यापूर्वी क्रिएशनच्या वेळी सगळे जीव एकदम तयार झाले असं चर्च सांगत होतं,तर काही लोक घाणीतून,सडलेल्या मांसातून जीव तयार होतात असंही म्हणत होते.लॅमार्क चूक असला तरी या सगळ्यांपेक्षा वेगळं आणि निदान जास्त तर्कवादी तरी बोलत होता.
सस्तन प्राणी,पक्षी,सरीसृप (सरपटणारे) प्राणी आणि मासे ही लिनियसनं मानलेले पहिले चार क्लासेस लॅमार्कनं एकाच 'व्हर्टिब्रेट' म्हणजेच 'पाठीचा कणा असलेल्या' या गटात टाकले. लिनियसनं मानलेल्या कीटक आणि वर्म्स या इतर दोन क्लासेसना लॅमार्कनं 'इनव्हर्टिब्रेट' या दुसऱ्या गटात टाकलं.वर्गीकरणाची ही पद्धत लवकरच प्रसिद्ध झाली.
याशिवाय,त्यानं आठ पायांच्या कोळ्यांना सहा पायांच्या कीटकांच्या गटात टाकणं किंवा लॉब्स्टरनं स्टारफिशच्या गटात टाकणं योग्य नाही हे सांगितलं.
१८१५ ते १८२२ च्या दरम्यान लॅमार्कनं 'नॅचरल हिस्ट्री ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांचा मोठा ग्रंथच लिहिला.या खंडानं आधुनिक 'इनव्हर्टिब्रेट झूऑलॉजी'चा पाया घातला.
या विषयाचा अभ्यास करतानाच खरं तर त्याच्या डोक्यात उत्क्रांतीची कल्पना आली होती.त्याबद्दल त्यानं आपल्या १८०१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिलं होतंच.
यानंतर १८०९ साली लॅमार्कनं 'झूऑलॉजिकल फिलॉसॉफी' लिहिलं.त्यात त्यानं तीन मुद्दे मांडले. एक म्हणजे जीव हे सतत शिडीतल्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करतात. याच प्रक्रियेत मग साध्या जिवातून जास्त गुंतागुंतीच्या वरच्या दर्जाचे जीव कालांतरानं तयार होतात.दुसरा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमुळे प्राणी काही अवयव जास्त वापरतो. ते मग बळकट होतात. उदाहरणार्थ, जिराफ उंच झाडांवरची पानं खाण्यासाठी मान उंच करतो आणि त्याची मान उंच होत जाते.प्राणी जे अवयव भरपूर वापरतात ते अवयव आकारानं आणि क्षमतेनं वाढतात आणि जे अवयव वापरत नाहीत ते नष्ट होतात.
आणि हे अवयवांचं वाढणं किंवा नष्ट होणं पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केलं जातं.हे आपल्या पुस्तकांत लॅमार्कनं सांगितलं होतं.हे समजावताना त्यानं त्या काळी नव्यानंच लक्षात आलेल्या जिराफाचं उदाहरण दिलं होतं.
हा प्राथमिक प्राणी अँटेलोप झाडाची पानं खाऊन जगायचा.
नंतर खालच्या भागातली पानं संपल्यामुळे आणखी आणखी वरच्या भागातली पानं खायला तो आपली मान उंच ताणत राहिला, त्यानं आपली जीभ आणि पायही लांब ताणले आणि यातूनच मान,पाय आणि जीभ हे अवयव लांब झाले आणि हेच गुण प्रत्येक पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि पुढची पिढी आधीच्या पिढीपेक्षा उंच निपजणं आणि त्यांनी मान आणि पाय आणखी ताणणं यातूनच अँटेलोपपासून जिराफ निर्माण झाला.
पण असे एका पिढीनं अवगत केलेले कोणतेही गुण असे पुढच्या पिढीत संक्रमित होतात या गोष्टीला सबळ पुरावा नसल्यामुळे ही थिअरी फारशी काही चालली नाही.त्या उलट एका पिढीनं अवगत केलेले गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जात नाहीत,हेच त्या वेळचे पुरावे दाखवत होते.
तिसरा म्हणजे एका पिढीत कमावलेले गुणधर्म हे पुढच्या पिढीत वारसांना मिळतात.
माणूसही एपपासून निर्माण झाला असं लॅमार्क म्हणे.त्याच्या मते केव्हातरी एप झाडावरून खाली उतरून सरळ चालायला लागला आणि मग त्यानं माणसाचे गुणधर्म उचलले.यानंतर त्याला मुलं झाली तेव्हा पुढच्या पिढीतही ते मानवी गुण अवतरले आणि मग असं करत करत मनुष्यजात निर्माण झाली,असं लॅमार्क म्हणे.लॅमार्कचं म्हणणं त्या काळी खूप लोकांना पटलं,अगदी डार्विनपर्यंत. पण मग सगळंच बदललं आणि मग लोक त्याची टिंगल करायला लागले.
माणूस एपपासून निर्माण झाला हे लॅमार्कचं म्हणणं बरोबर असलं तरी या आयुष्यात कमावलेले गुण पुढच्या पिढीत जातात हे त्याचं म्हणणं मात्र नक्कीच चूक होतं.व्यायाम करून शरीर कमावलेल्याला झालेली मुलं काही दंडाचा गोळा घेऊनच जन्माला येत नाहीत.ऑगस्ट वीझमन या जर्मन प्राणिशास्त्रज्ञानं हे तपासण्यासाठी एक विचित्रच प्रयोग केला.त्यानं उंदरांच्या शेपट्या कापल्या आणि नवीन पिढीत उंदीर कापलेली किंवा आखूड शेपटीच घेऊन जन्माला येतात,की नाही हे उंदरांच्या अनेक पिढ्या शेपट्या कापून तपासलं.पण त्याला नवीन पिढीतल्या उंदरांच्या शेपट्या तशाच लांब सापडल्या.म्हणजे एका पिढीत कमावलेले किंवा गमावलेले गुणधर्म नवीन पिढीवर परिणाम करत नाहीत हे सिद्ध झालं.पण लॅमार्कची ही चूक जरी झाली असली तरी उत्क्रांतिवादाची ही एका अर्थानं सुरुवात लॅमार्कनंच केली होती! अर्थात,उत्क्रांतीची थोडीशी कुणकुण त्याला या पुस्तकात लागली असली तरी त्यानं उत्क्रांती अशा अर्थाचा शब्द त्या पुस्तकात वापरला नव्हता हे विशेष !
लॅमार्कनं ही थिअरी मांडल्यावर लॅमार्क आणि कुव्हिए यांच्यात वादावादी सुरू झाली.ती अगदी विकोपाला जाऊन पोहोचली.इतकी की शेवटी जेव्हा लॅमार्क आंधळा झाला तेव्हाही कुव्हिए ओरडला,लॅमार्कनं निसर्गाकडे नीट नजरेनं किंवा स्वच्छ डोळ्यांनी बघितलं नसल्यानंच निसर्गानं त्याचे डोळे काढून घेतले असले पाहिजेत !
लॅमार्कनं चार लग्नं केली.वयाच्या सत्तरीत त्याची दृष्टी गेली.त्या वेळेपर्यंत अनेक कारणानं त्याच्याकडचे पैसेही संपले होते.अत्यंत दरिद्री अवस्थेत तो आपल्या मुलीजवळ राहायला लागला. १८ डिसेंबर १८२९ रोजी तो वारला तेव्हा त्याच्या कुटुंबाची एवढी दयनीय अवस्था होती,की त्याला पुरायला शवपेटीही विकत घेता येईना.घरची चीजवस्तू आणि त्याच्या पुस्तकांचा लिलाव करून पाच वर्षांसाठी भाड्याने शवपेटी घेऊन पुरण्याची व्यवस्था मग कशीबशी झाली!पण कालांतरानं मात्र लीज संपल्यावर त्याचे अवशेष उकरून कचऱ्यात कचऱ्यात फेकण्यात आले आणि ती जागा दुसऱ्याला पुरण्यासाठी दिली गेली.लॅमार्कची परवड त्याच्या मरणानंतर त्याच्या अवशेषांच्याही वाट्याला आली होती!लॅमार्क दरिद्री आणि दर्लक्षित अवस्थेत मरण पावला.त्याची थिअरीही अनावश्यक अवयवांप्रमाणे आक्रसून गेली.पण या पार्श्वभूमीनं उत्क्रांतीच्या संकल्पनेला मात्र अनुकूल वातावरणनिर्मिती केली हे मात्र खरं.
विसाव्या शतकात पुन्हा जवळपास लॅमार्कचीच थिअरी रशियात लिसेंको नावाच्या शास्त्रज्ञानं पुढे आणली.कुठल्याही माणसाचे गुणधर्म हे आनुवांशिक असतात तसेच ते भोवतालच्या परिस्थितीप्रमाणेही बदलतात.पण ते फक्त बाह्य परिस्थितीप्रमाणेच बदलतात असा चुकीचा अर्थ लावण्यात आला.म्हणून बाह्य परिस्थितीमुळे प्राण्याचे गुणधर्म नुसतेच बदलत नाहीत तर ते पुढच्याही पिढीत जाऊ शकतात असंच लॅमार्कसारखं लिसेंको बोलायला लागला.
लॅमार्कच्या थिअरीज हाणून पाडण्यात कुव्हिएचाच मोठा हात होता.त्या काळातला कुव्हिए हा मोठा शास्त्रज्ञ तर समजला जायचाच,पण राजकारणातही तो चाणाक्ष असल्यामुळे त्यानं महत्त्वाची पदंही पटकावली होती.कुव्हिएची निरीक्षणं अचूक असत.तो झोपेतही अनेक प्राण्यांविषयी अस्खलितपणे बोलू शकत असे असं म्हणतात.एका (दंत) कथेप्रमाणे जरा जास्तच दारू प्यायल्यावर तो जेव्हा झोपला होता,तेव्हा त्याला घाबरवून टाकून गंमत करण्यासाठी काही विद्यार्थी मुद्दामहून कुव्हिएच्या पलंगापाशी शिंगासारखं काहीतरी लावून आले आणि म्हणाले,'कुव्हिए, कुव्हिए,आम्ही तुला खायला आलो आहोत.' तेव्हा कुव्हिए अर्धवट झोपेतच,किलकिल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाला, 'शिंगं असणारी जनावरं ही शाकाहारीच असतात,तुम्ही मला मारूच शकणार नाही' आणि एवढं बोलून तो पुन्हा चक्क झोपून गेला! ते विद्यार्थी अवाक होऊन बघतच बसले !
फ्रेंच अॅकॅडमीनं शब्दकोश बनवण्यासाठी निर्माण केलेल्या कमिटीतल्या कुणीतरी खेकड्याची व्याख्या लाल असणारा,
उलट दिशेनं चालणारा मासा अशी केली होती.कुव्हिएनं लगेच आपलं मत त्यावर व्यक्त केलं.तो म्हणाला,तीन गोष्टी सोडल्या तर ही व्याख्या बरोबर आहे.एक तर खेकडा लाल नसतो,तो उलट दिशेनं चालत नाही आणि तो मासा नाही.खरं तर लॅमार्क आणि कुव्हिए हे दोघंही चुकले होतेच.पण त्यांनी उत्क्रांतिवादाचा पाया घातला हे मात्र नाकारता येत नाही.
१३.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…