* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक रंजक गोष्ट / An interesting thing 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/९/२४

एक रंजक गोष्ट / An interesting thing 

या काळ्या-पांढऱ्या रंगसंगतीचा आणखी एक फायदा आहे.जर तापमान वाढलं तर पेंग्विन सूर्याच्या दिशेने पोट करून उभे राहतात.त्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि त्यांच्या शरीराचं तापमान फार वाढत नाही.जर तापमान कमी असेल तर पेंग्विन सूर्याकडे पाठ करून उभे राहतात,त्यामुळे उपलब्ध उष्णता शोषली जाते. पेंग्विन बराच काळ पाण्यात घालवतात.त्यांचं मानेखालचं शरीर पाण्यात असतं,

त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या मानेवरच्या भागात अनेक प्रकारचे पिसारे आणि रंग निर्माण झालेले आढळतात.बहुतेक पेंग्विन जातींचं वर्गीकरण त्यांच्या शरीराची ठेवण आणि डोक्यांमध्ये असलेली बाह्यवैशिष्ट्यं यांच्या साहाय्याने केलं जातं.


डायेन तिला दिसलेल्या पेंग्विनांबद्दल लिहिताना अंटार्क्टिकावर आढळणाऱ्या आणि उत्तरेकडे अगदी विषुववृत्तापर्यंत आढळणाऱ्या वेगवेगळ्या पेंग्विन जाती प्रथमदर्शनी कशा वाटल्या याचं सरस वर्णन करते.ते वाचताना आपल्याला कंटाळा येत नाही.या प्रेमळ पक्ष्यांच्या शत्रूचीही ती आपल्याला माहिती देते.पेंग्विनांच्या पिल्लांचे प्रमुख शत्रू म्हणजे स्कुआ.तपकिरी,विटकरी रंगाच्या या भल्या मोठ्या पक्ष्यांचं लक्ष कोवळ्या पेंग्विनांवर असतं.ज्या प्राण्यावर हल्ला करायचा त्याच्या डोक्याच्या दिशेने प्रथम स्कुआ सूर मारतात.ते अतिशय चतुराईने आणि तितक्याच चपळाईने भक्ष्य निवडतात.

काही शास्त्रज्ञांच्या मते स्कुआ एखाद्या पेंग्विन वसाहती

तील आपापला हिस्सा ठरवून वाटून घेतात.यामुळे एखाद्या पेंग्विन वसाहतीमध्ये किती पेंग्विन आहेत हे ठरवायचं असेल तेव्हा त्या भागातील स्कुआंची संख्या मोजायची आणि तिला दोन हजारांनी गुणायचं,की त्या वसाहतीमधील पेंग्विनांची संख्या आपोआप कळते.


'द मून बाय द व्हेल लाइट...' या पुस्तकात येणारे प्राणी,त्यांचे रहिवास याबद्दल जनसामान्यांना क्वचितच माहिती असते.यामुळे अनेकदा डायेनला वाचकांच्या विक्षिप्त प्रश्नांना तोंड द्यावं लागतं.तिने वटवाघुळं,सुसरी,

देवमासे,पेंग्विन्स अशा आगळ्यावेगळ्या प्राण्यांबद्दल लिहायचं का ठरवलं याचं कारण सांगताना ती म्हणते-


या प्राण्यांच्या जगण्याचं निरीक्षण करताना साहजिकच आपल्या जगण्याशी त्याची तुलना होते.कायमस्वरूपी नाहीसे होण्याची शक्यता असलेल्या एखाद्या प्राणिजातीचा अभ्यास करणाऱ्यांची धडपड आणि तगमग यावरून मानव आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांबद्दलही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.'


डायेन स्वतःला निसर्गलेखक म्हणवून घ्यायला उत्सुक नसते.कारण त्यातून माणूस निसर्गापासून वेगळा आहे,असा अर्थ ध्वनित होतो,असं तिला वाटतं.तिला ते मंजूर नाही.आपण निसर्गापासून वेगळं होऊन त्रयस्थपणे निसर्गाचं निरीक्षण करूच शकत नाही,असं ती म्हणते,प्रत्यक्ष कुठल्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी ती मोहीम आपण का हाती घेतोय याची डायेनला कल्पना असायची. मोहिमेदरम्यान आपण कोणती निरीक्षणं करायची हेही तिने ठरवलेलं असायचं.

पण प्रत्येकवेळी तिला काही ना काही अनपेक्षित अनुभव येत.मात्र अशा अनुभवांमुळेच आपलं आयुष्य अधिक संपन्न झालंय,असं तिला वाटतं. ती म्हणते 'प्रत्येक मोहिमेवर आधारित लेखन पूर्ण केल्यावर त्या लेखनातून काही तरी सुटलेलं आहे असं मला नेहमीच वाटत आलंय. मोहिमेतली बरीच गंमत,ताणतणाव,गोंधळ आणि मोहिमेवर जायलाच हवं असा माझा हट्टाग्रह,या गोष्टी पूर्णत्वाने या लिखाणात उतरलेल्या नाहीत असं माझ्या लक्षात येतं... बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मुद्दाम साहसी संकटं शोधत असते.मी सुसरीच्या पाठीवर बसते,देवमाशांच्या अगदी जवळ पोहत जाऊन त्याच्या तोंडात डोकावते;लक्षावधी वाघुळांच्या मधोमध उभी राहते; त्यामुळे बऱ्याचदा मी खूप घाबरलेही होते.पण तरीही जेव्हा 'व्हाय द हेल डू यू गेट इन दु सिच्युएशन्स लाइक दीज?' हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं,की असे भीतीचे क्षण झटकन निघून जातात.मी जेव्हा जेव्हा अभ्यासासाठी विजनवासात जाते तेव्हा तेव्हा त्या विषयांतले तज्ज्ञ माझ्याबरोबर असतात.ते प्राणी धोकादायक केव्हा बनू शकतात याची त्यांना माहिती असतेच.'कष्टप्रद जीवन भोगणं,हे मात्र या प्रकारच्या जगण्याचं एक वारंवार ओढवणारं सत्य आहे. मर्लिन टटल आणि त्याच्या सहाध्यायांबरोबर डायेन एकदा टेक्सासच्या वाळवंटात गेली.त्या मोहिमेदरम्यान त्यांना दिवसभरात जेमतेम दोन तास झोपायला मिळत होतं.दिवसाउजेडी सर्वजण वाघुळं कुठे येऊ शकतील अशा जागा शोधत हिंडायचे.अशी एखादी जागा दिसली की त्या जागी जाळी लावायचे.रात्री ही जाळी तपासणं आणि वाघुळांचं छायाचित्रण करणं ही कामं असायची.

वाघुळांवर कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा उजेड पडला की दचकून उडालेली वाघुळं 'विधी' करत.त्या मोहिमेतला रात्रीतला एक फोटो डायेनने मोठा करून स्वतःच्या खोलीत लावलाय.तो बघितला की त्या रात्रीचा तो प्रसंग,तो वास आणि सकाळी केलेली अंघोळ आठवून मला नेहमीच हसू येतं.'असं ती म्हणते..


एकदा सुसरींच्या अभ्यासाच्या वेळी एक सुसर हाताळताना डायेन चांगलीच सडकून निघाली होती.

सुसरीच्या पाठीवरून उठताना ज्या चपळाईने दूर व्हायला हवं होतं तेवढी चपळाई ती दाखवू शकली नाही;त्या सुसरीने झटकन आपलं मुस्काड वळवलं,ते डायेनच्या नडगीवर आपटलं.सुसरींची डोकी चांगलीच टणक असतात,आणि ती अशा त-हेने चिडून हलवली जातात तेव्हा त्यामागे सुसरीची सगळी ताकद एकवटलेली असते. 'एखादी हाडांनी बनवलेली बेसबॉलची बॅट माझ्या नडगीवर कुणीतरी मारावी तसं मला त्या वेळी वाटलं;

नडगी काळीनिळी पडून सुजली होती.सुदैवाने कुठलंही हाड मोडलेलं नव्हतं.या किरकोळ अपघाताच्या मोबदल्यात मला सुसरीच्या नाकाडाला, डोळ्यांना,

मानेवरच्या वळ्यांना,शरीरावरील खवल्यांना स्पर्श करता आला होता.तिच्या मागच्या पायाच्या नख्या चाचपून बघता आल्या होत्या.हे सगळं इतर कुणाला करता येतं ?' डायेन त्या प्रसंगाबद्दल म्हणते.


नंतर एकदा जपानमध्ये ती कुरवांची (अल्बॅट्रॉस) एक अगदी दुर्मिळ प्रजाती वास्तव्यास आल्याचं कळल्यामुळे तिथे जाऊन पोहोचली.पण त्या वेळी तिच्या तीन बरगड्या मोडल्या होत्या. वैद्यकीय पाहणी आणि उपचारांनंतर तिला काम पुढे चालू ठेवायला हरकत नाही,असं सांगण्यात आलं तेव्हा तिला खूप आनंद झाला.पण तिला असह्य वेदना होत होत्या.थांबून श्वास घेणं, बसणं,आडवं होणं सगळंच अतिशय त्रासदायक झालं होतं.बरं,कुरव निरीक्षण करण्यासाठी छोट्या,हलत्या पडावावरून सागरात फिरणं तर अनिवार्य होतं.एकदा पडावाने किनारा सोडला, तेव्हा तिला विश्रांती मिळावी म्हणून पडावावरील कर्मचाऱ्यांनी तिला बंकबेडच्या खालच्या फळीवर झोपवलं.हलणाऱ्या गलबतामुळे तिला झोप लागली.

काही तासांनी जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं,की तिथून उठणंच काय पण कूस बदलणंही अशक्य झालं होतं.तिचे स्नायू अतिश्रमांनी सुजले होते.ओरडायचं तर दीर्घ श्वास घ्यायला हवा.ती तर तिच्या दृष्टीने असंभाव्य गोष्ट होती.सुमारे दोन- अडीच तास तिची धडपड चालू होती.तिच्या समोरच्या तशाच एका बेडवर झोपलेला जपानी सहप्रवासी जागा झाला. त्याला खाणाखुणा करून डायेनने 'मला या बेडमधून बाहेर काढ' असं सांगायचा प्रयत्न केला.बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.त्याने शक्य तितक्या हळुवारपणे डायेनला तिच्या बंक बेडमधून बाहेर खेचलं.'त्या वेळी झालेल्या मरणप्राय वेदना मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.'असं डायेन म्हणते.


अशा अपघातांवेळी आपल्यामुळे इतरांच्या कामात व्यत्यय येतो,या अपराधीपणाच्या भावनेने त्या काळात डायेनला पछाडलं होतं. त्याच वेळी अगदी अपरिचित व्यक्तींच्या कनवाळूपणाचाही तिला अनुभव येत होता.या प्रकारच्या शोधमोहिमांमधील धोके,अनिश्चितता, शारीरिक त्रास,वेदना आणि शारीरिक कष्ट यांची हळूहळू आपल्याला सवय होते,असं ती सांगते. प्राण्यांबरोबरच माणसांकडून होणाऱ्या दगाफटक्यांचा उल्लेख करायलाही ती विसरत नाही.तिच्या या अनुभवकथनातून आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच अद्भुत गोष्टी,वैज्ञानिक माहितीही आपल्याला मिळत राहते. 


वाघुळांबाबत ती सांगते- 'जेव्हा एखाद्या वाघुळाच्या तोंडात भक्ष्य किंवा खाद्य असतं तेव्हा त्यांना प्रतिध्वनी ग्रहण करायलाही त्रास होतो आणि ध्वनिलहरी प्रक्षेपणातही अडचण होते.या अडचणींवर मात करण्यासाठी काही वाघुळांच्या कानावर किंवा चेहऱ्यावर उत्क्रांतीत सोनार यंत्रणा तयार झालेली आहे.सोनार म्हणजे साउंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग, ध्वनिलहरींचा वापर करून फिरणं आणि भक्ष्याचा तसंच अडथळ्यांचा अंदाज घेणं.बऱ्याच प्रजातींच्या वाघुळांचे चेहरे सोनार यंत्रणा बनलेले असतात. त्यांच्या नाकावर टोकदार उंचवटे असतात.ही सर्व निसर्गाची योजना असते.मात्र हे तंत्र अगदी निर्दोष नसतं.त्यामुळेच काही वेळा काटेरी तारांच्या कुंपणामध्ये वाघुळं अडकलेली आढळतात.महामार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर वाघुळं आपटून जखमी होतात.' सुसरीं बद्दलही पुस्तकात बरीच माहिती समजते.सुसरींच्या रक्तातील तांबड्या पेशी आकारामानाने बऱ्याच मोठ्या असतात.त्यांचा उपयोग मानवी सांधेदुखीच्या आर्थायटिस या आजाराच्या निदानासाठी उपयोग होतो.सुसरींच्या जबड्याच्या निर्मितीचा गर्भावस्थे

पासूनचा अभ्यास करताना जे तंत्र वापरलं गेलंत्याच तंत्राचा वापर मानवी टाळू आणि फाटके ओठ गर्भावस्थेतच दुरुस्त करण्यासाठी करता येऊ शकेल हे वैद्यकशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं.


देवमाशांच्या बाबतीतही अशीच वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला समजते.दक्षिण ध्रुवीय प्रदेशातले देवमासे दक्षिण अमेरिका खंडाच्या किनाऱ्याने उत्तरेकडे स्थलांतर करतात. या स्थलांतराचा डायेनने अभ्यास केला. देवमाशांच्या माद्या आपल्या नवजात पिल्लांसोबत उत्तरेकडच्या प्रवासाला निघतात. या प्रवासादरम्यान एक अद्भुत गोष्ट पाहायला मिळते.या माद्या एका ओळीत प्रवास करत असतात,तरीही त्या परस्परांशी अजिबात कुठल्याही प्रकारचा संपर्क साधत नाहीत. आपल्या आगेमागे असलेल्या माद्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा ठावठिकाणा त्यांना माहीत असतो,तरीही त्या एकमेकींना टाळत असतात. काही वेळा एखादी मादी दुसऱ्या मादीच्या जवळ जाते आणि त्या दोघी समांतर पोहू लागतात; पण ज्या क्षणी त्यांची बछडी एकमेकांशी खेळू लागतात,त्या क्षणी माद्या त्या पिल्लांचा परस्परसंबंध रोखायचा प्रयत्न करतात.या माद्या असं का वागतात ? कारण या काळात त्या माद्या उपाशी असतात.त्यांच्या अन्नाच्या स्रोतापासून त्या साधारणपणे पंधराशे ते बत्तीसशे कि.मी. दूर आलेल्या असतात.त्यांच्या विण्याच्या काळात त्यांची उपासमार झालेली असते.पिलू जन्माल्या आल्यापासून या माद्या त्याचं पोषण दूध पाजून करत असतात.त्यामुळे पिलांनी एकमेकांशी खेळून फालतू वेळ घालवणं त्यांना परवडणारं नसतं.त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या खाद्यकुरणाकडे जाऊन परत पूर्ववत व्हायचं असतं.डायेन हे सगळं इतक्या सहजतेने आणि रंजकपणे सांगते की वाचताना आपण जगाचं भान विसरून जातो.त्याचबरोबर ती त्या त्या मोहिमेतल्या तिच्याबरोबर असणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखाही आपल्यासमोर उभ्या करते.खरं तर ती विज्ञान प्रशिक्षित नाही.ती पत्रकार आहे,तीसुद्धा न्यूयॉर्करसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकाची.तेव्हा ती गावगन्ना न हिंडता आरामात शहरातल्या घडामोडींबद्दल लिहू शकली असती.त्याऐवजी तिने निसर्ग पत्रकारितेची अनवट वाट पकडली आणि काही वेगळ्याच विषयांवरची पुस्तकं लिहिली.ती वाचून मला जो वैयक्तिकरीत्या आनंद मिळाला त्यासाठी धन्यवाद देण्याचा हा एक प्रयत्न.


तुमची मालकी कितीही कमी असली किंवा तुमचा पैसा कितीही कमी असला,तरी वन्यजीव आणि निसर्गावर प्रेम केल्याने तुम्ही खूप श्रीमंत व्हाल.

- पॉल ऑक्स्टन