live
मुख्यपृष्ठ
१९/७/२५
चांदणी रात / moonlit night
१७/७/२५
पैसा - एक देणगी \ Money - a donation
पैसा हे तर फक्त एक साधन.चांगल्यासाठी तो एक ताकद होऊ शकतो,काही भयानकासाठी ही,किंवा नुसता पडून राहिल्यास निरर्थक.
आयुष्यात कधी कधी अशा वेळा येतात,की आपण करतोय त्यातून काही निष्पन्न होणार आहे की नाही,या विषयी आपण साशंक असतो.अचानक,कुठूनतरी एक अगदी साधीशी-छोटीशी खूण मिळते आणि वाटतं की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.जेव्हा जेसन स्टीव्हन्स आमच्या दुसऱ्या मासिक सभेला आला,तेव्हा असंच घडलं.
कॉन्फरन्स रूममध्ये मी आणि जेसन आपापल्या ठराविक जागी बसून त्याच्या अल्पाईन ऑस्टिनमधल्या कामाच्या अनुभवाविषयी बोलत होतो.मिस् मागरिट कपाटामधला रेड स्टीव्हन्सचा खोका घेऊन आली. काही न सुचवता सांगता जेसनने खुर्चीतून उठून, मागरिटच्या हातातून खोका घेऊन टेबलाच्या टोकावर ठेवला.त्यात काय विशेष असं वाटेल किंवा अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल खूप जणांना,पण जेसनमध्ये प्रगती झालीय हे मला जाणवलं.नेहमी अशा छोट्या गोष्टींकडे त्याचं लक्ष नसायचं.ही घटना लहान असली तरी माझ्या मते सकारात्मक खूण होती.
त्या मोठ्या पडद्यावरनं रेड स्टीव्हन्स आमच्याकडे डोळे रोखून बघायला लागला.चेहऱ्यावर जरा मिस्कल भाव होते.गस् कॉल्डवेलच्या रँचवरच्या जेसनच्या कामाच्या अनुभवाबद्दल गस् च्या मनात ते भाव असतील अशी शंका मला चाटून गेली.
त्याचा आवाज घुमला."इडनचे नंदनवन,जे टेक्सस् म्हणून ओळखलं जातं,तिथून सुखरूप परतल्याबद्दल तुझं मी स्वागत करतो,जेसन.गस् कॉल्डवेलच्या संगतीत एक महिना काढलास तू.गळवं झालेले हात पाण्यात धरण्याचा उपयोग होतो नक्कीच."
मी जेसनकडनं चक्क अस्फूट हास्याचा आवाज ऐकला.रेडचे बोलणे चालू झाले."जगात सर्वात जास्त गैरसमज असलेल्या गोष्टीबद्दल,म्हणजेच पैशाबद्दलआज आपण बोलणार आहोत.पैशानं जे करता येतं ते दुसऱ्या कशानंही करता येत नाही.पण जगातल्या उरलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पैसा कस्पटासारखा भासतो "
"उदाहरणार्थ,जगातला अख्खा पैसा तुझ्या आयुष्याचा एक दिवस वाढवू शकत नाही.म्हणून तर तुला ही दृश्य फीत बघता येत्येय आत्ता.पैसा कुणाला सुखी करत नाही हे जाणणं फार महत्वाचं आहे.मी लगेच तुला हे ही सांगतो की गरिबी पण तुला सुखात ठेवणार नाही.मी श्रीमंत होतो.आणि गरीब होतो,आणि बाकी परिस्थिती तशीच असली तर श्रीमंत असणं दोहोत बरं."
आम्ही सगळे हसलो तेंव्हा.
रेडने जरा गंभीर भाव आणले आणि बोलणे चालू ठेवले.
"जेसन,पैसा काय चीज आहे,याची तुला कल्पना नाही.आणि त्याचे मोल,ही संकल्पना तुला माहीत नाही. तुझा दोष नाही हा,तो माझा दोष आहे.पण येत्या तीस दिवसात वास्तविक जगातल्या सामान्य लोकांच्या जीवनात पैसा काय चीज असते,ते तुला कळेल.जगात पुष्कळसे घातपात,
घटस्फोट,अविश्वास,तणाव याचे कारण पैसा या विषयीच्या समजुतीचा अभाव हे असते. या कल्पना तुला अजिबात ओळखीच्या वाटणार नाहीत (कळणार ही नाहीत),कारण आपण सहजपणे श्वासोच्छ्वास करून हवा घेतो तशा सहजपणे तुला पैसा मिळलाय.फक्त पुढचा श्वास घेत रहायचं एवढंच करायचं."
"तू पैशाची बऱ्यापैकी उधळपट्टी केली आहेस,हे मला माहीत आहे.त्याची जबाबदारी माझ्यावरच येते.त्याचं कारण मीच आहे,कारण काम आणि पैसा यांच्या विनिमयाचं नातं समजण्यापासून मी तुला वंचित ठेवलं. गेल्या महिनाभरात अगदी मामुली कामही नीट केलं तर, त्यापासून जे समाधान आणि अभिमान प्राप्त होतो त्याची लज्जत तुला चाखायला मिळाली.
बऱ्याच लोकांच्या कष्टांमध्ये पैशाचा उगम असतो.मला वाटतं, तुला हे समजू लागायला पाहिजे."
"गेल्या महिन्यात तू जे काम केलंस त्याबद्दल गस् कॉल्डवेलने तुला पैसे दिले असतील,तर तुला साधारण पंधराशे डॉलर मिळाले असतील.तुझ्या दृष्टिने ती मामुली,असून नसल्यासारखीच रक्कम असेल.पण तुला विश्वासाने सांगतो की हाच सध्याचा दर आहे.आज तू निघशील तेव्हा मिस्टर हॅमिल्टन तुला एक लिफाफा देतील.त्यात पंधराशे डॉलर्स आहेत.येत्या महिन्यात तू अशा पाच व्यक्ती निवडायच्या की या पंधराशे डॉलर्स पैकी काही रक्कम त्यांना दिली तर त्यांच्या आयुष्यात खरोखर फरक पडणार आहे.मला तुझ्या हे लक्षात आणून द्यायचं आहे,की पैशाची कमतरता आणि त्यामुळे असलेली चिंता यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो,एकदा का तू त्यांना पैसे दिलेस म्हणजे बघ त्यांच्या जीवनातल्या खऱ्या प्रश्नांवर त्यांना कसं लक्ष केन्द्रीत करता येतं "
"मला ठाऊक आहे आपले मित्र म्हणवणाऱ्यांच्या समवेत काही तासातच पंधराशे डॉलर्स उडवलेस तू.तेच पंधराशे डॉलर्स व्यवस्थितपणे वापरले तर काय होतं हे तू समजण्याची वेळ आली आहे."
"महिन्याच्या शेवटी तू मिस्टर हॅमिल्टनला अहवाल देशील.पाच प्रसंग असे सांगायचे की परिस्थिती काय होती आणि त्याबाबत तू काय कृती केलीस.पैसा ही एक देणगी आहे हा धडा तू शिकलास असे मिस्टर हॅमिल्टनना वाटले तर पुढच्या महिन्यात मी तुला भेटेन."पडद्यावरून रेडची प्रतिमा हळूहळू लुप्त झाली.आम्ही थोडा वेळ गप्प बसलो.नंतर जेसन माझ्याकडे वळून म्हणाला, "मी काय करायचं ते मला समजलंय असं वाटत नाही.मला कुठे अशी माणसं सापडणार आणि कसं काय...." त्याला थांबवत मी म्हटलं,"अरे,तू जसं ऐकलंस तसंच मी ऐकलंय,त्याच सूचना.आणखी जास्त माहिती किंवा मदत देण्याचा मला अधिकार नाही.तुझा काका तुला जे धडे शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्यातला हा धडा पण तुझा तुलाच शिकावा लागणार आहे रेड स्टीव्हन्स मोठा माणूस होता याची खात्री मी तुला देतो.आणि तू यशस्वी व्हावंस म्हणूनच तुला सर्व काही दिलंय."
रेडने सांगितल्याप्रमाणे खोक्यात एक पाकीट होते.ते काढून जेसनच्या हातात देत मी म्हटलं,"पुढच्या महिन्याच्या शेवटी किंवा त्याआधीच आम्ही तुझ्या भेटीची वाट बघतो."
गोंधळलेल्या चेहऱ्याने जेसन हळूहळू उठला.वळून दाराकडे गेला.काही वेळ मी आणि मिस हेस्टिंग्ज कॉन्फरन्स रूममध्ये थांबलो. शेवटी शांततेचा भंग करत ती म्हणाली,पाकिटातल्या त्या पैशाचं नक्की काय करायच हे त्याला नीट समजलय असं नाही वाटत मला.क्षणभर थांबून मी म्हटलं,"पैशांबद्दल आपण वर्षानुवर्षे शिकत आलोय.जेसन या शाळेत नवखा आहे.
त्याला खूप भरपाई करायची आहे."
पुढच्या महिन्याच्या शेवटी जेसनने संपर्क साधला.मी कबूल करतो की त्याच्या प्रगतीबद्दल मी साशंक होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ जेसनने ठरवून घेतली. ठरलेल्या वेळी जेसनला आदबीने घेऊन मागरिट माझ्या ऑफिसमध्ये आली.ती आणि जेसन माझ्या समोरच्या चामड्याने वेष्टित केलेल्या खुर्ध्यावर बसले.
जेसन जरा भांबावल्यासारखा दिसला.थोडा वेळ मी थबकलो.एका महिन्यात पाच जण शोधून पैशांच्या सहाय्याने त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करायला मला सांगितलं असतं तर मी काय केलं असतं असा विचार मनात आला.रेड स्टीव्हन्सचा कायदेशीर सल्लागार आणि इच्छापत्राचा व्यवस्थापक या माझ्या भूमिकेत मी शिरलो.करारपत्रात लिहिल्याप्रमाणे जेसनच्या हातून काही घडलं नसेल तर मला हा प्रवास तेथेच थांबवावा लागणार होता.जेसनच्या बाजूने बोलायचे झाले तर असं घडावसं वाटत नव्हते.आणि मी मान्य करतो की माझ्याही दृष्टिने तसे व्हायला नको होते.
शेवटी मी जेसनकडे वळून म्हणालो, "काय गड्या, रिपोर्ट द्यायची तयारी झालीय ना तुझी ?"
जेसनने मान हलवली आणि जाकिटाच्या आतल्या खिशातून एक चुरगळलेला कागद काढला.घसा साफ करून हळूहळू तो बोलायला लागला,"हे बरोबर आहे की नाही याची मला खात्री नाही.पण हे असं आहे खरं."
एकदा जरा उशिरा संध्याकाळी पार्किंग जागेत फंड जमा करण्यासाठी गाड्या धुणारी मुले दिसली.अंधार व्हायला लागला होता.त्यावरून त्यांचे दिवसाचे काम संपत आले असावे असा मी अंदाज केला.त्यांच्या व्यवस्थापकाला बोलावून चौकशी केली.ही मुले कोण आणि कशासाठी फंड गोळा करताहेत असं विचारल्यावर त्याने सांगितले की ती स्काऊटमधली मुले होती.
पुढच्या आठवड्यात त्यांना त्यांच्या जांबोरीला जायचे होते.फंड गोळा करण्याचा तो शेवटचा दिवस होता.आणि फंड थोडा कमी जमा झाला होता.परिणामी एक दोन मुलांना जाता येणार नव्हते.
म्हणून ती मुलं जरा निराश झाली होती. ठरवलेल्या रकमेपेक्षा किती पैसे कमी पडताहेत ते मी त्यांना विचारले. दोनशे डॉलरची तुट आहे असे त्यांनी खालच्या सुरात सांगितले.त्यांना ती जागा दहा मिनिटांत सोडावी लागणार होती.ठरावीक जागेत मी माझी गाडी उभी केली आणि मुलांना झटून काम करायला सांगितले,
त्यांची वेळ संपल्यावर मी एका मुलाजवळ दोनशे डॉलर्स दिले आणि गाडी घेऊन निघून गेलो
माझ्या संमतीच्या अपेक्षेने जेसनने माझ्याकडे पाहिले. त्याने पुढे चालू ठेवावे म्हणून मी फक्त मान हलवली.तो जरी चाचरत होता तरी कागदावर नजर टाकल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले होते.पुढे मी एका मॉलमध्ये जाऊन गाडी पार्क करण्यासाठी जागा बघत होतो.एका जुन्या गाडीपुढे एक तरूणी छोट्या बाळाला घेऊन उभी होती.तिच्या मागे गाड्या घेऊन जाणारा ट्रक उभा होता. ट्रकच्या तरूण ड्रायव्हरला ती तरूणी मोठ्या आवाजात काही सांगत होती.त्या दोघांचा वाद चालू असताना मी माझ्या गाडीतून तिथे पोचलो.थांबून काय चाललंय असं त्याना विचारताच तो तरूण म्हणाला की जुन्या गाड्या हफ्त्याने देणाऱ्या एबीसी देणाऱ्या एबीसी कंपनीत तो नोकरीला होता.त्या तरुणीने कर्जाचे दोन हफ्ते चुकविले होते.महिन्याला शंभर डॉलर्स असा हप्ता होता तसल्या टपराट गाडीसाठी.ती तरुणी रडत सांगू लागली की तिचे छोटे बाळ आजारी होते.तिची गाडी काढून घेतली असती तर तिला नोकरीला मुकावं लागणार होते. मग काय झालं असतं ते तिला काय माहीत ? किती कर्ज आहे तिच्या नावावर असे मी ट्रक ड्रायव्हरला विचारता प्रत्येकी शंभर डॉलर्सचे चार हफ्ते तिच्याकडून येणे असल्याचे त्याने सांगितले.मी त्याला चारशे डॉलर्स दिले. आणि पूर्ण रक्कम भरली गेल्याची पावती त्या तरूण आईलां देववली.ही बघा त्याची प्रत."
सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल
चुरगळलेली आणि दमट झालेली एक पावती त्याने डेस्कच्या काठावर ठेवली.त्याने बोलणे चालू ठेवले."मी मॉलमध्ये होतो तेव्हा एक तरूण,त्याची बायको आणि दोन छोटी मुले खेळण्यांच्या विभागात खरेदीसाठी घुटमळत होती.प्रत्येक मूल पुन्हापुन्हा विविध खेळण्यांची मागणी करत होते.आईवडील त्यांना सांगत होते की बहुधा यंदा सांताक्लॉज येणार नाही.कारण त्यांच्या वडिलांची नोकरी सुटली होती.दुसऱ्या दालनात मुले भुसा भरलेल्या प्राण्यांकडे बघत होती तेव्हा मी त्यांच्या आईजवळ जाऊन तीनशे डॉलर्स दिले आणि बजावले की यंदा सांताक्लॉज त्यांच्या घरी जरूर येणार आहे,नाही कसा ?मी मॉलमधून बाहेर पडत होतो तेव्हा माझ लक्ष बाकावर बसलेल्या एका म्हाताऱ्या बाईकडे गेले.मी जवळून जात होतो तेव्हा तिची पर्स खाली पडली.मी उचलून तिला दिली.ती रडत असल्याचं मी पाहिलं.तिला कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की ती आणि हॅरॉल्डने सत्तावन्न वर्षाचे वैवाहिक जीवन घालवले होते.आणि आयुष्यात प्रथमच कस जगायचं ही पंचाईत आली आहे.त्यांच्या हृदयासाठी घ्यायच्या गोळ्यांसाठी दरमहा साठ डॉलर्स लागतात.मॉलमधला औषधविक्रेता तिची अन्नाची कपन स्वीकारून त्याबदल्यात औषधे देत नाही आहे.दोनशे डॉलर्स खर्च करून मी हॅरॉल्डची तीन महिन्यांची औषधे घेतली. आणि वीस डॉलर्स उरले ते मी तिला देऊन त्यांचा आवडीचा खाद्यपदार्थ घेण्यास सांगितले.
जेसनने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले.मी हसलो आणि त्याला म्हणालो,"हे सारं ठीक आहे.पण तुला पाच उदाहरणं आणण्याची सूचना होती."
जेसन नेहमीपेक्षा नर्व्हस वाटला.तो म्हणाला,"एक दिवस गाडी चालवत असतांना रस्त्याच्या कडेला मी एक मोडकी गाडी पाहिली.मी बाहेर येऊन पाहिलं आणि ब्रायन नावाच्या एका तरूणाला भेटलो.तो जवळ जवळ माझ्याच वयाचा आहे.आम्हा दोघांमध्ये बऱ्याच समान गोष्टी आहेत असं आम्हाला आढळलं.मी माझ्या मोबाईलचा उपयोग करून गाडी ओढून नेणाऱ्या एका ट्रकला बोलावलं.त्यानी गाडी गॅरेजमध्ये नेली.तिथल्या दुरूस्ती करणाऱ्या मेकॅनिकने सांगितले की मशीन पार बिघडलं आहे आणि बदली करायला पाहिजे.ब्रायन अगदी घाबरून गेला.कारण त्याला शाळा आणि घर यामध्ये जा-ये करायला गाडीची गरज असायची. सातशे डॉलर्स खर्च येईल असे मेकॅनिकने सांगितले. ब्रायनला शॉक बसला कारण त्याच्याजवळ पैसे नव्हतेच.मी त्याला नवीन इंजिन घालायला लागणारे सातशे डॉलर्स दिले.
सदा तत्पर असणारी मिस हेस्टिंग्ज कापऱ्या आवाजात म्हणाली,
"सर याची बेरीज तर अठराशे डॉलर होते. मुळच्या पत्राप्रमाणे तर पंधराशे डॉलर्सचाच विनियोग करायचा होता."जेसन घाबराघुबरा होऊन खुर्चीत थोडा पुढे वाकून म्हणाला,"माझ्या पदरचे तीनशे डॉलर्स मी घातले.हरकत नाही ना?"
मला बोलायला अवसरही न देता मिस् हेस्टिंग्ज म्हणाली, "हो तर,बेशक.मिस्टर हॅमिल्टन उमदा आणि समजूतदार माणूस आहे." माझ्याकडे पहात म्हणाली, "हो ना,मिस्टर हॅमिल्टन ?"
न वाकणारी मागरिट आणि जेसन यांना मी उमदा आणि समजूतदार असल्याची खातरजमा दिली.आणि जेसन पैशाचे मोल हा महत्वाचा धडा शिकला.तो आपला धडा कधीच विसरणार नाही अशी आशा मला वाटली.मी पण कधी विसरणार नव्हतो.
१५/७/२५
उत्क्रांतीकडे वाटचाल \ Move towards evolution
यापूर्वी क्रिएशनच्या वेळी सगळे जीव एकदम तयार झाले असं चर्च सांगत होतं,तर काही लोक घाणीतून,सडलेल्या मांसातून जीव तयार होतात असंही म्हणत होते.लॅमार्क चूक असला तरी या सगळ्यांपेक्षा वेगळं आणि निदान जास्त तर्कवादी तरी बोलत होता.
सस्तन प्राणी,पक्षी,सरीसृप (सरपटणारे) प्राणी आणि मासे ही लिनियसनं मानलेले पहिले चार क्लासेस लॅमार्कनं एकाच 'व्हर्टिब्रेट' म्हणजेच 'पाठीचा कणा असलेल्या' या गटात टाकले. लिनियसनं मानलेल्या कीटक आणि वर्म्स या इतर दोन क्लासेसना लॅमार्कनं 'इनव्हर्टिब्रेट' या दुसऱ्या गटात टाकलं.वर्गीकरणाची ही पद्धत लवकरच प्रसिद्ध झाली.
याशिवाय,त्यानं आठ पायांच्या कोळ्यांना सहा पायांच्या कीटकांच्या गटात टाकणं किंवा लॉब्स्टरनं स्टारफिशच्या गटात टाकणं योग्य नाही हे सांगितलं.
१८१५ ते १८२२ च्या दरम्यान लॅमार्कनं 'नॅचरल हिस्ट्री ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांचा मोठा ग्रंथच लिहिला.या खंडानं आधुनिक 'इनव्हर्टिब्रेट झूऑलॉजी'चा पाया घातला.
या विषयाचा अभ्यास करतानाच खरं तर त्याच्या डोक्यात उत्क्रांतीची कल्पना आली होती.त्याबद्दल त्यानं आपल्या १८०१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिलं होतंच.
यानंतर १८०९ साली लॅमार्कनं 'झूऑलॉजिकल फिलॉसॉफी' लिहिलं.त्यात त्यानं तीन मुद्दे मांडले. एक म्हणजे जीव हे सतत शिडीतल्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करतात. याच प्रक्रियेत मग साध्या जिवातून जास्त गुंतागुंतीच्या वरच्या दर्जाचे जीव कालांतरानं तयार होतात.दुसरा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमुळे प्राणी काही अवयव जास्त वापरतो. ते मग बळकट होतात. उदाहरणार्थ, जिराफ उंच झाडांवरची पानं खाण्यासाठी मान उंच करतो आणि त्याची मान उंच होत जाते.प्राणी जे अवयव भरपूर वापरतात ते अवयव आकारानं आणि क्षमतेनं वाढतात आणि जे अवयव वापरत नाहीत ते नष्ट होतात.
आणि हे अवयवांचं वाढणं किंवा नष्ट होणं पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केलं जातं.हे आपल्या पुस्तकांत लॅमार्कनं सांगितलं होतं.हे समजावताना त्यानं त्या काळी नव्यानंच लक्षात आलेल्या जिराफाचं उदाहरण दिलं होतं.
हा प्राथमिक प्राणी अँटेलोप झाडाची पानं खाऊन जगायचा.
नंतर खालच्या भागातली पानं संपल्यामुळे आणखी आणखी वरच्या भागातली पानं खायला तो आपली मान उंच ताणत राहिला, त्यानं आपली जीभ आणि पायही लांब ताणले आणि यातूनच मान,पाय आणि जीभ हे अवयव लांब झाले आणि हेच गुण प्रत्येक पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि पुढची पिढी आधीच्या पिढीपेक्षा उंच निपजणं आणि त्यांनी मान आणि पाय आणखी ताणणं यातूनच अँटेलोपपासून जिराफ निर्माण झाला.
पण असे एका पिढीनं अवगत केलेले कोणतेही गुण असे पुढच्या पिढीत संक्रमित होतात या गोष्टीला सबळ पुरावा नसल्यामुळे ही थिअरी फारशी काही चालली नाही.त्या उलट एका पिढीनं अवगत केलेले गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जात नाहीत,हेच त्या वेळचे पुरावे दाखवत होते.
तिसरा म्हणजे एका पिढीत कमावलेले गुणधर्म हे पुढच्या पिढीत वारसांना मिळतात.
माणूसही एपपासून निर्माण झाला असं लॅमार्क म्हणे.त्याच्या मते केव्हातरी एप झाडावरून खाली उतरून सरळ चालायला लागला आणि मग त्यानं माणसाचे गुणधर्म उचलले.यानंतर त्याला मुलं झाली तेव्हा पुढच्या पिढीतही ते मानवी गुण अवतरले आणि मग असं करत करत मनुष्यजात निर्माण झाली,असं लॅमार्क म्हणे.लॅमार्कचं म्हणणं त्या काळी खूप लोकांना पटलं,अगदी डार्विनपर्यंत. पण मग सगळंच बदललं आणि मग लोक त्याची टिंगल करायला लागले.
माणूस एपपासून निर्माण झाला हे लॅमार्कचं म्हणणं बरोबर असलं तरी या आयुष्यात कमावलेले गुण पुढच्या पिढीत जातात हे त्याचं म्हणणं मात्र नक्कीच चूक होतं.व्यायाम करून शरीर कमावलेल्याला झालेली मुलं काही दंडाचा गोळा घेऊनच जन्माला येत नाहीत.ऑगस्ट वीझमन या जर्मन प्राणिशास्त्रज्ञानं हे तपासण्यासाठी एक विचित्रच प्रयोग केला.त्यानं उंदरांच्या शेपट्या कापल्या आणि नवीन पिढीत उंदीर कापलेली किंवा आखूड शेपटीच घेऊन जन्माला येतात,की नाही हे उंदरांच्या अनेक पिढ्या शेपट्या कापून तपासलं.पण त्याला नवीन पिढीतल्या उंदरांच्या शेपट्या तशाच लांब सापडल्या.म्हणजे एका पिढीत कमावलेले किंवा गमावलेले गुणधर्म नवीन पिढीवर परिणाम करत नाहीत हे सिद्ध झालं.पण लॅमार्कची ही चूक जरी झाली असली तरी उत्क्रांतिवादाची ही एका अर्थानं सुरुवात लॅमार्कनंच केली होती! अर्थात,उत्क्रांतीची थोडीशी कुणकुण त्याला या पुस्तकात लागली असली तरी त्यानं उत्क्रांती अशा अर्थाचा शब्द त्या पुस्तकात वापरला नव्हता हे विशेष !
लॅमार्कनं ही थिअरी मांडल्यावर लॅमार्क आणि कुव्हिए यांच्यात वादावादी सुरू झाली.ती अगदी विकोपाला जाऊन पोहोचली.इतकी की शेवटी जेव्हा लॅमार्क आंधळा झाला तेव्हाही कुव्हिए ओरडला,लॅमार्कनं निसर्गाकडे नीट नजरेनं किंवा स्वच्छ डोळ्यांनी बघितलं नसल्यानंच निसर्गानं त्याचे डोळे काढून घेतले असले पाहिजेत !
लॅमार्कनं चार लग्नं केली.वयाच्या सत्तरीत त्याची दृष्टी गेली.त्या वेळेपर्यंत अनेक कारणानं त्याच्याकडचे पैसेही संपले होते.अत्यंत दरिद्री अवस्थेत तो आपल्या मुलीजवळ राहायला लागला. १८ डिसेंबर १८२९ रोजी तो वारला तेव्हा त्याच्या कुटुंबाची एवढी दयनीय अवस्था होती,की त्याला पुरायला शवपेटीही विकत घेता येईना.घरची चीजवस्तू आणि त्याच्या पुस्तकांचा लिलाव करून पाच वर्षांसाठी भाड्याने शवपेटी घेऊन पुरण्याची व्यवस्था मग कशीबशी झाली!पण कालांतरानं मात्र लीज संपल्यावर त्याचे अवशेष उकरून कचऱ्यात कचऱ्यात फेकण्यात आले आणि ती जागा दुसऱ्याला पुरण्यासाठी दिली गेली.लॅमार्कची परवड त्याच्या मरणानंतर त्याच्या अवशेषांच्याही वाट्याला आली होती!लॅमार्क दरिद्री आणि दर्लक्षित अवस्थेत मरण पावला.त्याची थिअरीही अनावश्यक अवयवांप्रमाणे आक्रसून गेली.पण या पार्श्वभूमीनं उत्क्रांतीच्या संकल्पनेला मात्र अनुकूल वातावरणनिर्मिती केली हे मात्र खरं.
विसाव्या शतकात पुन्हा जवळपास लॅमार्कचीच थिअरी रशियात लिसेंको नावाच्या शास्त्रज्ञानं पुढे आणली.कुठल्याही माणसाचे गुणधर्म हे आनुवांशिक असतात तसेच ते भोवतालच्या परिस्थितीप्रमाणेही बदलतात.पण ते फक्त बाह्य परिस्थितीप्रमाणेच बदलतात असा चुकीचा अर्थ लावण्यात आला.म्हणून बाह्य परिस्थितीमुळे प्राण्याचे गुणधर्म नुसतेच बदलत नाहीत तर ते पुढच्याही पिढीत जाऊ शकतात असंच लॅमार्कसारखं लिसेंको बोलायला लागला.
लॅमार्कच्या थिअरीज हाणून पाडण्यात कुव्हिएचाच मोठा हात होता.त्या काळातला कुव्हिए हा मोठा शास्त्रज्ञ तर समजला जायचाच,पण राजकारणातही तो चाणाक्ष असल्यामुळे त्यानं महत्त्वाची पदंही पटकावली होती.कुव्हिएची निरीक्षणं अचूक असत.तो झोपेतही अनेक प्राण्यांविषयी अस्खलितपणे बोलू शकत असे असं म्हणतात.एका (दंत) कथेप्रमाणे जरा जास्तच दारू प्यायल्यावर तो जेव्हा झोपला होता,तेव्हा त्याला घाबरवून टाकून गंमत करण्यासाठी काही विद्यार्थी मुद्दामहून कुव्हिएच्या पलंगापाशी शिंगासारखं काहीतरी लावून आले आणि म्हणाले,'कुव्हिए, कुव्हिए,आम्ही तुला खायला आलो आहोत.' तेव्हा कुव्हिए अर्धवट झोपेतच,किलकिल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाला, 'शिंगं असणारी जनावरं ही शाकाहारीच असतात,तुम्ही मला मारूच शकणार नाही' आणि एवढं बोलून तो पुन्हा चक्क झोपून गेला! ते विद्यार्थी अवाक होऊन बघतच बसले !
फ्रेंच अॅकॅडमीनं शब्दकोश बनवण्यासाठी निर्माण केलेल्या कमिटीतल्या कुणीतरी खेकड्याची व्याख्या लाल असणारा,
उलट दिशेनं चालणारा मासा अशी केली होती.कुव्हिएनं लगेच आपलं मत त्यावर व्यक्त केलं.तो म्हणाला,तीन गोष्टी सोडल्या तर ही व्याख्या बरोबर आहे.एक तर खेकडा लाल नसतो,तो उलट दिशेनं चालत नाही आणि तो मासा नाही.खरं तर लॅमार्क आणि कुव्हिए हे दोघंही चुकले होतेच.पण त्यांनी उत्क्रांतिवादाचा पाया घातला हे मात्र नाकारता येत नाही.
१३.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…
१३/७/२५
उत्क्रांतीकडे वाटचाल \ Move towards evolution
लिनियसनं सजीवांचं वर्गीकरण केलं.त्यानं सजीवांचं बऱ्यापैकी मोठ्या गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.त्या मोठ्या गटांचं पुन्हा लहान लहान गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची त्यानं एक शिडीची कल्पना केली होती.प्रत्येक सजीव या शिडीवरच्या कोणत्या तरी पायरीवर होता आणि तो कायमचाच तिथं उभा आहे.अशी त्याची कल्पना होती.
अर्थात,ही कल्पना काही त्याची स्वतःची नव्हती,तर ती अनेक धर्मांत सांगितली होती आणि शिवाय ती अॅरिस्टॉटलनंही मान्य केलेली होती.लिनियसनं एकसारखे असणारे प्राणी एका गटात घातले होते,पण ते पूर्वी कोणत्या तरी एकाच पूर्वजापासून निर्माण झाले असावेत आणि असे दोन सारखे पूर्वज त्याहीपेक्षा आणखी साध्या पूर्वजांपासून निर्माण झाले असावेत, अशी शक्यता त्याच्या गावीच नव्हती.गंमत म्हणजे लिनियसनं प्राण्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या वर्गीकरण केलं आणि त्यानं त्याच्याच कामातून पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचे प्रगत जीव निर्माण झाले असावेत असं वाटावं अशी शक्यता निर्माण केली होती.आणि तो स्वतःच साध्या प्राण्यापासून प्रगत जीव निर्माण होऊ शकतो ही गोष्ट मानत नव्हता..! बायॉलॉजीच्या क्षेत्रात आता खरं म्हणजे पूर्वी कधीही नव्हता इतका विरोधाभास आता निर्माण झाला नव्हता! त्यामुळेच जीवशास्त्रानं यापुढे जे वळण घेतलं ते बायॉलॉजीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं होतं.('सजीव' अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)
लिनियस हा स्वतः खरं तर देवभोळा माणूस होता. त्याचा बायबलवर पूर्ण विश्वास होता.त्याच्या दृष्टीनं कोणतीही स्पिशीज नामशेष होऊच शकत नव्हती.आणि नव्यानं निर्माणही होऊ शकत नव्हती.देवानं निर्माण केलेलं विश्व पहिल्यापासून तसंच आहे आणि तसंच राहणार आहे यावर त्याची अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यानं स्वतः जेव्हा सजीवांचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यानं सजीवांच्या बाह्मगुणांवरून (फिनोटाइपवरून) ठोकळेबाज रीतीनं वर्गीकरण केलं. जनुकीय पातळीवर दोन सजीवांमध्ये काहीतरी नातं असलं पाहिजे या गोष्टीचा त्यानं विचारच केला नव्हता.अर्थात,जेनेटिक्सचा उदय व्हायला एकोणिसावं शतक उजाडावं लागणार होतं.
गंमत म्हणजे त्याच वेळी इतर काही वैज्ञानिक पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचेप्रगत प्राणी निर्माण झाले असले पाहिजेत किंवा एकाच कॉमन (सामयिक) पूर्वजापासून पुढे प्राण्यांच्या दोन वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या असल्या पाहिजेत असं आता म्हणायला लागले होते.सुदैवानं नंतरच्या आयुष्यात लिनियस दोन प्राण्यांच्या संकरातून (हायब्रिडायझेशनमधून) तिसरी नवी प्राण्याची जात अस्तित्वात येऊ शकते असं मानायला लागला होता.फ्रेंच बायॉलॉजिस्ट / निसर्ग अभ्यासक जॉर्ज लुई लेने कॉम्टे दे ब्यूफाँ (१७०७ ते १७८८) यानंही यावर अभ्यास सुरू केला होता. हा एक कुतूहल जागृत असणारा,हसतमुख गडी होता.त्यानं पूर्वीच्या निडहॅमच्या आणि स्पॉटेनियस जनरेशनच्या प्रयोगांवर अभ्यास केला होता.त्या काळचा तो बऱ्यापैकी पुढारलेला वैज्ञानिक होता तरी तोही आता सारख्या दिसणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज आधी कधीतरी एकच असतील असा युक्तिवाद मांडायला धजावला नव्हता.
न्यूफॉनं नॅचरल हिस्ट्रीवर ४४ खंडांचा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) लिहिला होता.या ज्ञानकोशामुळे ब्यूफाँला प्लिनीसारखीच प्रसिद्धी मिळाली.पण प्लिनीपेक्षा ब्यूफाँचा ज्ञानकोश जास्त अचूक होता.यामध्ये त्यानं अनेक प्राण्यांना काही अनावश्यक अवयव असतात असं दाखवलं होतं.
उदाहरणार्थ,डुकरांना दोन उपयोगी खुरांच्या बाजूंना आणखी दोन निरुपयोगी बोटं असतात.कदाचित ते फार फार पूर्वी उपयोगी असतीलही,पण नंतर ते निरुपयोगी झाल्यानंतर खुरटले असतील.असं झालं असावं का? अशाच प्रकारे एखादा संपूर्ण प्राणीच खुरटला नसेल कशावरून? माणूस हा लहान झालेला एप नसेल कशावरून? किंवा गाढव हा खुरटलेला घोडा नसेल कशावरून?
इरॅस्मस डार्विन (१७३१ ते १८०२) हा इंग्लिश डॉक्टर होता.त्यानं प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्यावर मोठमोठ्या कविता केल्या होत्या.त्यात त्यानं लिनियसचं बरंच कौतुक केलं होतं.त्यात त्यानं वातावरणातल्या परिस्थितीमुळे प्राण्यांच्या स्पिशीजमध्ये बदल होऊ शकतात हेही मान्य केलं होतं.पण हा माणूस काळाच्या ओघात झाकोळला गेला.
याच्याच नातवानं,चार्ल्स डार्विननं पुढे याच विषयात कामगिरी करून उच्चांक गाठला.
ब्यूफाँच्या मृत्यूनंतर झालेल्या फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे अख्खं युरोप मुळापासून ढवळून निघालं होतं.त्यानंतर नव्या युगात नवी मूल्यं आली.यानंतर धर्म,धर्मगुरू आणि प्रार्थनास्थळं यांची मक्तेदारी कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला लागला.
यामुळे वैज्ञानिक थिअरीज सर्वांसमोर मांडणं पूर्वीच्या मानानं अधिक सोपं झालं.त्यामुळे सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल जास्त काही खोलवर जाऊन विचार करण्याची गरज नाहीये,हा ब्यूफाँचा दृष्टिकोन आता बदलला होता.काही दशकांनी फ्रेंच निसर्गअभ्यासक जाँ बाप्टिस्ट दे मोनेत शैवेलियर दे लॅमार्क (Jean Baptiste de Monet Chevalier de Lamarck) (१७४४-१८२९) यानं उत्क्रांतीचा खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा असं मत मांडलं.
या पृथ्वीवरचे जीव हे पृथ्वीच्या जन्मापासून तसेच आहेत,त्यांच्यात काहीच बदल घडलेला नाहीये आणि या सर्व जीवसृष्टीत एक शिडी आहे ही धर्मानं आणि अॅरिस्टॉटलनं शिकवलेली कल्पना अगदी १८व्या शतकापर्यंत दृढ होती.या कल्पनांना जर कोणी प्रथम विरोध केला असेल,तर तो दोन माणसांनी.त्यातला एक होता,जाँ बाप्टिस्ट दी मोने दी लॅमार्क किंवा फक्त लॅमार्क(१७४४-१८२९) आणि दुसरा होता जॉर्ज कुव्हिए.हे दोघं फ्रेंच होते हा काही फक्त एक अपघात नव्हता.त्या काळी पॅरिसमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास खोलवर चालू झाला होता.याच काळात लॅमार्क आणि कुव्हिए या दोघांनी आपले विचार मांडून पूर्वीच्या कल्पनांना धक्का दिला,
पण गंमत म्हणजे लॅमार्क आणि कुव्हिए हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते!त्यातला एक होता कणा नसलेल्या प्राण्यांचा (उदा.,गांडूळ) किंवा इनव्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ,तर दुसरा होता कणा असलेल्या प्राण्यांचा (उदा., माकड) किंवा व्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ.
पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातो हे प्रथम ओळखलं होतं ते लॅमार्कनंच.हे उत्क्रांतिवादातलं खूपच मोठं पाऊल होतं. खुद्द चार्ल्स डार्विनही ते मान्य करायचा.पण धर्म मात्र याविरुद्ध शिकवत होता.सगळंच विश्व देवानं एकाच क्षणी निर्माण केलं असल्यानं ते बदलेल कसं ?
ते बदलत असेल तर मग देवाची हे जग निर्माण करण्यामध्ये काहीतरी चूक झाली होत की काय? असा सवाल धर्मपंडित लोकांसमोर करीत.त्या काळी धर्माच्या अशा शिकवणीविरुद्ध काही बोलणं म्हणजे धारिष्ट्याचंच होतं.पण असं धाडस दाखवल्याबद्दल लॅमार्कचं कौतुक होण्याऐवजी त्याची चेष्टाच खूप झाली.
लॅमार्क हा १९व्या शतकातला जीवशास्त्रज्ञ होता. त्यानंच जीवशास्त्र (बायॉलॉजी) हा शब्दही प्रथमच वापरला.त्याचा जन्म १ ऑगस्ट १७४४ चा.एका उमराव घराण्यात तो जन्मला असला तरी त्याचे वडील मात्र दरिद्री होते.त्यांच्या ११ मुलांपैकी लॅमार्क हा सगळ्यात लहान होता.त्याच्या वडिलांनी त्यानं पाद्री व्हावं म्हणून जेझूईट कॉलेजात त्याला घातलं.पण वडील वारल्यावर १७६० साली लगेच त्यानं कॉलेज सोडलं.वडिलांनी ठेवलेल्या पैशात एक घोडा विकत घेतला आणि त्यावर टांग मारून स्वारी फ्रेंच सैन्यात दाखल झाली!
लढाईत फ्रेंच सैन्याचा दारुण पराभव झाला.फक्त १४ सैनिक शिल्लक असताना लॅमार्क अत्यंत कडव्या शौर्यानं लढत राहिला.
त्याला त्याबद्दल सैन्यात बढतीही मिळाली.पण आयुष्याच्या वाटा कशा विचित्र वळणं घेतात बघा! लढाई संपल्यानंतर आपापसात गंमती चालू असताना त्याच्या मित्रांनी कान धरून त्याला उचललं आणि त्यात त्याची मान जायबंदी झाली.त्यावर चक्क शस्त्रक्रिया करावी लागली! त्यामुळे अर्थातच त्याची सैन्यातली नोकरी सुटली.
मग आता करायचं काय? त्यानं मग अनेक उद्योग केले. त्यानं वनस्पतिशास्त्र,वैद्यकशास्त्र आणि संगीत यांचा अभ्यास केला.
बरीच वर्षं स्वतःच्याच अशातशा पद्धतीनं हवामानाचे अंदाज वर्तवून त्यानं ११ वर्षं थोडाफार पैसाही कमावला,पण त्याचे अंदाज बऱ्याचदा चुकायचेच !
याच काळात त्याची मैत्री फ्रेंच विचारवंत जिअँ जॅक्स रुसो याच्याबरोबर झाली. ते दोघं बऱ्याचदा लांबवर फिरायला जात. त्या वेळी ते वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत.लॅमार्कनं वैद्यकशास्त्रावरही दोन पुस्तकं लिहिली आणि बँकेत कारकून म्हणूनही नोकरी केली. म्हणजे काय काय वेगवेगळे उद्योग बघा!
ब्यूफाँचं लक्ष त्या काळात लॅमार्ककडे गेलं.त्यानं लॅमार्कला आपल्या मुलाला शिकवणी देण्यासाठी ठेवून घेतलं.याबरोबरच लॅमार्क हा राजाच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये जाऊन काम करायला लागला.याच काळात त्यानं बराच प्रवास करून अनेक वनस्पतींविषयी सखोल निरीक्षणंही केली.पण याच सुमारास फ्रेंच राज्यक्रांती झाली.ज्या राजवटीनं ब्यूफाँ आणि लॅमार्क यांना नोकरी दिली होती,ती राजवटच मुळी संपुष्टात आली होती.पण योगायोगानं नवीन क्रांतिकारक सरकारला कुणीतरी कीटक आणि इतर अनेक बिगर कण्याच्या प्राण्यांचा तज्ज्ञ हवाच होता.मग त्यांनी ते काम लॅमार्कला दिलं.आणि याच वेळी कणा असलेल्या प्राण्यांचा तज्ज्ञ म्हणून काम मिळालं ते कुव्हिएला. लॅमार्कनं या संधीचा पुरेपूर फायदा उठवून बिनकण्यांच्या प्राण्यांविषयी
'हिस्टरी ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांतला ग्रंथ लिहिला.
कुठल्याशा जिलेटिन किंवा तत्सम बुळबुळीत पदार्थापासून उष्णतेमुळे किंवा विजेमुळे पहिला जीव तयार झाला असावा असं लॅमार्कला वाटे.हे विचार जरी चुकीचे असले,तरी चर्चच्या शिकवणीपेक्षा हे नक्कीच वेगळं होते,त्यामुळेही त्याला विरोध झालाच.. ( शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..)
११/७/२५
मुक्या शतकांचा आवाज - डान्टे / The voice of silent centuries: Dante
०९.०७.२५ या लेखातील पुढील शेवटचा दुसरा भाग
मध्ययुगातील द्वेष मध्ये थांबत नसे.द्वेष म्हणजे संपूर्ण द्वेष ! शेवटच्या टोकाला जायचे.डान्टे फ्लॉरेन्समधून हद्दपार केला गेला.तो सापडेल,तिथे त्याला जिवंत जाळून टाकावे,अशीही शिक्षा दिली गेली!डान्टेला आता स्वतःचा देश राहिला नाही!
या ऐहिक जगाने त्याला दूर लोटले.तो आपल्या धीरगंभीर व भीषण प्रतिभेच्या साहाय्याने मृतांच्या जगात - परलोकात वावरू लागला.त्याला आपल्या इटलीमधल्या शत्रूचा प्रत्यक्ष सूड घेता येईना,तेव्हा त्याने त्यांच्यासाठी नरकातील अनेक प्रकारचे काल्पनिक छळ शोधून काढले व त्यांना तिथे नेऊन टाकले ! डान्टेला समाधान वाटावे व ईश्वराचे वैभव वाढावे म्हणून हे सारे शत्रू नरकात लोटले जातात ! डान्टे आपल्या इन्फर्नोची चोवीस सर्कल्स करतो. त्या त्या विशिष्ट प्रकारच्या पापांसाठी छळण्याची ती ती विशिष्ट यंत्रे त्या त्या विशिष्ट सर्कलमध्ये ठेवलेली असतात.डान्टेचे इन्फर्नोचे वर्णन अती दुष्ट व अती भव्य आहे.दूषित व विकृत झालेल्या अशा उदात्त प्रतिभेने निर्मिलेले हे नरकस्थान आहे.अमेरिकन तत्त्वज्ञानी सन्टायना लिहितो, 'डान्टे पुष्कळ वेळा विकारवशतेने लिहितो,शुद्ध बुद्धीने निर्णय घेऊन तो लिहीत नाही.' पण आपण विसरता कामा नये की, डान्टे मध्ययुगाचा नागरिक तद्वतच रोमन कॅथॉलिक चर्चचे अपत्य आहे.तो आपल्या शत्रूचेच नरकात हाल करतो असे नाही;तर त्याला जे जे चर्चचे शत्रू वाटतात,त्या सर्वांना तो तिथे नेतो व त्यांचा छळ मांडतो.
जे जे कॅथॉलिक नाहीत,ते ते सारे चर्चचे शत्रू असे डान्टे समजतो.ख्रिश्चन धर्मात नसलेले असे प्राचीन काळातील कोणीही डान्टेच्या स्वर्गात जाऊ शकत नाहीत.मध्ययुगातील चर्च किती असहिष्णू होते,हे यावरून दिसून येते.त्या प्राचीनांना स्वर्ग का नाही? त्यांचे काय पाप? ते बाप्तिस्मा मिळण्यापूर्वी कित्येक शतके जन्मले हे? ईश्वराची करुणा अनंत असली तरी तिची व्याप्ती फक्त कॅथॉलिकांपुरतीच आहे ! निदान डान्टे तरी असे म्हणतो.डान्टेला नरकातील गुंतागुंतीचे मार्ग दाखविणारा थोर गुरू व्हर्जिलदेखील स्वर्गाकडे येऊ शकत नाही! त्यालाही निराशेच्या चिरंतन आगीत रडत बसावे लागते.त्यालाही उद्धाराची आशा नाही! कारण,तो फार पूर्वी जन्मला. मग तो कसा ख्रिश्चन होणार?
ही असहिष्णुता,जे जे चर्चच्या मताचे नाहीत,त्या सर्वांना खुशाल नरकाग्नीत खितपत ठेवणे व मनाला काहीही न वाटता त्यांचे हाल व छळ पाहणे याला काय म्हणावे? किती संकुचित,स्वार्थी व असहिष्णू हे मन ? डान्टेच्या डिव्हाइन कॉमेडी या महाकाव्यात ही असहिष्णुता सर्वत्र भरलेली आहे. मी दोनच उदाहरणे देतो,दोनच उतारे दाखवितो- १. इन्फर्नोच्या दुसऱ्या सर्गात बिएट्रिस म्हणते, "ईश्वराच्या कृपेने मला नरकात खितपत पडणाऱ्यांच्या दुःखाचा स्पर्श होत नाही." ही बिएट्रिस स्वर्गात शाश्वत आनंद उपभोगीत असते; तिला नरकाग्नीत जळणाऱ्यांच्या दुःखाची कल्पनाही येत नाही व याला ती ईश्वरी कृपा समजते.त्यांचे दुःख तिला दुःख असे वाटतच नाही. तिला त्यांच्या वेदना कळतील तेव्हा ना तिचे डोळे ओलावणार;तिचा आनंद अस्तास जाणार? हे मध्ययुगातील रानटीपणाचे द्योतक आहे,त्या कालच्या रानटी वृत्तीला धरून आहे.सेंट थॉमस क्विनस हा मध्ययुगातील अत्यंत धार्मिक व अती प्रतिभावान लेखक होऊन गेला.तो त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, "परमेश्वराची आपल्या भक्तांवर फार कृपा असते.नरकात खितपत पडलेल्या प्राण्यांच्या होणाऱ्या छळांचा विचार करून स्वतःचे सुख वृद्धिंगत करण्यास प्रभू त्यांना परवानगी देतो." दुसऱ्यांचे दुःख पाहून आपण तसे दुःखी नाही असे मनात येऊन अधिक सुखी होणे किंवा "दुसऱ्यांचा कसा छळ होत आहे!"असे मिटक्या मारीत म्हणून आपला आनंद द्विगुणित करणे रानटीपणाचे तर खरेच,पण मध्ययुग जणू रानटीपणाचेच प्रतीक आहे. २. दुसरा उतारा पर्गेटोरियाच्या सातव्या सर्गातला आहे. पर्गेटरीयातल्या सॉर्डेलो नामक एका जिवाला व्हर्जिल नरकातील एका भागाचे वर्णन ऐकवीत आहे.तो म्हणतो, "मी त्या निराशेच्या नरकात खाली खोल खितपत पडलेला असतो. मर्त्य जन्मीच्या पापांपासून सुटका होण्यापूर्वी लहान मुलांना तिथे मृत्यूचे दात सारखे चावीत असतात." डान्टेच्या मते केवळ निधर्मी,नास्तिक व पाखंडीच तेवढे नरकात पडतात,असे नव्हे,तर निष्पाप मुलेही नरकान्नीत हाल भोगतात ! बाप्तिस्मा मिळण्यापूर्वीच जर लहान मुले मेली,तर ती नरकात आलीच पाहिजेत व त्यांनी तेथील यातना भोगल्याच पाहिजेत.ज्या जगात डान्टे राहत होता, ते मूर्खपणाचे जग होते,ते आंधळे,संकुचित,दुष्ट, नष्ट,बेशरम आणि असहिष्णुतेने भरलेले असे होते. डान्टेचे मन आपण जाणू शकलो,तरच क्रूसेड्स् - इन्क्विझिशनसारखी छळण्याची मध्ययुगीन साधने व संस्था आपण समजू शकू.
मध्ययुगे सुंदर होती हे खरेच;ते नाकारता येणार नाही.पण केवळ सौंदर्य पुरेसे नसते.भूकंपातही नसते का एक प्रकारचे सौंदर्य ? एखादा हिमप्रपात,समुद्रावरील एखादे भीषण वादळ,ज्वालामुखीचा एखादा स्फोट, विजेचा एखादा लखलखाट,व्यवस्थित रीतीने योजनापूर्वक पार पाडलेला एखादा खून,दोन रानटी सैन्यांतील एखादे युद्ध,या सर्वांतही एक प्रकारचे सौंदर्य असतेच;पण ही सुंदरता,ही भव्यता विसंवादी असते.हे विनाशाचे,विध्वंसाचे,मूर्खतेचे सौंदर्य होय, हे सौंदर्य भेदांनी विदीर्ण झालेल्या रोगट व फिक्कट जगाचे आहे.डान्टेच्या महाकाव्यातील व तेराव्या शतकातील जगाचे सौंदर्य असे भेसूर आहे.
जवळजवळ हजार वर्षे युरोप या दुष्ट भ्रमात होते की,सर्वांनी ख्रिश्चन तरी व्हावे,नाहीतर कायमचे नरकात तरी पडावे,अशी ईश्वराचीच इच्छा आहे. डान्टेने या भ्रमाचा वारसा घेतलेला होता. इन्क्विझिटरही याच भ्रमात होते.या दुष्ट भ्रमाभोवती
डान्टेने महाकाव्य निर्मिले व छळ कसा करावा, याची माहिती इन्क्विझिटरांनी डान्रेच्या या छळाच्या ज्ञानकोशातून घेतली.डान्टेने चर्चच्या शत्रूना काव्यात केवळ अलंकारिकरीत्या जाळून टाकले; पण इन्क्विझिटर्स कवी नसून प्रत्यक्षवादी व्यवहारी असल्यामुळे त्यांनी चर्चच्या शत्रूना प्रत्यक्षच जाळले!
व्हॉल्टेअरच्या हिशेबाप्रमाणे चर्चच्या आज्ञेनुसार जवळजवळ एक कोटी माणसे जिवंत जाळली गेली असतील; व ती का? तर ती केवळ परधर्मीय होती म्हणून; कॅथॉलिक ख्रिश्चन नव्हती म्हणून!
डान्टेचे 'डिव्हाइन कॉमेडी' हे जगातील अत्यंत थोर अशा प्रतिभासंपन्न कवीचे,अतिशय उदात्त अशा स्वप्नवीराचे महाकाव्य.त्याच्यासारख्या अत्यंत थोर व प्रतिभासंपन्न कवीला असा विषय मिळावा,असे ध्येय मिळावे;पण असे दृष्ट भ्रम त्याने धर्म म्हणून कवटाळावेत,ही एक दुर्दैवी घटना आहे.डान्टेची ही फार मोठी कीव येण्याजोगी चूक झाली.मानवी इतिहासातील हा भयंकर दैवदुर्विलास होय !
डान्टे इ.स. १३१७ मध्ये मरण पावला व त्याच्याबरोबरच मध्ययुग संपले असे सांगण्यात येते; पण असे वाटेल ते ठोकून देणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असते. दुर्दैवाने अद्यापही कोट्यवधी स्त्री-पुरुष मध्ययुगीन असहिष्णू व संकुचित जगातच वावरत आहेत ! आणि त्यामुळे शांती व प्रगती स्थगित झाल्या आहेत.मध्ययुग अजूनही गेलेले नाही. तोच रानटीपणा,तोच आंधळेपणा, तीच संकुचितता,सारे तेच अद्यापिही कायमच आहे !