो परतून माझ्या ऑफिसमध्ये आला आणि त्यानं मला सांगितलं की,त्यांनी माझ्या टॅक्स रिटर्नला त्याच रूपात स्वीकृती दिली आहे.हा टॅक्स इन्स्पेक्टर खूपच साधारण मनुष्याच्या कमकुमवतपणाचं प्रदर्शन करत होता.प्रत्येक माणसाप्रमाणे त्यालाही महत्त्व हवं होतं.जोपर्यंत मिस्टर पार्सन्स त्याच्या बरोबर वाद घालत राहिले,तोपर्यंत तो प्रबळपणे वाद घालत स्वतःला महत्त्वाचं असल्याचं सिद्ध करत राहिला;पण जेव्हा मिस्टर पार्सन्सनं त्याच्या महत्त्वाला स्वीकारलं,तेव्हा वाद संपला आणि तो सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू माणूस बनला.


बुद्धांनी म्हटलं आहे,'द्वेष द्वेषाने नाही,तर प्रेमाने संपतो.'गैरसमजही वादांनी नाही तर समजदारी,

कूटनीती,सद्भावना,दुसऱ्यांच्या नजरेने बघण्याची इच्छा ठेवल्यावर संपतो.


लिंकन यांनी एकदा एका तरुण आर्मी ऑफिसरला आपल्या सहयोगीबरोबर मोठ्या वादात अडकल्यावर फटकारलं होतं.'जी व्यक्ती जीवनात आपल्या क्षमतांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याकरिता संकल्पवान आहे, त्याच्याजवळ व्यक्तिगत विवादाकरता वेळच राहत नाही.

याशिवाय तो परिणामांना झेलण्याकरताही तयार नाही होत.त्या मोठ्या गोष्टींना सोडून द्या,झेलण्यावर तुमचा दुसऱ्या इतकाच अधिकार आहे.त्या छोट्या गोष्टींना सोडून द्या,जी स्पष्टपणे तुमचीच आहे. जर एखादा कुत्रा तुमच्या रस्त्यात आला आहे, तर त्याच्याशी भांडायच्याऐवजी चांगलं हेच आहे की,तुम्ही त्याच्याकरिता रस्ता मोकळा करा. कुत्र्याला नंतर तुम्ही मारलं तरी त्यानं चावलेल्या ठिकाणाचे घाव भरणं संभव होत नाही.'


बिटस् अँड पीसेस नावाच्या पत्रिकेने एक लेख छापला होता.त्याच्यात काही विचार सुचविले गेले होते की,

असहमती वादात बदलण्यापासून कोणत्या प्रकारे रोखता येईल.


असहमतीचं स्वागत करा.लक्षात ठेवा,'जर दोन्ही पार्टनर नेहमी सहमत होत असतील,तर त्यांच्यातल्या एकाची गरज नाही आहे.'जर तुम्हाला एखादा नवा पैलू दाखवला,

ज्याच्या बाबतीत तुम्ही कधीच विचार केला नव्हता,तर कृतज्ञ राहा की,त्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलंय. असं होऊ शकतं की,ही असहमती एक संधी असेल,ज्यात तुम्ही गंभीर चूक करण्याच्या आधीच चूक सुधारू शकता.

आपल्या पहिल्या भावनेवर भरोसा करू नका.जेव्हा आमच्या समोर कठीण परिस्थिती येते,तेव्हा आमची पहिली प्रतिक्रया सुरक्षिततेची असते.सावधान राहा.शांत डोक्याने विचार करा आणि आपल्या पहिल्या प्रतिक्रियेवर नजर ठेवा.होऊ शकतं की, या वेळी तुम्ही सर्वश्रेष्ठ रूपात नसून,आपल्या निकृष्ट रूपात असाल.आपल्या रागावर काबू ठेवा.लक्षात ठेवा की,कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव या गोष्टीवर मोजला जाऊ शकतो की, त्याला कोणत्या गोष्टीवर राग येतो.पहिल्यांदा पूर्ण गोष्ट ऐका.आपल्या विरुद्ध असलेल्यांना बोलण्याची संधी द्या.त्यांना आपली पूर्ण गोष्ट सांगू द्या.त्यांना विरोध करू नका.वाद घालू नका. स्वतःचा बचाव करू नका.यामुळे भिंत उभी राहते.याच्या उलट समजदारीचा पूल बनवायचा प्रयत्न करा.गैरसमजाची उंच भिंत उभी करू नका.समजुतीचा भाग शोधा.जेव्हा तुम्ही तुमच्या विरोधकांची पूर्ण गोष्ट ऐकाल तेव्हा त्या बिंदूपासून बोलायला सुरुवात करा,

ज्यावर तुम्ही तुमच्या विरोधकाबरोबर सहमत आहात. इमानदार राहा.त्या बिंदूचा शोध लावा ज्यात तुम्ही तुमच्या चुका मानू शकाल आणि तसं सांगा.तुमच्या चुकांकरता माफी मागा.यामुळे तुमचे विरोधक थंड पडतील.


असं वचन द्या,की तुम्ही आपल्या विरोधकांच्या विचारांवर लक्ष देऊन विचार कराल.होऊ शकतं की,तुमचे विरोधक बरोबर असतील.हे जास्त सोपं आहे की,तुम्ही त्यांच्या विचारांवर विचार करायला सहमत व्हा.याऐवजी तुम्ही जोरात पुढे व्हाल आणि अशी चूक कराल ज्यात तुमच्या विरोधकांना नंतर हे सांगण्याचा मोका मिळेल की,'आम्ही तुम्हाला समजवायचा खूप प्रयत्न केला होता;पण तुम्ही आमचं एकपण ऐकलं नाही.' समस्येमध्ये रुची घेण्याबाबत आपल्या विराधकांचे मनापासून धन्यवाद मना.जो तुमच्याबरोबर वाद करण्याकरिता वेळ देतो आहे,

त्याच्याही आवडीचा विषय आहे.त्याला एक अशी व्यक्ती समजा जी खरंच तुमची मदत करू इच्छिते.या प्रकारे तुम्ही तुमच्या विरोधकांना मित्र बनवू शकाल.दोन्ही बाजूंनी विचार केल्यावरच काम करा. 


तुम्ही समोरच्याला त्याच दिवशी नंतर किंवा दुसऱ्या दिवशी मीटिंग करता सांगू शकता,तेव्हा पूर्ण तथ्यांवर विचार विमर्श केला जाऊ शकतो. या मीटिंगच्या तयारीसाठी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारा.हे होऊ शकतं का की माझे विरोधक खरे आहे? थोड्याशा प्रमाणात खरे? काय त्यांच्या नजरेत या तर्कामध्ये खरेपणा किंवा दम आहे? काय मी खरंच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय की स्वतःचा राग काढतो आहे? माझ्या प्रतिक्रियेमुळे माझे विरोधक दूर जाताहेत की ते माझ्या जवळ येत आहेत? मी जे करतो आहे,त्याने माझी प्रतिष्ठा वाढेल? मी जिंकेन किंवा हरेन ? जर मी जिंकलो तर मला याची काय किंमत चुकवावी लागेल? जर मी याबाबतीत शांत राहिलो तर काय ही असहमती संपेल ? काय ही कठीण परिस्थिती कुठल्याही प्रकारे माझ्याकरिता एक स्पर्धा बनू शकेल ?


ऑपेरा स्टार जॉन पियर्स आपल्या पन्नास वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या सफलतेचं गुपित सांगताना म्हणतात,"माझी पत्नी आणि मी आम्ही खूप आधी एक तडजोड केली होती. आम्ही एकमेकांबरोबर कितीही रागावलेला असो,आम्ही या तडजोडीला निभावलं.जेव्हा एक खूप रागावतो आणि ओरडत असतो,तेव्हा दुसरा त्याची शांतपणे बडबड ऐकेल कारण जर दोघे जण ओरडायला लागले,तर संवाद होऊ शकत नाही.घरात हल्ला आणि वादावादी शिवाय काहीही नाही होणार."


वाद घालू नका,वादापासून स्वतःचा बचाव करा..!


०९.०७.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग संपला…

९/७/२४

वाद करु नका - don't argue

पहिलं युद्ध संपल्यावर काही काळानंतर मी लंडनमध्ये एका रात्री एक बहुमूल्य धडा शिकलो. मी त्या वेळी सर रॉन्स स्थिथचा मॅनेजर होता.युद्धाच्या वेळी सर रॉन्स फिलिस्तीन ऑस्ट्रेलिया सरकारचे महत्त्वपूर्ण व्यक्ती होते. युद्धानंतर सर रॉन्सनी आधी जगाला हवाई चक्कर मारून सर्वांना आश्चर्यचकित केलं.या प्रकारची करामत याच्या आधी कधीच केली गेली नव्हती.या अद्भुतपूर्व प्रवासामुळे जबरदस्त खळबळ पसरली.इंग्लंडच्या राजानं त्यांना नाइटची पदवी दिली आणि काही काळापर्यंत ते

ब्रिटिश साम्राज्याचे सर्वाधिक चर्चित व्यक्ती होते.एका रात्री मी सर रॉसच्या सन्मानार्थ दिल्या गेलेल्या जेवणात सामील झालो.रात्रीच्या जेवण्याच्या वेळी माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं एक मजेदार गोष्ट सांगितली.ती एका म्हणीवर आधारित होती.


काही दैवी शक्ती आमच्या भाग्याचं नियंत्रण करते.मग आम्ही कितीही प्रयत्न केले तरी.


गोष्ट ऐकणाऱ्यानं त्यावर म्हटले की,हे बायबलचे कोटेशन आहे.मला माहीत होते की,हे खोटे आहे.मी चांगल्या प्रकारे हे जाणत होतो.या बाबतीत माझ्या मनात जरापण संदेह नव्हता म्हणून याकरिता महत्त्वपूर्ण बनायच्या लालसेनी आणि आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता मी स्वतःच स्वतःला सुधारक समितीचा अध्यक्ष बनवून टाकले.जेव्हा की तो आपल्या गोष्टीवर अडून राहिला,काय ? शेक्सपिअरचे कोटेशन ? असंभव ! फालतु ! हे कोटेशन तर बायबलचंच आहे आणि त्याला पूर्ण विश्वास होता की हे खरं आहे.गोष्ट सांगणारा माझ्या उजवीकडे बसला होता आणि माझे जुने मित्र क्रॅक गॅमंडनी अनेक वर्षे शेक्सपिअरचा अभ्यास केला होता.यामुळे आम्ही त्यांच्याचकडून या गोष्टीचा निकाल लावण्याचं ठरविलं.

गॅमंडनं आमची पूर्ण गोष्ट ऐकली आणि टेबलाच्या खालून पाय मारत मला म्हणाला,डेल,तू चुकीचा आहेस.हे सज्जन बरोबर आहेत.हे कोटेशन बायबलचं आहे.त्या रात्री घरी परतताना मी गॅमंडला म्हटलं,फ्रँक तुम्ही तर जाणत होता ना की ते कोटेशन शेक्सपिअरचं आहे?हो,का नाही? त्यांनी उत्तर दिलं."हॅम्लेट नाटकातल्या पाचव्या अंकातल्या दुसऱ्या सीनमध्ये हे कोटेशन आहे;पण माझ्या प्रिय मित्रा डेल,आपण एका समारंभात पाहुणे म्हणून गेलो होतो.

कोणत्या तरी माणसासमोर हे सिद्ध करून काय फायदा की,तो चुकीचा आहे? यामुळे तो तुम्हाला पसंत करू लागेल का? त्यांनी तुम्हाला मत नव्हतं विचारलं.त्याला तुमच्या मताची जरूरतही नव्हती.त्याच्या बरोबर वाद कशाला करायचा ? धारदार वादापासून नेहमी वाचलं पाहिजे.मला अशा त-हेच्या धड्यांची सक्त जरूरत होती.

कारण वादविवाद करणं किंवा वाद घालणं हा माझा प्रिय शौक होता.आपल्या तारुण्यात मी जगातल्या प्रत्येक गोष्टीवर तर्क आणि वादविवाद करत होतो. 


जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मी तर्कशास्त्र आणि तर्कवितर्कचा अभ्यास केला.वादविवाद प्रतियोगितामध्ये खूप हिरिरीनं भाग घेतला. मिसुरीच्या लोकांमध्ये ही सवय आहे आणि मी तर तिथंच जन्मलो.मला वाटायचं जगानं मला बघावं आणि बघतच राहावं.नंतर मी वादविवाद

आणि तर्कवितर्क करण्याची कला न्यू यॉर्कमध्ये शिकवली.मला हे स्वीकारायला तर लाज वाटते की,एक वेळ तर मी या विषयावर एक पुस्तक लिहिण्याची योजना केली होती,तेव्हापासून आजपर्यंत मी हजारो वादांमध्ये भाग घेतला आहे.त्यांना ऐकलं आहे.पाहिलं आहे.


आपल्या आणि दुसऱ्या लोकांच्या जीवनात त्याचे परिणाम बघितले आहेत.यानंतर मी या निष्कर्षाला आलो की,ईश्वरानं बनविलेल्या या जगात वादापेक्षा एकाच पद्धतीनं फायदा होऊ शकतो.तो हा की,वादापासून वाचले पाहिजे.वादापासून त्याच तऱ्हेने वाचा ज्या त-हेने तुम्ही साप किंवा भूकंपापासून वाचता.दहामध्ये नऊ वेळा तर वादामुळे काही फायदा होत नाही.कारण दोन्ही पक्षांना वादानंतर हा पूर्ण विश्वास होतो की तेच बरोबर होते.


तुम्ही वादामध्ये नाही जिंकू शकत.कारण जर तुम्ही हारता,तेव्हा तर तुमची जीत होते.का? पण जर तुम्ही जिंकलात तरी तुमची हार होते.का? जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सिद्ध केलंत की, त्यांच्या तर्कामध्ये काही दम नाही आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही चिंधड्या उडवल्यात तर काय होईल? निश्चितपणे तुम्हाला छान वाटेल; पण त्याची हालत काय होईल ? तुम्ही त्याला सगळ्यांसमोर खाली बघायला लावलं.तुम्ही त्याच्या गर्वाचं घर खाली केलंत.तो तुमच्या जिंकण्यामुळे चिडून जाईल.


आपल्या इच्छेविरुद्ध जो गोष्ट मानतो,

तो आजही त्याच विचाराचा असतो.


वादांनी कुठलाच फायदा होत नाही.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन


अनेक वर्षांपूर्वी माझ्या क्लासमध्ये पॅट्रिक जे.ओ. हेअर नावाचा स्टुडंट होता.त्याचं शिक्षण तर कमी होतं;पण त्याला वादविवाद करायला खूप मजा यायची. एकदा तो शोफरचं काम करून चुकला होता.तो माझ्यापाशी आला होता कारण त्याला त्याचे ट्रक विकायचे होते आणि त्याचे ट्रक विकले जात नव्हते.थोड्या प्रश्नोत्तरांनंतर मला लक्षात आले की,ज्या लोकांना तो ट्रक विकायचा म्हणतो आहे, त्यांच्याशी वाद घालून तो त्यांना स्वतःचा विरोधी बनवायचा.जर कोणत्या ग्राहकानं त्याच्या कंपनीच्या ट्रकमध्ये काही खोट दाखवली,तर पॅट्रिकला प्रचंड राग येत असे.तो लगेच ग्राहकाचा गळा पकडत होता.पॅट्रिकनी या पद्धतीनं खूप वाद जिंकले.जसं त्यांनी नंतर मला सांगितलं.मी बहुतेक कोणाच्या ऑफिसमधून हे सांगून निघत होतो की,आज मी त्याला धडा शिकवला.

निश्चितपणे मी त्याला धडा शिकवला होता;पण मी त्याला काही विकू शकलो नाही.


माझी समस्या ही नव्हती की,पॅट्रिकला बोलायला शिकवायचं आहे.माझी समस्या ही होती की,पॅट्रिकला बोलण्यापासून आणि वाद घालण्यापासून कसं थांबवायचं?


पॅट्रिक जे.ओ.हेयर काही काळानंतर काइट मोटर कंपनीचा स्टार सेल्समन बनला.हे कसं झालं हे त्याच्याच शब्दांत ऐका.जेव्हा मी कोणत्या ग्राहकाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि समोरच्यानं अशी प्रतिक्रिया दिली,'व्हाइट कंपनीचा ट्रक ? त्यात काही खास दम नाहीये. जर मला कोणी फुकटात तो ट्रक दिला,तरी मी तो घेणार नाही.मी तर हूजइट कंपनीचा ट्रक विकत घेणार आहे.'यावर मी सांगतो की, हूजइट कंपनीचे ट्रक खूप छान असतात.जर तुम्ही तो ट्रक विकत घेतला तरी तुम्हाला मुळीच पश्चात्ताप होणार नाही.हूजइट कंपनी खूप चांगली आहे. आणि त्याचे सेल्समनही खूप छान आहेत.'


हे ऐकल्यावर ग्राहक आश्चर्यचकित होतो.आता वादाला कुठं जागाच उरत नाही.जर तो सांगतो की,हूजइट कंपनीचे ट्रक सगळ्यात चांगले असतात आणि मी हे मानतो तर पुढे तो वाद घालूच शकत नाही.जेव्हा मी त्याच्याशी सहमत होतो,तेव्हा तो हे पुन्हा नाही म्हणू शकत की, हूजइट कंपनीचे ट्रक सर्वश्रेष्ठ आहेत.मग आम्ही हूजइट विषयाच्या पुढे सरकतो आणि मी त्याला व्हाइट ट्रकची महती सांगतो.आधी असं व्हायचं की,जेव्हा ग्राहक माझ्या कंपनीला नाव ठेवायचे तेव्हा मी रागानं लालेलाल होत होतो.मग मी जोरजोरात हूजइट कंपनीच्या ट्रकबद्दल नकारात्मक गोष्टी सांगू लागायचो.मी जितकं जास्त वाईट म्हणायचो,माझा ग्राहक माझ्या प्रतिस्पर्धी ट्रकची तितकीच तारीफ करायचा आणि माझ्या प्रतिस्पर्ध्याचा ट्रक विकत घेण्याबद्दलचं मत अधिक ठाम बनत जायचं.जेव्हा मी पाठीमागं वळून बघतो,तेव्हा मला हैराण व्हायला होतं की,मी जो काही माल विकला तो मी कसा काय विकू शकलो?मी वाद करण्यात आणि भांडण्यात आपल्या जीवनातली अनेक वर्षं बरबाद केली.आता मी माझे तोंड बंद ठेवतो.यामुळे मला खूप फायदा होतो.


बेन फ्रँकलीननं एकदा म्हटलं होतं,


जर तुम्ही वाद घालत आहात आणि समोरचा विरोध करत आहे,तर अनेक वेळा तुम्ही जिंकाल;परंतु हे जिंकणं पोकळ असेल कारण तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याचा सद्भाव मिळणार नाही.तुम्ही स्वतःच विचार करा की,तुम्ही काय पसंत कराल?वादात नाटकीय,सैद्धान्तिक विजय की समोरच्याचा सद्भाव मिळवणे ? दोन्ही गोष्टी एकदम मिळविणं खूपचं कठीण असतं.


बोस्टन ट्रांस्क्रिप्टमध्ये एकदा काही महत्त्वाच्या ओळी छापल्या होत्या.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..!

७/७/२४

टच ॲण्ड गो / Touch and Go - २

दोन्हीमधून सुटका होणार होती म्हणून आम्ही गावातून एक पहार मागवली,काही अंतरावरून पाच सहा काटेरी झुडपं तोडली व पहारीच्या सहाय्याने त्या सपाट जागेच्या आमच्या बाजूला पाच भोके पाडून त्यात ती झुडपं अगदी नैसर्गिकपणे उगवल्यासारखी वाटावीत अशी रोवून दिली आणि त्यात माती दाबून बसवली. आता मात्र आमची खात्री पटली की उंदरापेक्षा मोठं असं कोणतंही जनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे मृत्यूला कवटाळण्याशिवाय भक्ष्याला तोंड लावू शकणार नाही.सर्वात शेवटी आम्ही रायफलीचे सेफ्टी कॅचेस उघडले व गावात परतलो.

गावापासून पन्नास यार्डावर,जिथे आम्हाला रक्ताचं थारोळ दिसलं होतं,त्या जागेपासून जवळच एक भलं थोरलं आंब्याचं डेरेदार झाड होतं.गावातून काही फळ्या घेऊन आम्ही त्या झाडावर एक ऐसपैस मचाण बांधलं व त्याच्यावर गोड वासाच्या भाताच्या पेंढ्या पसरून ठेवल्या.बिबळ्या जिनट्रॅपमध्ये सापडला तर त्याला लगेच खतम करण्यासाठी रात्रभर तिथे थांबण्याचा आमचा इरादा होता.सूर्यास्ताला आम्ही मचाणावर आमच्या जागा घेतल्या.अगदी पाय ताणून व एकमेकांशेजारी लवंडू शकू इतकं ते मचाण मोठं होतं. मचाणापासून भक्ष्यापर्यंतचं अंतर जवळजवळ दोनशे ते तीनशे यार्ड होतं आणि मृतदेह मचाणाच्या पातळीपेक्षा शंभर फूट उंचीवर होता.


टेलिस्कोपिक साईट्स लावलेल्या रायफलने सुद्धा इतक्या लांबवरचा नेम अचूक बसेल की नाही याबद्दल इबॉटसनला शंका होती.त्यामुळे त्याने त्याची अतिशय शक्तीमान दुर्बीण केसमधून बाहेर काढली आणि मी माझी ०.२७५ रायफल लोड केली.आमची योजना अशी होती की इबॉटसनने बिबळ्या जिथून येईल अशी अपेक्षा होती तेवढा भाग दुर्बीणीतून काळजीपूर्वक बघावा आणि मी डोंगरावर सर्वसाधारण नजर ठेवावी.ज्या कोणाला पहिल्यांदा बिबळ्या दिसेल त्याने शॉट घ्यावा;हा शॉट रेंजच्या अगदी टोकाला असेल तरीसुद्धा !


इबॉटसन डुलकी घेत असताना मी आरामात सिगरेट ओढत पश्चिमेकडच्या पहाडांमुळे पडलेल्या सावल्या आमच्या समोरच्या डोंगरावरून पुढे पुढे येत असताना बघत होतो. आणि जेव्हा सूर्यास्ताच्या किरणांमुळे पहाडांची शिखरं लाल रंगाने न्हाऊन निघू लागली तेव्हा इबॉटसन उठला.त्याने दुर्बीण उचलली आणि मी माझी रायफल ! आता बिबळ्या त्या ठिकाणी येण्याची वेळ आली होती.तरीही अजून पाऊणतास उजेड राहणार होता व त्या पाऊणतासात इबॉटसनने दुर्बीणीतून आणि मी नुसत्या डोळ्यांनी समोरच्या डोंगराचा इच न इंच पिंजून काढला.पण पक्षी किंवा प्राणी कोणाचीच काही हालचाल दिसली नाही.आता मात्र अंधार पडला तशी मी रायफल खाली ठेवली व इबॉटसनने दुर्बीण केसमध्ये ठेवून दिली.

बिबळ्याला मारण्याची एक संधी गेली होती पण अजूनही दोन संधी बाकी होत्या. त्यामुळे आम्ही फारसे निराश झालो नाही.अंधार पडल्यावर थोडा पाऊस सुरू झाला तसं मी माझ्या मनातली भीती इबॉटसनला बोलून दाखवली की पाण्याच्या वजनाने नाजूकपणे जुळवलेला सापळा बंद होण्याची शक्यता आहे व जरी तसं झालं नाही तरी पावसात भिजल्याने आमच्या फिशिंग लाईन्स आकुंचित होऊन ट्रीगर दाबला जाण्याची शक्यता आहे.थोड्या वेळानंतर,

पाऊस सुरूच असताना इबॉटसनने मला वेळ विचारली. माझ्याकडे ल्यूमिनस मनगटी घड्याळ होतं व मी त्याला "पावणे आठ वाजलेत" असं सांगतोय, तोच भक्ष्याच्या दिशेकडून आम्हाला एकापाठोपाठ एक अशा डरकाळ्या ऐकायला आल्या. तो बिबळ्या- रुद्रप्रयागचा जगप्रसिद्ध नरभक्षक-सरतेशेवटी आमच्या जिनट्रॅपमध्ये फसला होता.!


इबॉटसनने मचाणावरून जवळजवळ उडीच मारली आणि मीही फांद्यावरून लटकत खाली आलो.दोघांपैकी एकाचाही पाय मोडला नाही हे सुदैवच ! जवळच्याच रताळ्याच्या शेतात पुरलेला पेट्रोमॅक्स आम्ही बाहेर काढला. इबॉटसन तो पेटवत असताना मी माझ्या मनातल्या भीतीला आणि संशयाला वाट करून दिली.

त्यावर इबॉटसन वैतागून म्हणाला,'तू म्हणजे एक नंबरचा निराशावादी आहेस.तुला पहिली शंका आली की पावसाच्या एकदोन थेंबांमुळे ट्रॅप बंद होईल आणि रायफलच्या गोळ्या सुटतील व आता तिकडनं कोणताच आवाज येत नसल्याने तुला म्हणायचंय की बिबळ्या ट्रॅपमधून सटकलाय.'मला अगदी हेच म्हणायचं होतं हे मान्य करावं लागेल.कारण मागच्या वेळेला सापळ्यात अडकल्यावर त्या बिबळ्याने सातत्याने गुरगुर केली होती व डरकाळ्या फोडल्या होत्या पण आता मात्र पहिले काही आवाज सोडले तर तिकडे अगदी स्मशान शांतता पसरली होती.कंदिलांच्या सर्व मेक्सच्या बाबतीत इबॉटसन तज्ज्ञ आहे.लवकरच त्याने तो पेटवला,पंप केला व 'आमचे' विचार जरा बाजूला ठेवून आम्ही झपाट्याने तिकडे निघालो,कारण आता इबॉटसनलाही ती शांतता खटकायला लागली होती.फिशिंग लाईनला धक्का लागू नये म्हणून आम्ही लांब फेरा मारून वरच्या बाजूने  भक्ष्याकडे आलो.जेव्हा आम्ही बांधावरून खाली बघितलं तेव्हा आम्हाला दिसलं की जमीनीत ट्रॅप नाहीये तर त्या ठिकाणी फक्त रिकामा खड्डा आहे.आमच्या आशा जरा उंचावतायत तेवढ्यात पेट्रोमॅक्सच्या रिकामा,उत्तारावर दहा यार्डावर आम्हाला जिन ट्रॅप दिसला.


त्याचे जबडे बंद होते व तो रिकामा होता.मृतदेहसुद्धा आता पहिल्या स्थितीत नव्हता, त्याचा बराच भाग खाल्ला गेला होता.अतिशय निराश मनाने आम्ही परत मचाणावर जाऊन बसलो.आता जागं राहण्याची काही गरजच उरली नव्हती त्यामुळे आम्ही अंगावर गवताचं पांघरूण घेऊन झोपून गेलो.पहाटे आम्ही झाडाखाली शेकोटी पेटवली,

पाणी गरम करून चहा केला व जरा शेकत बसलो. त्यानंतर पटवारी आणि माझ्या माणसांना घेऊन परत मृतदेहाजवळ गेलो.या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करतोय की त्यावेळेला आम्ही दोघं होतो व आमच्याबरोबर बरीच माणसं होती.कारण मी जर एकटा असतो तर मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सांगायला धजलो नसतो.


'सैतानी शक्ती' असो किंवा साधं जनावर...अगदी असं गृहीत धरलं की ह्या बाईच्या मारेकऱ्याने आम्ही सर्व तयारी करताना पाहिलं असेल तरी ही गोष्ट आमच्या कल्पनेपलीकडची होती की एवढ्या अंधाऱ्या रात्री,पाऊस पडत असताना तो इतक्या प्रकारचे ट्रॅप्स चुकवून भक्ष्यापर्यंत जाऊ शकला व जिवंत राहू शकला.


रात्री हलका पाऊस पडल्यामुळे जमीन ओलसर झाली होती व त्यामुळे आम्ही जमीनीवरच्या खाणाखुणांवरून रात्रीच्या एकूण हालचालींचा मागोवा घेऊ शकलो.आम्ही अपेक्षा केली होती त्याच दिशेकडून तो आला होता.पण त्या सपाट जमीनीच्या पट्ट्यापर्यंत आल्यानंतर मात्र त्याला वळसा घालून आम्ही ज्या मार्गावर काटेरी झुडपं रोवली होती तिथून भक्ष्याकडे गेला होता. पाचापैकी तीन झुडपं त्याने उपटून टाकली होती आणि जाण्याइतपत मोठी जागा करून भक्ष्यापर्यंत गेला होता.त्यानंतर भक्ष्य तोंडात धरून त्याने स्वतःकडे म्हणजे आम्ही गनट्रॅप म्हणून बांधलेल्या रायफलींकडे फूटभर ओढून घेतलं होतं.त्यामुळे फिशिंग लाईन ढिल्या पडल्या होत्या.त्यानंतर त्याने खायला सुरुवात केली होती.तिच्या कमरेला बांधलेल्या फिशिंग लाईनला तोंड लागू नये अशी काळजी घेत घेत त्याने खाल्लं होतं. डोकं आणि मानेत विष पेरलेलं नव्हतं.तेच भाग त्याने सर्वप्रथम खाल्ले.नंतर अतिशय काळजीपूर्वक त्याने विष पेरलेल्या जागांच्या मधले भाग खाल्ले होते. 


पोट भरल्यानंतर त्याने पावसापासून आडोसा शोधण्यासाठी जागा सोडली व याचवेळी ज्याची मला भीती वाटत होती ते खरंच घडलं. 


पावसाच्या पाण्याच्या वजनामुळे ट्रॅपची प्लेट दाबली गेली होती.बिबळ्याचा पाय त्यावर पडण्याच्याच वेळेला स्प्रिंग सुटल्या होत्या व त्याच्या गुडघ्याच्या सांध्याच्या ठिकाणी त्या ट्रॅपचे दोन्ही जबडे बंद झाले.इकडेच आमचं दुर्दैव आड आलं होतं.रुद्रप्रयागवरून तो वजनदार सापळा आणताना आमच्या माणसांकडून तो पडला होता व एक तीन इंची दात तुटला होता.त्याच्या डाव्या पायाचा तो सांधा बरोबर त्या तुटलेल्या दातामुळे पडलेल्या फटीतच अडकला होता. नाहीतर तो सापळ्यामध्ये पुरता अडकला असता कारण होती ती पकडही इतकी मजबूत होती की त्याला ताकद लावून तो चाळीस किलोचा सापळा खड्ड्यातून पायाबरोबर ओढून काढता आला व पुढे दहा यार्ड ओढूनही नेता आला. आता मात्र बिबळ्याऐवजी त्या सापळ्यामध्ये फक्त त्याच्या केसांचे झुपके व कातडीचा छोटा तुकडाच अडकला होता... हाच तुकडा - नंतर म्हणजे खूप दिवसांनी मला त्याच्या ठिकाणी चपखल बसवून बघण्याचं समाधान मिळालंय.


या त्याच्या हालचाली कितीही अविश्वसनीय वाटल्या तरी आठ वर्ष नरभक्षक असलेल्या जनावरांकडून अपेक्षित अशाच त्या होत्या…! 


मोकळा भाग सोडून आडोशाच्या दिशेकडूनच भक्ष्यावर येणे,काटेरी झुडुपं उखडून टाकणे, स्वतःच्या सोयीसाठी भक्ष्य जवळ ओढून घेणे. आम्ही विष पेरलेले भाग सोडून उरलेला भाग खाणे (सायनाईडचा आता त्याला अनुभव होता व या विषाला अतिशय उग्र वास आहे) या सर्व नैसर्गिकच क्रिया आहेत.ट्रॅप बंद होण्याबद्दलचं मी जे काही स्पष्टीकरण दिलंय ते माझ्या मते बरोबर आहे.

पावसाच्या पाण्याच्या वजनाने प्लेट दाबली जाऊन जबडे बंद होत असतानाच योगायोगाने त्याच्यावर बिबळ्याने पाय ठेवला होता.ट्रॅपचे सर्व भाग सुटे केल्यावर व मृतदेहाचे अवशेष नातेवाईकांकडून दहनविधीसाठी गोळा केले गेल्यावर आम्ही रुद्रप्रयागच्या वाटेला लागलो.रात्री केव्हातरी तो बिबळ्या आंब्याच्या झाडाजवळ येऊन गेला होता. कारण तिथे आम्हाला त्याचे पगमार्क् स दिसले... या पगमार्कर्सचा माग सरळ यात्रामार्गावर व तिथून बंगल्याच्या फाटकापर्यंत गेला होता.


फाटकाच्या पिलर्सखाली त्याने जमीन खरवडली होती.पुढे तो तसाच गुलाबराईच्या दिशेने आणखी एक मैल गेला होता.इथेच आपला तो जुना मित्र ओझीवाला म्हातारा मुक्काम ठोकून होता व त्याच्या एक बोकड त्याने निष्कारण मारला होता.


तुमच्यापैकी ज्यांनी शिकारीसाठी रायफल खांद्याला लावून जंगलवाटा तुडवल्या असतील त्यांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की इतक्या सातत्याने येणाऱ्या अपयशांनी खचून न जाता माझा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला की एक ना एक दिवस (किंवा रात्र) असा येईल की जेव्हा विष,ट्रॅप्स वगैरे गोष्टींचा अजिबात वापर करावा न लागता मला माझ्या रायफलचा खराखुरा उपयोग करायची संधी मिळेल.


दिनांक - ०५.०७.२४ या लेखातील दुसरा व शेवटचा भाग…