* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पाठलाग रानडुकराचा Chasing the wild boar

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/९/२४

पाठलाग रानडुकराचा Chasing the wild boar

आपला तो जुना म्हातारा मित्र-ओझीवाला फिरस्ता त्या पूर्वीच्याच काटेरी कुंपण असलेल्या शेतात आदल्या रात्रीच मुक्कामाला आला होता. यावेळी त्याने हरिद्वारवरून मीठ व गुळाची पोती आणली होती.एखाददुसरा दिवस इथे मुक्काम करून तो बद्रीनाथ पलीकडच्या गावांमध्ये जाणार होता.त्याच्या शेळ्यामेढ्यांच्या पाठीवर जरा जास्तच वजन असल्याने आणि शेवटची मजल जरा मोठी मारल्याने त्याला काल इथे पोचायला जरा उशीरच झाला होता.साहजिकच काल त्याला त्या कुंपणातल्या कच्च्या जागांची दुरुस्ती करायला वेळ मिळाला नव्हता.त्याचा परिणाम असा झाला त्याचे काही बोकड कुंपणाच्या बाहेर भरकटले होते व त्यातला एक पहाटे पहाटेच रस्त्याच्या कडेला बिबळ्याने मारला होता.कुत्र्यांच्या भुंकण्याने त्याला जाग आली आणि जरा उजेड पडल्यावर त्याला दिसलं की त्याचा सर्वात चांगला,एखाद्या शेटलँड पोनीच्या आकाराचा, पोलादी रंगाचा बोकड काहीही कारण नसताना बिबळ्याने मारला होता.हा बोकड रस्त्याच्या कडेलाच मरून पडला होता.


काही वर्ष नरभक्षक राहिल्यानंतर एखाद्या बिबळ्याच्या सवयी किती बदलू शकतात हे या बिबळ्याच्या आदल्या रात्रीच्या वागणुकीवरून समजत होतं.


अचानक जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे,तो ट्रॅप पायाला लटकत काही अंतर ओढून नेल्यामुळे त्याला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना करा;ज्या पद्धतीने रागारागाने त्याने डरकाळ्या मारल्या होत्या त्यावरूनच ते सिद्ध होत होतं.साहजिकच एखाद्याला वाटेल की ट्रॅपमधून सुटल्यावर तो मनुष्यवस्तीपासून शक्य तेवढा दूर जाईल आणि परत खूप भूक लागेपर्यंत लांब कुठेतरी विश्रांती घेईल.पण असं काही करण्याऐवजी तो भक्ष्याच्या जवळपास राहिला आणि आम्हाला मचाणावर चढताना पाहिल्यावर शोध घेण्यासाठी झाडापर्यंतही आला.सुदैवाने झाडाभोवती काटेरी तारा गुंडाळण्याचं भान इबॉटसनला होतं.आपली शिकार करायला आलेल्या शिकाऱ्यांचाच नरभक्षकाने बळी घेतल्याची उदाहरणं काही कमी नाहीत.सध्याही मध्यप्रांतात एक असा नरभक्षक वावरतोय की ज्याने त्याला मारायला आलेल्या चार भारतीय शिकाऱ्यांचा बळी घेतलाय.माझ्या माहिती

प्रमाणे त्याने आजपर्यंत चाळीस माणसं मारली आहेत.स्वतःच्याच मारेकऱ्यांना खाण्याच्या सवयीमुळे तो कधी माणसं,कधी पाळीव जनावरं तर कधी जंगली जनावरं असं 'व्हरायटी डाएट' करत अगदी मजेत दिवस घालवतोय.


असो... आंब्याच्या झाडाला भेट दिल्यानंतर तो गावाकडून येणाऱ्या वाटेवरून मुख्य पायवाटेवर आला व तिथून उजवीकडे वळून एक मैलानंतर यात्रामार्गावर आला.

त्यानंतर भर बाजारातून चालत अर्ध्या मैलावरच्या बंगल्याच्या फाटकाजवळ येऊन तिथल्या पिलर्सखालची जमीन खरवडली.आदल्या रात्रीच्या पावसामुळे जमीन ओली व मऊ झाली होती... त्यावरच्या पगमार्कवरून स्पष्ट दिसत होतं की ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे त्याला कोणतीही मोठी जखम झाली नव्हती.ब्रेकफास्टनंतर मी त्याचे माग फाटकाजवळच उचलले आणि त्याच्या

बरोबरच सरळ त्या म्हाताऱ्या ओझीवाल्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचले.या ठिकाणी रस्त्याला वळण होतं.या वळणावरूनच कुंपणापासून १०-१५ यार्डावरून त्याला भरकटलेल्या शेळ्यामेंढ्या दिसल्या होत्या. रस्त्याच्या बाहेरच्या कडेकडून आतल्या कडेला ओलांडून येऊन आणि डोंगराच्या आड आडोशाने दबकत येऊन त्यातला एक बोकड त्याने मारला होता पण त्याचं साधं रक्तही पिण्याची तसदी न घेता तो परत रस्त्याकडे परतला होता.


मालाची रचून ठेवलेली पोती व मेलेला बोकड यावर त्या ओझीवाल्याचे दोन धनगरी कुत्रे पहारा देत होते.त्यांना छोट्या साखळ्यांनी लाकडी मेखांना पक्कं बांधलं होतं.हे काळे,मोठे व ताकदवान कुत्रे जे काम या ओझीवाल्यांसाठी करतात तशा कामांसाठी युरोपातल्या धनगरी कुत्र्यांना वापरलं जात नाही. मजल मारताना हे कुत्रे कळपाबरोबर चालत राहतात आणि त्यांचं खरं काम हे मुक्काम ठोकल्यानंतर सुरू होतं. रात्री ते जंगली जनावरांपासून कळपाचं रक्षण करतात तर दिवसा मालक शेळ्यामेंढ्या चारायला बाहेर गेला की ते चोरांपासून मालाचं रक्षण करतात.

रात्रीच्या राखणीच्या वेळी एका बिबळ्याला अशा कुत्र्यांनी मारल्याचं मला माहीत आहे व मुक्कामावर चोरी करायचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसालाही त्यांनी ठार मारल्याची नोंद आहे.


बोकडाला मारून तो बिबळ्या परत रस्त्यावर ज्या ठिकाणी आला तिथून मी त्या बिबळ्याचे माग उचलले व त्याच्या मागोमाग गुलाबराईतून जाऊन पुढे एका घळीपर्यंत गेलो.या घळीतून मात्र तो निघून गेला होता.आंब्याच्या झाडापासून घळीपर्यंत जवळजवळ आठ मैलांचं अंतर त्याने तोडलं होतं.दुसरा कोणताही सर्वसाधारण बिबळ्या वरकरणी काही कारण नसताना इतकं लांब अंतर चालत गेला नसता.

त्याचप्रमाणे भूक लागलेली नसताना सर्वसाधारण बिबळ्याने उगीचच त्या बोकडाला मारलं नसतं.

घळीपलीकडे पाव मैल अंतरावर रस्त्याच्या कडेच्या एका मोठ्या दगडावर तो म्हातारा आसपास चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांवर नजर ठेवत बसला होता.लोकर विणण्याची टकळी व लोकरीचा गुंडा आपल्या भल्या मोठ्या खिशात टाकून मी दिलेली सिगरेट घेताना त्याने मला विचारलं की मी त्याच्या कॅम्पवरूनच इथे आलोय का? मी त्याच्या कॅम्पवरूनच आलोय व त्या सैतानाने काय करून ठेवलंय हेही बघितलंय असं मी त्याला सांगितलं आणि पुढे म्हणालो की त्याचे कुत्रे आता पहिल्यासारखे शूर राहिले नसल्याने पुढच्या हरिद्वारच्या भेटीत त्या कुत्र्यांना उंटवाल्यांना विकायला हरकत नाही.माझं म्हणणं पटलं असल्यासारखी त्याने मान हलवली व म्हणाला,'साहेब,आमच्यासारखी पिकल्या केसाची माणसंही कधीकधी चुका करून बसतात व त्यांना परिणामही भोगावे लागतात. मलाही आज तसे भोगावे लागतायत, मी माझा सर्वात चांगला बोकड गमावलाय.पण माझे कुत्रे वाघासारखे शूर आहेत आणि आख्ख्या गढवालमधल्या कुत्र्यांना ते भारी आहेत


ते उंटवाल्यांना विकण्याच्या लायकीचे आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे.तुम्ही पाह्यलंच असेल की माझं मुक्कामाचं ठिकाण रस्त्याच्या अगदी जवळ आहे.

जर चुकून कोणी रात्री जवळून गेला तर कुत्र्यांकडून त्याला धोका होईल अशी भीती वाटल्यामुळे मी त्यांना साखळीने बांधलं होतं व हीच माझी चूक झाली. त्याचा परिणाम तुम्ही पाह्यलाच आहे पण साहेब माझ्या कुत्र्यांना दोष देऊ नका कारण बोकडांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मानेत साखळी रूतून जखमा झाल्यात त्या भरायलाही काही दिवस लागणार आहेत.'


आम्ही बोलत असतानाच गंगेच्या पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर एक जनावर अवतीर्ण झालं. त्याच्या रंगावरून व आकारावरून मला प्रथम ते हिमालयातलं काळ अस्वल वाटलं पण जेव्हा ते डोंगर उतरून नदीकडे यायला लागलं तेव्हा मला दिसलं की ते एक मोठ्ठ रानडुक्कर होतं.त्याच्या पाठलागावर काही गावठी कुत्रे होते आणि त्यांच्या मागे हातात काठ्या घेतलेली पोरं व माणसं पळत होती.सर्वात शेवटच्या माणसाकडे बंदूक होती.जेव्हा हा बंदूकवाला डोंगराच्या माथ्यावर पोचला तेव्हा त्याने बंदूक उंचावली आणि आम्हाला लगेचच धूर दिसला व पाठोपाठ ठासणीच्या बंदूकीचा बार ऐकू आला.त्या बंदूकीच्या रेंजमध्ये फक्त ती पोरं आणि माणसंच येत होती आणि त्यांच्यातला कोणीच धारातीर्थी पडला नसल्याने बघणाऱ्याला असं 'वाटत होतं की त्या माणसाचा नेम जणू काही चुकला आहे.डुकराच्या समोर एक उभा गवताळ उतार होता आणि त्याच्यावर इथेतिथे छोटी झुडुपं विखुरली होती. ह्या उताराखाली थोडी ओबडधोबड जमीन होती आणि त्याखाली खुरट्या झुडुपांचा एक पट्टा होता.हा पट्टा थेट नदीला भिडला होता.


त्या ओबडधोबड भागात डुकराचा वेग जरा कमी पडला.

त्यामुळे डुक्कर व कुत्रे एकत्रच खुरट्या झुडुपांच्या पट्ट्यात घुसले.दुसऱ्याच क्षणाला सर्वात पुढे असलेल्या फिक्कट रंगाच्या कुत्र्याचा अपवाद सोडला तर इतर सर्व कुत्रे झुडुपांच्या बाहेर मागे पळत आले.मागून येणारी माणसं त्या कुत्र्यांनी,डुकरामागे परत जावं म्हणून प्रयत्न करायला लागली.पण रानडुक्कर त्याच्या सुळ्यांनी काय प्रताप करू शकतं हे पाहिल्यामुळे कुत्रे काही पुढे जाईनात.तो बंदूकधारी पण आता त्यांच्यात आला व त्याला लगेच सर्वांनी गराडा घातला.ते दृश्य व आम्ही यांच्यामधून नदी वाहत होती पण नदीच्या वेगवान प्रवाहाच्या आवाजामुळे इतर कुठलेही आवाज ऐकू येत नव्हते.त्यामुळे त्या 'ग्रँडस्टँड'वर बसून हे दृश्य बघताना आपण एखादा मूकपट बघतोय असं वाटत होतं. एक बंदुकीचा बार सोडला तर आम्हाला कोणताच आवाज आला नव्हता.कुत्र्यांप्रमाणेच त्या बंदूक्याची सुद्धा झुडुपात शिरायची इच्छा दिसत नव्हती कारण आता तो त्यांच्या घोळक्यातून दूर झाला आणि बाजूलाच एका खडकावर बसला. "मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा." असं काहीसं तो म्हणत असावा.अगदी काठ्यांनी मारूनसुद्धा रानडुकराला सामोरं जाण्याची कुत्र्यांची हिंमत होत नव्हती.आता अशा दोलायमान अवस्थेत प्रथम पोरं व नंतर बाप्यांनी झुडुपांमध्ये दगड फेकून मारायला सुरुवात केली.हे सर्व होत असताना आम्हाला ते डुक्कर झुडुपांच्या पट्ट्यातून बाहेर पडून नदीकाठच्या वाळूवर येताना दिसलं.दोनचार पावलं भराभर टाकून ते उघड्यावर आलं,काही क्षण स्तब्ध उभं राहिलं,परत काही पावलं टाकून उभं राहिलं व शेवटी एका धावेत पळत येऊन त्याने धाडकन नदीत उडी मारली.या ठिकाणी प्रवाहाला चांगलीच ओढ होती.पण रानडुक्करं तशी निधड्या छातीची असतात आणि आम्ही शेवटचं पाहिलं तेव्हा ते डुक्कर प्रवाहाबरोबर पाव मैल पुढे वाहत गेलं होतं पण तरीही दम काढून पोहतच होतं.माझी खात्री आहे की त्याने किनारा गाठलाच असणार.ओझीवाल्याने मला विचारलं, "ते रानडुक्कर तुमच्या रायफलच्या रेंजमध्ये होतं का साहेब?" मी उत्तर दिलं "हो... पण जीव वाचवण्या

साठी पळत असलेल्या रानडुकरांना मारायला मी गढवालमध्ये ही रायफल आणलेली नाही,तर तुम्ही ज्याला 'सैतानी शक्ती' म्हणता, पण जो बिबळ्या आहे हे मला माहीत आहे त्याला मारायला आणली आहे.


"ठीक आहे साहेब... तुम्ही तुमच्या मार्गाने जावा. आता तुम्ही निघाल्यावर कदाचित आपली भेट कधीच होणार नाही.तेव्हा काळच दाखवेल की तुमचं म्हणणं खरं ठरतं की माझं !"


या त्याच्या उत्तरानंतर आमची भेट दुर्दैवाने पुन्हा कधी झाली नाही हे खरं.पण तो एक मस्त,रंगेल म्हातारा होता,मानी आणि आनंदी ! कदाचित अशा दिवसाची वाट बघणारा,की जेव्हा बिबळे त्याच्या सर्वोत्कृष्ट बोकडाला मारणार नाहीत आणि त्याच्या कुत्र्यांच्या शूरपणावर कोणीही शंका घेणार नाही !


२७.०८.२४ या लेखमालेतील पुढील लेख..