* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/९/२४

पाठलाग रानडुकराचा Chasing the wild boar

आपला तो जुना म्हातारा मित्र-ओझीवाला फिरस्ता त्या पूर्वीच्याच काटेरी कुंपण असलेल्या शेतात आदल्या रात्रीच मुक्कामाला आला होता. यावेळी त्याने हरिद्वारवरून मीठ व गुळाची पोती आणली होती.एखाददुसरा दिवस इथे मुक्काम करून तो बद्रीनाथ पलीकडच्या गावांमध्ये जाणार होता.त्याच्या शेळ्यामेढ्यांच्या पाठीवर जरा जास्तच वजन असल्याने आणि शेवटची मजल जरा मोठी मारल्याने त्याला काल इथे पोचायला जरा उशीरच झाला होता.साहजिकच काल त्याला त्या कुंपणातल्या कच्च्या जागांची दुरुस्ती करायला वेळ मिळाला नव्हता.त्याचा परिणाम असा झाला त्याचे काही बोकड कुंपणाच्या बाहेर भरकटले होते व त्यातला एक पहाटे पहाटेच रस्त्याच्या कडेला बिबळ्याने मारला होता.कुत्र्यांच्या भुंकण्याने त्याला जाग आली आणि जरा उजेड पडल्यावर त्याला दिसलं की त्याचा सर्वात चांगला,एखाद्या शेटलँड पोनीच्या आकाराचा, पोलादी रंगाचा बोकड काहीही कारण नसताना बिबळ्याने मारला होता.हा बोकड रस्त्याच्या कडेलाच मरून पडला होता.


काही वर्ष नरभक्षक राहिल्यानंतर एखाद्या बिबळ्याच्या सवयी किती बदलू शकतात हे या बिबळ्याच्या आदल्या रात्रीच्या वागणुकीवरून समजत होतं.


अचानक जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे,तो ट्रॅप पायाला लटकत काही अंतर ओढून नेल्यामुळे त्याला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना करा;ज्या पद्धतीने रागारागाने त्याने डरकाळ्या मारल्या होत्या त्यावरूनच ते सिद्ध होत होतं.साहजिकच एखाद्याला वाटेल की ट्रॅपमधून सुटल्यावर तो मनुष्यवस्तीपासून शक्य तेवढा दूर जाईल आणि परत खूप भूक लागेपर्यंत लांब कुठेतरी विश्रांती घेईल.पण असं काही करण्याऐवजी तो भक्ष्याच्या जवळपास राहिला आणि आम्हाला मचाणावर चढताना पाहिल्यावर शोध घेण्यासाठी झाडापर्यंतही आला.सुदैवाने झाडाभोवती काटेरी तारा गुंडाळण्याचं भान इबॉटसनला होतं.आपली शिकार करायला आलेल्या शिकाऱ्यांचाच नरभक्षकाने बळी घेतल्याची उदाहरणं काही कमी नाहीत.सध्याही मध्यप्रांतात एक असा नरभक्षक वावरतोय की ज्याने त्याला मारायला आलेल्या चार भारतीय शिकाऱ्यांचा बळी घेतलाय.माझ्या माहिती

प्रमाणे त्याने आजपर्यंत चाळीस माणसं मारली आहेत.स्वतःच्याच मारेकऱ्यांना खाण्याच्या सवयीमुळे तो कधी माणसं,कधी पाळीव जनावरं तर कधी जंगली जनावरं असं 'व्हरायटी डाएट' करत अगदी मजेत दिवस घालवतोय.


असो... आंब्याच्या झाडाला भेट दिल्यानंतर तो गावाकडून येणाऱ्या वाटेवरून मुख्य पायवाटेवर आला व तिथून उजवीकडे वळून एक मैलानंतर यात्रामार्गावर आला.

त्यानंतर भर बाजारातून चालत अर्ध्या मैलावरच्या बंगल्याच्या फाटकाजवळ येऊन तिथल्या पिलर्सखालची जमीन खरवडली.आदल्या रात्रीच्या पावसामुळे जमीन ओली व मऊ झाली होती... त्यावरच्या पगमार्कवरून स्पष्ट दिसत होतं की ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे त्याला कोणतीही मोठी जखम झाली नव्हती.ब्रेकफास्टनंतर मी त्याचे माग फाटकाजवळच उचलले आणि त्याच्या

बरोबरच सरळ त्या म्हाताऱ्या ओझीवाल्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचले.या ठिकाणी रस्त्याला वळण होतं.या वळणावरूनच कुंपणापासून १०-१५ यार्डावरून त्याला भरकटलेल्या शेळ्यामेंढ्या दिसल्या होत्या. रस्त्याच्या बाहेरच्या कडेकडून आतल्या कडेला ओलांडून येऊन आणि डोंगराच्या आड आडोशाने दबकत येऊन त्यातला एक बोकड त्याने मारला होता पण त्याचं साधं रक्तही पिण्याची तसदी न घेता तो परत रस्त्याकडे परतला होता.


मालाची रचून ठेवलेली पोती व मेलेला बोकड यावर त्या ओझीवाल्याचे दोन धनगरी कुत्रे पहारा देत होते.त्यांना छोट्या साखळ्यांनी लाकडी मेखांना पक्कं बांधलं होतं.हे काळे,मोठे व ताकदवान कुत्रे जे काम या ओझीवाल्यांसाठी करतात तशा कामांसाठी युरोपातल्या धनगरी कुत्र्यांना वापरलं जात नाही. मजल मारताना हे कुत्रे कळपाबरोबर चालत राहतात आणि त्यांचं खरं काम हे मुक्काम ठोकल्यानंतर सुरू होतं. रात्री ते जंगली जनावरांपासून कळपाचं रक्षण करतात तर दिवसा मालक शेळ्यामेंढ्या चारायला बाहेर गेला की ते चोरांपासून मालाचं रक्षण करतात.

रात्रीच्या राखणीच्या वेळी एका बिबळ्याला अशा कुत्र्यांनी मारल्याचं मला माहीत आहे व मुक्कामावर चोरी करायचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसालाही त्यांनी ठार मारल्याची नोंद आहे.


बोकडाला मारून तो बिबळ्या परत रस्त्यावर ज्या ठिकाणी आला तिथून मी त्या बिबळ्याचे माग उचलले व त्याच्या मागोमाग गुलाबराईतून जाऊन पुढे एका घळीपर्यंत गेलो.या घळीतून मात्र तो निघून गेला होता.आंब्याच्या झाडापासून घळीपर्यंत जवळजवळ आठ मैलांचं अंतर त्याने तोडलं होतं.दुसरा कोणताही सर्वसाधारण बिबळ्या वरकरणी काही कारण नसताना इतकं लांब अंतर चालत गेला नसता.

त्याचप्रमाणे भूक लागलेली नसताना सर्वसाधारण बिबळ्याने उगीचच त्या बोकडाला मारलं नसतं.

घळीपलीकडे पाव मैल अंतरावर रस्त्याच्या कडेच्या एका मोठ्या दगडावर तो म्हातारा आसपास चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांवर नजर ठेवत बसला होता.लोकर विणण्याची टकळी व लोकरीचा गुंडा आपल्या भल्या मोठ्या खिशात टाकून मी दिलेली सिगरेट घेताना त्याने मला विचारलं की मी त्याच्या कॅम्पवरूनच इथे आलोय का? मी त्याच्या कॅम्पवरूनच आलोय व त्या सैतानाने काय करून ठेवलंय हेही बघितलंय असं मी त्याला सांगितलं आणि पुढे म्हणालो की त्याचे कुत्रे आता पहिल्यासारखे शूर राहिले नसल्याने पुढच्या हरिद्वारच्या भेटीत त्या कुत्र्यांना उंटवाल्यांना विकायला हरकत नाही.माझं म्हणणं पटलं असल्यासारखी त्याने मान हलवली व म्हणाला,'साहेब,आमच्यासारखी पिकल्या केसाची माणसंही कधीकधी चुका करून बसतात व त्यांना परिणामही भोगावे लागतात. मलाही आज तसे भोगावे लागतायत, मी माझा सर्वात चांगला बोकड गमावलाय.पण माझे कुत्रे वाघासारखे शूर आहेत आणि आख्ख्या गढवालमधल्या कुत्र्यांना ते भारी आहेत


ते उंटवाल्यांना विकण्याच्या लायकीचे आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे.तुम्ही पाह्यलंच असेल की माझं मुक्कामाचं ठिकाण रस्त्याच्या अगदी जवळ आहे.

जर चुकून कोणी रात्री जवळून गेला तर कुत्र्यांकडून त्याला धोका होईल अशी भीती वाटल्यामुळे मी त्यांना साखळीने बांधलं होतं व हीच माझी चूक झाली. त्याचा परिणाम तुम्ही पाह्यलाच आहे पण साहेब माझ्या कुत्र्यांना दोष देऊ नका कारण बोकडांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मानेत साखळी रूतून जखमा झाल्यात त्या भरायलाही काही दिवस लागणार आहेत.'


आम्ही बोलत असतानाच गंगेच्या पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर एक जनावर अवतीर्ण झालं. त्याच्या रंगावरून व आकारावरून मला प्रथम ते हिमालयातलं काळ अस्वल वाटलं पण जेव्हा ते डोंगर उतरून नदीकडे यायला लागलं तेव्हा मला दिसलं की ते एक मोठ्ठ रानडुक्कर होतं.त्याच्या पाठलागावर काही गावठी कुत्रे होते आणि त्यांच्या मागे हातात काठ्या घेतलेली पोरं व माणसं पळत होती.सर्वात शेवटच्या माणसाकडे बंदूक होती.जेव्हा हा बंदूकवाला डोंगराच्या माथ्यावर पोचला तेव्हा त्याने बंदूक उंचावली आणि आम्हाला लगेचच धूर दिसला व पाठोपाठ ठासणीच्या बंदूकीचा बार ऐकू आला.त्या बंदूकीच्या रेंजमध्ये फक्त ती पोरं आणि माणसंच येत होती आणि त्यांच्यातला कोणीच धारातीर्थी पडला नसल्याने बघणाऱ्याला असं 'वाटत होतं की त्या माणसाचा नेम जणू काही चुकला आहे.डुकराच्या समोर एक उभा गवताळ उतार होता आणि त्याच्यावर इथेतिथे छोटी झुडुपं विखुरली होती. ह्या उताराखाली थोडी ओबडधोबड जमीन होती आणि त्याखाली खुरट्या झुडुपांचा एक पट्टा होता.हा पट्टा थेट नदीला भिडला होता.


त्या ओबडधोबड भागात डुकराचा वेग जरा कमी पडला.

त्यामुळे डुक्कर व कुत्रे एकत्रच खुरट्या झुडुपांच्या पट्ट्यात घुसले.दुसऱ्याच क्षणाला सर्वात पुढे असलेल्या फिक्कट रंगाच्या कुत्र्याचा अपवाद सोडला तर इतर सर्व कुत्रे झुडुपांच्या बाहेर मागे पळत आले.मागून येणारी माणसं त्या कुत्र्यांनी,डुकरामागे परत जावं म्हणून प्रयत्न करायला लागली.पण रानडुक्कर त्याच्या सुळ्यांनी काय प्रताप करू शकतं हे पाहिल्यामुळे कुत्रे काही पुढे जाईनात.तो बंदूकधारी पण आता त्यांच्यात आला व त्याला लगेच सर्वांनी गराडा घातला.ते दृश्य व आम्ही यांच्यामधून नदी वाहत होती पण नदीच्या वेगवान प्रवाहाच्या आवाजामुळे इतर कुठलेही आवाज ऐकू येत नव्हते.त्यामुळे त्या 'ग्रँडस्टँड'वर बसून हे दृश्य बघताना आपण एखादा मूकपट बघतोय असं वाटत होतं. एक बंदुकीचा बार सोडला तर आम्हाला कोणताच आवाज आला नव्हता.कुत्र्यांप्रमाणेच त्या बंदूक्याची सुद्धा झुडुपात शिरायची इच्छा दिसत नव्हती कारण आता तो त्यांच्या घोळक्यातून दूर झाला आणि बाजूलाच एका खडकावर बसला. "मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा." असं काहीसं तो म्हणत असावा.अगदी काठ्यांनी मारूनसुद्धा रानडुकराला सामोरं जाण्याची कुत्र्यांची हिंमत होत नव्हती.आता अशा दोलायमान अवस्थेत प्रथम पोरं व नंतर बाप्यांनी झुडुपांमध्ये दगड फेकून मारायला सुरुवात केली.हे सर्व होत असताना आम्हाला ते डुक्कर झुडुपांच्या पट्ट्यातून बाहेर पडून नदीकाठच्या वाळूवर येताना दिसलं.दोनचार पावलं भराभर टाकून ते उघड्यावर आलं,काही क्षण स्तब्ध उभं राहिलं,परत काही पावलं टाकून उभं राहिलं व शेवटी एका धावेत पळत येऊन त्याने धाडकन नदीत उडी मारली.या ठिकाणी प्रवाहाला चांगलीच ओढ होती.पण रानडुक्करं तशी निधड्या छातीची असतात आणि आम्ही शेवटचं पाहिलं तेव्हा ते डुक्कर प्रवाहाबरोबर पाव मैल पुढे वाहत गेलं होतं पण तरीही दम काढून पोहतच होतं.माझी खात्री आहे की त्याने किनारा गाठलाच असणार.ओझीवाल्याने मला विचारलं, "ते रानडुक्कर तुमच्या रायफलच्या रेंजमध्ये होतं का साहेब?" मी उत्तर दिलं "हो... पण जीव वाचवण्या

साठी पळत असलेल्या रानडुकरांना मारायला मी गढवालमध्ये ही रायफल आणलेली नाही,तर तुम्ही ज्याला 'सैतानी शक्ती' म्हणता, पण जो बिबळ्या आहे हे मला माहीत आहे त्याला मारायला आणली आहे.


"ठीक आहे साहेब... तुम्ही तुमच्या मार्गाने जावा. आता तुम्ही निघाल्यावर कदाचित आपली भेट कधीच होणार नाही.तेव्हा काळच दाखवेल की तुमचं म्हणणं खरं ठरतं की माझं !"


या त्याच्या उत्तरानंतर आमची भेट दुर्दैवाने पुन्हा कधी झाली नाही हे खरं.पण तो एक मस्त,रंगेल म्हातारा होता,मानी आणि आनंदी ! कदाचित अशा दिवसाची वाट बघणारा,की जेव्हा बिबळे त्याच्या सर्वोत्कृष्ट बोकडाला मारणार नाहीत आणि त्याच्या कुत्र्यांच्या शूरपणावर कोणीही शंका घेणार नाही !


२७.०८.२४ या लेखमालेतील पुढील लेख..

१३/९/२४

वैवाहिक दोष रेषा-Marital fault lines

पती : ड्राय क्लिनिंगला दिलेले माझे कपडे आणलेस?


पत्नी : (वेडावून दाखवत) म्हणे ड्रायक्लिनिंगला दिलेले माझे कपडे आणलेस."तूच जा आणि तुझी कामं कर.मला काय तुझी मोलकरीण समजतोस?"


पती : नाहीच नाही;कारण तू मोलकरीण असतीस तर तुलाच माझे कपडे धुता आले असते.


जर हा दूरदर्शनवरील एखाद्या मालिकेतील संवाद असता तर गंमत वाटली असती;परंतु दुर्दैवाने ही दाहक वादावादी एका जोडप्यातील आहे ज्यांनी पुढील काही वर्षांत घटस्फोट घेतला आणि त्यात आश्चर्य काहीच नाही.


वॉशिंग्टन विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमनचा यांच्या एका प्रयोगशाळेत वरील संभाषण घडले आहे.

जॉन गॉटमन यांनी पती-पत्नीला एकत्र बांधून ठेवणारे भावबंध कोणते आणि लग्नविच्छेद घडवून आणणाऱ्या या नात्याला गंज चढवणाऱ्या भावना कोणत्या 

याविषयी त्यांच्या प्रयोगशाळेत अभ्यास केला.


अनेक जोडप्यांच्या संभाषणाची हिडिओ टेप तयार करून या प्रयोगशाळेत तिच्यावर  सखोल विश्लेषण करून त्या संभाषणातील भावनांचा अंदाज घेतला जातो.हा अभ्यास हेच सांगतो कि,विवाहबंधन टिकवून ठेवण्यात भावनिक बुद्धिमत्तेची अत्यंत महत्वाची भूमिका असते.


गेल्या वीस वर्षात गॉटमनने दोनशेपेक्षा जास्त जोडप्यांच्या जीवनातील चढ-उतारांचा अभ्यास केला.त्यापैकी काही जोडपी नवविवाहित होती, तर काहींच्या लग्नाला दशक उलटून गेली होती. वैवाहिक जीवनातील या परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास इतक्या अचूकपणे केला आहे की, त्यांच्या प्रयोगशाळेत अभ्यास केल्या जाणाऱ्या एका जोडप्याच्या सुरुवातीला कपडे धुण्याच्या बाबतीत दिल्या गेलेल्या पती-पत्नीच्या संभाषणासारखे संवाद साधणाऱ्या बाबतीत अंदाज वर्तवला होता की,हे जोडपे पुढील तीन वर्षात घटस्फोट घेईल अशी ९४ टक्के शक्यता आहे। वैवाहिक जीवनाच्या अभ्यासात इतकी अचूकता अजून तरी ऐकण्यात आलेली नाही!


खोलवर जाऊन कसून अभ्यास करण्याच्या पद्धती वापरून त्यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या विश्लेषणाच्या बळावर त्यांच्या पूर्वकथनाला ही अचूकता येऊ शकली.

विवाहित जोडप्यांच्या संभाषणाची व्हिडिओ टेप तयार होत असताना त्यांच्यात होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म,

शारीरिक बदलाची नोंद विद्युत सेन्सॉर घेत असतात.

पॉल एकमनने विकसित केलेल्या भावना ओळखण्याच्या पद्धतीचा वापर करून त्यांच्या चेहऱ्यावर दर सेकंदाला व्यक्त होणाऱ्या भाव-भावनांचे विश्लेषण करून ते अनुभव असलेल्या अतिसूक्ष्म आणि क्षणोक्षणी बदलणारा भावनांचा शोध घेतला जातो. 


पती-पत्नीत झालेल्या प्रत्येक संभाषणानंतर ती दोघ एकट्याने प्रयोगशाळेत येऊन त्यांच्या संभाषणाची व्हिडिओ टेप पाहतात आणि वादावादीचा प्रसंगी त्यांच्या डोक्यात कोणते विचार चालले होते याचे रहस्य उघड करतात. परिणामी शरीराच्या अवयवांच्या क्ष-किरण चित्राप्रमाणे वैवाहिक जीवनाचे क्ष-किरण चित्र (X Ray) तयार होते.


गॉटमनला दिसून आले की,लग्नजीवनाला धोका निर्माण झाल्याचे सुचवणारा प्राथमिक संकेत म्हणजे एकमेकांची केलेली कठोर टीका.निरोगी लग्नजीवनात पती-पत्नी परस्परांबद्दलच्या तक्रारी मोकळ्या मनाने मांडतात;परंतु रागाच्या भरात या तक्रारी विघातक स्वरूप घेऊ लागतात


जसे जोडीदाराच्या चारित्र्यावर वार करणे.उदा.पामेला आपल्या मुलीला घेऊन चपलांच्या दुकानात गेली तर तिचा नवरा टॉम पुस्तकांच्या दुकानात शिरला.एका तासानंतर दोघांनी आपापली खरेदी आटपून पोस्ट ऑफिससमोर भेटायचे आणि तिथून सिनेमा पहायला जायचे असे त्यांचे ठरले होते.पामेला वेळेवर पोहोचली; परंतु टॉमचा पत्ता नव्हता.पामेलाने आपल्या मुलीजवळ तक्रार केली,"हा मेलाय कुठे? दहा मिनिटात सिनेमा सुरू होईल.तुझ्या वडिलांना काहीतरी निमित्तच हवे असते." दहा मिनिटांनी टॉम परतला.एक मित्र भेटला म्हणून तो आनंदात होता. उशीर झाल्याबद्दल त्याने पामेलाची माफीही मागितली; परंतु पामेला भडकून वाकड्यात शिरत म्हणाली," ठीक आहे,तुझ्यात तेवढी ताकद आहे की,आपण काहीही ठरवले तरी तसे होऊ द्यायचे नाही.तू दुसऱ्यांचा विचारच करीत नाहीस.पक्का स्वार्थी आहेस!"


पामेलाची तक्रार त्याहून जास्त आहे.तिची टीका त्याच्या वागण्याबद्दल नाही तर ती सरळ त्याच्या चारित्र्यावर वार करीत एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर टीका करते.खरेतर टॉमने माफी मागितली होती;पण त्याच्याकडून झालेल्या या क्षुल्लक चुकीबद्दल पामेलाने त्याच्यावर अविचारी आणि स्वार्थीपणाचा शिक्का मारला. अनेक जोडप्यांच्या बाबतीत असे घडते की, जोडीदाराने जे 'केले' आहे,

त्याबद्दल तक्रार करताना त्याच्या वागण्यावर नव्हे तर त्या व्यक्तीवरच ठपका ठेवला जातो.त्याच्या वागण्याबद्दल केल्या गेलेल्या तर्कनिष्ठ तक्रारीपेक्षा अशी दाहक व्यक्तिगत टीका तीव्र भावनिक परिणाम करणारी,

दुखावणारी असते. त्यामुळे साहजिकच आपली तक्रार आपला जोडीदार ऐकत नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे आपल्या जोडीदारावर प्रत्यक्ष वार करणाऱ्याला वाटू शकते.


तक्रार आणि वैयक्तिक टीका यातील फरक ओळखणे सोपे आहे.पत्नी जेव्हा तक्रार करते तेव्हा ती नेमकं सांगते की,नवऱ्याच्या या गोष्टींमुळे तिला त्रास होत आहे.ती नवऱ्याची नाही तर त्याच्या वागण्याची टीका करते आणि तिला काय वाटले ते कळवते :"धोब्याकडून माझे कपडे आणायला तू विसरलास तेव्हा मला असे वाटले की,तुला माझी पर्वाच नाही."भावनांची ही अभिव्यक्ती मूलभूत भावनिक बुद्धिमत्तेला साजेशी आहे;परंतु पतीवर वैयक्तिक टीका करताना तिच्या कुरबुरीत पतीवर मोघम टीका करतेःतू नेहमीच असा स्वार्थी आणि बेपर्वा आहेस.तू काही बरोबर करशील असा भरोसाच मी बाळगू नये याचाच हा पुरावा आहे." अशा टीकेमुळे त्या व्यक्तीला लाजिरवाणे वाटते, आपल्या जोडीदाराला आपण आवडत नाही, आपल्याला दोषी ठरवले जाते,आपल्यात कमतरता आहे अशी भावना तिच्यात निर्माण होतात.या सगळ्यांच्या परिणामी ती व्यक्ती यापुढे स्वतंत्र सुधारणा घडवून आणील अशी शक्यता तर अजिबात नसतेच उत्तर आता ती स्वतःला वाचवण्याचा,स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू लागते.जेव्हा अशी वैयक्तिक टीका तिरस्काराच्या विध्वंसक भावनेसह केली जाते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.तिरस्काराबरोबर राग आपोआपच येतो.हा राग केवल शब्दांतूनच व्यक्त होतो असे नाही तर आवाजालाही धार चढते आणि रागीट अभिव्यक्त केली जाते.मग रागाच्या भरात एकमेकांची कुचेष्टा केली जाते,

अपशब्द वापरून टिंगल केली जाते.शिवाय ज्या देहबोलीसह हे शब्द उच्चारले जातात तीदेखील तितकीच दुखवणारी असते. विशेषतःतुच्छतादर्शक आविर्भावात नाक मुरडणे, किती वीट आला आहे किंवा घृणा वाटत आहे हे दाखवून देणारे मुडपलेले ओठ किंवा "अरे देवा!" असा भाव व्यक्त करीत डोळे फिरवणे असे हावभाव शब्दांपेक्षा जहाल परिणाम करतात.


डोळे आभाळाकडे वळवत ओठांची महिरप सहसा डाव्या बाजूला मुडपली जाते,तेव्हा त्यातून तिरस्कार,तुच्छता सहज झळकते.जेव्हा एका जोडीदाराच्या चेहऱ्यावर हे हावभाव येतात तेव्हा दुसऱ्या जोडीदाराला त्याचा गर्भितार्थ लक्षात येऊन त्याच्या हृदयाचे दोन किंवा तीन ठोके दर मिनिटाला वाढतात.या छुप्या संवादाची किंमत शरीराला मोजावी वा लागते.गॉटमनला आढळून आले आहे की,जर नवरा नियमितपणे असा तिरस्कार व्यक्त करीत असेल तर पत्नीला स्वास्थ्याशी निगडित नाना समस्या सतावतात.यामध्ये वारंवार ती सर्दी- खोकला होण्यापासून पोटाचे पचनासंबंधी,

आतड्याच्या संसर्गासंबंधी,यकृतासंबंधी अनेक आजारांचा समावेश होतो.जेव्हा पत्नी तिरस्काराशी मिळता जुळता,वीट आल्याचा,घृणेचा हावभाव पंधरा मिनिटांच्या संभाषणात चारदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला व्यक्त करते तेव्हा त्याला या गोष्टीचे मूक चिन्हे समजावे की, येत्या चार वर्षांत हे जोडपे विभक्त होण्याची शक्यता आहे.अर्थातच घृणा किंवा तिरस्कार कधीतरी व्यक्त होत असेल तर त्यामुळे लग्नजीवनाला हानी पोहोचणार नाही.अर्थात असे भावनिक गोळीबार व चकमकी धूम्रपान आणि रक्तातील वाढलेल्या चरबीच्या पातळीसारखे असतात.जसे दीर्घकाळ हे दोन्ही घटक तीव्रपणे अस्तित्वात असले तर जसा हृदयरोगाचा धोका संभवतो;तसेच घृणा व तिरस्कार तीव्र स्वरूपात असतील आणि वारंवार व्यक्त होत असतील तर मात्र ते सहजीवनाला मारक ठरू शकते.


घटस्फोटाच्या वाटेवरील जोडप्यांसाठी यापैकी एखादा घटक वाढत्या दुःखाचा अंदाज वर्तवू शकतो.टीका करण्याची, घृणा आणि तिरस्कार व्यक्त करण्याची सवय धोक्याचे चिन्ह ठरते.या गोष्टी असे सुचवतात की,एका जोडीदाराने दुसऱ्याच्या बाबतीत मूकपणे वाइटात वाईट निर्णय घेऊन टाकला आहे.पती किंवा पत्नीला वाटते की,आपल्या जोडीदाराला सतत शिक्षा करायला हवी.

अशा नकारात्मक आणि शत्रुत्वाच्या विचारसरणीमुळे स्वाभाविक आहे की,त्या व्यक्तीचा जोडीदार शाब्दिक हल्ला चढवतो किंवा त्याच्या ( इमोशनल इंटेलिजन्स,

डॅनिअल गोलमन,अनुवाद-प्रा.पुष्पा ठक्कर,साकेत प्रकाशन.)जोडीदाराने केलेल्या वाराचा प्रतिवाराने बदला घ्यायला सज्ज होतो.अशा वादावादीत समोरची व्यक्ती एक तर लढाईचा पवित्रा घेते किंवा मुकाट्याने माघार घेते.

आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर या दोनपैकी एका मार्गाने देते. 


'अरे' ला 'कारे' म्हणणे हा मार्ग उघडच असतो. रागाने व्यक्ती जिभेचे फटकारे मारते.हा मार्ग जोडप्याने स्वीकारला म्हणजे त्याचा शेवट निरर्थक आरडा-ओरडा करण्यात होतो.दुसरा पर्याय,तिथून दूर जाणे,पळ काढणे;परंतु जेव्हा व्यक्ती माघार घेत स्वतःभोवती अबोल्याची अभेद्य भिंत उभी करते तेव्हा मात्र भांडण्यापेक्षा सौम्य वाटणारा हा पर्याय अपायकारकच ठरतो.अबोल्याच्या द‌गडी किल्ल्यात स्वतःला कोंडून घेणे हा अंतिम बचाव असतो.अशी व्यक्ती संभाषणातून अंग काढून घेत भावनाशून्य बनून जाते.प्रतिक्रियेच्या रूपात देते केवळ थंड, थिजलेले मौन.ही परिस्थिती समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करून टाकणारा जबरदस्त संदेश देते. तिची निर्विकार वृत्ती म्हणजे उष्माहीन अंतर, श्रेष्ठता आणि नावड यांचे मिश्रण असते.ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत अशा जोडप्यांच्या बाबतीत मौनाची ही दगडी भिंत रचलेली दिसून येते.जेव्हा पत्नी पतीशी तिरस्काराने वागून त्याची टीका करते तेव्हा ८५ टक्के प्रकरणात पती स्वतःभोवती अशी मौन थंडपणाची अभेद्य भिंत रचताना दिसतो.


 बाप्पा मोरया


बाबा गणपती घेऊन आला,आई त्याच्या पायावर दूधपाणी घालायला एक पाऊल बाहेर आली आणि वाऱ्याने आपलं काम केलं…!.


धडामकन दार लागलं…!


गणपती सकट आई बाबा घराबाहेर...आणि घरात सहा महिन्याची मनूडी एकटी!


नुकती आंघोळ ऊरकून दुपट्यावर शांत निजलेली दाराच्या आवाजाने ती दचकली, आणि तिने टाहो फोडला.विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं…!


तशी मनुडी खरंच शहाणी होती.पण,कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची.नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती.


चौदाव्या मजल्यावर घर होतं.


ब्रह्मांडाचा नायक हातात असताना,दोघांना त्याचा विसर पडला.दोघं फक्त मनुडीचा टाहो ऐकत होते.आई तर रडायलाच लागली.बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते. रावणासारखी त्याची अवस्था झाली.शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती,मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते,असं त्याने ऐकलं होतं.विषाची परीक्षा कोण घेणार? तुची माता, तुची पिता, तुची बंधू , तुची सखा...म्हणताना त्याच्याच बद्दल इतकी भिती...


भिती कसली? तर तो कोपेल याची.क्षणात सगळं आठवलं.घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न,सगळ्यांशी तोडलेले संबंध…!


दोघं दोघंच जगताना कधी शेजारीही डोकाऊन पाहीलं नव्हतं.त्यात शेजारच्या फ्लँटमधे अठरा पगडचे पेअींग गेस्ट राहतात म्हटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता.

पण,आईचं रडणं ऐकल्यावर आपसूक शेजारचं दार ऊघडलं गेलं.सहा सात मुलांचा घोळका बाहेर आला.


व्हाँट हँपंडचा गलका झाला.एकाने पटकन बाबाच्या हातातली मुर्ती जबाबदारीने आपल्या हातात घेतली.

बावचळून गेलेल्या बाबाच्या ते लक्षातही आलं नाही.थकल्यासारखा तो मटकन खालीच बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नकळत अनावर होत त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला.आवाजावरून भावाने त्याची अवस्था ओळखली.तो फोनवर बोलत असताना शेजारच्या मुलांना कळलं.त्यानी आधी दोघांना घरात बोलावलं.बघतात तर त्यांच्या घरीही गणपति विराजमान होता.सगळे दोघांना त्यांच्या परीने धीर देत होते.


एका चुणचणीत मुलाने विचारलं,"आपके बेडरूम की विंडो खुली है क्या?


चौदावा मजला....!


"विंडो ओपन असून काय ऊपयोग?" ती म्हणाली.


"दरवाजा तोड देते है"


 पण ते ही लगेच होणारं काम नव्हतं.


आईशी बोलत बसायच्या आधीच दोघांनी त्यांच्या गॅलरीतून ढांग टाकली होती…!


चौदाव्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पॅरेफीटवरून मनुडीच्या बेडरूमपाशी पोहोचली.

एकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली.बघतात तर मनुडी कोणीतरी खेळवत असल्या सारखी खेळत होती खिदळत होती....! मनूडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आई बाबाला वाटत होतं,मनुडीने डोळे फिरवले असतील... मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात तसा अनुभव ते घेत होते.मनुडी बाकी कशाला नाही...पण एकटं रहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात आलं होतं...


भोवती माणसांचा वावर असेल तर तासंतास मुठी चोखत ती एकटी खेळत असायची.पण, जरा जरी एकटेपणाची जाणीव झाली,तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची.म्हणून तर आई घरी राहूनच कामाचा व्याप सांभाळत होती.बाबापण मनूडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता शिवाय एक मावशी बाईही मनुडीसाठी ठेवली होती.


सकाळी येउून ती रात्री जात असे.पण,नेमकी तिनेसुद्धा दोन दिवस गणपतीची सुट्टी मागितली होती.या दोन्ही मुलांनी आधी घरात प्रवेश मिळवून मनुडीला उचलली आणि धाडकन बंद झालेलं दार ततपरतेनं उघडलं...

त्यांच्याकडेवर खुदू खुदू हसणाऱ्या मनुडीला बघून आई बाबाला काय वाटलं हे शब्दात सांगत बसायचा अट्टाहास मी करणार नाही…!


पण,मनूडी एकटी असतानाही खेळत होती,यावर दोघांचा विश्वास बसेना.त्यांना काय माहीत ती एकटी होती? की कोणी गब्दूल पाहूणा मनुडीशी लडीवाळपणे खेळत होता? तो दिसायला भाग्य हवं किंवा ते कळायला तेवढीच श्रद्धा…!


इतक्यात याच्या फोनमुळे मोठा भाऊ मोठेपणाने नात्याचा मान राखत आई बाबांसह घरी पोहोचला…! दूरावा असा कुठे राहीलाच नाही. मनुडीला बघून आजी आबांना गहीवरून आलं. तो मन मिलाप बघून शेजारच्या सडाफटींग मुलानाही उचंबळून आलं.मग मोठ्याने पूजा सांगितली धाकट्याने मनोभावे पूजा केली. दणक्यात आरती झाली.मोदकांची दिलेली आँर्डर ऐनवेळी वाढवण्यात आली आणि मग त्या गजाननासमोर भलीमोठी पंगत जेवायला बसली...प्रत्येकजण आपआपल्या भाषाबोली सहीत त्यात सहभागी झाला होता.मनुडीच्या आनंदाला तर ऊत आला होता.


लहान मूलं म्हणजे देवाचंच रूप म्हणतात.हे खर मानलं,

तर मनुडीच्याच रूपाने तो विघ्नहर्ता खुदू खुदू हसत होता.सार्वजनीक गणपतीची मूळ संकल्पना आणि मुख्य उद्देश हाच असेल नाही?


गणपती बाप्पा मोरया





११/९/२४

वाघीण कथा / Tiger story 

चांदोली धरणाच्या उशाला नामू धनगराचं गाव. अभयारण्याच्या सावलीत वसलेलं.चारी बाजूंनी डोंगर आणि मधे गाव.उंच डोंगरांच्या आडोशामुळं सकाळी आठ वाजता दिवस उजडायचा आणि चार वाजलं की मावळायचा.द्रोणात ठेवलेल्या नैवेद्याच्या चार शितांसारखा शंभर उंबरा.गावाची जेमतेम पाच- सहाशे लोकसंख्या. डोंगरावरनं खळाळत येणाऱ्या झऱ्याचं स्वच्छ पाणी.कसदार जमिनीत पिकणारं चवदार धान्य. कुठल्याही औषधाची फवारणी न करता झाडावर पाडानं पिकलेली फळं.प्रत्येकाच्या घरात एक-दोन दुभती जनावरं असल्यामुळं खाण्या-पिण्याची कमतरता नाही.शहरापासून दूर असलेल्या या गावात चैनीच्या महागड्या सुखवस्तू नाहीत.त्यामुळं पैशाची जास्त गरज भासायची नाही.पावसाच्या पाण्यावर पिकणारी हंगामी शेती आणि शहरापासून दूर असल्यामुळं गावात आर्थिक व्यवहार कमीच.पैशाचा स्रोत कमी त्यामुळं गावातल्या सगळ्यांचंच खिसं फाटकं.

एकमेकांच्या हाकेला उभा राहिल्या शिवाय गावकऱ्यांना मदत करणारं कोणी नाही. गावातील काहीजण मुंबईला दादर मार्केटमध्ये हमाली करायला गेलेले.त्यांचं म्हातारं आई-वडील पोरांच्या वाटंला डोळं लावून बसत. नामू मात्र गावातच शेतीवाडीत रमलेला.दोन दुभत्या म्हशी आणि विसेक शेरडं संभाळत होता. महिना-दोन महिन्यांतून एखादं पालवं शेजारच्या गावात आठवडी बाजारात विकायचा. त्यात घरात लागणारी चटणी,मीठ,धडूतं,कापडं आणायचा.आई,वडील,बायको,मुलगी आणि मुलगा अशा छोट्या अन् सुखी संसाराचा गाडा नामू चालवायचा.


सुखाच्या पालखीला दुःखाचं भोई खांदा द्यावंत, तसं गावाला काही अडचणीपण होत्याच. 


शहरापासून दूर असल्यामुळं गावात शाळा नाही, वीज नाही.अंधारात चाचपटत जगायचं,गावात यायला डोंगरमाथ्यावरून फिरून येणारी बैलगाडीची वाट.रात्री-अपरात्री कोणी आजारी पडल्यावर एकतर बैलगाडीतून आणायला लागायचं,नाही तर बांबूच्या दोन काठ्यांना घोंगडी गुंडाळून चौघांनी पालखी करून पायवाटेनं पळवत घेऊन जायचं.कोणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही म्हणून गावकरी एकमेकांच्या हाकेला उभा रहात होतं.पैरा करून जमीन कसायचं.पाहुणेराला बोलवून जेवणाच्या बदल्यात एकमेकांच्या शेतात दिवसभर राबायचं,पैशाची जरूरत नव्हती. पोटभर खायला आणि गावठी दारू किंवा ताडी प्यायला मिळायची.नामूला शिकारीचा भारी नाद होता.ससा,साळिंद्र मारणं ही त्याच्यात एक कला होती. त्यात जास्त धोका नसायचा;

पण रानडुक्कर मारण्यात खरी मर्दानगी. 


लहानपणापासून सकस खाणं आणि रानावनात शेळ्यांच्या मागनं फिरणं.शेतात राबून कसलेला धिप्पाड देहाचा नामू दांडगा ताकदवान. शिकारीचं जनावर खांद्यावर टाकून आणायचा.इतक्या वर्षांत अनेक जनावरांची शिकार केली; पण आजपर्यंत कधी वाघाची शिकार करण्याची संधी त्याला मिळाली नाही.गेल्या दोन दिवसांपासून गावात चर्चा सुरू होती.कोणाच्या तरी शेळ्या गायब झाल्या होत्या.कोणी म्हणत होतं लांडगा असल,तर काहीजणांनी घळणीत वाघाच्या पायाचं ठसं उमटलेलं बघितलं होतं.


त्या दिवशी रात्री नामूनं शिकारीला जायचा बेत ठरविला.

गावातील एकाकडं बंदूक होती.नामूनं त्याची फरशी कुऱ्हाड पाजवून आणली. कुऱ्हाडीचा दांडा घट्ट आवळला आणि खुंटीला अडकवली.कंदिलात घासलेट भरून वात बदलली.बायकोला सांजंचं जेवण लवकर बनवायला सांगितलं आणि संध्याकाळी म्हशीची धार काढायला तो वस्तीवर आला.चारापाणी केलं.शेळ्यांना डाळून करडी डालग्यात टाकली. कडूस पडायच्या आत घराकडं परत जायचं म्हणून नामूची धांदल चालू होती.छपरातली कामं उरकून नामू बाहेर पडला.दाराला फेसाटी लावून मार्ग वळून मावळतीला बघितलं तर दोन कासरा अंतरावर बांध चढून येणारा वाघ दिसला. ज्याच्या शिकारीला जायची तयारी करून कुऱ्हाड घरात ठेवली होती,तो वाघ छपराच्या दारात उभा.हातात काही हत्यार नाही.नामूला

बघताच वाधानं डरकाळी फोडली आणि गती वाढविली.

वाघाच्या आवाजानं पलीकडच्या वावरातनं घराकडं निघालेल्या माणसांनी डोक्यावरची वैरणीची ओझी टाकून पळ काढला.नामूला काहीच सुचंना.आजूबाजूला काठी,

कुऱ्हाड बघायला लागला.पलीकडं रोवलेला लाकडाचा खुंटा उपसून हातात घेऊन नामूनं पवित्रा घेतला.आता नामा लाकडी दांडक्यानं वाघाच्या अंगावर जाणार हे लांबवर उभा राहिलेल्या केशवनं बघितलं.तो तिथनंच खेकसला. "आरं ये नाम्या आडबाळा,झटदिशी छपरात जा आन् फेसाटी लाव,नाय तर फुकट मरशील..." तसा नामू भानावर आला.हातातला खुट्टा वाघावर फेकून मारला आणि झटक्यात फेसाटी ओढून छपरात घुसला.जवळ येणाऱ्या वाघानं झडप घातली;पण फेसाटीला तटली. नामू छपरात गेल्याबरोबर केशवनं गावाकडं धूम ठोकली.नामू वाघाच्या तावडीत सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.


सगळी तरणी मंडळी मिळेल ते हत्यार घेऊन नामूच्या दारात जमली.बंदूकवाला शंकर गोळ्या आणायला पलीकडल्या गावात गेला होता.तो अजून आला नाही.बिनाकाडतुसाची बंदूक म्हणजे रिकामी फुकणीच.

काठी,कुऱ्हाडीनं वाघाची शिकार करायला गेलं,तर आपलीच शिकार होणार; म्हणून कोणी पुढं जायला

धजावत नव्हतं.दारातला कालवा ऐकून घरात नामूच्या आईनं हंबरडा फोडला.मागोमाग पोरांनी सूर धरला.

नामूची बायको काशीबाईच्या डोळ्यांचा बांध फुटला.

आजूबाजूच्या आयाबाया गोळा झाल्या.रडारड सुरू झाली.प्रत्येकजण आपल्या मनात येईल ते तर्कवितर्क मांडायला लागलं. 'इतका वकूत हून गेला तर वस्तीवर

थांबायचं कशाला? वाघ आलाय माहीत असताना बिनाहत्यार जायाचं कशाला?कुराडीला धार करून खुटीला आडकीवल्या ती काय पुजाय ठेवलीया का? संगं घेऊन जायला काय वझं हुतं व्हय? नामू वस्तीवर अडकलेला आणि इकडं गावकरी मनाला येईल तसं बोलत होती.काहीजण पुढं जायला तयार होती;पण

तो छपरात आहे,तोपर्यंत सुरक्षित आहे. मग बाकीच्यांनी जीव धोक्यात घालून कशाला उगाच जायचं! असं काहीजण म्हणत होतं.गावातली काही आडदांडतरणी पोरं वाघावर हल्ला करायची भाषा करत होती.वडीलधारी मंडळी सबुरीनं घ्यायला लावत होती.काडतूस आणायला गेलेला शंकर परत येईपर्यंत वाट बघत बसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.छपराभोवती घुटमळणारा वाघ जरा वघळीपर्यंत जायचा आणि शेळ्यांच्या आवाजानं पुन्हा परत यायचा.सूर्य पूर्णपणे डोंगराआड लपला.


संध्याकाळच्या मुक्कामाला आलेली पाखरं घरट्यात विसावली,तशी त्यांची किलबिल थांबली.अंधाराची चादर पांघरून झाडंही झोपली.निरव शांततेत वाघाची डरकाळी गावात ऐकू यायला लागली.घरात जमलेल्या बायांनी काशीबाईसमोर घोळका घातला.चूल पेटवायची वेळ झाली तशी एक एक करून सगळ्यांनी काढता पाय घेतला.काळजीनं पोरांची तोंड किरवांजलेली.नामूच्या घरात चूल पेटली नाही. शेजारच्या घरातनं आलेल्या जेवणात काशीबाईनं पोरांना आणि सासू-सासऱ्यांना जेवायला घातलं. त्यांनी कसंतरी चार घास घशाखाली ढकललं. कशीबाईच्या घशाखाली मात्र घास उतरला नाही. नामूचा बाप चार-पाच वेळा बंदूकवाल्या शंकरच्या घराकडं हेलपाटं मारून आला. म्हातऱ्यानं दारातच उंबऱ्यावर ठाण मांडलं. नामूची आई नातवंडांना उराशी कवटाळून कणगीला पाठ लावून बसली.काशी मागच्या दाराला भांडी घासत बसली.तिच्या अंगाची काहिली होत होती. तोंडात देवाचा धावा सुरू होता.तिकडं नामू छपरात बसून आदमास घेत होता.वाघ कुठल्या दिशेला गेलाय याचा अंदाज येत नव्हता.मधनंच डरकाळी ऐकायला यायची. घरातल्या मंडळींची काळजी वाढत होती. काशीबाईनं धुतलेल्या भांड्यांची पाटी चुलीम्होरं आणून ठेवली.माजघरात अडकवलेली फरशी कुऱ्हाड उचलली.

कंदिलाची वात मोठी केली आणि मागच्या दारानं तडक पाणंदीची वाट धरली.कुणी बघायच्या आत काशी गावाबाहेरच्या पायवाटेनं झपाझप पावलं टाकत छपराच्या दिशेनं निघाली.पौर्णिमा तोंडावर आल्यानं चंद्राच्या उजेडात चांदण्या चमकत होत्या. रातकिड्यांची किरकिर सुरू होती.झपाट्यानं चालणाऱ्या काशीला यातल्या कशाचंच भान नव्हतं.ओढा ओलांडून पुढं आल्यावर कळकीच्या बेटाचा वाऱ्यामुळं येणारा आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता.काशीची नजर चौफेर फिरत होती.ती हातात फरशी कुऱ्हाडीचा दांडा घुमवत होती.

छपराकडं जाणारी वाट ओढ्याच्या समांतरच जात होती.वस्ती समोर दिसायला लागली तशी काशीबाईच्या पायाची गती वाढली. कपाळ घामाघूम झालेलं.घशाला कोरड पडली. करकचून आवळलेल्या कासोट्यामुळं साडी पायात येत नव्हती.खांद्यावरनं घट्ट ओढून घेतलेला पदर कमरंला खोचलेला.त्यावर कमरपट्ट्याच्या घुंगरांचा आवाज शांत वातावरणात कानाला सुखावत होता.

कंदिलाची काच थोडीशी काळवंडली.


काशीबाईला समोरच्या घळणीतनं काहीतरी वर येताना दिसलं.अंधाराला चिरत तिची नजर एका ठिकाणी खिळली.क्षणार्धात तिच्या ध्यानात आलं की,समोरनं येणारं कमरंएवढ्या उंचीचं जनावर वाघच आहे.आता पळून जाणं शक्य नव्हतं. काशीबाईनं हातातला कंदील फरशी कुऱ्हाडीत अडकवून वाघाच्या दिशेनं केला.

आगीला घाबरून वाघ जेवढा वेळ लांब राहील,तेवढ्यात जितकं अंतर कापता येईल तितकं पुढं जायचं तिनं ठरवलं.काही अंतर जाईपर्यंत वाघ कंदिलापासून लांब राहिला;पण पाठलाग सुरूच होता.एका बांधावर चढताना काशीचा पाय ठेचकाळला.कंदील जमिनीवर आपटून भडका झाला तसा वाघ जरा मागं सरकला.काशीनं पटकन् कुऱ्हाडकंदिलापासून बाजूला काढली. जिभळ्या चाटत तिच्या दिशेनं येणाऱ्या वाघाला आता तिनं सामोरं जायचं ठरवलं.दोन्ही हातांनी कुऱ्हाड धरून पावित्रा घेतला.बांधावरनं चालत येणाऱ्या वाघानं काशीजवळ येताच गती बदलली.झेप घेऊन वाघ जर अंगावर आला,

तर कुऱ्हाडीचा वार करून आवरणं कठीण होतं. काशीसावध उभा राहिली.जवळ आलेल्या वाघानं झडप घातली,तशी काशीनं कुऱ्हाड त्याच्या जबड्यात घालून मागचा दांडा जमिनीवर टेकला.कुऱ्हाड वाघाच्या घशात घुसली.कुऱ्हाडीला धडकलेला वाघ झेंडा लटकावा तसा या बाजूनं त्या बाजूला गेला.जाताना त्याचं मागचं पाय काशीबाईच्या दंडाला ओरखडून गेलं.बेभान झालेल्या काशीला त्याची फिकीर नव्हती.तिनं खसकन् कुऱ्हाड मागं ओढली. त्यासरशी घशात गेलेली फरशी वाघाच्या जिभंवरून मार्ग आली.त्याचा जबडा रक्तबंबाळ झाला.

जखमी झाला तरी तो वाघ होता.त्यानं जबडा झटकून गुरगुरत परत उडी घेतली. यावेळी अंतर कमी होतं.

काशीनं फरशी वाघाच्या पुढच्या दोन्ही पायांच्या मधे रुतवून परत जमिनीवर कुऱ्हाडीचा दांडा टेकवून पायानं दाबून धरला.वाघ झोक्यानं पलीकडं पडला.यावेळी खाली बसलेल्याकाशीबाईच्या पाठीचा लचका वाघाच्या नखानं ओरबडला.वाघाच्या छातीत घुसलेली कुऱ्हाड हिसडा देऊन काशीनं मागं घेतली.खोलवर घुसलेली कुऱ्हाड बाहेर खेचताना बरीच ताकत लागली.रक्तानं माखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्यावरचं थेंब गळायला लागलं. धडपडत उठणारा वाघ नीट उभा व्हायच्या आत काशीनं बाजूला येऊन वाघाचा मागचा पाय आणि पोट यांच्या मधे वार करून एक पायनिकामी केला.वाघाच्या मागून पलीकडं उडी मारून काशीनं तसाच पलीकडल्या बाजूनं मागचा पाय निकामी केला.सांध्यात पाय निकामी झाल्यानं वाघाची गती कमी झाली तरी ताकत कमी नव्हती.पुढच्या दोन्ही पायांच्या जोरावर त्यानं झडप घातली.यावेळी ढेपाळलेल्या वाघावर पतीच्या संरक्षणासाठी हातात कुऱ्हाड घेऊन एकटीनं आलेल्या या वाघिणीनं हल्ला केला.काशीनं मागं सरकून सरळ वाघाच्या गळ्यावर कुऱ्हाड घातली.ताकदवान वाघ कुऱ्हाडीसकट काशीबाईच्या अंगावर कोसळला. वाघाचं रक्तबंबाळ घड बाजूला सारून उठताना दमलेल्या काशीबाईच्या दोन्ही हातांना वाघानं खरवडलं.वाघाच्या नख्यांनी तिचं झंपर पदराची चाळण झाली.सारं अंग सोलकटून निघालं. रागाच्या भरात तिनं वाघाच्या गळ्यावर कुऱ्हाडीचं दोन-तीन घाव घातलं.मागं सरणाऱ्या काशीला जाणवलं की आता वाघ उठणार नाही आणि उठला तरी आपल्याला गाठणार नाही.हातातला कुऱ्हाडीचा दांडा ओढतच तिनं वस्तीकडं धाव घेतली.वस्ती हाकंच्या अंतरावर आल्या

बरोबर तिनं अंगात असल नसल तेवढा जोर लावून 'धनी...' म्हणून हाक दिली. 


कारभारणीच्या आवाजानं खडबडून उठलेला नामू धनगर छपराची फेसाटी फेकूनच बाहेर आला.बांधावरनं धडपडत येणाऱ्या काशीकडे धावत सुटला.रक्तानं माखलेल्या कारभारणीच्या हातात कुऱ्हाड बघून धावत जाऊन तिला त्यानं मिठीत घेतलं.घाम आणि रक्तानं न्हालेली काशीबाई नवऱ्याच्या मिठीत कोसळली. काशीच्या हातावर,पाठीवर वाघाच्या नखांचे ओरखडे बघून नामू भांबावला.झटक्यात त्यानं काशीला खांद्यावर घेतलं आणि गावाकडं पळत सुटला.काडतुसं घेऊन आलेला शंकर नामूच्या दारात बंदूक घेऊन उभा होता.माणसांची जुळवाजुळव सुरू होती.इतक्यात एवढ्या अंधारात नामू मालकिणीला खांद्यावरून घेऊन येताना दिसला तसा आश्चर्यानं सगळ्यांचंच डोळं मोठं झालं.कुणाला काहीच सुचत नव्हतं. चेहऱ्यावर केवळ प्रश्न,प्रश्न आणि प्रश्न..'मघाशी तर काशी घरात हुती आणि शेताकडं कवा गेली. आमी हितंच हाय नव्हं.' नामूच्या दारातल्या माणसांची हळू आवाजात कुजबूज वाढली. जखमी काशीच्या तोंडावर पाणी मारून दोन घोट घशात घालताच तिनं नवऱ्याच्या डोळ्यांत डोळं घालून बघितलं.एकट्या बायकोनं आपल्यासाठी वाघाचा सामना केला याचं कौतुक करताना नामू गलबलून गेला आणि मोठ्यानं ओरडला, "काशी,तू माझी वाघीण हाईस वाघीण..."


महत्वाची नोंद.:- दिनांक ०८.०९.२४ रोजी सुट्टी असल्याने आमचे लाडके मित्र गणितायन लॅबचे निर्माते डॉ.दिपक शेटे यांच्यासोबत कोल्हापूरला नवीन 'माणसांना' भेटण्यासाठी गेलो.आमचे मार्गदर्शक मित्र भरत बुटाले उपसंपादक लोकमत कोल्हापूर आवृत्ती यांना तर कडकडून भेटतोच.फार दिवस झाले (वाघीण हा कथासंग्रह प्रतिक पाटील जे मानवी मनाला,मानवी संवेदनेला आपल्या बहारदार लेखणीने साद घालतात.) देणार होते.तो मला मिळाला. 'स्वच्छंद'प्रकाशन कोल्हापूर,अतिशय आकर्षक,सुबक बांधणी व महत्वाचे म्हणजे अजिबात छपाई चुक नाही.मुखपृष्ठ श्रीरंग मोरे यांचे आहे.हा कथा संग्रह ७८पृष्ठांचा (११ कथा असणारा ) हाती पडल्यानंतर लगेच वाचून संपवला.मला फारच आवडला काय वाचावं,वाचायला कुठून सुरवात करावी.

अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वाघीण हे पूस्तक.सरळ साधं,सोप्पं पण सर्वोत्कृष्ट मानवतेला देणारं शेवटी जे साधं,सरळ,सोप्पं असतं तेच कठिण तत्त्वज्ञान असतं.याच पुस्तकातील कथा आपणास या ठिकाणी वाचावयास मिळतील.धन्यवाद

९/९/२४

एक रंजक गोष्ट / An interesting thing 

या काळ्या-पांढऱ्या रंगसंगतीचा आणखी एक फायदा आहे.जर तापमान वाढलं तर पेंग्विन सूर्याच्या दिशेने पोट करून उभे राहतात.त्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि त्यांच्या शरीराचं तापमान फार वाढत नाही.जर तापमान कमी असेल तर पेंग्विन सूर्याकडे पाठ करून उभे राहतात,त्यामुळे उपलब्ध उष्णता शोषली जाते. पेंग्विन बराच काळ पाण्यात घालवतात.त्यांचं मानेखालचं शरीर पाण्यात असतं,

त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या मानेवरच्या भागात अनेक प्रकारचे पिसारे आणि रंग निर्माण झालेले आढळतात.बहुतेक पेंग्विन जातींचं वर्गीकरण त्यांच्या शरीराची ठेवण आणि डोक्यांमध्ये असलेली बाह्यवैशिष्ट्यं यांच्या साहाय्याने केलं जातं.


डायेन तिला दिसलेल्या पेंग्विनांबद्दल लिहिताना अंटार्क्टिकावर आढळणाऱ्या आणि उत्तरेकडे अगदी विषुववृत्तापर्यंत आढळणाऱ्या वेगवेगळ्या पेंग्विन जाती प्रथमदर्शनी कशा वाटल्या याचं सरस वर्णन करते.ते वाचताना आपल्याला कंटाळा येत नाही.या प्रेमळ पक्ष्यांच्या शत्रूचीही ती आपल्याला माहिती देते.पेंग्विनांच्या पिल्लांचे प्रमुख शत्रू म्हणजे स्कुआ.तपकिरी,विटकरी रंगाच्या या भल्या मोठ्या पक्ष्यांचं लक्ष कोवळ्या पेंग्विनांवर असतं.ज्या प्राण्यावर हल्ला करायचा त्याच्या डोक्याच्या दिशेने प्रथम स्कुआ सूर मारतात.ते अतिशय चतुराईने आणि तितक्याच चपळाईने भक्ष्य निवडतात.

काही शास्त्रज्ञांच्या मते स्कुआ एखाद्या पेंग्विन वसाहती

तील आपापला हिस्सा ठरवून वाटून घेतात.यामुळे एखाद्या पेंग्विन वसाहतीमध्ये किती पेंग्विन आहेत हे ठरवायचं असेल तेव्हा त्या भागातील स्कुआंची संख्या मोजायची आणि तिला दोन हजारांनी गुणायचं,की त्या वसाहतीमधील पेंग्विनांची संख्या आपोआप कळते.


'द मून बाय द व्हेल लाइट...' या पुस्तकात येणारे प्राणी,त्यांचे रहिवास याबद्दल जनसामान्यांना क्वचितच माहिती असते.यामुळे अनेकदा डायेनला वाचकांच्या विक्षिप्त प्रश्नांना तोंड द्यावं लागतं.तिने वटवाघुळं,सुसरी,

देवमासे,पेंग्विन्स अशा आगळ्यावेगळ्या प्राण्यांबद्दल लिहायचं का ठरवलं याचं कारण सांगताना ती म्हणते-


या प्राण्यांच्या जगण्याचं निरीक्षण करताना साहजिकच आपल्या जगण्याशी त्याची तुलना होते.कायमस्वरूपी नाहीसे होण्याची शक्यता असलेल्या एखाद्या प्राणिजातीचा अभ्यास करणाऱ्यांची धडपड आणि तगमग यावरून मानव आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांबद्दलही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.'


डायेन स्वतःला निसर्गलेखक म्हणवून घ्यायला उत्सुक नसते.कारण त्यातून माणूस निसर्गापासून वेगळा आहे,असा अर्थ ध्वनित होतो,असं तिला वाटतं.तिला ते मंजूर नाही.आपण निसर्गापासून वेगळं होऊन त्रयस्थपणे निसर्गाचं निरीक्षण करूच शकत नाही,असं ती म्हणते,प्रत्यक्ष कुठल्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी ती मोहीम आपण का हाती घेतोय याची डायेनला कल्पना असायची. मोहिमेदरम्यान आपण कोणती निरीक्षणं करायची हेही तिने ठरवलेलं असायचं.

पण प्रत्येकवेळी तिला काही ना काही अनपेक्षित अनुभव येत.मात्र अशा अनुभवांमुळेच आपलं आयुष्य अधिक संपन्न झालंय,असं तिला वाटतं. ती म्हणते 'प्रत्येक मोहिमेवर आधारित लेखन पूर्ण केल्यावर त्या लेखनातून काही तरी सुटलेलं आहे असं मला नेहमीच वाटत आलंय. मोहिमेतली बरीच गंमत,ताणतणाव,गोंधळ आणि मोहिमेवर जायलाच हवं असा माझा हट्टाग्रह,या गोष्टी पूर्णत्वाने या लिखाणात उतरलेल्या नाहीत असं माझ्या लक्षात येतं... बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मुद्दाम साहसी संकटं शोधत असते.मी सुसरीच्या पाठीवर बसते,देवमाशांच्या अगदी जवळ पोहत जाऊन त्याच्या तोंडात डोकावते;लक्षावधी वाघुळांच्या मधोमध उभी राहते; त्यामुळे बऱ्याचदा मी खूप घाबरलेही होते.पण तरीही जेव्हा 'व्हाय द हेल डू यू गेट इन दु सिच्युएशन्स लाइक दीज?' हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं,की असे भीतीचे क्षण झटकन निघून जातात.मी जेव्हा जेव्हा अभ्यासासाठी विजनवासात जाते तेव्हा तेव्हा त्या विषयांतले तज्ज्ञ माझ्याबरोबर असतात.ते प्राणी धोकादायक केव्हा बनू शकतात याची त्यांना माहिती असतेच.'कष्टप्रद जीवन भोगणं,हे मात्र या प्रकारच्या जगण्याचं एक वारंवार ओढवणारं सत्य आहे. मर्लिन टटल आणि त्याच्या सहाध्यायांबरोबर डायेन एकदा टेक्सासच्या वाळवंटात गेली.त्या मोहिमेदरम्यान त्यांना दिवसभरात जेमतेम दोन तास झोपायला मिळत होतं.दिवसाउजेडी सर्वजण वाघुळं कुठे येऊ शकतील अशा जागा शोधत हिंडायचे.अशी एखादी जागा दिसली की त्या जागी जाळी लावायचे.रात्री ही जाळी तपासणं आणि वाघुळांचं छायाचित्रण करणं ही कामं असायची.

वाघुळांवर कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा उजेड पडला की दचकून उडालेली वाघुळं 'विधी' करत.त्या मोहिमेतला रात्रीतला एक फोटो डायेनने मोठा करून स्वतःच्या खोलीत लावलाय.तो बघितला की त्या रात्रीचा तो प्रसंग,तो वास आणि सकाळी केलेली अंघोळ आठवून मला नेहमीच हसू येतं.'असं ती म्हणते..


एकदा सुसरींच्या अभ्यासाच्या वेळी एक सुसर हाताळताना डायेन चांगलीच सडकून निघाली होती.

सुसरीच्या पाठीवरून उठताना ज्या चपळाईने दूर व्हायला हवं होतं तेवढी चपळाई ती दाखवू शकली नाही;त्या सुसरीने झटकन आपलं मुस्काड वळवलं,ते डायेनच्या नडगीवर आपटलं.सुसरींची डोकी चांगलीच टणक असतात,आणि ती अशा त-हेने चिडून हलवली जातात तेव्हा त्यामागे सुसरीची सगळी ताकद एकवटलेली असते. 'एखादी हाडांनी बनवलेली बेसबॉलची बॅट माझ्या नडगीवर कुणीतरी मारावी तसं मला त्या वेळी वाटलं;

नडगी काळीनिळी पडून सुजली होती.सुदैवाने कुठलंही हाड मोडलेलं नव्हतं.या किरकोळ अपघाताच्या मोबदल्यात मला सुसरीच्या नाकाडाला, डोळ्यांना,

मानेवरच्या वळ्यांना,शरीरावरील खवल्यांना स्पर्श करता आला होता.तिच्या मागच्या पायाच्या नख्या चाचपून बघता आल्या होत्या.हे सगळं इतर कुणाला करता येतं ?' डायेन त्या प्रसंगाबद्दल म्हणते.


नंतर एकदा जपानमध्ये ती कुरवांची (अल्बॅट्रॉस) एक अगदी दुर्मिळ प्रजाती वास्तव्यास आल्याचं कळल्यामुळे तिथे जाऊन पोहोचली.पण त्या वेळी तिच्या तीन बरगड्या मोडल्या होत्या. वैद्यकीय पाहणी आणि उपचारांनंतर तिला काम पुढे चालू ठेवायला हरकत नाही,असं सांगण्यात आलं तेव्हा तिला खूप आनंद झाला.पण तिला असह्य वेदना होत होत्या.थांबून श्वास घेणं, बसणं,आडवं होणं सगळंच अतिशय त्रासदायक झालं होतं.बरं,कुरव निरीक्षण करण्यासाठी छोट्या,हलत्या पडावावरून सागरात फिरणं तर अनिवार्य होतं.एकदा पडावाने किनारा सोडला, तेव्हा तिला विश्रांती मिळावी म्हणून पडावावरील कर्मचाऱ्यांनी तिला बंकबेडच्या खालच्या फळीवर झोपवलं.हलणाऱ्या गलबतामुळे तिला झोप लागली.

काही तासांनी जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं,की तिथून उठणंच काय पण कूस बदलणंही अशक्य झालं होतं.तिचे स्नायू अतिश्रमांनी सुजले होते.ओरडायचं तर दीर्घ श्वास घ्यायला हवा.ती तर तिच्या दृष्टीने असंभाव्य गोष्ट होती.सुमारे दोन- अडीच तास तिची धडपड चालू होती.तिच्या समोरच्या तशाच एका बेडवर झोपलेला जपानी सहप्रवासी जागा झाला. त्याला खाणाखुणा करून डायेनने 'मला या बेडमधून बाहेर काढ' असं सांगायचा प्रयत्न केला.बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.त्याने शक्य तितक्या हळुवारपणे डायेनला तिच्या बंक बेडमधून बाहेर खेचलं.'त्या वेळी झालेल्या मरणप्राय वेदना मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.'असं डायेन म्हणते.


अशा अपघातांवेळी आपल्यामुळे इतरांच्या कामात व्यत्यय येतो,या अपराधीपणाच्या भावनेने त्या काळात डायेनला पछाडलं होतं. त्याच वेळी अगदी अपरिचित व्यक्तींच्या कनवाळूपणाचाही तिला अनुभव येत होता.या प्रकारच्या शोधमोहिमांमधील धोके,अनिश्चितता, शारीरिक त्रास,वेदना आणि शारीरिक कष्ट यांची हळूहळू आपल्याला सवय होते,असं ती सांगते. प्राण्यांबरोबरच माणसांकडून होणाऱ्या दगाफटक्यांचा उल्लेख करायलाही ती विसरत नाही.तिच्या या अनुभवकथनातून आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच अद्भुत गोष्टी,वैज्ञानिक माहितीही आपल्याला मिळत राहते. 


वाघुळांबाबत ती सांगते- 'जेव्हा एखाद्या वाघुळाच्या तोंडात भक्ष्य किंवा खाद्य असतं तेव्हा त्यांना प्रतिध्वनी ग्रहण करायलाही त्रास होतो आणि ध्वनिलहरी प्रक्षेपणातही अडचण होते.या अडचणींवर मात करण्यासाठी काही वाघुळांच्या कानावर किंवा चेहऱ्यावर उत्क्रांतीत सोनार यंत्रणा तयार झालेली आहे.सोनार म्हणजे साउंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग, ध्वनिलहरींचा वापर करून फिरणं आणि भक्ष्याचा तसंच अडथळ्यांचा अंदाज घेणं.बऱ्याच प्रजातींच्या वाघुळांचे चेहरे सोनार यंत्रणा बनलेले असतात. त्यांच्या नाकावर टोकदार उंचवटे असतात.ही सर्व निसर्गाची योजना असते.मात्र हे तंत्र अगदी निर्दोष नसतं.त्यामुळेच काही वेळा काटेरी तारांच्या कुंपणामध्ये वाघुळं अडकलेली आढळतात.महामार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर वाघुळं आपटून जखमी होतात.' सुसरीं बद्दलही पुस्तकात बरीच माहिती समजते.सुसरींच्या रक्तातील तांबड्या पेशी आकारामानाने बऱ्याच मोठ्या असतात.त्यांचा उपयोग मानवी सांधेदुखीच्या आर्थायटिस या आजाराच्या निदानासाठी उपयोग होतो.सुसरींच्या जबड्याच्या निर्मितीचा गर्भावस्थे

पासूनचा अभ्यास करताना जे तंत्र वापरलं गेलंत्याच तंत्राचा वापर मानवी टाळू आणि फाटके ओठ गर्भावस्थेतच दुरुस्त करण्यासाठी करता येऊ शकेल हे वैद्यकशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं.


देवमाशांच्या बाबतीतही अशीच वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला समजते.दक्षिण ध्रुवीय प्रदेशातले देवमासे दक्षिण अमेरिका खंडाच्या किनाऱ्याने उत्तरेकडे स्थलांतर करतात. या स्थलांतराचा डायेनने अभ्यास केला. देवमाशांच्या माद्या आपल्या नवजात पिल्लांसोबत उत्तरेकडच्या प्रवासाला निघतात. या प्रवासादरम्यान एक अद्भुत गोष्ट पाहायला मिळते.या माद्या एका ओळीत प्रवास करत असतात,तरीही त्या परस्परांशी अजिबात कुठल्याही प्रकारचा संपर्क साधत नाहीत. आपल्या आगेमागे असलेल्या माद्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा ठावठिकाणा त्यांना माहीत असतो,तरीही त्या एकमेकींना टाळत असतात. काही वेळा एखादी मादी दुसऱ्या मादीच्या जवळ जाते आणि त्या दोघी समांतर पोहू लागतात; पण ज्या क्षणी त्यांची बछडी एकमेकांशी खेळू लागतात,त्या क्षणी माद्या त्या पिल्लांचा परस्परसंबंध रोखायचा प्रयत्न करतात.या माद्या असं का वागतात ? कारण या काळात त्या माद्या उपाशी असतात.त्यांच्या अन्नाच्या स्रोतापासून त्या साधारणपणे पंधराशे ते बत्तीसशे कि.मी. दूर आलेल्या असतात.त्यांच्या विण्याच्या काळात त्यांची उपासमार झालेली असते.पिलू जन्माल्या आल्यापासून या माद्या त्याचं पोषण दूध पाजून करत असतात.त्यामुळे पिलांनी एकमेकांशी खेळून फालतू वेळ घालवणं त्यांना परवडणारं नसतं.त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या खाद्यकुरणाकडे जाऊन परत पूर्ववत व्हायचं असतं.डायेन हे सगळं इतक्या सहजतेने आणि रंजकपणे सांगते की वाचताना आपण जगाचं भान विसरून जातो.त्याचबरोबर ती त्या त्या मोहिमेतल्या तिच्याबरोबर असणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखाही आपल्यासमोर उभ्या करते.खरं तर ती विज्ञान प्रशिक्षित नाही.ती पत्रकार आहे,तीसुद्धा न्यूयॉर्करसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकाची.तेव्हा ती गावगन्ना न हिंडता आरामात शहरातल्या घडामोडींबद्दल लिहू शकली असती.त्याऐवजी तिने निसर्ग पत्रकारितेची अनवट वाट पकडली आणि काही वेगळ्याच विषयांवरची पुस्तकं लिहिली.ती वाचून मला जो वैयक्तिकरीत्या आनंद मिळाला त्यासाठी धन्यवाद देण्याचा हा एक प्रयत्न.


तुमची मालकी कितीही कमी असली किंवा तुमचा पैसा कितीही कमी असला,तरी वन्यजीव आणि निसर्गावर प्रेम केल्याने तुम्ही खूप श्रीमंत व्हाल.

- पॉल ऑक्स्टन