* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/६/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

२८.०५.२५ या लेखातील पुढील शेवटचा भाग


निहोंगीत याबद्दल काय म्हटले आहे?


जग निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळे देश जे वाहत जात होते त्यांची तुलना फक्त पाण्यात पोहणाऱ्या माशांशीच होऊ शकते.निहोंगीमध्ये दिलेली सर्वच माहिती तंतोतंत बरोबर आहे. अचूक आहे.मग ज्यांनी प्रथम मानव निर्माण केला त्या स्वर्गात निर्माण झालेल्या 'देवांनी' (अंतराळवीरांनी) त्यांना हे ज्ञान दिले होते असे म्हटले तर संशयास्पद का ठरावे?


सर्व धर्मग्रंथांत या नवीन घटनांचा वृत्तांत सांगताना होणारी गडबड अगदी साहजिकच आहे.कोणत्याही नवीन गोष्टींना नावे द्यायची म्हटले की विसाव्या शतकातील आपण 'हुशार' माणसेही एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकलेलो नाही.


चाळीस वर्षांपूर्वी मानवाने आकाशात उडणारी एक वस्तू पाहिली.कशी दिसत होती?कपबशी मधल्या बशीसारखी ! बरोबर !उडती बशी !उडती तबकडी !


जग जर अणुयुद्धात नष्ट झाले तर विसाव्या शतकातल्या आख्यायिकेचे संशोधन करण्याची पाळी चाळिसाव्या शतकातल्या संशोधकांवर येईल.


या उडत्या तबकड्यांबद्दल त्यांना किती तरी ठिकाणी उल्लेख सापडेल.आख्यायिकांप्रमाणे आकाशातून उडणाऱ्या,रंग बदलणाऱ्या,प्रचंड वेगात कशाही तऱ्हेने दिशा बदलणाऱ्या वस्तुंची माहिती त्यांना मिळेल पण त्यांना काही समजू शकेल असे वाटत नाही.तबकडी फेकणाऱ्या एखाद्या खेळाडूचा ब्रॉन्झचा पुतळा त्यांना मिळाला तर उडत्या तबकड्या हा एक वेगळा खेळच होता,असे जर त्यांना वाटले तर त्यात नवल काहीच नाही.


आल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला (Theroy of Relativity) आणि त्यामुळे पुराणकाळातील काही अफलातून गोष्टींचा अर्थही या शतकात लागला आहे.


जपानची अत्यंत जुनी अशी ही आख्यायिका !


हेकि प्रांतात जोसा जिल्ह्यातील त्सुत्सुकाहा या सागर किनाऱ्यावरील एका खेड्यात एक तरूण राहत असे. अत्यंत देखणा.त्याला लोकांनी नाव ठेवले होते 'आयलंड चाईल्ड.' एक दिवस मासेमारीसाठी तो एकटाच समुद्रात गेला.त्याला त्या दिवशी काहीच मासे मिळेनात आणि कंटाळत असतानाच त्याला डुलकी लागली.डोळे उघडतो तो एकाएकी त्याला नावेत शेजारीच एक अत्यंत सुंदर तरुणी बसलेली दिसली.तो तिला म्हणाला. 'माणसांची घरे तर फार दूर किनाऱ्यावर राहिली आहेत.

समुद्रावरही काही दिसत नाही.तूआहेस तरी कोण आणि अचानक इथे आलीसच कशी?' ती तरुणी उत्तरली

'मी आकाशातूनच आले.' 'म्हणजे कुठून? स्वर्गातून ?'

'तू मनातला संशय काढून टाक.माझ्याबरोबर प्रेमाने रहा.

अनंत काळपर्यंत आपण सुखाने राहू या.जरा तुझे डोळे मात्र क्षणभर मीट.'


थोड्याच वेळात ते एका सुरेख बेटावर पोहोचले.तो तिच्या आई-वडिलांना भेटला.त्यांनी त्याला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातला फरक समजावून सांगितला.त्यांचे लग्नही लावून दिले.त्यांनी तीन वर्षे अगदी सुखात काढली पण नंतर आपल्या घराच्या आठवणीने तो व्याकुळ झाला.त्याचे कशातच लक्ष लागेना.तो दुःखी बनला.शेवटी तिने त्याला सांगितले की,'तू क्षणभर डोळे मीट आणि मी तुला घरी पोहोचवते.'


थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तर तो गावात आला होता पण त्याला ते अनोळखी भासत होते.त्याला त्याचे घर सापडेना.त्याने एका खेडुताला आयलंड चाईल्डचे कुटुंब कुठे राहते म्हणून विचारले.खेडुताने तो कुठुन आला आहे याची चौकशी करून म्हटले,की तो फार जुनी गोष्ट विचारतो आहे म्हणून.जुन्या कथा सांगणाऱ्या वृद्ध माणसांकडून त्याने आयलंड चाईल्डची गोष्ट ऐकली आहे.अशा नावाचा एक तरूण त्या खेडेगावात राहत होता.एकदा तो मासेमारीला समुद्रावर म्हणून जो गेला तो परत आलाच नाही.त्या गोष्टीला आता तीनशे वर्षे होऊन गेली.हा तरूण अफाट वेगाने जाणाऱ्या अंतराळयानातून दुसऱ्या ग्रहावर गेला होता हेच खरे असणार.म्हणूनच काळातला हा फरक.तशी साधीच गोष्ट पण ही गोष्ट किती सत्य सांगून जाते हे नाकबूल करता येईल?


दक्षिण अमेरिकेतील ही आख्यायिका तर अजून अप्रकाशितच आहे.कार्ल ब्रजरने बरीच वर्षे दक्षिण अमेरिकेत पत्रकार म्हणून वास्तव्य केले होते.तो इतिहासकारही आहे.१९७२ मध्ये त्याची आणि तिथल्या भोंगुलाला जमातीच्या प्रमुखाची प्रथम गाठ पडली. तातुन्का नारा हे त्याचे नाव.दोघांच्या नंतर अनेक भेटी झाल्या आणि ते मित्रही बनले.नाराचा कार्लवर विश्वास बसला आणि जगाला एका आश्चर्यकारक कथेचा लाभ झाला.


भोंगुलाला जमात ही देवांनी त्यांची जमात मानली होती. त्यावेळेपासूनचा सर्व इतिहास त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवलेला आहे.तातुन्का नारा त्यांचा जो इतिहास सांगतो तो अगदी थक्क करणारा आणि विलक्षण आहे.


आमचा इतिहास देव पृथ्वीवरून निघून गेल्या क्षणापासून सुरू होतो.


भोंगुलाला जमातीचा त्यावेळचा राजपुत्र इना याने घडलेला सर्व इतिहास पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित लिहून ठेवण्याची आज्ञा दिली आणि आजपर्यंत आम्ही ती आज्ञा पाळत आलेलो आहोत.


त्यावेळी या खंडात फक्त आम्ही होतो.त्यावेळी माणसात आणि जनावरात तसा विशेष फरक नव्हताच.अंगावर वस्त्रे नाहीत,शेती करायची माहिती नाही,समाजव्यवस्था वगैरे काही प्रकारच अर्थात नाही.आणि मग एक दिवस देव उतरले.ही घटना अगदी नक्की कधी घडली माहीत नाही पण साधारण १५००० वर्षापूर्वी घडली.अचानक अंतराळात उडती जहाजे दिसायला लागली.त्या जहाजातून प्रखर प्रकाशझोत बाहेर पडत होते.धरणी हादरत होती. गडगडाटाचा आवाज टेकड्यांपलिकडेही घुमत होता.ही दैदिप्यमान जहाजे उतरली आणि त्यातून पृथ्वीचा ताबा घेण्यासाठी आलेले देव उतरले.ते विश्वातल्या ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणाचे नाव होते श्वेरता !आमचे धर्मगुरू म्हणतात की,खरे म्हणजे त्यांचे साम्राज्य अनेक ग्रहांवर पसरलेले होते. त्यांना तारे कसे फिरतात माहीत होते.निसर्गाचे नियम माहिती होते.त्यांचे ज्ञान इतर जगांना देण्यासाठी ते आले होते.अकाकुर या किल्ल्यावरून देव राज्य करीत. त्यांची प्रथम १३० कुटुंबे पृथ्वीवर आली होती.त्यांची आकाशातून उडणारी जहाजे पक्ष्यांहून जास्ती वेगाने जात असत.रात्र असो किंवा दिवस असो शिडांशिवाय, सुकाणुंशिवाय उडत असत,परत येत असत.त्यांच्याकडे एका तऱ्हेच्या धातूचे दगड होते.जगात कुठेही,काहीही घडले तरी त्या दगडात स्वच्छ दिसत असे.त्यांनी जमिनीखाली राहण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती.


परत जाण्याच्या दिवशी त्यांनी इनाला बोलावून सांगितले की,त्यांचे इथले काम झाले आहे.त्यांना आता निघून जायला पाहिजे.पण तुम्ही कधी संकटात सापडलात तर आम्ही नक्की परत येऊ.आता एक महाभयंकर संकट कोसळणार आहे.त्यातून निभाव लागण्यासाठी तू तुझ्या लोकांना घेऊन जमिनीखाली, आम्ही बनवलेल्या घरात रहायला जा.प्रचंड गडगडाट करीत आणि अग्निवर्षाव करीत देवांची जहाजे अंतराळात नाहीशी होईपर्यंत इना एकटाच उभा होता. ही घटना साधारण १२००० वर्षांपूर्वीची आहे.आता आमच्या हृदयातच फक्त देवांच्या प्रतिमा होत्या. डोळे पाण्याने भरून येत असताना आम्ही पुनःपुन्हा आकाशाकडे पाहत होतो पण ती सोनेरी जहाजे परत आली नाहीत.


तातुन्का नारा या ठिकाणी जगावर कोसळलेल्या दोन आपत्तींचे वर्णन करतो की,ज्यात सर्व मानव जमातच नष्ट होणार होती.


मग बारा वर्षांनी पुन्हा महापूर आला.पृथ्वीवर काय घडत आहे याचा उमज पडत नव्हता.सगळीकडे थंडीच थंडी,नाहीतर भयंकर उष्णता.भीतीने माणसे आणि जनावरे सैरावैरा पळत होती.

झाडांवर चढावे तर झाडेच उन्मळून लांबवर पडत होती.फेकली जात होती.गुहेत लपायला पाहावे तर त्या कोसळून पडत होत्या.वरचे सर्व खाली जात होते,खालचे सर्व वर येत होते.


पण तरीही या आपत्तींतून आणि दुसऱ्याही भीषण संकटांतून भोंगुलाला जमातीचे थोडे जण बचावलेच.आणि एके दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा सोनेरी जहाजांनी आकाश व्यापून टाकले.देव परत आले होते. आम्हाला खूप आनंद होत होता पण देवांच्या स्वागताला आता थोडेसेच लोक शिल्लक राहिले होते.शआमच्या जमातीचा खूपच नाश झाला होता.


अकाकुर येथे एका मंदिराखाली जमिनीवर चालणारे, पाण्यावर चालणारे,टेकड्यासुद्धा चढणारे देवांचे एक वाहन आणि अंतराळात उडणारे दुसरे एक वाहन आम्ही अगदी जपून ठेवून दिले आहे.उडणारे वाहन कोणत्या धातूचे आहे हे माहीत नाही पण ते सोनेरी आहे.दोन माणसे एकावर एक उभी राहतील एवढी त्यांची लांबी-रुंदी आहे.त्यात दोन माणसांना बसायची सोय आहे.त्याला शीड नाही,सुकाणू नाही पण आमचे धर्मगुरू म्हणतात,

त्यात ल्हासा (?) बसला तर गरुडापेक्षा जास्ती वेगाने जाईल आणि ढगांमध्ये तरंगेल. ह्या वाहनाचा मुख्य भाग चांदीच्या वाटीसारखा आहे.ते वाहन अगदी रहस्यमय आहे.त्याला सात पाय आहेत. तीन पुढल्या बाजूला आणि चार मागच्या बाजूला.'


हे असे सर्व संभाषण कार्ल ब्रजरने टेप करून घेतले आहे.

भोंगुलाला जमातीच्या १५००० वर्षांच्या इतिहासात काय नाही?त्यांना त्यांच्या देवांनी सर्व गोष्टींची नावे शिकवली,भाषा शिकवली,

लिपी शिकवली,शेतीभाती करायला शिकवली,नियम घालून दिले,की जे आजही पाळले जातात.तातुन्का नाराचा वृत्तांत आश्चर्याने थक्क करतो.म्हणून तो अशक्य ?


१८ ऑक्टोबर १९७६ रोजी मेक्सिको शहरातील एका वृत्तपत्र संस्थेने बातमी दिली की,एका अज्ञात अशा प्राण्याचा सापळा मिळाला आहे.हा प्राणी पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता.या प्राण्याचा जन्म परग्रहावरच झाला असावा.त्याला पाठीचा मणका, खांद्याची हाडे आहेत,हातांची सुरुवात दिसते. कुत्र्यासारखे डोके,अगदी लहान डोळे आणि मोठे नाक येईल अशी घडण आहे.


हे वाचल्यावर तातुन्का नारा याने सांगितलेली आणखी एक गोष्ट आठवते.


खोलीच्या चारही भिंतीतून रहस्यमय प्रकाश येत होता. मध्यभागी पारदर्शक दगडी पेट्यात चार गूढ प्राणी दिसले.तीन पुरूष आणि एक स्त्री! त्यांच्या छातीपर्यंत कुठला तरी द्राव होता.ते अगदी आपल्यासारखेच होते पण त्यांच्या हाता-पायांना सहा सहा बोटे होती.ते झोपलेले देवच भासत होते.


पृथ्वीच्या पोटातून मेक्सिकोमध्ये असेच काही बाहेर आले होते का? आख्यायिकांप्रमाणे काही जुन्या चालीरिती म्हणजे सुद्धा 'देवांच्या' स्मृतीच जागृत ठेवण्याचा प्रयत्न वाटतो.


ब्राझिलमधल्या कियापो जमातींच्या दंतकथांप्रमाणे शेकडो पिढ्यांपूर्वी त्यांच्या जवळच्या पर्वतावर धूर व ज्वाळा सोडत एक धरणीकंप झाला.सर्वजण त्यांच्या जवळच्या खेडेगावातच पळून गेले पण काही दिवसांनी काही तरूण योद्धयांनी धीर केला आणि ते पर्वताकडे निघाले.त्यावेळी तिथून एक अनोळखी इसम बाहेर आला.लाकडी दांडुके,विषारी बाण,तलवारी त्याच्यावर आपटूनच उडत.त्याच्यावर या सर्वांचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने उलट हसत राहूनच त्यांची टर उडवली.तो अनोळखी माणूस त्यांच्याबरोबर त्यांच्याच गावात रहायला आला.हळुहळू त्याचे अस्तित्व लोकांच्या अंगवळणी पडले.कियापोंची भाषा या अज्ञात माणसानेच त्यांना शिकवली आहे.शिकार कशी करावी, साधी आयुधेच पण ती कशी वापरावीत,शेती कशी करावी या गोष्टी शिकवण्यासाठी त्याने स्वतःच्याच घरी शाळा काढली होती.त्याचे नाव होते 'बेप कोरोरोटी' म्हणजे 'मी अंतराळातून आलो.'


आणि एक दिवस विचित्र दिसणारा चकचकीत पांढरा सूट त्याने अंगावर चढवला आणि तो त्यांना म्हणाला, 'त्याला बोलावणे आले आहे.त्याची इथे रहायची वेळ संपली आहे.आता त्याला परत जायला पाहिजे.इलाज नाही;पण कोणीही त्याच्यामागे यायचा प्रयत्न करू नये.' पण तरीही कुतुहलाने काही जण लपत छपत त्याच्या मागोमाग पर्वतापर्यंत गेले.तो त्या पर्वतावर गेला आणि पुन्हा एकदा त्यांनी पर्वतावर धूर व ज्वाळा पाहिल्या आणि भूमी हादरवून सोडणारा प्रचंड गडगडाटही ऐकला.अंतराळात झेप घेऊन बेप कोरोरोटी अदृश्य झाला.आजसुद्धा समारंभात कियापो लोक गवताचे सूट अंगावर चढवतात.फुगीर ओबडधोबड आकाराचे.कियापो लोकांशी पहिला संपर्क १९५२ मध्ये साधला गेला.युरी गागारिन यान १९६१ मध्ये अंतराळात पाऊल टाकले.

अवकाशयात्रिकांचे तऱ्हेचे सूट घालून समारंभात वावरत आहेत,

त्यांना एक अक्षर लिहिता-वाचता येत असेल तर शपथ.आज आपण अंतराळ प्रवासात करीत असलेल्या प्रगतीची त्यांना थोडीसुद्धा जाणीव नाही.बाहेरच्या जगात काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही.आपले अंतराळवीर कसा पोषाख करतात याची त्यांना माहिती नाही.पण अंतराळातून उतरलेल्या 'देवांची' स्मृती शेकडो वर्षे अंतराळवीरांसारखाच पण गवती सूट घालून जतन केली आहे हे तर सत्य आहे.


तिबेट ! कायमचाच,अगदी आजसुद्धा अत्यंत गूढ आणि रहस्यमय वाटणारा देश! तिबेटी लोकांचे दोन धर्मग्रंथ आहेत.किती मोठे असावेत? त्यांचे २२५ खंड होतात. लाकडी फळ्यांवर कोरलेले हे धार्मिक ग्रंथ इतकी प्रचंड जागा व्यापतात की,तिबेटमधल्या अनेक खेड्यांतील तळघरांमध्ये या फळ्या विभागून ठेवल्या आहेत.अत्यंत गुप्तपणे.हे ग्रंथ मुळी सर्वसामान्य लोकांसाठी नाहीतच. त्यातले ज्ञान सुद्धा 'गुप्त' ठेवण्यात आले आहे.तरीही त्या खंडांचा साधारण १/१०० वा भाग भाषांतरित केला गेला आहे.त्याच्यात २७ राजांची मूळ नावे दिली आहेत. त्यातले सात म्हणे शिडीवरून आकाशात चढून अदृश्य झाले. त्यांना प्रकाशाचे देव मानतात.आपले पृथ्वीवरील काम आटोपून ते परत गेले.जिथून आले होते तिथे परत गेले.


आख्यायिकेप्रमाणेच त्यांचा पद्मसंभव हा शिक्षक अंतराळातून आला.त्याने स्वतःबरोबर अनेक ग्रंथ आणले होते.पण ते कुणालाही न समजणाऱ्या भाषेत लिहिले होते.ज्या काळापर्यंत ती भाषा सर्वांना समजणार नाही,त्यावेळेपर्यंत जतन करून ठेवण्यासाठी ते ग्रंथ त्याने गुहांमध्ये लपवून ठेवले होते.इथे राहत असताना त्याने त्याचा आवडता शिष्य पागुर वैरकाना याला तो निघून गेल्यावर या पुस्तकांचे भाषांतर करायची परवानगी दिली होती.खरे सांगायचे तर आजही कित्येक तिबेटी पुस्तकांची नावे या गूढ भाषेत लिहिलेली आढळतात.ती नावे कुणालाच समजत नाहीत.आख्यायिका सत्यकथांवरच आधारित असतात या गोष्टीचा हा धडधडीत पुरावा आहे.


पद्मसंभवाचा आवडता शिष्य पागुर वैरकाना याने पद्मसंभव स्वर्गाला जायला निघतो त्याचे वर्णन केले आहे.आकाशात इन्द्रधनुष्य आणि एक ढग दिसत होता.पाहता पाहता तो ढग अगदी जवळ आला.देवांना भेटण्यासाठी पद्मसंभव चांदी-

सोन्यासारख्या लखलखणाऱ्या घोड्यावरून बसून निघाला हे सर्वांना दिसत होते.राजा आणि इतर सर्वजण बघत होते तोपर्यंत पद्मसंभव एखाद्या मोठ्या पक्ष्यासारखा दिसायला लागला.पुन्हा बघेतो तो एखाद्या छोट्या पक्ष्यासारखा वाटत होता.थोड्या वेळातच तो अगदी माशीएव्हढा लहान झाला आणि नंतर दिसेनासाच झाला.चांदी-सोन्याच्या घोड्यांवर बसून पद्मसंभव अंतराळात अदृश्य झाला होता.'


बहुतेक सर्व धर्मग्रंथांत आकाशातून देव पृथ्वीवर उतरताना होणाऱ्या गोष्टींची नोंद आहे.पण तिबेटी धर्मग्रंथ देव परत जाताना काय घडते याचे वर्णन करतात.


बायबलमधल्या अशा वर्णनांवर कोणीही अविश्वास दाखवणार नाही;पण तिबेटी धर्मग्रंथांत अशी वर्णने आली तर मग त्या दंतकथा,आख्यायिका का ठराव्यात ?


तिबेटी लोकांना त्यांचा अद्वितीय गुरू माहिती होता.तो त्यांच्यात राहिला होता.गुरुने त्यांच्याबरोबर वास्तव्यच केलेले होते.त्यांना अनेक गोष्टी शिकवलेल्या होत्या. त्यांच्याशी संभाषण केलेले होते.पद्मसंभव इतका हुशार होता की कुणालाही न येणारी एक भाषा त्याला अवगत होती;आणि एक दिवस सर्वांच्या देखत अंतराळात उडून तो नाहीसा झाला.त्याच्या घरी परत गेला.त्याला एकट्यालाच येणाऱ्या भाषेतील पुस्तके आजही तिबेटमध्ये अस्तित्वात आहेत.आजही ती भाषा कुणाला कळत नाही.तरी ही आख्यायिकाच म्हणणार? कोणता 'काल्पनिक' देव अशी पुस्तके देऊन गेला असता?


जगातल्या सर्व महाकाव्यात आख्यायिका आहेत, जगातील कानाकोपऱ्यात चितारलेल्या चित्रात आहेत, धार्मिक ग्रंथांत आहेत.


जग निर्मितीच्या जगभरच्या कथात कोणाच्याही लक्षात यावे इतके साम्य आहे.


निर्मितीला जबाबदार असलेले सर्व देव आकाशातूनच आले आणि त्यांचे काम झाल्यावर आकाशातच परत गेले.त्या सर्वांची वाहने चमकदार होती.दुसऱ्या सूर्याएवढी दैदिप्यमान दिसायची.ती उडताना पृथ्वीचासुद्धा थरकाप उडत असे,

मेघगर्जनेसारखा गडगडाट होत असे.याच देवांनी आपली पृथ्वी राहण्यालायक बनवली.त्यांनीच पृथ्वीवर वनस्पती जीवन,प्राणी जीवन निर्माण केले.


त्यांच्यासारखीच बुद्धिमान जमात देवांनीच प्रथम या जगात निर्माण केली,शेती करण्याचे ज्ञान दिले, स्वच्छतेचे,समाजसुधारणेचे पहिले नियम घालून दिले.देवांनी निघून जाण्यापूर्वी पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्यांच्यासारखे राजे निर्माण केले.आपापली कामे झाल्यावर देव जेव्हा परत गेले तेव्हा येण्याचे आश्वासन देऊनच परत गेले.अजूनही या सर्व आख्यायिका आहेत, दंतकथा आहेत,काल्पनिक,बनवून सांगितलेल्या गोष्टी आहेत असे म्हटले तर ते संपूर्णतःअव्यवहार्य ठरेल.


प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींच्या चक्षुर्वैसत्यम् हकिगती म्हणजेच या आख्यायिका !


परग्रहांवरील अंतराळवीरच मानवाच्या अज्ञात इतिहासातील आपल्या प्राचीन पूर्वजांनी पाहिले होते ही गोष्ट अगदी नक्की आहे.वादातीत आहे.

३०/५/२५

नीलाम्बरी मांडवी / Nilambari Mandvi

ह्या गोव्यातल्या.कर्नाटकातल्या.ओडिशातल्या अंदाधुंद खाण व्यवसायाचा परिपाक म्हणून भारत सरकारच्या खनिज मंत्रालयाने न्यायाधीश शाह ह्यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर खाणींबद्दल चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला.त्या आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे : गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही.त्यामुळे कशाचीही भीती नाही असे वातावरण निर्माण होऊन खाण चालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण,जीवसृष्टी, शेती,भूजल,ओढे,नद्या,तळी ह्यांचा विध्वंस चालला आहे.अशा अवैध व्यवहारातून किती पैसा गोळा केला गेला आहे? शाह आयोगाचा अंदाज आहे पस्तीस हजार कोटी रुपये.ह्या अहवालापोटी गेले पंधरा महिने इथल्या खाणी बंद आहेत.एवढा अवधी श्वास घ्यायला फुरसत मिळाल्याने निसर्गरम्य गोमंतक पुन्हा खुलतो आहे.गोवेकरांची लाडकी मांडवी आता रक्तांबरी नाही,नीलांबरी बनली आहे.तिच्यात लाललाल नाही निळेशार पाणी वाहायला लागले आहे.


पुन्हा जीव धरला आहे.खरोखरच केवढे परिवर्तन झाले आहे? लोक सांगतात त्याप्रमाणे नद्यांच्यात अनेक वर्षांनी खर्चाणी,

लेपसारखे मासे,खुबे, माड्यासारखे शंख-शिंपले,वाधी अथवा टायगर प्रॉन खरोखरच पुन्हा बागडू लागले आहेत का? समजावून घेऊ या,म्हणून मी नुकतीच मांडवी नदीत मच्छीमारांच्या होडीवर दिवसभराची सफर केली.


मच्छीमार सांगत होते - होय,खुदानातून,खनिज वाहतुकीतून नदी जी गढूळ,प्रदूषित होत होती ते थांबल्याने खूप जास्त मासे,झिंगे,

शंख-शिंपले भेटताहेत. पण नदीची अवदशा संपलेली नाही,कारण गेली अनेक दशके मत्स्योत्पादनात जी मोठी घट झाली होती. त्यामुळे अनेक मच्छीमार वाळू उपसण्याकडे वळले आहेत.ह्या उपशाने माशांच्या विणीवर मोठा दुष्परिणाम होऊन मत्स्योत्पादनाची जी हानी झाली आहे,ती सहजासहजी भरून निघणार नाही.वाटते की ही घसरगुंडी चालूच राहील आणि काही वर्षांनी वाळूही संपून सारे मच्छीमार पूर्णपणे बेकार होतील.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


आज पर्यावरण आणि विकास हा जो वाद चालू आहे, त्यात आजच्या धर्तीच्या विकासानेच रोजगार निर्माण होतील,आणि नवे रोजगार निर्माण करणे ही तर आपली फार निकडीची गरज आहे असे प्रतिपादन केले जाते. पण वास्तव काय आहे? गोव्यात खाणी बंद केल्या गेल्यावर हे आपोआपच उघडकीला आले.जो प्रचंड गैरव्यवहार झाला आहे त्याविरुद्ध काहीही कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी एकच ओरडा सुरू केला आहे: खाणबंदीमुळे गोव्यात पराकाष्ठेची बेकारी फैलावत आहे.निदान सव्वा लाख लोक बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत.तेव्हा खाणवाल्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातून नाही हो,तुमच्या आमच्याकडून वसूल केलेल्या कराच्या पैशातून,ह्या बेरोजगारांना भत्ता दिला पाहिजे. कित्येक महिन्यापूर्वी सरकारने अशी एक योजना जाहीर केली,अर्ज मागवले.किती अर्ज आले असतील ? पाचशेहूनही कमी ! सव्वा लाख कुठे आणि पाचशे कुठे ! कारण उघड आहे. 


एके काळी कुदळीने खनिज खणले जात होते.आज जेसीबीसारखी अगडबंब यांत्रिक फावड्यांनी सज्ज वाहने एका व्यक्तीच्या हजारोपट वेगाने खणताहेत. अर्थशास्त्राच्या परिभाषेत श्रमिकांची उत्पादनशक्ती झपाट्याने वाढते आहे.जसजसे हे स्वयंचलित यांत्रिकीकरण प्रगती करत आहे.तसतशी माणसांच्या शारीरिक,तसेच बौद्धिक श्रमाची आवश्यकता घटते आहे.सहाजिकच बेकारी भडकते आहे.हे युरोपात अमेरिकेतही दिसत आहे.जगभर भांडवलावर व तंत्रज्ञानावर पकड असलेले मूठभर लोक सत्ता गाजवू लागले आहेत.म्हणूनच अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर लोक घोषणा देत होते : अमेरिकेची नव्याण्णव टक्के सामान्य जनता आता एक टक्का धनदांडग्यांची दादागिरी सहन करणार नाही !


भारतात हेच चालू आहे.आपल्या आर्थिक विकासाची मंदगती जोवर तीन टक्के होती,तोवर संघटित क्षेत्रांतील रोजगार प्रतिवर्षी दोन टक्क्यांनी वाढत होते.पण तीच आठ टक्क्यांवर पोचल्यावर असे रोजगार केवळ एक टक्क्याने वाढताहेत.बहुतेक सारी भारतीय जनता असंघटित क्षेत्रांत तऱ्हेतऱ्हेच्या लटपटी करत कशी बशी गुजराण करते आहे.गोव्यात खाणींवर किती लोकांची उपजीविका अवलंबून आहे ह्याची काहीही नोंद नव्हती. मग जलप्रदूषणाने मच्छीमारीतील रोजगार किती प्रमाणात घटले आहेत,किंवा खाणींमुळे भूजलाची पातळी खाली जाऊन,हवेत धूळ पसरून,शेतीचे उत्पादन घटून रोजगारांवर किती दुष्परिणाम झाला आहे,ह्यांबद्दलची माहिती कशी उपलब्ध असणार? पक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी अशा आघातांमुळे बेकारी खूप वाढते आहे हे नक्की.


स्वयंचलनाच्या अविरत प्रगतीतून आधुनिक क्षेत्रांतील रोजगार घटत राहणे अटळ आहे.पण आजच्या झपाट्याने एकत्र येणाऱ्या जगात आधुनिकीकरण नकोच असे म्हणणे शुद्ध वेडगळपणा ठरेल.


तेव्हा आपल्याला औद्योगिकीकरण,जगातील इतर राष्ट्रांबरोबर देवाण-घेवाण जरूर हवीत.पण आधुनिकीकरणाचा पाठपुरावा करताना भारतातील बहूतांश लोक आपल्या उपजीविकेसाठी नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत,एवढेच नव्हे तर आधुनिक संघटित क्षेत्रात त्यांना पुरेसे रोजगार निर्माण होणे अशक्य आहे.हे वास्तव विसरता कामा नये.


पण हे दृष्टिआड करत आज एक भ्रामक मांडणी केली जाते की आधुनिकीकरणातून लोकांना भरपूर रोजगार मिळतील.तेव्हा ह्या प्रक्रियेत परंपरागत श्रमशक्तीला महत्त्व देणारे उपजीविकेचे मार्ग नष्ट झाल्यास काहीही काळजी करण्याचे कारण नाही.तेव्हा आज आवश्यकता आहे एका समन्वयाची,सहयोगाची.एका बाजूने आधुनिक संघटित उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासाची निश्चितच निकड आहे.पण हा विकास हिंसक असता कामा नये.तो सहयोगी असावा.जोडीलाच,तितक्याच अगत्याने नैसर्गिक संसाधनाधारित श्रमप्रधान उपजीविकांचे मार्ग सांभाळण्याची,आणि नुसते सांभाळण्याची नाही तर आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानांचा वापर करत विकसित करण्याचीही निकड आहे.


गोव्यात खाणींच्या गैरव्यवहारातून जो काळ्या पैशाचा पाऊस पडला आहे त्याची एक निष्पत्ती आहे गोव्यात झपाट्याने होत असणारी वसंतसेनेच्या वाड्यासारखी उधळपट्टीचे प्रदर्शन करणारी बांधकामे.ह्यातलेच एक आहे सुइदाद दे गोवा नावाचे तिमले ह्या खाणचालक कुटुंबाचे समुद्रकिनाऱ्यावरचे किनाऱ्यावरच्या बांधकामांबद्दलच्या कायद्याचा भंग करणारे हॉटेल.ह्या हॉटेलला,अनेक बेकायदेशीर खाणव्यवहारांना आव्हान दिले आहे नॉर्मा व क्लॉड अल्वारिस ह्यांच्या गोवा फौन्डेशनने,रमेश गावस निलेश गावकर ह्यांसारख्या कार्यकर्त्यांनी त्यातल्या निलेश गावकर ह्या कावरे गावच्या वेळिप समाजातल्या तरुण कार्यकर्त्यावर तर चक्क भर मडगावात गुंडानी हल्ला केला होता;कसाबसा बचावला. मृच्छकटिकातल्या जुलमी राजाला आव्हान देणाऱ्या तरुण गवळ्यासारखे,मुळशीच्या धरणाविरुद्ध टाटांना आव्हान देणाऱ्या सेनापती बापटांसारखे हे धडाडीचे कार्यकर्ते एक वेगळीच धुरा उचलून,बलदंडांना, सत्ताधीशांना त्यांच्या अन्याय्य वर्तणुकीबद्दल आव्हान देऊन,आपण कसे सामर्थ्यवान आहोत हे सिद्ध करतात व समाजात एक वेगळेच स्थान प्राप्त करून घेतात. मर्ढेकर म्हणतात असे दिसते की स्वार्थ,शोषण हाच जगाचा स्थायीभाव आहे.हेच शाश्वत आहे.


मग दुर्बलांवरचा अन्याय,निसर्गावरचे अत्याचार कधी आटोक्यात येतील का? पण मर्ढेकरांचा आशावाद दुर्दम्य आहे :अखेर घेता टक्कर जरि मग - युगायुगांचे फुटेल भाल - अशाश्वताच्या समशेरीवर शाश्वताचिही तुटेल ढाल । मर्ढेकर सांगतात,धीर धरा.मानवापाशी जी तकलादू वाटणारी सद्भावनेची तलवार आहे,ती एक दिवस भरभक्कम भासणाऱ्या दुष्टप्रवृत्तींच्या ढालीला भेदेल आणि मानवसमाज एक अर्थपूर्ण,माणुसकीचे, निसर्गाशी समरस जीवन जगायला शिकेल! मानवी समाज यथावकाश आजच्या हिंसक अर्थव्यवस्थेकडून एक सहयोगी अर्थव्यवस्थेकडे प्रगती करू शकेल.


हिंसेपासून सहयोगाकडे


आजही जगात अशी अमेरिकेहून वेगळी,अहिंसक, सहयोगी दिशा चोखाळणारे नॉर्वे,स्वीडनसारखे देश आहेत.त्यांचा अनुभव दाखवतो की सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी विषमता पोसणे आवश्यक तर नाहीच, पण हानिकारक आहे.इथे शासन लोककल्याणकारी कार्यक्रमांवर खर्च करते,आणि त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळच मिळत आहे.ह्या देशांत सरकार कमी खर्च करत असूनही जास्त चांगली आरोग्यसेवा उपलब्ध आहे.समाजात मोठ्या प्रमाणात सामंजस्य नांदते आहे.अर्थात आपला देश आज ह्यांच्याहून वेगळ्या परिस्थितीत आहे.पण आपल्याकडे काय दिशा सुयोग्य आहे ह्याचे स्वातंत्र्याच्या उषःकालीच महात्मा गांधींचे अर्थतज्ज्ञ सहकारी जे सी कुमारप्पा ह्यांनी केले होते.त्यांचा गांधींसारखा विज्ञान - तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता.परंतु,ते म्हणाले की भारतात भांडवलही मुबलक नाही,आणि लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधनेही तुटपुंजी आहेत.तेव्हा आपल्या विकासाचा भर आपली मुबलक मानवी संसाधने काळजीपूर्वक वापरण्यावर असावा.ह्यासाठी ह्या लोकांना विकासनीतीचा केन्द्रबिंदू बनवावे.त्यांचा आधार असलेली स्थानिक नैसर्गिक संसाधने कार्यक्षमतेने वापरत त्यांना समाधानकारक रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास हाच खरा अहिंसक आर्थिक विकास ठरेल.त्या दिशेने स्वतंत्र भारतात काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवावे.


देशाच्या विकासासाठी दोन सारख्याच महत्त्वाच्या विकास प्रक्रिया समांतर राबवल्या पाहिजेत.पहिली म्हणजे आधुनिक तंत्राधारित उत्पादनावर भर देणारी विकासप्रक्रिया.तांत्रिक विशेषतः

स्वयंचलनाच्या प्रगतीतून आधुनिक क्षेत्रात श्रमाची उत्पादकता सतत वाढणे अपरिहार्य आहे,आणि 'त्यातून रोजगार घटतीलच,

वाढणार नाहीत.तेव्हा उर्वरित बहुसंख्य भारतीयांसाठी अत्यावश्यक आहे दुसरी,निसर्गाधारित, श्रमप्रधान उत्पादनावर भर देणारी विकासप्रक्रिया.पण आज काय चालले आहे?केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत,कायदे झुगारून देत,नैसर्गिक संसाधने नासवत,बेरोजगारी फुगवत,लोकशाहीला तुडवत, विज्ञानाचा अवमान करत एक एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया राबवली जात आहे.मग लोकांचा असंतोष आवरण्यासाठी मनरेगा किंवा अन्नसुरक्षा कायदे करतो आहोत.हा खऱ्या खुऱ्या विकासाचा विपर्यास आहे.आपल्या जनतेकडे घटनेने बहाल केलेले सर्व अधिकार व्यवस्थित पोचवून,निसर्ग संपत्ती काळजीपूर्वक जोपासून,निसर्गाधारित,श्रमप्रधान उत्पादन भरभराटीस आणणे पूर्णपणे शक्य आहे.ह्यासाठीही आधुनिक विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाच लागेल.पण ही पाश्चात्त्य विज्ञानाची नक्कल नसेल,त्यासाठी आपल्यालाच मनापासून झटायला हवे, लोकांसोबत काम करायला हवे.विज्ञानाची कास धरून, निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच भारताचा सर्वंकष विकास होऊ शकेल.अशा संतुलित विकासप्रक्रियेतूनच समाजात जो जे वांछील तो ते लाहो,असे सुख-शांतिप्रद वातावरण नांदू लागेल.


हे कसे होऊ शकेल ? ह्यासाठी सरकारवर,सरकारी कृपाछत्राखाली संतुष्ट असणाऱ्या तज्ज्ञांवर व त्यांच्या संशोधनावर भिस्त ठेवून चालणार नाही.लोकांनीच पुढाकार घेऊन आपल्या समाजाला,

अर्थव्यवस्थेला, शासनाला,विज्ञानालाही रुळावर आणले पाहिजे.

आपण स्फूर्ती घेतली पाहिजे गडचिरोलीतल्या मेंढा (लेखा) सारख्या गोंड गावाकडून.इथे शिरल्या- शिरल्या दिसतो एक फलक : दिल्ली - मुंबईत आमचे सरकार,आमच्या गावात आम्हीच सरकार ! मेंढावासी अराजकवादी बिलकूल नाहीत,नक्षलवाद्यांप्रमाणे सरकार तोडले पाहिजे असे म्हणत नाहीत.उलट म्हणतात,आम्ही सारे भारताच्या शासनाचे घटक आहोत.


कस्तुरीच्या एका कणालाही जसा साऱ्या कस्तुरीचा परिमळ असतो,तसेच आम्हीही भारताचे शासक आहोत.अनेकदा शासकीय यंत्रणा सचोटीने काम करत नाही,तेव्हा आमची सर्वांचीच जबाबदारी आहे देशात सर्वंकष सुधारणा आणण्याची.केवळ आर्थिक नाही. आपण राजकीय,शासकीय,सामाजिक,वैज्ञानिक सुधारणांसाठी झटायला पाहिजे.भारतात लोकांपर्यंत सत्ता पोचवणारे पंचायत राज,आदिवासी स्वशासन,जैवविविधता,माहिती हक्क,वनाधिकार असे अनेक चांगले कायदे आहेत.ह्यांची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी होत नाही म्हणून हताश होऊन हात चोळत बसण्यात अर्थ नाही.संघर्ष करू या.पण ते अंतिम उद्दिष्ट नाही. मनापासून रचनात्मक कामासाठीही झटत राहू या.


आपल्या देशात आपले कायदे जमिनीवर उतरलेच पाहिजेत म्हणून लढत मेंढावासीयांनी वनाधिकार कायदा पुऱ्या गडचिरोली जिल्ह्यात लागू करवला आहे. शेकडो गावांचे सामूहिक वनसंपत्तीवरचे अधिकार मान्य झाले आहेत.ह्या संसाधनांचा शाश्वत वापर करत आर्थिक लाभकरून घ्यायचा,आणि जोडीने निसर्गाला अधिकाधिक समृद्ध करायचे मोठे आव्हान ह्या गावांपुढे आहे.ह्या संदर्भात एक परिसरशास्त्रज्ञ म्हणून गेली दोन वर्षे मेंढाच्या ग्रामवासीयांबरोबर व बायफ ह्या सेवाभावी संस्थेच्या व इतर अनेक मित्रांच्या मदतीने मी राबतो आहे.तिथल्या परिस्थितीला अनुरूप अशी मृद् व जलसंधारणाची,वनराजी जोपासण्याची तंत्रे विकसित करायची,जमिनीवर उतरवायची,व वनोपजाच्या मूल्यवर्धनाची,विक्रीची नीट व्यवस्था लावायची,असे अनेक उपक्रम जोरात चालू आहेत.


असे परिसरानुरूप विज्ञान हे प्रयोगशाळेत बीटी कॉटन निर्माण करण्याइतकेच कष्टाचे,तितकेच समाधान देणारे विज्ञान आहे.पण बीटी कॉटन रोजगार नष्ट करेल,तर मेंढाचे संशोधन निसर्गाला पोसत पोसत रोजगार निर्माण करेल. शिवाय एक निसर्गप्रेमी म्हणून मी खास उत्साहात आहे, कारण मेंढा ग्रामसभेने सामूहिक वनसंपत्ती क्षेत्रातल्या दहा टक्के क्षेत्रास देवरायांसारखे पूर्ण संरक्षण देण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

२८/५/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

मदी-मोरुई : पहिले मानव स्वर्गातच रहायचे.निळ्या पक्ष्याने पृथ्वी आणि स्वर्ग जोडणारी शिडी तोडून टाकीपर्यंत स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून बराच प्रवास चाले.


अशांती : देवाने निर्माण केलेली सात माणसे दोरखंडाने पृथ्वीवर उतरली.इथे मानवांचा जन्म झाल्यावर ती स्वर्गाला परत गेली.


झुलू : झुलू या शब्दाचा अर्थच मुळी स्वर्ग.सर्व झुलू लोक,त्यांचे प्राचीन वंशज थेट स्वर्गातून उतरले म्हणून सांगतात.त्यांच्या देशाला ते 'स्वर्गीय मानवांचा देश' असेच म्हणतात.


मसाई म्हणतात,स्वर्गात प्राणीही होते.सूर्य,चंद्र व तारे यांची निर्मिती करणाऱ्या देवाने पृथ्वीवर वनस्पती जीवन निर्माण केले आणि मगच त्या प्राण्यांना पृथ्वीवर आणले.


टांझानियातील झिबा जमातीचा मूळ देव 'रुगाबा.' त्यांनी त्याची कधी पूजा केली नाही किंवा त्याला बळी वगैरे दिले नाहीत;कारण त्यांना माहीत होते की रुगाबा 'फार दूर-अनंत विश्वात' राहतो.अंतराळात अंधारच असतो.रुगाबाने पहिला माणूस 'अंधार नाहीसा झाल्यावर' (आपल्या पृथ्वी या ग्रहावर पोहोचल्यावरच) निर्माण केला.


स्वर्ग म्हणजे अमरत्व,स्वर्ग म्हणजे सुखाचे आगर असे आपल्या 'मागासलेल्या' पूर्वजांना वाटत होते;असे आजचे विद्वान लोक सांगतात.खोटे आहे ते! स्वर्गातही माणसे मरत असत असे किलिमांजारो येथील जग्गा जमात सांगते.जन्म-मरणाचा फेरा स्वर्गातही चुकत नव्हताच.सत्य आहे.स्वर्ग काल्पनिक नव्हताच मुळी ते होते अंतराळ यांत्रिकांचे निवासस्थान.ते कसे अमर असतील ?


पृथ्वी प्रथम कशी होती? विश्वाची निर्मिती झाली कशी?


झांबियामधील वेम्बा या निग्रो जमातीची आख्यायिका सांगते की त्यांचा देव 'मुकुला' हा स्वर्गात रहायचा. प्रथम त्याने तारे,मग सूर्य आणि चंद्र निर्माण केले.मग प्रकाश निर्माण करून त्याने पृथ्वी निर्माण केली, तिच्यावर प्राणी निर्माण केले.वनस्पतींचे बी पेरले आणि प्राणी आणले.मग त्याने कियोम्बे आणि दोन स्त्रियांना पृथ्वीवर पाठवले. त्यानेअग्नी निर्माण करणारी वस्तू आणली होती.त्याने प्रथम निरनिराळ्या वस्तुंना नावे ठेवली आणि त्यांचा वापर शिकवला.


बुशोंगो त्यांची निर्मिती कशी झाली म्हणतात ?


पहिल्या प्रथम पृथ्वीवर सर्वत्र अंधार होता आणि पाणी. मग बुम्बा हा धिप्पाड आणि गोरा माणूस आला.त्याचे एक दिवस इतके पोट दुखायला लागले की तो ओकायलाच लागला.प्रथम त्याच्या पोटातून बाहेर पडले ते तारे,सूर्य आणि चंद्र ! सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन सागर निर्माण झाले,किनारे निर्माण झाले. मग तो झाडाचे एक रोपच ओकला आणि त्यातून वनस्पती जीवन निर्माण झाले.मग त्याच्या तोंडातून प्राणिमात्र पडले व शेवटी मानव,औषधे,आयुधे आणि अग्नी! त्याने एका माणसाची पृथ्वीवरील देव, पृथ्वीवरील राजा म्हणून नेमणूक केली व तो उडून अंतराळात नाहीसा झाला.


बुम्बाची जग निर्मितीची घाणेरडी तऱ्हा सोडली तर जग निर्मितीबद्दलचे त्याचे ज्ञान आश्चर्याने थक्क करणारे नाही? प्रथम काहीच नाही.मग वाळवंट,चिखल,पाऊस, सूर्याची उष्णता,

जमीन,वनस्पती,प्राणी,माणूस,औषधे, आयुधे,अग्नी हा क्रम कोणत्याही जमातींच्या आख्यायिका चुकवत नाहीत.


मसाईंच्या आख्यायिका विचार करायला लावतात. त्यांच्या 'गोऱ्या' देवाने प्रथम माईतुम्बे हा पहिला माणूस निर्माण केला. स्वर्गातच ! पृथ्वीवर त्याच्या खाण्या-पिण्याची सोय झाल्यावर त्याने त्याला पृथ्वीवर पाठवले आणि तो आफ्रिकेतील 'नोहा' च बनला. जगाचा निर्माता स्त्री नव्हतीच.तेव्हा त्याने स्वतःपासून सात पुरूष निर्माण केले;कारण माईतुम्बे एकाच वेळी स्त्री होता आणि पुरूषही.


आपले पूर्वज कसेही असोत.आपला पहिला मानव एकाच वेळी स्त्री आणि पुरूष होता हे जगातल्या सर्व आख्यायिका कशा सांगतात? ही गोष्ट विचार करण्यासारखी नाही ?


आपले पूर्वज मागासलेले असतील पण मूर्ख नक्कीच नव्हते.एकाच शरीरातून स्त्री-पुरूष निर्माण होतात ही कथा मानवाची निर्मिती कृत्रिमपणे केली होती असे नाही दर्शवत ?


न्होंगा अमो जमातीत एक कथा आहे.चंद्र आणि सूर्य एकदा जेवायला बसले.स्वयंपाक बिघडला होता.सूर्य इतका रागावला की त्याने चंद्राचा चेहराच जाळून टाकला.तेव्हापासून चंद्रावर खड्डे पडले.साधीच गोष्ट; पण चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे आहेत याचे ज्ञान हजारो वर्षे चालत आले आहे हेच नाही का सिद्ध होत?


माणसाचे आयुष्य एकदा का ठराविक साच्याचे बनले की त्याच त्याच गोष्टींचे त्याचे कौतुक नाहीसे होते. मेंढपाळ दररोज सूर्योदय पाहतो.त्याची नवलाई त्याला नाही.ती असते शहरात राहणाऱ्या माणसाला.चंद्रावर प्रथम माणसाने पाऊल टाकले तेव्हा श्वास रोखून सर्व जग त्या प्रसंगावर नजर ठेवून होते;पण हीच गोष्ट पुनःपुन्हा घडायला लागल्यावर त्यातले नाविन्यच नाहीसे झाले.टीव्हीवर सुद्धा बातमीत फक्त एकच ओळ वाचायला सुरुवात झाली.


आफ्रिकन आख्यायिकांकडे आधुनिक नजरेने पाहिले तर त्यातल्या किती तरी रिकाम्या जागा भरतील.


 आख्यायिका तरी कशी जन्म घेते ?


कल्पना करा की १५००० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात एक अंतराळवीर उतरला.रानटी मागासलेले पूर्वज भीतीने घाबरून त्यांच्या गुहेत पळून गेले.हळुहळू दररोज त्याला पाहून त्यांच्यातली भीती नाहीशी झाली.त्यांच्यात विश्वास निर्माण झाला.हा परका माणूस त्यांना इजा करू इच्छित नाही,याबद्दल तरी त्यांची खात्री पटली.ते काय म्हणत होते यापेक्षा तो त्यांना स्वतःबद्दल जे सांगायचा प्रयत्न करीत होता हे त्यांना कळू शकत नव्हते हे महत्त्वाचे.


त्यांना ज्या थोड्या फार खाणाखुणा कळत असतात त्यात 'मी देव नाही' असे दर्शवणारे चिन्हच नाही.तो कसे समजवणार त्यांना? त्या रानटी लोकांनी त्याला आकाशातून उतरलेले पाहिलेले असते.तिथे देवच असतात.तो त्यांच्या दृष्टीने देवच राहतो.


त्यांची भाषा येत नसल्याने तो स्वतःशीच बडबडत असतो,'अरे बाबांनो! मी देव नाही.मी तुमच्यासारखाच रक्तामांसाचा माणूस आहे.हात लावून पहा मला.वर आकाशात पहा.तुमच्यासारखाच आकाशात एक ग्रह तिकडे आहे.ते माझे घर.मी उतरताना झालेल्या चकचकाटाने घाबरू नका.मला उतरण्यासाठी जागा शोधताना सर्चलाईटस् वापरावे लागल्याने तो प्रखर प्रकाश पडला होता.हा पहा जनरेटर.या केबल्स.'


यातले काहीही त्यांना कळत नव्हते.कळले असते तरी त्यांनी तो देव नाही हे मान्य केले असते की नाही शंकाच आहे.त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्याला आकाशातून उतरताना पाहिलेले असते.ही दैवी शक्तीच की! फक्त देवांकडेच ती असते.काही काळाने तो अंतराळवीर आपल्या 'घरी' निघूनही जातो.


त्या काळात घडलेला अघटित असा प्रकार होता तो.हा अनुभव इतरांना कसा समजावणार? देव एका दैदिप्यमान मागे अग्नी सोडणाऱ्या वाहनातून उतरला होता.दैदिप्यमान म्हणजे कसे? सूर्य सर्वांना माहिती आहे.प्रखर,उष्ण गोळा.मग असेच सांगू या.आकाशातून 'काही तरी' उतरले.सूर्याहून प्रखर,प्रकाशमान, स्वतःभोवती फिरणारे.ते 'काही तरी' जबरदस्त आवाज करीत होते.मेघगर्जनेसारखा! मेघगर्जना सर्वांना कळते ना! ढगातून आलेले 'ते' वाहनासारखे वाटत होते पण वाहने तर जमिनीवर फिरतात.हे वाहन तर उडत होते. सर्वांनी पाहिले होते.कसे समजावणार? पण पक्षी तर उडतात ना? बरोबर,असेच सांगायला पाहिजे.अत्यंत प्रकाशमान वस्तू उतरली.स्वतःभोवती फिरणारी.


सूर्याहून चमकदार,अग्निने वेढलेली आणि पक्ष्याप्रमाणे उडणारी.तशी ती धोकादायकच वस्तु होती पण धोकादायक म्हणजे कशी? जमिनीवर सरपटणाऱ्या सर्याएव्हढी.त्याची सर्वांनाच भीती वाटते आणि ती वस्तूही पूर्ण गोलाकृती नव्हती.

अंड्यासारखी वाटत होती.त्यातून उतरलेल्या देवाने झगझगीत कपडे घातले होते.काही प्राण्यांची शरीरे चमकतात तसे.बरोबर, देवाने घातलेले कपडे चमकणाऱ्या चांदीच्या कातड्यासारखे होते.अशा त-हेने रचली जात जात ती कथा जन्म घेते आणि तरीही तिचा अर्थ आज आपण समजू शकतो. हजारो वर्षांपूर्वीच्या कुठल्या अप्रतिम दृश्याचे वर्णन चालले आहे ते आपण गेल्या ३५-४० वर्षांत जाणून आहोत.


आख्यायिका ? अजूनही आख्यायिकाच? ही तर सत्यकथा आहे.स्वानुभव आहे.


निनेव्ह येथे उजेडात आलेल्या मृत्तिकापत्रात आणखी एक महाकाव्य आहे.एटना! गिलगामेशच्या महाकाव्यात याचा थोडा भाग समाविष्ट आहे पण या महाकाव्याचा उगम तर मानवी इतिहासाच्या आरंभापासून वाटतो. ५००० वर्षांपूर्वीच्या सिलेंडर सीलवर एटनाचे चित्र आहे. ही काय आख्यायिका आहे?


एटना समासदेवाला विनंती करतो की त्याला अमरत्वाची औषधी वनस्पती द्यावी म्हणून.देव त्याला गरुडाकडे पाठवतो.गरूड त्याला विचारतो तुझी काय इच्छा आहे म्हणून.एटना म्हणतो,मला अमरत्वाची औषधी वनस्पती हवी म्हणून.गरूड त्याला घेऊन स्थिर ताऱ्यांच्या दिशेने अंतराळात उड्डाण करतो.या उड्डाणात सहा वेळा गरूड एटनाचे लक्ष नाहीशा होणाऱ्या पृथ्वीकडे वळवतो.थोडा वेळ झाल्यावर गरूड म्हणतो,'मित्रा,बघ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.समुद्र बघ,पर्वत बघ;जमीन आता टेकडीसारखी आणि समुद्र कालव्यासारखा दिसत आहे.'थोड्या वेळाने गरूड पुन्हा म्हणतो, 'मित्रा बघ ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.आता ती जंगलासारखी वाटत आहे.'थोड्या वेळाने जमीन एखाद्या झोपडी एव्हढी तर समुद्र अंगणासारखाच दिसायला लागला.आणि उंच उंच गेल्यावर गरूड एटनाचे लक्ष पृथ्वीकडे वळवतो.शेवटी म्हणतो.'बघ! आता जमीन दिसेनाशीच झाली आहे.'


एटना ते बघतो आणि म्हणतो,'जमीन कशी दिसेनाशी झाली ते मी पाहिले,आता तर समुद्रही दिसेनासा झाला आहे;माझी स्वर्गात जायची इच्छा नष्ट झाली आहे.तू मला परत पृथ्वीवर घेऊन जा.'


'गरूड उतरला आहे!' चंद्रावर उतरल्यावर ह्यूस्टन इथे आपल्या अंतराळ यात्रिकांकडून ऐकू आलेले पहिले शब्द ! आता इतिहासात नोंद केले गेलेले !


एटनाचा प्रवासही तितकाच सत्य आहे.स्पष्ट आहे.

जग निर्मितीबद्दलसुद्धा या मृत्तिकापत्रांमध्ये लिहिले आहे.प्रथम अंतराळालाही काही नाव नव्हते.आणि खालच्या पृथ्वीलाही.प्रथम फक्त सागर होता.आणि त्याच्या लाटांचा गंभीर आवाज.त्यावेळी शेते नव्हती, कुठल्या जमाती नव्हत्या.एकही देव अस्तित्वात नव्हता. कुणालाच नावे नव्हती.कुणाचेच भविष्य ठरत नव्हते. मग देवाची निर्मिती झाली.लुहुमु आणि लहामु जन्माला आले.आणि अनंत काळ निघून जातच होता.


आख्यायिका ? की सत्यकथा?


गेल्या महायुद्धात जपानचा पराभव केल्यावर अमेरिकेने पहिली कोणती गोष्ट केली असेल तर शिंटो या त्यांच्या धर्मावर बंदी घातली.जपानचा सम्राट हाच या धर्माचा अधिपती.पृथ्वीचा अधिपती आणि देवांचा राजा हा एकच ! जपानी सम्राट ! ही रूढी मोडणे अमेरिकेला भागच पडले नाही तर देव म्हणून जपानी लोक ज्याची पूजा करीत होते,त्या सम्राटाला कोणत्याही आज्ञा अमेरिकन देऊ शकले नसते.तेव्हा प्रथम त्यांनी जपानी सम्राटाला त्याच्या देवपदावरून भ्रष्ट केले.


या धर्मात महत्त्वाची तीन पुस्तके.कोयिको,कोऊयिकी आणि निहोंगी! तसे हे धर्मग्रंथ प्रथम आठव्या शतकात लिहिले गेले असले तरी त्यांचा उगम वादातीतपणे अत्यंत जुन्या अशा आख्यायिकात आहे.पुनःपुन्हा तीच गोष्ट लिहायचे,टाळायचे म्हटले तर सांगता येईल की, इतर सर्व धर्मग्रंथांप्रमाणेच विश्वाची,

विश्वनिर्मितीची, अंतराळयानांची माहिती निहोंगी या धर्मग्रंथात व्यवस्थित दिली आहे.इतर धर्मग्रंथांचा अर्थ लावताना जी अडचण येते ती यांच्या बाबतीतही येते.


१९१२ मध्ये आल्फ्रेड वेगनर याने पृथ्वीवरील खंडे कशी तयार झाली याबाबत मांडलेला सिद्धांत सागरतळाचे संशोधन केल्यावर खरा ठरला आहे.पॅसिफिक महासागरात प्रथम प्रचंड भू-भाग होता.पुरातन काळात एकदा त्याचे तुकडे उडले आणि आपल्या जागेवरून ढळले.वेगवेगळे होत त्यातून तयार झाली अमेरिका, आफ्रिका खंडे.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…



२६/५/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

पश्चिम आफ्रिकेतील 'माली' या देशात डोगॉन या जमातीचे वास्तव्य आहे.ज्याचा काळ ठरविणेही अवघड अशा जुन्या काळातील त्यांच्या पौराणिक कथा व्याध सीरिअस-अ (Sirius- A) या ताऱ्याची आणि त्याच्या 'न दिसू शकणाऱ्या' अशा जोडताऱ्याची माहिती कशी देतात हे कोडे मात्र उलगडत नाही.त्या जोडताऱ्याला ते म्हणतात 'डिजिटारिया.'


डोगॉनच्या पुराणकथा सांगतात की डिजिटारिया हा आपल्याला दिसत नसलेला 'उपग्रह' व्याधाभोवती ५० वर्षांत एकदा फिरतो.तो एक अत्यंत जड तारा आहे आणि व्याधाभोवती फिरताना तो व्याधाच्या कक्षेवरही परिणाम करतो.त्यांना 'अदृश्य' अशा या ताऱ्याची माहिती,त्याची कक्षा,त्याची घनता,त्याचा भ्रमणकाळ या सर्व गोष्टींची माहिती कशी होती?


दंतकथा,पुराणकथा का स्वानुभव ? देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर,बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


व्याध आणि त्याचा उपग्रह यांची माहिती आपल्याला गेल्याच शतकात झाली आहे.सूर्य सोडला तर व्याध हा आपल्याला सर्वात जवळ असलेला तारा.रंगाने पांढरा, आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर आणि दक्षिण गोलार्धातील अत्यंत तेजस्वी असा हा तारा आहे.त्याचा उपग्रह व्याध-ब (Sirius-B) १८४४ मध्ये विल्यम फ्रेडिक बेसेल याने 'शोधून' काढला तरी दुर्बिणीची भिंगे तयार करणाऱ्या अमेरिकन यंत्रज्ञ अल्वन क्लार्क याने तो खरोखरच प्रथम 'बघेपर्यंत' १८६२ साल उजाडावे लागले."


व्याध हा सर्वसामान्य तारा आहे तर व्याध-ब हा एक पांढरा ठिपकाच (White Dwarf) म्हणावा लागेल. त्याची घनता मात्र खूप जास्त आहे.


१८३४ मध्येच बेसेलच्या लक्षात आले की व्याधाची गती सरळ रेषेत नसून ती पाण्यातल्या तरंगांप्रमाणे वक्र असावी.मृग नक्षत्रात आपण व्याधाने मारलेला बाण पाहतो.मग नेहमी बाणाच्या सरळ रेषेत व्याध दिसायला हवा.तो तसा दिसत नाही.कधी तो बाणाच्या वरच्या बाजूला दिसतो तर कधी खालच्या बाजूला.बेसेल व त्याचे साथीदार यांनी ठराविक कालाने व्याधाच्या गतीची नोंद घ्यायला सुरुवात केल्यावर तर त्यांचा संशय दृढ झाला.याचा अर्थ व्याधाच्या गतीवर दुसरा कुठला तरी तारा परिणाम करीत होता;पण तो दिसत मात्र नव्हता.या अदृश्य ताऱ्यालाच त्याने नाव दिले 'व्याध-ब'. त्याकाळच्या अत्यंत चांगल्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नव्हता.तेव्हा तो 'अप्रकाशित' असावा असा निष्कर्ष खगोलशास्त्रज्ञांनी काढला.


पण त्यावेळी अल्वन क्लार्क याने दुर्बिणी बनवण्यात नाव कमवायला सुरुवात केली होती.१८६२ मध्ये त्याने बनविलेल्या ४७ सेंटिमीटर व्यासाच्या दुर्बिणीतून बेसेल याने सांगितलेल्या ठिकाणीच क्लार्क याला 'व्याध-ब' सापडला,दिसला.तो अप्रकाशित नव्हता,व्याधाच्या सावलीत नव्हता,पण तेजस्वी व्याधाच्या सान्निध्यात तो पाहताच येत नव्हता;त्याची तेजस्विता लुप्त होत होती.मध्यंतरीच्या काळात 'व्याध-ब' ची 'पांढरा ठिपका' अशी नोंद झाली होती.अशा ताऱ्यांची घनता पुष्कळच असते; पण तेजस्विता कमी असते.व्याधाशी तुलना करता व्याध-ब ची घनता ०.४२:२७००० या प्रमाणात आहे. व्याध पहिल्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे तर व्याध-ब नवव्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे. (तिसऱ्या,चौथ्या प्रतीच्या पलिकडील तारे नुसत्या डोळ्यांनी पाहणेही तसे अशक्यच.) 


व्याध-ब चा व्यास ४१००० किलोमीटर आहे पण त्याचे वस्तुमान (Mass) मात्र सूर्याएवढे आहे.उगीच नाही व्याधाच्या भ्रमणकक्षेवर तो इतका जबर परिणाम करीत असतो.


सूर्य परिमाणांप्रमाणे…!


व्याध-अ (Sirius-A) - ( व्याध-ब (Sirius-B) )


वस्तुमान - २.४ -  ( ०.९६ )


त्रिज्या - १.८ -  ( ०.०३४ )


घनता - ०.४२ -  ( २७००० )


व्याधाबद्दलचे आजचे आपले ज्ञान आणि पुराणकाळापासून डोगॉन जमातीला असलेले ज्ञान यांची तुलना केली तर काय दिसेल?


प्रचलित ज्ञान


व्याध-ब हा व्याधाच्या कक्षेवर परिणाम करतो हे गेल्या शतकात प्रथम लक्षात आले.


व्याध-ब दिसू शकत नव्हता.अद्ययावत दुर्बिणींच्या सहाय्याने सततच्या संशोधनाने तो शोधता आला आणि त्याची कक्षा ठरवता आली.


व्याध-ब हा अगदी छोटा तारा आहे.


व्याध-ब कक्षेतून फिरण्याला ५०.४ ± ०.०९ वर्षे लागतात.


व्याध-ब ची घनता प्रचंड आहे.



डोगॉनचे ज्ञान


डिजिटारिया हा व्याधाच्या कक्षेतील एक बिंदू आहे. डिजिटारिया डोगॉन लोकांनी कधी पाहिलेलाच नाही.


डिजिटारियाच्या अस्तित्वाबद्दल डोगॉनना कधीच शंका नव्हती.तो अदृश्य आहे हे माहीत असूनही !


डिजिटारिया फारच लहान आहे त्याच्या निर्मितीत त्याने आपल्या जवळचे सर्व देऊन टाकले.


डिजिटारियाच्या भ्रमणाला साधारणतः ५० वर्षे लागतात.


डिजिटारिया हा सर्वांत जड तारा आहे.तो व्याधाची कक्षा ठरवितो व स्वतःच्या कक्षेप्रमाणे त्याच्याभोवती फिरतो.


रॉबर्ट टेम्पल हा भाषाशास्त्रज्ञ असला तरी रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचाही सदस्य आहे.त्याने डोगॉनच्या पुराणकथांप्रमाणे आणि आजच्या खगोलशास्त्रातील ज्ञानाप्रमाणे व्याध-ब च्या भ्रमणकक्षा काढल्या व निष्कर्ष काढला की अगदी बारीकसारीक बारकाव्यांसह या दोन्ही आकृत्यात इतके साम्य आहे की शास्त्रज्ञांना फूटपट्टी घेऊन मोजमाप करण्याची काहीही आवश्यकता नाही.ही वस्तुस्थिती स्वयंसिद्ध आहे. अद्ययावत ज्ञानाची पुराणकथांशी ही सांगड कशी बसली?


डोगॉनच्या आख्यायिका सांगतात की डिजिटारियाला स्वतःभोवती फिरण्याला एक वर्ष लागते.ते पृथ्वीवरील वर्षाबद्दल बोलत आहेत की डिजिटारियाच्या वर्षाबद्दल हे कळत नाही;पण तरीही आकाशस्थ ताऱ्यांचे स्वतःभोवतीचे भ्रमण डोगॉन जमातीला पुराणकाळापासून ज्ञात आहे हे कसे काय? आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे आपल्याला तसे हल्लीच कळायला लागले आहे.तरी विश्वाच्या या मूळ गतीची कल्पना आफ्रिकेतील 'रानटी' जमातीला हजारो वर्षे असावी हे आश्चर्य नाही का?


खरे सांगायचे म्हणजे आज आपल्याला माहीत नाही अशा आणखी काही गोष्टींचे ज्ञानही डोगॉनना हजारो वर्षे आहे.कदाचित आपले खगोलशास्त्रज्ञ या गोष्टी भविष्यकाळात शोधून काढतीलही.


डोगॉनच्या पुराणांप्रमाणे तेजस्वी व्याधाचा व्याध-ब हा एकच उपग्रह नाही.व्याध-ब पेक्षा मोठा पण वजनाने त्याच्या (१/४) वजनाच्या 'एमी या' या आणखी एका दुसऱ्या उपग्रहाबद्दलही ते बोलतात.त्याची भ्रमणकक्षा व्याध-ब पेक्षा मोठी असून तो व्याध-ब च्या दिशेने ५० वर्षांत एक प्रदक्षिणा करतो आणि शिवाय 'एमी या' ला स्वतःचा एक उपग्रह आहे.व्याधाला शूमेकर (Shoemaker) असा तिसराही एक उपग्रह आहे. व्याधापासून सर्वांत लांबचा उपग्रह आणि तो उलट्या दिशेने फिरतो.


'एमी या' किंवा 'शूमेकर' यांची माहिती जमविण्याइतके ज्ञान आपल्याजवळ आज नाही.आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर असलेल्या व्याधाचे उपग्रह लवकर शोधून काढू अशी आजची परिस्थिती नाही.


पण ज्या पौराणिक काळापासून डोगॉनच्या आख्यायिका चालत आल्या आहेत,त्या काळात तर 'अदृश्य' अशा या ताऱ्यांबद्दलचे ज्ञान कुणालाच नव्हते. मग डोगॉनना ही सर्व माहिती कशी झाली?कोणी दिली? याचा उलगडा कोण करणार?


डोगॉनच्या दंतकथा एक गोष्ट स्पष्ट करतात.हजारो वर्षे दंतकथा,आख्यायिका जे सांगत आहेत त्यात सत्याचा अंश नक्कीच आहे,त्या काल्पनिक नाहीत.त्यांचा उगम प्राचीन काळातल्या आपल्या पूर्वजांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या,

अनुभवलेल्या गोष्टीत आहे.या आख्यायिकांचा अर्थ अक्षरन्अक्षर किंवा शब्दन्शब्द जुळवून लावण्याचा प्रयत्न मात्र निरर्थक आहे.शब्दांचे अवडंबर झटकून टाकून त्यांचे एकूण सार शोधले पाहिजे.ज्यांनी हे वृत्तांत लिहिले त्यांना ते पाहत असलेल्या तंत्रविज्ञानाबद्दल काहीही माहिती नव्हती.त्यांच्या दररोजच्या आयुष्यातील संबंधित अशा गोष्टी सांगून पटतील अशा शब्दात,त्यांचे अनुभव सांगण्याच्या प्रयत्नात ते काही वेळा शब्दांच्या जंजाळात फसले आहेत हे खरे ! पण म्हणून ते वृत्तांत काही खोटे ठरत नाहीत.


पुराणकाळात उल्लेख केलेले 'देव' तरी होते कोण? कोणत्या परिस्थितीत ते पृथ्वीवर आले होते? ते काल्पनिक असतील तर लोक त्यांना बघू शकत होते, त्यांच्याशी बोलू शकत होते हे कसे काय? त्यांना तसे पृथ्वीवर येण्याचे कारणच काय होते?पण ते आले, बऱ्याचदा आनंदाने राहिले.का? त्यांनी त्यांची शक्ती दाखवली,त्यांचे ज्ञान,प्रगत विज्ञान या गोष्टी दाखवल्या. जमेल तेवढे ज्ञान दिलेही.ज्ञानदानाचे हे पुण्य त्यांना कशासाठी पदरात पाडून घ्यायचे होते?आणि ते नेहमी आपल्या ज्या घरी परत निघून गेले ते घर होते कुठे? परत येऊ असे वचन त्यांनी नेहमीच का दिले? सर्व जगभर खळबळ माजवली ते देव खरे होते का खोटे ?


सर्व पुराणकथात देवांचे आगमन,त्यांची वागणूक, विश्वाची निर्मिती,वनस्पती जीवन,प्राणी जीवन,मानव यांची निर्मिती यांची अचूक माहिती आहे.ती काय खोट्या काल्पनिक देवांनी दिली असेल ?


आफ्रिकेतील सर्व जमातींच्या कथा तपासल्या तर त्यात आश्चर्यकारक साम्य आढळून येते.


स्वर्गाचीच गोष्ट घ्या.आपल्या पूर्वजांची स्वर्गाबद्दलची कल्पना तरी काय होती?तो अनंत विश्वातील पोकळीत कुठे तरी होता.त्यावेळी अंतराळप्रवास नव्हता, टेलिस्कोप नव्हते.अब्जावधी ताऱ्यांनी भरलेले हे अज्ञात विश्व त्यांना संपूर्ण अज्ञात होते.तरीही आफ्रिकेतील वेगवेगळ्या धर्माच्या,चालीरितींच्या,संस्कृतींच्या सर्व जमातींच्या आख्यायिकांप्रमाणे स्वर्ग हा अगदी 'गजबजलेला' होता.त्यांचे मूळचे लाल,निळे,गोरे,काळे सर्व देव 'ढगावरील विश्वातून' आले होते.या गजबजलेल्या स्वर्गातून आलेल्या शक्तिमान देवांबद्दल आफ्रिकेतील निरनिराळ्या जमातींच्या आख्यायिका काय सांगतात ?


मसाई : स्वर्गीय जोडप्याने अमर अशा शक्तिमान देवपुत्रांची निर्मिती केली आणि त्यापैकी काही जणांना पृथ्वीवर पाठवले.तसे हे देवही भांडखोरच ! कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांचेही एकमत होत नसे.एका देवाने एखादी गोष्ट बनवली की दुसरे देव कित्येकदा ती मोडून-तोडून टाकीत असत.


शिल्लक भाग पुढील भागात प्रकाशित केले जातील.