सेंट फ्रेंन्सिस रोमन चर्चचा आनुषंगिक पुत्र होता,
तर डान्टे रोमन चर्चचा खरा म्हणजे संपूर्ण अर्थाने पुत्र होता.सेंट फ्रेंन्सिसच्या मोठेपणाशी त्याच्या कॅथॉलिक असण्याचा संबंध नव्हता.तो मुसलमान असता,ज्यू असता वा बुद्धधर्मी असता तरीही त्याने आपल्या जीवनाचे दैवी काव्य लिहिलेच असते. त्याचा मोठेपणा अभिजात होता.तो गुण,ते एका विशिष्ट धर्माचा वा पंथाचा असल्यामुळे आलेला नव्हता.तो कॅथॉलिक होता ही केवळ योगायोगाची गोष्ट होती.पण डान्टेचा मोठेपणा त्याच्या कॅथॉलिक पंथीय असल्यामुळेच आहे.
डान्टे कॅथॉलिक नसता तर त्याला 'इन्फर्नो' हे महाकाव्य लिहिता आले नसते.नरकाची व भीषण शिक्षांची वर्णनेही करता आली नसती.सेंट फ्रेंन्सिस मानवजातीची उत्कृष्टता दाखवितो;तर डान्टे रोमन कॅथॉलिक पंथाची उत्तमता दाखवितो. सेंट अॅन्सिस हे मानवजातीच्या वेलीवरील सुगंधी व निर्दोष फूल आहे,डान्टे हे कॅथॉलिक धर्माच्या वेलीवरचे फूल आहे.
 कॅथॉलिक,बिन कॅथॉलिक,सर्वांसच सेंट फ्रेंन्सिस वाचवू पाहतो.या जगातील दुःखांतून त्या सर्वांचीच सुटका करण्यास धावतो;पण डान्टे काही अपवादात्मक कॅथॉलिक व्यक्ती सोडून बाकी सर्वांना परलोकीच्या नरकाग्नीत लोटून देतो!
सेंट फ्रेंन्सिसचा आवाज सर्व काळासाठी आहे. त्याची वाणी सर्व युगांसाठी;आहे पण डान्टे केवळ मध्ययुगाची भाषा बोलतो,फक्त मध्ययुगाचा पुरस्कार करतो,त्याचे महाकाव्य चर्चचे गुण,दोष दोन्ही दाखविते...मध्ययुगात मनातील सौंदर्य व कडवेपणा दोहोंचेही संपूर्ण चित्र तो देतो. 
मध्ययुगातील भलेबुरे,दोन्ही रंगवतो.मध्ययुगातील मन डान्टेचे कॅथॉलिकपंथीय मन उत्कट प्रेम करी, तद्वतच उत्कट द्वेषही करी,चर्चमधल्या सर्व गोष्टींवर मन प्रेम करी;पण चर्चबाहेरील जगाचा मात्र द्वेष व तिटकारा करी.तो द्वेषप्रेमामुळेच होता.प्रत्येक कॅथॉलिकास असे शिकविण्यात येत असे की, ईश्वराचे आपल्या लेकरांवर प्रेम असल्यामुळेच तो त्यांना शिक्षा करतो.जे चुकतील.्पदच्युत होतील,त्यांना तो प्रेमाने कठोर शासन करतो.ईश्वराच्या या प्रेमाचे अनुकरण करणारे हे मध्ययुगातील कॅथॉलिकही त्यांना जे चुकलेले वाटत,त्यांचा छळ करीत;त्यांना मार मारीत. 'यांच्या आत्म्यांचा बचाव व्हावा म्हणून,
यांच्यावर आमचे प्रेम आहे,म्हणूनच आम्ही यांना छळतो व ठार करतो',असे ते म्हणत. 
जी. के.चेस्टर्स्टन आपल्या 'सेंट फॅन्सिस' या पुस्तकात लिहितो,"माणसावर प्रेम करणे व त्याला ठार मारणे यात विसंगती नाही." चेस्टर्टन हा आजकालच्या कॅथॉलिसिजमचा आचार्य आहे. चेस्टर्टनच्या मध्ययुगीन मनाला तेराव्या शतकातील ते मन नीट समजते.डान्टेला नरकात पडणाऱ्यां विषयी करुणा वाटे.फॅन्सिस्का ऑफ रिमिनि ही व्यक्ती त्याला लहानपणापासून माहीत होती. त्याचे फ्रेंन्सिस्कावर प्रेम होते; पण त्याने फॅन्सिस्कास नरकातच लोटले आहे. डान्टेला का करुणा नसे वाटत? वाटे;पण आपल्या पापांसाठीच त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे,
त्यांचा अमानुष छळ होत आहे,या विचाराने डान्टेला एक प्रकारचा आनंद वाटतो;तो छळ पाहून त्याचे डोळे ओले होत नाहीत! तो पाहण्यात त्याला नकळत जणू एक प्रकारच दुष्ट समाधान वाटते! आणि त्यांची ती पापे तरी खरीखुरी होती का ? डान्टेच्या मते मात्र ती त्यांची पापेच होती व म्हणून तो त्यांना भराभरा नरकवासाच्या शिक्षा ठोठावतो.त्या सर्वांचा छळ व्हावा अशी प्रभूचीच इच्छा आहे असे त्याला वाटे. डान्टे ज्या चर्चचा प्रतिनिधी होता,त्या चर्चप्रमाणेच तोही ईश्वराची इच्छा काय आहे,एवढे सांगूनच थांबत नसे,तर स्वतः शिक्षा देणारा व ठार मारणारा ईश्वराचा 
अंमलदारही बने.
डान्टेचे हृदय विश्वकवीचे होते;पण त्यांचे मन मात्र मध्ययुगातील पाद्र्याचे होते.
मध्ययुगातील इतिहासाचा आत्मा नीट 
समजावयाला हवा असेल,तर डान्टेचे मन समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.कारण मध्ययुगाचा आत्मा म्हणजेच डान्टे म्हणून या बाबतीत मी जरा विस्ताराने लिहीत आहे.
सेंट फ्रेंन्सिसच्या मृत्यूनंतर एकोणचाळीस वर्षांनी म्हणजे सन १२६५ मध्ये डान्टे जन्मला.बायबल पढविण्यासाठी जनतेला वळवू पाहणारे इनिक्कझिशन त्याच्या जन्मापूर्वी चौतीस वर्षे निर्माण झाले होते.डान्टेचा बाप फ्लॉरेन्स येथे वकील होता.त्याची वकिली छान चालत होती. डान्टेला लहानपणी प्रामुख्याने तीन गोष्टी शिकविण्यात आल्या.... १. आपल्या देवाची पूजा करणे, २. आपल्या शहराशी एकनिष्ठ राहणे, ३. आपल्या चर्चसाठी लढणे.जगात दोन प्रकारचे लोक आहेत.ईश्वराचे आवडते असे ख्रिश्चन व त्याचे नावडते ख्रिश्चनेतर.ख्रिश्चन धर्मी नसलेल्यांनी ख्रिश्चन धर्म सक्तीने वा स्वेच्छेने स्वीकारला,तर देव त्यांच्यावरही प्रेम करील.
ईश्वराच्या लाडक्यांसाठी त्याचा स्वर्ग होता;
ईश्वराच्या नावडत्यांसाठी त्याचा नरक होता.
प्रभूची प्रीती वा प्रभूचा द्वेष होईल तद्नुसार इकडून तिकडे वा तिकडून इकडे पाऊल टाकण्याची पायरी म्हणून स्वर्ग व नरक या दोहोंच्या दरम्यान पर्गेटरी असे.या सर्व गोष्टी डान्टेला शिकविण्यात आल्या;व त्या सर्व त्याला खऱ्या वाटल्या.त्याला त्या म्हणजे केवळ कल्पित कादंबरी असे वाटत नसे.त्याच्या मनासमोर स्वर्ग,
नरक व पर्गेटरी ही जणू नकाशातील निश्चित स्थाने होती! माणसे मरणोत्तर या तीन जागांपैकी कोठे तरी निश्चित जातात,असे त्याला वाटे.
ऑस्टेलिया स्वतः कधीही पाहिला नसतानाही भूगोल वाचणारांना खरा वाटतो,तद्वतच डान्टेला स्वर्ग,नरक व पर्गेटरी ही ठिकाणे वाटत.डान्टेचे भूगोलाचे अचूक पुस्तक म्हणजे बायबल !
मानवजातीची कथा, हेन्री थॉमस, अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन 
बायबलमधील शब्द न् शब्द जसा डान्टेला खरा वाटे,तद्वतच अॅरिस्टॉटलचे लिहिणेही तो वेदवाक्य समजे ! मध्ययुगातील कॅथॉलिक,प्लेटो व 
अॅरिस्टॉटल यांचे भक्त होते हे मोठे आश्चर्य होय. 
मध्ययुगातील कॅथॉलिक धर्म म्हणजे बाप्तिस्मा; देवाला जणू प्लेटोचा धर्म आहे.ख्रिश्चनांना ग्रीक तत्त्वज्ञानाचे ज्ञान मुसलमान व ज्यू यांनी करून दिले.अर्थात,कॅथॉलिकांनी या बाबतीत मुसलमान व ज्यू यांचे ऋणी राहिले पाहिजे.मुसलमानांनी सारे ग्रीक ज्ञान अरेबीत आणले होते.अरेबीतून ते ज्यूंनी लॅटिनमध्ये आणले.रोमन कॅथॉलिकांना सुसंस्कृत व प्रगल्भ अशी एकच भाषा समजे,ती म्हणजे लॅटिन, डान्टेने अॅरिस्टॉटलचा भाषांतराच्या द्वारेच अभ्यास केला.पुष्कळदा तो अॅरिस्टॉटलच्या अर्थाचा अनर्थही करी.ग्रीकमधून अरेबीच्या द्वारा लॅटिनमध्ये आलेले भाषांतराचे भाषांतर वाचूनच डान्टे ग्रीक विचारांशी परिचित झाला होता.
अॅरिस्टॉटल व प्लेटो यांच्यापासून डान्टे शिकला की, आत्मा ईश्वरापासून खाली संसारात आला असून पुन्हा ईश्वराकडे माहेराला जाण्यासाठी सदैव धडपडत असतो. "आकाशातून पडणारे पाणी ज्याप्रमाणे बाष्प होऊन पुन्हा आकाशाकडे जाते, तद्वतच या आत्म्याचे आहे.ईश्वराजवळून खाली आलेला हा आत्मा देहाच्या बंधनात पडून अधःपतित होतो;त्याला देहासक्ती जडते व तो खाली जातो,हे जीवन म्हणजे देहाच्या भुका व आत्म्याच्या क्षुधा यांमध्ये सतत चाललेला झगडा होय.आत्म्याचा आवाज व वासनांचा आवाज यांमधील हे चिरंतन युद्ध आहे.इंद्रियांना निर्भयपणे नकार द्या,म्हणजे आत्मा शुद्ध होत जाईल; आत्म्याच्या आशा-आकांक्षा शुद्ध होत जातील. ऐहिक सुखाचा त्याग करून दैवी,
आध्यात्मिक सुखाच्या मागे लागा.या ऐहिक सुखोपभोगांतच रमाल,तर तुमच्या आत्म्यावर इतकी वैषयिक पुटे चढतील की,नरकात घालूनच ती कश्मले जाळावी लागतील.ती जळाल्यानंतरच आत्मा पुन्हा झगमगीत सुवर्णाप्रमाणे होईल.
स्वर्गात प्रभूसमोर जाण्यापूर्वी जाळून घ्यावे लागेल."
अॅरिस्टॉटल व प्लेटो यांचे तत्त्वज्ञान याप्रमाणे मध्ययुगातील ख्रिश्चन नीतीत मिसळून गेले. स्वर्ग-नरकांचे हे तत्त्व,मानवी आत्मा आपल्याकडे ओढू पाहणारे हे स्वर्ग व नरक यांचे तत्त्वज्ञान डान्टेच्या तरुण व संस्कारक्षम मनावर खोल बिंबवले गेले होते.ग्रीक तत्त्वज्ञान व कॅथॉलिक धर्मशास्त्र यांचा त्याने पुरापुरा अभ्यास केला होता.त्याने विज्ञानाचे ज्ञान बायबलामधूनच घेतले होते. ज्या जगात तो राहतो,त्याची फारशी माहिती त्याला नव्हती.त्याचे या जगाचे ज्ञान जवळजवळ शून्यच होते. पण ज्या जगात मरायला तो जाणार होता, त्याचे ज्ञान आपणास भरपूर आहे असे त्याला वाटत होते.
स्वर्गाची राजधानी,अर्थात सोन्याचे जेरुसलेम शहर,तद्वतच नरकाची राजधानी डिस या दोहोंचीही माहिती त्याला तो राहत असलेल्या फ्लॉरेन्स शहराच्या माहितीपेक्षा अधिक होती.
डान्टे आपल्या शहरातील राजकारणात भाग घेत असे.तेराव्या शतकात फ्लॉरेन्समध्ये पोपच्या व सम्राटाच्या अनुयायांमध्ये लढाया होत असत.
डान्टे पोपच्या बाजूचा होता.कारण,त्याचा बापही त्याच पक्षाचा होता.पण वयाने वाढल्यावर काही पोपांचा अप्रामाणिकपणा तद्वतच त्यांची भीरुता पाहून तो विटला.त्याने पोपचा पक्ष सोडून सम्राटाचा पक्ष धरला.तो राजकीय क्षेत्रात भराभर वर चढत चालला.तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच फ्लॉरेन्समधील प्रमुख न्यायाधीशांपैकी एक निवडला गेला.पण पुढे दोनच वर्षांनी त्याचा पराजय झाला.त्या प्रक्षुब्ध काळात, बुध्दिहिन वासनाविकारांच्या व आंधळ्या भावनांच्या त्या काळात पराभूत होणे म्हणजे हद्दपार होणे,वा मरणेच असे.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….