लिनियसनं सजीवांचं वर्गीकरण केलं.त्यानं सजीवांचं बऱ्यापैकी मोठ्या गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.त्या मोठ्या गटांचं पुन्हा लहान लहान गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची त्यानं एक शिडीची कल्पना केली होती.प्रत्येक सजीव या शिडीवरच्या कोणत्या तरी पायरीवर होता आणि तो कायमचाच तिथं उभा आहे.अशी त्याची कल्पना होती.
अर्थात,ही कल्पना काही त्याची स्वतःची नव्हती,तर ती अनेक धर्मांत सांगितली होती आणि शिवाय ती अॅरिस्टॉटलनंही मान्य केलेली होती.लिनियसनं एकसारखे असणारे प्राणी एका गटात घातले होते,पण ते पूर्वी कोणत्या तरी एकाच पूर्वजापासून निर्माण झाले असावेत आणि असे दोन सारखे पूर्वज त्याहीपेक्षा आणखी साध्या पूर्वजांपासून निर्माण झाले असावेत, अशी शक्यता त्याच्या गावीच नव्हती.गंमत म्हणजे लिनियसनं प्राण्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या वर्गीकरण केलं आणि त्यानं त्याच्याच कामातून पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचे प्रगत जीव निर्माण झाले असावेत असं वाटावं अशी शक्यता निर्माण केली होती.आणि तो स्वतःच साध्या प्राण्यापासून प्रगत जीव निर्माण होऊ शकतो ही गोष्ट मानत नव्हता..! बायॉलॉजीच्या क्षेत्रात आता खरं म्हणजे पूर्वी कधीही नव्हता इतका विरोधाभास आता निर्माण झाला नव्हता! त्यामुळेच जीवशास्त्रानं यापुढे जे वळण घेतलं ते बायॉलॉजीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं होतं.('सजीव' अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)
लिनियस हा स्वतः खरं तर देवभोळा माणूस होता. त्याचा बायबलवर पूर्ण विश्वास होता.त्याच्या दृष्टीनं कोणतीही स्पिशीज नामशेष होऊच शकत नव्हती.आणि नव्यानं निर्माणही होऊ शकत नव्हती.देवानं निर्माण केलेलं विश्व पहिल्यापासून तसंच आहे आणि तसंच राहणार आहे यावर त्याची अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यानं स्वतः जेव्हा सजीवांचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यानं सजीवांच्या बाह्मगुणांवरून (फिनोटाइपवरून) ठोकळेबाज रीतीनं वर्गीकरण केलं. जनुकीय पातळीवर दोन सजीवांमध्ये काहीतरी नातं असलं पाहिजे या गोष्टीचा त्यानं विचारच केला नव्हता.अर्थात,जेनेटिक्सचा उदय व्हायला एकोणिसावं शतक उजाडावं लागणार होतं.
गंमत म्हणजे त्याच वेळी इतर काही वैज्ञानिक पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचेप्रगत प्राणी निर्माण झाले असले पाहिजेत किंवा एकाच कॉमन (सामयिक) पूर्वजापासून पुढे प्राण्यांच्या दोन वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या असल्या पाहिजेत असं आता म्हणायला लागले होते.सुदैवानं नंतरच्या आयुष्यात लिनियस दोन प्राण्यांच्या संकरातून (हायब्रिडायझेशनमधून) तिसरी नवी प्राण्याची जात अस्तित्वात येऊ शकते असं मानायला लागला होता.फ्रेंच बायॉलॉजिस्ट / निसर्ग अभ्यासक जॉर्ज लुई लेने कॉम्टे दे ब्यूफाँ (१७०७ ते १७८८) यानंही यावर अभ्यास सुरू केला होता. हा एक कुतूहल जागृत असणारा,हसतमुख गडी होता.त्यानं पूर्वीच्या निडहॅमच्या आणि स्पॉटेनियस जनरेशनच्या प्रयोगांवर अभ्यास केला होता.त्या काळचा तो बऱ्यापैकी पुढारलेला वैज्ञानिक होता तरी तोही आता सारख्या दिसणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज आधी कधीतरी एकच असतील असा युक्तिवाद मांडायला धजावला नव्हता.
न्यूफॉनं नॅचरल हिस्ट्रीवर ४४ खंडांचा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) लिहिला होता.या ज्ञानकोशामुळे ब्यूफाँला प्लिनीसारखीच प्रसिद्धी मिळाली.पण प्लिनीपेक्षा ब्यूफाँचा ज्ञानकोश जास्त अचूक होता.यामध्ये त्यानं अनेक प्राण्यांना काही अनावश्यक अवयव असतात असं दाखवलं होतं.
उदाहरणार्थ,डुकरांना दोन उपयोगी खुरांच्या बाजूंना आणखी दोन निरुपयोगी बोटं असतात.कदाचित ते फार फार पूर्वी उपयोगी असतीलही,पण नंतर ते निरुपयोगी झाल्यानंतर खुरटले असतील.असं झालं असावं का? अशाच प्रकारे एखादा संपूर्ण प्राणीच खुरटला नसेल कशावरून? माणूस हा लहान झालेला एप नसेल कशावरून? किंवा गाढव हा खुरटलेला घोडा नसेल कशावरून?
इरॅस्मस डार्विन (१७३१ ते १८०२) हा इंग्लिश डॉक्टर होता.त्यानं प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्यावर मोठमोठ्या कविता केल्या होत्या.त्यात त्यानं लिनियसचं बरंच कौतुक केलं होतं.त्यात त्यानं वातावरणातल्या परिस्थितीमुळे प्राण्यांच्या स्पिशीजमध्ये बदल होऊ शकतात हेही मान्य केलं होतं.पण हा माणूस काळाच्या ओघात झाकोळला गेला.
याच्याच नातवानं,चार्ल्स डार्विननं पुढे याच विषयात कामगिरी करून उच्चांक गाठला.
ब्यूफाँच्या मृत्यूनंतर झालेल्या फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे अख्खं युरोप मुळापासून ढवळून निघालं होतं.त्यानंतर नव्या युगात नवी मूल्यं आली.यानंतर धर्म,धर्मगुरू आणि प्रार्थनास्थळं यांची मक्तेदारी कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला लागला.
यामुळे वैज्ञानिक थिअरीज सर्वांसमोर मांडणं पूर्वीच्या मानानं अधिक सोपं झालं.त्यामुळे सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल जास्त काही खोलवर जाऊन विचार करण्याची गरज नाहीये,हा ब्यूफाँचा दृष्टिकोन आता बदलला होता.काही दशकांनी फ्रेंच निसर्गअभ्यासक जाँ बाप्टिस्ट दे मोनेत शैवेलियर दे लॅमार्क (Jean Baptiste de Monet Chevalier de Lamarck) (१७४४-१८२९) यानं उत्क्रांतीचा खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा असं मत मांडलं.
या पृथ्वीवरचे जीव हे पृथ्वीच्या जन्मापासून तसेच आहेत,त्यांच्यात काहीच बदल घडलेला नाहीये आणि या सर्व जीवसृष्टीत एक शिडी आहे ही धर्मानं आणि अॅरिस्टॉटलनं शिकवलेली कल्पना अगदी १८व्या शतकापर्यंत दृढ होती.या कल्पनांना जर कोणी प्रथम विरोध केला असेल,तर तो दोन माणसांनी.त्यातला एक होता,जाँ बाप्टिस्ट दी मोने दी लॅमार्क किंवा फक्त लॅमार्क(१७४४-१८२९) आणि दुसरा होता जॉर्ज कुव्हिए.हे दोघं फ्रेंच होते हा काही फक्त एक अपघात नव्हता.त्या काळी पॅरिसमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास खोलवर चालू झाला होता.याच काळात लॅमार्क आणि कुव्हिए या दोघांनी आपले विचार मांडून पूर्वीच्या कल्पनांना धक्का दिला,
पण गंमत म्हणजे लॅमार्क आणि कुव्हिए हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते!त्यातला एक होता कणा नसलेल्या प्राण्यांचा (उदा.,गांडूळ) किंवा इनव्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ,तर दुसरा होता कणा असलेल्या प्राण्यांचा (उदा., माकड) किंवा व्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ.
पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातो हे प्रथम ओळखलं होतं ते लॅमार्कनंच.हे उत्क्रांतिवादातलं खूपच मोठं पाऊल होतं. खुद्द चार्ल्स डार्विनही ते मान्य करायचा.पण धर्म मात्र याविरुद्ध शिकवत होता.सगळंच विश्व देवानं एकाच क्षणी निर्माण केलं असल्यानं ते बदलेल कसं ?
ते बदलत असेल तर मग देवाची हे जग निर्माण करण्यामध्ये काहीतरी चूक झाली होत की काय? असा सवाल धर्मपंडित लोकांसमोर करीत.त्या काळी धर्माच्या अशा शिकवणीविरुद्ध काही बोलणं म्हणजे धारिष्ट्याचंच होतं.पण असं धाडस दाखवल्याबद्दल लॅमार्कचं कौतुक होण्याऐवजी त्याची चेष्टाच खूप झाली.
लॅमार्क हा १९व्या शतकातला जीवशास्त्रज्ञ होता. त्यानंच जीवशास्त्र (बायॉलॉजी) हा शब्दही प्रथमच वापरला.त्याचा जन्म १ ऑगस्ट १७४४ चा.एका उमराव घराण्यात तो जन्मला असला तरी त्याचे वडील मात्र दरिद्री होते.त्यांच्या ११ मुलांपैकी लॅमार्क हा सगळ्यात लहान होता.त्याच्या वडिलांनी त्यानं पाद्री व्हावं म्हणून जेझूईट कॉलेजात त्याला घातलं.पण वडील वारल्यावर १७६० साली लगेच त्यानं कॉलेज सोडलं.वडिलांनी ठेवलेल्या पैशात एक घोडा विकत घेतला आणि त्यावर टांग मारून स्वारी फ्रेंच सैन्यात दाखल झाली!
लढाईत फ्रेंच सैन्याचा दारुण पराभव झाला.फक्त १४ सैनिक शिल्लक असताना लॅमार्क अत्यंत कडव्या शौर्यानं लढत राहिला.
त्याला त्याबद्दल सैन्यात बढतीही मिळाली.पण आयुष्याच्या वाटा कशा विचित्र वळणं घेतात बघा! लढाई संपल्यानंतर आपापसात गंमती चालू असताना त्याच्या मित्रांनी कान धरून त्याला उचललं आणि त्यात त्याची मान जायबंदी झाली.त्यावर चक्क शस्त्रक्रिया करावी लागली! त्यामुळे अर्थातच त्याची सैन्यातली नोकरी सुटली.
मग आता करायचं काय? त्यानं मग अनेक उद्योग केले. त्यानं वनस्पतिशास्त्र,वैद्यकशास्त्र आणि संगीत यांचा अभ्यास केला.
बरीच वर्षं स्वतःच्याच अशातशा पद्धतीनं हवामानाचे अंदाज वर्तवून त्यानं ११ वर्षं थोडाफार पैसाही कमावला,पण त्याचे अंदाज बऱ्याचदा चुकायचेच !
याच काळात त्याची मैत्री फ्रेंच विचारवंत जिअँ जॅक्स रुसो याच्याबरोबर झाली. ते दोघं बऱ्याचदा लांबवर फिरायला जात. त्या वेळी ते वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत.लॅमार्कनं वैद्यकशास्त्रावरही दोन पुस्तकं लिहिली आणि बँकेत कारकून म्हणूनही नोकरी केली. म्हणजे काय काय वेगवेगळे उद्योग बघा!
ब्यूफाँचं लक्ष त्या काळात लॅमार्ककडे गेलं.त्यानं लॅमार्कला आपल्या मुलाला शिकवणी देण्यासाठी ठेवून घेतलं.याबरोबरच लॅमार्क हा राजाच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये जाऊन काम करायला लागला.याच काळात त्यानं बराच प्रवास करून अनेक वनस्पतींविषयी सखोल निरीक्षणंही केली.पण याच सुमारास फ्रेंच राज्यक्रांती झाली.ज्या राजवटीनं ब्यूफाँ आणि लॅमार्क यांना नोकरी दिली होती,ती राजवटच मुळी संपुष्टात आली होती.पण योगायोगानं नवीन क्रांतिकारक सरकारला कुणीतरी कीटक आणि इतर अनेक बिगर कण्याच्या प्राण्यांचा तज्ज्ञ हवाच होता.मग त्यांनी ते काम लॅमार्कला दिलं.आणि याच वेळी कणा असलेल्या प्राण्यांचा तज्ज्ञ म्हणून काम मिळालं ते कुव्हिएला. लॅमार्कनं या संधीचा पुरेपूर फायदा उठवून बिनकण्यांच्या प्राण्यांविषयी
'हिस्टरी ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांतला ग्रंथ लिहिला.
कुठल्याशा जिलेटिन किंवा तत्सम बुळबुळीत पदार्थापासून उष्णतेमुळे किंवा विजेमुळे पहिला जीव तयार झाला असावा असं लॅमार्कला वाटे.हे विचार जरी चुकीचे असले,तरी चर्चच्या शिकवणीपेक्षा हे नक्कीच वेगळं होते,त्यामुळेही त्याला विरोध झालाच.. ( शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..)