* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ओंजळीतलं पाणी / Boiling water

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

५/७/२५

ओंजळीतलं पाणी / Boiling water

सकाळपासूनच तानाजीच्या घरात गडबड,गोंधळ सुरू होता.त्याचं लग्न होऊन आज चौथा दिवस होता.अगदी लग्नाच्या आधी दोन दिवस तयारीपासून पोटाला नीट दोन घास वेळेवर नाहीत की,डोळ्याला झोप नाही.अंग नुसतं शिणून गेलं होतं.कधी एकदाचं सगळं विधी संपतायत अन् कधी समाधानानं शांत झोपायला मिळतंय असं त्याला झालेलं.त्यात आज देवीचा गोंधळ घातलेला. सगळ्या गावाला मटणाचं जेवण केलेलं.एरवी घरटी एखादं माणूस जेवायला येतं;पण आज झाडून सारा गाव आलेला.


रीतिरिवाजाप्रमाणं लग्नानंतर देवीचा गोंधळ घालून तिच्या देवळाच्या मागं चार पायाचा बळी दिल्याशिवाय नवरा-नवरी एका खोलीत राहू शकत नव्हतं.मटणाचा रस्सा वरपून गावकरी खूश. जाताना तानाजीला चिमटा काढून जायची,

"काय मग? लय घाई झाली आसल आज झोपायची ? चार-पाच दिवस जागरण झालं नव्हं तुझं? आज झोप नित्रास..."


तानाजीला या बोलण्यानं गुदगुल्या व्हायच्या."पर नित्रास कसला झोपतुया ? लग्नात झालेल्या खर्चाची उद्यापासनं भागवाभागीव करायला लागणार हाय." वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर घरची सगळी जबाबदारी तानाजीवर आली होती. त्यावेळी हा उमदापुरा विशीत होता.दोन बहिणी लग्नाला आलेल्या.वडिलांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी काढलेलं कर्ज फेडणार तोवर दोन्ही बहिणींची लग्नं.त्यानंतर त्यांची माहेरपणं,जावयांना पहिल्या सणाचा मानपान झाला. - बहिणींची बाळंतपणं झाली.वडिलांच्या माघारी पोरींना काहीही कमी पडलं नाय पायजे म्हणून आईची तळमळ.या सगळ्याचा गाडा ओढायला तानाजीला शेतीचाच काय तो आधार होता.त्यात खतांचा खर्च,पाण्याचा खर्च,कामगारांची मजुरी,कधी मधी पावसानं किंवा टोळधाडीनं दगा दिला की जिवाला घोर.पिकांना,जनावरांना औषधपाण्याचा खर्च जाऊन उरलेल्या पैशातनं घर चालवायचं.वर्षभर पुरंल इतकं ज्वारी,तांदूळ शेतात पिकवायचं.दूध-दुभत्याचा घरखर्चाला मोठा आधार व्हायचा.घरात बाकी कसली उधळपट्टी नसली तरी सणासुदीला कपडालत्ता,तेल-तिखट,मीठ-मसाला तोच काय तो विकत आणायचा.आठवड्याला दोनदा मटण पायजेच असा काही हट्ट नव्हता. देवादिकांच्या नावाखाली कधीच गाडी करून फिरणं नाही.महिनोन्महिने शहराचं तोंड बघायचा नाही.मग गाठीला चार पैसं उरायचं.


काटकसर करून जनावरांसाठी गोठा बांधला. गोबरगॅसही बांधला.घराची डागडुजी करून लग्नाला आलेल्या पाहुण्यांसह नातेवाईकांना बसा उठायला जागा केली.तुमची पोरगी आमच्या घरी खाऊन-पिऊन सुखी राहील याची खात्री पाहुण्यांना वाटंल अशी सोय केली;पण तानाजीचं लग्न काही केल्या ठरत नव्हतं.मुलींच्या मुलाकडून दांडग्या अपेक्षा असायच्या.पोरगा दहा हजार पगारावर कुठंतरी शिपाई असला तरी चालंल पर शेतकरी नको.शहरात नोकरी पाहिजे अन् गावाकडं शेती पाहिजे,अशी मागणी करणाऱ्या पोरी शेती करणाऱ्या तानाजीसोबत लग्नाला तयार होतील का? खेड्यात राहिलं तर शेण काढावं लागणार. शेतात जावं लागणार.त्यापेक्षा शहरात राहिलं की, कसं सासू-सासरा गावात राहून शेती करणार. शहरात भाड्याच्या घरात राजा-राणीसारखं राहणार.मागं सरक म्हणायला सासू जवळ नको... लिपस्टिकनं चोच रंगवून चिमणी पाणीपुरी खाणार, सिनेमाला जाणार.दोघांच्यापुरता स्वयंपाक केला की,राणी टी.व्ही. बघत दिवस घालवणार.मग दोन दिवसांपूर्वी तोडलेली भाजी विकायला भाजीपाला दारावर आला की,रोख पैशानं मिळंल ती भाजी घेणार.कुजलेल्या पेंढीतली मूठभर भाजी निवडणार.पिशवीतलं दूध दारात येतं ते पाणी मिसळून उकळून उकळून पुरवणार.उन्हात जायला नको,

चेहऱ्यावर डाग नको,अंगाला घाम नको,मग घरचं ताजं दूध खरपूस तापवून रबरबीत साय मिळाली नाही तरी चालंल.

बांधावरचा पावटा नको की ताजा शेवगा नको.शेतातल्या ताज्या भाजीपेक्षा फ्रीजमधली फ्रेश भाजी खाऊ;पण शहरात राहू म्हणणारी पोरगी तानाजीला लग्नाला नकारच द्यायची.

शेती करतोय म्हणून पोरी लग्नाला नकार देतायत तर शेती विकून शहरात घर घ्यावं का? शहरातल्या एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या बंगल्यात माळी म्हणून नोकरी करायची.


 तर त्यांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त दहा दिवसाला दूधाचं बिल मिळतंया.कुणी मागं सरक म्हणायची धमक नाय.शेतात राबला की पोटाला भूक लागती,रात्रीला शांत झोप लागती.ना रक्तदाब ना साखर वाढती,ना ढेरी सुटती.रोज संध्याकाळी आईच्या सेवेला हजर अन् आईच्या हातच्या जेवणाची चव ढाब्यावरच्या जेवणाला कधीच येणार नाय आसं म्हणत तानाजी कोणतरी मिळंल जिला शेतकरी नवरा आवडंल याची वाट बघत होता.


गेल्या महिन्यात तो योग जुळून आला. शिकल्या सवरल्याली शारदा तानाजीसोबत लग्न करायला तयार झाली.शारदाचं आई-वडील शेतमजूर.चार बहिणींच्या पाठीवर त्यांना मुलगा झाला.पाय ठेवायला स्वतःची शेती नाही तरी पोरींना झेपल तेवढी शाळा शिकविली.थोरल्या तिघींच्या लग्नात खर्चामुळं आधीच घाईला आलेल्या वडिलांनी चौथ्या नंबरच्या शारदाचं लग्न जरा उशिराच करायचं ठरवलं.तोवर तिला पुढं काहीतरी कोर्स कर म्हणून सांगितलं.म्हणून शारदानं नर्सचा कोर्स केला आणि दवाखान्यात नोकरीला लागली.पोरीच्या पगारामुळं आधीच्या लग्नाचा कर्जाचा डोंगर उतरला;पण तिच्या कमाईवर डोळा ठेवून तिचं लग्न मुद्दाम उशिरा करतोय अशी कुजबूज शेजारी-पाजारी करायला लागलं.


स्वाभिमानी बापाला हे खटकायला लागलं म्हणून त्यानं शारदाच्या लग्नाचा विषय सुरू केला.घरची परिस्थिती नसताना माझ्या बापानं मला शिक्षण दिलं,मग मी त्याला हातभार लावला तर बिघडलं कुठं? या शारदाच्या प्रश्नाचं उत्तर तिच्या वडिलांकडं नव्हतं;


पण तुझ्या संसाराची जबाबदारी तू वेळीच तुझ्या खांद्यावर घे.नवरा कमवून आणणार आणि घरात बसून फक्त पीठ मळून खायला घालणार असं न म्हणता,नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात न डगमगता बरोबरीनं उभं राहिलं पायजे.सासर हे आपलं माहेरच आहे असं समजून संसार कर,असं संस्कार असणारी शारदा तानाजीच्या नशिबात आली.


आज गोंधळ झाला की,पहिल्यांदा नवरा-नवरी त्यांच्या खोलीत जाणार म्हणून माडीवरच्या खोलीची सजावट सुरू होती.त्यात आज लोडशेडिंगमुळं लाईट नव्हती.कुठं गॅसबत्ती,

कुठं कंदील,मेणबत्ती तर कुठं चार्जिंगच्या बॅटरीचा उजेड पाडून लोकांना जेवायला वाढायचं सुरू होतं. उशिरा जेवायला येणारे काही महाभाग देशीचा डोस चढवूनच आले होते.रश्यात मिळणाऱ्या मटणाच्या फोडीला चापचत रस्साभात वरपत होते.ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं, सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,


शिल्लक दुसरा भाग पुढील लेखामध्ये…वाघीण प्रतिक पाटील स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर,या मधील एकुण ११ कथा प्रकाशित झालेल्या आहेत.आपण त्या आवर्जून वाचल्या त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व धन्यवाद…विजय गायकवाड