थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या खालच्या मजल्यावर आलो.जेसनने सगळे सामान बाजूला काढले होते.गस् पुढे गेला,पार्किंग केलेला त्याचा डीलक्स पिक-अप ट्रक आणून त्याने दारात आमच्यापुढे उभा केला.असलं वाहन बोस्टनमध्ये क्वचितच बघायला मिळतं.मी आणि मागरिटसाठी त्याने दार उघडले.आणि जेसनकडे वळून म्हणाला,
"नुसता उभा नको राहूस.त्या बॅगा चढव ट्रकमध्ये."
जेसनने सगळे सामान ट्रकच्या मागच्या भागात चढवलं आणि संकोचून विचारलं,"मी कुठे बसू ?"
गस् म्हणाला,"बस तिकडेच मागे.नाहीतर ये चालत. मला काही फरक पडत नाही."
गस् वर चढला आणि ट्रक चालवू लागला.जेसन मागच्या भागात सामानामध्ये अवघडून बसला. गस्ने जोरात ट्रक सुरू केला.त्याचे गचके त्याला बसत होते.
गस् त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या रँचकडे चालला होता.आम्ही रेडच्या आठवणी काढत होतो. जेसनबाबत रेड जी भरपाई करू बघत होता त्याविषयी मदत करण्याची तयारी बोलून दाखवत होतो.पुढचे चार आठवडे गस् जेसनला कामाची नीती शिकवणार होता.आम्ही दुसऱ्या दिवशीच ऑस्टिनला जायला निघणार होतो.दुसऱ्या एका अशिलाचे काम आम्हाला करायचे होते.
संपतो की नाही,असं वाटायला लागलेला खडबडीत रस्ता एकदाचा संपून आम्ही वळण घेतले.काही अंतर गेल्यावर पाटी होती,गस् कॉल्डवेल यांचे रँच. मित्रांचे स्वागत आहे.
अवैध प्रवेश करणाऱ्यांना गोळी घालण्यात येईल.
त्याचे कामगार आणि खूप सारी कुत्री होती.गस्ने मी आणि मागरिटला आरामशीर घराकडे नेले.मागे वळून जेसनला ओरडून म्हणाला,"नुसता ट्रकमध्ये बसू नकोस.सामान घे खाली." कॉल्डवेल-रँचमधे दुसरा दिवस सकाळी लवकर सुरू होईल असं मला आणि मागरिटला गस्ने सांगितले.जेसनला जरा दमात घ्यायचं,त्याने ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी,मागरिट आणि कॉल्डवेलच्या सर्व कुटुंबियांनी सहाच्या आधीच दणदणीत नाश्ता केला.आम्ही कॉफीचा दुसरा कप घेत होतो तेव्हा गस् म्हणाला,"मी जाऊन
त्या निद्रासुंदरीला घेऊन येतो.आजचा दिवस मजेदार जाईल,
खरोखरी शिकवणीचा.तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते!"
गस् जिना चढतानाचा आवाज ऐकला आम्ही.त्याने धाडकन जेसनच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाजही ऐकला.
मोठ्या आवाजात तो ओरडला, "काय रे गड्या,जिवंत आहेस ना ? इथं दिवसभर झोपून रहतोयस ? चल उठ,कपडे कर अन् ये खाली."
छान कडक कॉफीचा स्वाद घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.तेवढ्यात गस् येऊन बसला. पाठोपाठ काही वेळातच झोपाळलेला जेसनही आला.टेबलाशी येऊन तो बसला न बसला तोच गस् उभा राहून म्हणाला,"मस्त झाला नाश्ता.चला कामाची वेळ झाली."
जेसनने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले.आणि तो भांडखोर स्वरात म्हणाला, "मला मिळेल का नाश्ता ?"
गस् जरासा हसला अन् म्हणाला,"उद्या सकाळी प्रथम सकाळी सकाळी गस् कॉल्डवेलच्या घरातून भुकेल्या अवस्थेत कोणी कधी बाहेर पडत नाही. पण दिवसभर कोणी झोपून राहिलं तर मी काहीच करू शकत नाही."
खिडकीतून बाहेर बघत जेसन म्हणाला,"अजून उजाडलंही नाहीये."
गस्ने गालात जीभ फिरवली आणि म्हणाला,"छान निरीक्षण आहे तुझं.मला वाटलं मला प्रत्येक गोष्ट शिकवायला लागते की काय ? त्या कोठीच्या खोलीकडे जा अन् तुला तिथे कामावर जाताना घालायचे कपडे मिळतात का बघ.तुझ्या अंगावरचे हे कपडे त्यासाठी अगदी अयोग्य आहेत. आपल्याला पाच मिनिटात निघायचं आहे."
जेसनला त्याच्या कामाच्या ठिकाणी सोडून मी आणि मागरिट यांना ऑस्टिनला जाण्यासाठी घेऊन जायचे गस्ने कबूल केले.आम्ही ऑस्टिनला जाण्यापूर्वी जेसनने कामाला सुरूवात केल्याचं आम्ही बघणार होतो.आम्ही ट्रकच्या पुढच्या भागात बसेपर्यन्त जेसन धावतच खोलीकडून आला आणि सहजपणे मागील भागात जाऊन बसला.तो बसतो न बसतो तोच गस्ने जोरात ट्रक चालू करून, फाटकाबाहेर पडून,एका मैदानातून जाऊन मग थांबवला.सूर्य उगवत होता तेव्हा गस् रँचच्या दूरच्या एका कोपऱ्यात गेला.तिथे कुंपणाला लावण्याच्या खांबांचा एक मोठा ढीग जमिनीवर पडला होता. गस्ने ट्रकमधून खाली उडी मारली आणि मोठ्याने म्हणाला,"अरे ए,त्या बिछान्याबाहेर पड.असा मिळेल तिथे पडून रहाणारा कोणी मी याआधी पाहिला नाही."
गस् आणि जेसनच्या मागे मी आणि मागरिट चालायला लागलो.दृष्टीच्या टप्प्यात खूप दूरवर शेवटच्या खांबाच्या जागेपर्यन्त गेलो.गस् अभिमानाने सांगत होता,"कुंपणाचा हा 101 वा खांब.तुमचं स्वागत असो." चटकन् त्याने खांबासाठी खड्डा कसा खणायचा,खांब कसा रोवायचा आणि तार कशी खेचून घ्यायची याचं प्रात्यक्षित जेसनला दाखविले.
पंचाहत्तरीतही त्याची ताकद व जोम विश्वास बसणार नाही असा होता. सगळ्या गोष्टी कशा सहज आहेत हे त्यामुळे दिसत होते.जेसनकडे बघून तो म्हणाला,"तू कर बरं आता प्रयत्न.
ट्रकजवळ मी आणि मागरिटच्या जवळ येऊन तो उभा राहिला.
जेसन कसाबसा धडपडत कामाला लागला.त्याच्या हालचाली गंमतीदार दिसत होत्या."एक तर हे करण्याचं तुला हळू हळू जमेल;नाहीतर तू धडपडत बसशील.दुपारच्या जेवणासाठी कोणीतरी येईल आणि तुला घेऊन जाईल."
घाबरून जेसन ओरडला,"किती लांब आहे हे कुंपण ?" मला आणि मागरिटला ट्रकमध्ये चढताना हात देत गस् म्हणाला,
"फार तर मैलभर.मग आपण दुसऱ्या दिशेने करायचं काम.
काळजी करू नको. भरपूर काम आहे तुला करायला.
ककुंपणाच्या एकेका खांबासाठी जर का एकेक डॉलर मिळाला असता तर मी आणि त्या भल्या रेड स्टीव्हन्सने सर्व टेक्ससभर खणलं असतं."
जेसनला कामावर सोडून आम्ही निघालो.
जवळजवळ चार आठवड्यांनी मी आणि मागरिट आमचं काम यशस्वीपणे करून ऑस्टीनमधल्या टेक्सस या राजधानीच्या गावाहून परतलो.पुन्हा गस्नं आमचं विमानतळावर स्वागत केलं,दोन तासाच्या त्या रँचपर्यंत पोचण्याच्या प्रवासात न राहवून मी विचारलं,"कसं चाललंय जेसनचं ?"
गस् गालात जीभ फिरवून म्हणाला,"मला खात्री वाटत नव्हती,तो पार पाडेल अशी.दमवणारं ऊन, किडे,उन्हाळी गळवं,घामोळं यामुळे ते सोपं नव्हतच.पण तुम्हाला सुखद धक्का मिळणार आहे."
रँचवर पोचताच जेसन पहिल्या दिवशी कामाला लागला तिकडेच गस्ने आम्हाला नेले.मी पाहिले, कुंपण खूप दूरवर घातलं गेलं होतं.आणि जेसन दिसत नव्हता.आणखी दूरवर गस्ने आम्हाला नेले. थोडं चढून गेल्यावर दूरवर जेसन दिसला मला.आश्चर्यकारक बदल झाला होता त्याच्यात.उन्हामुळे तो रापला होता,कष्ट करून हटकला होता.आणि आम्ही येईपर्यन्त कामात व्यवस्थित दंग होता. आम्ही ट्रकमधून उतरताच हात उंचावून आमच्याकडे आला.
मी विचारलं,"हे सगळे खड्डे खणून त्यात खांब तू रोवलेस की काय ?"
बोलताना त्याच्या डोळ्यात चमक होती."हो,मीच प्रत्येक खांब रोवलाय.आणि एका सरळ रांगेत आहेत ते."
जेसनच्या खांद्यावर हात ठेवून गस् म्हणाला,"तू करशील की नाही असं वाटत होतं,पण तू मस्तच काम केलंस.साठ एक वर्षांपूर्वीच मला आणि रेडला कळलं की अशा प्रकारचं काम उत्तम दर्जाचं आणि अभिमानास्पद केलं तर तुम्ही नंतरच्या आयुष्यात काहीपण करू शकता.मला वाटतं तू हा धडा शिकलास.आता तू बोस्टनला परतू शकतोस."
जेसन उत्तरला,"हा टप्पा संपवायला थोडंच काम उरलंय.उद्या सकाळी निघालं तर ?" मला या उत्तराने धक्काच बसला.
दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर गस्ने आम्हाला विमानतळावर सोडले.जेसनने कर्तव्यदक्षतेने सामान पोर्चपर्यन्त आणून ठेवले.पण यावेळी गस्ने ट्रक ऐवजी नवी कॅडिलॅक बाहेर काढली होती.
जेसनने हसून विचारले,"मिस्टर कॉल्डवेल,ट्रक कुठाय तुमचा ?"
गसूने हसून उत्तर दिले,"माझ्या एका उत्तम कामगाराला सामानाच्या ट्रकमधून नेववणार नाही मला.चला निघूया विमानतळाकडे.
तीस हजार फूट उंचीवरून,अमेरिकेच्या मध्य भागावरून आम्ही उडत होतो.रेड स्टीव्हन्सने जेसनला कष्टाबाबत जो धडा शिकवला ते विचार मनात घोळत होते.हा धडा माझ्या मनावर ठसला तसाच जेसनच्या मनावरही ठसू दे म्हणजे झालं.
०१.०७.२५ या लेखातील दुसरा भाग…