०९.०७.२५ या लेखातील पुढील शेवटचा दुसरा भाग
मध्ययुगातील द्वेष मध्ये थांबत नसे.द्वेष म्हणजे संपूर्ण द्वेष ! शेवटच्या टोकाला जायचे.डान्टे फ्लॉरेन्समधून हद्दपार केला गेला.तो सापडेल,तिथे त्याला जिवंत जाळून टाकावे,अशीही शिक्षा दिली गेली!डान्टेला आता स्वतःचा देश राहिला नाही!
या ऐहिक जगाने त्याला दूर लोटले.तो आपल्या धीरगंभीर व भीषण प्रतिभेच्या साहाय्याने मृतांच्या जगात - परलोकात वावरू लागला.त्याला आपल्या इटलीमधल्या शत्रूचा प्रत्यक्ष सूड घेता येईना,तेव्हा त्याने त्यांच्यासाठी नरकातील अनेक प्रकारचे काल्पनिक छळ शोधून काढले व त्यांना तिथे नेऊन टाकले ! डान्टेला समाधान वाटावे व ईश्वराचे वैभव वाढावे म्हणून हे सारे शत्रू नरकात लोटले जातात ! डान्टे आपल्या इन्फर्नोची चोवीस सर्कल्स करतो. त्या त्या विशिष्ट प्रकारच्या पापांसाठी छळण्याची ती ती विशिष्ट यंत्रे त्या त्या विशिष्ट सर्कलमध्ये ठेवलेली असतात.डान्टेचे इन्फर्नोचे वर्णन अती दुष्ट व अती भव्य आहे.दूषित व विकृत झालेल्या अशा उदात्त प्रतिभेने निर्मिलेले हे नरकस्थान आहे.अमेरिकन तत्त्वज्ञानी सन्टायना लिहितो, 'डान्टे पुष्कळ वेळा विकारवशतेने लिहितो,शुद्ध बुद्धीने निर्णय घेऊन तो लिहीत नाही.' पण आपण विसरता कामा नये की, डान्टे मध्ययुगाचा नागरिक तद्वतच रोमन कॅथॉलिक चर्चचे अपत्य आहे.तो आपल्या शत्रूचेच नरकात हाल करतो असे नाही;तर त्याला जे जे चर्चचे शत्रू वाटतात,त्या सर्वांना तो तिथे नेतो व त्यांचा छळ मांडतो.
जे जे कॅथॉलिक नाहीत,ते ते सारे चर्चचे शत्रू असे डान्टे समजतो.ख्रिश्चन धर्मात नसलेले असे प्राचीन काळातील कोणीही डान्टेच्या स्वर्गात जाऊ शकत नाहीत.मध्ययुगातील चर्च किती असहिष्णू होते,हे यावरून दिसून येते.त्या प्राचीनांना स्वर्ग का नाही? त्यांचे काय पाप? ते बाप्तिस्मा मिळण्यापूर्वी कित्येक शतके जन्मले हे? ईश्वराची करुणा अनंत असली तरी तिची व्याप्ती फक्त कॅथॉलिकांपुरतीच आहे ! निदान डान्टे तरी असे म्हणतो.डान्टेला नरकातील गुंतागुंतीचे मार्ग दाखविणारा थोर गुरू व्हर्जिलदेखील स्वर्गाकडे येऊ शकत नाही! त्यालाही निराशेच्या चिरंतन आगीत रडत बसावे लागते.त्यालाही उद्धाराची आशा नाही! कारण,तो फार पूर्वी जन्मला. मग तो कसा ख्रिश्चन होणार?
ही असहिष्णुता,जे जे चर्चच्या मताचे नाहीत,त्या सर्वांना खुशाल नरकाग्नीत खितपत ठेवणे व मनाला काहीही न वाटता त्यांचे हाल व छळ पाहणे याला काय म्हणावे? किती संकुचित,स्वार्थी व असहिष्णू हे मन ? डान्टेच्या डिव्हाइन कॉमेडी या महाकाव्यात ही असहिष्णुता सर्वत्र भरलेली आहे. मी दोनच उदाहरणे देतो,दोनच उतारे दाखवितो- १. इन्फर्नोच्या दुसऱ्या सर्गात बिएट्रिस म्हणते, "ईश्वराच्या कृपेने मला नरकात खितपत पडणाऱ्यांच्या दुःखाचा स्पर्श होत नाही." ही बिएट्रिस स्वर्गात शाश्वत आनंद उपभोगीत असते; तिला नरकाग्नीत जळणाऱ्यांच्या दुःखाची कल्पनाही येत नाही व याला ती ईश्वरी कृपा समजते.त्यांचे दुःख तिला दुःख असे वाटतच नाही. तिला त्यांच्या वेदना कळतील तेव्हा ना तिचे डोळे ओलावणार;तिचा आनंद अस्तास जाणार? हे मध्ययुगातील रानटीपणाचे द्योतक आहे,त्या कालच्या रानटी वृत्तीला धरून आहे.सेंट थॉमस क्विनस हा मध्ययुगातील अत्यंत धार्मिक व अती प्रतिभावान लेखक होऊन गेला.तो त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, "परमेश्वराची आपल्या भक्तांवर फार कृपा असते.नरकात खितपत पडलेल्या प्राण्यांच्या होणाऱ्या छळांचा विचार करून स्वतःचे सुख वृद्धिंगत करण्यास प्रभू त्यांना परवानगी देतो." दुसऱ्यांचे दुःख पाहून आपण तसे दुःखी नाही असे मनात येऊन अधिक सुखी होणे किंवा "दुसऱ्यांचा कसा छळ होत आहे!"असे मिटक्या मारीत म्हणून आपला आनंद द्विगुणित करणे रानटीपणाचे तर खरेच,पण मध्ययुग जणू रानटीपणाचेच प्रतीक आहे. २. दुसरा उतारा पर्गेटोरियाच्या सातव्या सर्गातला आहे. पर्गेटरीयातल्या सॉर्डेलो नामक एका जिवाला व्हर्जिल नरकातील एका भागाचे वर्णन ऐकवीत आहे.तो म्हणतो, "मी त्या निराशेच्या नरकात खाली खोल खितपत पडलेला असतो. मर्त्य जन्मीच्या पापांपासून सुटका होण्यापूर्वी लहान मुलांना तिथे मृत्यूचे दात सारखे चावीत असतात." डान्टेच्या मते केवळ निधर्मी,नास्तिक व पाखंडीच तेवढे नरकात पडतात,असे नव्हे,तर निष्पाप मुलेही नरकान्नीत हाल भोगतात ! बाप्तिस्मा मिळण्यापूर्वीच जर लहान मुले मेली,तर ती नरकात आलीच पाहिजेत व त्यांनी तेथील यातना भोगल्याच पाहिजेत.ज्या जगात डान्टे राहत होता, ते मूर्खपणाचे जग होते,ते आंधळे,संकुचित,दुष्ट, नष्ट,बेशरम आणि असहिष्णुतेने भरलेले असे होते. डान्टेचे मन आपण जाणू शकलो,तरच क्रूसेड्स् - इन्क्विझिशनसारखी छळण्याची मध्ययुगीन साधने व संस्था आपण समजू शकू.
मध्ययुगे सुंदर होती हे खरेच;ते नाकारता येणार नाही.पण केवळ सौंदर्य पुरेसे नसते.भूकंपातही नसते का एक प्रकारचे सौंदर्य ? एखादा हिमप्रपात,समुद्रावरील एखादे भीषण वादळ,ज्वालामुखीचा एखादा स्फोट, विजेचा एखादा लखलखाट,व्यवस्थित रीतीने योजनापूर्वक पार पाडलेला एखादा खून,दोन रानटी सैन्यांतील एखादे युद्ध,या सर्वांतही एक प्रकारचे सौंदर्य असतेच;पण ही सुंदरता,ही भव्यता विसंवादी असते.हे विनाशाचे,विध्वंसाचे,मूर्खतेचे सौंदर्य होय, हे सौंदर्य भेदांनी विदीर्ण झालेल्या रोगट व फिक्कट जगाचे आहे.डान्टेच्या महाकाव्यातील व तेराव्या शतकातील जगाचे सौंदर्य असे भेसूर आहे.
जवळजवळ हजार वर्षे युरोप या दुष्ट भ्रमात होते की,सर्वांनी ख्रिश्चन तरी व्हावे,नाहीतर कायमचे नरकात तरी पडावे,अशी ईश्वराचीच इच्छा आहे. डान्टेने या भ्रमाचा वारसा घेतलेला होता. इन्क्विझिटरही याच भ्रमात होते.या दुष्ट भ्रमाभोवती
डान्टेने महाकाव्य निर्मिले व छळ कसा करावा, याची माहिती इन्क्विझिटरांनी डान्रेच्या या छळाच्या ज्ञानकोशातून घेतली.डान्टेने चर्चच्या शत्रूना काव्यात केवळ अलंकारिकरीत्या जाळून टाकले; पण इन्क्विझिटर्स कवी नसून प्रत्यक्षवादी व्यवहारी असल्यामुळे त्यांनी चर्चच्या शत्रूना प्रत्यक्षच जाळले!
व्हॉल्टेअरच्या हिशेबाप्रमाणे चर्चच्या आज्ञेनुसार जवळजवळ एक कोटी माणसे जिवंत जाळली गेली असतील; व ती का? तर ती केवळ परधर्मीय होती म्हणून; कॅथॉलिक ख्रिश्चन नव्हती म्हणून!
डान्टेचे 'डिव्हाइन कॉमेडी' हे जगातील अत्यंत थोर अशा प्रतिभासंपन्न कवीचे,अतिशय उदात्त अशा स्वप्नवीराचे महाकाव्य.त्याच्यासारख्या अत्यंत थोर व प्रतिभासंपन्न कवीला असा विषय मिळावा,असे ध्येय मिळावे;पण असे दृष्ट भ्रम त्याने धर्म म्हणून कवटाळावेत,ही एक दुर्दैवी घटना आहे.डान्टेची ही फार मोठी कीव येण्याजोगी चूक झाली.मानवी इतिहासातील हा भयंकर दैवदुर्विलास होय !
डान्टे इ.स. १३१७ मध्ये मरण पावला व त्याच्याबरोबरच मध्ययुग संपले असे सांगण्यात येते; पण असे वाटेल ते ठोकून देणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असते. दुर्दैवाने अद्यापही कोट्यवधी स्त्री-पुरुष मध्ययुगीन असहिष्णू व संकुचित जगातच वावरत आहेत ! आणि त्यामुळे शांती व प्रगती स्थगित झाल्या आहेत.मध्ययुग अजूनही गेलेले नाही. तोच रानटीपणा,तोच आंधळेपणा, तीच संकुचितता,सारे तेच अद्यापिही कायमच आहे !