* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वाघीण कथा / Tiger story 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/९/२४

वाघीण कथा / Tiger story 

चांदोली धरणाच्या उशाला नामू धनगराचं गाव. अभयारण्याच्या सावलीत वसलेलं.चारी बाजूंनी डोंगर आणि मधे गाव.उंच डोंगरांच्या आडोशामुळं सकाळी आठ वाजता दिवस उजडायचा आणि चार वाजलं की मावळायचा.द्रोणात ठेवलेल्या नैवेद्याच्या चार शितांसारखा शंभर उंबरा.गावाची जेमतेम पाच- सहाशे लोकसंख्या. डोंगरावरनं खळाळत येणाऱ्या झऱ्याचं स्वच्छ पाणी.कसदार जमिनीत पिकणारं चवदार धान्य. कुठल्याही औषधाची फवारणी न करता झाडावर पाडानं पिकलेली फळं.प्रत्येकाच्या घरात एक-दोन दुभती जनावरं असल्यामुळं खाण्या-पिण्याची कमतरता नाही.शहरापासून दूर असलेल्या या गावात चैनीच्या महागड्या सुखवस्तू नाहीत.त्यामुळं पैशाची जास्त गरज भासायची नाही.पावसाच्या पाण्यावर पिकणारी हंगामी शेती आणि शहरापासून दूर असल्यामुळं गावात आर्थिक व्यवहार कमीच.पैशाचा स्रोत कमी त्यामुळं गावातल्या सगळ्यांचंच खिसं फाटकं.

एकमेकांच्या हाकेला उभा राहिल्या शिवाय गावकऱ्यांना मदत करणारं कोणी नाही. गावातील काहीजण मुंबईला दादर मार्केटमध्ये हमाली करायला गेलेले.त्यांचं म्हातारं आई-वडील पोरांच्या वाटंला डोळं लावून बसत. नामू मात्र गावातच शेतीवाडीत रमलेला.दोन दुभत्या म्हशी आणि विसेक शेरडं संभाळत होता. महिना-दोन महिन्यांतून एखादं पालवं शेजारच्या गावात आठवडी बाजारात विकायचा. त्यात घरात लागणारी चटणी,मीठ,धडूतं,कापडं आणायचा.आई,वडील,बायको,मुलगी आणि मुलगा अशा छोट्या अन् सुखी संसाराचा गाडा नामू चालवायचा.


सुखाच्या पालखीला दुःखाचं भोई खांदा द्यावंत, तसं गावाला काही अडचणीपण होत्याच. 


शहरापासून दूर असल्यामुळं गावात शाळा नाही, वीज नाही.अंधारात चाचपटत जगायचं,गावात यायला डोंगरमाथ्यावरून फिरून येणारी बैलगाडीची वाट.रात्री-अपरात्री कोणी आजारी पडल्यावर एकतर बैलगाडीतून आणायला लागायचं,नाही तर बांबूच्या दोन काठ्यांना घोंगडी गुंडाळून चौघांनी पालखी करून पायवाटेनं पळवत घेऊन जायचं.कोणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही म्हणून गावकरी एकमेकांच्या हाकेला उभा रहात होतं.पैरा करून जमीन कसायचं.पाहुणेराला बोलवून जेवणाच्या बदल्यात एकमेकांच्या शेतात दिवसभर राबायचं,पैशाची जरूरत नव्हती. पोटभर खायला आणि गावठी दारू किंवा ताडी प्यायला मिळायची.नामूला शिकारीचा भारी नाद होता.ससा,साळिंद्र मारणं ही त्याच्यात एक कला होती. त्यात जास्त धोका नसायचा;

पण रानडुक्कर मारण्यात खरी मर्दानगी. 


लहानपणापासून सकस खाणं आणि रानावनात शेळ्यांच्या मागनं फिरणं.शेतात राबून कसलेला धिप्पाड देहाचा नामू दांडगा ताकदवान. शिकारीचं जनावर खांद्यावर टाकून आणायचा.इतक्या वर्षांत अनेक जनावरांची शिकार केली; पण आजपर्यंत कधी वाघाची शिकार करण्याची संधी त्याला मिळाली नाही.गेल्या दोन दिवसांपासून गावात चर्चा सुरू होती.कोणाच्या तरी शेळ्या गायब झाल्या होत्या.कोणी म्हणत होतं लांडगा असल,तर काहीजणांनी घळणीत वाघाच्या पायाचं ठसं उमटलेलं बघितलं होतं.


त्या दिवशी रात्री नामूनं शिकारीला जायचा बेत ठरविला.

गावातील एकाकडं बंदूक होती.नामूनं त्याची फरशी कुऱ्हाड पाजवून आणली. कुऱ्हाडीचा दांडा घट्ट आवळला आणि खुंटीला अडकवली.कंदिलात घासलेट भरून वात बदलली.बायकोला सांजंचं जेवण लवकर बनवायला सांगितलं आणि संध्याकाळी म्हशीची धार काढायला तो वस्तीवर आला.चारापाणी केलं.शेळ्यांना डाळून करडी डालग्यात टाकली. कडूस पडायच्या आत घराकडं परत जायचं म्हणून नामूची धांदल चालू होती.छपरातली कामं उरकून नामू बाहेर पडला.दाराला फेसाटी लावून मार्ग वळून मावळतीला बघितलं तर दोन कासरा अंतरावर बांध चढून येणारा वाघ दिसला. ज्याच्या शिकारीला जायची तयारी करून कुऱ्हाड घरात ठेवली होती,तो वाघ छपराच्या दारात उभा.हातात काही हत्यार नाही.नामूला

बघताच वाधानं डरकाळी फोडली आणि गती वाढविली.

वाघाच्या आवाजानं पलीकडच्या वावरातनं घराकडं निघालेल्या माणसांनी डोक्यावरची वैरणीची ओझी टाकून पळ काढला.नामूला काहीच सुचंना.आजूबाजूला काठी,

कुऱ्हाड बघायला लागला.पलीकडं रोवलेला लाकडाचा खुंटा उपसून हातात घेऊन नामूनं पवित्रा घेतला.आता नामा लाकडी दांडक्यानं वाघाच्या अंगावर जाणार हे लांबवर उभा राहिलेल्या केशवनं बघितलं.तो तिथनंच खेकसला. "आरं ये नाम्या आडबाळा,झटदिशी छपरात जा आन् फेसाटी लाव,नाय तर फुकट मरशील..." तसा नामू भानावर आला.हातातला खुट्टा वाघावर फेकून मारला आणि झटक्यात फेसाटी ओढून छपरात घुसला.जवळ येणाऱ्या वाघानं झडप घातली;पण फेसाटीला तटली. नामू छपरात गेल्याबरोबर केशवनं गावाकडं धूम ठोकली.नामू वाघाच्या तावडीत सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.


सगळी तरणी मंडळी मिळेल ते हत्यार घेऊन नामूच्या दारात जमली.बंदूकवाला शंकर गोळ्या आणायला पलीकडल्या गावात गेला होता.तो अजून आला नाही.बिनाकाडतुसाची बंदूक म्हणजे रिकामी फुकणीच.

काठी,कुऱ्हाडीनं वाघाची शिकार करायला गेलं,तर आपलीच शिकार होणार; म्हणून कोणी पुढं जायला

धजावत नव्हतं.दारातला कालवा ऐकून घरात नामूच्या आईनं हंबरडा फोडला.मागोमाग पोरांनी सूर धरला.

नामूची बायको काशीबाईच्या डोळ्यांचा बांध फुटला.

आजूबाजूच्या आयाबाया गोळा झाल्या.रडारड सुरू झाली.प्रत्येकजण आपल्या मनात येईल ते तर्कवितर्क मांडायला लागलं. 'इतका वकूत हून गेला तर वस्तीवर

थांबायचं कशाला? वाघ आलाय माहीत असताना बिनाहत्यार जायाचं कशाला?कुराडीला धार करून खुटीला आडकीवल्या ती काय पुजाय ठेवलीया का? संगं घेऊन जायला काय वझं हुतं व्हय? नामू वस्तीवर अडकलेला आणि इकडं गावकरी मनाला येईल तसं बोलत होती.काहीजण पुढं जायला तयार होती;पण

तो छपरात आहे,तोपर्यंत सुरक्षित आहे. मग बाकीच्यांनी जीव धोक्यात घालून कशाला उगाच जायचं! असं काहीजण म्हणत होतं.गावातली काही आडदांडतरणी पोरं वाघावर हल्ला करायची भाषा करत होती.वडीलधारी मंडळी सबुरीनं घ्यायला लावत होती.काडतूस आणायला गेलेला शंकर परत येईपर्यंत वाट बघत बसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.छपराभोवती घुटमळणारा वाघ जरा वघळीपर्यंत जायचा आणि शेळ्यांच्या आवाजानं पुन्हा परत यायचा.सूर्य पूर्णपणे डोंगराआड लपला.


संध्याकाळच्या मुक्कामाला आलेली पाखरं घरट्यात विसावली,तशी त्यांची किलबिल थांबली.अंधाराची चादर पांघरून झाडंही झोपली.निरव शांततेत वाघाची डरकाळी गावात ऐकू यायला लागली.घरात जमलेल्या बायांनी काशीबाईसमोर घोळका घातला.चूल पेटवायची वेळ झाली तशी एक एक करून सगळ्यांनी काढता पाय घेतला.काळजीनं पोरांची तोंड किरवांजलेली.नामूच्या घरात चूल पेटली नाही. शेजारच्या घरातनं आलेल्या जेवणात काशीबाईनं पोरांना आणि सासू-सासऱ्यांना जेवायला घातलं. त्यांनी कसंतरी चार घास घशाखाली ढकललं. कशीबाईच्या घशाखाली मात्र घास उतरला नाही. नामूचा बाप चार-पाच वेळा बंदूकवाल्या शंकरच्या घराकडं हेलपाटं मारून आला. म्हातऱ्यानं दारातच उंबऱ्यावर ठाण मांडलं. नामूची आई नातवंडांना उराशी कवटाळून कणगीला पाठ लावून बसली.काशी मागच्या दाराला भांडी घासत बसली.तिच्या अंगाची काहिली होत होती. तोंडात देवाचा धावा सुरू होता.तिकडं नामू छपरात बसून आदमास घेत होता.वाघ कुठल्या दिशेला गेलाय याचा अंदाज येत नव्हता.मधनंच डरकाळी ऐकायला यायची. घरातल्या मंडळींची काळजी वाढत होती. काशीबाईनं धुतलेल्या भांड्यांची पाटी चुलीम्होरं आणून ठेवली.माजघरात अडकवलेली फरशी कुऱ्हाड उचलली.

कंदिलाची वात मोठी केली आणि मागच्या दारानं तडक पाणंदीची वाट धरली.कुणी बघायच्या आत काशी गावाबाहेरच्या पायवाटेनं झपाझप पावलं टाकत छपराच्या दिशेनं निघाली.पौर्णिमा तोंडावर आल्यानं चंद्राच्या उजेडात चांदण्या चमकत होत्या. रातकिड्यांची किरकिर सुरू होती.झपाट्यानं चालणाऱ्या काशीला यातल्या कशाचंच भान नव्हतं.ओढा ओलांडून पुढं आल्यावर कळकीच्या बेटाचा वाऱ्यामुळं येणारा आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता.काशीची नजर चौफेर फिरत होती.ती हातात फरशी कुऱ्हाडीचा दांडा घुमवत होती.

छपराकडं जाणारी वाट ओढ्याच्या समांतरच जात होती.वस्ती समोर दिसायला लागली तशी काशीबाईच्या पायाची गती वाढली. कपाळ घामाघूम झालेलं.घशाला कोरड पडली. करकचून आवळलेल्या कासोट्यामुळं साडी पायात येत नव्हती.खांद्यावरनं घट्ट ओढून घेतलेला पदर कमरंला खोचलेला.त्यावर कमरपट्ट्याच्या घुंगरांचा आवाज शांत वातावरणात कानाला सुखावत होता.

कंदिलाची काच थोडीशी काळवंडली.


काशीबाईला समोरच्या घळणीतनं काहीतरी वर येताना दिसलं.अंधाराला चिरत तिची नजर एका ठिकाणी खिळली.क्षणार्धात तिच्या ध्यानात आलं की,समोरनं येणारं कमरंएवढ्या उंचीचं जनावर वाघच आहे.आता पळून जाणं शक्य नव्हतं. काशीबाईनं हातातला कंदील फरशी कुऱ्हाडीत अडकवून वाघाच्या दिशेनं केला.

आगीला घाबरून वाघ जेवढा वेळ लांब राहील,तेवढ्यात जितकं अंतर कापता येईल तितकं पुढं जायचं तिनं ठरवलं.काही अंतर जाईपर्यंत वाघ कंदिलापासून लांब राहिला;पण पाठलाग सुरूच होता.एका बांधावर चढताना काशीचा पाय ठेचकाळला.कंदील जमिनीवर आपटून भडका झाला तसा वाघ जरा मागं सरकला.काशीनं पटकन् कुऱ्हाडकंदिलापासून बाजूला काढली. जिभळ्या चाटत तिच्या दिशेनं येणाऱ्या वाघाला आता तिनं सामोरं जायचं ठरवलं.दोन्ही हातांनी कुऱ्हाड धरून पावित्रा घेतला.बांधावरनं चालत येणाऱ्या वाघानं काशीजवळ येताच गती बदलली.झेप घेऊन वाघ जर अंगावर आला,

तर कुऱ्हाडीचा वार करून आवरणं कठीण होतं. काशीसावध उभा राहिली.जवळ आलेल्या वाघानं झडप घातली,तशी काशीनं कुऱ्हाड त्याच्या जबड्यात घालून मागचा दांडा जमिनीवर टेकला.कुऱ्हाड वाघाच्या घशात घुसली.कुऱ्हाडीला धडकलेला वाघ झेंडा लटकावा तसा या बाजूनं त्या बाजूला गेला.जाताना त्याचं मागचं पाय काशीबाईच्या दंडाला ओरखडून गेलं.बेभान झालेल्या काशीला त्याची फिकीर नव्हती.तिनं खसकन् कुऱ्हाड मागं ओढली. त्यासरशी घशात गेलेली फरशी वाघाच्या जिभंवरून मार्ग आली.त्याचा जबडा रक्तबंबाळ झाला.

जखमी झाला तरी तो वाघ होता.त्यानं जबडा झटकून गुरगुरत परत उडी घेतली. यावेळी अंतर कमी होतं.

काशीनं फरशी वाघाच्या पुढच्या दोन्ही पायांच्या मधे रुतवून परत जमिनीवर कुऱ्हाडीचा दांडा टेकवून पायानं दाबून धरला.वाघ झोक्यानं पलीकडं पडला.यावेळी खाली बसलेल्याकाशीबाईच्या पाठीचा लचका वाघाच्या नखानं ओरबडला.वाघाच्या छातीत घुसलेली कुऱ्हाड हिसडा देऊन काशीनं मागं घेतली.खोलवर घुसलेली कुऱ्हाड बाहेर खेचताना बरीच ताकत लागली.रक्तानं माखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्यावरचं थेंब गळायला लागलं. धडपडत उठणारा वाघ नीट उभा व्हायच्या आत काशीनं बाजूला येऊन वाघाचा मागचा पाय आणि पोट यांच्या मधे वार करून एक पायनिकामी केला.वाघाच्या मागून पलीकडं उडी मारून काशीनं तसाच पलीकडल्या बाजूनं मागचा पाय निकामी केला.सांध्यात पाय निकामी झाल्यानं वाघाची गती कमी झाली तरी ताकत कमी नव्हती.पुढच्या दोन्ही पायांच्या जोरावर त्यानं झडप घातली.यावेळी ढेपाळलेल्या वाघावर पतीच्या संरक्षणासाठी हातात कुऱ्हाड घेऊन एकटीनं आलेल्या या वाघिणीनं हल्ला केला.काशीनं मागं सरकून सरळ वाघाच्या गळ्यावर कुऱ्हाड घातली.ताकदवान वाघ कुऱ्हाडीसकट काशीबाईच्या अंगावर कोसळला. वाघाचं रक्तबंबाळ घड बाजूला सारून उठताना दमलेल्या काशीबाईच्या दोन्ही हातांना वाघानं खरवडलं.वाघाच्या नख्यांनी तिचं झंपर पदराची चाळण झाली.सारं अंग सोलकटून निघालं. रागाच्या भरात तिनं वाघाच्या गळ्यावर कुऱ्हाडीचं दोन-तीन घाव घातलं.मागं सरणाऱ्या काशीला जाणवलं की आता वाघ उठणार नाही आणि उठला तरी आपल्याला गाठणार नाही.हातातला कुऱ्हाडीचा दांडा ओढतच तिनं वस्तीकडं धाव घेतली.वस्ती हाकंच्या अंतरावर आल्या

बरोबर तिनं अंगात असल नसल तेवढा जोर लावून 'धनी...' म्हणून हाक दिली. 


कारभारणीच्या आवाजानं खडबडून उठलेला नामू धनगर छपराची फेसाटी फेकूनच बाहेर आला.बांधावरनं धडपडत येणाऱ्या काशीकडे धावत सुटला.रक्तानं माखलेल्या कारभारणीच्या हातात कुऱ्हाड बघून धावत जाऊन तिला त्यानं मिठीत घेतलं.घाम आणि रक्तानं न्हालेली काशीबाई नवऱ्याच्या मिठीत कोसळली. काशीच्या हातावर,पाठीवर वाघाच्या नखांचे ओरखडे बघून नामू भांबावला.झटक्यात त्यानं काशीला खांद्यावर घेतलं आणि गावाकडं पळत सुटला.काडतुसं घेऊन आलेला शंकर नामूच्या दारात बंदूक घेऊन उभा होता.माणसांची जुळवाजुळव सुरू होती.इतक्यात एवढ्या अंधारात नामू मालकिणीला खांद्यावरून घेऊन येताना दिसला तसा आश्चर्यानं सगळ्यांचंच डोळं मोठं झालं.कुणाला काहीच सुचत नव्हतं. चेहऱ्यावर केवळ प्रश्न,प्रश्न आणि प्रश्न..'मघाशी तर काशी घरात हुती आणि शेताकडं कवा गेली. आमी हितंच हाय नव्हं.' नामूच्या दारातल्या माणसांची हळू आवाजात कुजबूज वाढली. जखमी काशीच्या तोंडावर पाणी मारून दोन घोट घशात घालताच तिनं नवऱ्याच्या डोळ्यांत डोळं घालून बघितलं.एकट्या बायकोनं आपल्यासाठी वाघाचा सामना केला याचं कौतुक करताना नामू गलबलून गेला आणि मोठ्यानं ओरडला, "काशी,तू माझी वाघीण हाईस वाघीण..."


महत्वाची नोंद.:- दिनांक ०८.०९.२४ रोजी सुट्टी असल्याने आमचे लाडके मित्र गणितायन लॅबचे निर्माते डॉ.दिपक शेटे यांच्यासोबत कोल्हापूरला नवीन 'माणसांना' भेटण्यासाठी गेलो.आमचे मार्गदर्शक मित्र भरत बुटाले उपसंपादक लोकमत कोल्हापूर आवृत्ती यांना तर कडकडून भेटतोच.फार दिवस झाले (वाघीण हा कथासंग्रह प्रतिक पाटील जे मानवी मनाला,मानवी संवेदनेला आपल्या बहारदार लेखणीने साद घालतात.) देणार होते.तो मला मिळाला. 'स्वच्छंद'प्रकाशन कोल्हापूर,अतिशय आकर्षक,सुबक बांधणी व महत्वाचे म्हणजे अजिबात छपाई चुक नाही.मुखपृष्ठ श्रीरंग मोरे यांचे आहे.हा कथा संग्रह ७८पृष्ठांचा (११ कथा असणारा ) हाती पडल्यानंतर लगेच वाचून संपवला.मला फारच आवडला काय वाचावं,वाचायला कुठून सुरवात करावी.

अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वाघीण हे पूस्तक.सरळ साधं,सोप्पं पण सर्वोत्कृष्ट मानवतेला देणारं शेवटी जे साधं,सरळ,सोप्पं असतं तेच कठिण तत्त्वज्ञान असतं.याच पुस्तकातील कथा आपणास या ठिकाणी वाचावयास मिळतील.धन्यवाद