live
मुख्यपृष्ठ
९/७/२५
मुक्या शतकांचा आवाज - डान्टे / The voice of silent centuries: Dante
७/७/२५
ओंजळीतलं पाणी / Boiling water
ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं,सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,...०४.०७.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…
काही केल्या चावंनाच झालंया.शेजाऱ्याच्या लग्नात सुनंचं कौतुक करणारं वाडपी आपल्या ओळखीच्या माणसाला कोपऱ्यात बसवून भात वाढायच्या नावाखाली मटणाची पळी ओतायचे.ते बघून बाजूची मंडळी चिमटा काढायची.त्याकडं दुर्लक्ष करून अंधारात काय वाढलं कळलंच नाय म्हणून वेळ मारून न्यायचे.
घड्याळाचा काटा आकराच्या पुढं गेला तरी पंगती सुरूच होत्या.गोंधळाच्या जेवणाला आलेलं शारदाच्या माहेरचं मुराळी तिला दुसऱ्या दिवशी माहेरी घेऊन जाणार होतं.
कारण,आषाढ सुरू होणार होता आणि आषाढात नववधूनं महिनाभर माहेरीच रहायचं असतं,हा परंपरागत अलिखित नियम अमलात आणला जात होता.तशी तानाजीच्या आयुष्यात आजची रात्र एक नवी पहाट घेऊन येणार होती.
जेवणावळीत आता ही शेवटची पंगत होती.तिथं बाहेरची माणसं बसलेली.त्यानंतर घरातली वयस्कर मंडळी आणि बायका जेवायला बसणार होत्या.तानाजीचं पाहुण्यांसोबत जेवण आटपलं.घरची पंगत बसली.घरच्या मंडळींसाठी आचाऱ्यानं बाजूला काढून ठेवलेली मटणाची परात पुढं केली.इतक्यात लाईट आली आणि सगळ्यांना आनंद झाला.घरचे जेवत असताना तानाजीच्या ध्यानात आलं की,विहिरीवरची पाण्याची मोटर सुरू करून उसाला पाणी सोडून यायचं,म्हणजे रातभर लाईट आहे तोवर शेताला पाणी मिळंल.सकाळी परत लाईट जाणार.कारण,मायबाप सरकारनं तो नियमच केल्याला.शहराला दिवसा आणि शेताला रात्री लाईट मिळायची.शहरात दिवसभर विविध कार्यालयात कामकाज सुरू असतं.त्यामुळं त्यांना दिवसभर सुरळित वीजपुरवठा झाला पाहिजे. दिवसभर काम करून थकून भागून सगळे घरी जाऊन आरामात आपापल्या परिवारासोबत झोपतील तेव्हा शेतकरी शेतात पिकाला पाणी पाजून धान्य पिकवील.ऊस पिकवील.जनतेला अन्न आणि चहाला साखर पुरवील.
खरं तर इतक्या उशिरा शेतात जायची तानाजीची पण इच्छा नव्हती;पण मनगटावर हळकुंड आहे तोवर घरातून बाहेर जायचं नाही म्हणून चार दिवस झालं घरातच बांधून घातल्यागत झालं होतं त्याला. घरची सगळी मंडळी ताटावर बसल्यात तोवर मोटर सुरू करून उसाच्या सरीचं दारं मोडून लगेच यायचं असं त्यानं ठरवलं.जाऊन पटकन् परत यायचं म्हणून त्यानं मोटारसायकल घेतली.आधीच पावसानं दडी मारली हुती आणि लग्नाच्या धांदलीत शेताला पाणी पाजायला उशीर झालेला म्हणून गाडीवर मागच्या सीटवर खोरं घेऊन तानाजीचा दोस्त महेश बसला.
घरच्यांना ही दोघं कुणीकडं चाललीत याचा अंदाज येण्याआधी गाडी अंधार कापत पुढं गेली.इतक्या रात्री शेतावर जाणं तानाजीसाठी नवीन नव्हतं;पण लग्नानंतर पहिल्या रात्री पैपाहुणं घरात असताना आपण जाणं बरं नाय,असं सगळीजण म्हणायला लागली.
तानाजीच्या घरात त्याच्याशिवाय दसर शेती करणारं कोणीच नव्हतं.मी घरात थांबतो तुम्ही शेतात जावा असं भावकीतल्या कुणाला सांगणार कसं? म्हणून चटकन् जाऊन येऊ म्हणत तानाजी सटाकला. घरात सजवलेली खोली आणि शारदाचा देखणा चेहरा दोन्हीपण त्याच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हतं.विहिरीच्या काठावर गाडी उभा करून मोटर सुरू केली.परत गाडी सुरू करून उसाच्या बांधाजवळ आला.
पाण्याचा पाट शेतातनं पुढं दुसऱ्याच्या रानात चालला होता.झटकन् दारं मोडून पाणी आपल्या उसात वळवायचं.
मग रातभर पाणी शेतात फिरत बसतंया.सकाळी लाईट गेली की मोटर आपोआप बंद होईल.
पाटात उतरायला तानाजीनं पँट गुडघ्यापर्यंत वर केली.
डोक्याला टावेल गुंडाळला.खोरं हातात घेतलं आणि त्यानं उसाच्या सरीत पाय टाकला.पटापट तीन-चार खोरी ओढून पाट वळविला.पाणी उसाच्या सरीत शिरलं.पुढं जाणारं पाणी आता थांबलं हुतं.तिकडचा गाळ वढून दारं पुन्हा पाण्याच्या दाबानं फुटू नयेत म्हणून हातानं गाळ ओढून लावला.वाहत्या पाण्यात हात-तोंड धुतलं. डोक्याला गुंडाळलेला टावेल सोडून तोंड पुसत खोरं उचललं आणि महेशच्या हातात दिलं.
पाटातला पाय उचलून वाहत्या पाण्यात खंगाळून उसाच्या बुडक्याला वाळक्या जागेत टाकला.दुसरा पाय बांधावर टाकणार तवर उसाच्या बुंध्याला सळकन आवाज आला.
काही कळायच्या आत पायाच्या पोटरीला काय टोचलं म्हणून मागं बघितलं तसा तानाजी ओरडला, "आरं,मह्या साप..." बॅटरी घेऊन उभा असणारा महेश दचकून पुढं आला,तर मनगटाएवढा नाग फणा काढून उसात शिरला. तानाजीच्या पायावर डास चावल्यागत दोन खुणा स्पष्ट दिसू लागल्या.
महेशनं चटकन् टावेल मांडीजवळ घट्ट बांधला आणि मोटरसायकलला किक मारली.खोरं तिथंच टाकून तानाजी गाडीवर बसला.महेशनं गाडी वाऱ्यागत गावाच्या दिशेनं पळवली.गाडीवर बसल्या बसल्या तानाजीनं गावातल्या गुरवाला फोन करून देऊळ उघडायला सांगितलं.महेशच्या भावाला फोन करून त्याच्या घरची कोंबडीची आठ-दहा पिल्लं देवळात आणायला सांगितली.पिल्लांचा आवाज ऐकून गल्लीत कालवाकालव सुरू झाली.गडबडीत महेशचा भाऊ बोलून गेला की,तानाजीला पान लागलंय,विहिरीजवळ पाणी पाजताना नाग चावला.बातमी वाऱ्यागत गावभर पसरली. तानाजीच्या घरची पंगत नुकतीच उठली होती.
बायका जेवणाची भांडी घासत हुत्या.तवर कोणतरी हळूच सांगितलं अन् बायकांनी हंबरडा फोडला.काय झालंय कुणाला कळायच्या आधी सगळा लोंढा देवळाकडं पळायला लागला.गावातल्या कर्त्या माणसांनी बायकांना पुढं येण्यास मनाई केली.अशावेळी शिवाशिव नको अपशकून होईल म्हणाले.कोणतरी गर्दीत बोलून गेलं.अपशकून कसला नागीन पहिल्याच रात्री तानाजीला डसली. निष्पाप पोराचा घात केला.अवदसा कुठनं आली आणि पोराच्या आयुष्यात विष कालवलं. बोलण्याचा सूर शारदाच्या दिशेला चालला. वेळकाळ बघून काहीजण समजूत घालायला लागलं;पण जे काही झालंय याची शारदाला भणकच नव्हती.फक्त काहीतरी अघटित घडलंय इतकंच तिच्या कानावर आलं हुतं.
देवळात पुजाऱ्यानं कोंबडीची पाच-सहा पिल्लं तानाजीच्या पायाला डंख मारला होता तिथं लावली.ती सगळी झटक्यात गप झाली.पिल्लं संपत आली तरी असर कमी येत नव्हता.
अजून पिलांची जुळवाजुळव सुरू झाली.तानाजीच्या बहिणींनी हंबरडा फोडला अन् गावातल्या बायकांच्या सुरात सूर मिसळून शारदाला पांढऱ्या पायाची म्हणून घराबाहेर ओढायला लागल्या.तसा सगळा प्रकार घरातल्या लोकांना कळला. तानाजीची आई आक्रोश करायला लागली.
पतीच्या जाण्यानं निष्ठूर झालेल्या घरात आता कुठं आनंदाची बासरी वाजली होती,ती या नागिणीसाठी पुंगी वाजली की काय ?
शारदानं स्वतःला सावरत संसारसटातील भांड्यात मांडलेली नवीकोरी सुरी घेतली.काहीजणांना वाटलं आता ही जीव देणार.तिला आडवायला जाणाऱ्यांना तानाजीच्या बहिणींनी मागं ढकललं. 'मरू दे तिला,पण माझा भाऊ जगला पायजे...' हे वाक्य शारदाच्या कानठळ्या बसवून गेलं.ती तडक देवळात घुसली.इतर बायकांना आत येण्यापासनं आडवणारी मंडळी शारदाचा अवतार बघून मागं सराकली.देवळात खांबाला टेकून बसलेल्या तानाजीच्या समोर शारदा उभा राहिली.तिला बघून डोक्याला हात लावून बसलेला तानाजी सावध झाला.शारदानं डोळ्यांत डोळं घालून बघितलं. तानाजीनं गालात हसून आपण ठीक असल्याचं खुणावलं.शारदानं कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता हातातल्या सुरीनं डंक मारलेल्या ठिकाणी कापून जखम मोठी केली.रक्त भळाभळा वहायला लागलं.तसं तानाजीच्या मस्तकात जोराची कळ गेली.दाबून जेवढं रक्त निघंल तेवढं तिनं काढलं. जास्त दाबलं की तानाजीला दुखायला लागलं. शारदानं हातातली सुरी टाकून दिली.जखमेतलं रक्त तोंडानं वढून थुकायला सुरू केलं.बघणाऱ्या लोकांनी मात्र तोंडावर हात ठेवला.तेवढ्यात गर्दीतून कोणतरी बडबडलं.जी नागीन डसलीया तिनंच विष उतरवलं.काय ते पोरीच धाडस, नवऱ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला.हीच खरी सावित्री. गर्दीत कोणी कौतुक केलं तर कोणी कुचेष्ठा. शारदानं जमेल तेवढं काळंनिळं रक्त काढून टाकलं.घामानं डबडबलेल्या शारदानं शेवटच्या थुकीत निव्वळ लाल रक्त आल्यालं बघितलं आणि नवऱ्याकडं डोळं भरून बघत गालावर एक स्मित आणलं.नवऱ्याच्या गालावरनं हात फिरवत त्याच्या कानात, "जगलो वाचलो तर पुन्हा भेटू..." असं म्हणत शारदानं तानाजीच्या छातीवर डोकं ठेवलं. तिथंच ती बेशुद्ध पडली.दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर आपण आषाढ पाळायला माहेरी जाणार नाही असं सांगितलं आणि तानाजीच्या बहिणींना सासरी पाठविलं…
समाप्त…
५/७/२५
ओंजळीतलं पाणी / Boiling water
सकाळपासूनच तानाजीच्या घरात गडबड,गोंधळ सुरू होता.त्याचं लग्न होऊन आज चौथा दिवस होता.अगदी लग्नाच्या आधी दोन दिवस तयारीपासून पोटाला नीट दोन घास वेळेवर नाहीत की,डोळ्याला झोप नाही.अंग नुसतं शिणून गेलं होतं.कधी एकदाचं सगळं विधी संपतायत अन् कधी समाधानानं शांत झोपायला मिळतंय असं त्याला झालेलं.त्यात आज देवीचा गोंधळ घातलेला. सगळ्या गावाला मटणाचं जेवण केलेलं.एरवी घरटी एखादं माणूस जेवायला येतं;पण आज झाडून सारा गाव आलेला.
रीतिरिवाजाप्रमाणं लग्नानंतर देवीचा गोंधळ घालून तिच्या देवळाच्या मागं चार पायाचा बळी दिल्याशिवाय नवरा-नवरी एका खोलीत राहू शकत नव्हतं.मटणाचा रस्सा वरपून गावकरी खूश. जाताना तानाजीला चिमटा काढून जायची,
"काय मग? लय घाई झाली आसल आज झोपायची ? चार-पाच दिवस जागरण झालं नव्हं तुझं? आज झोप नित्रास..."
तानाजीला या बोलण्यानं गुदगुल्या व्हायच्या."पर नित्रास कसला झोपतुया ? लग्नात झालेल्या खर्चाची उद्यापासनं भागवाभागीव करायला लागणार हाय." वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर घरची सगळी जबाबदारी तानाजीवर आली होती. त्यावेळी हा उमदापुरा विशीत होता.दोन बहिणी लग्नाला आलेल्या.वडिलांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी काढलेलं कर्ज फेडणार तोवर दोन्ही बहिणींची लग्नं.त्यानंतर त्यांची माहेरपणं,जावयांना पहिल्या सणाचा मानपान झाला. - बहिणींची बाळंतपणं झाली.वडिलांच्या माघारी पोरींना काहीही कमी पडलं नाय पायजे म्हणून आईची तळमळ.या सगळ्याचा गाडा ओढायला तानाजीला शेतीचाच काय तो आधार होता.त्यात खतांचा खर्च,पाण्याचा खर्च,कामगारांची मजुरी,कधी मधी पावसानं किंवा टोळधाडीनं दगा दिला की जिवाला घोर.पिकांना,जनावरांना औषधपाण्याचा खर्च जाऊन उरलेल्या पैशातनं घर चालवायचं.वर्षभर पुरंल इतकं ज्वारी,तांदूळ शेतात पिकवायचं.दूध-दुभत्याचा घरखर्चाला मोठा आधार व्हायचा.घरात बाकी कसली उधळपट्टी नसली तरी सणासुदीला कपडालत्ता,तेल-तिखट,मीठ-मसाला तोच काय तो विकत आणायचा.आठवड्याला दोनदा मटण पायजेच असा काही हट्ट नव्हता. देवादिकांच्या नावाखाली कधीच गाडी करून फिरणं नाही.महिनोन्महिने शहराचं तोंड बघायचा नाही.मग गाठीला चार पैसं उरायचं.
काटकसर करून जनावरांसाठी गोठा बांधला. गोबरगॅसही बांधला.घराची डागडुजी करून लग्नाला आलेल्या पाहुण्यांसह नातेवाईकांना बसा उठायला जागा केली.तुमची पोरगी आमच्या घरी खाऊन-पिऊन सुखी राहील याची खात्री पाहुण्यांना वाटंल अशी सोय केली;पण तानाजीचं लग्न काही केल्या ठरत नव्हतं.मुलींच्या मुलाकडून दांडग्या अपेक्षा असायच्या.पोरगा दहा हजार पगारावर कुठंतरी शिपाई असला तरी चालंल पर शेतकरी नको.शहरात नोकरी पाहिजे अन् गावाकडं शेती पाहिजे,अशी मागणी करणाऱ्या पोरी शेती करणाऱ्या तानाजीसोबत लग्नाला तयार होतील का? खेड्यात राहिलं तर शेण काढावं लागणार. शेतात जावं लागणार.त्यापेक्षा शहरात राहिलं की, कसं सासू-सासरा गावात राहून शेती करणार. शहरात भाड्याच्या घरात राजा-राणीसारखं राहणार.मागं सरक म्हणायला सासू जवळ नको... लिपस्टिकनं चोच रंगवून चिमणी पाणीपुरी खाणार, सिनेमाला जाणार.दोघांच्यापुरता स्वयंपाक केला की,राणी टी.व्ही. बघत दिवस घालवणार.मग दोन दिवसांपूर्वी तोडलेली भाजी विकायला भाजीपाला दारावर आला की,रोख पैशानं मिळंल ती भाजी घेणार.कुजलेल्या पेंढीतली मूठभर भाजी निवडणार.पिशवीतलं दूध दारात येतं ते पाणी मिसळून उकळून उकळून पुरवणार.उन्हात जायला नको,
चेहऱ्यावर डाग नको,अंगाला घाम नको,मग घरचं ताजं दूध खरपूस तापवून रबरबीत साय मिळाली नाही तरी चालंल.
बांधावरचा पावटा नको की ताजा शेवगा नको.शेतातल्या ताज्या भाजीपेक्षा फ्रीजमधली फ्रेश भाजी खाऊ;पण शहरात राहू म्हणणारी पोरगी तानाजीला लग्नाला नकारच द्यायची.
शेती करतोय म्हणून पोरी लग्नाला नकार देतायत तर शेती विकून शहरात घर घ्यावं का? शहरातल्या एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या बंगल्यात माळी म्हणून नोकरी करायची.
तर त्यांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त दहा दिवसाला दूधाचं बिल मिळतंया.कुणी मागं सरक म्हणायची धमक नाय.शेतात राबला की पोटाला भूक लागती,रात्रीला शांत झोप लागती.ना रक्तदाब ना साखर वाढती,ना ढेरी सुटती.रोज संध्याकाळी आईच्या सेवेला हजर अन् आईच्या हातच्या जेवणाची चव ढाब्यावरच्या जेवणाला कधीच येणार नाय आसं म्हणत तानाजी कोणतरी मिळंल जिला शेतकरी नवरा आवडंल याची वाट बघत होता.
गेल्या महिन्यात तो योग जुळून आला. शिकल्या सवरल्याली शारदा तानाजीसोबत लग्न करायला तयार झाली.शारदाचं आई-वडील शेतमजूर.चार बहिणींच्या पाठीवर त्यांना मुलगा झाला.पाय ठेवायला स्वतःची शेती नाही तरी पोरींना झेपल तेवढी शाळा शिकविली.थोरल्या तिघींच्या लग्नात खर्चामुळं आधीच घाईला आलेल्या वडिलांनी चौथ्या नंबरच्या शारदाचं लग्न जरा उशिराच करायचं ठरवलं.तोवर तिला पुढं काहीतरी कोर्स कर म्हणून सांगितलं.म्हणून शारदानं नर्सचा कोर्स केला आणि दवाखान्यात नोकरीला लागली.पोरीच्या पगारामुळं आधीच्या लग्नाचा कर्जाचा डोंगर उतरला;पण तिच्या कमाईवर डोळा ठेवून तिचं लग्न मुद्दाम उशिरा करतोय अशी कुजबूज शेजारी-पाजारी करायला लागलं.
स्वाभिमानी बापाला हे खटकायला लागलं म्हणून त्यानं शारदाच्या लग्नाचा विषय सुरू केला.घरची परिस्थिती नसताना माझ्या बापानं मला शिक्षण दिलं,मग मी त्याला हातभार लावला तर बिघडलं कुठं? या शारदाच्या प्रश्नाचं उत्तर तिच्या वडिलांकडं नव्हतं;
पण तुझ्या संसाराची जबाबदारी तू वेळीच तुझ्या खांद्यावर घे.नवरा कमवून आणणार आणि घरात बसून फक्त पीठ मळून खायला घालणार असं न म्हणता,नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात न डगमगता बरोबरीनं उभं राहिलं पायजे.सासर हे आपलं माहेरच आहे असं समजून संसार कर,असं संस्कार असणारी शारदा तानाजीच्या नशिबात आली.
आज गोंधळ झाला की,पहिल्यांदा नवरा-नवरी त्यांच्या खोलीत जाणार म्हणून माडीवरच्या खोलीची सजावट सुरू होती.त्यात आज लोडशेडिंगमुळं लाईट नव्हती.कुठं गॅसबत्ती,
कुठं कंदील,मेणबत्ती तर कुठं चार्जिंगच्या बॅटरीचा उजेड पाडून लोकांना जेवायला वाढायचं सुरू होतं. उशिरा जेवायला येणारे काही महाभाग देशीचा डोस चढवूनच आले होते.रश्यात मिळणाऱ्या मटणाच्या फोडीला चापचत रस्साभात वरपत होते.ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं, सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,
शिल्लक दुसरा भाग पुढील लेखामध्ये…वाघीण प्रतिक पाटील स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर,या मधील एकुण ११ कथा प्रकाशित झालेल्या आहेत.आपण त्या आवर्जून वाचल्या त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व धन्यवाद…विजय गायकवाड
३/७/२५
काम हीच देणगी \ Work is a gift
थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या खालच्या मजल्यावर आलो.जेसनने सगळे सामान बाजूला काढले होते.गस् पुढे गेला,पार्किंग केलेला त्याचा डीलक्स पिक-अप ट्रक आणून त्याने दारात आमच्यापुढे उभा केला.असलं वाहन बोस्टनमध्ये क्वचितच बघायला मिळतं.मी आणि मागरिटसाठी त्याने दार उघडले.आणि जेसनकडे वळून म्हणाला,
"नुसता उभा नको राहूस.त्या बॅगा चढव ट्रकमध्ये."
जेसनने सगळे सामान ट्रकच्या मागच्या भागात चढवलं आणि संकोचून विचारलं,"मी कुठे बसू ?"
गस् म्हणाला,"बस तिकडेच मागे.नाहीतर ये चालत. मला काही फरक पडत नाही."
गस् वर चढला आणि ट्रक चालवू लागला.जेसन मागच्या भागात सामानामध्ये अवघडून बसला. गस्ने जोरात ट्रक सुरू केला.त्याचे गचके त्याला बसत होते.
गस् त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या रँचकडे चालला होता.आम्ही रेडच्या आठवणी काढत होतो. जेसनबाबत रेड जी भरपाई करू बघत होता त्याविषयी मदत करण्याची तयारी बोलून दाखवत होतो.पुढचे चार आठवडे गस् जेसनला कामाची नीती शिकवणार होता.आम्ही दुसऱ्या दिवशीच ऑस्टिनला जायला निघणार होतो.दुसऱ्या एका अशिलाचे काम आम्हाला करायचे होते.
संपतो की नाही,असं वाटायला लागलेला खडबडीत रस्ता एकदाचा संपून आम्ही वळण घेतले.काही अंतर गेल्यावर पाटी होती,गस् कॉल्डवेल यांचे रँच. मित्रांचे स्वागत आहे.
अवैध प्रवेश करणाऱ्यांना गोळी घालण्यात येईल.
त्याचे कामगार आणि खूप सारी कुत्री होती.गस्ने मी आणि मागरिटला आरामशीर घराकडे नेले.मागे वळून जेसनला ओरडून म्हणाला,"नुसता ट्रकमध्ये बसू नकोस.सामान घे खाली." कॉल्डवेल-रँचमधे दुसरा दिवस सकाळी लवकर सुरू होईल असं मला आणि मागरिटला गस्ने सांगितले.जेसनला जरा दमात घ्यायचं,त्याने ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी,मागरिट आणि कॉल्डवेलच्या सर्व कुटुंबियांनी सहाच्या आधीच दणदणीत नाश्ता केला.आम्ही कॉफीचा दुसरा कप घेत होतो तेव्हा गस् म्हणाला,"मी जाऊन
त्या निद्रासुंदरीला घेऊन येतो.आजचा दिवस मजेदार जाईल,
खरोखरी शिकवणीचा.तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते!"
गस् जिना चढतानाचा आवाज ऐकला आम्ही.त्याने धाडकन जेसनच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाजही ऐकला.
मोठ्या आवाजात तो ओरडला, "काय रे गड्या,जिवंत आहेस ना ? इथं दिवसभर झोपून रहतोयस ? चल उठ,कपडे कर अन् ये खाली."
छान कडक कॉफीचा स्वाद घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.तेवढ्यात गस् येऊन बसला. पाठोपाठ काही वेळातच झोपाळलेला जेसनही आला.टेबलाशी येऊन तो बसला न बसला तोच गस् उभा राहून म्हणाला,"मस्त झाला नाश्ता.चला कामाची वेळ झाली."
जेसनने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले.आणि तो भांडखोर स्वरात म्हणाला, "मला मिळेल का नाश्ता ?"
गस् जरासा हसला अन् म्हणाला,"उद्या सकाळी प्रथम सकाळी सकाळी गस् कॉल्डवेलच्या घरातून भुकेल्या अवस्थेत कोणी कधी बाहेर पडत नाही. पण दिवसभर कोणी झोपून राहिलं तर मी काहीच करू शकत नाही."
खिडकीतून बाहेर बघत जेसन म्हणाला,"अजून उजाडलंही नाहीये."
गस्ने गालात जीभ फिरवली आणि म्हणाला,"छान निरीक्षण आहे तुझं.मला वाटलं मला प्रत्येक गोष्ट शिकवायला लागते की काय ? त्या कोठीच्या खोलीकडे जा अन् तुला तिथे कामावर जाताना घालायचे कपडे मिळतात का बघ.तुझ्या अंगावरचे हे कपडे त्यासाठी अगदी अयोग्य आहेत. आपल्याला पाच मिनिटात निघायचं आहे."
जेसनला त्याच्या कामाच्या ठिकाणी सोडून मी आणि मागरिट यांना ऑस्टिनला जाण्यासाठी घेऊन जायचे गस्ने कबूल केले.आम्ही ऑस्टिनला जाण्यापूर्वी जेसनने कामाला सुरूवात केल्याचं आम्ही बघणार होतो.आम्ही ट्रकच्या पुढच्या भागात बसेपर्यन्त जेसन धावतच खोलीकडून आला आणि सहजपणे मागील भागात जाऊन बसला.तो बसतो न बसतो तोच गस्ने जोरात ट्रक चालू करून, फाटकाबाहेर पडून,एका मैदानातून जाऊन मग थांबवला.सूर्य उगवत होता तेव्हा गस् रँचच्या दूरच्या एका कोपऱ्यात गेला.तिथे कुंपणाला लावण्याच्या खांबांचा एक मोठा ढीग जमिनीवर पडला होता. गस्ने ट्रकमधून खाली उडी मारली आणि मोठ्याने म्हणाला,"अरे ए,त्या बिछान्याबाहेर पड.असा मिळेल तिथे पडून रहाणारा कोणी मी याआधी पाहिला नाही."
गस् आणि जेसनच्या मागे मी आणि मागरिट चालायला लागलो.दृष्टीच्या टप्प्यात खूप दूरवर शेवटच्या खांबाच्या जागेपर्यन्त गेलो.गस् अभिमानाने सांगत होता,"कुंपणाचा हा 101 वा खांब.तुमचं स्वागत असो." चटकन् त्याने खांबासाठी खड्डा कसा खणायचा,खांब कसा रोवायचा आणि तार कशी खेचून घ्यायची याचं प्रात्यक्षित जेसनला दाखविले.
पंचाहत्तरीतही त्याची ताकद व जोम विश्वास बसणार नाही असा होता. सगळ्या गोष्टी कशा सहज आहेत हे त्यामुळे दिसत होते.जेसनकडे बघून तो म्हणाला,"तू कर बरं आता प्रयत्न.
ट्रकजवळ मी आणि मागरिटच्या जवळ येऊन तो उभा राहिला.
जेसन कसाबसा धडपडत कामाला लागला.त्याच्या हालचाली गंमतीदार दिसत होत्या."एक तर हे करण्याचं तुला हळू हळू जमेल;नाहीतर तू धडपडत बसशील.दुपारच्या जेवणासाठी कोणीतरी येईल आणि तुला घेऊन जाईल."
घाबरून जेसन ओरडला,"किती लांब आहे हे कुंपण ?" मला आणि मागरिटला ट्रकमध्ये चढताना हात देत गस् म्हणाला,
"फार तर मैलभर.मग आपण दुसऱ्या दिशेने करायचं काम.
काळजी करू नको. भरपूर काम आहे तुला करायला.
ककुंपणाच्या एकेका खांबासाठी जर का एकेक डॉलर मिळाला असता तर मी आणि त्या भल्या रेड स्टीव्हन्सने सर्व टेक्ससभर खणलं असतं."
जेसनला कामावर सोडून आम्ही निघालो.
जवळजवळ चार आठवड्यांनी मी आणि मागरिट आमचं काम यशस्वीपणे करून ऑस्टीनमधल्या टेक्सस या राजधानीच्या गावाहून परतलो.पुन्हा गस्नं आमचं विमानतळावर स्वागत केलं,दोन तासाच्या त्या रँचपर्यंत पोचण्याच्या प्रवासात न राहवून मी विचारलं,"कसं चाललंय जेसनचं ?"
गस् गालात जीभ फिरवून म्हणाला,"मला खात्री वाटत नव्हती,तो पार पाडेल अशी.दमवणारं ऊन, किडे,उन्हाळी गळवं,घामोळं यामुळे ते सोपं नव्हतच.पण तुम्हाला सुखद धक्का मिळणार आहे."
रँचवर पोचताच जेसन पहिल्या दिवशी कामाला लागला तिकडेच गस्ने आम्हाला नेले.मी पाहिले, कुंपण खूप दूरवर घातलं गेलं होतं.आणि जेसन दिसत नव्हता.आणखी दूरवर गस्ने आम्हाला नेले. थोडं चढून गेल्यावर दूरवर जेसन दिसला मला.आश्चर्यकारक बदल झाला होता त्याच्यात.उन्हामुळे तो रापला होता,कष्ट करून हटकला होता.आणि आम्ही येईपर्यन्त कामात व्यवस्थित दंग होता. आम्ही ट्रकमधून उतरताच हात उंचावून आमच्याकडे आला.
मी विचारलं,"हे सगळे खड्डे खणून त्यात खांब तू रोवलेस की काय ?"
बोलताना त्याच्या डोळ्यात चमक होती."हो,मीच प्रत्येक खांब रोवलाय.आणि एका सरळ रांगेत आहेत ते."
जेसनच्या खांद्यावर हात ठेवून गस् म्हणाला,"तू करशील की नाही असं वाटत होतं,पण तू मस्तच काम केलंस.साठ एक वर्षांपूर्वीच मला आणि रेडला कळलं की अशा प्रकारचं काम उत्तम दर्जाचं आणि अभिमानास्पद केलं तर तुम्ही नंतरच्या आयुष्यात काहीपण करू शकता.मला वाटतं तू हा धडा शिकलास.आता तू बोस्टनला परतू शकतोस."
जेसन उत्तरला,"हा टप्पा संपवायला थोडंच काम उरलंय.उद्या सकाळी निघालं तर ?" मला या उत्तराने धक्काच बसला.
दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर गस्ने आम्हाला विमानतळावर सोडले.जेसनने कर्तव्यदक्षतेने सामान पोर्चपर्यन्त आणून ठेवले.पण यावेळी गस्ने ट्रक ऐवजी नवी कॅडिलॅक बाहेर काढली होती.
जेसनने हसून विचारले,"मिस्टर कॉल्डवेल,ट्रक कुठाय तुमचा ?"
गसूने हसून उत्तर दिले,"माझ्या एका उत्तम कामगाराला सामानाच्या ट्रकमधून नेववणार नाही मला.चला निघूया विमानतळाकडे.
तीस हजार फूट उंचीवरून,अमेरिकेच्या मध्य भागावरून आम्ही उडत होतो.रेड स्टीव्हन्सने जेसनला कष्टाबाबत जो धडा शिकवला ते विचार मनात घोळत होते.हा धडा माझ्या मनावर ठसला तसाच जेसनच्या मनावरही ठसू दे म्हणजे झालं.
०१.०७.२५ या लेखातील दुसरा भाग…
१/७/२५
काम हीच देणगी \ Work is a gift
आस्थेने काम करणाऱ्याला कष्ट जाणवत नाहीत.
मी कबूल करतो की पुढचे आठवडे माझे मन उत्सुक आणि अस्वस्थ होते.पण पुढच्या महिन्याची पहिली तारीख आली आणि सर्व संपले.
ऑफीसमध्ये बसून मी इतर कामे करीत बसलो होतो.त्यात मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो.पण मनाच्या कोपऱ्यात जेसन स्टीव्हन्स थोड्याच वेळात यायचा आहे हे वाटत होतं.
शेवटी फोन खणखणला आणि जेसन स्टीव्हन्स कॉन्फरन्स रूममध्ये बसला आहे ही बातमी मिस हेस्टिंग्जने सांगितली.
मी जरूर त्या फायली घेतल्या आणि कपाटातला रेड स्टीव्हन्सचा तो खोका मिस मागरिटने काढला.आम्ही दोघे कॉन्फरन्स रूममध्ये गेलो,तो तिथे टेबलावर पाय ठेऊन खुर्चीत रेलून जेसन बसला होता.मी खोलीत पलिकडे गेलो आणि टेबलावरचा तो खोका मिस् मागरिटच्या दिशेने असा जोरात सरकवला की मध्ये आलेल्या जेसनच्या पायावर तो आदळला आणि त्याचे पाय आपोआप कॉन्फरन्स टेबलावरून खाली गेले.
मी म्हणालो, "गुड मॉर्निंग जेसन,अरे खुर्ची मिळवून तू छान बसला आहेस.फर्निचरचा नीट वापर कसा करायचा ते काही जणांना नीट कळतच नाही."
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्रासिक नजरेने माझ्याकडे बघत तो म्हणाला, "सरळ इथल्या कामाला सुरूवात करू या ना ? मला खूप कामे पडली आहेत.खूप लोकांना भेटायचे आहे."
मी मोठ्याने हसून म्हटलं, "अरे, तुला कामं पडली आहेत आणि लोकांना भेटायचं आहे असा माझा अंदाज आहेच.पण तुला वाटतं तसंच ते काही नसेलही."
मी दुसरी टेप काढून मागरिटजवळ दिली.व्हिडिओ प्लेअरमध्ये ठेवून तिने प्लेअर सुरु केला.क्षणभरातच त्या मोठ्या पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी दिसायला लागली. तो म्हणाला, "गुड मॉर्निंग टेड अन् मिस हेस्टिंग्ज, हे जरा कंटाळवाणं काम स्वीकारल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो,आणि जेसन,मी पुन्हा एकदा तुला नियमांची आठवण करून देतो.पुढील वर्षात ठरलेल्या वेळी समजा कधी तू आला नाहीस किंवा तुझं वागणं मिस्टर हॅमिल्टनला खटकलं तर तो हा सगळा खटाटोप थांबवून टाकील आणि तुला माझ्या सर्वोत्तम देणगीला मुकावं लागेल."
"मी तुला मिस्टर हॅमिल्टनबाबत सावध करतो.तो शांत,खूप सहनशील असलेला दिसतो खरा,पण तू त्याला फार जर ताणलस,त्याचा अंत पाहिलास तर मात्र आपण पिंजऱ्यातून एक गुरकावणारा वाघ बाहेर काढलाय समज."
गोंधळलेल्या नजरेने जेसनने माझ्याकडे पाहिले.मी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले.
रेड जरासा थांबला.गतकाळातल्या आठवणी त्याला येत होत्या.पुढे तो म्हणाला, "जेसन, मी तुझ्याहून बराच लहान होतो तेव्हा एक साधा दोन अक्षरी शब्द 'काम' यापासून मिळणारं समाधान मी शिकलो होतो.माझ्या विशाल संपत्तीमुळे तू आणि सगळे कुटुंबीय एका आनंदाला मुकले आहेत. दिवसभर घाम गळेपर्यन्त काम करण्यात केवढीतरी मजा असते."
खोल उच्छ्वास टाकत गरागरा डोळे फिरवणारा जेसन मी बघत होतो.
रेडचं बोलणं चालू होतं. "तू खोलात जाण्याअगोदर मी जे सांगणार आहे ते तू धिक्कारण्याआधी मला तुला सांगायचंय की माझ्याकडे जे सर्व आहे किंवा तुझ्या कडे जे जे आहे ते सर्व मी कष्ट करून मिळवलं आहे.हे तू पक्क लक्षात ठेव.तुमच्या जवळ जे जे आहे ती तुमची कमाई हे तुम्हाला अज्ञात ठेवून तुमचा आनंद हिरावून घेतलाय मी. मी त्यासाठी दिलगीर आहे."
"लुइझियाना,तो दलदलीचा प्रदेश,माझ्या तेथील अगदी सुरवातीच्या आठवणी म्हणजे केलेले काबाडकष्ट.त्या लहान वयात कंबरडं मोडेपर्यन्त करावे लागणारे कष्ट अगदी नको वाटत.माझ्या आईवडिलांना खूप माणसांना जेवू-खाऊ घालावं लागायचं आणि उत्पन्न तर तुटपुंज.मग आम्हाला खायला हवं,तर काम करणं आलंच.मी नंतर टेक्ससला आलो.
आणि स्वावलंबी झालो.तेव्हा लक्षात आलं की मेहनत करणं माझ्या अंगात मुरलंय.आणि उर्वरित आयुष्यात मी त्यातून आनंदच घेऊ लागलो."
"जेसन,जगात मिळण्यासारख्या सगळ्या उत्तम गोष्टी तुला मिळाल्या आहेत.सगळीकडे हिंडलास, सर्व काही बघितलंस,सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या तुला.एक गोष्ट नाही मिळाली तुला.
आपल्या कष्टांनी या गोष्टी मिळवण्यातला आनंद नाही मिळाला तुला. तुला फुरसद मिळते ती कष्टाचं फळं म्हणून,काम टाळण्याचा मार्ग म्हणून नव्हे."
"मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् मागरिट यांच्याबरोबर उद्या सकाळी तुला एका छोट्या प्रवासाला जायचंय.
अल्पाईन,टेक्ससच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या रँचवर माझा एक जुना मित्र रहातो. त्याला तू भेटायचं आहे.मंदीच्या काळात,माझ्या तरूणपणी जिवंत रहाण्यासाठी झगडावं लागत होतं,तेव्हा मला गस् कॉल्डवेल भेटला.तेव्हा आम्हाला दाबून काम करण्यातली ताकद म्हणजे काय ते समजलं. हा धडा तुला शिकवायला त्याच्या सारखा दुसरा कोणी नाही."
"मी आधीच गस कॉल्डवेलला एक पत्र लिहून परिस्थिती कशी आहे ते कळवलं आहे.मिस्टर हॅमिल्टनने ते पत्र अल्पाईन,टेक्ससला पाठवून दिलं आहे.गस् कॉल्डवेल तुझी वाट पहात असेल."
"नीट लक्षात ठेव.केव्हाही माझ्या मृत्युपत्रात दर्शवल्याप्रमाणे तू वागला नाहीस किंवा तुझ्या वर्तनामुळे मिस्टर हॅमिल्टन दुखावला गेला तर ही सारी धडपड लगेच थांबवली जाईल.आणि तू सर्वोत्तम देणगीला मुकशील."
पडदा अंधारला.
"हे हास्यास्पद आहे." जेसन रागाने माझ्यावर खेकसला.मी हसून म्हटलं,"तुझ्याशी वागणं तसं त्रासदायकच आहे.पण रेड स्टीव्हन्ससारख्या मित्राखातर अशा काही गोष्टी कराव्या लागतात. सकाळी पावणेसात वाजता मी तुला विमानतळावर भेटतो."
जेसनने माझ्याकडे अशा नजरेने बघितले की मी जणू मंदबुद्धि माणूस असावा.तो म्हणाला, "नंतरच्या वेळेत नाहीत का उड्डाणं ?"
मला वाटलं होतं त्यापेक्षा मी शांतपणे उत्तरलो, "हो. आहेत ना.पण मिस्टर कॉल्डवेलला वेळ घालवण मुळीच आवडत नाही,कळेलंच नंतर तुला ते.तर मग भेट्या उद्या."
जेसन ऑफिसमधून गेला आणि मिस् मागरिटने जरूर ती व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी विमानतळावरचा सेवक दारं बंद करण्याच्या बेतात होता झोपाळलेल्या अवस्थेतला जेसन स्टीव्हन्स प्रवाशांच्या चौकातून दौडत आला.मागरित सेवकाला तिकिटे दिली आणि आम्ही विमानात बसलो.
विमानात पहिल्या वर्गाच्या पहिल्या दोन सीट्स मी आणि मागरिट यांच्या होत्या.आम्ही तिथे जाऊन बसलो.जेसन गोधळून उभा होता,कारण पहिल्या वर्गात आता रिकामी नव्हती.
माझ्याकडे पाहून तो म्हणाला,"मला कुठंय जागा ?"
त्याच्या या प्रश्नाला मागरिटने तिच्या खास कमावलेल्या शैलीत उत्तर दिले.मला ठाऊक होतं तसं करताना तिची सारखी करमणूक होत होती.ती म्हणाली, "मिस्टर स्टीव्हन्स तुम्हाला सीट नं. एफ् 23 मिळाली आहे."
जेसनला तिने तिकिटाचा फाडलेला भाग दिला. पाय आपटत तो साध्या वर्गात जाऊन बसला.
मिडलँड-ओडेसा विमानतळावर आम्ही विमानातून बाहेर पडलो.आम्हाला न्यायला गस् कॉल्डवेल आला होताच.रेड स्टीव्हन्सचा मित्र आणि सहचर म्हणून मी गेल्या काही वर्षांपासून त्याला ओळखत होतो.आम्हा दोघांचा जिवलग मित्र समान असल्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटत होता.हस्तांदोलन करताना त्याने माझा हात असा छान दाबला की त्याचे वय जणू पस्तीस वर्षांचे होते. तो तर पंचाहत्तरीचा आहे हे मला माहीत होते. मागरिटला त्याने विनम्र अभिवादन केले. पण जेसनच्या बाबत मात्र तो जरा करडाच वागला.
जेसनला तो म्हणाला, 'रेड स्टीव्हन्स मी बघितलेल्यात सर्वात मस्त माणूस होता. तु कसं काय निभावून नेणार आहेत कोण जाणे ?"
जेसन त्याच्या या भावनाशून्य स्वागताला काही उद्धट उत्तर देण्याच्या आत गस् त्याला ओरडला, "अरे,तिकडे खाली जाऊन सामान का शोधून काढत नाहीस ? जरा उपयोग होऊ दे की तुझा." ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल )
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…