दोन्हीमधून सुटका होणार होती म्हणून आम्ही गावातून एक पहार मागवली,काही अंतरावरून पाच सहा काटेरी झुडपं तोडली व पहारीच्या सहाय्याने त्या सपाट जागेच्या आमच्या बाजूला पाच भोके पाडून त्यात ती झुडपं अगदी नैसर्गिकपणे उगवल्यासारखी वाटावीत अशी रोवून दिली आणि त्यात माती दाबून बसवली. आता मात्र आमची खात्री पटली की उंदरापेक्षा मोठं असं कोणतंही जनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे मृत्यूला कवटाळण्याशिवाय भक्ष्याला तोंड लावू शकणार नाही.सर्वात शेवटी आम्ही रायफलीचे सेफ्टी कॅचेस उघडले व गावात परतलो.
गावापासून पन्नास यार्डावर,जिथे आम्हाला रक्ताचं थारोळ दिसलं होतं,त्या जागेपासून जवळच एक भलं थोरलं आंब्याचं डेरेदार झाड होतं.गावातून काही फळ्या घेऊन आम्ही त्या झाडावर एक ऐसपैस मचाण बांधलं व त्याच्यावर गोड वासाच्या भाताच्या पेंढ्या पसरून ठेवल्या.बिबळ्या जिनट्रॅपमध्ये सापडला तर त्याला लगेच खतम करण्यासाठी रात्रभर तिथे थांबण्याचा आमचा इरादा होता.सूर्यास्ताला आम्ही मचाणावर आमच्या जागा घेतल्या.अगदी पाय ताणून व एकमेकांशेजारी लवंडू शकू इतकं ते मचाण मोठं होतं. मचाणापासून भक्ष्यापर्यंतचं अंतर जवळजवळ दोनशे ते तीनशे यार्ड होतं आणि मृतदेह मचाणाच्या पातळीपेक्षा शंभर फूट उंचीवर होता.
टेलिस्कोपिक साईट्स लावलेल्या रायफलने सुद्धा इतक्या लांबवरचा नेम अचूक बसेल की नाही याबद्दल इबॉटसनला शंका होती.त्यामुळे त्याने त्याची अतिशय शक्तीमान दुर्बीण केसमधून बाहेर काढली आणि मी माझी ०.२७५ रायफल लोड केली.आमची योजना अशी होती की इबॉटसनने बिबळ्या जिथून येईल अशी अपेक्षा होती तेवढा भाग दुर्बीणीतून काळजीपूर्वक बघावा आणि मी डोंगरावर सर्वसाधारण नजर ठेवावी.ज्या कोणाला पहिल्यांदा बिबळ्या दिसेल त्याने शॉट घ्यावा;हा शॉट रेंजच्या अगदी टोकाला असेल तरीसुद्धा !
इबॉटसन डुलकी घेत असताना मी आरामात सिगरेट ओढत पश्चिमेकडच्या पहाडांमुळे पडलेल्या सावल्या आमच्या समोरच्या डोंगरावरून पुढे पुढे येत असताना बघत होतो. आणि जेव्हा सूर्यास्ताच्या किरणांमुळे पहाडांची शिखरं लाल रंगाने न्हाऊन निघू लागली तेव्हा इबॉटसन उठला.त्याने दुर्बीण उचलली आणि मी माझी रायफल ! आता बिबळ्या त्या ठिकाणी येण्याची वेळ आली होती.तरीही अजून पाऊणतास उजेड राहणार होता व त्या पाऊणतासात इबॉटसनने दुर्बीणीतून आणि मी नुसत्या डोळ्यांनी समोरच्या डोंगराचा इच न इंच पिंजून काढला.पण पक्षी किंवा प्राणी कोणाचीच काही हालचाल दिसली नाही.आता मात्र अंधार पडला तशी मी रायफल खाली ठेवली व इबॉटसनने दुर्बीण केसमध्ये ठेवून दिली.
बिबळ्याला मारण्याची एक संधी गेली होती पण अजूनही दोन संधी बाकी होत्या. त्यामुळे आम्ही फारसे निराश झालो नाही.अंधार पडल्यावर थोडा पाऊस सुरू झाला तसं मी माझ्या मनातली भीती इबॉटसनला बोलून दाखवली की पाण्याच्या वजनाने नाजूकपणे जुळवलेला सापळा बंद होण्याची शक्यता आहे व जरी तसं झालं नाही तरी पावसात भिजल्याने आमच्या फिशिंग लाईन्स आकुंचित होऊन ट्रीगर दाबला जाण्याची शक्यता आहे.थोड्या वेळानंतर,
पाऊस सुरूच असताना इबॉटसनने मला वेळ विचारली. माझ्याकडे ल्यूमिनस मनगटी घड्याळ होतं व मी त्याला "पावणे आठ वाजलेत" असं सांगतोय, तोच भक्ष्याच्या दिशेकडून आम्हाला एकापाठोपाठ एक अशा डरकाळ्या ऐकायला आल्या. तो बिबळ्या- रुद्रप्रयागचा जगप्रसिद्ध नरभक्षक-सरतेशेवटी आमच्या जिनट्रॅपमध्ये फसला होता.!
इबॉटसनने मचाणावरून जवळजवळ उडीच मारली आणि मीही फांद्यावरून लटकत खाली आलो.दोघांपैकी एकाचाही पाय मोडला नाही हे सुदैवच ! जवळच्याच रताळ्याच्या शेतात पुरलेला पेट्रोमॅक्स आम्ही बाहेर काढला. इबॉटसन तो पेटवत असताना मी माझ्या मनातल्या भीतीला आणि संशयाला वाट करून दिली.
त्यावर इबॉटसन वैतागून म्हणाला,'तू म्हणजे एक नंबरचा निराशावादी आहेस.तुला पहिली शंका आली की पावसाच्या एकदोन थेंबांमुळे ट्रॅप बंद होईल आणि रायफलच्या गोळ्या सुटतील व आता तिकडनं कोणताच आवाज येत नसल्याने तुला म्हणायचंय की बिबळ्या ट्रॅपमधून सटकलाय.'मला अगदी हेच म्हणायचं होतं हे मान्य करावं लागेल.कारण मागच्या वेळेला सापळ्यात अडकल्यावर त्या बिबळ्याने सातत्याने गुरगुर केली होती व डरकाळ्या फोडल्या होत्या पण आता मात्र पहिले काही आवाज सोडले तर तिकडे अगदी स्मशान शांतता पसरली होती.कंदिलांच्या सर्व मेक्सच्या बाबतीत इबॉटसन तज्ज्ञ आहे.लवकरच त्याने तो पेटवला,पंप केला व 'आमचे' विचार जरा बाजूला ठेवून आम्ही झपाट्याने तिकडे निघालो,कारण आता इबॉटसनलाही ती शांतता खटकायला लागली होती.फिशिंग लाईनला धक्का लागू नये म्हणून आम्ही लांब फेरा मारून वरच्या बाजूने भक्ष्याकडे आलो.जेव्हा आम्ही बांधावरून खाली बघितलं तेव्हा आम्हाला दिसलं की जमीनीत ट्रॅप नाहीये तर त्या ठिकाणी फक्त रिकामा खड्डा आहे.आमच्या आशा जरा उंचावतायत तेवढ्यात पेट्रोमॅक्सच्या रिकामा,उत्तारावर दहा यार्डावर आम्हाला जिन ट्रॅप दिसला.
त्याचे जबडे बंद होते व तो रिकामा होता.मृतदेहसुद्धा आता पहिल्या स्थितीत नव्हता, त्याचा बराच भाग खाल्ला गेला होता.अतिशय निराश मनाने आम्ही परत मचाणावर जाऊन बसलो.आता जागं राहण्याची काही गरजच उरली नव्हती त्यामुळे आम्ही अंगावर गवताचं पांघरूण घेऊन झोपून गेलो.पहाटे आम्ही झाडाखाली शेकोटी पेटवली,
पाणी गरम करून चहा केला व जरा शेकत बसलो. त्यानंतर पटवारी आणि माझ्या माणसांना घेऊन परत मृतदेहाजवळ गेलो.या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करतोय की त्यावेळेला आम्ही दोघं होतो व आमच्याबरोबर बरीच माणसं होती.कारण मी जर एकटा असतो तर मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सांगायला धजलो नसतो.
'सैतानी शक्ती' असो किंवा साधं जनावर...अगदी असं गृहीत धरलं की ह्या बाईच्या मारेकऱ्याने आम्ही सर्व तयारी करताना पाहिलं असेल तरी ही गोष्ट आमच्या कल्पनेपलीकडची होती की एवढ्या अंधाऱ्या रात्री,पाऊस पडत असताना तो इतक्या प्रकारचे ट्रॅप्स चुकवून भक्ष्यापर्यंत जाऊ शकला व जिवंत राहू शकला.
रात्री हलका पाऊस पडल्यामुळे जमीन ओलसर झाली होती व त्यामुळे आम्ही जमीनीवरच्या खाणाखुणांवरून रात्रीच्या एकूण हालचालींचा मागोवा घेऊ शकलो.आम्ही अपेक्षा केली होती त्याच दिशेकडून तो आला होता.पण त्या सपाट जमीनीच्या पट्ट्यापर्यंत आल्यानंतर मात्र त्याला वळसा घालून आम्ही ज्या मार्गावर काटेरी झुडपं रोवली होती तिथून भक्ष्याकडे गेला होता. पाचापैकी तीन झुडपं त्याने उपटून टाकली होती आणि जाण्याइतपत मोठी जागा करून भक्ष्यापर्यंत गेला होता.त्यानंतर भक्ष्य तोंडात धरून त्याने स्वतःकडे म्हणजे आम्ही गनट्रॅप म्हणून बांधलेल्या रायफलींकडे फूटभर ओढून घेतलं होतं.त्यामुळे फिशिंग लाईन ढिल्या पडल्या होत्या.त्यानंतर त्याने खायला सुरुवात केली होती.तिच्या कमरेला बांधलेल्या फिशिंग लाईनला तोंड लागू नये अशी काळजी घेत घेत त्याने खाल्लं होतं. डोकं आणि मानेत विष पेरलेलं नव्हतं.तेच भाग त्याने सर्वप्रथम खाल्ले.नंतर अतिशय काळजीपूर्वक त्याने विष पेरलेल्या जागांच्या मधले भाग खाल्ले होते.
पोट भरल्यानंतर त्याने पावसापासून आडोसा शोधण्यासाठी जागा सोडली व याचवेळी ज्याची मला भीती वाटत होती ते खरंच घडलं.
पावसाच्या पाण्याच्या वजनामुळे ट्रॅपची प्लेट दाबली गेली होती.बिबळ्याचा पाय त्यावर पडण्याच्याच वेळेला स्प्रिंग सुटल्या होत्या व त्याच्या गुडघ्याच्या सांध्याच्या ठिकाणी त्या ट्रॅपचे दोन्ही जबडे बंद झाले.इकडेच आमचं दुर्दैव आड आलं होतं.रुद्रप्रयागवरून तो वजनदार सापळा आणताना आमच्या माणसांकडून तो पडला होता व एक तीन इंची दात तुटला होता.त्याच्या डाव्या पायाचा तो सांधा बरोबर त्या तुटलेल्या दातामुळे पडलेल्या फटीतच अडकला होता. नाहीतर तो सापळ्यामध्ये पुरता अडकला असता कारण होती ती पकडही इतकी मजबूत होती की त्याला ताकद लावून तो चाळीस किलोचा सापळा खड्ड्यातून पायाबरोबर ओढून काढता आला व पुढे दहा यार्ड ओढूनही नेता आला. आता मात्र बिबळ्याऐवजी त्या सापळ्यामध्ये फक्त त्याच्या केसांचे झुपके व कातडीचा छोटा तुकडाच अडकला होता... हाच तुकडा - नंतर म्हणजे खूप दिवसांनी मला त्याच्या ठिकाणी चपखल बसवून बघण्याचं समाधान मिळालंय.
या त्याच्या हालचाली कितीही अविश्वसनीय वाटल्या तरी आठ वर्ष नरभक्षक असलेल्या जनावरांकडून अपेक्षित अशाच त्या होत्या…!
मोकळा भाग सोडून आडोशाच्या दिशेकडूनच भक्ष्यावर येणे,काटेरी झुडुपं उखडून टाकणे, स्वतःच्या सोयीसाठी भक्ष्य जवळ ओढून घेणे. आम्ही विष पेरलेले भाग सोडून उरलेला भाग खाणे (सायनाईडचा आता त्याला अनुभव होता व या विषाला अतिशय उग्र वास आहे) या सर्व नैसर्गिकच क्रिया आहेत.ट्रॅप बंद होण्याबद्दलचं मी जे काही स्पष्टीकरण दिलंय ते माझ्या मते बरोबर आहे.
पावसाच्या पाण्याच्या वजनाने प्लेट दाबली जाऊन जबडे बंद होत असतानाच योगायोगाने त्याच्यावर बिबळ्याने पाय ठेवला होता.ट्रॅपचे सर्व भाग सुटे केल्यावर व मृतदेहाचे अवशेष नातेवाईकांकडून दहनविधीसाठी गोळा केले गेल्यावर आम्ही रुद्रप्रयागच्या वाटेला लागलो.रात्री केव्हातरी तो बिबळ्या आंब्याच्या झाडाजवळ येऊन गेला होता. कारण तिथे आम्हाला त्याचे पगमार्क् स दिसले... या पगमार्कर्सचा माग सरळ यात्रामार्गावर व तिथून बंगल्याच्या फाटकापर्यंत गेला होता.
फाटकाच्या पिलर्सखाली त्याने जमीन खरवडली होती.पुढे तो तसाच गुलाबराईच्या दिशेने आणखी एक मैल गेला होता.इथेच आपला तो जुना मित्र ओझीवाला म्हातारा मुक्काम ठोकून होता व त्याच्या एक बोकड त्याने निष्कारण मारला होता.
तुमच्यापैकी ज्यांनी शिकारीसाठी रायफल खांद्याला लावून जंगलवाटा तुडवल्या असतील त्यांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की इतक्या सातत्याने येणाऱ्या अपयशांनी खचून न जाता माझा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला की एक ना एक दिवस (किंवा रात्र) असा येईल की जेव्हा विष,ट्रॅप्स वगैरे गोष्टींचा अजिबात वापर करावा न लागता मला माझ्या रायफलचा खराखुरा उपयोग करायची संधी मिळेल.
दिनांक - ०५.०७.२४ या लेखातील दुसरा व शेवटचा भाग…