ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं,सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,...०४.०७.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…
काही केल्या चावंनाच झालंया.शेजाऱ्याच्या लग्नात सुनंचं कौतुक करणारं वाडपी आपल्या ओळखीच्या माणसाला कोपऱ्यात बसवून भात वाढायच्या नावाखाली मटणाची पळी ओतायचे.ते बघून बाजूची मंडळी चिमटा काढायची.त्याकडं दुर्लक्ष करून अंधारात काय वाढलं कळलंच नाय म्हणून वेळ मारून न्यायचे.
घड्याळाचा काटा आकराच्या पुढं गेला तरी पंगती सुरूच होत्या.गोंधळाच्या जेवणाला आलेलं शारदाच्या माहेरचं मुराळी तिला दुसऱ्या दिवशी माहेरी घेऊन जाणार होतं.
कारण,आषाढ सुरू होणार होता आणि आषाढात नववधूनं महिनाभर माहेरीच रहायचं असतं,हा परंपरागत अलिखित नियम अमलात आणला जात होता.तशी तानाजीच्या आयुष्यात आजची रात्र एक नवी पहाट घेऊन येणार होती.
जेवणावळीत आता ही शेवटची पंगत होती.तिथं बाहेरची माणसं बसलेली.त्यानंतर घरातली वयस्कर मंडळी आणि बायका जेवायला बसणार होत्या.तानाजीचं पाहुण्यांसोबत जेवण आटपलं.घरची पंगत बसली.घरच्या मंडळींसाठी आचाऱ्यानं बाजूला काढून ठेवलेली मटणाची परात पुढं केली.इतक्यात लाईट आली आणि सगळ्यांना आनंद झाला.घरचे जेवत असताना तानाजीच्या ध्यानात आलं की,विहिरीवरची पाण्याची मोटर सुरू करून उसाला पाणी सोडून यायचं,म्हणजे रातभर लाईट आहे तोवर शेताला पाणी मिळंल.सकाळी परत लाईट जाणार.कारण,मायबाप सरकारनं तो नियमच केल्याला.शहराला दिवसा आणि शेताला रात्री लाईट मिळायची.शहरात दिवसभर विविध कार्यालयात कामकाज सुरू असतं.त्यामुळं त्यांना दिवसभर सुरळित वीजपुरवठा झाला पाहिजे. दिवसभर काम करून थकून भागून सगळे घरी जाऊन आरामात आपापल्या परिवारासोबत झोपतील तेव्हा शेतकरी शेतात पिकाला पाणी पाजून धान्य पिकवील.ऊस पिकवील.जनतेला अन्न आणि चहाला साखर पुरवील.
खरं तर इतक्या उशिरा शेतात जायची तानाजीची पण इच्छा नव्हती;पण मनगटावर हळकुंड आहे तोवर घरातून बाहेर जायचं नाही म्हणून चार दिवस झालं घरातच बांधून घातल्यागत झालं होतं त्याला. घरची सगळी मंडळी ताटावर बसल्यात तोवर मोटर सुरू करून उसाच्या सरीचं दारं मोडून लगेच यायचं असं त्यानं ठरवलं.जाऊन पटकन् परत यायचं म्हणून त्यानं मोटारसायकल घेतली.आधीच पावसानं दडी मारली हुती आणि लग्नाच्या धांदलीत शेताला पाणी पाजायला उशीर झालेला म्हणून गाडीवर मागच्या सीटवर खोरं घेऊन तानाजीचा दोस्त महेश बसला.
घरच्यांना ही दोघं कुणीकडं चाललीत याचा अंदाज येण्याआधी गाडी अंधार कापत पुढं गेली.इतक्या रात्री शेतावर जाणं तानाजीसाठी नवीन नव्हतं;पण लग्नानंतर पहिल्या रात्री पैपाहुणं घरात असताना आपण जाणं बरं नाय,असं सगळीजण म्हणायला लागली.
तानाजीच्या घरात त्याच्याशिवाय दसर शेती करणारं कोणीच नव्हतं.मी घरात थांबतो तुम्ही शेतात जावा असं भावकीतल्या कुणाला सांगणार कसं? म्हणून चटकन् जाऊन येऊ म्हणत तानाजी सटाकला. घरात सजवलेली खोली आणि शारदाचा देखणा चेहरा दोन्हीपण त्याच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हतं.विहिरीच्या काठावर गाडी उभा करून मोटर सुरू केली.परत गाडी सुरू करून उसाच्या बांधाजवळ आला.
पाण्याचा पाट शेतातनं पुढं दुसऱ्याच्या रानात चालला होता.झटकन् दारं मोडून पाणी आपल्या उसात वळवायचं.
मग रातभर पाणी शेतात फिरत बसतंया.सकाळी लाईट गेली की मोटर आपोआप बंद होईल.
पाटात उतरायला तानाजीनं पँट गुडघ्यापर्यंत वर केली.
डोक्याला टावेल गुंडाळला.खोरं हातात घेतलं आणि त्यानं उसाच्या सरीत पाय टाकला.पटापट तीन-चार खोरी ओढून पाट वळविला.पाणी उसाच्या सरीत शिरलं.पुढं जाणारं पाणी आता थांबलं हुतं.तिकडचा गाळ वढून दारं पुन्हा पाण्याच्या दाबानं फुटू नयेत म्हणून हातानं गाळ ओढून लावला.वाहत्या पाण्यात हात-तोंड धुतलं. डोक्याला गुंडाळलेला टावेल सोडून तोंड पुसत खोरं उचललं आणि महेशच्या हातात दिलं.
पाटातला पाय उचलून वाहत्या पाण्यात खंगाळून उसाच्या बुडक्याला वाळक्या जागेत टाकला.दुसरा पाय बांधावर टाकणार तवर उसाच्या बुंध्याला सळकन आवाज आला.
काही कळायच्या आत पायाच्या पोटरीला काय टोचलं म्हणून मागं बघितलं तसा तानाजी ओरडला, "आरं,मह्या साप..." बॅटरी घेऊन उभा असणारा महेश दचकून पुढं आला,तर मनगटाएवढा नाग फणा काढून उसात शिरला. तानाजीच्या पायावर डास चावल्यागत दोन खुणा स्पष्ट दिसू लागल्या.
महेशनं चटकन् टावेल मांडीजवळ घट्ट बांधला आणि मोटरसायकलला किक मारली.खोरं तिथंच टाकून तानाजी गाडीवर बसला.महेशनं गाडी वाऱ्यागत गावाच्या दिशेनं पळवली.गाडीवर बसल्या बसल्या तानाजीनं गावातल्या गुरवाला फोन करून देऊळ उघडायला सांगितलं.महेशच्या भावाला फोन करून त्याच्या घरची कोंबडीची आठ-दहा पिल्लं देवळात आणायला सांगितली.पिल्लांचा आवाज ऐकून गल्लीत कालवाकालव सुरू झाली.गडबडीत महेशचा भाऊ बोलून गेला की,तानाजीला पान लागलंय,विहिरीजवळ पाणी पाजताना नाग चावला.बातमी वाऱ्यागत गावभर पसरली. तानाजीच्या घरची पंगत नुकतीच उठली होती.
बायका जेवणाची भांडी घासत हुत्या.तवर कोणतरी हळूच सांगितलं अन् बायकांनी हंबरडा फोडला.काय झालंय कुणाला कळायच्या आधी सगळा लोंढा देवळाकडं पळायला लागला.गावातल्या कर्त्या माणसांनी बायकांना पुढं येण्यास मनाई केली.अशावेळी शिवाशिव नको अपशकून होईल म्हणाले.कोणतरी गर्दीत बोलून गेलं.अपशकून कसला नागीन पहिल्याच रात्री तानाजीला डसली. निष्पाप पोराचा घात केला.अवदसा कुठनं आली आणि पोराच्या आयुष्यात विष कालवलं. बोलण्याचा सूर शारदाच्या दिशेला चालला. वेळकाळ बघून काहीजण समजूत घालायला लागलं;पण जे काही झालंय याची शारदाला भणकच नव्हती.फक्त काहीतरी अघटित घडलंय इतकंच तिच्या कानावर आलं हुतं.
देवळात पुजाऱ्यानं कोंबडीची पाच-सहा पिल्लं तानाजीच्या पायाला डंख मारला होता तिथं लावली.ती सगळी झटक्यात गप झाली.पिल्लं संपत आली तरी असर कमी येत नव्हता.
अजून पिलांची जुळवाजुळव सुरू झाली.तानाजीच्या बहिणींनी हंबरडा फोडला अन् गावातल्या बायकांच्या सुरात सूर मिसळून शारदाला पांढऱ्या पायाची म्हणून घराबाहेर ओढायला लागल्या.तसा सगळा प्रकार घरातल्या लोकांना कळला. तानाजीची आई आक्रोश करायला लागली.
पतीच्या जाण्यानं निष्ठूर झालेल्या घरात आता कुठं आनंदाची बासरी वाजली होती,ती या नागिणीसाठी पुंगी वाजली की काय ?
शारदानं स्वतःला सावरत संसारसटातील भांड्यात मांडलेली नवीकोरी सुरी घेतली.काहीजणांना वाटलं आता ही जीव देणार.तिला आडवायला जाणाऱ्यांना तानाजीच्या बहिणींनी मागं ढकललं. 'मरू दे तिला,पण माझा भाऊ जगला पायजे...' हे वाक्य शारदाच्या कानठळ्या बसवून गेलं.ती तडक देवळात घुसली.इतर बायकांना आत येण्यापासनं आडवणारी मंडळी शारदाचा अवतार बघून मागं सराकली.देवळात खांबाला टेकून बसलेल्या तानाजीच्या समोर शारदा उभा राहिली.तिला बघून डोक्याला हात लावून बसलेला तानाजी सावध झाला.शारदानं डोळ्यांत डोळं घालून बघितलं. तानाजीनं गालात हसून आपण ठीक असल्याचं खुणावलं.शारदानं कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता हातातल्या सुरीनं डंक मारलेल्या ठिकाणी कापून जखम मोठी केली.रक्त भळाभळा वहायला लागलं.तसं तानाजीच्या मस्तकात जोराची कळ गेली.दाबून जेवढं रक्त निघंल तेवढं तिनं काढलं. जास्त दाबलं की तानाजीला दुखायला लागलं. शारदानं हातातली सुरी टाकून दिली.जखमेतलं रक्त तोंडानं वढून थुकायला सुरू केलं.बघणाऱ्या लोकांनी मात्र तोंडावर हात ठेवला.तेवढ्यात गर्दीतून कोणतरी बडबडलं.जी नागीन डसलीया तिनंच विष उतरवलं.काय ते पोरीच धाडस, नवऱ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला.हीच खरी सावित्री. गर्दीत कोणी कौतुक केलं तर कोणी कुचेष्ठा. शारदानं जमेल तेवढं काळंनिळं रक्त काढून टाकलं.घामानं डबडबलेल्या शारदानं शेवटच्या थुकीत निव्वळ लाल रक्त आल्यालं बघितलं आणि नवऱ्याकडं डोळं भरून बघत गालावर एक स्मित आणलं.नवऱ्याच्या गालावरनं हात फिरवत त्याच्या कानात, "जगलो वाचलो तर पुन्हा भेटू..." असं म्हणत शारदानं तानाजीच्या छातीवर डोकं ठेवलं. तिथंच ती बेशुद्ध पडली.दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर आपण आषाढ पाळायला माहेरी जाणार नाही असं सांगितलं आणि तानाजीच्या बहिणींना सासरी पाठविलं…
समाप्त…